लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी
किती दिस झालं, आठवंना सालं
गोष्ट सांगतो मी खरीखुरी;
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||धृ||
हि असली कसली चढती महागाई
वाढत्या भावानं जीव निघून जाई
पहिल्या आठवड्यात पगार संपतो
बँक खाते अन खिसा रिकामा होतो
पैसा जावून मी जणू होतो भिकारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||१||
ह्या भाववाढीनं डोकं वर काढलं
महागाईनं आगीत तेल टाकलं
पेट्रोल सत्तर रूपये लिटर झालं
गरीबीत दिवस काढणं आलं
उसनवारी करावी लागती दारोदारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||२||
चांगलचुंगलं पोटात आता जाईना
पोरासोरांची हौस करता येईना
बायकोला सांगावं तरी काय?
गेला माझाच फाटक्यात पाय
अशीच स्थिती आहे शेजारीपाजारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||३||
महिन्याला पडतं कोनी आजारी
आठवड्याला येती पैपाव्हनं घरी
कमाईला माझे दोन हातं राहती
खायला रावनाचे दहा तोंडं असती
रिकाम्या खिशानं कसा जावू बाजारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||४||
करता येत नाही वरकमाई मला
नाही कसला जोडधंदा करायला
कामगाराची नोकरी करतो मी आता
नाही सहावा वेतन आयोग, महागाई भत्ता
रातंदिस करावी लागे कंपनीत रोजंदारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||५||
आसं वाटतं व्हावं आपन पुढारी
नाहीतर व्हावं गुंड अन मवाली
त्यांची जात असते लई माजोरी
जनतेचं पैसं खावून करती शिरजोरी
पर गरीबाला नाही कोणी वाली
त्याचं होत नाही कोणी कैवारी
म्हनून मी रोज अंथरून पाहून पाय पसरी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||६||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०११
छान लिहीतोस कि...
छान लिहीतोस कि...
शिरापुरी पुढच्या
शिरापुरी पुढच्या घरी.
रच्याकने, धोंडफोड्या मी तुझ्या कवितांच्या प्रेमात पडलोय. अशाच पाडत जा कविता.
मला पण बरी वाटली कविता..
मला पण बरी वाटली कविता..
(No subject)
(No subject)
छान
छान