आकाशी झेप घे रे पाखरा

Submitted by असो on 24 April, 2011 - 01:03

"बाबा .................."

" काय झालं शोन्याला ?"

" आई रागावते सारखी सारखी, उठल्यापासून रागावते "
पिल्लू रडवेलं होऊन म्हणत होतं..

" काय ओरडत असतेस गं. झोपेतून उठल्यापासून काय भुणभुण आहे ? जरा प्रेमानं बोल कि..
पाच वर्षांच बाळच आहे ते "

" तुम्ही मधे पडू नका. ती तसंच करते. खूप हट्टी झालीय. मला आवरायचंय , तिचं आवरायचंय, बसची वेळ झालीय. हिला खायला तास लागतो. कधीचा घास तोंडात ठेवलाय "

" अग नाही खाल्लं तर नाही खाऊ दे. डबा खाईल ना ती. " मनात म्हटलं माझ्यावर गेलीये . मी पण असाच होतो .

" हे बघा.. तुम्ही तिची बाजू घेता ना !! माहीतीये ? दोन दिवस तिला जेवायला विचारलं नाही तर तश्शी बसून होती तुमची पोरगी. म्हटलं विचारल्याशिवाय द्यायचं नाही तर खायचं नावच घेत नाही. कसं होईल ? तिचे गाल बघा, डोळे बघा कुठं चाललेत ?"

रोजचा सकाळचा हा ठरलेला संवाद.
रोज माझ्या मघाचा रडवेला चेहरा आणि तसच शाळेत जाणं.
हिने तिला झोपेतून फरफटत उठवून आणणं..
मघा ब्रश कर.. कर म्हणते ना
मघा बाथरूम मधे जा
मघा हे.. मघा ते
केव्हढा आरडा ओरडा !

आणि तिच्या आईचं तरी काय चुकत होतं.. बाळ एकदा शाळेत गेलं कि त्याचं बाल्य संपतंच कि. घड्याळाच्या काट्यावर पळणा-या कामगाराची निर्मिती करणा-या कारखान्यात स्वतःच्या हातांनी तिला आम्हीच तर लोटलं होतं. न लोटून सांगतोय कुणाला ?

मूल होत नाही म्हणून कित्येक उपाय केल्यानंतर चौदा वर्षांनी झालेली पोर ही. इक्सी बेबी ! जन्मली तेव्हा गुटगुटीत होती. काय कौतुक होतं.. तिची आई तर दोन बोटं स्वर्गातच होती !

तिला काय बनवायचं, माझी मुलगी काय बनणार याच्या चर्चा झडू लागलेल्या. तिच्या बोबड्या बोलांचं, कल्पनाशक्तीचं सगळ्याचंच कौतुक होऊ लागलं.

इवली इवली पावलं बोटाला धरून घरभर हुंदडू लागली. कोण बाहेर चाललय याचा नेमका अंदाज घेऊन दरवाजापाशी येऊ लागली..

बोललेले शब्द , उच्चार हे लक्षपूर्वक ऐकून बोबडं बोबडं बोलूही लागली.
मग तिला ए वेडू म्हटल्यावर त्याची परतफेडही होऊ लागली.
सगळ्याचंच कौतुक..

बाळाचं बाळसं जाऊ लागलं आणि आईला काळजी वाटू लागली. मग काजू, बदाम, पिस्ता आणि जे नाही ते टाकून त्याचा पातळ शिरा बनवून तिला घट्ट बांधून चारायचा कार्यक्रम सुरू झाला. तिच्या पोटात काही गेलं कि आईला कसं कृतकृत्य वाटायचं.

पण मग हळू हळू तिची खाण्याची अनिच्छा चिंतेचा विषय बनू लागली. खाणं नाही, म्हणून एनर्जी नाही, एनर्जी नाही म्हणून खेळणं नाही. खेळणं नाही म्हणून भूक नाही... असं दुष्टचक्र मागे लागलेलं. त्यात आयसीएसची शाळा म्हणजे मूल घरीही बिझी राहणार. या वेळापत्रकात तिला खेळण्यासाठी वेळ कुठं होता ?

तिच्या आईचं काळजी करणं रास्त होतं. त्यात तिचं कार्टूनच वेड..
शाळेत जाण्यासाठी आई ओढत असत्तानाही एक झलक तरी डोरेमॉनचं काय झालं हे ती पाहून घेणारच. नाश्ता करताना लक्ष नसेल कि कार्टून सुरू. मग घड्याळ कुठं चाललंय याच्याशी तिला कर्तव्य नसतंच.

मला मात्र तिच्यात माझं बालपण दिसत होतं. कल्पनेच्या राज्यात तिला वावरताना पाहीलं कि लहानपणी राहून गेलेली कार्टूनची भूक आठवायची. तेव्हां कुठं टीव्ही होता ?

दोन जोड कपड्यात वर्षं निघायचं. वर्षाकाठी एखादा सिनेमा. सिनेमाला जाणं म्हणजे केव्हढा सोहळा होता. दादा सायकलवरून फिरायला न्यायचे तेव्हां त्यांचा घाम केसात टपकायचा. त्याचा वास अजून लक्षात आहे. त्यांच्या स्वतःच्या कपड्यांना ठिगळं असायची. आम्हाला मात्र काही कमी पडू नये ही त्यांची धडपड तेव्हा कळत नव्हती. बाप झाल्यावर मात्र एकेक सगळं उमजत गेलं. त्या काळात टीव्ही म्हणजे स्टेटस सिंबॉल असायचं. खूप श्रीमंत लोकांकडे टीव्ही असायचा.

दादांनी मात्र टीव्हीची कमतरता कधी जाणवू दिली नाही. रोज रात्री झोपतांना गोष्टी सांगणारे दादा आम्ही झोपल्यावरच झोपायचे. आमच्याबरोबर वेळात वेळ काढून खेळायचे. मोठ्या माणसांना तेव्हा मुलांसाठी वेळ द्यायला आवडायचं. खेळायला मैदानंही भरपूर होती. पालकांच्या दृष्टीनं मुलांना सुट्टीत शिबीरात टाकायची गरज त्यावेळी वाटत नसावी बहुतेक.

सुट्टीला आजोळी गेलो कि मग आज्जी गोष्टी सांगायची...
तिला सगळे वैनी म्हणायचे. ती खूप गोष्टीवेल्हाळ होती. रात्ररात्र तिच्या गोष्ती रंगायच्या.. इतक्या कि वैनीनं गोष्ट सांगायला सुरूवात केली कि शेजारच्या बाया तिला थांबायला लावायच्या आणि घाई घाईनं जेवणं उरकून दहा बारा कुटूंबं आमच्या बाजूला येऊन बसायची. आम्ही ओसरीवर अंथरलेल्या गोधडीवर रात्रीच्या गार वा-यात चांदण्यांखाली पहुडलेलो असायचो.

आणि मग गुलबकावली, सुखी दुखी, ओनाम्या अशा सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला मिळायच्या. आम्ही झोपलो तरी इतरांसाठी पहाटेपर्यंत गोष्ट चालत असे. अलिफ लैला ची कहाणी आम्हाला तेव्हा माहीत सुद्धा नव्हती.

त्या गोष्टीतली पात्र मग डोक्यात राहत. मन त्या कथेत रमत असे. ती जादुई नगरी, परीराज्य यांच चित्र मनात उभं राहायचं आणि मग एकटाच त्या कल्पनेच्या राज्यात मी रमत असे. त्या वेळी इतर मुलं खेळण्यात, खोड्या काढण्यात दंग असत.

मग आईचं ओरडण...

एका जागेवर बसून राहतो. अजिबात मुलांच्यात मिक्स होत नाही. कसं व्यवहार ज्ञान येणार कुणास ठाऊक ? आईनं रागावलेलं अजिबात आवडायचं नाही. लहानपणी तेच तर माझं सर्वस्व होतं. पण सारखी बोलणी खायला लागायची..

म्हणून नंतर आईचा राग येऊ लागला. प्रेम करणारे, लाड पुरवणारे सगळे आवडायचे. दादा मोठे असल्याने गावी गेल्यावर शब्द खाली पडायचा अवकाश.. काका, आत्या सगळे धावत यायचे. हीच सवय लागून गेली.

" मघा...एक तास झाला. पहिलाच घास तोंडात आहे . थांब आता कायमचंच कार्टून बंद करते तुझं. काय ठेवलंय ग त्या कार्टूनमधे .." हिच्या चढलेल्या आवाजानं तंद्रीतून बाहेर आलो.

" ओ. हा टीव्ही कुणाला तरी देऊन टाका बरं..."

मघा मात्र काकुळतीला येऊन म्हणत होती... आई, प्लीज लाव ना, प्लीज प्लीज..

मी काही न बोलता टीव्ही ऑन केला.
पुढची कॅसेट आता पाठ झालेली होती.

*************************

हल्ली मघाबद्दल तक्रारीच ऐकू येऊ लागलेल्या.

तासाला लक्ष नसतं. वहीत चित्र काढत बसते. एकटीच हसते, पेपर सोडवतानाही त्या कार्टूनच्या पात्रांचाच विचार करते....वगैरे वगैरे
आज मूड नाही म्हणून पेपर लिहीला नाही
उद्या येत असून सोडून दिलं..
छोट्या आदूला मारते.
मी म्हणत होतो.. जाऊ दे गं. अजून कळत नाही.

हिचं म्हणणं.... टीचर म्हणतात शाळा बदला.

सीनिअर केजी, पहिली ला कसली आलीये कॉम्पिटिशन ! टीचर्सबद्दल तर बोलायलाच नको. एकीकडे प्रिन्सिपॉल भाषणातून बाल्य जपा वगैरे सल्ले देणार आणि एकीकडे टीचर्स मान मोडेल इतका होमवर्क देणार.

सहामाहीच्या रिझल्टला आम्ही दोघं गेलो.

गणिताच्या पेपरमधे डोरेमॉन काढला होता. येणारी गणितं सोडवली नव्हती. परिक्षा काय असते हेच तिला समजत नव्हतं..

त्या क्षणी खूप अस्वस्थ झालेलो. काय वाटल कुणास ठाऊक..

तिला बाहेर नेलं आणि दोन ठेवून दिल्या......

तिच्या नजरेत अविश्वास.
मारल्यापेक्षा बाबाने मारलं याचा. प्रेमाने वागवणा-यातला मी होतो. लाड पुरवणा-यातला मी होतो.

आणि मी मात्र आता मारलच आहे तर... म्हणून मग तिला रागवत राहीलो.

"करशील पुन्हा असं ? पेपर मधे असं करशील ?"
" सारखं सारखं तेच तेच तरी कितीदा सांगायचं ? सांगितलं होतं ना तुला ? मग ? पुन्हा तीच चूक ? चल तुला सोडूनच देतो कुणाकडं तरी. ती बघ गरिबाची मुलं, शाळेत जायला मिळत नाही म्हणून रडतात आणि तू........ थांब आता, या भंगारवाल्याकडं सोडतो तुला. सगळी कामं करावी लागतील, मगच खायला मिळेल ना तेव्हा कळेल तुला "

माझं भान सुटलं होतं..

मी काय करून् बसलो होतो. तिच्या छोट्याशा विश्वात प्रचंड उलथापालथ होत होती.

घरी गेल्यावर ती भेदरलेली होती.

मी पडून राहीलो.
आईनं तिला जवळ घेतलं असलं पाहीजे. तिच्या हुंदक्यांचे आणि आईच्या समजावण्याचे आवाज येत होते..

" बाबा तुझ्यासाठी जातो ना रोज कामाला ? आपल्याला तुझी शाळा परवडत नाही बेटा. आपल्याला फी ला खूप पैसे लागतात बाळा.. बाबाला इतका पगार नाही शोन्या ! मग बाबा, बाहेरची कामं करतो. खूप फिरावं लागतं त्याला. सकाळी घर सोडतो, रात्री उशिरा येतो.. पण तुला बघ चांगल्या शाळेत घातलय. आणि तू असं केलस तर काय उपयोग झाला त्याच्या मर मर मरण्याचा ?"

माझ्या डोक्यात खाडकन प्रकाश पडला होता. तिला मिळणारे कमी मार्क्स हा माझ्यासाठी इश्शु कधीच नव्हता. काळजी होती ती ..माझी पोरगी माझ्यावर गेल्याची. ही अशीच राहीली तर तिला कधीच व्यवहारज्ञान येणार नाही. स्वार्थ कळणार नाही. कुणीही तिला फसवेल. माणसं तुटतील.. आणि स्पर्धेत ती मागं पडेल.

या चिंतेपायी आज हात उगारला होता.

मघाला मात्र काहीच कळलं नव्हतं. आदूचे लाड जास्त होतात. आई त्यालाच घेते, माझ्याकडे लक्ष देत नाही हे तिच्या डोक्यात होतं.

अधून मधून आईशी कडकडून भांडायला लागली कि हसून हसून पुरेवाट व्हायची.

बघ बघ त्याला मांडीवर घेतलंस
बघ त्याचा मा घेतलास
मला नाही ना जवळ घेतलं ?

हे असले डायलॉग्ज पाच वर्षाची चिमुरडी मारते हे सांगूनही कुणाला पटलं नसतं. तिच्या जगात सगळं तिला हवं तसच घडायला हवं होतं. प्रत्यक्षात वेगळं काही घडू शकतं हे तिच्या गावीही नव्हतं. आणि मनासारखं झालं नाही कि मग सगळंच बिनसायचं..

व्यवहार ज्ञानाच्या आभावाने कित्ती नुकसान होतं याच्यावर माझ्यापेक्षा आणखी कोण जास्त चांगलं सांगणार होतं.. माणसांवर विश्वास ठेवण्याने, फक्त चांगलाच विचार केल्याने जो फटका बसलेला त्यातून आजतागायत सावरलेलो नसतानाच सगळं जग विरोधात उभं आहे असं वाटू लागलं. स्वतःची लढाई स्वतःच लढायची असते हे कळेपर्यंत बराच उशीर झालेला. माणसं अशी का वागतात ?

माझ्यासारख्याच्या जगात सरळ सरळ व्यवहार होते. प्रत्यक्षातला जंगलचा कानून कल्पनेच्या राज्यात वावरणा-यांना कसा कळणार ?

ही माझ्यावर गेलीये म्हणून खूप पॅनिक होतोय का ?

धाकटा अडीच वर्षांचा. पण किती चंट आहे. बारीक लक्ष असतं. आताच गाड्यांची नावं न चुकता सांगतो. अंगात कसली एनर्जी आहे...
नकळत तुलना होते.

शाळेत पण हल्ली वॉर्निंग देतात..
कसं होईल तिचं ?

कुठंतरी हे विचार छळत होते.
अजून लहान आहे ती. कदाचित माझ्या मार्गाने ती जाणारही नाही.

माझ्या नशिबी आलं ते तिच्या नशिबी येऊ नये..

पुढच्या टेस्टला ती म्हणत होती.... आई तू एकटी ये. बाबा नको !!

****************************************

तिचं कार्टून बंद झालं होतं.
रोज ती रिमोटशी चाळा करत होती. एक मिनिट का होईना टॉम अँड जेरी पाहून घेत होती.
वाईट वाटत होतं..

पण अभ्यास इतका होता कि शाळेतून आल्यावर नऊ वाजत होते. मग जेवणखाण आणि झोपणं..

या वेळी टेस्टला ब-यापैकी मार्क्स पडले होते. अजूनही काही प्रश्न सोडून देणं, उत्तराला प्रश्नांचे क्रमांक नसणं हे चालूच होतं. पण या वेळी तिला कुणीच बोललो नाही.

ती आता विसरली होती.

पूर्वीसारखं माझे दोन गालाचे मा (पापे) घेणं मग तिचं गाल पुढं करणं चालू झालं होतं. तिच्यापेक्षा लहान असलेल्या बालाचे लाड केले कि फुरंगटून बसणं, त्याला मारणं हे प्रकार हल्ली वाढले होते.

असंच वर्षं संपलं.

परिक्षेच्या आधीच समर कँपची भुणभूण सुरू झाली. पाठवायला काही नाही. पण पुन्हा तिला कशाला त्या कोंडवाड्यात अडकवायचं म्हणून मी तयार नव्हतो. सुट्टीत आता खेळ, भूक याचं नियोजन करावं हा माझा विचार होता.

पण भुणभुण इतकी वाढली कि मी हो म्हणून टाकलं.

पुन्हा ती सकाळची बस, पुन्हा ते डाफरणं, ओरडणं...
डब्बा न खाणं
दोनच दिवसात ती कंटाळल्याचं जाणवलं. तिस-या दिवशी मात्र पुन्हा ती रमली होती.

समर कँप संपत आला होता. आम्हालाही बोलावलं होतं.

एक एक करून मुलांचे परफॉर्मन्सेस चालू होते. बाबांनी लिहून दिलेली कविता वाचणं, समूहगीत..
मनात म्हटलं...... हा होय समरकँप !!

अगदी शेवटी ग्रूप डान्स सुरू झाला.
मघा सगळ्यात पुढे होती.

मी खांबाआड उभा राहून पहात होतो.

पहिल्या गाण्यालाच तिने गुडघ्यात पाय मुडपून डोकं मागे टेकवलं तेव्हाच टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि कजरारे च्या धुन वर मुलं ठरवून दिलेल्या स्टेप्स करू लागली. पण मघा बिजलीसारखी हलत होती.

तिच्यात एक लय होती.
प्रत्येक स्टेपमधे तिच्याकडून काहीतरी स्वतःच अ‍ॅड होत होतं..
खूप प्रसन्न वाटत होती.
ती बेभान होऊन नाचत होती..

केवळ बाप म्हणून नाही तर सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

पाण्यात हलणारी मासोळी
लयीत धावणारी हिरणी
सगळं सगळं होतं तिच्यात..

हळुवार ओळींवर स्लो होत केलेल्या दिमाखदार हातांच्या स्टेपस, अंगातून दर्शवलेल्या लाटा आणि भुमरो भुमरो च्या तालावर स्वतःभोवती धरलेला फेर ..

काय फेर धरला होता.
तिच्या फ्रॉकचा घेर एका लयीत भिंगरीसारखा फिरत होता. चावी दिलेली बाहुली फिरावी त्या गतीनं ती फिरत होती..
तालावर उड्या घेत होती..
पाहणारे तिच्याकडे बोट दाखवून तल्लीन झाले होते.

मला दिसेनासं झालं...
हीच का ती सगळ्यांची बोलणी खाणारी पोर ? स्वतःच्याच मस्तीत, स्वत्:च्याच धुंदीत बेभान होऊन नाचणारी हीच का ती माझी इवलिशी छकुली..

तिच्या त्या परफॉर्मनसला पडलेल्या टाळ्याही मला थोड्या वेळाने ऐकू आल्या आणि ..
भरून आलं.
गळ्यात आवंढा दाटून आला.
कधी डोळे ओले झाले समजलच नाही..

सहज हिच्याकडे पाहीलं..
तिची अवस्था माझ्याहीपेक्षा वाईट होती.

डान्स संपला आणि टीचरने तिला उचलून घेतलं. सगळे जवळ जाऊन तिला हात मिळवत होते आणि मी ते कौतुक समाधानाने पहात होतो...

अचानक तिला आई दिसली आणि सगळ्यांना हिसका मारून ती एखाद्या तीरासारखी पळत सुटली. आईला अगदी घट्ट बिलगली.
आता एव्हढ्यात तिने काय पराक्रम गाजवला त्याचा लवलेशही तिच्या चेह-यावर नव्हता.

"आई माझे पण लाड कर ना आदूसारखे ..प्लीज"

आणि आई तिचे पापे घेत सुटली होती.

आज आरडाओरडा नाही कि फरफटणं नाही कि भुणभुण नाही..

"मघा .. "

तिला हाक मारताना माझा आवाज किती जड वाटला. तिला ऐकू तरी गेलं असेल का ?
पण आज तिचं मनच भरत नव्हतं... आईला सोडायलाच तयार नव्हती कन्या.

किती उपासमार झाली होती पिल्लाची. तिच्या आईच्या आणि माझ्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

अनावर होऊन मी बाहेर आलो. समोर बागेत रंगीबेरंगी फुलं फुललेली होती. माळ्याची पाणी द्यायची लगबग चालली होती.

झाड लावून विसरून जावं.. आपलं काम पाणी द्यायचं
बस्स ...
आपोआप कळ्या खुलतात.
फुलतात..
रंग तर निसर्गाने बहाल केलेले असतात
त्याचा आपण बेरंग का करावा.

हलकं हलकं वाटायला लागलं होतं. खूप प्रसन्न वाटत होतं

मागे पावलांचा आवाज झाला म्हणून पाहीलं तर मघा बाणासारखी येत होती..

एका झेपेत माझ्या कडेवर बसून वेड्यासारखी मा घेत सुटली...

"बाबा मी कशी नाचले आज ? बाबा सांग ना कशी नाचले "

" बाळा..खूप खूप खूप सुंदर . सर्वात छान ..."

"तुला आवडलं बाबा ?"

" अरे म्हणजे काय.. मी खूप खूप खुश आहे तुझ्यावर !! "

ती आनंदाने हसली..

आणि या वेळी मी तिचे मा घेत सुटलो... वेड्यासारखा. सगळं ओझं उतरल्यासारखा.

माझं रोम रोम म्हणत होतं...
जा... आकाशी झेप घेप घे रे पा़खरा !!!

- अनिल

गुलमोहर: 

प्रकाशित करताना संपूर्ण हा ओप्शनच सिलेक्ट करायचा राहून गेलेला .... Wink

आवडलं तर कळवा. नाही आवडलं तर सुधारणा सुचवा

छान.
सुरेख.
फार आवडल...............
खुप वेगळ लिखाण......
पु.ले.शु.
ह्यालाच Talent म्हणतात का हो.........?

अनिलब्रम्ह,
अहो काय झालय तुम्हाला ? खरच मला पण ही कथा खुप आवडली. भावना प्रधानता हा जर गाभा धरला तर या लेखनातुन अत्यंत उत्कट भावना वाचकांपर्यंत नक्कीच पोचल्या.

आणखी एक सामाजीक आशय किमान माझ्यापर्यंत पोहोचला. सर्वच मुल पोर्शन, प्रिपरेशन, पेपर ( परिक्षा ) आणि पास ( यशस्वी होणे ) या चक्रात गुंतण्याच्या मनस्थितित नसतात. दुर्दैवाने हाच एक मार्ग शाश्वत (?) सहजमान्य असल्याने आपण ( पालक ) त्यात मुलांना गुंतवु पहातो.

सुजाब्रह्म, रचुब्रह्म आभारी आहे..
नितीन ब्रह्म...माझ्या कळफलकबडवम छंदाच्या कौतुकाबद्दल आभार.. Wink
तुमचं विश्लेषण इतकं छान आहे कि दोष दाखवून दिले असते तरीही ते एका जाणकाराचं मार्गदर्शनच ठरलं असतं.. Happy

अनिल, माहीत नाही का ते पण डोळ्यांना नकळतपणे अश्रूंच्या धारा लागल्या... खूप खूप छान लिहीलंय....

मस्त!

पण मारामारी करून काही साधत नाही हो...!

नशिब तुमचं की लेकीने माफ केले.. माझ्यासारखी एखादी अश्या बर्‍याच गोष्टी मनात राखून आणि रोखून धरते.

छान!

खूप सुंदर.
अवलोकानावरचा फोटो तुमच्या लेकीचाच आहे का? आणखी एक विचारू?
प्रतिसाद देणार्यांना अनिलब्रम्ह,शुभांगीब्रह्म, प्रफुल्लब्रह्म,तृष्णाब्रह्म असे का संबोधत आहात?

घड्याळाच्या काट्यावर पळणा-या कामगाराची निर्मिती करणा-या कारखान्यात स्वतःच्या हातांनी तिला आम्हीच तर लोटलं होतं. >>

मस्तयं कथा..!

खूप छान लिहीले आहे. माझी मुलगी आता चक्क नाचाच्या क्लासात शिकवायला जाते. पहिल्या दिवशी सरांनी विचारले तेव्हा मला विश्वासच बसेना. आपलं पिल्लू आता जबाबदारीने दुसर्‍याला शिकविणार?
ग्रेट Happy

Pages