मसाला (रोजच्या वापरातला)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 May, 2011 - 03:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मसाला १ किलोच्या प्रमाणात करायचा असेल तर
१/२ किलो संकेश्वरी मिरची (जास्त तिखट हवा असेल तर पांडी/घाटी मिरची)
१/२ लो बेडगी किंवा काश्मिरी मिरची
५० ग्रॅम धणे
६० ग्रॅम मिरी
६० ग्रॅम बडीशेप
१०० ग्रॅम राई
६० ग्रॅम खसखस
५० ग्रॅम हळद
५० ग्रॅम जिरे
१० ग्रॅम शहाजिरे
१० ग्रॅम लवंग
१० ग्रॅम दालचिनी
१० ग्रॅम बाद्यान
४ ग्रॅम मसाले वेलची
४ ग्रॅम दगडी फुल
५ ग्रॅम तमाल पत्र
६ ग्रॅम जायपत्री
४ ग्रॅम नाकेश्वर
४ ग्रॅम तिरफला
अर्धा जायफळ
छोटासा हिंगाचा खडा

मी पाच किलो मिरचीचा मसाला केला त्यात मी तिन प्रकारच्या मिरच्या घेतल्या. २ कोलो पांडी, २ किलो बेडगी आणि १ किलो काश्मिरी.

ही आहे पांडी उर्फ घाटी मिरची. मला मार्केटमध्ये संकेश्वरी मिरची चांगली नाही मिळाली म्हणुन पांडी घेतली

ही आहे बेडगी मिरची हि रंग चांगला येण्यासाठी वापरतात.

ही आहे काश्मिरी मिरची रंग लाल भडक येण्यासाठी ही मिरची घेतात. हिच्या लाल भडक रंगाप्रमाणे हि महाग असते. ही आकाराने रुंद व बुटकी असते.

हे आहे ५ किलोच्या मसाल्याचे साहित्य

क्रमवार पाककृती: 

मिरची २-३ दिवस चांगली कडक उन्हात तापवा.

१-२ दिवस तापली की जरा कुरकुरीत होते मग ती मोडायला सोपी पडते. मिरचीची देठे काढून (काही जणं नाही काढत देठे तसेही चालते, हल्ली बाजारात देठे काढलेली मिरची पण मिळते) एका मिरचीचे दोन ते तिन तुकडे करा. मिरचीचे तुकडे केल्यावर त्यातील जे बी पडते ते वेगळे ठेवायचे.

ज्या दिवशी मसाला करायचा असेल त्या दिवशी मसाल्यासे सगळे सामान कडकडीत उन्हात वाळवा. आधीपासुन वाळवले तर मसाल्यांचा वास काही प्रमाणात उडतो असे आईचे मत आहे.

प्रचि १) मध्ये हळद व बाजुला दालचिनी, तमालपत्र,जायपत्री, मिरी व बाद्यान किंवा चक्रिफुल

प्रचि २) मध्ये जिर बाजुला डाविकडुन दगडफुल, शहाजिर, लवंग, मसाले वेलची, हिंग, नाकेश्वर, जायफळ, तिरफला,

प्रचि ३) ह्यामध्ये मधल्या डिशमध्ये खसखस, दोन परातीत राई व धणे. पाठचे दोन थाळे प्रचि १ व प्रचि २ आहेत.

आता मसाला करण्यासाठी सज्ज व्हा.

हळद, हिंग खडा आणि जायफळ वेगवेगळे कुटून त्यांचे बारीक तुकडे करुन वेगवेगळे ठेवा.

मोठ्या कढईत किंवा टोपात मिरच्या भाजुन घ्या. जास्त भाजु नका नाहीतर रंग काळा पडेल. तापतील इथपत ठिक आहे. (काही जणं मिरच्या भाजत नाहीत त्या गिरणीत भाजल्या जातात असे त्यांचे मत आहे) हे जरा सहनशिलतेचे काम आहे. कारण मिरच्यांचा तिखट ठसका लागत राहतो मिरची भाजताना. तोंडाला फडके बांधुन भाजलेत तर ठसक्याचे प्रमाण कमी होईल.

मोकळ्या जागी खाली पेपर रचुन ठेवा. त्यावर भाजलेल्या मिरच्या गार करण्यासाठी ठेवा.

मिरच्या भाजून झाल्यावर राई सोडून मसाल्यासाठी लागणारे सगळे साहित्य एक एक करुन भाजा, करपवु नका. जिर, शहाजिर एकत्र भाजलत तरी चालेल, मिरी, तिरफला, नाकेश्वर असे जे एकाच आकाराचे पदार्थ आहेत ते एकत्र भाजलेत तरी चालतील. मिरचिच्या बियाही भाजुन घ्या. बाकीचे सगळे जिन्नस भाजुन झाले की मिरच्यांवर टाकुन गार करण्यासाठी ठेउन द्या.

आता राई करपेपर्यंत भाजा. करपली कि थंड करुन ती मिक्सरमध्ये वाटून एका डब्यात भरुन ठेवा. राई दळायला गिरणवाले घेत नाहीत कारण ती गिरणीला चिकटते. म्हणुन घरीच मिक्सरमध्ये काढून सोबत घेउन जायची.

आता मिश्रण गार झाले की ते स्वच्छ जाड पिशवीत भरा आणि दळायला घेउन जा. सोबर दळलेली राई न्यायला विसरू नका. मसाल्या दळणाच्या वेळा ठरलेल्या असतात. एक दिवस आधीच विचारुन या गिरणवाल्याला की मसाला कधी आणु ? (अपॉइंटमेंट घ्यावी लागते दळणासाठी )

आता गिरण वाल्याकडे मिश्रण आणि राईची पुड सोपवा आणि लक्ष ठेवा तो आपलेच दळण आपल्याला देतो का ? (हे ऑप्शनल आहे, विश्वासावर अवलंबुन आहे :हाहा:) आपली मिरची दळली की गिरणवाल्याकडे हल्ली चाळण्यासाठी बायका असतातच. मग ह्या बायका मसाला चाळतात आणि त्यात राई मिक्स करुन देतात. पुर्वी आपल्यालाच बायका मॅनेज कराव्या लागत. किंवा मग घरातलच कोणितरी चाळावी लागे. आता जर तुम्ही डबा नेला असेल तर डब्यात किंवा पिशवीत मसाला भरुन आणा.

(स्टिलच्या डब्याचा फ्लॅश मसाल्यावर पडलाय म्हणुन फोटो तिखट मानुन घ्या.)

मसाला थंड झाला की एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरुन वरुन १-२ हिंगाचे खडे ठेवा म्हणजे तो लवकर उतरत नाही. तसेच त्याच्या तुम्ही पाव किलो अर्था कोलो च्या पिशव्या भरुन मेणबत्तीने पॅक करुन ठेवलात की डब्याच्या उघडझाकीमुळे मसाल्याला हवा लागणार नाही.

इति मसाला पुराण संपुर्णम.

वाढणी/प्रमाण: 
५ किलो चा मसाला हा आमच्या दोन घरांच्या कुटुंबासाठी म्हणजे १० माणसांसाठी वर्षभरासाठी आहे आता त्यावरुन तुम्ही तुमचा अंदाज बांधा.
अधिक टिपा: 

मी जेंव्हापासुन माबोवर रेसिपिज टाकते तेंव्हापासुन मला काही माबोकर मैत्रीणी मी वापरत असलेल्या मसाल्याची रेसिपी विचारतात. त्यांना मी रोज आईला विचारुन सांगते , तिच मसाला करते अस सांगत सांगत जवळ जवळ दिड दोन वर्ष झाली. त्यासाठी पहिला मी त्या सर्व मैत्रीणिंची माफी मागते.

ह्यावर्षी मी स्वतः घरी मसाला केलाय त्यामुळे ही फोटो सकट रेसिपी मला इथे टाकता आली. अर्थात सामानाची यादी आईकडूनच घेतली.
आता काही महत्वाच्या टिप्स.

राई ही स्वाद व रंगासाठी घालतात. ती चांगली करपवुन घ्या कच्ची ठेवु नका.

तुम्हाला मसाला जर जास्त तिखट हवा असेल तर खसखस आणि धण्यांचे प्रमाण कमी करु शकता.

काही जणं ह्या मसाल्यात रश्याला दाटपणा येण्यासाठी चणाडाळही घालतात.

मसाला भाजल्यावर व दळुन आणतानाही थोडी आग होते ती सहन करायची तयारी ठेवायची.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्स्स्स्स्स्स्स्स्स्........जागु... फाआआआअर आवडला ..
माझ्या दोन बरण्यांची वॉर्डर लिहून घे पाहू.. Lol
रंग पाहूनच वेडावलय मन... तोंपासु........

व्वा... मस्तच गं जागुडे! काय कलर आलाय मसाल्याला, सही! Happy
माझी आई पण ब्याडगी आणि संकेश्वरी एकत्र करुन वापरते.
राहुरीला ती 'ज्वाला' मिरची यायची. तिला हाताळतांना आणि मिरची कांडपमधे देतांना बरोबर गोडे तेल द्यावे लागे कारण हाताची फार आग आग व्हायची.

मस्त फोटो आहेत गं....

यावर्षी मी मसाला करणार नाहीय. गेल्या वर्षी केलेला मसाला संपला पण गोडा मसाला, गरम मसाला आणि धणे जिरेपुड शिल्लक आहे. आता हे वापरुन जे काही करेन ते.. हे सगळे संपल्याशिवाय नविन काही नाही. फक्त मिरची कुटुन आणायचीय. तिखट संपलेय.

माझ्या घरी पण आई आता आता पर्यंत हे सगळे करायची. त्या दिवशी खोकून खोकून मी बेजार व्हायचो.
(पण तूमच्याकडे नाकेश्वर कुठून आले, कोल्हापूरच्या आसपासच ते वापरतात.)
आई गिरणीवर न देता डंकावरुन कुटून आणायची. त्याला अर्थातच जास्त चांगली चव येत असे.
आई तर मिरचीच्या बिया पण वेगळ्या काढत असे.
लोणच्यासाठीचे लाल तिखट मात्र, आई घरी करत असे. त्यासाठी हाताने फिरवायचे यंत्र असायचे. मद्रासी लोकांकडे कॉफी दळायला असते ते. ते मात्र चालवायला मला मजा वाटायची.

<<मसाल्याचा रंग सही आहे मी नुसताच बघणार....<<
बघणार का म्हणुन? तु ही कर की कांगारुंच्या देशात, तिथली संकेश्वरी आणि ब्याडगी घेउन! Proud

आर्ये, आमच्याकडे मी जरातरी तिखट खाते पण नवरा अजिब्बात नाही.
आणि एव्हढा खटाटोप करण्यापेक्षा जागुकडुन्च घेइन छोट्यापुडीत बांधुन Happy

जागू, तू काश्मिरी आणि बेडगी दोन्ही मिरच्यांसाठी एकच फोटो टाकला आहेस.>>> मलाही असंच वाटलं.

आणि प्रचि १) मधे त्या लवंगा नाहीयेत, तिकडे मिरी कर Happy

एवढा तिखट मसाला नुसता बघायलाच छान आहे. खाववणार नाही आणि माझ्याच्याने करून होणारही नाही. Wink

मंजु, रावी , पियापेटी, नुतन, वर्षा धन्स.

वर्षू त्यासाठी तुला घरी याव लागेल.

आर्या मी कांदा लसुण मसाला करताना थोड तेल घालते तळण्यासाठी. ह्यापुढचा मसाला कांदा लसुण मसाला करायचा आहे. मी ३ वर्षा पुर्वी हा मसाला घरी केला उत्सुकता म्हणुन. तेंव्हा प्रमाण दिनेशदांच्या रेसिपीवरुन घेतल होत. माझ्या नवर्‍याला तिखट आवडत नाही. पण चक्क हा मसाला त्यांना चटणी म्हणुन आवडला आणि तेंव्हापासुन ते मला दर वर्षी करायला सांगतात. मागच्या वर्षी करायचा राहीला. पण ह्या वर्षी करायचाच आहे.

साधना पण मसाला संपला ना ?

दिनेशदा ते मी विसरलेच लिहायला. मिरच्या मोडल्या की त्याच्या बिया खाली पडतात. मग त्या वेगळ्या ठेवुन त्याही वेगळ्या भाजुन घ्यायच्या. बदल करते. धन्स आठवण करुन दिल्याबद्दल.

गजानन फोटो बरोबर आहे. पण दुकानदाराने भेसळ केली आहे. काश्मिरी मिरच्यांमध्ये बेडगी मिरची मिक्स आहे.

मंजुडी धन्स. बदलते.

आई गिरणीवर न देता डंकावरुन कुटून आणायची. त्याला अर्थातच जास्त चांगली चव येत असे.

डंकावर कुटले की रंग कायम राहतो. चक्कीवर दळले की रंग फिका पडतो. आणि तसेही पदार्थ कुटला म्हणजेच रगडला की त्याची घटकद्रव्ये वेगवेगळी होतात, चव वाढते. मिक्सरवर दळतो तेव्हा पदार्थाचे अतिबारीक तुकडे होतात त्यामुळे आतली घटकव्ये वेगळी होत नाहीत, चवीत फरक पडतो.

एका वर्षी, मोठे डब्बे घेऊन हिंडत होतो नेरुळ बेलापुरला डंकन शोधत. मी गिरणी शोधुन ठेवलेली पण आईने ती पाहताच 'मसाला दळायचा नाहीय तर कुटायचाय' म्हणुन त्या गिरणीवर फुली मारली Happy

जागु, मालवणी मसाला संपला पण सोबत इतर केलेले ते न वापरल्यामुळे संपले नाहीत. आता आधी त्यांना संपवायचे आणि मगच सगळे नविन बनवायचे ठरवलेय.

हम्म...गावाकडे माझ्या काकुचच मिरची कांडप असल्याने आम्हाला तिकडुनच मसाला, तिखट येतं! आणि आम्ही मसाला व लाल तिखट वेगवेगळं करतो.

तसेच बिया थोड्या मिरच्यांबरोबर कांडुन जाड तिखट ही करतो. ते तळलेलं तिखट भाकरीबरोबर खायला एकदम यम्मी लागतं!

<<डंकावर कुटले की रंग कायम राहतो. चक्कीवर दळले की रंग फिका पडतो. आणि तसेही पदार्थ कुटला म्हणजेच रगडला की त्याची घटकद्रव्ये वेगवेगळी होतात, चव वाढते. मिक्सरवर दळतो तेव्हा पदार्थाचे अतिबारीक तुकडे होतात त्यामुळे आतली घटकव्ये वेगळी होत नाहीत, चवीत फरक पडतो.<<

अगदी अगदी ..जसा ठेचलेला लसुण, ठेचलेले आले चव देते तसं कितीही बारीक तुकडे केले तर देत नाही. तसच.

जागु तुझे तर उन्हाळी काम जोरात सुरु आहे ग. आत मला पण तुझ बघून जरा हुरुप आला. मसाला करणार नाही पण लोणच टाकीन ह्या २-३ दिवसात.

मीही लोणचे करणार आहे जागुसारखे. दरवर्षी बेडेकरांचे करते, यावर्षी जागु उरणकरांचे Happy

जागू, मला असं म्हणायचे आहे की ३ आणि ५ क्रमांकाचा फोटो एकच आहे (दोनदा टाकला गेला आहे).

(दोन्ही फोटोंमध्ये उजव्या खालच्या कोपर्‍यातली मिरची हत्तीच्या कानापासून तेवढ्याच अंतरावर आहे. :फिदी:)

(दोन्ही फोटोंमध्ये उजव्या खालच्या कोपर्‍यातली मिरची हत्तीच्या कानापासून तेवढ्याच अंतरावर आहे. )
Lol
आहो त्या चादरभर हत्तिच आहेत गजानन. Lol

स्वाती धन्स.

जागू, मला जिराफ दिसला. Wink

बाकी तुझी पण कमाल आहे हां. बेडगी मिरच्या आणि काश्मिरी मिरच्या चादरीवर सारख्याच ढिगात, सारख्याच अंतरावर ओतू शकलीस. Wink

अगं आता तरी कळलं का? तू काश्मिरी मिरच्यांचा म्हणून फोटो टाकला आहेस त्या बेडगी मिरच्याच आहेत. Lol

जागू ! सहीच. फोटोसकट टाकल्यामुळे बेस्ट झालं, शहाजिरे कोणते वगैरे माठ प्रश्न पडायला नकोत Happy

जागू,
इतकी सविस्तर रेसिपी टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. एवढा घोळ घालून मसाला करणे हेच जिकिरीचे काम, न त्यात आठवणीने क्रमवार फोटो घ्यायचं लक्षा ठेवायचं म्हणजे आणखीन किचकट काम.

मी बहुतेक अर्ध्या किलोच्या प्रमाणात करून पाहीन - सलग उन्हाचे दिवस इथे जून मधे सुरु होतील तेंव्हा करेन .

जागू,तू खरंच धन्य आहेस.मसाला चांगलाच झणझणीत असणारे.मी पण मसाला घरी करते पण आमच्या कडे त्यात तिखट खूपच कमी घालतात. (नावाप्रमाणेच तो 'गोडा' मसाला असतो.) तो कांदा-लसूण मसाला कसा करतात ते पण लिही ना,

>>अस सांगत सांगत जवळ जवळ दिड दोन वर्ष झाली
हो Lol

पण आला एकदाचा. Happy मस्त आहेत फोटो. मसाल्याचा रंग पण! तिकडे आल्यावर तुझ्याकडूच घ्यावा झालं!

Pages