फलश्रुती भाग ५ - संत्री

Submitted by दिनेश. on 11 May, 2011 - 07:50

नारिंगाची रसाळ गोडी, हवी कशाला ती जोडी.
या ओठांचा शराबपेला, भरला काठोकाठ.. ( विद्याधर गोखले)

लिंबूवर्गातलेच पण सगळ्यात जास्त लोकप्रिय फळ म्हणजे संत्रे किंवा ऑरेंज, किंवा मराठीत नारिंगे. (मीना प्रभूंच्या पुस्तकात असे वाचले कि दक्षिण अमेरिकेत पण याला नारिख असाच शब्द आहे.)

याचे झाड सदा हिरवेगार असते. याला पांढरी फूले जवळजवळ वर्षभर येत असतात. या फ़ूलांना आणि पानांना पण एक सुगंध असतो. फळे आधी हिरवी आणि मग केशरी रंगाची होत जातात.
आपल्याकडे मिळणारी संत्री आधी किंचीत पिवळसर असायची. पण आता त्यांचा रंग जास्तीत जास्त केशरी होऊ लागला आहे. हिरव्यागार झाडावर लगडलेल्या केशरी फळांमूळे हे झाडही फार देखणे दिसते.

सध्या दिसणारी संत्री हि काही मूळ जातींच्या संकरातून निर्माण झाली असावीत असा अंदाज आहे, पण हा संकर हजारो वर्षांपूर्वी करण्यात आला होता. चीनमधे पूर्वापार त्यांची लागवड होतेय.
पण सध्या ब्राझिल हा संत्र्याचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश आहे. (भारताचा क्रमांक तिसरा )
या संकरीत फळालाच, Citrus sinensis असे नाव देण्यात आलेले आहे. ऑरेंज किंवा नारिंगी हा शब्द तर आपण रंगासाठीही वापरतो.

जगभर संत्र्याच्या हजारो जाती जोपासल्या जातात. मला स्वत:ला अनेक देशांतील संत्री खाण्याची संधी मिळाली. लेबनॉनमधली मोठ्या लिंबाच्या आकाराची आणि पातळ सालीची संत्री अवीट गोडीची असतात. इस्रायल मधली, आकाराने भलीमोठी आणि रंगाने भडक केशरी फळे पण तशीच. संत्र्यांच्या रंगावर आणि स्वादावर स्थानिक हवापाण्याचा खुप परिणाम होतो.

आपल्याला संत्री म्हंटली की नागपूर आठवते. प्रत्यक्ष नागपूरातली संत्री पण मी चाखली आहेत. (नागपूरातच.)

आपल्याला संत्री हे नाव घेतले कि, सहज सोलता येणारे आणि आतल्या पाकळ्याही सहज वेगळ्या करता येणारे फळ आठवते. ते संत्रे खाण्यासाठी अगदी योग्य. पण रस काढण्या साठी एक वेगळी जात असते. त्याची साल सहज सोलता येत नाही आणि त्याच्या पाकळ्याही विलग होत नाहीत. पहिल्या प्रकारचे संत्रे, रसासाठी वापरले तर रस थोडा कडवट निघतो. पण आपल्याकडे पुर्वी त्याच प्रकारची संत्री मिळत असत. वरच्या फोटोत दोन्ही प्रकारची संत्री दिसताहेत.
तरीही त्या त्या देशांतील एक खास जात असतेच.

एक खास प्रकार म्हणजे ब्लड ऑरेंज यातल्या गरात रक्तासारखा लाल रंग दिसतो तर नेविल प्रकारची संत्री मार्मलेड साठी वापरली जातात.

(मोसंबीच्या लेखात जो गोंधळ झाला होता त्याचे कारण मोसंब्यांना पण अ‍ॅसिडलेस ऑरेंज असा शब्द वापरतात. पण मी ज्या फ़ळाबद्दल लिहिलेय, त्याचा उगम भारत किंवा चीनमधेच झाला, असे मानतात,)

स्वाहिली भाषेत संत्र्याला, मसिंदा असा शब्द आहे पण जगातील अनेक भाषात जो शब्द आहे, त्याचा उच्चार साधारण पोर्तुगाल असा होतो. (अरेबिक मधे प नसल्याने, त्यांच्यासाठी तो बर्तकल ) त्यामुळे स्पेन पोर्तूगाल पासून या फ़ळाचा प्रसार झाला होता, असे मानता येईल.

खाण्यासाठि संत्री :

जगभरातील हॉटेलमधे सकाळचा जो कॉंटीनेंटल ब्रेकफास्ट दिला जातो, त्यात संत्र्याचा रस
असतोच. मला मात्र रसापेक्षा ते फळ खाणेच जास्त आवडते.
पहिल्या फ़ोटोत आहे, तो माझा ब्रेकफ़ास्ट. (कोरलेले संत्रे ही पण माझीच करामत, टोस्ट केलेले
पाव. त्यावर नावालाच बटर आणि मार्मलेड )

संत्र्यातील पोषणमूल्ये

संत्र जगभर प्रसिद्ध आहे ते त्यातल्या सी जीवनसत्वासाठी. १०० ग्रॅम संत्र्याच्या गरात ४५ मिलीग्रॅम
सी जीवनसत्व असते. आणि जवळजवळ तेवढेच कॅल्शियम. ९ टक्के साखर असली तरी त्यात थायमीन,
रिबोफ्लेविन, नायसिन, फ़ोलेट आधी ब गटातील जीवनस्त्वे असतात. शिवाय लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम.
फ़ॉस्फ़ोरस आणि झिंक पण असतात. पण हे फळ आम्लधर्मी असते हेही लक्षात ठेवायला हवे.

संत्र्यापासूनचे पदार्थ

संत्रापासून अनेक पदार्थ केले जातात. जॅम, स्क्वॅश, जेली वगैरे. पण सगळ्यात खास पदार्थ असेल तर तो
मार्मलेड. यात संत्र्याच्या गराबरोबरच संत्र्याच्या साली पण बारिक कापून वापरलेला असतात. खास मार्मलेड मधे जास्त कडवतपणा येण्यासाठी, संत्र्याच्या बिया पण पुरचुंडीत बांधून शिजवतात.

(संत्र्याच्या साली नियमित पणे आहारात असणार्‍या लोकांनी, आहारात अ जीवनस्त्व ठेवणे जरुरीचे असते,
कारण, सालीतील सायट्रल हा घटक अ जीवनसत्वाचा नाश करतो.) पण नुसत्या जॅमपेक्षा मार्मलेडची चव नक्कीच अनोखी असते.

आपल्याकडच्या रसना सरबतात, हा अगदी पहिल्यांदा बाजारात आणलेला स्वाद होता आणि तो सर्वात जास्त लोकप्रिय आहे. टॅंग सरबतात पण हाच स्वाद जास्त लोकप्रिय आहे. (पण या दोन्ही प्रकारात संत्राच्या स्वादाचेच दोनतीन प्रकार उपलब्ध आहेत.)

आपल्याकडे आधीपासून लोकप्रिय असलेला गोल्ड स्पॉट हा पण संत्र्याच्याच स्वादाचा तर फ़ंटामधेही
तो स्वाद आहेच. लहान मूलांच्या गोळ्यांतही हा स्वाद आहे.

नागपूरच्या संत्रा बर्फ़ीला विसरून कसे चालेल. पुर्वी साखरेचे क्यूब्ज संत्राच्या सालीवर घालून, ती साखर वापरुन माव्याची बर्फ़ी केली जात असे. (ती ओरिजिनल.) पण हल्दिरामकडे मिळणारी’ संत्रा बर्फ़ी मात्र, कोहळ्यापासून केलेली असते. (त्यात भरपूर रंग व स्वाद घातलेला असतो.)

संत्र्याचा मोरंबा, संत्र्याचा भात, रबडी हे पण लोकप्रिय प्रकार आहेत. संत्र्याच्या सालीचा मोरंबा किंवा पाकवलेली साल हा केक मधला महत्वाचा घटक. नाताळाच्या पुडींगमधला तर तो एक महत्वाचा घटक.

इतर उपयोग :

संत्र्याच्या सालीचा उपयोग सौंदर्यप्रसाधनातही केला जातो. फ़ेस पॅक, केसांना लावायचे लेप आदी उत्पादनात साल वापरतात. संत्र्याच्या सालीपासून काढलेले तेल, साबण उद्योगात वापरतात.
संत्र्याच्या फूलांना पण सुंदर गंध असतो. त्या फूलांपासून केलेले ऑरेंज ब्लॉसम वॉटर हे अरब लोकांत खाद्यपदार्थ सुगंधी करण्यासाठी वापरतात.

गुलमोहर: 

आहाहा.. मार्मलेड,टोस्ट आणी संत्र्याचा रस... वॉव.
इतकं सुरेख कोरलय... दिनेश दा.. परत म्हणेन्-तुस्सी ग्रेट्ट हो!!!!
माझं सर्वात आवडतं फळ आहे हे Happy आणी ते सोलून खायला अजून छान लागतं
पूर्वी भारतात अमूल चॉकलेट मी फक्त संत्र्याच्या फ्लेवर वालं खात असे

संत्र्यावरील कोरीव काम सुंदर आहे. पण दुसर्‍या फोटोत दिसतंय ते Llife narrated by David Attenboriugh हे पुस्तक आहे का? आणि ते कुठे मिळेल?

मस्त Happy

पहिला फोटो जाम आवडला... लेखही एकदम मस्त.

मला संत्र्याचे मार्मलेड खुप आवडते. त्यात संत्र्याच्या सालीचे उभे तुकडे असतात ते तर जाम आवडतात.

तुम्ही मागे संत्रा चिकनची रेसिपीही टाकलेली.

साधना टायपो होता, सुधारला.
काही दिवसांपुर्वी जयावी ने फेसबुकावर फूड कार्व्हींगचा व्हीडीओ टाकला होता (तिच्या नव्हे.) म्हणून मला हुक्की आली. एकेकाळी फार हौस होती, पण मधे बरीच वर्षे केले नव्हते. आता परत सुरु केलेय. तेव्हा, आता मारा होणार. तयार रहा.

माहिती तर नेहमीप्रमाणेच उपयोगी.
पण त्या कार्व्हिंगच काहीतरी करा बुवा. हे संत्र्याचं कार्व्हिंग हा एक टीझर असेल अशी आशा करावी का? आता स्टेप बाय स्टेप अजून कार्व्हिंग्ज येऊ द्या.

नेहमीप्रमाणे छान लेख Happy

उत्तरेकडे एक किनू नावाचे संत्र्यासारखे फळ मिळते.... त्याची साल सैलसर असते आणि ते अतिशय गोड असते.

एकदा टँगरिन नावाचे संत्र्यासारखे फळ आणले होते. मला वाटतं ते भारतात पिकत नाही. ते सुद्धा खुप छान रसाळ आणि गोड होते.

आपण मोरांबा बनवतो तसा संत्र्याचा मोरांबा वगैरे बनतो का?

नेहमीप्रमाणे अप्रतिम.. Happy कोरीवकामपण फारच भारी. फोटो पाहिल्यापाहिल्या विचार केलेला हे कोणी केलं असेल बरं? आणि मग लेखात कळुनच गेलं.. Happy माझं आवडतं फळ आहे संत्र. नविन माहिती मिळाली.. Happy धन्यवाद दिनेशदा..!

सुरेख माहीती.. Happy फोटो सुद्धा अप्रतिम दिनेश..
संत्र्याच्या सेवनाने बी एम आर वाढतो असं ही ऐकलंय मी..

कार्व्हिंग करण्यासाठी एक खास कार्व्हिंग नाईफ मिळते. पण साध्या टोकदार सुरीने पण करता येते. सालीच्या जाडीचा अंदाज घेत घेत ते करायचे असते. यात थेट फळावरच काम करावे लागते. फळाचा आकार आणि वरचा व आतला रंग लक्षात घेऊन ते करायचे असते. हाताला थोडे वळण असले तर फार कठीण नाही.
डिजे चा तर हात डिझाईनमधे बसलेला आहे, त्यामूळे अजिबात कठीण जाणार नाही. पुढच्या लेखात आणखी नमुने टाकीन.

आणि यात फळ वाया जात नाही !!

दिनेश, आज संत्र खाताना तुमच्याकडून फूर्ती घेऊन थोडासा प्रयत्न केला. तुमच्यासारखा फिनेस अजिबात नाही पण तरीही पोस्ट करते. Happy

Orange.jpg

नेहमीसारखीच उपयुक्त माहिती
कार्व्हिंगबद्दल प्रश्नच नाही ..... सुंदरच.
त्यामुळे स्वाभाविकच काही प्रतिसाद
संत्र्याच्या माहितीपेक्षा कार्व्हिंगकडेच
जास्त झुकलेले दिसतात.