सकाळी बोचरी थंडी असते. दिवसा गरम होतं म्हणून चैत्रच आहे म्हणायचं..!
पण कोकिळेचं गाणं कानावर पडतंय आणि तुझं गुणगुणणं आठवतं. मी तुला म्हणायचो "ऐक ऐक ..ती म्हणतेय ..कुळीव कुळीव" आणि तू म्हणायचीस "कुहू कुहू..!"
तुझ्या आवाजातलं ते कुहू कुहू ऐकताना कानात ह्रूदय गोळा व्हायचं आणि कुठेतरी मनाच्या पडवीतल्या वीणेच्या तारा झंकारायच्या. तू न्हात असतांना गायचीस .. गाणं होतं कि नुसतंच गुणगुणणं ते..पण ते ऐकताना आसमंतातला प्रत्येक कण न कण सुरांच्या तालावर तरंगू लागायचा. आणि तू केस पुसत तुझ्या गो-या अंगावर टॉवेल गुंडाळून बाहेर यायचीस तेव्हां........!
मी संगमरवरी पुतळा होऊन अनिमिष नेत्रांनी पहात रहायचो तुला. मला असं पुतळा झालेलं पहायला तुला खूप आवडायचं.. नाही का ? मग तू खिदळायचीस. त्या हास्याची किणकिण मंदिरातल्या घंटांची आठवण करून देते न देते तोच माझ्याजवळ येऊन झटकलेल्या तुझ्या ओल्या केसांतल्या पाण्याने अंगावर शहारा येऊन मी पुतळावस्थेतून बाहेर यायचो...... आणि मग तुला मिठीत घ्यायचा मोह अनावर व्हायचा ...
तू अंगाला झटके देत माझ्यापासून दूर जायचीस..
आणि मी धडपडलो कि पुन्हा खिदळाचीस............
तुझ्या गुलाबी ओठांवर ओठ ठेवून तुला गप्प करीपर्यंत !!
ऐकतेस का ? तुझ्या आवडीचा ऋतू परततोय. चैत्रपालवी दिसू लागलीय. सकाळी सकाळी किलबिलाटाने जाग येते. एरव्ही मी फिरायला जातो तेव्हां अंधारलेलं असतं. रस्त्याने कैरीची झाडं दिसतात आणि तुझ्यासाठी पाडलेल्या कै-या आणि मागे लागलेला माळी आठवतो. चिंच या वेळेस बरीक वाकलीय.
ज्या वर्षी चिंचा येतात त्या वर्षी आंबे कमी येतात.. तू म्हणाली होतीस. आणि मी काहीतरी बोललो असलो पाहीजे कारण तू लज्जेनं लाल झालेली आणि नंतर मला मारत सुटलेलीस..
डोंगराकडे जातांना तुझ्या लज्जेचा लालिमा पूर्वेला पसरलेला असतो. मी पश्चिमेकडे चालणारा वाटसरू त्या कोवळिकीने थबकतो. मागे वळून पाहतांना उजव्या हाताची हिरवाई त्या सोनेरी स्पर्शात झळाळून उठलेली दिसते आणि पाटाच्या पाण्यातून उडणारे सोनसळी तुषार वेचून घ्यायला मन धावतं.. तू वेडी व्हायचीस ना हे असं काही पाहतांना ? आणि तुला तसं पाहतांना मी ही ?
आपल्या फिरायच्या रस्त्यावरचं वळणावरचं ते लिंबाचं झाड चांगलंच डंवरलंय आणि चाफाही बहरलाय. तुला आठवतंय का गं ?.. त्या चैत्राच्या आधीच्या महिन्यात अवेळी पाऊस आलेला आणि तेव्हां चाफ्याचा वर्षाव झालेला बघ पावसाआधी... रस्त्यावर पावसाआधी पांढरा शुभ्र सडा पडला होता. आपण त्यात पूर्ण भिजायच्या आधीच तो गायबही झालेला. याआधीही गेल्या महिन्यात एकदा असाच अवेळी पाऊस पडला होता...
आता पक्षांचे थवे त्या खुणेच्या तळ्यावर येतील. पांढ-याशुभ्र बगळ्यांची माळ आकाशात दिसू लागेल. गुलमोहराचं झाड बहरून येईल.. मी त्याला आजही गुलमोहरच म्हणतो.. तू नाही म्हणायचीस. कुठल्या तरी ब्रिटीश मुलीचं नाव घ्यायचीस. त्या नावाचं झाड म्हणे.. काय गं ते ? गुलमोहरासारखंच झाड ?? छे !मला कुठलं लक्षात रहायला ते ?? मला अशा तजेलदार फुलांच्या झाडाला आणि तुलाही गुलमोहरच म्हणायला आवडतं. .. अरे हो , तुत्तूच्या झाडाला मोहर आलाय. तुत्तूची आंबटगोड फळं आता लवकरच येतील.
उघड्या बोडक्या डोंगराला पालवी फुटतेय. पुढह्च्या काही ऋतूत हा हिरवागार होऊन जाईल . तुझा आवडता आंबा मात्र डेरेदार झालाय आताच. भर उन्हात इथल्या आंब्याखाली काय छान झोप लागते. त्याही वेळी असचं व्हायचं आताही तसचं तर सगळं आहे. तोच ऋतू आहे, तेच बदल आहेत. तेच संकेत आहेत.. पण त्यावेळी आंब्याचा मोहर धुंद करून टाकत होता तसा आता करत नाही. काल आभाळ भरून आलं होतं तेव्हां मोहर झडला आणि काळजाचा ठोका चुकला. ज्या वर्षी चिंचा येतात त्या वर्षी... तू म्हणालीच होतीस.
तुझा आवडीचा चैत्र पुन्हा तेच रूपडं घेऊन येतोय, पुन्हा एकदा !! पण काल ना...चैत्रात आभाळ भरून आलेलं...!!!
कालचा चैत्रातला पाऊस अनुभवतांना तो अतृप्त करून गेलेला पाऊस आठवला आणि तुझी भिजायची तीव्र इच्छा आठवली. कालच्या वादळी पावसात अंग अंग चिंब होतांना मन मात्र छिन्नविछिन्न झालं.. पुन्हा तो जागर झाला तेव्हां सहन नाही झाला गं कालच्या एकाच पावसात....आभाळागतच मनही दाटून आलेलं आणि गळा ओहोटीच्या लाटेगत आंत आंत खेचला जात होता..
आणि आता तर पुन्हा तोच ऋतू .., तेच बदल ...तेच संकेत .... तेच ते सगळं तुझं आवडतं..कसा सामोरा जाऊ मी या सगळ्याला ?
तुझ्याशिवाय .........!!!!
- Kiran
खूप सुंदर लिखाण!! अतिशय
खूप सुंदर लिखाण!!
अतिशय हळवं.. तरल...!
चैत्राचं वर्णनही छान...!
लिहीत रहा,
शुभेच्छा!
सुरेख लिखाण्.मनाला भावलं. एक
सुरेख लिखाण्.मनाला भावलं. एक पोर्ट्रेट पहात असल्याचा भास झाला. पण शेवट धक्का देणारा म्हणण्यापेक्षा काळजात कळ उमवटणारा गेला.
अती सुंदर .
अती सुंदर .
सुंदर लिहीलं आहे..... आणि आता
सुंदर लिहीलं आहे.....
आणि आता तर पुन्हा तोच ऋतू .., तेच बदल ...तेच संकेत .... तेच ते सगळं तुझं आवडतं..कसा सामोरा जाऊ मी या सगळ्याला ?
तुझ्याशिवाय .........!!!!..............ही वाक्ये छातीत कळ आणून गेली.
अगदी हळूवार!! स्वानुभवाशिवाय
अगदी हळूवार!!
स्वानुभवाशिवाय हे लिहीणे शक्य नाही!! अतिशय आवडले
दोस्तांनो, खूप खूप आभार !
दोस्तांनो,
खूप खूप आभार ! जसजसं मनात उमटू लागलं तसतसं लिहीत गेलो. त्या नादात भरपूर स्पेलिंग मिस्टेक्स झालेल्या. क्षमस्व !
सुधारून घेतल्यात आता. सहकार्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल पुन्हा एकदा आभार !!
भिब्ररा, जबरदस्त लिहिलंय..
भिब्ररा,
जबरदस्त लिहिलंय.. अगदी खोल आतून आलंय.. भयानक आवडलं..
भिब्ररा, काही ठिकाणी
भिब्ररा,
काही ठिकाणी उद्गारवाचक चिन्हांचा वापर अनावश्यक वाटला. अगदी शेवटच्या ओळीत ही. कदाचित मी चुकत असेन, जाणकारांनी प्रकाश टाकावा.
प्रचंड आवडलं. असंच काहीसं होत
प्रचंड आवडलं. असंच काहीसं होत असतं किंवा असावं हे कळायला सुद्धा भाग्य लागतं.
आज इथं खडकवासल्याला आभाळ भरून
आज इथं खडकवासल्याला आभाळ भरून आलंय. चार वाजल्यापासूनच धरणावर थंड वारं होतं... पाऊस मात्र आला नाही...!! यावा असं वाटत होतं.
निवडुंगा, गोजिरी.. थँक्स !!
ते उद्गारवाचक चिन्हं ना? आता ती सवय नाही जाणार.....
सुरेख लिखाण!!! खुप आवडलं
सुरेख लिखाण!!!
खुप आवडलं
मस्तच ...अगदी मनापासुन
मस्तच ...अगदी मनापासुन लिहीलयस....आवडलं
खूप खूप सुंदर !!
खूप खूप सुंदर !!
..कसा सामोरा जाऊ मी या
..कसा सामोरा जाऊ मी या सगळ्याला ?
तुझ्याशिवाय .........!!!!
..... सुंदर. सुंदर चित्रण, सुंदर शेवट....
अशक्य.. सुंदर..
अशक्य.. सुंदर..
अ प्र ति म !!
अ प्र ति म !!
व्वा..एकदम तरल विचार! भिडलं
व्वा..एकदम तरल विचार! भिडलं मनाला!
मस्त ... आवडेश !!! सुंदर
मस्त ... आवडेश !!! सुंदर
अप्रतिम... शेवटच्या दोन ओळीत
अप्रतिम...
शेवटच्या दोन ओळीत टचकन पाणी आणलंस डोळ्यात, जियो !
सुंदर!
सुंदर!
@ Zandu KBH...
@ Zandu
KBH...
>>>कालचा चैत्रातला पाऊस
>>>कालचा चैत्रातला पाऊस अनुभवतांना तो अतृप्त करून गेलेला पाऊस आठवला आणि तुझी भिजायची तीव्र इच्छा आठवली. कालच्या वादळी पावसात अंग अंग चिंब होतांना मन मात्र छिन्नविछिन्न झालं.. पुन्हा तो जागर झाला तेव्हां सहन नाही झाला गं कालच्या एकाच पावसात....आभाळागतच मनही दाटून आलेलं आणि गळा ओहोटीच्या लाटेगत आंत आंत खेचला जात होता..
आणि आता तर पुन्हा तोच ऋतू .., तेच बदल ...तेच संकेत .... तेच ते सगळं तुझं आवडतं..कसा सामोरा जाऊ मी या सगळ्याला ?
तुझ्याशिवाय .........!!!!>>>
काय हृदयस्पर्शी लिहिलय??
हुरहूर लावलीये !!!
कुठंतरी सलतय!!
छान असूनही तसं म्हणवत नाहीये.
यातचं या लिखाणाच नव्हे विराणीचे यश आले!!
खूप आवडलं
खूप आवडलं
सर्वांचे प्रतिसाद वाचले.
सर्वांचे प्रतिसाद वाचले. आवडले. घाऊक धन्यवाद मानताना जरा विचित्र वाटतंय खरं ....
ही कथा स्वानुभव आहे कि कसं हे सांगता नाही येणार. असूही शकेल किंवा कल्पनाविलासही असेल.. पण एक मात्र नक्की सुचलेल्या कित्येक कथा लिहून न काढल्याने विरून गेल्या, काही पाखु मधे अर्धवट पडून राहील्या तसं हिचं झालं नाही. पहिल्या अक्षरासाठी किबोर्डला टच केला डायरेक्ट प्रकाशित करूनच थांबलो.. कदाचित माझ्याकडून कुणीतरी लिहून घेतलं असावं..!
( जरा जादाच झालं का ? )
अरे व्वा.. काय सुरेख
अरे व्वा.. काय सुरेख लिहितोस.. वाचकाला अलगदपणे तुझ्या भावविश्वात गुरफटवून टाकतोस.. ऋतु तोच पण तुझ्या वर्णनामुळे आसपास मोहोराचा वास अनुभवला खरच..
पार भिडलं मनाला..
पुलेशु.
सुरेख.
सुरेख.
सुरेख!
सुरेख!
अवांतर : गुलमोहरासारखीच
अवांतर : गुलमोहरासारखीच वाटणारी ती बोगनवेल. मेरी पामर या नावाने ती ओळखली जाते. सध्या सीझन आहे. सुरूवातीला पांढरी पुलं येतात, मग गुलाबी होत रानी कलर बनतो.. ब-याचदा गुलमोहराच्या झाडावरच हा वेल हौशींनी चढवून दिलेला आढळतो.. कदाचित त्यामुळं ते झाड आहे असं वाटत असेल.
चैत्राचं इतकं सुंदर वर्णन आणि
चैत्राचं इतकं सुंदर वर्णन आणि बाकी भावनांचं हळुवार रेखाटन, हे सहीच combination आहे. खुप आवडलं.
माझ्या निवडक १० त.
मेरी पामर..
मेरी पामर.. थँक्स.
दोस्तांनो..... थँक यू व्हेरी मच !
Pages