द एक्स्ट्रॉ मॅरायटल - प्रेमा कतलानी

Submitted by बेफ़िकीर on 4 April, 2011 - 11:44

प्रेमा कतलानी!

२९ नोव्हेंबर १९९७ ची ती रात्र! अहमदनगरलाही पाऊस होता. त्यावेळेस कंपनीत माझी जी पोझिशन होती तिला प्रवासासाठी कार मिळायची नाही. पण त्या दिवशी अहमदनगरच्या प्लँटला एक साहेबही आलेले होते, जे परत जाणार असूनही नेमके काहीतरी अर्जन्सीमुळे थांबले आणि त्यांची कार त्यांच्याविनाच जाणार हे ठरले. कॉस्ट सेव्हिंग! लग्गेच कुणीतरी विषय काढला की कटककर पुण्याला चाललाय, त्याला जाऊदेत की त्या गाडीतून!

जन्म मुत्यूच्या फेर्‍यातून मुक्त व्हायचे असेल किंवा 'किमान' खरोखर व्यक्त व्हायचे असेल तर स्वतःला स्वतःसमोर आणि समाजासमोर नागडे करावे लागते. 'नागडे' याचा अर्थ वस्त्रहीन शरीर नाही. मनाला नागडे करावे लागते.

धाडस लागते त्याला!

आणि ते कवितेच्या माध्यमातून होणे सोपे असले तरीही गद्यात मुळातच एक नागडेपण असते आणि त्यामुळे आपले मन नग्न करणे गद्याच्या माध्यमात अधिक सुलभ ठरते.

सुंदर वस्त्रांमध्ये झाकलेले आणि त्याचमुळे लोभस, अप्राप्य, गूढ, आकर्षक आणि हृदयद्रावक वाटणारे लेखन म्हणजे कविता आणि नग्न असल्यामुळे हिडीस तरीही कुतुहलजनक आणि प्राप्य वाटणारे लेखन म्हणजे गद्य! ओह, मी कवितेला पद्य का नाही म्हणालो? कारण पद्य लोभस किंवा आकर्षक असेलही, पण अप्राप्य, गूढ आणि हृदयद्रावक यांच्यापैकी बहुतेक सर्व किंवा किमान दोन घटक त्यात नसतील.

तर गद्य!

प्रेमा कतलानी गद्य नव्हती, कविताही नव्हती, ती केवळ पद्यही नव्हती. ती या तिन्हींचे मिश्रण होती.

हे वाक्य मात्र च्यायला मी गद्यात लिहीले राव!

कधी एकदा पुण्याला पोचतोय ही पुण्याबाहेरून पुण्यात यायला निघालेल्या तमाम पुणेकरांची भावना प्रवासाच्या सुरुवातीला निर्माण झाली आणि अर्ध्या तासातच ती नामशेष होऊन 'कशाला पुण्यात जायचंय' अशी नवीन 'गूढ' भावना निर्माण झाली.

पाऊस हा माझ्या आयुष्यातील काही वैतागांपैकी एक वैताग आहे. आणि मी हा पावसाच्या आयुष्यातील एकमेव वैताग आहे. नशीब एकेकाचे! पावसाला मी आवडत नाही. कारण त्याला मी घाबरत नाही. मी मलाही घाबरत नाही. नाहीतर दिवसाला साडे सहा पेग्ज आणि सोळा गुडांग गरम हे कुणी केले असते?

मी घाबरतो फक्त माझ्या प्रतिमेला! 'लोक काय म्हणतील' हा प्रश्न मला वयाच्या कितव्यातरी वर्षापासून सर्वाधिक छळत आलेला आहे.

हं! तर पावसाला मी घाबरत नाही. कारण पाऊस आला की मी मुद्दाम कोणतेही 'पाऊसरोख' अस्त्र न घेता बाहेर पडतो. सुदैवाने माझ्याकडे चिक्कार टी शर्ट्स आणि शर्ट्स आहेत. सरळ टू व्हीलरवरून बाहेर जातो, एका ठेल्यावर सिगारेट ओढतो आणि परत येतो. आल्यावर डोके पुसतो. बाकी अंग पुसले नाही तरच बरे वाटते. 'तू असा का बाहेर चालला आहेस' हा प्रश्न घरच्यांनी विचारणे सोडल्यालाही आता कितीतरी वर्षे झाली असावीत. अरे हो, कुणीतरी म्हणेलही की 'माझ्याकडे चारचाकी आणि दुचाकी दोन्ही असल्याचे सांगण्याचा क्षीण प्रयत्न'! म्हणूदेत! मायबोलीवरील काही काही कमेंट्स मला अतिशय व्यवस्थित लक्षात असतात. माझ्या धाग्यावरच्या नसल्या तरीही! हं! आता ती कमेंट देणारा माझाच दुसरा आय डी आहे हेही म्हंटले जाईल म्हणा, पण म्हणोत बापडे!

"मुझे पता नही था के इंदौरके लिये यहांसे बसही नही है"

प्रेमा कतलानीचे ते विधान कानात गुंजते!

तिथे तंबाखू घ्यायला कृष्णा नावाचा ड्रायव्हर जर थांबला नसता तर? काय बनलो असतो मी? एक नक्की, कुणीच बनलो नसतो इतके नक्की! आज मी निदान कुणीतरी आहे. किमान थट्टेचा विषय!

माणसाने झाडे कापली, डांबरी रस्ते केले, इमारती बांधल्या पण श्वासासाठी प्राणवायूची गरज, तहानेसाठी पाणी, भूकेसाठी अन्न आणि कामभूकेसाठी परलिंगाचे आकर्षण या चार गोष्टींवर विजय नाही मिळवला. चंद्रावर पोचला साला! समलिंगी आकर्षण असणार्‍यांना सलाम! ते त्या चार घटकांपैकी एकावर विजय मिळवतात. आपल्याला नाय जमायचं! है ना?

"पूनासे इंदौर जानेवाली हर बस यहींसे जाती है"

मी माझे अगाध प्रवास केल्यानंतर मिळवलेले ज्ञान पाझळले.

मला आता नक्की आठवत नाही, पण बहुतेक पाऊस हसला होता माझं वाक्य ऐकून!

कुणी मला 'सुसंस्कृतता' या शब्दाचा अर्थ नीटपणे सांगाल का?

म्हणजे असा अर्थ, जो सापेक्षतावादाच्या पलीकडचा आहे? सापेक्ष हा एक गोंडस शब्द वापरला की किती प्रश्न सुटतात नाही? प्रेमा कतलानीच्या मते अहमदनगरहून इंदौरची बसच न सुटणे ही गोष्ट वाईट होती. आणि माझ्यामते पुण्याहून इंदौरला निघालेली प्रत्येक बस तिथूनच जाते आणि तिथे थांबतेच हे ज्ञान तिला नसणे हे वाईट होते. की चांगले होते?

"डेढ घंटेसे खडी हूं"

कोणत्याही मुक्तछंदात खपावे असे हे वाक्य!

पराकोटीचे चांगले वागायचे संस्कार अत्यंत दबावपूर्ण पद्धतीने केल्यानंतर व्यक्तीमत्वाचा स्फोट होऊ शकतो हे जाणवण्याचे आई वडिलांचे तेव्हा वय नसते आणि स्फोट होतो तेव्हा तो रोखण्याची त्यांची 'पोझिशन' नसते.

झालं?? आई बापांना दोष दिला की मी मोकळा! मला जन्माला घालायचा काय अर्ज केला होता मी? हा प्रश्न टाकला की जन्माला आल्याचे सर्व नैतिक व अनैतिक फायदे घ्यायला मी मोकळा!

पुरुष अत्यंत चारित्र्यवान व संयमी असू शकतो व त्याने तसेच असावे.

कोणत्या 'येड**'ने हे वाक्य म्हंटलंय कुणास ठाऊक!

आपण पुरुषाला पुरुष म्हणतो हीच चूक आहे. स्त्रीने निर्मिलेला आणि स्त्रीला प्राप्त करण्याची आकांक्षा बाळगणारा व त्याचबरोबर स्वतःसाठी सर्व प्रकारची भौतिक, अध्यात्मिक वगैरे सुखे मिळवण्याचा प्रयत्न करणारा व स्त्रीला प्रजनन करण्यास सहाय्यकारक ठरणारा दुराभिमानी माणूस! एवढे दर वेळेस बोलायचा कंटाळा म्हणून पुरुष म्हणायचे!

असो! या 'असो'चेही असेच! सापेक्ष या शब्दासारखेच! गेल्या सात पिढ्यांचा उद्धार करायचा एखाद्याच्या अणि शेवटी लिहायचे 'असो'! ब्रह्मदेवाचे बाप सगळे!

भिजलेली नसती तरी प्रेमा कतलानीच्या स्ट्रॅप्स दिसल्याच असत्या असे ब्लाऊझ होते तिचे!

निषेध निषेध! बेफिकीरला हाकलून द्या!

एकेकाळी मी जानवे घालायचो आणि दिवसातून एकदा संध्या करायचो.

या विधानातील 'मी' हा शब्द गाळणे व 'घालायचो' अन 'करायचो' या शब्दातील 'चो' चा 'चा' करणे आवश्यक आहे. 'तो' मी आता राहिलेलो नाही.

"ये इधर सामने रुकती है बस... "

मी बहुतेक ड्रायव्हर गाडीत आहे या गोष्टीला लाजत असणार! हल्ली मला माझा स्वतःचा अभ्यास फार छान करता येतो. 'हा असताना मी कसा काय हिला लिफ्ट ऑफर करणार?' असेच मला वाटलेले असणार हे उत्तर लगेच दिले की नाही?

सवाष्ण चारचौघांसमोर वागते तसा मी त्या फियाटमध्ये वागत होतो आणि वेश्या चारचौघांना वागवते तसा पाऊस लोकांना भिजवत होता.

साडी, पंजाबी ड्रेस, टीशर्ट, पोषाख काहीही असो! काय बघायचे हे पुरुषांना आणि काय दिसू द्यायचे हे बायकांना माहीत असते. त्याउप्पर कुणी जात नाही. नाहीतर असे कित्येक लेख इथे असते.

मला स्त्रीचे आकर्षण, भीती आणि कीव एकाचवेळी वाटते. स्त्रीलाही पुरुषांचे आकर्षण, भीती आणि दुर्दैवाने उगाचच दरारा वाटत असतो. पुरुष खरे तर बिचारा असतो. हेही 'सापेक्षच'! 'असो'!

"पहुंचादेंगे क्या पूनातक??"

प्रेमा कतलानी ड्रायव्हरच्या शेजारी बसू नये याचे मी प्रयत्न केले हे न सांगणे म्हणजे माझ्याचविरुद्ध मी वागत आहे असे होईल.

फियाट फार चांगली गाडी आहे. तिच्या पुढच्या सीटला पुण्यातल्या बीआरटी का काय ते तसा डिव्हायडर नसतो. सलग सीट! कित्ती कित्ती हीन माणूस आहे नाही मी?

मोह!

ज्यांना लेख वाचण्यात प्रॉब्लेम्स आहेत, माझा निषेध करायचा आहे, मला लवकरात लवकर 'डिसाअयडी' करावे अशा तक्रारी करायच्या आहेत त्यांनी आपले वाचन नेमके याच पातळीला थांबवावे.

हा लेख निरुद्देश नाही. हा लेख 'माझे अधिकाधिक वाचक असावेत' या उद्देशाचा नाही. चीप पॉप्युलॅरिटी तर आपण रोजच मिळवतो. त्यात काय विशेष?

अहमदनगरला पाऊस पडू शकतो, इंदौरच्या बसेस पुण्याहून सुटतात आणि फियाट ही एक चांगली कार आहे यापैकी काही सांगणे हाही उद्देश नाही या लेखाचा!

मानवी समाजात निर्माण झालेले सर्व कायदे तात्कालीन व असमर्थ आहेत हे सांगणे! हा उद्देश आहे. आपण निसर्गाला नाही जिंकू शकत! जे खरे आहे ते खरे आहे! उगाच गुडीगुडी किती दिवस लिहायचे राव?

हे इथल्या पॉलिसीत बसत नसेल तर उद्यापासून मी पुन्हा कादंबरी लिहिताना दिसेनच, किंवा अजिबात नाहीसुद्धा काही लिहिताना दिसणार आयुष्यभर! माझी एवढीच विनंती आहे की 'हा लेख ही केवळ एक काल्पनिक कथा आहे' असे समजून प्रशासकांनी ती प्रकाशित होऊ द्यावी. काही कारणाने पटले नाही तर मग 'छान छान' लिहिणारे खूप आहेतच.

अंतर्बाह्य भिजलेल्या प्रेमा कतलानीचे अनवधानाने होणारे स्पर्श काय करून गेले याचा तपशील मांडणे हा कथेचा उद्देशच नाही.

पुण्यात पोचलो तेव्हाही फियाटमध्येच होतो हा बहुधा माझ्या संस्कारांची परिणाम करण्याची अतिरिक्त क्षमता असावी.

मी प्रवासात, म्हणजे एकटाच ड्राईव्ह करत जात असेन तर, खूप गाणी म्हणतो.

२९ नोव्हेंबर १९९७ ला ही मी एकटाच समजत होतो स्वतःला! खूप खूप गाणी म्हंटली.

दीज फेसलेस एन्काऊंटर्स टेक यू नो व्हेअर!

पुण्यात अशा वेळेला पोचलो जेव्हा इंदौरची शेवटची गाडी निघून गेलेली होती. धुळ्याची एक गाडी होती. त्यात तिला बसवून दिले.

आय वॉज बॅक होम! टू बी अ‍ॅन आयडियल हसबंड!

नीतीमत्तेच्या सर्वमान्य व्याख्या आणि स्वमान्य व्याख्या यांच्यामध्ये गोंधळलेल्या अवस्थेत येण्याची ही पहिली पायरी! व्याख्या तरी कशाची करता येते? सूर्याची करता येते? जो प्रकाश देतो तो सूर्य? असे म्हणता येईल? किंवा जो पृथ्वीवर जीवनसृष्टी निर्माण करतो तो सूर्य? मग जो सध्या एप्रिलमध्येच भारताला भाजत आहे तो कोण आहे? जो मावळल्यावर काहींचा दिवस सुरू होतो तो कोण आहे? चांगला कोण आणि वाईट कोण हे नाही ठरवता येत. सूर्यही वाईट वागू शकतो. माणसाने फक्त चांगल्या स्वभावाचे असावे असे मला वाटते. बाकी दुनिया खड्यात गेली. कुणीही कुणाचाही नाही.

प्रेम! सहवासाचे प्रेम हे एकमेव प्रेम आहे. जन्माला आलेल्या मुलाला जन्मल्याजन्मल्याच तिसर्‍याच पाजत्या बाईकडे ठेवले, जसे संभाजीमहाराजांना धाराऊकडे सोपवले होते, तर त्या मुलाला स्वतःच्या जन्मदात्रीची भेट वीस वर्षांनी झाली तरीही सांभाळणार्‍या आईबद्दलच अधिक प्रेम वाटेल.

सहवास!

आपला आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी फक्त सहवास असतो आणि त्या सहवासामुळेच ते प्रेम असते. या तत्वाला अपवाद एकच! आई आणि अपत्य यातील आईचे अपत्यावरील प्रेम! सईबाई जर जिवंत राहिल्या असत्या तर संभाजी महाराजांना जरी त्यांच्यापेक्षा धाराऊबद्दल अधिक वाटले असते तरीही सईबाईंना संभाजीला पाहिल्यावर मातृत्वच उफाळुन आल्याचा अनुभव आला असता.

आपली आई आणि आपण हे नाते सोडले तर संपूर्ण जग तात्कालीन प्रेमावर उभारलेले आहे असे मला वाटते. अगदी बाप आणि मुलगासुद्धा!

हं! वादोत्पादक आहे खरे असे म्हणणे! पण ... का कुणास ठाऊक, त्या पावणे दोन तासात प्रेमा कतलानीने ते खरे ठरवले.

दोष नक्कीच माझाच असावा... की मी ते आधी जाणलेले नव्हते.

दिवसातले काही तास मायबोलीवर असणे यात आपण आपल्या एंप्लॉयर, लाईफ पार्टनर यांच्यापैकी कुणाचा विश्वासघात करतो असे आपल्यापैकी कुणाला वाटते का?

मला नाही वाटत! इन्टरनेटचे बिल शक्य असूनही मी कंपनीला नाही लावत! कंपनीचे काम करून मग लेखन करतो. पण तरीही... कोणत्याही समाजाच्या नीतीमूल्यांनुसार.. मी कंपनीचा विश्वासघातच करत असतो ना?

विश्वासघात ही एकच गोष्ट सापेक्ष नाही असे मला वाटते. विश्वासघात केला आहे हे न कळणे आणि विश्वासघात केला हे कळणे यात फरक आहे.

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

बेफिकिरजी,
भन्नाट लेख ,शेवटपर्यंत ससंपेन्स टिकवुन ठेवलात !
यावरुन पाऊस हा भल्याभल्यांना पाणी पाजतो असे म्हणता येईल ..!

शेवटी खुप वेळा संधी येऊन देखील आपणच मागे पडलेलो असतो ..
Happy

अत्तापर्यंतच्या लेखनातल्या तुमच्या सर्वच स्त्री प्रतिमा , तसेच स्त्रीविषयक दृष्टीकोन मला का खटकत आलाय हे या वाक्यातील "मला स्त्रीचे आकर्षण, भीती आणि कीव एकाचवेळी वाटते. स्त्रीलाही पुरुषांचे आकर्षण, भीती आणि दुर्दैवाने उगाचच दरारा वाटत असतो "
'कीव' या शब्दावरून लक्षात आले.
याबाबत थोडे अजुन स्पष्टी. केलेत तर समजुन घेण्यास फायदा होईल :
बायकांची 'कीव' का वाटते ????
१. केवळ 'बाई' आहे म्हणुनच बाईची कीव वाटते ?? ( यात अगदी इंदीरा गांधी , मेधा पाटकर ई . सामाजिकदृष्ट्या यशस्वी बायका पण का )
२. का फक्त गरीब, असहाय्य बायकांचीच कीव वाटते ? ( जर तुम्ही सिंधुताई सकपाळ सिनेमा बघितला असेल तर त्यांचीही तुम्हाला कीव वाटली का? )
३. का गरीब व त्यामुळे लैंगिक शोषणाला बळी पडणार्‍या ( जसे की वैश्या ई) बायकांची ??

जर मुद्दे २,३ मुळे बायकांची कीव वाटत असेल तर तेच भोग काही पुरुषांच्याही वाट्याला येतात त्यांचीही तुम्हाला 'कीव' वाटते का ??
जसे लहानपणी लै. अत्याचाराला बळी पडलेले मुलगे, जबरद्स्तीने हिजडे बनवले गेलेले पुरुष , अतिशय हलाकीत जिवन जगणारे पुरुष

बरे नशिबाने ज्यांच्या वाट्याला भोग येतात ते सोडून स्वतःहुन आपत्ती ओढवून घेणार्‍यांची कीव येते का? जसे व्यसनाधीन पुरुष जे स्वतःचे सगळे आयुष्यच हरवून बसतात ?

आणि प्रत्येक बाईला प्रत्येक पुरुषाचा 'दरारा'च वाटतो असे तुम्हाला वाटते का? असे असेल तर ते फारच हास्यास्पद आहे. किन्वा तुमच्या वर्तुळात फक्त अशाच स्त्रिया आल्या असतील असे वाटते.
मी हा प्रतिसाद अतिशय प्रामाणिक पणे लिहिला आहे. केवळ विरोध करण्यासाठी नव्हे. पण एकंदरीत तुमच्या आणि त्याआधीच्या जनरेशनच्या बहुतेक पुरुषांची मानसिकता थोड्याफार प्रमाणात अशीच दिसून येते.

मला तरी ओळखीतल्या कोणाही बाईची कधीच कीव वाटली नाही. अगदी आमच्या भांडीवालीची सुद्धा. एकटीच्या जीवावर काम करून तिने घर संभाळले , मुलीचे लग्न करून दिले आणि नवरा मात्र दारू पिऊन पिऊन मेला. तो अतिशय माजात आणि आरामात जगलाही असेल आणि तिने फार शारीरिक कष्ट केलेही असतील. तरीही मला त्याचीच कीव वाटते. स्त्रीला अनेक शारीरिक , मानसिक यातनातून जायला लागते पण अखेर तिला खंबीरपणे जगावेच लागते. पण अनेक पुरुषाचे आयुष्य मात्र या निष्फळ अहंकाराच्या भोवती वाया जाते. आणि त्यांच्या मुलांना त्याचे वाईट परीणाम सोसावे लागतात.

अर्थात माझ्या प्रतिसादाने तुमचे विचार बदलणार नाहीत किंवा तुमच्या मनावरचा पुरुषी अहंगडाचा पडदा हटणार नाही. तरीही इथे हे लिहायचे कारण इतकेच की तुमच्या प्रत्येक लिखाणात कधी उघडपणे , कधी सुप्तपणे , मला काय खटकट होते ते इथे स्पष्ट झाले.

हे काही प्रश्न राहिले होते वरती द्यायचे --
१. तुमच्याकडे वैषयिक दृष्ट्रीने पहाणर्‍या ( तुमच्या मते विबासं ठेवणार्‍या ) स्त्रियांची फक्त कीव वाटते का? आणि त्या स्त्रियांना तुमचा दरारा वाटतो ??
२. तुमच्या बायकोचीही कीव वाटते का ? ( संबंध वैवाहिक असले तरी 'रोल' तोच ) आणि त्यांना तुमचा दरारा वाटतो ??

कोणतेही प्रेमसंबन्ध हे मैत्रीपुर्ण नात्यावर टिकून असत्तात/असावे , असा माझा समज / अपेक्षा होती. त्यात जर कीव , दरारा अशा भावनांचा अंतर्भाव असेल तर त्यांना प्रेमसंबंध म्हणणे अवघड आहे.

रच्याकने , नशीब तुमचे की ती प्रेमा चोरांची साथेदार वगैरे नव्हती , नाहितर दिल चाहता है मधल्या सैफ सारखी अवस्था झाली असती तुमची Proud आणि तिला तुमची किव पण नसती आली

डेलिया, मला तुमचा प्रतिसाद अतिशय आवडला! खरंच कीव हा शब्द ह्या लेखात आलाय हे वाचण्याच्या ओघात लक्षात आलेच नाही... का बरं कीव वाटते बेफिकीरजी तुम्हाला स्त्रीयांची? Uhoh आणि प्रत्येक स्त्रीला पुरुषाचा दरारा वाटेलच असे नाही... Uhoh संकटात सापडलेल्या, कुठल्यातरी आजाराने जर्जर झालेल्या व्यक्तीची सुद्धा आपल्याला दयाच येते मग ती स्त्री असो वा पुरुष... कीव येत नाही! कीव हे दया ह्या शब्दाचे फार नकारात्मक रुप आहे. त्यात एक प्रकारची तुच्छतेची भावना आहे...

तसेच एखाद्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या, जसे पोलिस, बॉस, शिक्षक इ. व्यक्तीचा जर ते स्वतः शिस्तप्रिय असतील आणि शिस्तीची अपेक्षा ठेवत कडक धोरण राबवत असतील तर त्यांचा, मग ते स्त्री असो की पुरुष आपल्याला दरारा वाटतो.

कीव आणि दरारा दोन्ही लिंगसापेक्ष भावना नाहीत तसेच तुम्हाला स्त्रीयांची भीती वाटते हे ठीक, पण सरसकट सर्व 'स्त्रीयांना पुरुषांची भीती वाटत असते', हेही विधान पटले नाही...

हा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद डेलिया Happy

धन्यवाद सानी !!

सानी , तुम्ही सायकॉलॉजी या विषयाशी संबंधित अहात म्हणुन विचारते , पुरुषांच्या अशा मानसिकतेमागचे कारण काय असावे? माझ्यामते घरातील पुरुषांचे/वडलांचे घरातील बायकांबरोबरचे / आईबरोबरचे वागणे याला काराणीभूत ठरत असावे. जी लहान मुले पहिल्यापासून अशा प्रकारच्या वातावरणात वाढतात त्यांच्या मनात स्त्रीचे दुय्यम स्थान कळत नकळत पणे ठसलेले असते असे वाटते. मी असे अनेक पुरुष प्रत्यक्षात पाहिले आहेत जे बायकांना कळत नकळत , केवळ 'बाई' म्हणुन कमी पणाची वागणुक देतात. त्यापैकी ज्यांच्या घराची मला माहिती आहे त्या बहुतेक घरात गृहीणीला अतिशय हीन स्थान दिले जात होते.

इथे बेफिकीर अभिमानाने त्यांच्या ( त्यांच्या मते ) विबासं विषयी सांगतात. हे सर्व नैसर्गिक आहे आणि होणारच असेही म्हणतात. हे मी मान्य करते. यात मला खरेच काही आक्षेप नाही.

पण त्याच वेळी ज्या दुसर्‍या स्त्रीने यात भाग घेतलाय तिच्याविषयी त्यांच्या मनात आदर नक्कीच नाही. फार तुच्छतेची भावना दिसते. कमीत कमी मला तरी ती तशीच जाणवते. हे मला फार खटकते. त्या स्त्रीचा होणारा अपमान , हा मीही एक स्त्री असल्याने मला खटकतो.
त्या स्त्रीच्या ( प्रेमा म्हणा किन्वा मागे एकदा त्यांनी कोणा एका स्त्रीला कपडे बदलताना चोरून पाहिले असे लिहिले होते ती स्त्री घ्या ) जागी त्यांची बहिण , पत्नी , आई असेल तर ते असे लिहू शकतील का ? लिहितील का ?
किंवा उद्या कोणा तिसर्‍या माणसाने त्यांच्या बहिणी/ पत्नी / आई विषयी असे लेखन केले तर ते शांतपणे वाचू शकतील ? जर या बायकांविषयी ते असे जाहिरपणे लिहू शकणार नाहीत, वाचू शकणार नाहीत तर कोणा एका 'प्रेमा' बद्दल का लिहावे ? आणि स्वतःला बेफिकीर म्हणवुन घ्यावे ??

केवळ विबासं बद्दल लिहिलेय म्हणुन आवडले नाही असे अजीबात नाही. असा गैरसमज कृपा करून इथे कोणी करून घेउ नये. पण केवळ स्वतःची फुशारकी आणि दुसर्‍याची नालस्ती करणारे जर लिखाण असेल तर नक्कीच ते खटकते. विबासं जरी असले तरी ती दुसरी 'स्त्री' प्रथम माणुस आहे, तिच्याही काही भावना आहेत हे लक्षात घ्या. she deserves some respect as a human being.
मला जे म्हणायचेय ते समजण्यासाठी Mr. & Mrs. Ayer आणि रीटा वेलणकर हे दोन पिक्चर पहा. दोन्हीमधे फारच सुंदर रीतीने गोष्ट मांडली आहे. दोघांना योग्य न्याय, आदर देऊन जर कोणी काही लिहिले , तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही.
बाकी ज्याची त्याची मर्जी.

"Frailty, thy name is woman."----Hamlet----William Shakespeare

श्शी ! डिसगस्टींङ ! मलातर शेक्स्पीयरचीच कीव वाटते ! किती तो पुरुशी अहंगंड !
अर्थात माझ्या प्रतिसादाने शेक्स्पीयरचे विचार बदलणार नाहीत किंवा शेक्स्पीयरच्या मनावरचा पुरुषी अहंगडाचा पडदा हटणार नाही. Proud

( अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व )

शेकस्पिअरने हॅम्लेट स्वतःच्या आयुष्यावर लिवले होते की काय??? मला इतके दिवस वाटत होते की ते काल्पनिक आहे, तो केवळ एक पात्र रंगवतो आहे आणि तसे त्याचे वैयक्तिक मत नसेलही. ऐतेन
अतिअवांतर प्रतिसादाबद्द्ल अजिबात क्षमस्व नाही, कारण माझ्या प्रतिसादाने बाकी काही बदलले नाही तरी निदान या लेखाचा टीआरपी वाढलाच की!!!

द एक्स्ट्रॉ मॅरायटल - प्रेमा कतलानी हे ललित आहे ...कन्फेशन नाही ....यात बराच ...कल्पनाविलास आहे ...असणार ..., अहो , साहित्यिक जेव्हा साहित्यात " मी " वापरतो तेव्हा तो कथेतला ...काल्पनिक मी असतो ... लेखत अन तो " मी " एकच असेल असे नाही ..
.
शिवाय " कोणताही कल्पना विलास न करता केवळ अनुभव लिहायला बेफीकीर समीक्षक / पत्रकार नाहीत " Rofl

ही तर अजूनच मजा आहे! म्हंजे असं की स्वानुभव म्हणून टीका झाली की कल्पनाविलास आणि कल्पनाविलास म्हणून कमी लेखले की स्वानुभव, बहोत खुब!!!
ल्हानपणी गावाकडे या बोटावरची थुंकी त्या बोटावर नेण्याची एक जादू असे तिचा आविष्कार फारा दिवसांनी बघायला मिळाला!

सानी , तुम्ही सायकॉलॉजी या विषयाशी संबंधित अहात म्हणुन विचारते , पुरुषांच्या अशा मानसिकतेमागचे कारण काय असावे? माझ्यामते घरातील पुरुषांचे/वडलांचे घरातील बायकांबरोबरचे / आईबरोबरचे वागणे याला काराणीभूत ठरत असावे. जी लहान मुले पहिल्यापासून अशा प्रकारच्या वातावरणात वाढतात त्यांच्या मनात स्त्रीचे दुय्यम स्थान कळत नकळत पणे ठसलेले असते असे वाटते. मी असे अनेक पुरुष प्रत्यक्षात पाहिले आहेत जे बायकांना कळत नकळत , केवळ 'बाई' म्हणुन कमी पणाची वागणुक देतात. त्यापैकी ज्यांच्या घराची मला माहिती आहे त्या बहुतेक घरात गृहीणीला अतिशय हीन स्थान दिले जात होते.>>>
डेलिया, तुम्ही मला प्रश्न विचारलात, आणि तुम्हीच त्याचे छान उत्तरही दिले आहे... मी स्त्रीमुक्तीच्या धाग्यावर ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ते तुम्ही वाचले नसल्यास ही त्याची लिंक.

डेलिया, तुमचा दुसरा मुद्दा: ते कपडे बदलतांना स्त्रीला पाहण्याचा... अर्थातच अशी परिस्थिती कोणी पुरुष आपल्या आई, बहिण, पत्नीवर आल्याचे लिहू, वाचू किंवा कल्पना करुच शकत नाही आणि करत असेल तर त्याला अ‍ॅबनॉर्मलच म्हणावे लागेल... तुम्ही ज्या कथेविषयी बोलत आहात, त्या काल्पनिक कथेतल्या- 'ऑल्ड मंक लार्ज' कादंबरीतल्या नायकाचे नैतिक अधःपतन कसे झाले, हेच त्यात मांडलेले आहे. तुम्ही जर परत तो प्रसंग वाचायचा प्रयत्न केलात तर ते तुम्हालाही जाणवेल. त्या नायकाने जे केले, ते त्या कथेत अजिबात समर्थनीय पद्धतीने मांडलेले नाही. आत्मानंदला आपल्या वागणुकीचा किती तीव्र पश्चाताप झाला हेच पुढे लिहिलेय आणि तेच लक्षात रहाते... शिवाय त्यात ज्या स्त्रीला तो पहातो, ती त्यावेळी आत्महत्या करत असते आणि सगळा आरोप त्याच्यावर जाणार असतो ह्या विचाराने तर असे काही चुकूनही करु नये हाच विचार विकृत विचार करणार्‍या आणि तशी कृती करणार्‍यांच्या मनात येऊ शकतो!

बाकी तुम्ही म्हणता ते केवळ स्वतःची फुशारकी आणि दुसर्‍याची नालस्ती करणारे जर लिखाण असेल तर नक्कीच ते खटकते. विबासं जरी असले तरी ती दुसरी 'स्त्री' प्रथम माणुस आहे, तिच्याही काही भावना आहेत हे लक्षात घ्या. she deserves some respect as a human being.>>> एकदम मान्य! कोणीही ह्या बाबतीत कायम विचार करावा...

"आपण पुरुषाला पुरुष म्हणतो हीच चूक आहे. स्त्रीने निर्मिलेला आणि स्त्रीला प्राप्त करण्याची आकांक्षा बाळगणारा व त्याचबरोबर स्वतःसाठी सर्व प्रकारची भौतिक, अध्यात्मिक वगैरे सुखे मिळवण्याचा प्रयत्न करणारा व स्त्रीला प्रजनन करण्यास सहाय्यकारक ठरणारा दुराभिमानी माणूस! एवढे दर वेळेस बोलायचा कंटाळा म्हणून पुरुष म्हणायचे! "

पटले. पण शेवटी हे सहजीवन आहे. नाही का ?

मंदार जोशींप्रमाणेच टायटल आणि कथा यात गोंधळल्यासारखं झालं.

छानच्........बेफिजी तसे फार छान आणि प्रामाणिक भावना पोहचवता तुम्ही तुमच्या लिखाणातुन, खरे तर सगळ्यांकडेच असतात त्या पण त्या पण उघडपणे आणि प्रामाणिक पणे मांडण्याचे औदार्य फार कमी लेखकामध्ये असते.........आणि तुमच्यासारख्या "बेफिकीर" यांनी का तमा बाळगावी कुणाची...................मस्त लिहिता तुम्ही लिहीत रहा असेच.......... Happy

जरा स्पष्टच लिहितो, तुम्ही मनाला लावून घेणार नाहीत अशी अशा आहे.

तुमचे सर्वच लेख मी वाचतो(गझल वगळता, एकदा प्रयत्न केला पण झेपली नाही गझल, पुन्हा त्या वाटेला गेलो नाही), मला तुमची लेखनशैली खूप आवडते. खूप ओघवती भाषा आहे तुमची, लेखासोबत मीसुद्धा वाहवत जातो आणि लेख संपल्यावरच पुन्हा वास्तवात येतो.

पण हा लेख वाचून निराशा झाली, अतिशय पांचट लेख वाटला, खूपच पाल्हाळ लावला होतं, एवढं पाणी तर राजवाडेही एल्दुगो मध्ये घालत नाहीत. कंटेन्ट खूपच कमी होता.

थोडंसं तुमच्याविषयी, स्वतःच्या चुकीच्या(अर्थात काही लोकांना ते चुकीचे आहे असे वाटणार नाही) गोष्टींचे समर्थन करतानाही, मी कसा चांगला आहे असं तुम्हाला सांगायचं असावे असे वाटते. राहून राहून असे वाटते कि हा लेख लिहिताना तुमचे मन तुम्हाला खात असावे. एखादी गोष्ट करू नये असे मन सांगते पण शरीर मनाविरुध्द काहीतरी करायला प्रवृत्त करते, आणि नंतर आपला आपल्याला वाईट वाटते, असं काहीसा. हा लेख लिहिताना तुम्ही भावनिक झाला होता का? लेखात खूप ठिकाणी "मी" स्पष्टपणे जाणवतो.

असो लोभ असावा, चू भू द्या घ्या.

हा माझा लेख आहे का?

चिखल्या, अहो मनावर घेऊ नका

हे असं असतं (च) जगात

मी तर मी, काहीतरी जाणवलं यामुळे 'गुलमोहर - विबासं' असं सदर नाही निघालं, हे काय कम्मीय्य क्कॅय?

Proud

=============

डेली या

तुम्हाला उद्या उत्तर देतो

-'बेफिकीर'!

बेफिकीर जी खर सांगू का मी तुमच लिखाण गेली दोन वर्षे वाचतो आहे. मायबोलीचा सभासद न होता. पहिल्यांदा छान वाटायचं तुमच लिखाण पण आता तुमच्या लिखाणामध्ये तोच तोच पणा जाणवत राहतो. म्हणजे एकंदरच तुमचे ललित या भागात प्रसिद्ध होणारे लेख "बाई, सेक्स आणि तुम्ही" याच प्रकरणात मोडणारे असतात. म्हणजे कितीहि तुम्ही ते कविता किवा चारोळ्या लेख मध्ये घातल्यात तरीही तुमचे ललित लेख त्याच अनुषंगाने जातात. म्हणजे हा ज्याचा त्याचा प्रश्न कि कोणी काय लिहावे पण तुमच्याकडे इतर विषयांवर लिहिण्याची प्रतिभा असताना सुद्धा अस का होत हा प्रश्न पडला म्हणून. प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व. कोणाला दुखविण्याचा हेतू नाही पण असा वाटल म्हणून लिहील.

आजच हा लेख वाचला
(अर्थात बेफीजींचे या सीरीजचे धागे मी क्लिक करतो तेच मुळी त्या एका शेरासाठी )

सुरुवातीला दुसर्‍याच परिच्छेदात समजले की ह्यात बरच पाल्हाळ असणार ...मला त्या प्रेमा कतलानी बद्दल तिच्या व्यक्तित्वा बद्दल व्यक्तिमत्त्वाबद्दल अजून सविस्तर लिहिलेले आवडले असते जसे बेफीजींच्या इतर मैत्रिणीबद्दल ते लिहितात यात तसे काहीच नव्हते त्यामुळे आधी निराश झालेलो

मग प्रतिसादवाचन सुरू झाले स्रीवर्गाची लेखाबाबत नाराजी काय आहे ते समजले
वर कुणीतरी म्हटले आहे की सस्पें स कॅरी केला आहे वगैरे व ते वाचून विचारात पडलो ते विचार असे .....

१) एकतर असे आहे की जीघटना घडली ती शीर्शकात एकाच वाक्यात दिली आहे व ती कोण होती तिचे नावही सांगीतले आहे बाकीचे नाट्य रंगवून न सांगता अगदी वेगळी स्टाईल वापरली आहे की विषय व्यवस्थित भरकटवू द्यायचा मुद्दा येवू द्यायचाच नाही ...सांगायचे तर आहेच पण काय सांगू कसे सांगू असे झाले की पुरुष असे भलते सलते विषय काढत राहतात जे काय बोलायचे त्याचा रोख कायम ठेवून मुद्दे अनाकलनीय पद्धतीने व्यवस्थित झुलवत ठेवतात (ह्याला पुरुष् लज्जा असेही म्हणता येईल हवेतर !! ..)व मनातल्या मनात मात्र सगळे बोलून घेतात तसा प्रकार ह्या लेखात केला गेलाय ही प्रतिभा आहे !!

ह्य हाताळणीला मनातले मांडे मनात असे म्हणता येईल !!!

२) स्त्रीजातीबद्दलचीच जर आक्षेपार्ह विधाने दिसत असतील तर वाचकांनी पुरुष ह्या शब्दाची लेखकाने केली;ली व्याख्याही वाचावी ....आई ह्या नात्याबद्दल काय म्हटले आहे तेही पहावे बाकी नैतिकता संस्कार स्वभाव असे अनेक मुद्दे हाताळून लेखकास आपण काय लिहित आहोत का लिहीत आहोइत व हे प्रसिद्ध करू काय होणार आहे ते पक्की माहीत आहे हे लक्ख्ख दिसते आहे

तरीही लेखकाने जे जे आक्षेपार्ह स्त्रीयांप्रती निंदेचे लिहिले आहे ते तसे अजिबातच नाही हे , मग ते काय आहे हे ...मला माझाच एक शेर अत्ता आठवला त्यावरून समजले !!!

मला माहीत असते विठ्ठला तू स्तुत्य असल्याचे
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी

बाकी जरी बेफीजींनी काहीच्या काही व काहीबाही अश्याप्रकारच्या वाक्यांनी हा लेख "सजवला" असला तरी मनात काही ही पाप , हीन हेतू न ठेवता असे केलेय हे दिसते आहे

आता हा हटके लेख मला फारच आवडू लागलाय ....शेवटचा शेर तर छानच आहे

तरीही त्या कतलानी बद्दल जरा अजून अंबट चिंबट अजून आले असते तर...... (तेवढ्या फक्त स्ट्रॅप्स पाहून माझं भागत नाहीये हो!!!) Wink

असो !!!

कदाचित मला समजला नसेल पण विस्कळीत वाटला. मध्येच मायबोली प्रशासन, वाचक वगैरे उगाच आले. अधिक खुलवता आलं असतं... शारीरीक आकर्षणचं उथळ आणि शॄंगारीक लेखन यात बरिच गल्लत होतेय का?

असो. मी बेफिकिर यांचं लेखनावर टीका करण्याइतका मोठा नाही, तरि खटकलं ते लिहावं वाटलं. शेवटी त्यांचे लेखन मलाही आवडतं. Happy

प्रेमा कतलानी....पुण्यापर्यंत फियाटमध्येच.....
बेफी स्वतःच्या भितीला संस्कार म्हणतात हे सत्य आपल्याला कीतव्या वर्षी उमगले. ख्याख्याख्याख्या(हसण्याचे विशेषण)

>> तरीही त्या कतलानी बद्दल जरा अजून अंबट चिंबट अजून आले असते तर...... (तेवढ्या फक्त स्ट्रॅप्स पाहून माझं भागत नाहीये हो!!!) >>

अय्ययो वैभव वसंतराव कु...काका , मग चिंचा , आवळे खा की.
अजूनच आंबट चिंबट हवे असेल तर बाकी साईट्स आहेत की वो , मायबोली सारख्या सात्विक सोज्वळ साईटीवर कशाला यावं म्हंते मी !

सात्विक शृंगारवाचनच्या गप्पा माझ्याबरोबर प्लीज कुणी मारू नका आता ......नाहीतर माझे काहीच्या काही शेर सुरू होतील तुम्हाला ते मुकाट ऐकावेही लागतील Happy

उदा:

बामनी डो़क्यात माझ्या , शायरीची म्हैस व्याली
मी विटेवर एक हेला पाहिला होता उभेला
................~वैवकु Happy

धन्स !!

_______________________________________
अत्यंत महत्त्वाचे :अय्ययो वैभव वसंतराव कु...काका , मग चिंचा , आवळे खा की.<<<<

एकतर मी "काका" नाही हे आधीच सांगून ठेवतो....

चिंचांचा विषय काढलात म्हणून एक शेर आठवला (हाही नियमानुसार माझाचय ..अँटीमीटर नाराज होवू नयेत :फिदी:)

वयानेच केले कडूश्या जिभेचे
तशी चिंच नाही तसे बोर नाही
........~वैवकु Happy

>> सात्विक शृंगारवाचन >> अँटीमॅटर लय भारी Biggrin

एकतर मी "काका" नाही हे आधीच सांगून ठेवतो.... >> मग -हायलं .' काका ' शब्द बिनशर्त मागे
घेत आहे. Happy

स्त्रीने निर्मिलेला आणि स्त्रीला प्राप्त करण्याची आकांक्षा बाळगणारा व त्याचबरोबर स्वतःसाठी सर्व प्रकारची भौतिक, अध्यात्मिक वगैरे सुखे मिळवण्याचा प्रयत्न करणारा व स्त्रीला प्रजनन करण्यास सहाय्यकारक ठरणारा दुराभिमानी माणूस! एवढे दर वेळेस बोलायचा कंटाळा म्हणून पुरुष म्हणायचे!
>>>>> Apratim!!!

Aani kharach he lihaNyas Dhadas lagata.... Durdevane te majhyat nahi...

aapala,
(Dhadas Nasalela) Vishubhau

Pages