रूपक कथा - १

Submitted by zaad on 29 April, 2011 - 15:12

"...एक विचारू?"
उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणालं.
"हं."
"मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय...पण.."
"पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?"
"..हो."
"अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या.."
" पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?"
"हो! आणि इतक्या उंचीवरून आता खरं तर ही लहान झाडंच ज्यास्त सुंदर दिसतात..."

...आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला!!

गुलमोहर: 

छान.
लहान पण महान..........
खुप वेगवेगळे अर्थ निघतिल ह्या अशा कथांमधुन.......................

zaad..छान ! मला आवडली कथा, पण थोडी फुलवता आली असती का? थोडा अजुन संवाद असायला हरकत नव्हती असे मला वाटते ज्यातुन 'स्वप्न आणि सत्य' यांची लपाछपी साधता आली असती.

बेफिकीरजी,

रूपक कथा म्हणजे ज्या कथेमधून किमान २ अर्थ निघू शकतात. पहिला अर्थ हा सरळसरळ त्या कथेतलाच आणि दुसरा अर्थ हा आयुष्यावर किंवा आयुष्यातल्या कुठल्याहि वास्तव गोष्टीवर भाष्य करणारा असतो. इसापनीती मधल्या कथा रूपक कथांचं सगळ्यात सुंदर असं उदाहरण म्हणून सांगता येतील. झेन कथा, जातक कथा, महानुभावी साहित्यामधले काही दृष्टांत हे सगळं साहित्य देखील रूपक कथांमधेच येतं.
आशयाच्या दृष्टीने कवितेशी तुलना नेहमी करता येईलच असे नाही. कारण खांडेकरांची 'ययाती' ही कादंबरी एक रूपक कथाच समजली जाते. खेडोपाडी पुर्वापार चालत आलेल्या, आज्या-पणज्यांच्या तोंडून ऐकलेल्या कित्येक दंत कथा देखील अशाच असायच्या. ह्या कथांचा शोध किंवा कथेच्या ह्या तंत्राचा शोध कसा लागला हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरू शकतो. पण परकीय आक्रमणांच्या काळात, ज्याला समजायचंय त्यालाच ते समजेल अशा स्वरूपात लिहिलेल्या ह्या कथा. महानुभाव पंथाचं साहित्य हे याचं एक मूर्तिमंत उदाहरण.
मात्र, 'जे सांगायचंय ते सरळ न सांगता आडवळणाने सांगणारी कथा म्हणजे रूपक कथा' अशी व्याख्या करणं हे अत्यंत वरकरणीपणाचं आणि अरसिकतेचं लक्षण ठरेल. अजून अस्सल रूपक कथा वाचायच्या असतील तर नेमाड्यांचं हिंदू वाचा. अहाहाहा! काय अप्रतिम रूपक कथा घेतल्या आहेत त्यात एक से एक! Happy
असो! एवढी टकळी पुरेशी आहे अशी आशा करतो!! Happy