रणरणत्या उन्हातून धावतपळतच तो क्लिनिकला पोचला. आतल्या थंडगार एसीने त्याला जरा हायसं वाटलं. घाम पुसतच रिसेप्शनिस्टच्या डेस्कपाशी जाऊन नाव गाव सांगितलं, तर तिचा भडिमार सुरू झाला.
"अहो काय हे? तुम्हाला दीडची अपॉईंटमेंट दिली होती ना? आता किती वाजलेत? अडीच. एजुकेटेड माणसं ना तुम्ही? साधी वेळ पाळता येत नाही का?"
"सॉरी मॅडम, झाला थोडा उशीर.. "
"काय सॉरी? उशीर झाला तर बसा मग आता. इतर पेशंट्स झाल्यावर पाठवते तुम्हाला आत.. "
"ठीक आहे. बसतो मी. सांगा मग नंतर नंबर आल्यावर.."
आता आपलीच चूक आहे म्हटल्यावर तिला काही बोलण्यात अर्थ नाही हे समजून घेतलं त्याने. इकडे तिकडे पाहिलं तर अजून पंधरा-वीस पेशंट्स तरी होते. छान म्हणजे बराच वेळ लागणार आहे तर.
तो माणूसघाणी आहे. म्हणजे फारच कोणी ओळखीचं असलं तरंच त्याला बोलायला वगैरे आवडतं. तिर्हाइत लोकांशी त्याला बोलणं सुरू पण करता येत नाही, आणि त्यांनी सुरू केलेलं आवडत पण नाही. त्यापेक्षा आपलं एकटं निवांत बसावं असा त्याचा स्वभाव. कुणी माझ्याशी बोलू नये, आणि मी ही तुमच्याशी फालतू गप्पा मारणार नाही असं. आजूबाजूला रिकाम्या खुर्च्या पाहून त्याने त्यातली बरोबर मधली खुर्ची निवडली बसायला, आणि काहीच करायला नाही म्हणून मोबाइल मधे तोंड खुपसलं.
दोन चार मिनिटं उलटून गेली असतील नसतील तेवढ्यात एक म्हातार्या आजीबाई त्याच्या शेजारच्याच खुर्चीत येऊन बसल्या. त्याने मान वर करून पाहण्याची पण तसदी घेतली नाही. एवढ्यात म्हातारीचा सूर.
"किती वाजलं रे बाळा?"
"अडीच." त्याचं तुटक उत्तर.
"आडीच वाजल्या व्हय? लई येळ झाला म्हंजी.."
"हो.. बराच वेळ झालाय, अडीच वाजून गेलेत." त्याचं पुन्हा एकदा तुटक उत्तर.
"हा ना.. लईच येळ झाला.. आजून न्ह्यारी बी नाय केली.. किती येळ लागतोय काय म्हायती.."
आता मात्र तो त्रासला. म्हातारी गप्प का बसत नाहीये, आणि मला ही गप्प का बसू देत नाहीये? जराश्या फणकार्यानेच म्हणाला.
"डॉक्टर फार हुशार आहेत. फार पेशंट्स असतात त्यांच्याकडे. वेळ लागतोच इथे."
"सकाळपासणं बसलोया आमी. आता कुठं नाव आलंया. "
आता मात्र म्हातारीच्या चिकाटीला त्याने मनोमन दाद दिली. इतर वेळी त्याने लक्षही दिलं नसतं, पण आज का कोण जाणे त्याला राहावलं नाही. तसं ही आपण कधी कुणाशी नीट बोलतो? आज ही म्हातारी आपणहून बोलायचा प्रयत्न करतेय, ओळखपाळख काही नसताना. आपण तुसडी उत्तरं दिली तर तशी ही ती गप्पंच बसणार आहे. कोण जाणे तिच्या मनात काय चाललंय? ऐकायला तर काय हरकत आहे वेगळं काही म्हणून? आपल्या आयुष्यातली दोन-चार मिनिटं तिला दिली तर असं काय आभाळ कोसळणार आहे? तसं ही काय करतोय आपण? मोबाइल मध्येच तोंड खुपसलंय ना? असा विचार मनात आल्यावर त्याने आपसूकच मोबाइल खिशात टाकला, आणि म्हातारीकडे तोंड फिरवलं.
म्हातारी होती एकदम लहानशी मूर्ती. समोर एखादी दहाबारा वर्षाची मुलगी बसली असावी अशी शरीरयष्टी. पिवळ्या रंगाची छापील नववारी, त्यावर न साजेसं पोलकं. अंगावर दोन-चार माफक दागिने. चेहरा सुरकुतलेला आणि सत्तरच्या घरात असल्याची जाणीव करून देणारा. केस जवळपास पांढरे. समोरचे दात पडलेले आणि बाकीचे दातवनाची काळी पुटं ल्यालेले. चेहर्यावर काळजी स्पष्ट पसरलेली. न राहवून त्यानेच मग विचारायला सुरूवात केली.
"तुम्हाला दाखवायचंय का डॉक्टर ला?"
"न्हाई.. नात आणलाय. डोक्याला सर्किट झाल्यावानी करतोय."
"म्हणजे? काय लागलं वगैरे होतं का डोक्याला?"
"न्हाई वो. असाच येड्यावानी कराय लागलाय. मंधीच झोपंच्या गोळ्या खाल्ल्या. दोन दिस बिनसूद व्हता. गावाच्या डाक्टरला दावलं. त्यो म्हनला, ह्यानी झोपंच्या गोळ्या खाल्ल्याता. मी नाय हात लावणार. उगंच मेला गेला त माही जबाबदारी न्हाई. तसाच मंग दोन दिस बिनसूद पडला घरात. आमी तरी काय करावा? डाकटरच बघाना त आमी कुणाला दावावा? मंग कशीतरी सूद आली त्याला. तुमच्यावानीच एक डाकटर हाय वळखीचा गाववाला. हितं ससून ला व्हता. त्यो म्हनला ह्याला पुण्याला न्ह्या. गावात दावून उपेग न्हाई. ह्या डाकटरचा पत्ता दिलता. म्हणून हितं आलोया.."
म्हातारीने एका दमात सगळं काही सांगून टाकलं.
"हो. चांगले आहेत हे डॉक्टर. करतील सगळं व्यवस्थित. कुठून आल्या तुम्ही आजी?"
"लई लांबून आले रं बाबा. बार्शी हाये ना तिकडं. थितनं."
"मग तुम्ही एकट्याच घेऊन आल्या नातूला की सोबत आणलंय कुणाला?"
"आवो कोण हाये सोबतीला. आई बा मरून गेलं पोराचं लहान असतानीच. त्याला कोण न्हाई. मी हाये आन् आमचं मालक. मालकास्नी यायला जमंना. जनवारापाशी कोण न्हाई. मंग ते घरलाच हाईती. मी आन् नात दोघंच आलतो. काल दुपारचं चार ला बसल्यालो बघा येश्टीत. रातचं बारा झालं हितं पोचाया. ते पुलगेट का काय हायेना?"
"हो हो पुलगेट आहे ना. स्वारगेटच्या आधी येतंय."
"हां. त थितं उतारलो रातचं बाराला. मी एकलीच, ह्यो बाबा त असा येड्यावानी करतोय. रस्त्यानी कुणी माणूस बी न्हाई. तशीच चलले रं बाबा मंग. पार भवानी पेठंपतूर. लई येळ चालत व्हतो, ह्यो बाबा बी मंदीच कटाळल्यावानी कराय लागला. रिक्षा बी गावना. येक व्हता, त साठ रूपय म्हनला. येवढं पैसं कुठनं देयाचं? बळच चललो मंग. पार एक वाजल्या असत्यान घरला पोचाया."
"हो खरंय तुमचं. रात्री रिक्षावाले फार अडवून पैसे मागतात."
"हा ना. पण माणसं पघून त मागावं ना? रातचं टाईम हाये, म्हातारं माणूस हाये, येवढं पैसं बी न्हाईत देयाला. का उगं आडून धरावा. माणूसकी नाय व्हय काय उलशीक?"
"ह्मम्म्म. तसेच करतात ते रिक्षावाले. माणूसकी नाही राहिली आता, सगळे पैश्याच्या मागे आहेत. मग कोण आहे का पुण्यात तुमचं नातेवाईक वगैरे? कुठे थांबल्या काल रात्री?"
"दुसरी सून र्हाती ना हितंच. तिच्या घरला गेलो. पण सून तरी आपली आसती का? उगं कुठं तरी रात काढायची म्हणून आसरा. त्यांला बी लय ग्वाड वाटतंय व्हय आपून आल्यालं?"
"ह्मम्म्म. आज काल कोण नाही राहिलं कुणाचं. सगळेच स्वार्थी झालेत."
म्हातारीला तो एवढं समजूतदारपणे ऐकून घेतोय म्हटल्यावर फार बरं वाटलं. एकदम त्याच्या मांडीवर हात फिरवून म्हणाली.
"व्हय रं बाबा. कोण नाय कुणाचं. कलयूग आलंय म्हणत्यात ते खोटं न्हाई. पण म्या बी लई जिद्दीची हाये. येळ आली त माझं मनी बी यिकीन पण नाताला काय बी कमी पडू द्याची न्हाय." गळ्यातल्या दोन पळीच्या आणि चार मण्यांच्या मंगळसूत्राला हात लावत म्हातारी बोलली.
"होईल हो चांगलं. हे डॉक्टर फार हुशार आहेत. तुमचा नातू नीटच करून पाठवतील." तो एकदम आश्वासक सूरात बोलला.
"मंग त देवंच पावला."
म्हातारीबद्दल आता त्याला सहानुभूती वाटायला लागली. किती विचारू आणि काय विचारू असं झालं.
"आज मग तुम्ही परत जाणार का घरी? की इथंच थांबणार?"
"घरालाच जावा म्हणतोय. हितं तरी परत काय त्या बयाकडं र्हायाचं? आपलं घर गाठल्यालं बरं. जायाला सुदीक पैसं न्हाई र्हाईलं बगा आता. आगीनगाडीनी जाणार मंग. काय कुणी धरलं, मारलं, त मारा बाबा. पैसंच न्हाईती त आमी बी काय करावा?"
हे ऐकून तो नुसताच हुंकारला. परत काहीतरी लक्षात येऊन म्हणाला.
"तुमचा नातू कुठे दिसत नाही?"
"आत न्हेलाय त्याला दावायला. आमची सून गेलीया सोबत आतमंदी."
"बरं बरं.. " तो पुटपुटला.
थोड्याच वेळात म्हातारीचा नातू आणि सून बाहेर आली. नातू म्हणजे एकदम नुकतंच मिसरूड फुटायला लागलेला कवळा पोरगा. सूनेकडे त्याने पाहिलं तर तोंडावरूनच कजाग दिसत होती ती.
म्हातारीपाशी येऊन सून म्हणाली,
"डाक्टरनी ह्या गोळ्या ल्हिवून दिल्याता. "
"मंग हितंच घिऊ. गावाकडं बी मिळायच्या न्हाईत. डाकटरला बी दाऊन घिऊ जाताणी."
सून मग म्हातारी कडे बघायला लागली. म्हातारी उमजून कमरेच्या पिशवीला हात घालत म्हणाली,
"किती पैसं दिऊ?"
"आता मला बी काय म्हायती? न्हाई त एक काम करा की, तुमीच चला संग. काय व्हत्यानं ती व्हत्यानं पैसं." सुनेने आपला रंग दाखवला.
म्हातारी मग उठली. ती, नातू आणि सून तिघे बाहेरच्या मेडीकल स्टोअर कडे निघाले.
त्याचा नंबर यायला अजून बराच वेळ होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. एकदम त्याला स्वता:चं लहानपण आठवलं. पायाला धड कधी नीट चप्पल पण मिळाली नाही. अगदी कॉलेजला जाईपर्यंत स्लिपर वापरली आपण. ती पण तुटली तर, तशीच पिना मारून ढोपरायची. वर्षाला दोन ड्रेस गावातल्याच टेलर कडे शिवलेले. शर्ट अगदी गुढग्यापर्यंत, आणि पॅंट टाचेच्याही खाली. का तर, वाढत्या अंगाला बरे, पुढे आपरे होऊ नयेत. हॉटेलमधलं चमचमीत कधी खायचं म्हणजे सनासारखं. वर्ष, सहा महिण्यातून कधीतरी एकदा. त्याच्या लहानपणी सॉफ्ट ड्रिंक्स च्या हॉटेल मध्ये लावलेल्या बाटल्या त्याला फार आवडायच्या. वेगवेगळ्या रंगांच्या. कुतुहूलाने तो फक्त बाहेरून पाहायचा त्यांना. आयुष्यात कधी असलं काही प्यायला मिळेल अशी अपेक्षा ही केली नव्हती त्याने.
आणि आता - किती तरी बदललो आपण. सगळं मिळवलं स्व:कष्टावर. आता पायात चार हजारचे बूट घालतो. दीड हजारचे शर्ट, दोन हजाराची पॅंट घालतो. हॉटेलिंग तर कधीही मनात आलं की. सॉफ्ट ड्रिंक्सचं आकर्षण तर कधीच गळून पडलं. उलट नवीन गोष्टी सुचायला लागल्या. पब मधे जाणं सुरू झालं. एका रात्रीत पब मध्ये दोन चार हजार रुपये उडवणं नॉर्मल वाटायला लागलं. आणि अजून काय काय. आणि ही म्हातारी बिचारी. गरीबीने अगदी पिचून गेलीय. शेजारी शेजारी बसलेल्या दोन व्यक्तींच्या जीवनात कसली घोर तफावत ही. त्याला एकदम विचित्र वाटायला लागलं.
असा आपल्याच विचारात गढला होता तो, तेवढ्यात म्हातारी आणि ते दोघे परत आले गोळ्या घेऊन. डॉक्टर कडे गेले. गोळ्या वगैरे दाखवून परत आले. आता निघायची वेळ झाली त्यांची. म्हातारी आणि ते दोघे तसेच क्लिनिकच्या बाहेर पडायला लागले. काय करावं हेच त्याला कळेना. खुर्चीत तसंच बसून ही राहावेना. आपण एक जरी मिनिट अजून इथेच बसलो तर ती म्हातारी कायमची निघून जाईल. तिचं जीवन तसंच चालू राहील, आपलं पण तसंच. काहीच तर फरक पडणार नाही. नाही, असं नकोय, काही तरी तर केलंच पाहिजे. नक्कीच.
झटक्यात तो खुर्चीतून उठला. बॅग तशीच पडू दिली तिथे. धावतच बाहेर आला. म्हातारी पुढे चालत होती. जोरात हाक मारली त्याने.
"आजी, अहो आजी.."
म्हातारी आणि ते दोघेही थांबले. मागे वळून फक्त पाहत राहीले.
तो म्हातारी जवळ गेला, काय करावं सुचेना. पटकन खिशात हात घालून पाकीट काढलं. शंभरची नोट हाताला लागली, ती म्हातारीच्या हाती ठेवली आणि म्हणाला.
"आजी, तुम्हाला घरी जायला पैसे नाहीयेत ना? मग हे घ्या. थोडेच आहेत, पण तुमच्या दुसर्या नाताने दिलेत असं समजा.."
म्हातारीला काय बोलावे हेच सुचेना. सून आणि नातू दोघे चकीत झाले. म्हातारीला एकदम मायेचा उमाळा फुटला. शब्द फुटेना तोंडून. हात वर केला आणि त्याच्या गालावरून मायेने हात फिरवला. त्याला ही काय बोलावं हे सुचेना, म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवून एवढंच म्हणाला,
"तुम्ही मला माझ्या आजी सारख्या आहात. राहू द्या हे पैसे."
नातू कडे वळून म्हणाला.
"नीट राहा रे बाबा. त्रास नको देऊ जास्त कुणाला." नातानेही मान डोलावली.
डोळ्यात नकळत पाणी तरळलं त्याच्या. मग म्हातारीपुढे जास्त वेळ थांबणं त्याला अशक्य झालं. तसाच तो माघारी फिरला. म्हातारीचा आशीर्वाद घेऊन.
शंभर रूपये म्हणजे काय होते त्याच्यासाठी?
दोन सिगरेटची पाकिटं?
एक बियरची बाटली?
सीसीडी मधली एक कॉफी?
करमत नाही म्हणून शहरभर फिरत जाळलेलं दोन लीटर पेट्रोल?
की अजून काही?
आजचे शंभर रूपये आधीच्या सर्व शंभर रूपयांपेक्षा कितीतरी किमतीचे होते त्याच्यासाठी. किंबहूना, अमूल्यच होते.
ती म्हातारी परत त्याला कधीच दिसणार नव्हती. तो त्या म्हातारीला परत कधीच भेटणार नव्हता. तरीही समाधानाचं एक हसू त्याच्या चेहर्यावर उमटलं होतं.
मस्त!!!
मस्त!!!
sahee.. kharay..aapan vichaar
sahee.. kharay..aapan vichaar sudha karat naahee kahihi ghetana.. asha lokanna thodi madat hona hech khoop aaplyakadun.. kalat nakalat.. touching!
hrudaysparshi...
सुंदर...
सुंदर...
खरंच मस्त, एकदम
खरंच मस्त, एकदम हॄदयस्पर्शी!!!
फारच सुंदर..... अशीच माणुसकी
फारच सुंदर.....
अशीच माणुसकी दाखविणारे आहेत म्हणून आपले आयुष्य सुसह्य होते......
खुप आवडले.
खुप आवडले.
सुंदर. वाचता वाचता माणसं
सुंदर. वाचता वाचता माणसं आपसूक डोळ्यांसमोर यायला लागतात. मस्त शैली आहे आपली. शुभेच्छा..!
सुंदर. जर सत्यकथा असेल तर
सुंदर.
जर सत्यकथा असेल तर उत्तमच...जमेल तिथे एखादा टक्का मदत केली तरी खुप असते. फक्त गरजु असेल त्यांनाच मदत करावी असं माझं मत.
सुंदर कथा.
सुंदर कथा.
शंभर रूपये म्हणजे काय होते
शंभर रूपये म्हणजे काय होते त्याच्यासाठी?
दोन सिगरेटची पाकिटं?
एक बियरची बाटली?
सीसीडी मधली एक कॉफी?
करमत नाही म्हणून शहरभर फिरत जाळलेलं दोन लीटर पेट्रोल?
की अजून काही?
>>>
सुरेख!
आपण तुसडी उत्तरं दिली तर तशी ही ती गप्पंच बसणार आहे. कोण जाणे तिच्या मनात काय चाललंय? ऐकायला तर काय हरकत आहे वेगळं काही म्हणून? आपल्या आयुष्यातली दोन-चार मिनिटं तिला दिली तर असं काय आभाळ कोसळणार आहे?>>>
अप्रतिम!
कथा >>> प्रेडिक्टेबल पण साधीसुधी आणि सच्ची!
शैली >>> मस्तच!
आवडली कथा!
असे विचार येतात खरे मनात की:
आता पायात चार हजारचे बूट घालतो. दीड हजारचे शर्ट, दोन हजाराची पॅंट घालतो. हॉटेलिंग तर कधीही मनात आलं की. सॉफ्ट ड्रिंक्सचं आकर्षण तर कधीच गळून पडलं. उलट नवीन गोष्टी सुचायला लागल्या. पब मधे जाणं सुरू झालं. एका रात्रीत पब मध्ये दोन चार हजार रुपये उडवणं नॉर्मल वाटायला लागलं. आणि अजून काय काय. आणि ही म्हातारी बिचारी. गरीबीने अगदी पिचून गेलीय. शेजारी शेजारी बसलेल्या दोन व्यक्तींच्या जीवनात कसली घोर तफावत ही>>
वा वा वा!
सुंदर!
अभिनंदन व धन्यवाद निवडुंगराव!
-'बेफिकीर'!
सुंदर !
सुंदर !
हिमु, इन्द्रधनू, sneha1,
हिमु, इन्द्रधनू, sneha1, गौतम्७स्टार, निशदे, सुनिधी, नितीनचंद्रजी, मुक्ता,
खूप खूप धन्यवाद.. इतके प्रतिसाद पाहून फारच छान वाटलं..
शिल्पाजी,
जमेल तिथे एखादा टक्का मदत केली तरी खुप असते. फक्त गरजु असेल त्यांनाच मदत करावी असं माझं मत. >>
पूर्णपणे सहमत आपणांस. धन्यवाद, आणि निवडक १० मध्ये नोंद केल्याबद्दल विशेष आभार..
बेफिकीरजी,
आपणाबद्दल माझ्या मनात फार आदर आहे ! आज आपला एवढा भरगच्च प्रतिसाद पाहून खूपच छान वाटलं. खूप खूप धन्यवाद..
(मी आपणापेक्षा फार लहान आहे, त्यामुळे "राव" वगैरे नको ! )
पोस्ट लिहीत असतानाच, रुणूझुणू यांचा पण प्रतिसाद आला.. खूप धन्यवाद..
मस्त कथा, आवडली!
मस्त कथा, आवडली!
मस्त.........................
मस्त....................................
मस्त.........................
मस्त....................................
आवडली कथा.
आवडली कथा.
निवडुंग फारच छान आहे ही कथा
निवडुंग फारच छान आहे ही कथा
विषय फार वेगळा नाही वाटला,
विषय फार वेगळा नाही वाटला, आधी पण अशा कथा वाचल्या आहेत. तुझ्या शैलीने शेवट पर्यंत खिळवुन ठेवल हे नक्की.
श्री निवडुंग, प्रथमदर्शनी या
श्री निवडुंग, प्रथमदर्शनी या लेखाचा लेखक "निवंडुंग" हे वाचुन मी दुर्लक्ष केले होते.....काही वेळाने राहावलं नाही आणि लेख शोधुन वाचायला घेतला...म्हंटलं काटेरी असल्यास 'काटेरी' प्रतिसाद देईन.
आपल्या इतर लेखनातुन मला आलेल्या अनुभवावरुन हे ठरवणे अवघड होत आहे की आपल्या हातुन इतका "संवेदनशील" लेख, इतक्या सहजेतेने उतरवला गेला आहे.
अप्रतिम लेख आहे. मनापासुन आवडला.
म्हणुन मनापासुन धन्यवाद!
आवडली
आवडली
मस्त. मनापासुन आवड्ली कथा.
मस्त. मनापासुन आवड्ली कथा.
लई बेस लिवलसं गड्या.
लई बेस लिवलसं गड्या.
सुरेख
सुरेख
आजचे शंभर रूपये आधीच्या सर्व
आजचे शंभर रूपये आधीच्या सर्व शंभर रूपयांपेक्षा कितीतरी किमतीचे होते त्याच्यासाठी. किंबहूना, अमूल्यच होते.>>> खरंय! आवडली कथा!
मी_आर्या, कवित, दिनेशदा,
मी_आर्या, कवित, दिनेशदा, ठमादेवी, सत्यजित, सचिन्_साची, सावली, गब्बर, प्राची, ट्यागो,
खूप खूप आभार.. इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल..
चातक,
आपल्या "बिन-काटेरी" प्रतिसादाबद्दल खूप आभार.. आणि निवडक १० बद्दल धन्यवाद..
छान लिहीलंय.. सत्यप्रसंग
छान लिहीलंय.. सत्यप्रसंग असल्यास फारच भारी.
चांगलंय.
चांगलंय.
आवडली.
आवडली.
लिहीण्याची हातोटी आवडली.
लिहीण्याची हातोटी आवडली. तुमच्या भाषाशैलीमुळे एक साधासाच प्रसंग एकदम प्रभावी झालाय.
तुमची शैली आवडली. नेहमीच्या
तुमची शैली आवडली. नेहमीच्या आयुष्यातला एक साधा प्रसंग... छान फुलवलाय.
Pages