"आई, मग काय विचार केलास तू? की अजुनही तुझा हट्ट कायमच आहे?" तन्मयने काकुळतीला येवुन विचारले.
"नाही, तेवढं सोडून बोला. हे मी कधीच मान्य करणार नाही." गायत्रीबाई आज अगदी हट्टालाच पेटल्या होत्या.
"आई, पण का आणि कशासाठी हा हट्ट? आम्हा पोटच्या पोरांपेक्षा तुझा हा शंभु तुला जास्त प्रिय आहे का? आणि आम्ही जे काही करतोय ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठीच करतोय ना?" चिन्मय गेल्या चार दिवसात प्रथमच या वादात पडला होता.
"यात कसलं हित साधणार आहात तुम्ही? शंभुमुळे चार माणसं येतात, एकत्र जमुन बोलतात. एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेण्याचा प्रयत्न करतात. तर त्यात आपल्याला किंबहुना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्लीज एक ल़क्षात ठेवा, जसे तुम्ही माझी मुले आहात तसेच शंभुदेखील माझे अपत्यच आहे. तुमच्याएवढा सक्षम नसेल तो, पण कदाचित म्हणुनच तो मला जास्त प्रिय आहे. म्हणतात ना आईला आपले सगळ्यात दुबळे मुलच जास्त जवळचे असते, तसं समजा हवं तर. हे बरंय तुमचं, त्याला बिचार्याला काही बोलता येत नाही, तो तुम्हाला विरोध करू शकत नाही म्हणुन केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आज तुम्ही त्याला घालवायला निघाला आहात. हे मला मान्य नाही. कृपया कुणीही शंभुला माझ्यापासुन दुर करण्याचा प्रयत्न करु नका. मला ते कधीही मान्य होणार नाही."
गायत्रीबाई आपल्या निर्णयावर ठाम होत्या.
"मी मधे बोलु का थोडे तन्मय?" तनयानेही संभाषणात भाग घेतला.
तन्मयने प्रश्नार्थक मुद्रेने तनयाकडे पाहीले...., त्याच्या कपाळावरच्या आठ्या जाणवल्या तशी तनया गप्प झाली.
"बोल, कदाचित तुझे तरी ऐकेल ती?"
"मी काय म्हणते तन्मय, जर समजा शंभु राहीला इथेच आपल्याबरोबर तर काय हरकत आहे? काय गं चिन्मयी तुला काय वाटते?"
तनयाने चिन्मयीकडे, आपल्या जावेकडे बघत विचारले. तशी चिन्मयीने होकारार्थी मान हलवली.
"मला पटतेय वहिनी तुमचे म्हणणे."
"काय्य? तनु..आता तू सुद्धा? अगं त्याच्यामुळे बाहेरची कितीतरी माणसे आपल्या घराच्या आवारात येत राहतात. बाबा होते तोपर्यंत ठिक होतं पण आता आई एकटीच असते. कधी काही भलतं सलतं घडलं तर?"
"दहा वर्षे झाली त्यांना जावून! काही झालय का या दहा वर्षात? तूझ्या मनात उगाचच भलते सलते विचार येताहेत हा तनु!" गायत्रीबाई पुन्हा कुरकुरल्या.
"काळजी वाटते गं आई! आम्ही सगळेच तिकडे लांब अमेरिकेत. तू एकटीच असतेस इथे. तुला तिकडे ये म्हणलं कायमची तरी येत नाहीस. मग तिथे कायम आम्हाला काळजी लागुन राहते गं!"
तन्मयची काळजी खरोखर जेन्युइन होती. त्याचं बोलणं ऐकलं आणि गायत्रीबाई हलकेच हसल्या.
"अरे वेड्या, मला कळत का नाही? पण या वास्तुत त्यांच्या सगळ्या आठवणी आहेत रे? शंभुलादेखील तेच घेवुन आले होते. त्यांचा खुप जीव होता शंभुवर. त्यामुळे तर आता त्याला दुर करणे जिवावर येतेय राजा."
गायत्रीबाई आपल्या यजमानांच्या आठवणीने हळव्या झाल्या. तसे तन्मय हलकेच पुढे येवून त्यांच्या शेजारी बसला, त्याने आपले डोके त्यांच्या खांद्यावर हळुवारपणे टेकवले.
"ठिक आहे आई, तुच सांग काय आणि कसे करायचे ते? शंभुची कशी व्यवस्था करायची ते?"
गायत्रीबाईंनी हळुवारपणे आपले दोन्ही डोळे मिटून घेतले आणि हळु-हळु भुतकाळात शिरण्याचा प्रयत्न करू लागल्या.
**********************************************************************************************************
साधारणतः दोनेक दशकांपुर्वींचा काळ....
श्री. दिवाकर सबनीस आणि त्यांची पत्नी गायत्री, त्यांची दोन मुले तन्मय आणि चिन्मय असं सुखी, समाधानी चौकोनी कुटुंब.
दिवाकरराव स्टेट बँक ऑफ इंडियात ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. नाशकात छावणीच्या भागात सुरेखसा छोटेखानी बंगला होता. दोन्ही मुले अतिशय हुशार होती. मोठा तन्मय एम.टेक. करून अमेरिकेला गेला आणि धाकट्या चिन्मयने आय.आय.एम. करुन यु.एस. मध्येच एका मोठ्या कंपनीत नोकरी पटकावली. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दोघेही दिवसें दिवस प्रगती करत होते. नंतर हळु हळु दोघांचीही लग्ने झाली अगदी आई वडीलांच्या पसंतीने, भारतीय पद्धतीप्रमाणे. दोघे ही आपापल्या क्षेत्रात स्थिरावले होते. सुरेख चालले होते दिवस....
सुरूवातीचे काही दिवस खुप छान होते. आनंदाचे होते. आमची दोन्ही मुले परदेशात चांगल्या ठिकाणी, चांगल्या हुद्द्यावर आहेत. ही भावना दिवाकरराव आणि गायत्रीताई दोघांनाही विलक्षण सुखावून टाकत असे. नातेवाईकांना, आप्तांनाही त्याबद्दल एक प्रकारचे असुयायुक्त कौतुक वाटायचे.
जेव्हा बरोबर काम करणारे गांगल म्हणायचे...
"तुम्ही मोठे नशिबवान हो, दिवाकरराव. तुमच्या दोन्ही चिरंजिवांनी नाव काढले तुमचे. दोघेही एवढ्या मोठ्या कंपन्यातुन , इतक्या मोठ्या हुद्द्यावर काम करताहेत. तुम्हाला एकदम कर्तव्यपुर्ती झाल्यासारखे, अगदी कृतार्थ वाटत असेल नाही?"
हे ऐकले की दिवाकररावांचे मन आपल्या मुलांबद्दलच्या अभिमानाने भरुन यायचे. दिवस कसे भरकन उडून गेले कळायचेच नाही. कालपर्यंत अंगा-खांद्यावर खेळणारी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणारी ही मुले किती मोठी झाली. साता समुद्रापार भविष्य उजळायला निघून गेली. याचे त्यांना खुप कौतुक वाटायचे. पण जसजसे दिवस जायला लागले, मुले त्यांच्या करियरमध्ये व्यस्त होत गेली तसे फरक जाणवायला लागला. आधी सहा महिन्यातून एकदा भारतात चक्कर मारणारी मुले...मग तो कालावधी हळुहळु ९ महिने, मग १ वर्ष मग कधी त्याहीपेक्षा जास्त काळ अंतर पडायला लागले. आयुष्याची संध्याकाळ जवळ आली तसतसे दिवाकररावांना हा एकलेपणा फार जाणवायला लागला. त्याक्षणी त्यांना जाणीव झाली निवृत्त होइपर्यंत का होइना पण आपल्याला निदान बँक, इथली कामे, समस्या..., हजार गोष्टी आहेत मन रमवायला. पण गायत्रीचे काय? चिन्मयच्या जन्मानंतरच तिने आपली नोकरीही सोडून दिली होती. तेव्हापासुन आजपर्यंत घर, मुले आणि संसार यातच तिने स्वतःला गुंतवून घेतले होते.
अशातच एके दिवशी दिवाकरराव सकाळचा आपला चालण्याचा व्यायाम आणि पेन्शनर्सचा कट्टा आटपून घरी परत आले. त्यांच्या हातात एक कापडाची छोटीशी पोटली होती. अगदी जपुन धरली होती त्यांनी. गायत्रीबाईंना कुतुहल वाटले. आपला नवरा सकाळी सकाळी काय घेवुन आला असेल एवढे जपुन?
"काय हो, काय आहे त्या कापडात? एखादं लहान बाळ असल्यासारखं जपताय ते त्याला."
चहाचा कप दिवाकरांच्या समोर ठेवत गायत्रीबाईंनी विचारले. तसे दिवाकरराव गालातल्या गालात हसले.
"हो लहान बाळच आहे. त्याच्या आईने नाकारलं त्याला, म्हणुन मी त्याला आपल्या घरी घेवुन आलोय. बघ, जमेल तुला? होशील त्याची आई?"
तश्या गायत्रीबाई घाबरल्या. दिवाकररावांच्या उपद्व्यापी स्वभावाची त्यांना सवय होती. गेली कित्येक वर्षे त्या दिवाकरांची सगळी हौस, सगळे शौक जपत आल्या होत्या.
"अहो कायतरीच काय? कुणाचं लेकरु उचलुन आणलत आता? अहो, आईच ती! कावली असेल क्षणभर पण म्हणुन काय पोटच्या पोराला टाकून देतं का कुणी? आधी ते लेकरु ज्याचं त्याला परत करुन या बघु."
"अगं, अगं आधी बघशील तरी की नाही लेकराला."
दिवाकरांनी तो कपडा उलगडला. त्यात एक छोटंसं...
छोटंसंच पण हिरवंगार रोप होतं.....!
गायत्रीबाईंनी ते बघीतलं आणि हसायलाच लागल्या.
"केवढं घाबरवुन सोडलंत मला. मी म्हटलं खरोखरच कुणाचं लेकरु घेवुन आलात की काय? तुमचा काही भरवसा देता येत नाही बाई. कसलं रोप आहे? आपल्या परसात लावु या आपण आणि हो या पिल्लाची मात्र आनंदाने आई होइन बरं मी."
"मला खात्री होती गं, म्हणुनच घेवुन आलो. अगं झालं काय, ते नाईक आहेत ना. त्यांच्या अंगणात उगवलं होतं हे उंबराचं रोपटं. आज सकाळी बागेला वाफे करताना चुकुन उखडलं गेलं. असंही आपल्याकडे उंबराचं झाड कोणी अंगणात लावत नाही, त्याची फार पथ्ये असतात म्हणे. म्हणुन नाईक ते फेकुनच द्यायला निघाले होते. मी म्हणलं द्या, मी घेवुन जातो त्याला आणि आणलं झालं. बघ तुला चालेल ना उंबराचं झाड अंगणात?"
"न चालायला काय झालं? अहो, पथ्ये कसली, सगळी खुळं आहेत झाली आपल्या अंधश्रद्धाळु लोकांची. हा.., आता झाड मोठं झाल्यावर त्याचा कचरा खुप होतो अंगणात. उंबराची फळं, वाळलेली पानं वगैरे प्रचंड कचरा होतो. पण लेकराने कचरा, पसारा करायचा आणि आईने तो आवरायचा हा नियमच आहे ना विधात्याचा. मी करीन त्याचं सगळं."
गायत्रीबाईंनी ते उंबराचं रोप उचललं आणि लगबगीने परसदाराकडे गेल्या. तसा दिवाकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आता निदान महिनाभर तरी गायत्रीबाई त्या रोपाच्या देखभालीत मग्न राहणार होत्या. त्यांची नेहमीची एकटेपणाची तक्रार काही अंशी का होइना कमी होणार होती. त्यांच्या डोळ्यातली ती एकटेपणाची उदास जाणीव आता किमान महिनाभरतरी दिसणार नाही या आनंदाने दिवाकरराव सुखावले. गेले काही दिवस गायत्रीबाई फारच उदास राहायला लागल्या होत्या. तसे दर दोन दिवसाआड मुलांचे, सुनांचे फोन असत. पण शेवटी प्रत्यक्ष सहवासाचा जिवंतपणा फोनवर थोडाच अनुभवता येतो? पण काही काळ का होइना गायत्रीबाई आता त्या रोपट्याच्या सरबराईत रमतील या कल्पनेने दिवाकरराव जरा शांत झाले. त्यांनी हलकेच डोळे मिटून घेतले व आरामखुर्चीच्या पाठीवर थोडेसे रेलुन निवांत झाले.
गायत्रीबाई तृप्त मनाने आपल्या नवर्याकडे बघत होत्या. एवढी काळजी करणारा जोडीदार मिळणे ही पण पुर्वसंचिताचीच गोष्ट ना. दिवाकरपंतांची ही सगळी धडपड त्यांना कळत का नव्हती? त्यांना पक्के माहीत होते... नाईकांचे केवळ नाव पुढे केलेय दिवाकरांनी. त्यांनी नक्की कुठूनतरी, एखाद्या नर्सरीतुन हे रोप विकत वगैरे आणलेले असणार. गायत्रीबाईंची झाडा-झुडपांची आवड त्यांना पक्की माहीत होती. निदान त्या निमीत्ताने का होइना आपण आपला एकटेपणा, उदासी विसरावी, आपल्याला थोडे समाधान लाभावे यासाठीच आपल्या नवर्याचा हा सगळा आटापिटा चालला आहे हे न कळण्याइतक्या गायत्रीबाई दुधखुळ्या नव्हत्या. पण म्हणुनच आज त्यांना खुप आनंद झाला होता. या वयातदेखील आपला नवरा आपल्याला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी धडपडतोय ही गोष्ट त्यांना प्रचंड सुखावून गेली होती आणि म्हणुनच त्यांनी मनाशी पक्का निर्धार केला होता, मनोमन आपल्या नवर्याला वचनच दिले होते म्हणा ना...
"मुला-बाळांचा विरह ही अशी विसरता येण्यासारखी बाब नव्हती. पण यापुढे कधीही आपण आपल्या चेहर्यावर ती उदासी, ते दु:ख दिसू द्यायचे नाही. दिवाकरना आपल्या चेहर्यावर कायम प्रसन्नपणा दिसला पाहीजे हे त्यांनी मनाशी पक्के ठरवुन टाकले होते. शेवटी मनातली वेदना दडवून वरवर हसत राहणे हे त्यांच्या स्वभावातच होते. किंबहुना प्रत्येक स्त्रीचे तेच तर वैशिष्ठ्य असते. ही एक गोष्ट अशी आहे की जी स्त्रीया लिलया करु शकतात तर पुरुषांना ती बर्यापैकी अवघड जाते."
त्या दिवसापासून गायत्रीबाईंनी स्वतःला आजुबाजुच्या गोष्टीत गुंतवून घेतले होते. त्यात दिवाकरांनी आणलेले हे नवीन रोपटे हे एक चांगलेच साधन ठरले होते.
"मग काय म्हणतं तुझं ते उंबराचं झाड?"
एके दिवशी जेवण झाल्यावर नॅपकिनने हात पुसता पुसता दिवाकररावांनी हसत हसत आपल्या बायकोला विचारले, तशा गायत्रीबाई उसळल्या.
"शंभु...शंभु नाव ठेवलय मी त्याचं! याच्यापुढे त्याला शंभु म्हणायचं कळलं?"
"कमाल आहे. झाडाचे सुद्धा नाव ठेवलेस तर!"
"झाड नाही, माझं धाकटं लेकरुच आहे आता ते. यापुढे त्याला त्याच्या नावानेच हाक मारायची."
गायत्रीबाई आपल्या कामाला लागल्या....
दिवस जात होते. गायत्रीबाई आणि दिवाकरराव आपल्या त्याच त्या आयुष्यात हळुहळु स्वतःला गुंतवून घेत होते. दरवर्षी सुट्टीत चिन्मय आणि तन्मय आठवणीने आपल्या मुला-बाळांसकट यायचे. महिनाभर राहून धमाल करायचे. प्रचंड आनंदात जायचा तो महिना गायत्रीबाईंसाठी. जोडीला शंभुही वाढत होता. आता त्याने हळु-हळु आकार धरायला सुरूवात केली होती. वयाबरोबर त्याचा पसाराही वाढत चालला होता. गायत्रीबाईंसाठी तर तो खरोखरच त्यांचा तिसरा मुलगाच झाला होता. दिवाकरांना वाटलेही नव्हते इतक्या गायत्रीबाई शंभुशी एकरुप झाल्या होत्या. मुले यायची तेवढा एक महिनाच काय तो शंभु जरा एकटा पडायचा. नाहीतर गायत्रीबाई कायम त्याच्या बरोबर असायच्या. मुलांनीही आता गायत्रीबाईंचे हे शंभुप्रेम स्विकारले होते. आधी त्यांना थोडे विचित्र वाटले खरे. पण सुदैवाने चिन्मय, तन्मय आणि त्यांच्या बायकाही समंजस होत्या. आईच्या मनाची घालमेल अगदी व्यवस्थीत त्यांच्यापर्यंत पोचत होती त्यामुळे त्यांनीदेखील शंभुला आता आपल्या कुटुंबांचा एक सदस्य म्हणुन स्विकारले होते. प्रत्येक वेळी भारतात आले की दोघेही दिवाकर्-गायत्रीच्या मागे लागायचे आता चला तिकडे. अजुन किती दिवस असे आमच्यापासुन दूर राहणार म्हणुन. पण दिवाकर आणि गायत्रीबाई दोघांनाही मायदेश सोडून जिवावर यायचे. आतातर दोघांनाही शंभूचा इतका लळा लागला होता की त्याला इथे सोडून परदेशात निघून जायचे ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. गायत्रीबाई तर चक्क तासन तास गप्पा मारायच्या शंभुबरोबर. आधी लोकांनी दिवाकरांना सल्लेही दिले एखाद्या मानसोपचार तज्ञाची भेट घेण्याचे. पण मग जेव्हा गायत्रीबाईंची उत्कटता, त्यामागची गहिरी भावना लक्षात आली तेव्हा लोकांना त्यांचे कौतुक वाटायला लागले. शंभुबरोबर त्याची इतरही भावंडे लाडा-कोडात वाढत होती गायत्रीबाईंच्या अंगणात. पण शंभूची ऐट काही वेगळीच होती. अशातच तो दिवस आला......
काळ कुणाला चुकलाय? एके दिवशी तृप्त समाधानी मनाने दिवाकरांनी इहलोक सोडला. पण जाताना मनात एक समाधान होते की आपल्यामागे गायत्री एकटी राहणार नाही. अगदी मुलांबरोबर जायचे तीने नाकारले तरीदेखील शंभु कायम तिच्या बरोबर असेलच. आणि तसेच झाले....
गायत्रीबाईंनी मुलांबरोबर जाण्याऐवजी इथे एकटीन राहण्याचा पर्याय स्विकारला. या वास्तुत, या परिसराच्या कणा-कणात त्यांचा दिवाकर व्यापुन राहीलेला होता. तो अदृष्य स्पर्श, ती दिवाकरांच्या सतत सोबत असण्याची जाणीव तिथे परदेशात थोडीच येणार होती. आणि पुन्हा दिवाकरांनी त्यांच्या हाती सोपवलेलं त्याचं धाकटं लेकरु , त्यांचा शंभु होताच की सोबत. गायत्रीबाई आपल्या शंभुबरोबर मागेच राहील्या.
***************************************************************************
दिवसामागून दिवस, महिने...वर्षे उलटून गेली. दिवाकररावांना जावून जवळ जवळ दहा वर्षे उलटली होती. शंभू या घरात आला त्यालाही १४-१५ वर्षे होत आली होती. आता शंभुचे रुपांतर एका देखण्या, डेरेदार वृक्षात झाले होते. अजुन काही वर्षांनी त्याला फळे यायला सुरूवात झाली असती. गायत्रीबाईंनी शंभुच्या पायथ्याशी एक छान पार बांधून घेतला होता. दिवाकरांच्या हयात पेन्शनर मित्रांचा कट्टा आता शंभुच्या कुशीतच भरायला लागला होता. दिवाकरांचा अंदाज अगदी खरा ठरला होता. शंभुने गायत्रीबाईंचा एकटेपणा पार नाहीसा करून टाकला होता. रोज सकाळ संध्याकाळ कितीतरी पेन्शनर्स गायत्रीबाईंच्या अंगणात शंभुच्या सहवासात जमायला लागले. गायत्रीबाईंनी आपल्या अंगणाला मागच्या बाजुने देखील एक फाटक बनवुन घेतले होते. सकाळ संध्याकाळ फिरायला येणारे-जाणारे आता हळु-हळु शंभुच्या सोबतीला क्षणभर विसावू लागले होते. गायत्रीबाईंचा वेळ छानच जात होता.
पण नेमकी हिच बाब मुलांच्या काळजींचे कारण बनली होती. कारण ते तिकडे परदेशात असत, इथे आई एकटीच. शंभुमुळे घरात लोकांचा वावर वाढलेला. पण लोकांच्या वाढलेल्या वावराबरोबर एक असुरक्षिततेची भावनाही मुलांच्या मनात निर्माण झाली होती. साहजिकच होते म्हणा....
"आई इथे एकटीच असते. इथे प्रत्येकालाच मुक्त प्रवेश. आओ, जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती. जरी आईचा एकटेपणा कमी होण्याच्या दृष्टीने ही बाब चांगली असली तरी तेवढीच धोकादायकही होती. आजच्या जगात कुणाचा भरवसा देता येतो. कुणाच्या मनात पाप आले तर........!"
त्यामुळे मुलांची आईला परदेशात आपल्याबरोबर घेवुन जाण्याची मागणी आता जोमाने वर यायला लागली होती. दोघी सुना हट्ट धरुन बसल्या होत्या गायत्रीबाईंकडे. कुठेही राहा, चिन्मयकडे वा तन्मयकडे. तुम्हाला आवडेल तिथे राहा. पण इथे एकट्या नका राहू आणि नातवंडानासुद्धा आज्जीचे प्रेम, माया अनुभवायला कधी मिळणार? पण गायत्रीबाईंची ही वास्तू, दिवाकरांचे सतत जाणवणारे सान्निध्य सोडून जायची इच्छा होत नव्हती. लग्नानंतर दोनच वर्षात दिवाकरांनी ही वास्तु बांधली. तेव्हापासून त्यांचं सगळं सुख - दु:ख या वास्तुशी जोडलं गेलं होतं. सगळ्या भावना, जाणिवा या परिसराशी निगडीत होत्या. त्यामुळे गायत्रीबाई काही आपलं घर सोडून मुलांबरोबर जायला तयार नव्हत्या.
अशाच कुठल्यातरी एका क्षणी तन्मयच्या मनात ती अभद्र कल्पना आली. जर आई हे घर, ही वास्तु सोडून यायला तयार नसेल तर ठिक आहे. राहू दे तिला इथे एखादी कंपेनियन ठेवता येइल फारतर बरोबर. पण या सगळ्या भीतीचे मुळ कारण , ते उंबराचं झाड तेच जर समुळ निपटून टाकलं तर. जर ते झाडच राहीलं नाही तर लोकांची वर्दळ आपोआपच कमी होइल. मग वाटणारा धोका ती काळजीही राहणार नाही. इतरांनाही ती कल्पना पटली आणि त्यांनी गायत्रीबाईंसमोर हा मुद्दा मांडला होता. ते उंबराचं झाड आपण कापून टाकू. तसेही उंबराच्या मुळ्या खुप खोलवर आत जातात. वास्तुला धोकादायकच ते. त्यापेक्षा ते झाडच कापून टाकले की जी अनावश्यक वर्दळ वाढलेली आहे ती आपोआपच कमी होइल. बाबांचे जे जुने मित्र इथे जमतात ते बाबांच्या, आईंच्या प्रेमापोटी. त्यांना काही ते झाड कापल्याने फारसा फरक पडणार नव्हता. ते तसेच येत राहणार होते.
पण हे ऐकल्यावर गायत्रीबाई कोसळल्याच. पोटच्या मुलासारखा वाढवला होता त्यांनी शंभुला. अगदी एवढ्याश्या रोपाचा एक डेरेदार वृक्ष होताना पाहीला होता त्यांनी. त्यांच्या दिवाकराच्या कितीतरी आठवणी निगडीत होत्या शंभुबरोबर. गेली कित्येक वर्षे त्यांच्या एकटेपणाचा एकमेव साक्षीदार आणि एकमेव सोबती होता तो. दिवाकर गेल्यानंतर कित्येकदा त्यांच्या आठवणीत आपले मन मोकळे केले होते त्यांनी शंभुपाशी. त्याच्या अंगावर डोके टेकवुन किती तरी वेळा आपल्या आसवांना मुक्त केले होते त्यांनी. आज स्वतःच्या स्वार्थासाठी त्या शंभुचा बळी द्यायचा. शक्यच नाही. गायत्रीबाईंनी या कल्पनेला अगदी कडाडून विरोध केला होता. गेले काही दिवस मुलांशी एकप्रकारचा अबोलाच धरला होता त्यांनी आणि आज तनु निर्वाणीचे विचारत होता.
"आई, मग काय विचार केलास तू? की अजुनही तुझा हट्ट कायमच आहे?"
"काय उत्तर देवु या पिल्लाला? अरे, जसा तू तसाच मला शंभुपण आहे रे. त्याला जन्म नसेल दिला मी. पण त्याचं सगळं बालपण अनुभवलंय मी. त्याचं वाढणं, मोठं होणं, कधीमधी कोमेजणं या डोळ्यांनी पाहीलय मी. त्याला सोडून कसं येवु मी? आणि त्याचा या पद्धतीने बळी देणं माझ्यातल्या आईला कसं शक्य होइल?"
पण ही लेकरं पण त्यांचीच होती, त्यांच्याच काळजीने व्याकुळ झाली होती. त्या माऊलीचा आपल्या लेकरांची ही घालमेलही बघवेना झाली. गायत्रीबाईंनी एकदा तन्मयकडे पाहीलं. त्याच्या चेहर्यावरचे त्यांच्याबद्दलचे प्रेम, माया ती काळजी त्यांना जाणवत होती. त्यांचे सगळे कुटूंब त्यांच्याकडे मोठ्या आशेन पाहात होते. गायत्रीबाईंनी थोडा विचार केला, मनोमन काही निर्णय घेतला आणि उठल्या.
"तनु, चिनु मला थोडा वेळ द्या. मी आलेच जावून तासाभरात. परत आले की माझा निर्णय सांगेनच. पण एक गोष्ट आत्ताच सांगुन ठेवते. यावेळी मी जो निर्णय घेइन तो अंतीम असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. आलेच मी.........!"
"कुठे चाललीहेस, मी सोडतो ना तुला", म्हणत दारापर्यंत आलेल्या चिन्मयला त्यांनी तिथेच थांबवले.
"थांब चिनु, हा निर्णय माझा आहे, माझा मलाच घेवु दे, काळजी करु नका मी लवकरच परत येते."
उंबर्यापासल्या चपला गायत्रीबाईंनी पायात सरकवल्या आणि त्या बाहेर पडल्या.
****************************************************************************************************************
एकाचे दोन तास झाले तरी गायत्रीबाईंचा पत्ता नव्हता. तशी मुलांची चुळबुळ वाढायला लागली. काळजी वाढतच होती.
"अजुन कशी नाही आली आई? कुठे गेली असेल? मी बघुन येतो तिला." तन्मय प्रचंड काळजीत होता.
"तू मुळात त्यांना एकट्याने बाहेर जावु द्यायलाच नको होते. मी पण मुर्खासारखी गप्प कशी बसले. मी जायला पाहीजे होतं त्यांच्याबरोबर. कुठे गेल्या आहेत कुणास ठाऊक?"
तनया तर रडकुंडीलाच आली होती. चिन्मय आणि चिन्मयी त्यांची समजुत काढायला लागले. पण मनातुन त्यांनाही काळजी वाटत होतीच. कुठे गेली असेल आई?
तेवढ्यात दारात चपला वाजल्या. गायत्रीबाई परत आल्या होत्या. त्यांच्या चेहर्यावर एक वेगळेच समाधान होते, थोडी वेदनाही दिसत होती. बहुदा त्या कुठल्यातरी निर्णयाप्रत आल्या होत्या.
"आई..........."
तन्मयचे वाक्य मध्येच तोडत गायत्रीबाई म्हणाल्या.
"मी माझा निर्णय घेतलाय बाळांनो.......
मी तुमच्याबरोबर येणार आहे. निदान सद्ध्यातरी... पुढे मागे जर वाटलंच तर परत येइन कदाचित अधुन मधुन शंभुला भेटायला."
"येस्स्स्स्स्स.....!" सगळ्यांच्याच तोंडून एकदम आनंदाने चित्कार बाहेर पडला. तनयाने तर गायत्रीबाईंना कडकडून मिठीच मारली. सगळे वातावरणच बदलून गेले अचानक एका क्षणात.
"अरे अरे हळु..हळु! माझे बोलणे अजुन संपलेले नाहीये. मला माझे बोलणे पुर्ण करु द्याल की नाही."
"ओक्के आई, आता तू म्हणशील ते ऐकायची आमची तयारी आहे. बोल तू!" चिन्मय आणि तन्मय एकदमच बोलले.
"मी आत्ता एका ठिकाणी जावून आले. तुमच्या बाबांच्या एका जुन्या स्नेह्याला भेटायला गेले होते. दादासाहेब आत या ना. " गायत्रीबाईंनी दाराबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला आत बोलावले. तसे एक धोतर, सदरा घातलेली साधारण सत्तरीच्या घरातली व्यक्ती आत आली.
"हे दादासाहेब सरवटे. एक छोटीशी समाजसेवी संस्था चालवतात. अनाथ मुले, निराधार स्त्रीया, तसेच मुलांनी टाकलेली वृद्ध दांपत्ये यांच्यासाठी त्यांची ही संस्था नेहमी मदतीचा हात देते. त्यांचे पालन्-पोषण करते. त्यांना त्यांची सद्ध्याची जाग अपुरी पडतेय आपल्या कार्यासाठी. म्हणून मी तुमच्या बाबांनी बांधलेली ही वास्तू त्यांच्या या संस्थेला दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबदल्यात त्यांनी शंभुची कायम काळजी घ्यावी अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी ती आनंदाने मान्य केली. आता शंभुचा विरह थोडा जड जाईल मला काही दिवस. पण माझी इच्छा होइल तेव्हा इथे या भावी स्नेहाश्रमात येवुन राहण्याची त्यांनी मला परवानगी दिलेली आहे....
बाळांनो, तुमच्या रुपात माझा शंभु कायम माझ्याबरोबर असेलच. पण हा शंभु इतर अनेक बाळांना, आई-बहिणींना, वृद्धांना असाच इथे कायम सावली आणि विसावा देत राहील या आशेवर आज मी माझ्या शंभुचा निरोप घेतेय."
"काका, आई बरोबर माझीही एक मागणी आहे. जर कधी इच्छा झालीच तर आम्हा सगळ्यांना काही दिवस तुमच्या या स्नेहाश्रमात इथल्या सर्वांबरोबर व्यतीत करण्याची तुमची परवानगी मला हवी आहे. मिळेल ना?"
तन्मयने पुढे येत विचारले तसे दादासाहेबांच्या डोळ्यातुन कृतज्ञतेचे अश्रु ओघळले तर मुलांच्या-सुनांच्या डोळ्यांतून आनंदाश्रु ................!
गायत्रीबाई आपल्या शंभुला ही बातमी द्यायला त्याच्याकडे जायला निघाल्या.
समाप्त.
खुप आवडली.
खुप आवडली.
क्रमशः नाही. आता वाचायला
क्रमशः नाही.
आता वाचायला घेतो.
सुंदर, मनाला भिडली
सुंदर, मनाला भिडली
छान पण ह्या कथेत खास विशाल
छान
पण ह्या कथेत खास विशाल टच जाणवत नाहीये. रागावू नकोस. तुझ्या कथा नेहमी आवडीने वाचते मी. तुझे नाव वाचल्यावर ज्या अपेक्षेने वाचायला घेतली ती अपेक्षा पूर्ण नाही झाली. उगाच गुडीगुडी वाटली.
हे आगळे-वेगळे नाते फार आवडले
हे आगळे-वेगळे नाते फार आवडले विशालराव!
नशिब हि क्रमशः:
नशिब हि क्रमशः: नह्वती..........
विशल्या..आवडली कथा
विशल्या..आवडली कथा
विशालभाउ आवडली कथा!!
विशालभाउ आवडली कथा!!
मस्त आहे विशाल भाऊ कथा..
मस्त आहे विशाल भाऊ कथा.. :स्मितः
आवडली कथा
आवडली कथा
मस्त आहे पण वृक्ष कापायचा
मस्त आहे पण वृक्ष कापायचा प्रस्ताव नसला असता तरी कथानक बिघडल नसत .
धन्यवाद मंडळी ! छायाताई, त्या
धन्यवाद मंडळी !
छायाताई, त्या प्रस्तावामुळे तर गायत्रीबाई या निर्णयाप्रत पोचु शकल्या ना. मुलांनी तो प्रस्ताव मांडला नसता तर शंभुला वाचवण्यासाठी का होइना त्याला सोडून जाण्याचा अप्रिय निर्णय गायत्रीबाईंना घ्यावा लागला नसता.
आवडली रे कथा. प्राची म्हणतेय
आवडली रे कथा.
प्राची म्हणतेय तशी गुडी गुडी आहे खरी. पण ते मुद्दाम हायलाईट होतय किंवा जाणवतय कारण प्रत्यक्षात इतके "आतूनही गोड दिसायलाही गोड" असे नाते प्रत्यक्ष व्यवहारी जगात बघायला फार कमी मिळते. प्रेमाच्या जागी प्रेम असतच पण व्यवहार नावाची गोष्ट पण नात्यात मधे असते त्यामुळे प्रत्यक्ष स्टार्ट टू एन्ड साखरेचं नातं फार दुर्मिळ गोष्ट वाटते
प्रेडिक्टेबल पण छान..! आज काल
प्रेडिक्टेबल पण छान..!
आज काल झाडे पण रिलोकेट करतात.. कापून टाकायला लागत नाहीत. फक्त नविन ठिकाणी मूळ रुजवणे कठीण... ह्या आज्जींसारखेच
मला अगदी विशेष आवडली. झाडावर
मला अगदी विशेष आवडली. झाडावर इतका जीव लावणारे कुणी बघितले, कि मी हरखतोच.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
एकदा परिव्राजक व्रतात असताना
एकदा परिव्राजक व्रतात असताना स्वामी विवेकानंदांना एका माणसाने त्यांच्या हातातली काठी मागीतली व तशीच दुसरी देतो म्हणाला. स्वामींना अनेक वर्ष साथ दिलेल्या काठीला देऊन दुसरी काठी घ्यायचा निर्णय घ्यायला काही क्षण लागले. हे जर सर्व संग परित्याग केलेल्या संन्यस्थ माणसाच आहे तर सजीव वृक्षात गृहस्थाक्षमी माणसाचा जीव अडकल्यास नवल ते काय.
सुंदर कथा आहे विशालराव.
एकदा परिव्राजक व्रतात असताना
एकदा परिव्राजक व्रतात असताना स्वामी विवेकानंदांना एका माणसाने त्यांच्या हातातली काठी मागीतली व तशीच दुसरी देतो म्हणाला. स्वामींना अनेक वर्ष साथ दिलेल्या काठीला देऊन दुसरी काठी घ्यायचा निर्णय घ्यायला काही क्षण लागले. हे जर सर्व संग परित्याग केलेल्या संन्यस्थ माणसाच आहे तर सजीव वृक्षात गृहस्थाक्षमी माणसाचा जीव अडकल्यास नवल ते काय.
सुंदर कथा आहे विशालराव.
.
.
विशाल, प्राची म्हणतेय तशी जर
विशाल, प्राची म्हणतेय तशी जर जास्तच गुडीगुडी वाटतेय कथा.
कल्पना छानच आहे. इतकी आयडिआलिस्टिक असल्यावर...
म्हणूनच वास्तवापासून दूर वाटतेय का?
तुझ्या ह्या कथेत नेहमीचा "विशाल"पणा जाणवला नाही, गड्या.
लिहिता रहा, रे.
छान! गुडी गुडी च आहे, पण
छान! गुडी गुडी च आहे, पण प्रेम ते प्रेमच, माणसांवर ही नी परिसरावरही!
आवडली
आवडली
धन्स मंडळी ! मला वाटतं अशा
धन्स मंडळी !
मला वाटतं अशा प्रकारची कथा लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. माझा प्रांत म्हणजे गुढकथा, भयकथा किंवा मर्डर मिस्टरीज ! त्यामुळे कदाचित असेल.........
क्षमस्व !
मला वाटतं अशा प्रकारची कथा
मला वाटतं अशा प्रकारची कथा लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. माझा प्रांत म्हणजे गुढकथा, भयकथा किंवा मर्डर मिस्टरीज ! त्यामुळे कदाचित असेल......... >>> तसं नाही रे. तू वेगळा प्रकार ट्राय करू नयेस असं थोडीच आहे.
क्षमस्व !>>>> ठीक आहे. माफ केलं तुला
(No subject)
मस्त रे विकु ... कथा आवडली
मस्त रे विकु ... कथा आवडली
विशाल, सॉरी पण बात कुछ खास
विशाल, सॉरी पण बात कुछ खास जमी नही. खूपच गोड गोड झालंय.
वेगळा प्रकार ट्राय करतोयस तर अजून वेळ घेऊन लिही असा एक फु. स.
धन्यवाद रोहित, नीरजा @नीरजा :
धन्यवाद रोहित, नीरजा
@नीरजा : वक्के जी, डन ! पण आता एक-दोन माझ्या पेशालिटी काण्या टाकतो म्हणजे पुन्हा मेहनत घ्यायची तयारी व्हईल मनाची
छान आहे मला आवडली....
छान आहे मला आवडली....
विशाल, खूप दिवसांनी कथा आली
विशाल, खूप दिवसांनी कथा आली तुझी. पण वर म्हणताहेत तशी जरा जास्तच गोड वाटली. पण इतक्या दिवसांनी कथा लिहिलियेस त्यामूळे, हरकत नाही.
Pages