फलश्रुती भाग ६ - ग्रेपफ्रुट

Submitted by दिनेश. on 13 May, 2011 - 08:23

खुप वर्षापुर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळी ग्रेपफ़्रुट हे नावही मी ऐकले नव्हते. ग्रेप्स म्हणजे द्राक्ष एवढेच माहीत होते. तर एका विमान प्रवासात मला हवाई सुंदरीने काय ज्य़ुस घेणार, त्यात ग्रेपफ़्रुट चे नाव ऐकल्यावर मी तोच मागितला. मला वाटलं असेल द्रा़क्षाचा रस, रंगालाही गुलाबीसर. पण पहिला घोट घेतला मात्र, तोंड प्रचंड कडवट झाले. त्यानंतर बरीच वर्षे मी या फळापासून लांबच राहिलो.

मग या फ़ळाच्या रसाबद्दल, किंवा हा रस बेस ठेवून केलेल्या डायेट बद्दल फ़ार वाचण्यात आले, मग मी परत याच्याकडे वळलो. ते फ़ार आवडते असे नाही, पण अधून मधून खायला चालते.

वरच्या फ़ोटोत दिसतेय त्यावरुन ते लिंबू वर्गातील आहे, हे वेगळे सांगायला नकोच. यात गराचे अनेक रंग असू शकतात. पांढरा, पिवळा, गुलाबी, लाल असे. पांढरा आणि पिवळा गर असणार्‍या फ़ळाबाबत सरसकट विधान करता येणार नाही. पण मी चाखलेली त्या रंगाची फळे मात्र जास्त कडवट होती.

(तर हे खास लोकाग्रहास्तव, कोरीव काम... आणि सोबत आहे ते माझे हत्यार, अर्थात कार्व्हिंग नाइफ)

आता भारतातील मंडळी याची तूलना, तोरंजन किंवा पपनस याच्याशी करणारच. आमच्याकडच्या बाजारात ते दिसते अधूनमधून. पण मला तूलनेसाठी ते मिळाले नाही. अगदी पहिला फरक असतो तो आकारमानात. हे ग्रेपफ़्रुट साधारण १० ते १२ सेमी व्यासाचे असते. पण आपले पपनस मात्र आकाराने मोठे असते. मी १८ सेमी व्यासाचे फळ, गोव्याजवळच बांदा गावी खरेदी केले होते. तोरंजनाची साल जास्त जाड असते आणि गरातल्या पाकळ्याही जास्त मोठ्या असतात. त्याचा रस काढण्यापेक्षा ते सोलून खाणे जास्त सोयीचे होते.

गणपतिच्या सुमारास हि फळे बाजारात येतात. बाजारात येणारी हिरवी असतानाच तोडलेली असतात. पण झाडावरच पिकून पिवळेजर्द झालेले पपनस मी माझ्या आजोळी खाल्ले आहे. तिथे त्याला बंपर असा शब्द वापरतात. पण या फ़ळापैकी काही खुप आंबट व मुरमुरणार्‍या चवीची निघू शकतात. दादर पश्विम रेल्वे़च्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर पुर्वी एक फ़्रुट स्टॉल होता. तिथे अप्रतिम चवीला सोललेला पपनस मिळत असे. तो फ़्रुट स्टॉल आता दिसत नाही.

तर या दोन फ़ळांचा एकेमेकांशी काय संबंध आहे, ते बघू.

तर पपनस उर्फ़ तोरंजन म्हणजेच Citrus maxima आणि परवा बघितलेले गोडे संत्रे Citrus sinensis यांच्या संकरातून ग्रेपफ़्रुट म्हणजेच Citrus paradisi निर्माण झाले असावे असा कयास आहे.
आणि हा संकर नैसर्गिक रित्याच झाला असावा, असेही मानतात.

याचे झाड १५ ते २० फ़ूट उंचीचे होऊ शकते, पण यांच्या फांद्या संत्रा मोसंब्यापेक्षा विरळ असतात. याचे फूल पांढरे आणि चार पाकळ्याचे असते. आणि बहुदा हि फळे झाडांना तीन ते चारच्या गटात लागतात. आणि हा गट द्राक्षाच्या घडासारखा दिसत असल्याने, त्याला ग्रेपफ्रुट हे नाव पडले. (हे लॉजिक मला अजिबात पटले नाही.) मोसंबी साधारण गोलाकार असते पण ग्रेपफ़्रुट मात्र देठाकडे किंचीत उभट असते.

तसे हे फळ खाण्यासाठी अगदी अलिकडे वापरात आहे (गेल्या शतकात) आणि अमेरिका त्याची अग्रेसर उत्पादक आहे. दक्षिण अमेरिकेत मात्र त्या आधीपासून खाल्ले जात होते. (एक खास बात म्हणजे स्पॅनिश भाषेत पण, याला तोरंजन असाच शब्द आहे. तिथून तो आपल्याकडे आला असेल का ?)

सध्या ते अमेरिकेबरोबरच, चीन, दक्षिण आफ़्रिका, मेक्सिको, सिरिया, इस्राईल आदी देशात उत्पादीत केले जाते.

खास बात :

मध्यंतरी ग्रेपफ़्रुट ज्यूस खुपच लोकप्रिय झाला होता. (आता विमानातही तो क्वचितच दिला जातो.) केवळ ग्रेपफ़्रुट ज्यूसवर आधारीत डाय़ेट पण फ़ार लोकप्रिय होते. हे डायेट करताना, बाकी काही बंधने पाळावी लागत नसत.

या रसाचा शरिरात होणारा परिणाम समजण्यास थोडा जटील आहे, पण थोडक्यात सांगायचे तर या रसामूळे शरीरातील काही एन्झाइम्स निष्प्रभ होतात. हे एन्झाईम्स काही वेळा, औषध शरिराला पुर्णपणे उपलब्ध होऊ देत नाही. ग्रेपफ़्रुटमूळे हे निष्प्रभ झाल्याने, औषधाची कमी मात्रा दिली तरी चालते. याबाबतीत जिज्ञासूनी जास्त माहिती अवश्य वाचावी. पण असाच परिणाम द्राक्ष आणि सफ़रचंद यांच्या रसाने पण होतो, असे पुढे सिद्ध झाले.

यातली पोषणमूल्ये :

ग्रेपफ़्रुटच्या गरात सात टक्के साखर आणि आठ टक्के कार्बोहायड्रेट्स असतात. फ़ॅटचे प्रमाण नगण्य़ असते. ब गटातल्या जीवनस्त्वांपैकी, थायमीन, रिबोफ़्लेविन, नायसीन, पॅंटोथेनीक, फ़ोलेट, ब६ असतात. पण लिंबूवर्गातील फळ असल्याने अर्थातच सी जीवनसत्व ३३.३ एम जी (१०० ग्रॅममधे ) असते. कॅल्शियम १२ एम जी असते. मॆग्नेशियम, फ़ॉस्फ़ोरस यापेक्षा पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

या रसामूळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहते. तसेच बॅक्टेरिया, बुरशी यांचाही नाश होतो, असे सिद्ध झाले आहे. (याबाबतीत हा आहार सुरु करण्यापुर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

इतर उपयोग :

याच्या सालीत एक प्रकारचे तेल असते आणि त्या तेलाचा उपयोग अरोमाथेरपी मधे केला जातो.

ते काही असो, हे ग्रेपफ्रुट व्यवस्थित सोलून पाकळ्या अलग करुन, मीठ साखर घालून पेश करतोय. या खायला.

गुलमोहर: 

लहानपणी खाल्लाय पपनस. (मी ह्याला आजही पपनसच म्हणते) आडवा चिरुन वर साखर पेरली तरच खाणं सुसह्य होतं अदरवाईज नाही. मी ह्याच्या कोणत्याही रुपातल्या वाटेला जात नाही.

मला आवडते ग्रेपफ्रूट. इथे वेगमन्समध्ये छान गोड मिळतात. पहिल्या फोटोत आहेत तशी अर्धी कापून घ्यायची आणि छोट्या चमच्याने सालाच्या बाजूने एकेक भाग बाहेर काढून खायचा. सहज निघतो.
चवीला मीठ-चाट मसाला घालता येईल.

सध्या थोडे दिवस खाणे बंद आहे. औषधांच्या परिणामांसाठी हे वाचा -
http://www.mayoclinic.com/health/food-and-nutrition/AN00413

पपनसाचं चुलत भावंड दिसतंय हे grape fruit, त्याची खास बात फारच खास आहे हं! वेगळ्याच फळाबद्दल माहिती दिल्या बद्दल तुम्हाला खूप धन्यवाद.ते carving मात्र फारच मस्त,तो चाकू खूप धारदार असेल ना? नेहेमी प्रमाणेच फोटो सुंदर आहेत.

पपनस डेंजर असतो भरपूर... त्याचं सालं जाम कडू लागतं.. सोलताना फार काळजी घ्यावी लागते.. थोडी जरी चूक झाली तरी सगळे फळ कडू लागते....

हे ग्रेपफ्रूट मस्त दिसतय.. पपनसापेक्षा थोडा डार्क रंग आहे पण..

ग्रेपफ्रुट आमच्या इथे बाहेरून पिवळा आणी आतून पांढरा मिळतो. ही व्हरायटी पण गोड असते. लहान फुटबॉल एव्हढ्या साईझ च असतं..
रच्याकने पपनसच, ग्रेपफ्रूट का??

दिनेश, लेख अगदी मस्त जमलाय. पण खुपच लहान वाटला. अजुन काहीतरी वाचायला मिळावे असे वाटतेय तोच स्विट डिश आली पुढ्यात Happy

ग्रेपफ्रुट हा शब्द मी २०-२५ वर्षांपुर्वी ऐकला पण फळ मात्र अजुनही पाहिलेले नाही. बरीच वर्षे ग्रेपफ्रुट म्हणजे फणसासारखे काहीतरी असणार असा अ. आणि अ. समज मी करुन घेतलेला. (बहुतेक ग्रेपफ्रुट = जॅकफ्रुट असे काहीतरी डोक्यात फिट झाले असणार). कालांतराने इंटरनेट आल्यावर गुगलच्या कृपेने ग्रेपफ्रुटचे दर्शन झाले, ते तोरंजनासारखे काहीतरी आहे हेही कळले पण तोरंजन मात्र नक्कीच नाही हेही लक्षात आले. मुख्य फरक सालीचा. दुसरा गराचा. तोरंजनाचा गर काय सुंदर दिसतो! आणि आत किती नजाकतीने लावलेला असतो. तो काढायचेही माझ्या जीवावर येते इतका सुंदर लावलेला असतो. (रच्याकने त्या रंगाची नी पोताची साडी घ्यायचे स्वप्न माझ्या डोक्यात कित्येक वर्षे आहे, पण ते तोरंजन खातानाच आठवते, नंतर मी विसरुन जाते Happy )

तोरंजने मात्र माझ्या खास आवडीची. तशी संत्रावर्गातली सगळीच फळे मला आवडतात पण तोरंजन पहिल्या नंबरावर. गणपतीत माझ्या घरी तोरंजन असते. गेल्या वर्षी रु. ४५ ला एक घेतलेले. यावर्षी र. ६५ तरी द्यावे लागतील असे दिसतेय. पण इथल्या तोरंजनात काही दम नाही. आंबट असतात, पोचट निघतात, गर भरलेला नसतो. पण काय करणार? प्रेमात माणसे आंधळी होतात. आंबट, पोचट कसेही असले तरी मी ते घेतेच आणि खातेच. एकदा बेंगलोरला गेले असता तेथे तोरंजने विकणारा गाडीवान दिसला. कोकणातली तोरंजने तिकडे अनोळखी प्रांतात दिसल्याचा मला इतका हर्षवायु झाला की मी चक्क दोन विकत घेतली नी मग ती प्रचंड आंबटढाण तोरंजने जमतील तितकी खाऊन उरलेली फेकुन दिली.. Happy
वाडीला गेले की तोरंजने शोधते नी खाते. तिथे अतिशय सुंदर गोड तोरंजने मिळतात.

मी पपनस खाल्लं नाहीये. बहुतेक पाहिलंही नाहीये.
ग्रेपफ्रुटचा ज्युस आणला होता एकदा. खूपच कडवट लागला.
( चित्र बघून संत्र्यालाच ग्रेपफ्रुट म्हणत असावेत असं वाटलं म्हणून घेतला होता.:फिदी:)
मग तु.क.(दुसर्‍या कुणाचे ?) झेलत झेलत आणि " ताज्या फळांचा रस करून प्यायला काय होतं? " हा प्रश्न सतरांदा ऐकत ऐकत संपवला !

संत्र्याचा कॅन्ड रस मला नेहमीच कडवट मिळालाय. मी सहसा कॅन्ड रसांच्या वाटेला जातच नाही, पण जेव्हा केव्हा गेले तेव्हा हे असे नशिब Sad

दिनेशदा, थोडी पण काही खासच माहीती मिळाली. Happy

आणि हा गट द्राक्षाच्या घडासारखा दिसत असल्याने, त्याला ग्रेपफ्रुट हे नाव पडले. (हे लॉजिक मला अजिबात पटले नाही.) >>अगदी मलाही पटले नाही हे कारण.
हा अन्याय आहे त्या बिचार्‍या वेगळ्या फळावर.

पपनस म्हणजे ग्रेपफ्रुटचे बाबा आणि संत्री म्हणजे आई..>>>>>> Happy

त्या रंगाची नी पोताची साडी घ्यायचे स्वप्न माझ्या डोक्यात कित्येक वर्षे आहे>>>>>>>> Lol

छान

मी पहिल्यांदा हॅरी पॉटरमध्ये ग्रेपफ्रुट बद्दल वाचले. त्यात ती हॅरीची मावशी ब्रेकफास्टकरता ग्रेपफ्रुट कापत असते. माझ्या डोळ्यापुढे सुरी घेऊन एका द्राक्षाचे चार भाग करणारी मावशी आली आणि म्हटलं 'ह्ये कायबाय वायलंच परकरण हाय.' ते तसंच निघालं. पपनसं खुप खाल्ल्येत. आवडीनी. एकदोनदा ग्रेपफ्रुट पण आणून झालय पण त्याच्याशी दोस्ती झालीच नाही. हल्ली जे असंख्य ज्युसेसचे प्रकार मिळतात त्यात ग्रेपफ्रुट ज्युस असतो म्हणा.

पण हे तुम्ही वर मांडलेलं माणिकजडित ग्रेपफ्रुट मस्तच दिसतय.

दिनेशदा, मला प्रथम ते पपनस वाटला. लहानपणी आम्ही खूप पपनस खायचो. बर्‍याच वर्षात नाही पाहिलं!
परत एकदा लेख आणि करगिरी लाजवाब..:)

पहिल्यांदाच ह्या फळाबद्दल ऐकलं आणि वाचलं.. Happy मजा आली.
पपनस मी पाहिलेलं नाही, फक्त ऐकलंय त्याबद्दल..
असो, दिनेश, माहीती अतिशय छान संकलित केली आहे तुम्ही..
शेवटचा फोटो एकदम तोंपासु आहे.. चव आंबटगोड असेल असं वाटतंय पाहून. Happy

पुलेशु!!

Back to top