गव्हाची खीर- हुग्गी

Submitted by ठमादेवी on 14 May, 2011 - 05:05

मी मराठी माध्यमात शिकले असले, मराठी वातावरणात वाढले असले तरीही माझी मातृभाषा कन्नड आहे. शिवाय घरात कन्नड-मराठी वातावरण असल्याने पदार्थही कर्नाटक स्टाईलने केले जातात. महाराष्ट्र-कर्नाटक- कोल्हापूरच्या सीमावर्ती भागांमध्ये विशेषतः कर्नाटकात या हुग्गीला एक महत्त्वाचं स्थान आहे. लिंगायतांच्या घरांमधली लग्नं हुग्गीशिवाय पूर्ण होत नाहीत. पंगतीत पत्रावळीवर हुग्गी, त्यावर तुपाची धार, भात, आमटी आणि वांग्याची भाजी हा बेत केला नाही तर लग्न अपूर्ण राहिल्यासारखं अनेकांना वाटतं.

हुग्गी -
साहित्य-
१०० ग्रॅम खपली गहू (हे गहू खिरीचे म्हणून वेगळे असतात. ते थोडे महागही असतात. मुंबईत ते मिळत नाहीत. )
५० ग्रॅम गूळ
सुक्या खोबर्‍याचा तुकडा
सुंठ
वेलची, मनुके, काजू (इच्छा असल्यास)

कृती
खपली गहू आदल्या रात्री नीट धुवून भिजत ठेवावेत. सकाळी कुकरला चांगल्या तीन-चार शिट्ट्या काढून शिजवून घ्यावेत. (हे गहू कडक असतात. त्यामुळे शिजायला वेळ लागतो. ) मग कुकर उघडून त्यातच किंवा साहित्य दुसर्‍या भांड्यात घेऊन त्यात गूळ घालावा. हा गूळ चांगला घोटवून घ्यावा. ताक करण्याची रवी किंवा पावभाजीचा स्मॅशर याच्यासाठी वापरता येईल. सुंठीची पावडर करून (ही हल्ली बाजारात तयार मिळते. बेडेकरांची उत्तम) ती घालावी. मनुके, काजू घालायचे असल्यास ते घालावेत. सुकं खोबरं किसून तेही त्यात घालावं. चांगली शिजली, गूळ मुरला की गॅस बंद करावा.

या खिरीत खरंतर दूध घालत नाहीत. पण घालायचे असल्यास खीर थोडी कोमट झाल्यावर त्यात कोमटच दूध घालावे. गरम खिरीत ते घातल्यास गुळामुळे फुटू शकतं. पूर्ण खीर खराब होऊ शकते. किंवा ताटात घेतल्यावरही दूध घालता येईल.

हुग्गी थोडी घट्टच असते. कर्नाटकात तिला पूर्णअन्नाचा दर्जा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवस झाले हुग्गी खाउन.. देशात गेलो की आईला सांगायला पाहिजे करायला..

रच्याकाने.. लिंगायतांच्या घरांमधली लग्नं हुग्गीशिवाय पूर्ण होत नाहीत. >> या भागातली जैन लग्नंपण हुग्गीशिवाय होत नाहित.

ठमादेवी काय गं तू मला सासर्‍यांची आठवण करून दिलीस. त्यांना फार आवडायची गव्हाची खीर. मी आपली साध्या पद्धतीने करायची ती खीर. ते बिचारे हुग्गी हुग्गी करून प्रेमाने खायचे. ते धारवाडला वाढले. आत्ता तू आणि रुणुझुणू जे काही "कुड कुड" करताय तसं कानडी बोलणारं भेटलं की इतके खूष व्हायचे. वर मला म्हणायचे काय गं तू....सांगलीची ना ?काहीच कसं येत नाही तुला कानडी?
असो आता तुझ्या पद्धतीने करून बघीन. ऑथेंटिक!

मला भयंकर आवडते.. आमच्याकडे ओलं खोबरं खवुन घालतात आणि गणपती आलेल्या दिवशी संध्याकाळी याच खिरीचा प्रसाद/नैवेद्य असतो.

ओ काउ कशाला धागे वर काढताय्?:राग::अरेरे: जीव जळतो, माझी अत्यन्त आवडती खीर.

खीर नक्कीच टिकेल. पण सगळ्या खिरीत दूध घालु नका. शिजवलेला गव्हाचा/ हुग्गीचा गोळा तसाच ठेऊन जरुरी पुरते दूध घालुन खीर शिजवा. नव्याने मस्त लागते. फ्रिझ नाही तर नाही पण ते भान्डे/ पातेले एका परातीत पाणी घालुन त्यात ठेवा, म्हणजे खीर खराब होणार नाही आणी गोडाच्या वासाने मुन्ग्या पण येत नाहीत.

Pages