रविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल.
-------------------------------
‘The Firm’ ही जॉन ग्रिशॅमची पहिली अशी कादंबरी की ज्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळाली. वकिली पेश्याच्या पार्श्वभूमीवरील वेगवान कथानक, थरारक घटनांची तितक्याच कुशलतेने केलेली मांडणी ही ग्रिशॅमच्या लेखनातील वैशिष्ट्ये या कादंबरीतदेखील आढळतात. या कादंबरीची अनिल काळे यांनी अनुवादित केलेली आवृत्ती ‘द फर्म’ याच शीर्षकाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे.
ही कादंबरी मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. मु्खपृष्ठावर वरच्या भागात एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचे वाटावे असे चित्र आणि त्याखाली अंधाऱ्या रात्री कशापासून किंवा कुणापासूनतरी लांब पळू पाहणारा एक उंची पेहरावातील तरुण... हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षण घेऊन नुकताच बाहेर पडलेला हा तरुण वकील आहे मिचेल मॅकडिअर ऊर्फ मिच. अतिशय हुशार असलेल्या मिचने प्रतिकूल कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेले असते. साहजिकच तो आणि त्याची सुस्वरूप पत्नी अॅबी यांच्यासमोर उज्ज्वल आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न भविष्याची स्वप्ने असतात.
‘बेन्डिनी, लँबर्ट अॅंड लॉक’ ही लॉ फर्म या तल्लख बुध्दीच्या होतकरू तरूणाला हेरते. त्याच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त पगार आणि इतर सुविधा त्याला देऊ करते. तो हुरळून जातो. न्यूयॉर्क, शिकागोसारख्या मोठ्या शहरांतील नोकरीच्या इतर तीन ऑफर्स धुडकावून मेंफिससारख्या तुलनेने लहान शहरातील ही नोकरी तात्काळ स्वीकारतो. झपाटून कामाला लागतो. आता त्याला बक्कळ पैसा कमवायचा असतो; फक्त बक्कळ पैसा. त्यासाठी तितकेच प्रामाणिक कष्टही करायची त्याची तयारी असते.
मात्र त्याला जेवढे वाटते तितके हे सगळे सरळसोपे नसते. बेन्डिनी, लँबर्ट अॅंड लॉक या फर्मची एक छुपी बाजूही असते आणि तिचे धागेदोरे जातात ते थेट एका कुख्यात माफिया फॅमिलीपर्यंत. आपली उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची त्या फॅमिलीची तयारी असते.
मिच नोकरीला लागल्याच्या काही महिन्यांनंतर फर्मच्या कामासाठीच गेलेल्या दोन अॅसोशिएट्स्चा मृत्यू होतो. वरवर पाहता तो एक अपघात असतो. फर्मतर्फे मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरे मदत करण्याची आश्वासने दिली जातात. मात्र फर्ममधल्या अजून तीन वकीलांच्या त्यापूर्वीच घडलेल्या मृत्यूंबद्दल त्याचवेळेस मिचला समजते आणि काहीतरी काळेबेरे असल्याचा त्याला प्रथमच संशय यायला लागतो. त्यात भर पडते ती वेन टेरेन्स नामक एक एफ.बी.आय. एजंट त्याला सतत भेटण्याचा, त्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा.
वकिली पेश्यावर मनापासून प्रेम करणारा मिच एकएक गोष्टी समजताच आधी हादरून जातो. पण पूर्ण विचारांती या सर्व गैरव्यवहारांच्या मुळाशी जाण्याचं ठरवतो. एकीकडे ती माफिया फॅमिली तर दुसरीकडे एफ.बी.आय. अशा विचित्र कात्रीत तो सापडतो. पण त्याची पत्नी, भाऊ, भावाचा मित्र आणि त्या मित्राची सेक्रेटरी यांची साथ त्याला लाभते आणि सुरू होतो एक थरारक, जीवघेणा खेळ. एक असा खेळ की ज्यात मिचचे करिअर, वैवाहिक आयुष्य सगळे पणाला लागते...
‘द फर्म’च्या कथानकात अनेक पात्रे आहेत. असे असूनही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. सर्वच व्यक्तिचित्रणे उत्तम झाली आहेत. मिचला भुलवण्यासाठी चोखंदळपणाचे, कार्यक्षमतेचे आणि संपन्नतेचे दिखाऊ चित्र ज्याप्रकारे ती फर्म त्याच्यासमोर उभे करते तो कादंबरीचा सुरूवातीचा भाग उत्कंठावर्धक झाला आहे. ते सर्व वर्णन वाचत असताना वाचकांना त्यामागच्या फर्मच्या काळ्या हेतूंबद्दल शंकाही येत नाही.
एफ.बी.आय.चा ससेमिरा चुकवत असतानाच मिच फर्मच्या गैरव्यवहारांचे कागदोपत्री पुरा्वे गोळा करण्यासाठी एक चलाख पण अतिशय धाडसी योजना आखतो. त्याची पत्नी आणि भावाच्या मित्राची सेक्रेटरी दोघी जीवावर उदार होऊन ती अमलात आणतात. ते सर्व रोमांचकारी घटनाक्रम नेमकेपणाने येतात. वाचकांना अगदी खिळवून ठेवतात.
‘The Firm’सारख्या बांधीव कथानकाचा अनुवाद करताना दोन्ही भाषांची शैली आणि बाज सांभाळणे अतिशय महत्त्वाचे असते. नाहीतर मूळ कलाकृती कितीही उत्कृष्ट असली तरी अनुवाद नीरस, कंटाळवाणा होऊ शकतो. काही मोजके अपवाद वगळल्यास हा तोल या पुस्तकात योग्य रीतीने सांभाळला गेला आहे.
एकूणात हे पुस्तक ग्रिशॅमच्या अगणित चाहत्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देते आणि ज्यांनी ग्रिशॅम आधी वाचलेला नाही अश्यांना त्याच्या चाहतेवर्गात तात्काळ सामिल करून घेते.
**************
द फर्म, जॉन ग्रिशॅम.
अनुवाद - अनिल काळे.
मेहता पब्लिशिंग हाऊस. पृष्ठे ४८०. मूल्य ४४० रुपये.
पुस्तक नाही वाचलं पण फिल्म
पुस्तक नाही वाचलं पण फिल्म पाह्यली आहे.
एकदम खिळवून ठेवणारी आहे. आता पुस्तक पण मिळवून वाचेन.
पुस्तक न वाचता फिल्म पाहिली
पुस्तक न वाचता फिल्म पाहिली तर ती आवडतेच. पण पुस्तकाच्या तुलनेत फिल्ममध्ये काही बदल केले गेले आहेत. आधी पुस्तक वाचून मग फिल्म पाहिली तर 'माध्यमात बदल झाल्याने पडणारा फरक' या विषयावर विचार आणि निरिक्षणे करण्यात वेळ व्यतित करता येतो.
पुस्तकात अॅबीचं वर्णन खूप सुंदर केलंय. फिल्ममधली अॅबी त्यामानाने मठ्ठ वाटते
येस्स.... जबरी पुस्तक. एकदा
येस्स.... जबरी पुस्तक. एकदा पुस्तक वाचल्यावर सिनेमा सपक वाटतो. शेवटी शेवटी सगळी डॉक्युमेंटस फोटोकॉपी करण्याच्या प्रसंगात तर इतकं टेन्शन आलं होतं मला. या पुस्तकाचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला होता की लग्न झाल्यावर नवर्याची फर्मपण असले काही उद्योग करत नसेल ना? अशी शंका यायची.
या पुस्तकाचा माझ्यावर एवढा
या पुस्तकाचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला होता की लग्न झाल्यावर नवर्याची फर्मपण असले काही उद्योग करत नसेल ना? अशी शंका यायची. >>>
पुस्तक न वाचता फिल्म पाहिली
पुस्तक न वाचता फिल्म पाहिली तर ती आवडतेच.<<<
हे बर्याच फिल्मांच्या बाबतीत का होतं?
>>>आधी पुस्तक वाचून मग फिल्म पाहिली तर 'माध्यमात बदल झाल्याने पडणारा फरक' या विषयावर विचार आणि निरिक्षणे करण्यात वेळ व्यतित करता येतो.<<
बघ मी वरती सुरूवात पण केली वेळ व्यतितिंग ला!
फर्मचा अनुवाद? थँक्स
फर्मचा अनुवाद? थँक्स ललिता.
खरंय ती फिल्म मधली बया माठ आहे. तसेही टॉमक्रुझ वरून लक्ष विचलीत होऊ नये म्हणून की काय.
टॉमक्रुझ वरून लक्ष विचलीत होऊ
टॉमक्रुझ वरून लक्ष विचलीत होऊ नये म्हणून की काय. >>> असेल, असेल
आधी पुस्तक वाचून मग फिल्म
आधी पुस्तक वाचून मग फिल्म पाहिली तर 'माध्यमात बदल झाल्याने पडणारा फरक' या विषयावर विचार आणि निरिक्षणे करण्यात वेळ व्यतित करता येतो.<<
ह्म्म्म वाचायचंय
ह्म्म्म वाचायचंय
ग्रिशम ची इतरही पुस्तके "द
ग्रिशम ची इतरही पुस्तके "द रेनमेकर", "टाईम टु किल" इ. चांगली आहेत. (त्यांचे चित्रपटही उपलब्ध आहेत)
हा सिनेमा पाहिलाय पण पुस्तक
हा सिनेमा पाहिलाय पण पुस्तक नाही वाचलेले
छान लिहलंय. मी चित्रपट पण
छान लिहलंय.
मी चित्रपट पण नाही पाहिलाय अन् पुस्तक देखील नाही वाचले.
दोन्ही पैकी एकच काही करावं म्हणतोय!
ट्यागो, पुस्तक वाच मिचच्या
ट्यागो, पुस्तक वाच मिचच्या ऐवजी तरूण देखणा टॉम क्रूझ दिसायला लागेलच वाचता वाचता. बाकी पात्र आपल्या मनाने घाल
जॉन ग्रिशॅमची शैली संथ आहे. सुरूवात कंटाळवाणी वाटू शकते. पण नंतर जाम पकड घेते.
अलिकडचे 'थिओडोअर बून' मात्र अगदीच निराशा करणारे. पहिली, तो भरात असतानाची पुस्तकं एकदम भारी. त्याचे 'पार्टनर' माझे सर्वात आवडते.
ललि, मस्त लिहिले आहेस.
आणि सहसा त्याच्या पुस्तकात
आणि सहसा त्याच्या पुस्तकात एखाद्या खाद्यपदार्थाचे रसभरीत वर्णनही असते. द क्लायंट वाचून झाल्यावर लगोलग दुसर्या दिवशी हाटेलात जाऊन मी लसान्या खाल्लं होतं. तसंच द अपीलमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीच्या शेवटच्या जेवणातले असंख्य पदार्थ वर्णन केलेत.
ट्यागो, पुस्तक वाच>>> नक्कीच
ट्यागो, पुस्तक वाच>>>
नक्कीच तेच खरं परवडेबल असतं.
बर्याचदा नाही का आपण ऐकतो वा म्हणतोही. चित्रपटापेक्षा पुस्तकंच उजवं होतं म्हणून.
मिचच्या ऐवजी तरूण देखणा टॉम क्रूझ दिसायला लागेलच वाचता वाचता. बाकी पात्र आपल्या मनाने घाल>>>
हेच मी कुठेतरी लिहलं होतं बहूदा..
येस मामी तो जनरलीच
येस मामी तो जनरलीच वर्णनात्मक लिहितो..
हेच मी कुठेतरी लिहलं होतं बहूदा..
>>> हो? मग ग्रेट माईंड्ज.. वगैरे माझं नेहेमीच असं होतं. पात्रांच्या जागी माझ्या कल्पनेतले चेहरे घालून मी पुस्तक वाचते. त्यावर चित्रपट/ सिरियल आली असेल, तर अर्थात ते नट दिसतात वाचता वाचता..
पुस्तक नेहेमीच उजवं कारण त्याला वेळेचे बंधन नाही. विस्ताराने सावकाशीने लिहू/ सांगू शकतो. शिवाय, आपण आपली कल्पनाशक्तीही त्यात वाचता वाचता घालतोच, त्यामुळे ते जास्त रम्य वाटते. -असे माझे एकटीचे वैयक्तिक मत.
जॉन ग्रिशॅमची शैली संथ आहे.
जॉन ग्रिशॅमची शैली संथ आहे. सुरूवात कंटाळवाणी वाटू शकते. पण नंतर जाम पकड घेते.>>>> अनुमोदन.
'द फर्म' माझेही आवडते पुस्तक आहे
असे माझे एकटीचे वैयक्तिक
असे माझे एकटीचे वैयक्तिक मत.>>> माझेही!
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
पात्रांच्या जागी माझ्या कल्पनेतले चेहरे घालून मी पुस्तक वाचते. त्यावर चित्रपट/ सिरियल आली असेल, तर अर्थात ते नट दिसतात वाचता वाचता. >>> मला ग्रिशमचं 'द पेलिकन ब्रीफ' प्रचंड आवडलं होतं. तेव्हा आधी सिनेमा पाहिला होता. नंतर पुस्तक वाचलं होतं. सुरूवातीला काही काळ नजरेसमोर ज्युलिया रॉबर्टस आणि डेंझेल वॉशिंग्टन आणायचा प्रयत्न केला. पण पुस्तकातली व्यक्तिचित्रणं त्याहून सरस आहेत. (डें.वॉ. माझा आवडता नट आहे तरीही...)
येस्स लले .... १०००० मोदकांच
येस्स लले .... १०००० मोदकांच ताट ग बाई तुला. मी मात्र ;पेलिकन ब्रीफ' चं पुस्तक आधी वाचलं होतं... मग सिनेमा ओके ओके.
पुस्तकाइतकाच सिनेमा आवडला तो केवळ हॅरी पॉटरचा. काय सह्ही लोकं निवडलीयेत. अगदी आपल्या (आणि गंमत म्हणजे प्रत्येकाच्या) मनातली पडद्यावर आलीयेत. लेखिकेचं व्यक्तीचित्रणं ही जबरदस्त आणि पात्रांची निवडही वाखाणण्याजोगी.
लले, आण एखादं जॉन ग्रिशॅमच
लले, आण एखादं जॉन ग्रिशॅमच पुस्तक आज येताना..
जॉन ग्रिशमची पुस्तकं आवडतात.
जॉन ग्रिशमची पुस्तकं आवडतात. हे पण आवडलं होतं. मराठी अनुवाद वाचायला आवडेल.
मी अजुन एकही सिनेमा नाही बघितला त्याच्या पुस्तकांवरचा. बघावा का?
मागे एकदा कधीतरी ग्रिशमची बरीच पुस्तकं इबुक फॉर्ममध्ये मिळाली होती, त्यावेळी दोन रात्री जागून लॅपटॉपवर सगळी वाचून काढली होती. तेंव्हापासून प्रत्येक ट्रेनच्या प्रवासात त्याचं एखादं पुस्तक घेतलं जातंच.
नाटकांवरच्या सिनेमांबद्दल काय
नाटकांवरच्या सिनेमांबद्दल काय मत?
जॉन ग्रिशॅमची शैली संथ आहे.
जॉन ग्रिशॅमची शैली संथ आहे. सुरूवात कंटाळवाणी वाटू शकते. >>>>> अनुमोदन.. ! हे माझंही झालं होतं आणि मग ग्रिशम सोडूनच दिला !! हे वाचेन आता आणून..
छान लिहिलयस ललिता..
हे पुस्तक (मुळ इंग्रजी)
हे पुस्तक (मुळ इंग्रजी) अत्यंत सुंदर आहे, मी अक्षरशः एकदा हातात घेतल्यावर सोडले नव्हते.
वाचलंय पुस्तक, पिक्चरही
वाचलंय पुस्तक, पिक्चरही पाहिलाय. ़कादंबरी मस्तच आहे.पिक्चर तेवढा प्रभावी नाही.
The Firm The Rainmaker The
The Firm
The Rainmaker
The Pelican Brief
ही तीन पुस्तके आधी वाचली मग सिनेमे पाहिले होते. पुस्तकं अगदी खिळवून ठेवतात पण Rainmaker चित्रपटाने खुप खिळवून ठेवले.
लले, चांगला परिचय दिलायस.
लले, चांगला परिचय दिलायस. परिचय वाचतानाही पुस्तक आत्ताच्या आत्ता मिळायला हवं होतं असं वाटलं
चांगला परिचय. पुस्तक आणि
चांगला परिचय. पुस्तक आणि चित्रपट दोन्ही रोचक आहेत.
ग्रिशॅम पूर्वी चांगले लिहायचा. फर्म, पेलिकन ब्रीफ, रेनमेकर.. नंतर नंतर कंटाळवाणा व्हायला लागला. त्याने कोर्टात बरीच वर्षे काढली त्यामुळे त्याला वातावरण निर्मिती सुरेख जमते.
सिनेमा पाहिला आहे...पण या
सिनेमा पाहिला आहे...पण या सुंदर परिचयानंतर पुस्तक वाचनाची उत्कंठा लागलीये.:)
Pages