कोकण - व्हाळ [ ओहोळ, नाला]

Submitted by भाऊ नमसकर on 29 April, 2011 - 12:20

'व्हाळ' शब्द बहुधा 'ओहोळ' वरून आला असावा. कोकणात बहुतेक गांवांत फिरताना व्हाळाची खळखळ कुठून तरी तुम्हाला साद घालत रहातेच. तुमचे कान तयार असतील तर व्हाळाच्या कोणत्या टप्प्यानजीक तुम्ही आहात, हेंही तुम्ही नेमकं हेराल; डोगराच्या उतारावरून कोसळणारा व्हाळ धबधब्यासारखा अविश्रांत कानावर धडकाच देत असतो, तिथून बागायतीत शिरला कीं जरा विसावून , सुखावून त्याचं लयबद्ध, हंळुवार खळखळणं तो सुरूं करतो ; तिथंही नधेच कुठं गर्द झाडीतून जाताना धसकावून, श्वास कोंडून ठेवल्यासारखा चोरपावलानी तो ती जागा पार करतो. मग गाव ओलांडून भाताच्या मळ्यात आल्यावर त्याला नदीची चाहूल व ओढ लागते; आपलं गुणगुणंण आवरतं घेऊन, मधेच कुठे शेताच्या बांधाने वाट रोखली तरच जराशी कुरकूर करत व कांठावर उगवलेल्या गवताच्या कानात 'येतो, बरं' असं कांहींसं पुटपुटत मग आपलं अस्तित्वच नदीला अर्पण करून तो मोकळा होतो.

पण सर्वच व्हाळांचं आयुष्य अशा सर्वच टप्प्यातून जातच असंही नाही ; आमच्या गांवचा व्हाळ वरच्या कातळावर उगम पावून कड्यावरून जो खाली कोसळतो तो स्वतःच पूर्वी आपल्यासंगे खेचून आणलेल्या खडकांवर आदळत, आपटत तडक खाडीतच सर्वस्व झोकून देतो ! पावसाळ्यात कोणाची बिशाद आहे तो पार करण्याची !! याउलट, आमच्या आजोळच्या गांवचा व्हाळ मस्तपैकी रेंगाळत, मळ्यात नागमोडी वळणं घेत यथावकाश हलकेच नदीच्या कुशीत शिरतो !!

व्हाळाच्या प्रत्येक टप्प्यावर विशिष्ठ उपयोगाकरता पारंपारिक जागा राखलेल्या असत; कपडे धुण्यासाठी, गुराना पाणी पाजण्यासाठी इ.इ. [आता सर्वत्र संडास झाले पण पूर्वी तशा विधींसाठीही झाडीआडची व्हाळातली जागा खास राखली जायची ]. कोकणात व्हाळाचा आणखी एक व्यावहारिक महत्वाचा उपयोग म्हणजे जमीन जुमल्याची कागदोपत्री स्विकारार्ह अशी व्हाळ ही नैसर्गिक सीमारेषा असते.

व्हाळ म्हटला की साकव आलाच ! पडलेल्या माडाचं खोड दुभंगून व्हाळावर केलेला पूल हा सामान्य प्रकार झाला; पोफळीचाही [ सुपारीचं झाड ] तसाच उपयोग होतो. पण आता दुचाक्या सर्वत्र आल्याने छोटे 'फॅब्रिकेट' केलेले लोखंडी साकवही बर्‍याच व्हाळांवर आता पहायला मिळतात.

मला स्वतःला व्हाळाची दोन रूपं सर्वात अधिक भावतात - काळ्याभोर कातळावर शुभ्रतेचे फवारे उडवत
खळाळणारं उगमाजवळचं व घरामागच्या बागायतीतून माडांच्या झापांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल यात बेमालूमपणे आपल्या लयबद्ध खळखळीचा सूर मिसळणारं त्याचं नंतरचं रूप. पण कधीही, कुठेही व्हाळ दिसला कीं माझं पाऊल पुढे पडत नाही हे खरं.

एका 'टीपीकल' व्हाळाचं डिजीटल चित्र रेखाटण्याचा हा एक 'हौशी' प्रयत्न -

vhaaLa123.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाऊनू तुमका आनंदव्हाळ ठावक आसा?? Happy मस्त!! भावनाचा ता गाव शिवाय माझी आजी पण थयलीच. त्यामुळे माका आनंद्व्हाळाशिवाय दुसरो व्हाळ ठावक नाय.

हा फोटो सही.
हो भाउकाका तो व्हाळ नारळाच्या बागांच्यातून जातो. मास्तर आणि हेडमास्तरांना पण तो व्हाळ चांगलाच परिचयाचा असणार.

<< त्यामुळे माका आनंद्व्हाळाशिवाय दुसरो व्हाळ ठावक नाय. >> नीलूजी, 'आनंदव्हाळ' आयुष्यात
येऊंचो म्हणान लोक काय काय व्रतां/ तपःश्चर्या करतत ! तुमकां एक आयतो गावलोहा [ शिवाय, दुधात साखर तशी थंय "भावना" पण आसा ], मग "दुसरो व्हाळ " व्होयोच ख्येंका; आणि, असलां कायतरी मनात येताच तरी कसां !!! Wink

भाउ काका Happy तुमी ता 'जी' बी लाव नकास मी तुमच्यापेक्षा खूप ल्हान आसय. माका फक्त नीलूच म्हणा.
बरा तुमका धुमडा ठावक आसा काय?

नी...
मास्तर आणि हेडमास्तरांना पण तो व्हाळ चांगलाच परिचयाचा असणार...>>>... तोच व्हाळ पूढे आमच्या मामांच्या बागायतीतून पूढे सरकत-सरकत जावन 'माकडाम' (परुळे गावची एक वाडी) कडे थोडां मोठां रूप घ्येवन नंतर समुद्राक जावन भेटता...

भाऊनु, तुमचा चित्र बघुन आणि वर्णन वाचुन कोकणात जाऊन इलै. बरा वाटता असा काय बघुक मिळाला कि. वर्णन वाचून तर माका मी व्हाळाच्या पाण्यात पाय सोडून बसल्याचो भास झालो. साकव पण आठवलो. असाच वरच्या वर आमका तिकडच्या भेटि देत जावा. धन्यवाद.
दिनेशदा, धन्यवाद. हा राजापूरचा फोटो पाहून पावसाळ्यात भरून वाहणारे राजापूर व खारेपाटण डोळ्यासमोर आले.

<< भाउ काका तुमी ता 'जी' बी लाव नकास मी तुमच्यापेक्षा खूप ल्हान आसय >> निलू, माका सगळेच सर्रास 'भाऊकाका" म्हणतत कारण मी 'निवृत्त' आसंय ह्यां खरां आणि स्पष्टच लिवलंय माझ्या व्यक्तीरेखेत; तुम्ही टाका मां गो तशीच तुमची वयां - खरीं आणि स्पष्ट - मग बघा 'जी" लावतंय का तुमच्या नावाक ! Wink
आणि तसां तू माकां देखील खूप सिनीयर आससच... 'मायबोली'वर तरी !!!! Wink
<< भाऊनु, तुमचा चित्र बघुन आणि वर्णन वाचुन कोकणात जाऊन इलै. >> शोभा१२३, ह्यां आपलां बरां आसा; आम्ही येस्टीत नाय तर कोकण रेल्वेत स्वताक कोंबून घेवन, हाडाची कांडा करून कोकणात जातंव, इल्यावर रवावणां नाय म्हणान असलो धुडगूस घालतंव आणि तुम्ही आमकां आरामात हंय बसान वर ह्यांच ऐकवतलात !!! Wink
सर्वाना धन्यवाद.

भाऊनू लिवक कित्या व्ह्यया.. अज्ञानात सुख असता असा कायतरी म्हणतत Proud पण तुमच्यासारखे वरिष्ठ अहो जाहो करुक लागले तर बरा नाय वाटणा.... मग सांगूचा पडता... मी आजून रिटायर होवक नाय. रिटायर होवक निदान २० वर्षा तरी आसत... म्हणजे बघा Proud
तुम्ही माका जितके सिनियर आसा त्यापुढे मायबोलीवरची सिनियरकी काय ईतकी मोठी नाय. Happy

आसो... Happy

भाऊ,
मी पण सेम गजाभावसारखी हरवून गेले तुमच्या चित्रात..
अतिशय सुरेख चित्रं काढलंय तुम्ही..
एक काम करा, तुमच्या सर्व चित्रांचं प्रदर्शन भरवा, आम्ही तिकिट काढून येऊ नक्की.. Happy

आचरया सून देवगडाक जाताना गाव व्हाळ लागता. मी काय बघुक नाय पन कोणाक म्हाय्त आसा काय.
तेच्यात भूता आसत असा मी ऐकलय.लय मोठो व्हाळ आसा असा वाट्ता. तेच्या आजुबाजुक घराव नायत.

भाऊ.. मस्त चित्र... तुमच्या चित्रांची चित्रमालिका करायला सांगितली पाहिजे अ‍ॅडमिनना... म्हणजे एकापाठोपाठ एक बघता येतील सगळी चित्रं..

<< आचरया सून देवगडाक जाताना गाव व्हाळ लागता. ....तेच्यात भूता आसत असा मी ऐकलय. >> मायबोलीवर माका जमतीत तशी कोकणातली चित्रां टाकतंय, तर माझी बायल म्हणता, " आत्ताच कोकणातली खंयचीं ही भुतां येवन बसलीत तुमच्या मानेवर ? ". हर्षदा, तुमच्यामुळे आत्ता कळलां माकां खंयची भुतां तीं ! आता मात्र बिनधास्त जावून तो व्हाळ बघाच कारण थंयली भुतां काय इतक्यात परत जांवूक उठतीत सा वाटना नाय माझ्या मानेवरसून ! Wink
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार.

<< भाउ काका मी तुमच्यापेक्षा खूप ल्हान आसय>> , << रिटायर होवक निदान २० वर्षा तरी आसत >> ह्यां सगळां खरां असलां तरी माकां तां कसां कळतलां ? नांवावरसून वय ओळखणां ह्यां माकां तरी जमणां नाय ! आणि, भुतां माझ्या मानेवर बसलीं असलीं तरी माकां सगळ्यांचीं वयां काय तीं सांगणत नाय ! मग सगळ्यांकच सरसकट "अहो", "जाहो" म्हणणां इलाच मां ! शिवाय, नांवाक "जी"च तर लावतंय, "आजी" नाय मां चिकटवणंय !! Wink

Pages