ओरीजीनल स्टोरी ची गोष्टं --- लघुकथा --- जयनीत दीक्षित

Submitted by जयनीत on 12 June, 2011 - 06:31

ते एका नवीन, एकदम ओरीजीनल कथेच्या शोधात होते.

लेखकाने त्यांना एक नवीन कथा दाखवली.

नाही हो मी ज्याच्या शोधात होतो ते हे नाही. तिकडे बघा कशा कथा लिहील्या जातात, एकसे एक! त्यांना
म्हणतात ओरीजीनल! आपल्या कडल्या एकाही कथेला त्याची सर नाही. गेली कित्येक वर्षे वाट बघतोय
अशी एखादी तरी कथा मिळावी हाताळायला म्हणून, पण आपल्या कडे कधी तशा कथा जन्माला येतील कुणास ठाउक?

लेखकाने त्यांना दूसरी कथा दाखवली.
नाही! थोड़ी चीनी कम वाटतेय.

लेखकाने त्यांना तीसरी कथा दाखवली.
नाही हो ह्यात मसाला नाही. पब्लिकला माल मसाला लागतोच हो. समजताय ना मी काय म्हणतो आहे ते?.

लेखकाने त्यांना अजून एक कथा दाखवली.
उं हूं! एंड जमला नही. असला एंड पचणार नाही आपल्या कडच्या पब्लिक ला.

हे बघा मी तुमच्या कथा बघितल्यात, खरं सांगू! तुमच्या कथा ना तिकडचा जसा ट्रेन्ड आहे तशा ही नाहीत आणी आपल्या मार्केट ची जी डिमांड असते तशाही नाहीत. एकतर तुम्ही त्यांच्या सारख्या तरी कथा लिहा नाही तर सरळ सरळ आपल्या कडे जशा चालतात तशा तरी लिहा. मी सांगतो तुम्हाला आपल्या कडे जे विषय चालतात ना त्यावर लिहा अन एक लक्षात ठेवा त्यात मेलोड्रामा हवाच हवा. थोडं स्पष्टं बोललो राग तर नाही ना आला?

नाही हो तुम्ही तुमचं मत सांगितलत हे तर चालायचंच त्यात राग कसचा? लेखक म्हणाला.

मग सांगा असं काही जमत असेल तर? लागेल तर मी विषय देतो तुम्हाला वाट्टेल तितके.

लेखक विचार करत होता कित्ती सोप्प झालं असतं ना सगळं? जर जमलं असतं लिहिणं कुणा दुस-या सारखं? थोडक्यात जर जमलं असतं जगणं स्वतः सारखं सोडून कुणा दुस-या सारखं? हे तर नेहमिचच आहे, प्रत्येकाला वेगळंच हवं आसतं. कुणाला ह्याच्या सारखं तर कुणाला त्याच्या सारखं, मग नक्की कुणा सारखं व्हायचं? पण कशाला व्हायचं? यशा साठी? कुणा दुस-या सारखं होणं ह्या सारखं दुसरं मोठं अपयश कोणतं?

नको त्याची काही गरज नाही नाही, धन्यवाद! तो म्हणाला, आणी त्याने त्याच्या कथांचे बाड उचलले.

(समाप्त)

गुलमोहर: