कोकण - व्हाळ [ ओहोळ, नाला]

Submitted by भाऊ नमसकर on 29 April, 2011 - 12:20

'व्हाळ' शब्द बहुधा 'ओहोळ' वरून आला असावा. कोकणात बहुतेक गांवांत फिरताना व्हाळाची खळखळ कुठून तरी तुम्हाला साद घालत रहातेच. तुमचे कान तयार असतील तर व्हाळाच्या कोणत्या टप्प्यानजीक तुम्ही आहात, हेंही तुम्ही नेमकं हेराल; डोगराच्या उतारावरून कोसळणारा व्हाळ धबधब्यासारखा अविश्रांत कानावर धडकाच देत असतो, तिथून बागायतीत शिरला कीं जरा विसावून , सुखावून त्याचं लयबद्ध, हंळुवार खळखळणं तो सुरूं करतो ; तिथंही नधेच कुठं गर्द झाडीतून जाताना धसकावून, श्वास कोंडून ठेवल्यासारखा चोरपावलानी तो ती जागा पार करतो. मग गाव ओलांडून भाताच्या मळ्यात आल्यावर त्याला नदीची चाहूल व ओढ लागते; आपलं गुणगुणंण आवरतं घेऊन, मधेच कुठे शेताच्या बांधाने वाट रोखली तरच जराशी कुरकूर करत व कांठावर उगवलेल्या गवताच्या कानात 'येतो, बरं' असं कांहींसं पुटपुटत मग आपलं अस्तित्वच नदीला अर्पण करून तो मोकळा होतो.

पण सर्वच व्हाळांचं आयुष्य अशा सर्वच टप्प्यातून जातच असंही नाही ; आमच्या गांवचा व्हाळ वरच्या कातळावर उगम पावून कड्यावरून जो खाली कोसळतो तो स्वतःच पूर्वी आपल्यासंगे खेचून आणलेल्या खडकांवर आदळत, आपटत तडक खाडीतच सर्वस्व झोकून देतो ! पावसाळ्यात कोणाची बिशाद आहे तो पार करण्याची !! याउलट, आमच्या आजोळच्या गांवचा व्हाळ मस्तपैकी रेंगाळत, मळ्यात नागमोडी वळणं घेत यथावकाश हलकेच नदीच्या कुशीत शिरतो !!

व्हाळाच्या प्रत्येक टप्प्यावर विशिष्ठ उपयोगाकरता पारंपारिक जागा राखलेल्या असत; कपडे धुण्यासाठी, गुराना पाणी पाजण्यासाठी इ.इ. [आता सर्वत्र संडास झाले पण पूर्वी तशा विधींसाठीही झाडीआडची व्हाळातली जागा खास राखली जायची ]. कोकणात व्हाळाचा आणखी एक व्यावहारिक महत्वाचा उपयोग म्हणजे जमीन जुमल्याची कागदोपत्री स्विकारार्ह अशी व्हाळ ही नैसर्गिक सीमारेषा असते.

व्हाळ म्हटला की साकव आलाच ! पडलेल्या माडाचं खोड दुभंगून व्हाळावर केलेला पूल हा सामान्य प्रकार झाला; पोफळीचाही [ सुपारीचं झाड ] तसाच उपयोग होतो. पण आता दुचाक्या सर्वत्र आल्याने छोटे 'फॅब्रिकेट' केलेले लोखंडी साकवही बर्‍याच व्हाळांवर आता पहायला मिळतात.

मला स्वतःला व्हाळाची दोन रूपं सर्वात अधिक भावतात - काळ्याभोर कातळावर शुभ्रतेचे फवारे उडवत
खळाळणारं उगमाजवळचं व घरामागच्या बागायतीतून माडांच्या झापांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल यात बेमालूमपणे आपल्या लयबद्ध खळखळीचा सूर मिसळणारं त्याचं नंतरचं रूप. पण कधीही, कुठेही व्हाळ दिसला कीं माझं पाऊल पुढे पडत नाही हे खरं.

एका 'टीपीकल' व्हाळाचं डिजीटल चित्र रेखाटण्याचा हा एक 'हौशी' प्रयत्न -

vhaaLa123.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काय मस्त हो! तो छोटासा पूल, पाण्याचा वहाता प्रवाह, प्रवाहातले दगड - सगळंच छान. इथूनसुध्दा अगदी ओहोळाशेजारी उभं असल्यासारखं वाटतय.

अप्रतिम चित्र भाऊ!! Happy

माझ्या गावकडच्या घरामागे व्हाळ आसा. साकव घातललो नाय. पण बारा महिने व्हावता. आजुबाजुची बायलमाणसा कपडे धुवुक येतत. आमच्या वाडीतले १३ घरांचे गणपती थयसरच बुडतत.

व्हाळाची आणखी एक आठवण म्हणजे मे महिनो सरत ईलो आणि पाणी आटला कि व्हाळ उपसान त्यातले "डेमके" माशे भाजून खायचे. Happy

भाऊ, मस्त लेखन आणि रेखाटन. माझ्याही आठवणीतला एक वहाळ. राजापूरच्या धोपेश्वराजवळचा. ते आमचे मूळ गाव. अगदी लहानपणी तिथे गेलो होतो. मग मात्र बर्‍याच वर्षांनी तिथे जाणे झाले. तूम्ही म्हणताय तसा मजबूत साकव आहे तिथे आता. रात्री फोटो डकवतो इथे.

हातखंब्याला माझ्या आत्याच्या परसात आणखी एक प्रकार आहे. घरामागच्या डोंगरातून एक झरा वहात वहात परसात येतो. स्वच्छ निर्मळ पाणी असते त्याचे. झर्‍यापासून परसापर्यंत त्याला वाट करुन दिलीय. बारा महिने वहात असतो तो. त्यालापण काहीतरी नाव आहे. मी विसरलो.

भाऊंनू...
मस्त चित्र सादर केल्यात!!!...

गावा-गावातल्या व्हाळांची सध्या बिकट परिस्थिती झालिहा... गावातल्या रिकाम्टेकड्या पोरांका 'राजकारणा'ची चटक लागली, आणी बर्‍याचश्या व्हाळांची परिस्थिती अक्षरशः दयनीय झालिहा... बहुतेक व्हाळ सध्या गाळान भरलेले आसत, त्या कारणान पावसाळो संपलो काय दिवाळे नंतर म्हयन्या-दीड म्हयन्यात व्हाळ सुकाक सुरुवात होता... माका आठवता खूप पुर्वी, दिवाळी झाल्यावर गावतल्या व्हाळाक बांध घालित, आणि त्यापाण्यावर वायंगणाची शेती, भाजीपालो करुन घेयत, त्याकारणान गावात पुढे बरेच म्हयने पाणी टिकान र्‍ह्वा, लोकांचे पाण्याचे हाल होयत नायत... आता तर जानेवारीतच विहिरी आटाक सुरुवात होता, आणी मार्च पासुन पुढे खरो पावसाळो सुरु होय पर्यन्त लोकांचे पाण्याचे हाल सुरु आसतत... येणे प्रमाणे राजकारण्यांका तेचां काय्यक सुख-दु:ख नाय... आसो...

ह्या खरा विवेक. आमच्याकडेय आता "तुंब" घालणत नाय! आजोळच्या 'तळी'ची अवस्था तर अगदीच बिकट झाली. जीव जळता, पण काय करतलो???

बर्‍याच जणांच्या मनातला 'व्हाळ' या चित्राच्या निमित्ताने अचानक दुथडी भरून वहायला लागलाय. झालंच ना या 'पोस्ट'चं सार्थक ! सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद.

<< कृपया 'नाला' म्हणू नका(त).. अरे व्हाळ खंय नालो खंय.. >> परदेसाईजी, मालवणी 'मायबोली'
ईली की, देवाशप्पथ सांगतंय, नाय म्हणूंचय 'नाला' !!

<< व्हाळाची आणखी एक आठवण म्हणजे मे महिनो सरत ईलो आणि पाणी आटला कि व्हाळ उपसान त्यातले "डेमके" माशे भाजून खायचे. >> भ्रमरजी, माझ्या आजोळला जो व्हाळ मळ्यातून नागमोडी वळणं घेत नदीकडे जातो म्हटलंय ना, तो पावसाळ्याच्या सुरवातीला आटलेला असताना नदीला मिळतो तिथं कच्चा बांध घातला जातो; मळ्यात पावसाळ्यात आलेल्या पूराचं पाणी ओसरताना नदी, खाडी व क्वचित समुद्रातलेही छोटे-मोठे मासे त्या बदिस्त व्हाळातच अडकतात. एखाद्या चिंचोळ्या लांबलचक फिशटँकमधे ठेवल्यासारखे ते चांगलेच पोसावतात. पुढल्या पावसाळ्याच्या आधी, एप्रिल- मे मधे, टप्प्याटप्प्याने गावात दवंडी पिटून तो बांध फोडला जातो व पाण्याच्या ओघाने नदीकडे खेचले गेलेले मासे - कांही तर दीड-दोन फूट लांब असतात - गाव लुटून नेतो; शेवटी शेवटीं तर नुसती टोपली जरी त्या उरलेल्या चिखलमय पाण्यातून बुडवून काढली तरी भरभरून कोळंबी मिळते ! ही प्रथा अजूनही चालू असावी असं वाटतं.

<< हातखंब्याला माझ्या आत्याच्या परसात आणखी एक प्रकार आहे >> दिनेशदा, मी एकदां गेलोय हाथखंबा गावात. एवढा मोठा गाव आंत आहे याची कल्पना नाही येत महामार्गावरून जाताना ! पण त्या गावाच्या मधूनही एक मोठा वहाळही जातो ना ? हातखंब्यासारखंच छोट्या दरीत वसलेलं एक बागायतीचं छानसं गांव मालवणजवळ मालवण-कट्टा रस्त्यावर आहे; नाव काय आहे माहित त्याच ? " आनंदव्हाळ "!

भाउकाका, मस्त चित्र.
ह्यो व्हाळ खुयचो? परूळ्याक जोशींच्या घरामागसून मंदिरापर्यंत एक व्हाळ आसा. तेची आठवण येतली!

>>> गावा-गावातल्या व्हाळांची सध्या बिकट परिस्थिती झालिहा... गावातल्या रिकाम्टेकड्या पोरांका 'राजकारणा'ची चटक लागली, आणी बर्‍याचश्या व्हाळांची परिस्थिती अक्षरशः दयनीय झालिहा... बहुतेक व्हाळ सध्या गाळान भरलेले आसत, त्या कारणान पावसाळो संपलो काय दिवाळे नंतर म्हयन्या-दीड म्हयन्यात व्हाळ सुकाक सुरुवात होता... माका आठवता खूप पुर्वी, दिवाळी झाल्यावर गावतल्या व्हाळाक बांध घालित, आणि त्यापाण्यावर वायंगणाची शेती, भाजीपालो करुन घेयत, त्याकारणान गावात पुढे बरेच म्हयने पाणी टिकान र्‍ह्वा, लोकांचे पाण्याचे हाल होयत नायत... आता तर जानेवारीतच विहिरी आटाक सुरुवात होता, आणी मार्च पासुन पुढे खरो पावसाळो सुरु होय पर्यन्त लोकांचे पाण्याचे हाल सुरु आसतत... येणे प्रमाणे राजकारण्यांका तेचां काय्यक सुख-दु:ख नाय... आसो...<<<
मास्तरानु ह्या बाकी खराच. राजकारणान सगळ्या पोरांका 'आळशी' केला!

अहाहा ! दिनेशदा, काय खानदानी व राजबिंडा आहे हा व्हाळ !! [ मी म्हटल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यात उडी घ्यायच्या तयारीत आहे स्वारी इथं !] . शोधून काढून औचित्यपूर्ण व अफलातून प्र.चि. पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.

<< परूळ्याक जोशींच्या घरामागसून मंदिरापर्यंत एक व्हाळ आसा >> नीधप, तुम्ही म्हणता तो व्हाळ, मला वाटतं, माझ्याही चांगल्याच परिचयाचा आहे व चित्रातल्या व्हाळाशी त्याचं बरंच साम्यही आहे; फक्त, परुळ्याचा व्हाळ नारळांच्या बागेतून वाट काढत जातो व चित्रात तो मोठ्या झाडांच्या आडून जातोय, इतकंच; खरंय ना ?

विवेकजी, "पाणी अडवा, पाणी जिरवा " योजनेखाली बर्‍याच जणानी छोटे बंधारे बांधून व्हाळाच पाणी अडवण्यासाठी पैसे घेतले पण त्याची सफलता किती झाली हा प्रश्न विवाद्यच ! तरी पण कोकणात आता 'नियोजनबद्ध मेहनत केली तर भरघोंस फळ मिळतं' याची उदाहरणं लोकांसमोर येताहेत व त्यामुळे मानसिकता निश्चितपणे बदलते आहे, हे आपलं माझं एक निरीक्षण. राजकारण्याना 'कार्यकर्ते' हवे असतात, कर्तबगार तरूण नव्हेत, ही तर सर्वत्रची बोंब आहेच !

Pages