दै. प्रहारच्या स्त्रीविधा मध्ये छापून आलेला हा लेख.
तो
http://www.prahaar.in/madhyantar/streevidha/40794.html इथेही पाहता येईल.
प्रसुती म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असं म्हटलं जातं. गर्भावस्थेत किंवा प्रसुतीदरम्यान होणाऱ्या स्त्रियांच्या मृत्यूची आकडेवारी पाहता ते अधिकच पटतं. या काळात आरोग्याशी संबंधीत वेगवेगळ्या कारणांनी स्त्रियांचा मृत्यू होण्याचं जगभरातील प्रमाण खूप मोठं आहे. या पार्श्वभूमीवर ‘जागतिक आरोग्य संघटने’ने स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याशी संबंधित निरनिराळ्या आजारांवरील 30 अत्यावश्यक औषधांची यादी जाहीर केली आहे.
स्त्रिया आणि मुलांचं आरोग्य हा जगभरातील सर्वच देशांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. आरोग्याशी संबंधीत विविध कारणांनी होणा-या स्त्रियांच्या मृत्यूचं प्रमाण ही चिंतेची बाब ठरते आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याशी संबंधित निरनिराळ्या आजारांवरील 30 अत्यावश्यक औषधांची यादी जाहीर केली आहे. केवळ स्त्रिया आणि मुलं यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली अशा प्रकारची ही जगातील पहिली औषधांची यादी आहे.
‘जागतिक आरोग्य संघटने’ने अलिकडेच जाहीर केलेल्या अहवालानुसार, गर्भावस्था आणि प्रसुतीदरम्यान रोज सुमारे एक हजार स्त्रियांचा मृत्यू होतो. जगभरात होणा-या मातामृत्यूपैकी 99 टक्के मातामृत्यू विकसनशील देशांत होतात. ग्रामीण भाग, गरीब आणि अशिक्षित लोक असलेल्या ठिकाणी हे प्रमाण अर्थातच जास्त आहे. प्रौढ स्त्रियांपेक्षा पौगंडावस्थेत असलेल्या मुलींना गर्भ राहण्याची आणि गर्भारपणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. याच सोबत ‘जागतिक आरोग्य संघटने’ने 1990 ते 2008 या कालावधीत गर्भावस्थेत मरण पावण्याच्या स्त्रियांच्या प्रमाणात सुमारे 34 टक्क्य़ांची घट झाल्याचंही स्पष्ट केलंय. गर्भावस्थेत आणि मुलाच्या जन्मानंतर नीट काळजी घेतली गेल्यास मूल आणि आई दोघंही वाचू शकतात, असंही ‘जागतिक आरोग्य संघटना’ म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या ‘मिलेनियम डेव्हलपमेंट गोल’ संदर्भात सप्टेंबर 2010 मध्ये झालेल्या एका परिषदेदरम्यान राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्यासाठी जागतिक योजनेची घोषणा केली होती. या योजनेद्वारे पुढील चार वर्षामध्ये 16 कोटी स्त्रियांचे प्राण वाचवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. याच योजनेचा भाग म्हणून ‘जागतिक आरोग्य संघटने’ने औषधांची यादी जाहीर केली आहे.
अपु-या आरोग्य सुविधा आणि अधिक आर्थिक विषमता असलेल्या ठिकाणी मातामृत्यूचं प्रमाण खूप जास्त असल्याचं संघटना म्हणते. यातील निम्म्याहून जास्त मातामृत्यू सहारा वाळवंटाच्या आसपास असलेल्या देशांमध्ये तर एक तृतीयांश मृत्यू आशियाई देशांमध्ये होतात. विकसनशील देशांमध्ये मातामृत्यूचं प्रमाण प्रति लाख अर्भकांमागे 290 असं आहे आणि विकसीत देशांमध्ये हेच प्रमाण 14 एवढं आहे. काही देशांमध्ये तर हे प्रमाण प्रति लाख अर्भकांमागे एक हजार इतकं गंभीर आहे. लहान वयात लग्न झालेल्या मुलींना गर्भ राहिल्यास मृत्यूचा धोका जास्त असतो. विकसीत देशांपेक्षा विकसनशील देशांमध्ये अशी परिस्थिती प्रकर्षाने दिसून येतं. वय वर्ष 15च्या आसपास गर्भवती राहिलेल्या मुलींच्या मृत्यूचं प्रमाण हे विकसनशील देशांमध्ये 120 अर्भकांच्या जन्मामागे एक तर विकसित देशांमध्ये हेच प्रमाण 4300 जन्मामागे एक असं आहे, असंही या अहवालातून स्पष्ट होतं.
जगभरातील 80 टक्के मातामृत्यू हे जंतुसंसर्ग, गर्भवती असताना रक्तदाब वाढल्याने (प्रेग्नन्सी इंडय़ूस्ड हायपरटेन्शन), प्रसुतीच्या वेळी अडचणी आल्याने (बाळाचं डोकं मोठं असणं, त्याची ‘पोझिशन’ चुकीची असणं, बाळाच्या जन्मानंतर खूप रक्त वाहून जाणं वगैरे) आणि असुरक्षित गर्भपात या कारणांमुळे होतात. इतर मृत्यू हे गर्भवती असताना किंवा त्यानंतर झालेल्या एचआयव्हीसारख्या रोगांच्या लागणीमुळे होतात. दरवर्षी तीन कोटींहूनहीअधिक नवजात बालकांचा मृत्यू होतो आणि तेवढीच मुलं जन्माच्या वेळी मृतावस्थेत असतात. गरीबी, माहितीचा अभाव, रूढीपरंपरा, अपुरी साधनसामुग्री, आरोग्य सेवा जवळ नसणं, अशा इतर अनेक गोष्टी स्त्रियांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. विकसनशील देशांमध्ये केवळ 66 टक्के स्त्रियांना गर्भावस्थेत आणि त्यानंतर पुरेशी सुविधा आणि उपचार मिळतात, असं हा अहवाल स्पष्ट करतो. याशिवाय आवश्यक त्या वेळी उपयुक्त औषधं उपलब्ध नसणं वगैरे कारणांमुळे अगदी साध्या आजारांमध्येही मुलं आणि मातांचे बळी जातात, असं मतही यात मांडण्यात आलंय. लहान मुलांची औषधं मोठय़ांपेक्षा वेगळी असतात, हेच अनेक लोकांना माहीत नसतं. त्यामुळे लहान मुलांसाठीही मोठय़ांचीच औषधं डॉक्टरांना घेण्यासाठी औषध कंपन्या भाग पाडतात. मोठय़ा माणसांच्या गोळ्या तुकडे करून त्याचा छोटा भाग मुलांना एखाद्या पातळ, कडू चवीच्या औषधातून दिला जातो. पण अनेकदा हा उपाय धोकादायकच ठरतो. ‘ओरल रिहायड्रेशन सिस्टिम’ ही डायरियासारख्या आजारांमध्ये अत्यावश्यक असलेली गोष्ट खूप ठिकाणी उपलब्ध नसते, याही गोष्टींची नोंद त्यात करण्यात आली आहे. मुलांसाठीची औषधं गोड आणि चांगल्या चवीची असणं, त्यांना योग्य डोस योग्य प्रमाणात दिला जाणं अपेक्षित आहे. पण पातळ औषधं ही पावडर, गोळ्या यांच्यापेक्षा महाग असतात, त्यांची साठवणूक करणं, सांभाळ करणं जास्त कठीण जातं. यावरही औषध उत्पादक कंपन्यांना ‘जागतिक आरोग्य संघटने’ने सूचना दिल्या आहेत. आवश्यक त्या वेळी योग्य ती औषधं जवळ असणं, हा जागतिक आरोग्य उद्दिष्टांचा महत्त्वाचा भाग आहे. सर्व देशांमधल्या रुग्णालयांमध्ये, आरोग्य केंद्रांमध्ये ही औषधं ठेवण्यात यावीत, असं आवाहन ‘जागतिक आरोग्य संघटने’ने केलं आहे. या औषधांमध्ये टी.बी., जन्मजात एचआयव्हीची लागण असलेल्या मुलांसाठीची विशेष पाच औषधंही आहेत.
छान लेख ठमे.
छान लेख ठमे.
कोमल, अभ्यासपुर्ण लेख आहे.
कोमल, अभ्यासपुर्ण लेख आहे.
ठमे, खरच लेख मस्त आहे.
ठमे, खरच लेख मस्त आहे.
याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच
याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे याचं वाईट वाटतं. अहवाल प्रसिद्ध होतात. औषधांची यादी जाहीर होते. नोटीसा पाठवल्या जातात पण प्रत्यक्ष हे थांबतच नाही. कधी कधी याचा गैरफायदा घेऊन पैश्यांची कमाई करणारे पण पाहीले आहेत. या सगळ्यातून जन्माला घालणार्या आईची आणि जन्माला येणार्या जीवाची सुटका व्हावी एवढीच अपेक्षा आणि प्रार्थना.
लेख चांगला. काहीच
लेख चांगला. काहीच दिवसांपूर्वी http://patientindia.com/ ही साईट बघण्यात आली. पेशंट्ससाठी उपयुक्त डिरेक्टरी आहे ही. औषधांचे कोणकोणते ब्रँड्स मान्यताप्राप्त आहेत, बाजारात आहेत, त्यांच्या किंमतीतील तुलना, वेगवेगळ्या रोगांची माहिती - लेख, नर्सिंग होम्स - हॉस्पिटल्स - डॉक्टर्स - रक्तपेढी इत्यादी सुविधांची तुम्ही रहात असलेल्या शहरानुसार माहिती अशा अनेक गोष्टी ह्या साईटमध्ये पाहिल्या. फक्त अशी माहिती खरोखर जे गरजू आहेत, त्यांच्यापर्यंतही पोचायला हवी.
चांगलं लिहिलं आहेस ठमे.
चांगलं लिहिलं आहेस ठमे.
छान पण कटु सत्य , छान लिहिल
छान पण कटु सत्य , छान लिहिल आहेस ठमे.
चांगला लेख!
चांगला लेख!
ठमादेवी, छान. माहितीपूर्ण
ठमादेवी, छान.
माहितीपूर्ण लेख.
केनयातही हे प्रमाण भयावह आहे.
केनयातही हे प्रमाण भयावह आहे. इथे सुपरमार्केट मधे ग्राहकांना प्रत्येक खरेदीच्या वेळी एक मामूली रक्कम ( भारतीय चलनात दोन रुपये ) द्यायचे आव्हान केले जाते. त्यातून या कामासाठी पैसा उभा केला जातोय.
आभार सर्वांचे... अरुंधती मी
आभार सर्वांचे... अरुंधती मी पाहते ती वेबसाईट कदाचित मला एखादा नवीन विषय सापडेल लिहायला.
नक्कीच! त्यात वरील लेखाच्या
नक्कीच! त्यात वरील लेखाच्या अनुषंगाने टीन एज प्रेग्नन्सी, मिसकॅरेजेस, कुटुंब नियोजनाविषयीही लेख आहेत.
कोमल, खुप महत्वाचा आणि
कोमल,

खुप महत्वाचा आणि अभ्यासपुर्ण लेख !
लहान मुलांची औषधं मोठय़ांपेक्षा वेगळी असतात, हेच अनेक लोकांना माहीत नसतं. त्यामुळे लहान मुलांसाठीही मोठय़ांचीच औषधं डॉक्टरांना घेण्यासाठी औषध कंपन्या भाग पाडतात.
ग्रामीण भागात तर हे अगदी सर्रास घडताना दिसतं, कित्येक गोळ्या या साध्या किराणा दुकानात देखील मिळतात, तो दुकानदार सांगेल त्या गोळ्या,त्या प्रमाणात लोक सर्रास घेतात.