''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्या, त्यांना कुस्करणार्या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती लपत वा बदलत नाही तर अधिकच बिकट होत जाते. प्रस्तुत लेखात बालकांच्या सुरक्षेच्या फक्त एका पैलूविषयी माहिती संकलन केले असून ह्या विषयावर सर्व समाजात अधिक मंथन करण्याची व जागृती निर्माण होण्याची गरज आहे.
आंतरजालावर देखील बातमीपत्रांखेरीज अथवा सरकारी/ सेवाभावी संस्थांखेरीज मराठीतून ह्या विषयावर क्वचितच माहिती आढळते.
लहान मुले ही समाजाचा दुर्बल घटक मानली जातात, कारण ती आपल्या योगक्षेमासाठी, पालन-पोषणासाठी मोठ्यांवर अवलंबून असतात. परंतु दुर्दैवाने ह्या दुर्बल घटकाचे शोषण सर्वाधिक रीत्या समाजात दिसून येते.
हिंसाचार, शिव्या, मारामार्या, आतंकवाद ह्यांना सध्याची लहान मुलांची पिढी प्रत्यक्ष व प्रसारमाध्यमांतून रोजच सामोरी जात असते. पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांना चोपणे, स्त्रीभ्रूणहत्या, मुलीला जन्मानंतर नष्ट करणे, जातिभेद किंवा धर्मामुळे पोळली जाणारी मुले, मुलींची कुटुंबात व समाजात होणारी अवहेलना, बालविवाह, बलात्कार, छळ अशा अनेक परिस्थितींचा, वस्तुस्थितींचा सामना आजच्या मुलामुलींना करायला लागतो.
पण वास्तवात अशी समाजातील ग्रासलेली किंवा अवहेलना झालेली मुले जर तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या/ कुटुंबियांच्या संपर्कात आली तर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही काय करता अथवा कराल?
• नशिबाला दोष द्याल ?
• वाद घालाल की “आमच्या लहानपणी असेच होते, मग ह्यांनी सहन केले तर काय बिघडले ? ”
• वाद घालाल की “हीच संस्कृती आहे, म्हणून हे असेच चालत राहील?”
• गरीबीला दोष द्याल?
• भ्रष्टाचाराला दोष द्याल?
• कुटुंबाला दोष द्याल व दुर्लक्ष कराल?
किंवा आपला संबंध नाही म्हणून दुर्लक्ष कराल ?
• खरंच ह्या बालकाला सुरक्षिततेची गरज आहे का हे पाहाल?
• कारण-मीमांसा होईपर्यंत वाट पाहाल ?
किंवा तुम्ही ….…..
• त्या मुलाच्या सुरक्षिततेची काळजी घ्याल?
• त्या बालकाला व त्याच्या कुटुंबाला गरज पडल्यास मदत कराल?
• त्या मुलाच्या सुरक्षितेत काय त्रुटी आहेत हे पाहाल?
• जे त्या बालकाच्या हिताच्या विरोधात आहेत त्यांच्यापासून त्या बालकाचा बचाव कराल?
• गरज भासल्यास पोलिसांत किंवा बालक संरक्षण संस्थांना कळवाल ?
तुम्ही कसे वागाल हे तुमच्यावर आहे. तुम्ही स्वतःला फक्त एक सामान्य नागरिक म्हणून पाहता की समाजातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून?
जर तुम्ही स्वतःला जबाबदार समजत असाल तर सर्वप्रथम मुलांचे - बालकांचे हक्कही जाणून घ्या.
‘बालक’ म्हणजे कोण?
आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे, ‘बालक’ हा १८ वर्षाखालील कोणीही व्यक्ती असू शकतो. ही आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त व्याख्या आहे आणि युनायटेड नेशन्स कनवेन्शन ऑन द राईटस् ऑफ द चाइल्ड (यु.एन.सी.आर.सी.) ने व बर्याच देशांनी देखील ही व्याख्या मान्य केली आहे.
भारतात १८ वर्षावरील व्यक्तींनाच मतदानाचा हक्क व वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) व कायदेशीर मान्यता मिळते. १८ वर्षाखालील कोणत्याही मुलीचे लग्न व २१ वर्षाखालील मुलांचे लग्न हे कायद्याने गुन्हा आहे, बालविवाह कायदा १९२९ प्रमाणे. कायद्याप्रमाणे लग्नास पात्र व्यक्तीचे वय हे १८ मुलींचे व २१ मुलांचे आहे.
लहान मुलांची काळजी का घ्यावी लागते?
• लहान मुलं मोठ्यांसारखी प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकत नाहीत.
• बहुतेक समाजात असा समज झालेला आहे की मुले ही फक्त त्यांच्या पालकांची संपत्ती आहे, किंवा त्यांचा अन्य समाजाशी काहीही संबंध नाही.
• लहान मुलांना स्वतःचे विचार मांडणे, चांगल्या वाईटाची निवड करणे, निर्णय घेण्याची कुवत नसते असा समज आहे.
• त्यांना समजून मदत करण्याऐवजी त्यांच्यावर मोठ्यांचे विचार लादले जातात.
• लहान मुलांना मतांचा अधिकार नाही, राजकीय सहभाग नाही, व आर्थिक स्वातंत्र्य नाही. आणि त्यांचे म्हणणे देखील कोणी ऐकत नाही.
• मुख्य म्हणजे लहान मुलांना अत्याचारांना व शिव्याशापांना तोंड द्यावे लागते व त्याचा मुकाबला करण्यास ती असमर्थ असतात.
बालकांचे / मुलांचे शोषण म्हणजे नक्की काय?
ज्याद्वारे मुलाच्या शरीराला इजा किंवा हानी पोहोचेल असा संपर्क/ स्पर्श, आणि अशी कोणतीही कृती/ भाषण/ वर्तन ज्यामुळे ते मूल घाबरेल/ लज्जित होईल/ अवमानित होईल ते सर्व बालकाच्या शोषणा अंतर्गत मोडते. तसेच अशी कोणतीही कृती किंवा दुर्लक्ष ज्यामुळे मुलांची निकोप वाढ होण्यास बाधा येईल.
कोणत्याही धर्म, वय, वंश, लिंग वा सामाजिक/ आर्थिक स्तरातील मूल हे शोषणाला व अवहेलनेला बळी पडू शकते.
जर पालक व्यसनाधीन असतील तर मुलांच्या शोषणाची शक्यता जास्त वाढते.
भावनिक शोषण : (शिव्या देणे, मानसिक अत्याचार करणे किंवा मानसिक दृष्ट्या हानिकारक वर्तन करणे) ह्यात पालक किंवा देखभाल करणार्या व्यक्तीचे असे कृत्य किंवा कृत्य न करणे ज्याचा परिणाम गंभीर स्वरूपाच्या मानसिक/ भावनिक/ वर्तनात्मक वा त्यासंबंधी विकारात होतो किंवा होऊ शकतो.
ह्यात पालक/ देखभाल करणार्याने टोकाची किंवा विचित्र प्रकारची शिक्षा देणे (उदा : मुलाला अंधार्या खोलीत/ कपाटात बंद करणे किंवा बराच वेळ खुर्चीला बांधून ठेवणे किंवा मुलाला धमकावणे, घाबरविणे इत्यादी) यांचा समावेश होतो.
कमी तीव्रतेचे भावनिक शोषण म्हणजे मुलाला सदा हीन/ तुच्छ लेखणे, त्याला दूर लोटणे व नकोसे असल्याची वागणूक देणे, त्याचा हीन प्रकारे उल्लेख करणे, त्याचेवर निष्कारण दोषारोपण करणे किंवा त्याला बळीचा बकरा बनविणे.
उपेक्षा : बालकाच्या किमान गरजा न भागविणे. उपेक्षा ही शारीरिक, भावनिक किंवा शैक्षणिक असू शकते. शारीरिक उपेक्षेत अन्न, वस्त्र, पुरेशी वैद्यकीय काळजी, देखरेख न पुरविणे हे येते. तसेच मुलाचा त्याग करणे हेही ह्यात येते. शैक्षणिक उपेक्षेत मुलाला योग्य प्रकारे शाळेत दाखल न करणे, त्याची शाळेची फी न भरणे किंवा शाळेला अतिरिक्त दांड्या मारण्यास मुलाला भाग पाडणे/ उत्तेजन देणे इत्यादी येते. मानसिक उपेक्षेत मुलाला भावनिक आधार व प्रेम न देणे, मुलाकडे लक्ष न देणे, त्याची काळजी न घेणे, आई-वडिलांमधील भांडणांना त्याला सामोरे जावे लागणे, मुलांसमोर व्यसने (दारू, ड्रग्ज इत्यादी) करणे आणि त्यांना दारू व मादक पदार्थांच्या सेवनात सामील करून घेणे हे प्रकार येतात.
शारीरिक शोषण : बालकाला/ मुलाला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करणे. डाग देणे, जाळणे, मारणे, गुद्दे घालणे, लाथा मारणे, छडीचा मार, मुलाला गदगदा हालविणे किंवा मुलाला इजा पोहोचेल असे वर्तन. त्यात मुलाला इजा करण्याचा हेतू नसला तरी जर ती कृती मुलाच्या वयासाठी अयोग्य अशा अती-शिस्तीचा किंवा शारीरिक शिक्षेचा परिणाम असेल तर त्याची गणना शारीरिक शोषणातच होते.
काही आकडेवारी :
युनिसेफ व भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने २००७ साली केलेल्या 'बाल शोषणावर एक अध्ययन: इंडिया २००७' सर्वेक्षणानुसार बाहेर आलेली काही धक्कादायक आकडेवारी :
५ ते १२ वयोगटातील मुलांना शोषणाचा व त्यांच्याशी गैरवर्तन केले जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. या अत्याचारांमध्ये शारीरिक, लैंगिक तसेच मानसिक अत्याचारांचा समावेश होतो.
बालकांचे शारीरिक शोषण :
१. सर्वेक्षणात दर ३ मुलांमधील २ मुले शारीरिक शोषणाला बळी पडतात हे दिसून आले.
२. नमुन्यादाखल १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणांत ६९% मुलांचे शारीरिक शोषण होत होते. त्यात ५४.६८% मुलगे होते.
३. तेरा राज्यांमधील ५०% पेक्षा जास्त मुले ही कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शारीरिक शोषणाला व मारहाणीला सामोरी जात होती.
४. कौटुंबिक वातावरणात शारीरिक शोषण होणार्या मुलांमध्ये ८८.६% मुलांना त्यांच्या पालकांकडून शारीरिक शोषण होत होते.
५. शाळेत जाणार्या ६५% मुलांना शारीरिक दंडाची शिक्षा ( कॉर्पोरल पनिशमेन्ट) सहन करायला लागली होती. म्हणजेच ३ मधील २ मुलांना शाळेत अशी शिक्षा झाली होती.
६. त्यातील ६२% दंड शिक्षा ह्या सरकारी आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये दिल्या गेल्या होत्या.
७. इतर राज्यांपेक्षा आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि दिल्लीत मारहाण व शोषणाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
८. बहुतेक सर्व मुलांनी ह्याबद्दल कोणाकडेच तक्रार केली नाही.
९. ह्यातील ५०.२% मुलं आठवड्याचे सातही दिवस काम करतात.
लैंगिक शोषण :
१. सर्वेक्षणातील ५३.२२% मुलांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले.
२. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि दिल्लीत सर्वात जास्त लैंगिक शोषणाचे बळी आढळले. मुलगे व मुली दोन्ही.
३. एकुणांतील २१.९०% मुलांनी तीव्र स्वरूपाचे लैंगिक शोषण होत असल्याचे नोंदविले तर ५०.७६% मुलांनी इतर प्रकारचे लैंगिक शोषण होत असल्याचे सांगितले.
४. लहान मुलांमध्ये ५.६९% मुलांनी आपल्यावर लैंगिक स्वरूपाचा हल्ला झाल्याचे सांगितले. (सेक्शुअल अॅसॉल्ट)
५. आसाम, बिहार, दिल्ली आणि आंध्र प्रदेशात लहान मुलांवर लैंगिक स्वरूपाचा हल्ला घडण्याचे प्रमाण सर्वाधिक दिसून आले.
६. रस्त्यावर राहणारी मुले, बालमजूर आणि संस्थागत देखभालीत असलेल्या मुलांनी सर्वात जास्त लैंगिक स्वरूपाच्या हल्ल्यांचे प्रमाण नोंदविले.
७. ह्यातील ५०% शोषणकर्ते हे मुलांच्या परिचयातील होते किंवा विश्वासाच्या व जबाबदारीच्या पदावर होते.
८. बहुतेक मुलांनी ह्या प्रकारांची तक्रार कोणाकडेही केली नाही.
भावनिक शोषण व मुलींची उपेक्षा :
१. दर दोन मुलांमागे एकाला भावनिक शोषणाला सामोरे जावे लागले.
२. मुलगे व मुलींना समप्रमाणात भावनिक शोषणाला सहन करावे लागले.
३. ह्यात ८३% केसेस मध्ये पालक हे शोषणकर्ते होते.
४. ह्यात ४८.४% मुलींनी आपण मुलगा व्हायला हवे होते ही इच्छा प्रकट केली.
ह्या लेखात भारतातील लहान किंवा अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल माहिती घेण्याचा, त्याविषयी सतर्क होण्याचा व प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच आपली एक नागरिक म्हणून जी जबाबदारी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती भारत सरकारच्या संबंधित संकेतस्थळांवरही उपलब्ध आहे.
मुलांचा लैंगिक छळ (Child Sexual Abuse )
समज : मुलांचा लैंगिक छळ आपल्या देशात कमी आहे. प्रसार माध्यमे चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींना प्रोत्साहन देतात. त्यामुळे लहान मुले व तरुण वर्ग आकर्षित होऊन लैंगिक छळाचे आरोप करतात. बऱ्याच घटनांमध्ये नालायक व वाईट वर्तनाच्या मुलीच कारणीभूत असतात.
वस्तुस्थिती : काहीच महिन्याची लहान बाळे, किंवा थोडी मोठी मुले लैंगिक छळाला बळी पडतात. मुलीच जास्त लैंगिक छळाच्या बळी होतात असे नाही तर मुले देखील लैंगिक छळाला बळी पडल्याचे दिसून आले आहे. व्यंग असणारे किंवा मंदबुद्धी मुले त्यांच्या निराधारते मुळे जास्तीत जास्त प्रमाणात लैंगिक छळाला बळी पडतात.
मुलांचा लैंगिक छळ हा जाती, धर्म, मूळ यावर मुळीच अवलंबून नाही व हे खेड्यात व शहरात दोन्हीकडे दिसून येते.
खालील पैकी कोणत्याही प्रकारे मुलांचा लैंगिक छळ होऊ शकतो :
• लिंगा द्वारे लैंगिक छळ. जसे. बलात्कार, किंवा शरीराच्या कुठल्याही अवयवाचा आत प्रवेश करून.
• मुलांचा लैंगिक कृत्याचे नमुने तयार करण्यासाठी वापर, वा लैंगिक कृत्याचे चित्र वा फिती दाखवणे.
• मुलांना संबंधासाठी उत्तेजित करण्यासाठी त्यांच्या अवयवांना स्पर्श करणे, किंवा एखादी वस्तू त्यांच्या अवयवांवरून फिरवणे.
• संबंधासाठी उत्तेजित करण्यासाठी शरीराचा भाग नग्न करणे.
• मुलांना अश्लील चाळे दाखवणे वा दोन मुलांना आपापसात अश्लील चाळे करायला लावणे.
• त्यांच्या वह्यांवर रंगीत अश्लील चित्र काढून किंवा त्यांच्याशी बोलताना अश्लील भाषा वापरणे.
अशा प्रकरणांमध्ये आरोपी हा नेहमी गोड बोलणारा, काळजी घेणारा, प्रेमाने वागणारा असल्याने तो स्वतःवरचे आरोप चुकीचे व खोटे असल्याचा दावा करतो.
मुलांचा लैंगिक छळ हा त्यांच्या परिचिताकडून किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडूनही होतो.
याला जबाबदार असणारी व्यक्ती ९०% त्यांच्या परिचयाची वा ओळखीची असते. अशी परिचित व्यक्ती आपल्या ओळखीचा, हुद्द्याचा व विश्वासाचा फायदा घेते आणि अश्लील कृत्ये करते. बऱ्याचवेळा अशी व्यक्ती ही नातेवाईकातलीच एक असते जसे, भाऊ, वडील, नातलग किंवा शेजारी. अशी व्यक्ती ही नातेवाईकातलीच असल्यास तो incest संबंध होतो.
लैंगिक छळ हा देह व्यापारातही मोडतो. जसे मुलींचा वेश्या व्यवसायासाठी व्यापार, ‘जोगीण’ किंवा ‘देवदासी‘ प्रथा. प्रसारण माध्यमे व लोकजागृती बरीच झाल्या मुळे, ह्या विषयीच्या अत्याचारांचे प्रमाण कमी झाले आहे.
अजून काही समज / गैरसमज व वास्तव :
पुरुष लहान मुलांचा वापर व त्यांवर लैंगिक अत्याचार त्यांची लैंगिक भूक मिटवण्यासाठी करतात, किंवा आपल्या सहचार्याकडून लैंगिक सुख न मिळाल्यामुळे करतात असा गैरसमज आहे. ते खरे नाही. हाही गैरसमज आहे की असा लैंगिक अत्याचार करणारे विकृत बुद्धीचे नसतात. हे अत्याचारी लोक विकृत बुद्धीचे नाहीत व ते पूर्णपणे सर्वसामान्य आहेत असा दिखावा केला जातो. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशा व्यक्ती स्वतःची गैरकृत्ये ही कशी न्याय्य व उचित होती हे दर्शविण्याचा प्रयत्न करतात. अत्याचार करणारी व्यक्ती सहसा त्या घटनेचा कोणी साक्षीदार नसावा ह्याची खबरदारी घेते. अनेकदा लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत असताना आजूबाजूचे लोक दुर्लक्ष करतात.
स्वतःवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल, किंवा लैंगिक चित्र वा दृश्य पाहण्यास भाग पाडल्याबद्दल, कोणाला सांगण्यास वा त्याबद्दल चर्चा करण्यास लहान मुले खूप घाबरतात. अत्याचारी मग कोणत्याही वयाचा असो, तो नेहमीच धीट असतो. अत्याचारी आपले असे कृत्य थांबवत नाही व अत्याचार होणारे ते अत्याचार सहन करत राहतात, खास करून जर ती व्यक्ती नातेवाईक किंवा जवळची परिचित असल्यास. बऱ्याच वेळा अशा प्रसंगात आईला हे सर्व माहीत असूनही ती तिच्या लाचारीमुळे काही करू शकत नाही. कुटुंबातील संबंध बिघडण्याची भीती किंवा तिच्या सांगण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ह्या भीतीने ती हे सहन करत राहते. घरातील मुख्य पुरुष / मोठा माणूस समाजाच्या, कुटुंबाच्या भीतीने ह्याकडे दुर्लक्ष करत राहतो.
लहान मुलांनी सांगितलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल शहानिशा करता असे अत्याचार नेहमी खरे आढळून आले आहेत. ही खरोखरीच आश्चर्याची व खेदाची बाब आहे की समाजात अशा लैंगिक अत्याचारांकडे दुर्लक्ष केले जाते. हेही दिसून येते की लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते आणि अत्याचाराचे जे बळी ठरतात त्यांबद्दल उलटे आरोप केले जातात व अत्याचार रोखण्यासाठी काही उपाय केले जात नाहीत.
मुले ही असहाय व भोळी असतात. त्यांना मोठ्यांसारखे लैंगिक अत्याचाराबद्दल किंवा लैंगिक संबंधाबद्दल काही ज्ञान नसते. म्हणून अशा प्रकारांत ती स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. नुसते लैंगिक अत्याचाराबद्दल किंवा लैंगिकते बद्दल ज्ञान असल्याने मुलांवर आरोप करणे बरोबर नाही. वेश्यांवर देखील बलात्कार होऊ शकतात, व कायदाही त्याचा विचार करतो. मुलांवर उलटे आरोप करून आपण आपली सामाजिक जबाबदारी मुलांवरच ढकलतो आहोत, व अत्याचार करणाऱ्याला मोकळा सोडत आहोत.
अल्पवयीन मूल हे लैंगिक संबंधास परवानगी देऊच शकत नाही. आणि तशी परवानगी त्याने दिल्यास कायद्याने ती परवानगी ग्राह्यच होऊ शकत नाही. ह्यात मुलगे व मुली दोघांचाही समावेश होतो.
कायद्यानुसार जर मुलीचा नकार असेल वा ती १६ वर्षापेक्षा लहान असेल तर तिच्याशी शारीरिक संबंध करणे म्हणजे बलात्कार होतो.
मुले जेव्हा लैंगिक अत्याचारा विषयी तक्रार करतात तेव्हा त्यांच्यावर अनेकदा कोणी विश्वास ठेवत नाही व त्यांना त्यांच्या चारित्र्यावर वा विश्वासार्हतेवर शंका घेणारे प्रश्न केले जातात. त्यांना असे भासवले जाते की तेच मोठे गुन्हेगार आहेत व त्यांच्या वागणुकीने त्यांच्या वर असा प्रसंग ओढवला आहे.
लैंगिक अत्याचाराचा लहान मुलांवर परिणाम (Impact of Sexual Abuse on Children)
अत्याचाराचा मुलांवर परिणाम कमी किंवा जास्त होऊ शकतो :
• शारीरिक जखमा जसे ओरखडे, चावे, चिरा इ. गुप्तांगातून रक्त येणे, किंवा आणखी इतर जागी शारीरिक जखमा.
• मुले भीती, चूक केल्याची भावना, मानसिक तणाव किंवा लैंगिक कमतरता याला तोंड देतात आणि कुटुंबापासून वेगळी पडतात.
• असे अत्याचार झालेल्या मुलांना मोठेपणी नातेसंबंधामध्ये बाधा येतात आणि लैंगिक संबंधामध्ये कमतरता येतात.
• आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे अशा अत्याचार झालेल्या मुलांमध्ये प्रत्येकावर संशय घेण्याची वृत्ती वाढते आणि ती फार काळ राहते. कधीकधी जन्मभर हा परिणाम होतो. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते व लैंगिक संबंधांवरही याचा परिणाम होतो.
मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार ओळखणे (Identifying Child Sexual Abuse)
मुलांवर वा युवांवर होणारे लैंगिक अत्याचार ओळखण्याची चिन्हे : खाली सांगितलेली चिन्हे / खुणा ही मुले त्रासात आहेत हे ओळखण्याचा अंदाज घेण्यासाठी आहेत आणि हा लैंगिक अत्याचार असू शकतो. त्यावरून एकदम या निर्णयावर पोहोचू नका की हे लैंगिक अत्याचाराचेच परिणाम आहेत , त्यापेक्षा सर्वांच्या सल्ल्याने किंवा स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. हे फार महत्त्वाचे आहे.
मुली
६ ते ११ वर्षे -
- इतर मुलांमुलींत उच्छृंखल/ कामुकपणे वावरणे वा त्यांच्याशी अश्लील बोलणे
- तोंडाने लैंगिक अत्याचारा बद्दल बोलणे.
- गुप्तांगांची काळजी दाखवणे वा फार काळजी घेणे
- मोठ्यांबरोबर उच्छृंखल संबंध ठेवणे.
- अचानक पुरुष किंवा मुलांविषयी किंवा स्त्रियांविषयी वाटणारी भीती, किंवा एखाद्या जागेला घाबरणे.
- वयोमाना पेक्षा लैगिकते बद्दल व लैंगिक संबंधांबद्दल जास्त माहिती असणे
१२ ते १७ वर्षे -
- आपल्यापेक्षा लहान मुलांमध्ये उच्छृंखलपणे वावरणे वा तशी कृत्ये करणे
- उच्छृंखल वागणे वा लैंगिकतेचा विषय पूर्णपणे टाळणे
- लाज, शरम वा भीती लपवण्याचा प्रयत्न करणे
- घरातून पळून जाणे.
- झोपेत दचकणे घाबरणे, वाईट स्वप्ने बघणे इ.
मुले
६ ते ११ वर्षे -
- इतर मुलांशी लैंगिक वागणूक
- आकस्मिक भीती किंवा मुलांवर, मुलींवर किंवा विशिष्ट जागे बद्दल अविश्वास
- झोपेत दचकणे घाबरणे इ.
- अचानक आक्रमक/ हिंसक वागणे
- पूर्वीच्या आवडींविषयी नावड दाखवणे
१२ ते १७ वर्षे -
- इतर वा लहान वयाच्या मुलांशी लैंगिक वागणूक किंवा एकदम आक्रमक वागणूक
- भिडस्त किंवा कुढणारी वागणूक
- दिखावेबाजी वा बेडर वागणूक
- लाज, शरम वा भीती लपवण्याचा प्रयत्न करणे
- भिडस्त वागणूक
(स्रोत : युनिसेफ, शिक्षकांना शिकण्याची माहिती http://www.unicef.org/teachers/ युनिसेफ मुलांचे संरक्षण आय.लेथ, यांच्याकडून)
मुलांना नेहमी मोठ्यांची आज्ञा पाळायला सांगितले जाते. ह्या प्रक्रियेत ते मोठ्यांना नाही कसे म्हणायचे हेच विसरतात. जरी त्यांना मोठ्यांचे वागणे आवडत नसले तरीही ते अनेकदा मोठ्यांना “नाही” म्हणू शकत नाहीत.
मुलांना अशा परिस्थितीत ''नाही'' म्हणायला शिकवा.
एक नागरिक म्हणून तुमचे कर्तव्य :
• पोलिसांना किंवा मुलांच्या संरक्षण संस्थांना कळवा.
• मुलांच्या संरक्षण संस्था मदत व सहकार्य करतात ना हे पाहा.
• समाजाचे सहकार्य मिळवा.
• प्रेसला कळवणे हा तुमचा शेवटचा उपाय असेल.
स्वतःच्या कुटुंबातील मुलांच्या सुरक्षिततेविषयी एक पालक या नात्याने तुम्ही कोणती जबाबदारी व खबरदारी घ्याल?
# तुमच्या मुलांना ग्राह्य / मान्य आणि अग्राह्य/ अमान्य स्पर्शांविषयी शिकवा. त्यांना लोकांबद्दल त्यांचे मन जे काही सांगेल त्यावर विश्वास ठेवायला शिकवा. तुम्ही स्वतः शोषणाची लक्षणे काय असतात, कसे ओळखावे हे शिकून घ्या म्हणजे तसे होत असेल तर लगेच तुम्हाला ते ओळखता येईल.
# मुलांचे किंवा बालकांचे शोषण म्हणजे फक्त लैंगिक शोषण एवढेच नव्हे तर त्यात मुलांना कोणत्याही प्रकारची इजा मोडते.
# मुलांना ''चांगला'' व ''वाईट'' स्पर्श ह्यांमधील फरक शिकवा. त्याबद्दल समजावून सांगा.
# त्यांना हे समजावा की कोणालाही तुमच्या मुलाला / मुलीला दुखापत करण्याचा किंवा गुप्तांगांना स्पर्श करण्याचा किंवा नकोसा वाटणारा स्पर्श करण्याचा अधिकार नाही.
# तुमच्या मुलांना हे शब्द लक्षात ठेवायला व गरज पडल्यास वापरायला सांगा : नाही, जा, ओरडा, सांगा.
त्यांना कोणी नकोशा पद्धतीने स्पर्श केला किंवा अनोळखी वा ज्या व्यक्तीविषयी त्यांना खात्री वाटत नाही अशा व्यक्तीबरोबर जायला सांगितले तर त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला पाहिजे.
# अशा व्यक्तीपासून व स्थान / परिस्थितीपासून लवकरात लवकर दूर जाण्याचे आपल्या मुलांना सांगा.
# आरडा ओरडा करायचा असेल तर कशा प्रकारे संकटसूचक आरडाओरड करायची हेही मुलांना शिकवा. अशा ओरडण्यात खर्जातील किंवा खालच्या स्वरातील आवाजात मोठ्याने ओरडतात. अशा आवाजाकडे लक्ष लगेच वेधले जाते. असा आवाज इतर कोणत्याही कारणासाठी वापरू नये. तो फक्त त्याच परिस्थितीत वापरावा.
# मुलांनी पालक/ शिक्षक किंवा देखभाल करणारे / काळजीवाहूंना झाल्या प्रकाराबद्दल लगेच सांगावे.
# जी व्यक्ती मुलांना अस्वस्थ करते, नकोशी वाटते, अगदी ती व्यक्ती तुमचा शेजारी का असेना, त्या व्यक्तीपासून मुलांना सावध राहायला सांगावे.
# मुलांना हेही शिकवा : कोणती परिस्थिती टाळावी, जी व्यक्ती पालक/ शिक्षक/ देखभाल करणारी किंवा जवळची नाही त्यांकडून खाऊ/ पेय / खेळ/ भेटवस्तू इत्यादी घेऊ नये. पोलिसांची मदत कशी घ्यावी, पोलिसांना कसे ओळखावे, पोलिसांचा बिल्ला कसा ओळखावा हेही मुलांना शिकवावे.
# भारतातील मुलांना चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर १०९८ कसा वापरायचा ते सांगावे. चाइल्ड हेल्पलाईन तर्फे प्रत्यक्ष मदत, वैद्यकीय मदत, निवारा, शोषणापासून संरक्षण इत्यादी अनेक बाबतींत मदत मिळते, तसेच फोनवरून सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशनही केले जाते. http://www.childlineindia.org.in/1098/b1a-telehelpline.htm
अमेरिकेसारख्या ठिकाणी ९११ नंबर ला कॉल करता येतो.
# शोषणाच्या खुणा ओळखायला शिका. मुलाचे वर्तन, त्याच्या अंगावरच्या जखमा, वळ, इतर खुणांवरून जर तुम्हाला काही गैरप्रकार होतोय असे वाटले तर चाइल्ड हेल्पलाईन, समाजकल्याण खाते, मुलांच्या संदर्भात काम करणार्या संस्था, पोलिस यांची मदत घ्या.
# जर तुम्हाला इतर कोणा मुलावर असा अत्याचार होतोय हे जाणवले/ आढळले तर त्याविषयी योग्य ठिकाणी तक्रार नोंदवा. प्रशिक्षित व अनुभवी लोकांची मदत घ्या.
# तुमचे कायदे समजून घ्या.
संस्थात्मक पातळीवर / शाळांतून ह्याविषयासंदर्भात काय करता येईल?
१. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन
२. पालक व शिक्षकांच्या कार्यशाळा.
३. शाळेतील मुलांना ''वैयक्तिक सुरक्षे'' अंतर्गत बोलते करणे, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ह्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. जर ह्या संवादांतर्गत एखाद्या मुलाने / मुलीने जे काही सांगितले त्यातून त्याचे/ तिचे शोषण होत आहे हे पुढे आले तर परिस्थितीनुसार ते पालक व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देणे.
भारतीय कायदा :
द कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स अॅक्ट २००५ : http://wcd.nic.in/The%20Gazette%20of%20India.pdf
मुलांविषयी / बालकांविषयी भारतात अस्तित्त्वात असलेल्या कायद्यांतील त्रुटी:
भारतीय दंड संहितेनुसार बालक म्हणजे बारा वर्षे वय किंवा त्यापेक्षा कमी धरले गेले आहे. बालक हक्कांनुसार १८ वर्षांखालील कोणीही व्यक्ती ही बालक म्हणून गृहित धरलेली आहे. भारताच्या कायदेव्यवस्थेतही वेगवेगळ्या कायद्यांनुसार बालकाची व्याख्या बदलताना दिसते.
भारतीय दंडविधानानुसार बालकाचे वय १२ वर्षांपर्यंत म्हटले आहे तर भारताच्या मनुष्य दलाली विरोधी कायद्यांनुसार ते वय १६ आहे. ज्या कलमानुसार बलात्काराला शिक्षा मिळते त्या भारतीय दंड विधानाच्या ३७६ व्या कलमानुसार हेच वय १६ वर्षे म्हटले आहे. तसेच दंड विधानाच्या ८२ व ८३ व्या कलमानुसार ७ वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या बालकाने तसेच १२ वर्षे पेक्षा कमी वय असलेल्या बालकाने केलेली कोणतीही कृती ही गुन्हा ठरू शकत नाही असे म्हटले आहे.
व्याख्यांमध्ये असलेल्या ह्या फरकामुळे त्याचा गैरफायदा गुन्हेगारांतर्फे घेतला जातो व ते कमी शिक्षेवर सुटतात.
तसेच ह्या संदर्भातील गुन्ह्यांना जरी ७ ते १० वर्षांची कारावासाची शिक्षा असली तरी ह्या केसेस मॅजिस्ट्रेट कोर्टातही चालविल्या जाऊ शकतात, जेथे जास्तीत जास्त ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देता येते.
जर लैंगिक शोषण व लैंगिक गुन्हा पुन्हा पुन्हा होत राहिले तर त्याचा त्या पीडित मुला/मुलीच्या मानसिकतेवर प्रचंड दुष्परिणाम होतो. पण अशा प्रकारच्या पुन्हा पुन्हा केल्या जाणार्या शोषणासाठी वेगळा कायदा किंवा शिक्षा नाही.
केवळ प्रत्यक्ष बलात्काराच्या गुन्ह्यात ३७७ व्या कलमानुसार ७ ते १० वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते. परंतु इतर प्रकारचे लैंगिक गुन्हे करणार्या गुन्हेगारांचा गुन्हा हा कमी तीव्रतेचा धरला जातो.
·
ह्या संदर्भात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रोम सेक्शुअल ऑफेन्सेस अंतर्गत २०११ मध्ये राज्यसभेत दाखल केलेले विधेयक : http://www.lawyerscollective.org/files/The%20Protection%20of%20Children%...
हे विधेयक संमत झाल्यावर बालकांविरोधात केल्या जाणार्या लैंगिक गुन्ह्यांसाठी एक सर्वसमावेशक कायदा अस्तित्वात येईल. त्यानुसार १० वर्षांची सक्तमजुरी, आणि ती प्रलंबित झाल्यास आजन्म कारावासची शिक्षा होऊ शकेल. बालकांच्या विरोधात घडणारे वेगवेगळे लैंगिक गुन्हे, जशी पोर्नोग्राफी, लैंगिक छळ, बलात्कार इत्यादी गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून ह्या विधेयकात तरतुदी सुचविल्या आहेत तसेच जलद न्याय मिळण्यासाठी जलदगती न्यायालयांची सोयही सुचविली आहे.
घटनेने बालकांना हक्क दिले आहेत. पण त्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सार्या समाजाने एक होऊन काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा जरी उचलला तरी आपण समाजात मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू शकू. त्यांचे बालपण अबाधित राखू शकू, तसेच स्वस्थ मनाचे अन् आरोग्यपूर्ण शरीराचे नागरिक होण्यासाठी ह्या मुलांच्या उपयोगी पडू शकू.
धन्यवाद!
(लेखाचे संदर्भ : युनिसेफ व महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केलेले सर्वेक्षण अहवाल, सरकारी अहवाल, कायदेतज्ञांची संकेतस्थळे, कायदाविषयक ब्लॉग्ज, बाल सुरक्षा पुस्तिका, बालक सुरक्षा विषयक विविध संकेतस्थळे )
-- अरुंधती
मुग्धानन्द ने लिहिलेल्या
मुग्धानन्द ने लिहिलेल्या आदिपथ संस्थेचा पत्ता :
AADIPATH - Aadipath Foundation and Research Centre
G-91,Gr. Floor, Lokmanya Nagar
Near Karnataka Sangh Hall,
T.H.Kataria Marg,,Mahim (W)
Mumbai - 400016.
Maharashtra
Note - This is a Charitable non-profit organization, working for Prevention of Abuse and Trauma at Home, Started toll free help line 1800 22 0205. ( दुपारी १२ ते ६)
This service on phone is free of charge, deal with counseling ,advice, guidence,legal rights,and to impart information about available services in the proximity of the caller.
प्रतिसादाबद्दल धन्स दीप्स आणि मुग्धानन्द.
अरुंधतीजी, नेहमीप्रमाणे
अरुंधतीजी, नेहमीप्रमाणे अभ्यासपुर्ण लेख.
अरुंधती, अतिशय अभ्यासपूर्ण
अरुंधती, अतिशय अभ्यासपूर्ण लेख.
आकडेवारी वाचली की सुन्न व्हायला होतं.
भारतातील चाईल्ड हेल्पलाईनचा नंबर मला माहीत नव्हता. बरं झालं, आता भारतातील नातेवाईकांना सांगून ठेवते.
अरुंधती, माहितीपूर्ण
अरुंधती, माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. मणिकर्णिकाचा प्रतिसाद आवडला.
>>अशाप्रकारच्या अत्यंत दुर्दैवाची शिकार भारतातीलही मुले होत असतात ही गोष्ट लांछनास्पद आहे.
मला यातील भारतातीलही या शब्दाचे प्रयोजन कळले नाही. भारत म्हणजे काही वेगळे नव्हे. या गोष्टी जगभर घडतात्/घडत आल्या आहेत. आणि जगाच्या पाठीवर कुठेही घडणारे शोषण हे लांछनास्पदच.
>>आपली परंपरागत एकत्र कुटुंबे खूपच संवेदनाशील आणि सक्षम होती हे आठवल्यावाचून राहत नाही.>>
हाही एक गैरसमज! उलट परंपरागत एकत्र कुटुंबात लहान मुलांचे शोषण करणारे बरेचदा घरातलेच नातेवाईक असतात. अशा काका-मामांविरुद्ध मुलाने तक्रार करणे, त्याच्यावर इतरांनी विश्वास ठेवणे वगैरे फार कठिण असते. अगदी मुलाच्या आईचा विश्वास बसला तरी मुलाला संरक्षण देणे बहुतेक वेळा तिला शक्य होत नाही.
माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद.
माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद. धन्यवाद.
>> भारतातीलही / एकत्र कुटुंबे खूपच संवेदनाशील आणि सक्षम
स्वाती२ यांना अनुमोदन. अशा समजुती वरवर पाहता निरुपद्रवी वाटल्या तरी त्यांचमुळे अशा घटना उघडकीस येण्यास प्रतिबंध होतो, म्हणून त्या मुळातूनच उपटायला हव्यात.
चांगले लिहिलयस अरुंधती.
चांगले लिहिलयस अरुंधती. माहितीपूर्ण आहे लेख.
खुप उपयुक्त लेख. थँक्स
खुप उपयुक्त लेख. थँक्स अरुंधती.
एका नाजूक आणी महत्वाच्या
एका नाजूक आणी महत्वाच्या विषयावर परिश्रमपूर्वक लिहिलेल्या लेखाबद्दल धन्यवाद.
अत्यंत उपयुक्त लेख. जास्तीत
अत्यंत उपयुक्त लेख. जास्तीत जास्त लोकंपर्यंत पोचायला हवा.
वर स्वाती२ आणि स्वाती यांनी लिहीलय त्याला अनुमोदन. आपल्याकडे एकत्रित कुटुंब होते म्हणजे सगळे सुरळीत होते असे नाही.
मुळात असे प्रकार लक्षात आल्यावर काय करायचे असते याची माहिती सगळ्यांपर्यंत पोचवायला हवी, त्यासाठीचे प्रबोधन खूप गरजेचे आहे. मुलांना शाळेत अश्या संस्थांची माहिती करून द्यायला हवी.
या लेखात म्हटलय की मुलांनी आपल्या आई वडीलांना न घाबरता याबद्दल सांगायला हवे मुळात आई वडील समजुतदार असतील, मुलांवर विश्वास ठेवतील या गृहीताकावर हे लिहीलेले आहे. प्रत्यक्षात अशी परिस्थीती असेलच असे नाही. कदाचित घरचेच मुलांवर असा अत्याचार करत असतील ही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मुले कौन्सलर्सशी मोकळेपणी बोलण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा अश्या संस्था व त्यांच्याशी कसा संपर्क करायचा ही सगळी माहितीपण सगळ्यांपर्यंत सतत पोचायला हवी.
अरुंधती, खूप माहितीपूर्ण व
अरुंधती, खूप माहितीपूर्ण व उपयुक्त लेख. प्रतिसादातूनही बर्याच गोष्टी कळल्या. वेगवेगळ्या माध्यमाद्वारे मुलांना हे समजणे आवश्यक आहे. पालक फार थोडी मदत करु शकतात - घरात आई-बाबा मुला-मुलींना मर्यादित स्वरुपात सांगू शकतात. पण वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे नाटुकले वगैरे स्वरुपात सांगितले तर फार उपयुक्त प्रबोधन होईल असे वाटते.
या अतिशय संवेदनशील व गंभीर स्वरुपाच्या विषयाला समोर आणल्याबद्दल खूप, मनापासून आभार.
अरूंधती, अगदी महत्वाचा विषय
अरूंधती,
अगदी महत्वाचा विषय अन मुद्दा! भ्राष्टाचार विरोधी सद्य लढाईचा रथ या ईतर बिकट समस्यांच्या मार्गाने गेला तर बरे होईल.. कायद्यात सुधारणेला बराच वाव आहे. शींचे ईंग्रजांनंतर आपल्याकडे कायदा बदल व सुधारणा हे नावाला देखिल नाही. लोकसभेत चर्चा म्हणजे एक मासळी बाजार असतो... आपण निवडून दिलेले आमदार, खासदार हे एकही शब्द न बोलता (किंबहुना नुस्तेच आरडा ओररडा करत) १०-१२ बिले पास करून टाकतात... आणि त्यातील तरतूदी या बरेच वेळा राजकारण्यांच्या हिताच्या असतात. anti corruption law मध्ये अशीच एक अमेंडमेंट गदारोळात केली गेली ज्यामूळे भ्रष्टाचाराविरोधी कारवई करणे अधिक अवघड होवून बसले.
संसदेत गदारोळ करणार्या, एकमेकांच्या अंगावर धावून जाणार्या, कसलीही चर्चा करण्यास अडथळा करणार्या या सभासदंविरुध्ध थेट निलंबन आणी हकालपट्टी (no atkt please!) चे कडक नियम अन कायदे राबवायला हवेत. संसदेची "बालवाडी" केलीये या लोकांनी. सभागृहाच्या अध्यक्षा/अध्यक्ष या सभासदांना विनंती करताना ईतके दीन वाटतात की त्या पेक्षा "ऑर्डर ऑर्डर" म्हणत बाकावर दंडूका ठोकणारा चित्रपटातील जज जास्त पॉवरफुल वाटतो 
तेव्हा ऊपोषणाला बसायला अजून बरेच विषय आहेत
जिप्सी, रुणुझुणू, दोन्ही
जिप्सी, रुणुझुणू, दोन्ही स्वाती, एच्चेच, सुनिधी, विकु, शशांक, रूनी, योग.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
दोन्ही स्वाती व रूनीला अनुमोदन. जुन्या काळात एकत्र कुटुंब व्यवस्थेत सर्व सुरळीत होते असे नाही, फक्त ते बाहेर येत नसे. कारण निवास, व्यवसाय, इस्टेट जमीन जुमला हे सर्व एकत्रित असल्यावर ज्यामुळे संघर्ष होऊ शकेल किंवा एकत्रितपणाला तडा जाऊ शकेल ते सारे विषय टाळण्यावर भर होता. मग शोषण होत असले तरी ते नजरेआड केले जायचे किंवा दाबले जायचे.
रूनी, इथे दिलेले उपाय आईवडील ''सजग'', ''दक्ष'' आहेत ह्या गृहितकावरच बेतलेले आहेत. पण जिथे आईवडील गाफील किंवा उदासीन आहेत तिथे त्यांचे प्रबोधन करण्यावाचून पर्याय नाही. या विषयावर मराठीतून आता पुस्तकेही निघाली आहेत. वर क्षिप्राने सांगितल्याप्रमाणे तुलीर संस्थेने मुलांसाठी ''माझी सुरक्षा'' नावाची पुस्तिका काढली आहे. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी बाल सुरक्षा पुस्तिका तर आहेच. प्रबोधन करणारे साहित्य, पुस्तके, माहितीपट, नाटके, पथनाट्ये अशा माध्यमांतून तसेच जालीय लिखाण, चर्चा, कार्यशाळा इ. मधून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणे खरेच गरजेचे बनले आहे.
योग, संसद सदस्यांविषयी काय बोलावे!! लाज वाटते त्यांना नेते म्हणायला त्यांनी सभागृहात केलेले तमाशे बघून...... हजारो कोटींचे स्कॅम्स झाल्यावर देशभरात जशी संतापाची लाट उसळली, ज्या प्रमाणे जनमत भ्रष्टाचाराच्या प्रचंड विरोधात गेले त्याचप्रमाणे ते अगतिक अल्पवयीन मुलांच्या शोषणाच्या विरोधातही जायला हवे आहे.
दुर्दैवाने इथे एका मुद्द्याचा
दुर्दैवाने इथे एका मुद्द्याचा उल्लेख झाला पाहिजे असे मला वाटते.
भारतीय समाजात वावरताना, आपल्या मुलांना (विषेश्तः मुलींना) आपण कशा प्रकारचे कपडे घालायला देतो, हा मुद्दा पण विचारात घेतला पाहिजे.
आपल्या नात्यातल्या/ परिचयातल्या पुरुषांना आपण चांगले ओळखत असलो तरी कोणाच्या मनात काय विचार चालू आहेत हे सांगणे कठीण. हिंदी चित्रपटातल्या नायि़कांप्रमाणे हॉल्टर नेकचे ब्लाऊज घातलेली, आपली सानुली, आपल्याला गोड आणि स्मार्ट वाटते. पण परिचयातल्या एखाद्या पुरुषाला तिच्याकडे बघून काहीतरी वेगळचं वाटू शकतं.
हा विचार काही लोकांना तालीबानी वाटू शकतो. पण समाज जोपर्यंत प्रगल्भ होत नाही तोवर आपल्या मुलीला जपणे हे आपले कर्तव्य आहे.
अय्यो,इथे पण पेहरावाचा मुद्दा
अय्यो,इथे पण पेहरावाचा मुद्दा काढला का? म्हणजे आता इथेही विनाकारण वादविवाद आणि चर्चा होणार.
अ.कु. लेख आवडला.
आपल्याकडे या गोष्टी होत नाहीत असं वाटणार्या लोकांचं मला आश्चर्य वाटतंय.
माझी एक नातेवाईक तिच्या आईच्या माहेरचे कुणी नातेवाईक आले की ती अगदी चवताळून जात असे. स्वतःचे शरिर सतत धुवत रहात असे. गावाकडच्या समजुतीप्रमाणे लग्न झाल्यावर सुधारेल असे वाटून सगळी सायकिअॅट्रिक हिस्टरी लपवून लग्न लावून दिले. नवर्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू शकत नव्हती. जबरदस्तीतून एक मुलगा झाला. नंतर काही दिवसांनी वैतागून नवर्याने सोडून दिले.
माझ्या लग्नानंतर तिच्याबद्दल समजले मला. सतत हात धुवणे,अस्वच्छतेला घाबरणे या प्रकारांमुळे ऑबस्ट्रक्टिव्ह कंपल्सिव डिसऑर्डर वाटली मला ती. (तिच्या सायकिअॅट्रिक वर्तणूकीचे पूर्ण डिटेल्स मला तेव्हा माहिती नव्हते.)मी तिला सायकिअॅट्रिस्ट कडे नेण्यास सुचवले. बर्याच काथ्याकुटानंतर हा सल्ला मानण्यात आला. तिच्या काऊंसेलिंगमध्ये कळले की ती अशा अॅब्यूज प्रकाराला बळी पडलीय.
१० -११ व्य वर्शी. तिच्या मोठ्या मामेभावानेच तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिने घरात कुणालाच सांगितले नव्हते. इतक्या पंधरा वर्षांनी एका सो कॉल्ड वेड्या मुलीवर भरवसा ठेवून त्या अत्याचारी मुलाला कुणी जाब विचारणे शक्यच नव्हते. आम्ही तिची ट्रिटमेंट चालू ठेवण्याविषयी तिच्या घरच्यांना खूप समजावले पण उपयोग झाला नाही.
आम्ही पी.जी. संपवून गावी येईपर्यंत तिने स्वतःला जाळून घेवून संपवले होते.
आजही २ वर्शांनी त्या माणसाला बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. आनंदाची बाब इतकीच की खूप बाता मारणारा हा माणूस नियतीनेच अगदी कफल्लक ठेवला आहे.
साती, मी तू उल्लेख केलेल्या
साती, मी तू उल्लेख केलेल्या कंपल्सिव्ह बिहेवियरल डिसॉर्डरविषयी वाचलंय फक्त. लहान वयात किंवा मोठेपणीही अॅब्यूजला बळी पडलेल्या व्यक्तींवर जे दीर्घकालीन मानसिक दुष्परिणाम होतात त्याचं दृश्य रूप आहे ते. बिचारी ती बाई! ना कोणाला सांगू शकली, ना तो आघात पचवू शकली.... त्याचा परिणाम फक्त तिच्याच आयुष्यावर झाला नाही, तर त्यामुळे तिच्या नवर्याचे आणि मुलाचे आयुष्यही त्यात ओढले गेले.
इथे खरं तर पेहराव हा वादाचा मुद्दा होऊच शकत नाही, कारण तालिबानी राष्ट्रांतही कोवळ्या वयाच्या नखशिखान्त झाकलेल्या मुलींवर अत्याचार व्हायचे राहत नाहीत.
सोहा, तुमची कळकळ समजतेय मला. फक्त मुलींची सुरक्षा त्यांना आपादमस्तक झाकून होणार नाहीए. जोवर या समाजात अत्याचारी गुन्हेगार फक्त संधीची वाट बघत मोकाट आहेत, तोवर मुलींचेच काय, छोट्या मुलांचेही भवितव्य असेच प्रश्नांकित राहणार. लहान वयाच्या मुलग्यांनाही ह्या अत्याचारांचे आघात सोसायला लागतात. त्यांच्यासाठी काय सुचवणार तुम्ही?
अरुंधती, खूप छान, माहिती
अरुंधती, खूप छान, माहिती /अभ्यासपूर्ण लेख.
मणिकर्णिकाची पोस्टही चांगली.
गोळे, तुमच्या >>> भारतातील मुले>>> ह्या वाक्यातला अर्थ कळला नाही.
माहितीपूर्ण लेख, धन्यवाद.
माहितीपूर्ण लेख, धन्यवाद.
धन्स अरुंधती.. खूप छान
धन्स अरुंधती.. खूप छान माहितीपूर्ण लेख
रुनी ला अनुमोदन.. आई वडीलांवर
रुनी ला अनुमोदन..
आई वडीलांवर सगळी भिस्त ठेवून उपयोग नाही. भारतीय कुटुम्ब व्यवस्थेत आई वडीलांवर नातेवाईक , वयोवृद्ध व्यक्तींचा खूप दबाव असतो. त्यातुन हे विषय म्हणजे अजुनही 'स्टीग्मा' याच प्रकारात मोडतात. त्यामुळे कळले तरी आपलीच नाचक्की होईल असा विचार करून बरेचसे आई वडील फार काही करू शकत नाहीत.
लहान मुलांचे डॉ, शाळा , बालवाड्या ई पासून अशा प्रबोधनास प्रारंभ झाला पाहिजे. अमेरिकेत अगदी लहान मुलांना त्यांच्या सुरक्षिततेविषयी शाळेत शिकवले जाते. तसेच अडचण आल्यास मदत कशी मागावी हेही सांगितले जाते.
पण आनंदाची गोष्ट हीच आहे की
पण आनंदाची गोष्ट हीच आहे की कमीतकमी अता लहान मुलांवर ( मुलग्यांवर सुद्धा) असे अत्याचार होउ शकतात हे बर्यापैकी लोकांना पटू लागले आहे. माझ्या आईवडीलांच्या पीढीच्या लोकामधे मात्र अशा प्रकारची जाणीव फारच कमी होती असे मला अनुभवास आले आहे
सायो, मंजु, उदय, डेलिया....
सायो, मंजु, उदय, डेलिया.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
डेलिया, लहान मुलगे व मुलींवरचे होणारे अत्याचार फक्त आता आताचे नाहीत. त्यांनाही बराच इतिहास आहे. मात्र आधीच्या पिढ्यांमध्ये त्यांविषयी बोलले जात नसे किंवा जागरुकताही नव्हती. प्रगत देशांमध्ये ज्या प्रकारे शाळा, बालवाड्या, लहान मुलांचे डॉक्टर्स इत्यादी माध्यमांतून ह्या विषयावर प्रबोधन केले जाते तसेच ते आपल्या देशातही व्हायला हवे. मात्र त्याचा अर्थ आईवडिलांनी आपली जबाबदारी झटकावी हा होत नाही. पुस्तके, माहितीपट, नाटके, चित्रपट अशा कितीतरी माध्यमांतून आता माहिती उपलब्ध आहे. पालकांनी सजग होऊन ती माहिती संपादन करणे व त्यानुसार आपल्या छोटुल्यांच्या सुरक्षेचे उपाय योजणे, आवश्यक खबरदारी घेणे जास्त योग्य वाटते.
आईवडिलांनी आपली जबाबदारी
आईवडिलांनी आपली जबाबदारी झटकावी असे म्हणत नाहीये मी. पण बरेच आईवडील ही जबाबदारी घेण्यास सक्षमच नसतात असे म्हणायचे होते मला. अजुनही आपल्याकडे बहुतेक घरातुन या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत नाहीत. आणि काही अगदी एक्स्ट्रीम केसेस मधे वडीलच शोषणकर्ते असतात. अशा आईवडीलांच्या पोटी आलेल्या मुलांचे संरक्षण कसे होणार? शाळेत प्रशिक्षित काउन्सेलर्स,शिक्षक उपलब्ध होउ शकतात. तसेच आई वडीलांच्या बाबतीत मुल लहान आहे अजुन , सांगू नंतर असे होउ शकते.
डीफ्रंट स्ट्रोक्स म्हणुन एक लहान मुलांची सीरियल लागायची. त्यात एक एपिसोड या विषयावर होता. त्यात अतिशय संयत , सुन्दर हाताळणी केली होती. आणि सहजपणे मुलांना कळेल अशा प्रकारे माण्डणी केली होती. मला वाटते जास्तीत जास्त मीडीया , अॅनिमेशन थोडक्यात करमणुकीच्या साधनाद्वारे याचा प्रचार समाजाच्या सर्व स्तरात जसे की शहरे , ग्रामीण भाग, सुशिक्षित , अशिक्षित ई सर्व वर्गात होऊ शकतो.
हो गं... कळले मला तुला काय
हो गं... कळले मला तुला काय म्हणायचे आहे ते!
अॅनिमेशन फिल्म्स, करमणुकीद्वारा संदेश तर जातोच. पण आपले मूल जेव्हा आपल्याला विश्वासाने काही सांगू पाहाते तेव्हा त्याचा तो विश्वास जपला गेला पाहिजे व त्याच्या समस्येचे समाधान करण्याइतपत किंवा त्याला मदत मिळवून देण्याइतपत तरी जागरूकता पालकांमध्ये यायला हवी. मी काय ''व्हायला हवे'' विषयी बोलत आहे. वस्तुस्थिती अर्थातच अनेकदा खूपच वेगळी असते. आणि अर्थातच हा सर्व एका सामाजिक प्रक्रियेचा भाग आहे. अशा जागरूकतेच्या गोष्टी चोवीस तासांमध्ये घडून येत नसतात. त्यांना वेळ द्यावा लागतो. प्रक्रिया सुरू तर झाली आहे.
अरुंधती मी पुन्हा सगळा लेख
अरुंधती मी पुन्हा सगळा लेख नीट वाचून पाहिला. एका पोस्टीत सगळ्याच प्रश्नांची उत्तर देणं शक्य नाही. पण मी आत्तापर्यंत केलेले निरिक्षण, मला आलेले अनुभव, मी केलेला प्रयत्न मी सांगू शकते. मी खूप वर्ष अनेक लहान मोठ्या खाजगी शाळेतून काम केलेलं आहे. मी इतक्या तर्हेने मुलांचं शोषण बघितले आहे की मला आपल्या असहायतेचा राग यायचा. काहीतरी करावं असंनेहमी वाटायचं पण नेमकंकाय ते कळलं नाही. शिवाय या गोष्टीला पूर्ण वेळ द्यावा लागेल तर तो मी देऊ शकत नव्हते. मी ह्या सगळ्यातून एक निष्कर्ष काढला की सगळ्यात जास्त बालकांचं शोषण पालक आणि शाळा करते. सगळ्यात अगोदर आंध्रप्रदेशातल्या शाळेतल्या वेळेबद्दल बोलते. आमच्याकडे के.जी.ते पाचवी शाळेची वेळ सकाळी साडे आठ ते चार. आणि सहावी ते दहावी सकाळी आठ ते रात्री आठ किंवा काही शाळातून सात. शाळा लांब असते. म्हणून व्हॅन. व्हॅन असेल ती शाळा छान असा पक्का (गैर्)समज. आठच्या शाळेसाठी व्हॅन सकाळी सहा साडे सहाला दारात हजर. त्या अगोदर मुलांनी तयार व्हायचे. यायला घरी नऊ. व्हॅन मध्ये ड्राइव्हर आणि क्लीनरची वेगळी छळवणूक. मुलांना चिमटे काढणं. ढकलणं, पाय आडवा घालणं, ते मूल पडल्यावर हसणं.वगैरे बरंच. घरी आल्यावर पुन्हा गृहपाठ. त्या मुलांनी खेळायचं केंव्हा?. बहुतेक शाळेच्या इमारती लहान.खेळायला जागा नाही. वर्ग लहान एका बाकावर पाच पाच मुलं पूर्ण दिवस भर मुलांनी अवघडून बसायचं. जेवायची एकच वीस मिनिटाची सुट्टी. भरभर जेवायचं. काही शाळातून कहर म्हणजे त्या सुट्टीत सुध्दा हाताची घडी घालून रांगेतून जायचं. त्यासाठी शिक्षक नेमलेले असतात. हात खाली केला तरी मुलांना फटके बसतात. शाळेला खेळायला जागा असली तरी खेळायचा तास नाही. लहान मुलं चार पाच वाजता घरी आले की जेवायच आणि शिकवणीला जायचं. शाळेत मुलांना मारणं हा शिक्षकांचा जन्मसिध्द हक्कच असतो. बरं आमच्यासरखे काही शिक्षक असतात जे विरोध करतात. पण त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. मॅनेजमेन्ट्ला सांगितलं तर ते दुर्लक्ष करतात. मुलांनां सांगितलं की तुम्ही तुमच्या आईवडीलांना सांगा तर ती मुलं सांगत नाहीत आणि जर कुणि सांगितलं आणि पालक विचारायला आले तर सरळ मी मारलच नाही अस सांगतात आणि मॅनेजमेन्ट पण शिक्षकांची बाजू घेऊन बोलतात. आपण चुगल्खोर ठरतो. मुलांनाही असं धमकवलेलं असतं की वर्गातली मुलंही सांगायला तयार होत नाहीत. लहान मुलांच्या गालावर चापट्या मारणं, छोट्या हातावर पट्ट्या मारणं. कपडे काढणं, उन्हात उभं करणं, डबा खायला न पाठवणं. हे सर्रास चालतं, एका शाळेत एक शिक्षिका सिनियर के.जी.च्या मुलाना असंच मारायची.आम्ही तिला खूप समजवायचं पण ती म्हणायची,"तुम्हाला माहीत नाही ही मुलं किती बदमाश आहेत ते" मुलं आणि बदमाश. आमच्या शाळेत एक रूल होता,पाचवी पर्यंत वर्गात गेलं की आधी सगळ्यांच्या बॅगा चेक करायच्या. कुणि ब्लेड्,कटर, किंवा अशा प्रकारच्या वस्तु असतील तर काढून टाकायच्या. एकदा के.जी.च्या एका मुलाच्या बॅगमध्ये ब्लेड मिळाली. क्लासटीचर मारणारी टीचरच होती. तिने त्याच्या थोबाडीत मारली अन विचारले "ही ब्लेड तू का आणलीस ?" तो मुलगा नुसता रडायला लागला पण काही सांगेना. तेंव्हा दुसरा मुलगा म्हणाला," टीचर त्याने ती ब्लेड ना तुमचे तुकडे करण्यासाठी आणली आहे. तो काल
मला म्हणाला." ती टीचर हतबुध्द झाली. एवढ्या लहान मुलाच्या मनात एवढा द्वेष. तिने आम्हाला येऊन सांगितले आणि म्हणाली "मी ह्यापुढे कधी मारणार नाही.". पण हे जर समजले नसते तर ही द्वेषाची वेल किती फोफावली असती?. त्याच्या आईला बोलावून सांगितले पण तिने हसण्या पलिकडे काहीही केले नाही.मोठ्या मुलाना तर बेदम मारतात. मुलींना मारत नाहीत पण त्यांच्या बाबतीत वेगळा धोका असतो. शिक्षक असेल तर मुलींचे दंड धरणे, खांद्यावर हात टाकून जवळ ओढून घेणे, तोंड कुरुवाळणे असे बरेच प्रकार घडतात.मुली हुशार असतील तर लांब रहातात ह्या प्रकारापासून. पण ते वयंच असं असतं की तो स्पर्श मुलींना आकर्षित करतो त्यामुळे
त्या काहीच बोलत नाहीत आणि कोणि शिक्षकानी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या शिक्षकांची टींगल करणं, अपमान करणं असं चालतं. एका तरूण शिक्षकाने तर मेडिकलची पुस्तकं आणून घाणेरडे प्रकार मुलांमुलींना एकत्र दाखवले होते. आम्ही समजल्यावर मॅनजमेन्ट्पर्यंत तक्रार नेली. पण मुलं तोंड उघडायला तयार नव्हती. चांगल्या पालकांनी तरूण मुलगा पाहूनच काढून टाकलं होतं आम्ही ते सगळं मॅनेजमेन्ट्च्या निदर्शनाला आणून
दिलं होत. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. नंतर त्याला काढलं पण त्याला फार उशीर झाला होता.
इथे मी पुरे करते कारण प्रतिसाद फार मोठा झाला आहे. मी दुसर्या प्रतिसादात पालकांबद्दल लिहिणार आहे आणि नंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मला विचारायची आहेत. हे सगळं मी फक्त निदर्शनाला आणून दिलं आहे.
एवढं लिहावं की नाही माहीत नाही. तसं वाटलं तर तुम्ही हा प्रतिसाद दिलिट करू शकता. धन्यवाद.
सुरेखा, सुन्न करणारा
सुरेखा, सुन्न करणारा प्रतिसाद!
शिक्षकांसाठी युनिसेफला बालसुरक्षा पुस्तिका का काढायला लागली असावी ह्याचे एक उत्तर तुमच्या प्रतिसादातून मिळाले.
तुमचे अनुभव जरूर लिहा इथे. शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक व संस्था सदस्य हे तर शोषणाबद्दल सर्वात जास्त जागरूक हवेत. मुलांचे हित, आरोग्य व मनःस्वास्थ्य अडचणीत येऊ नये यासाठी शाळांनी तत्पर असायला हवे. इथे मात्र उलटी गंगाच दिसते आहे.
शाळांमध्ये मुलांना मारत असतील/ शारीरिक शिक्षा करत असतील किंवा नियमांच्या नावाखाली त्यांना दबवत असतील तर ते अजिबात सहन करता कामा नये. आजही आंध्रमधील त्या शाळेत तसेच प्रकार चालू असतील तर चाइल्ड हेल्पलाईन व तुलीर संस्थेद्वारा त्या प्रकारांना आळा घालून पालक व शिक्षकांना जागरूक करता येईल.
सुरेखा ह्यांचा प्रतिसाद वाचुन
सुरेखा ह्यांचा प्रतिसाद वाचुन खुप अस्वस्थ व्हायला झालय. सुरेखा प्रतिसाद लांब होतोय म्हणुन कृपया लिहिणे थांबवु नका. जमतील तितके अनुभव लिहा. काय माहिती कोणता अनुभव केव्हा कामाला येतो. पालकांचे बद्दल पण अवश्य लिहा.
मी लिहिले त्यावर विचार
मी लिहिले त्यावर विचार केल्याबद्दल दोघींनाही धन्यवाद.
मी प्रत्येक शाळा अशीच आहे असं म्हणत नाही. जागा आणि वेळेचा विचार केला तर मिशनरी शाळा, कार्पोरेट शाळा,अनुदानित शाळा, सरकारी शाळा बर्या आहेत. पण त्या शाळा जास्त नाहीत. हल्ली गरीब असले तरी सरकारी शाळेत घालत नाहीत. तिथे वेगळी तर्हा असते,शिक्षकांना पगार भरपूर, काढून टाकण्याची भिती नाही. पालक येऊन विचारत नाहीत कारण ते अडाणि असतात. शाळेबद्दल अगदीच अनभिज्ञ असतात. शिक्षकांचं शिव्या देऊन बोलणं,अभ्यास केला तर केला नाहीतर नाही. घरांतही संस्कार नाहीत शाळेतही संस्कार नाहीत. काही मुलं खूप उद्ध्ट असतात.ती मार खातात गुंड ठरवली जातात. काही शिक्षक खूप चांगले असतात. पण बोटावर मोजण्या इतके. पण मी पाहिलं की अशा शिक्षकांच्या मागे पुढे ही गुंड म्हणवणारी मुलं असतात. ती त्यांना उलटं बोलत नाहीत त्यांचं सगळं ऐकतात.मी मुलांनी (मी अनुदानित शाळेत दोन वर्ष काम केले). काही चूक केली तर म्हणायची" मी तुमच्याशी बोलणार नाही आणि पुन्हा असं केलत तर प्रार्थनेच्या वेळी सगळ्यांच्या समोर शिक्षा देईन. शिक्षा कधीच केली नाही पण ती मुलं पुन्हा तसं करायची नाहीत. एकदा मी एका गुंड ठरवलेल्या मुलाला म्हट्ल," तुम्ही इतकी शहाणी मुलं आहात मग माझंजसं ऐकता तसं इतर शिक्षकांचं का ऐकत नाहीत. तर ती मुलं म्हणाली. " तुम्ही आमच्यावर प्रेम करता. आमची विचारपूस करता, चुकलं समजून सांगता. पण बाकीचे तसे करत नाहीत. ते आम्हाला शिव्या देतात. आम्ही गरीब आहोत म्हणून आम्ही शिव्या खायच्या का?आम्ही वाईट वागलो तर तुम्ही आमच्याशी बोलणार नाहीत ह्याची आम्हाला भीती वाटते." असं म्हणून तो मुलगा रडायला लागला. हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. ती मुलं प्रेमाला किती आसुसलेली होती.का ह्यांना चांगलं शिकवायचं नाही. सरकार त्याबद्दल मोबदला देते ना? पण सरकारी पगार घेणार्या शिक्षकाला वाटतं माझा पगार घट्ट आहे. मला काय करायचे आहे ह्या मुलांकरता मेहनत घेऊन आणि १५०० - २००० वर काम करणाराला वाटते
जास्त पगारवाले काम करत नाहीत मी का करू. ह्या दोघांमध्ये नुकसान कुणाचे? खस्ता खाणच नको आहे कोणाला.
ह्या सगळ्याला जास्त जबाब्दार कोण? तर माझ्या मते पालकच. माझे मिस्टर पण एका मोठ्या शाळेत काम करतात. आंध्र मध्ये त्यांच्या एकूण १२५ शाळा आहेत. तिथे ट्रेनिन्ग साठी आलेल्या एका प्रिंसिपालला त्यांनी विचारले,पुन्हा शाळेची वेळ वाढवणार आहेत असं कळलं तर त्यांचे वैयक्तीक मत काय आहे. तर त्यांनी सांगितले की मला स्वत:ला मुलांनी शाळेत एवढा वेळ बसणं आवडत नाही. चार वाजल्यानंतर मुलांची कपॅसिटीच नसते हे डायरेक्टर पासून सर्वांना माहित आहे. पण काय करणार त्या अमुक शाळेने वेळ वाढवली आहे मग आपण वेळ कमी ठेवली तर पालक मुलांना काढून टाकतील ही भिती. शिवाय पालकांचीच इच्छा आहे मुलांनी जास्त वेळ शाळेत रहावं अशी. आहे तुमच्याकडे याला उत्तर.?मुलांनी जास्त वेळ शाळेत बसायच. का? तर मुलं घरी येऊन अभ्यास करीत नाहीत.पण इतका वेळ शाळेत रहाणार्या मुलांचे काय. खस्ता खाणं हा प्रकारच माहीत नाही पालकांना. नोकरी करणार्या बायकांचं ठीक आहे. पण इथे प्रत्येक घरातली बाइ नोकरी करते असं नाही.पण केवळ पैसे आहेत म्हणून मोठ्या शाळेत घालायच. अभ्यास झेपत नाही म्हणून शिकवणीला पाठवायचं नाहीतर शाळाच करून घेते म्हट्ल की पैसे फेकून हे मस्त. मॅनेजमेन्ट्ला पैसे मिळतात पालकांना मुलांपासून मुक्ती मिळते भरडली जातात ती मुलं आणि शिक्षक. शिक्षकही वेळ प्रसंगी मुलांवर राग काढून मोकळी होतात. पण मुलांनी ह्याची दाद कुठे मागायची.शाळेत जात नाही म्हणून रडलं की मारायचं, शिकवणीला जात नाही म्हट्ल की मारायच. अशिक्षितच नाहीत तर सुशिक्षित पालकही असेच करतात. शाळेत का मारतात हे तर विचारत नाहीत पण उलट मारायची परवानगी देऊन येतात. मी खूप पालकांशी बोलले पण प्रत्येकांचा एकच सूर. शाळा करते ते बरोबरच करते सध्या स्पर्धा इतकी वाढली आहे की अभ्यास करणं भाग आहे. पण त्यांना कसं सांगावं की बाबानो ह्या मुलांना ही बसण्याची शिक्षा आहे. त्यामुलांचं अभ्यासात लक्षच नसतं. चार वाजता घरी जाऊन जेवण करून थोडावेळ खेळून आली की ती मुलं अभ्यासाला बसतात. फक्त आपल्याला थोडं त्यांच्या मागे लागावं लागत. दोन तीन वर्षापूर्वी सरकारने शाळेची वेळ सकाळी आठ ते अडीच.हायस्कूलसाठी तीन पर्यंत ठेवली. तेंव्हा शाळा सकाळी नऊ वाजता होत्या. सरकारी, अनुदानित शाळांनी ताबड्तोब तो कायदा अमलात आणला. पण ह्या इतर शाळांनी सकाळची नऊची वेळ काढून आठची केली पण संध्याकाळची वेळ बदलली नाही. सरकारने चार नंतर शाळेच्या वॅन का दिसतात असं विचारलं नाही आणि विचारलं तर त्यांना तोंड बंद कसं करायचं ते माहीत असतं. आणि उत्तरही असतात. शाळा तीनपर्यंतच आहे. नंतर आम्ही शिकवण्या घेतो.डलर्सक्लास्,स्मार्ट क्लास अशी गोंडस नावं देऊन रात्री पर्यंत बसऊन घेतात.पाचविपर्यंत मुलांना कोणि साडे तीनला, चारला सोडतात. पण जेवण झालं की पालक मुलांना शिकवणीला जाण्याची सक्ती करतात.दोन वर्षाच्या मुलांना प्लेस्कूलला घालून मूल घरी आलं की हनी, लकी, डॉली नावांच्या ह्या मुलामुलींना सिट, कम, गो करत धेडगुजरी इंग्रजी बोलून शाळेतली (पोयम) म्हणून दाखव म्हणणार्या नाही म्हट्ली तर सट्कन गालात मारणार्या गावाकडून आलेल्या दहावी बारावी पास असलेल्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या, माझ्या मुलाची शाळा इतकी चांगली आहे की मुलगा सकाळी सातला जातो तो आठलाच येतो. सगळं शाळाच करून घेते म्हणून अभिमान बाळगणार्या ह्या बायका आणि आभ्यास करत नाहीत म्हणून बेदम चोपणारे पालक पाहिले की माझ्या डोक्यात तिडिक उठते.
र्र
अरुंधती, इतक्या माहितीपुर्ण
अरुंधती, इतक्या माहितीपुर्ण लेखासाठी धन्यवाद.
सुरेखा तुमच्या पोस्ट वाचुन भयानक वाटतय.
सगळं शाळाच करून घेते म्हणून
सगळं शाळाच करून घेते म्हणून अभिमान बाळगणार्या ह्या बायका आणि आभ्यास करत नाहीत म्हणून बेदम चोपणारे पालक पाहिले की माझ्या डोक्यात तिडिक उठते.>>
तुमच्या दोन्ही पोस्ट्स वाचून वाइट वाटल.
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स...... काय बोलावं अशा पालकांना आणि शिक्षकांना....
सुरेखा, त्यांच्याशी एकट्या-दुकट्याने बोलून नाही चालणार.... त्यांना गटा-गटाने बोलवून एकत्रितपणे त्यांच्यापुढे मुलांच्या कलाने घेऊनही त्यांना व्यवस्थित शिक्षण कसे देता येते ह्याचे चित्रच उभे करावे लागेल. अशा वेळी मनोरंजनात्मक माध्यम, माहितीपट इत्यादींचा वापर करता येतो. पालकांचे क्विझ घेणे, स्पर्धा घेणे, खेळ इत्यादींतून त्यांच्याशी संवाद साधला जाऊ शकतो. आणि मुलांना ताण न येऊ देता शिकवणार्या शाळाही आहेत. परंतु तुम्ही वर्णन केलेली परिस्थितीही आहे, हे मान्यच करावे लागेल. पालक, शिक्षक व संस्था सदस्य ह्या सर्वांनाच या प्रकारात जाब विचारावा लागेल. कारण ते एक दुष्टचक्र आहे. त्यातून सुटण्याचा व मुलांना सोडविण्याचा निश्चय केल्याखेरीज हा प्रकार संपणारा नाही. तसेच ते एकेकट्याने करायचे कामही नाही. त्यासाठी संघटनात्मक पातळीवरचे प्रयत्नच योग्य ठरतील. पालक - शिक्षक संघ ह्यात मोठे योगदान देऊ शकतो.
मुलांना दिवसभर सतत शाळा-क्लास-शिकवण्यांमध्ये ताबडवणार्या पालकांविषयी काय बोलू? असे पालक मीच स्वतः पाहिलेत आजूबाजूला. पालकांचीच त्यांच्या मुलांसारखी काही दिवस शाळा घ्यायला पाहिजे.... सकाळी आठ ते सायं सहा पर्यंत, मग उरलेल्या वेळात शिकवणी. आठ दिवस त्यांनी असे केले की त्यांनाच कळेल आपलं कुठं चुकतं आहे ते!
Pages