स्वप्नातली परी

Submitted by धनेष नंबियार on 13 May, 2010 - 12:04

सांगतो मी तुम्हाला गोष्ट एक खरी,
काल रात्री मी पाहिली एक सुंदर परी.

काल स्वप्नात आली एक सुंदर परी,
म्हणाली, येशील का सोबत तू माझ्या घरी.
आईच्या हातचे लाडू तेथे नसले जरी,
खायला देईन तुला श्रीखंड अन् पुरी.

सांगतो मी तुम्हाला गोष्ट एक खरी,
काल रात्री मी गेलो परीच्या घरी.

परीच्या घराला होते सोन्याचे दार,
बप्पाच्या मूर्तिला चांदण्याचे हार.
खोटे नाही बोलत मी सांगतो खरे,
चोहिकडे वाहत होते मधाचे झरे.

परीच्या सस्याला होते मोठ्याले कान,
जणू कापसाच्या बोळ्याला दोन आळवाचे पान.
चांदण्यांच्या बागेत तिने फिरवीले मला,
फिरायला दिला चांदोबाचा झुला.

काल रात्री मी झोपलो ढगांवर जरी,
उघडताच डोळे होतो पलंगावरी.
सांगतो मी तुम्हाला गोष्ट एक खरी,
काल रात्री मी पाहिली एक सुंदर परी.

~ धनेष नंबियार

गुलमोहर: 

छान!

छान...

छान

धनेश -
काल रात्री मी झोपलो ढगांवर जरी,
उघडताच डोळे होतो पलंगावरी.
सांगतो मी तुम्हाला गोष्ट एक खरी,
काल रात्री पाहिली मी एक सुंदर परी.
मस्त ..मस्त .!!

छान Happy