"मला हाय बीपी dignose झाले आहे."
आणि मंडळीमध्ये गोंधळ माजला.
पण या प्रस्तावानेकडे येण्याआधी अगदी जवळच्या भूतकाळात डोकावून पाहिले पाहिजे.
१५ दिवसांपूर्वी:
सोमवारी सकाळी उठल्यावर रेग्युलर कामे आटपली. या कामाना रेग्युलर म्हणायचे हे लहानपणापासून सर्व लोक म्हणत असल्याने मीसुद्धा त्यांना रेग्युलर कामे म्हणतो. पण हा शब्द मला मान्य नाही. रेग्युलर कामे म्हणजे ज्यामध्ये इनपुट ठरलेले आणि आउटपुट देखील ठरलेले. मात्र सकाळच्या कामांचे आउटपुट रात्रीच्या इनपुट वर ठरलेले असते. रात्रीचे इनपुट बिघडले कि सकाळचे काम रेग्युलर होण्याची शक्यताच नाही. एकंदरीत हा सगळा मामला गोंधळाचा आहे. असो. मूळ मुद्द्याकडे परत येतो.
तर सकाळचे रेग्युलर आटोपल्यावर ऑफिसची तयारी सुरु असताना जरा चक्कर आल्यासारखे झाले. हिला सांगितले असते तर "रविवारी रात्री इतकी ढोसतोस ते कमी कर आधी. सोमवारी ऑफिसला जायचे असताना इतकी घ्यायची सुचते कशी?" असले निरर्थक संवाद कानावर पडले असते. म्हणून काहीच बोललो नाही. आणि आदल्या दिवशी खरच जास्त झाली होती. योगेशची बायको महिन्याभरानंतर घरी परत येणार होती म्हणून आता पुढच्या आठवड्यापासून दुसरीकडे बसावे लागणार या दु:खातिरेकाने जास्तच पिली गेली. hangover चा त्रास मला कधीच नव्हता पण वाढत्या वयाने नवीन त्रास सुरु होतात असे कुठेतरी वाचले असल्याने त्या त्रासांमध्ये hangover सुद्धा येत असावा असे समजून मी शांत राहिलो. नेमकी लिफ्ट बंद असल्याने जिने चढून दुसऱ्या मजल्यावर जावे लागले आणि तेव्हढे चढताना मला चक्क दम लागला. आता मात्र हे रविवार रात्रीच्या मदिरेचे प्रताप अशी माझीही ठाम समजूत झाली आणि यापुढे रविवार रात्रीऐवजी सकाळी प्यायला बसावे असा ठराव पुढच्या बैठकीत मांडायचे मी मनात पक्के केले.
दोन दिवस नेहेमीच्या कामाच्या दिवसांप्रमाणे निवांत गेले. गुरुवारी संध्याकाळी घरी पेपर वाचत असताना डोळ्यासमोर अंधारी आली आणि ते पाहून बायकोच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. पेपर मधील भ्रष्टाचाराच्या बातम्यामधील आकडे पाहून अंधारी आली असे मी तिला (आणि स्वत:ला) पटवून द्यायचा प्रयत्न केला. पण मी पुणे विशेष पुरवणी वाचत होतो आणि ती पुरवणी लाखामध्ये असलेले भ्रष्टाचारच प्रसिद्ध करते (कोटीमधील असतील तर मुख्य पुरवणी आणि त्याहून जास्त असले तर मराठी पेपर छापत नाही; इंग्रजी घेऊनच वाचावे लागते). त्यामुळे लाखातील भ्रष्टाचार वाचून अंधारी येणे शक्यच नव्हते. वास्ताविक पाहता मी headlines सुद्धा वाचत नव्हतो. कोणत्यातरी सुंदराबाई अप्सरकर कि अप्सराबाई सुंदरकर यांच्या तमाशाची जाहिरात आली होती ती वाचत होतो पण ते घरी सांगितले असते तर मग जाहिरात साक्षात घरी अवतरली असती.
तर त्या अंधारीने माझे डोळे उघडले.
""Hypertension" चा त्रास सुरु झाला आहे. " आमचा डॉक्टर मित्र आनंद कोल्हे गरजला.
"म्हणजे काय असते?" - मी. खरे तर 'tension ' हा शब्द बोलण्यात आला तेव्हा थोडा अंदाज आला. पण हायपर म्हणजे कमी कि जास्त, हा आदिमानव- कालीन प्रश्न पडला. असे प्रश्न विचारले कि कोणत्याही डॉक्टरला सार्वजनिक अज्ञानप्रसाराचे अत्यंत दु:ख होते आणि " जगात सर्व लोक डॉक्टर का नाहीत ?" असा भाव चेहऱ्यावर येतो. आता माझा हायपर आणि हायपो मध्ये कायम घोटाळा होतो. यातला धाकटा कोण आणि थोरला कोण हे ठरवताना बीपी कमी-जास्त झाल्याच्या अनेक आठवणी अजून माझ्या डोक्यात आहेत.
"म्हणजे हाय बीपी" आनंद हे वाक्य माझ्यापेक्षा बायकोकडे बघत हताशपणे म्हणाला. बायकोच्या चेहेऱ्यावर माझ्याबद्दलचे प्रेम, काळजी इ.इ. पाहायचा हाच तो सुवर्णक्षण म्हणून मी पण बायकोकडे पाहिले तर ती डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत होती. या reaction चा नीट अर्थ न कळून मी गोंधळात पडलो तेव्हढ्यात बायको कडाडली, "अरे या वयात बीपी?". मी आवाजात शक्य तेव्हढा शांतपणा आणत आनंदला म्हणालो, " आंद्या, नक्की हाय बीपीच आहे ना? की सेकंड ओपिनियन घेऊ कोणाचे?"
हा प्रश्न ऐकून जमदग्नींना लाज वाटेल इतका आनंद चिडला. पण यात माझा दोष नव्हता. काही काळापूर्वी आम्हा मित्रांच्या एका "बैठकीत" विकासला दोन आठवडे खोकला येत आहे हे कळल्यावर "त्याला एड्सच झाला असला पाहिजे" असे आंद्याने छातीठोकपणे सांगितले होते. त्या संध्याकाळी विकास एड्स ने नाही तरी हार्टफेलने निश्चितच मेला असता. त्यानंतरचा आठवडाभर त्याने सहा वेगवेगळ्या रक्तपेढी मधून रक्त तपासून घेतले होते आणि नंतर आंद्याला बुकलून ते रक्त त्याच्याकडून वसूल केले. त्यामुळे सगळ्या जगासाठी तो जरी नामांकित प्रथितयश वैद्यकीय तज्ञ असला तरी आमच्या ग्रुप मध्ये ते कोणीही मान्य करत नाही.
सेकंड, थर्ड अशी ओपिनियन झाल्यावरदेखील निकालात फरक पडला नव्हता. तेव्हा स्वत:ला हाय बीपी झाले आहे हे मान्य केल्याखेरीज गत्यंतर नव्हती. त्यामुळे आता त्यावर उपाय शोधणे प्राप्त होते. या बाबतीत बायकोचा उत्साह अफाट होता. आनंदने सांगितल्यानंतरच तिने कसली कसली जाड पुस्तके घरी आणायला सुरुवात केली. ती पुस्तके मी वाचावीत अशी तिची इच्छा होती असे तिनेच मला काही दिवसांनी सांगितले. ती पुस्तके रात्री वाचनासाठी नसतात हे मी स्वानुभवावरून सांगतो. कारण ते पुस्तक रात्री वाचताना मला झोप लागली तर काही वेळाने श्वास गुदमरून मी जागा झालो. अशी पुस्तके चुकून जरी छातीवर पडली तरी श्वास गुदमरून माझे बीपी वाढेल हे बायकोला पटले आणि ती ब्याद माझ्यामागून सुटली.
आमच्या बैठकीच्या दिवशी सर्वांनी पेग भरले आणि ग्लास एकमेकांना भिडणार इतक्यात मी आवाज शक्य तेव्हढा शांत ठेवत बोललो,
"मला हाय बीपी dignose झाले आहे."
आणि मंडळीमध्ये गोंधळ माजला.
भिडलेले ग्लास खाली ठेवले गेले. अशी दुर्दैवी कृती याआधी फक्त विनायक पिंपळखरेचे लग्न ठरल्याची बातमी त्याने दिली होती तेव्हा घडली होती. सर्वजण माझ्यावर तुटून पडले.
'कोणी सांगितले तुला हाय बीपी आहे म्हणून?' - विनोद.
कधी detect झाले?' - अनंत.
'आता?????????????'(म्हणजे 'आता याचे कसे होणार?') - कुजकट रम्या.
'आंद्याने सांगितले' - मी.
आणि सर्वत्र एकच हास्यकल्लोळ उडाला. आनंद अतिशय चिडून माझ्याकडे आणि बाकी सर्वांकडे आळीपाळीने बघू लागला.
'आंद्याने सांगितले ना!!!!!मग निवांत राहा' - आशिष.
'अरे मी तर रोज सकाळी त्याला फोन करून विचारतो की मी आज मरणार का म्हणून! हा जर 'हो' म्हणाला तर त्या दिवशी प्रकृतीला कसलीही चिंता नाही असे समजायचे.'-विनोद.
'हाय बीपी एड्स मुळेच झाला असे पण म्हणाला का रे????' -रम्या.
'अरे अजून दोन डॉक्टरना सुद्धा विचारले. ते पण तसेच म्हणाले.' -मी.
आता मैफिल थोडी शांत झाली. बाब थोडी गंभीर आहे हे पब्लिकच्या लक्षात येऊ लागले.
अशा वेळी नक्की काय बोलायचे हा पण एक प्रॉब्लेमच असतो. काहींना सल्ला द्यायचा असतो, काहींना सांत्वन करायचे असते, काहींना कसलीच पर्वा नसते. पण हाय बीपी हा खरंच काही धोकादायक प्रकार असतो यावर मंडळींचा(आणि माझाही) फारसा विश्वास नव्हताच मुळी. त्यामुळे याला आता काय बोलायचे हा प्रश्न सर्वांनाच पडला. अखेर अशा वेळी जी एक विचित्र शांतता असते ती तोडण्याचे काम ग्रुपमधला एखादा एरवी अतिशय शांत असणारा एखादा मेंबर करतो आणि केवळ शांतता भंग करणे एवडेच त्याच्या मनात असल्याने तो काहीतरी विचित्रच बोलतो.
इथेही तसेच घडले.
एकदम अविनाश म्हणाला ,"तू काळजी करू नको रे, काही झाले नाही तुला. माझा या बीपी वगैरे प्रकारावर विश्वासच नाही मुळी!!!!!"
सर्व मुंड्या त्याच्याकडे वळल्या.
"म्हणजे???" - कोणीतरी म्हणाले .
"म्हणजे काय? म्हणे रक्त शरीरात खालून वर वाहते!!! काय वाट्टेल ते बोलला तर ऐकायचे काय?????असे कधी पाणी कोणी खालून वर वाहताना पाहिले आहे का??? साधे टाकीतून वर चढवायचे असेल तरी मोटार लावायला लागते. इथे असलेल्या कोणाच्या बिल्डींगची टाकी गच्चीत नाही सांगा......" - अवि
काही क्षण शांतता पसरली. प्रत्येकजण मनात अविला बोलण्यासाठी रिप्लाय तयार करत असावा. कारण सगळे एकदम फुटले.
"अरे गाढवा, रक्त शरीरात वाहत नाही असेच म्हणायचे आहे का तुला?"
"असे मी कुठे म्हणालो!!!!!! पण एवढ्या नीट वाहणाऱ्या रक्ताला अचानक योग्य दाब मिळत नाही म्हणे.......असे होणेच शक्य नाही."
आता याला कोण आणि कसे समजावणार याचा सर्व विचार करायला लागले. आणि अखेर या alice ला त्याच्या wonderland मध्ये तसेच सोडून बाकीचे पुन्हा माझ्याकडे वळाले.
'अरे ३८ वर्षाचा तू झालास आणि इतक्यात बीपी चालू सुद्धा?????? असेच चालू राहिले तर अजून एखाद्या वर्षात हार्ट attack सुद्धा येईल तुला.......'
'आणि diabetes सुद्धा होतो बर का बीपी वाढल्यावर!!!!'
'नुसते खाणे, पिणे आणि झोपणे असे केल्यावर दुसरे काय होणार??????'
'अरे असेच बोलत राहिला तर बीपी वाढून मरेन मी आता!!!!!'
मग सगळे थोडे भानावर आले.
'ते काही नाही......याला आता नॉर्मल ला आणलेच पाहिजे.'
'आंद्या, बोल बीपी कसे कंट्रोल करायचे?????'
'व्यायाम वाढवायचा.' -आनंद
'वाढवण्यासाठी आधी सुरु करायला हवा.' -अत्यंत कुजका कॉमेंट म्हणजे रम्या.......
'अरे मी करतो व्यायाम.' - अत्यंत क्षीण स्वरात मी म्हणालो
'घरातून दोन चौक लांब मस्तानी खाण्यासाठी चालत जाणे म्हणजे व्यायाम नाही' - आंद्या शांतपणे म्हणाला. मला अतिशय संताप आला. हा साला परवा माझ्याबरोबर मस्तानी खायला आला होता आणि ह्याला प्रत्येक वेळी मस्तानी पिऊन झाल्यानंतर दोन सामोसे चरायचे असतात. त्यादिवशी माझ्याकडे फक्त मस्तानीचेच पैसे होते. आणि हा दादा कोंडके तर अर्धी बिनखिश्यांची चड्डी घालूनच आला होता. म्हणून मी म्हणालो कि नंतर येऊ तेव्हा सामोसा खाऊ; आज फक्त मस्तानी. तर त्याचा राग मनात धरून आता हा खंडोजी खोपडे माझ्यावर उलटला होता.
'अरे गड चढले पाहिजेत गड'
'याला दर रविवारी सिंहगड चढायला नेऊ आपण' - विनोद.
'करेक्ट. याला सिंहगडाच्या पायथ्याला drop करू. आपण गाडीने वरती जाऊ. आपले भजी, पिठले-भाकरी, दही संपेपर्यंत हा आलाच पाहिजे वरती........'-रम्या
'अरे पण तुम्ही पण चढा कि गड माझ्याबरोबर.......' -मी
पुन्हा एकदा हास्यकल्लोळ झाला.
'अरे साल्या......तुझी जीवनशक्ती वाढण्यासाठी नेत आहोत. आम्ही चढायला लागलो तर आमची कमी होईल उलट.....तुला सक्रिय पाठिंबा दाखवण्यासाठी आम्ही गाडीने तिथपर्यंत येत आहोत हे काय कमी आहे का??????' -रम्याने दम भरला.
'नाहीतर काय!!!!आणि आता ड्रिंकिंग सुद्धा कमी करायचे एकदम.' आनंद म्हणाला
सगळीकडे पुन्हा शांतता पसरली.
'म्हणजे फार कमी करायची आवश्यकता नाही' - विनोदने अखेरचा दुबळा प्रयत्न केला पण आनंद पुन्हा कडाडला.
'आवश्यकता नाही कसे!!!!! ड्रिंकिंगने हार्ट attack चा चान्स दुपटीने वाढतो असे सिद्ध झाले आहे.'
सर्व चर्चेचा अंत मी व्यायाम सुरु करणे आणि ड्रिंकिंग कमी करणे या पर्यायांनी सुरुवात करायची आणि आनंदने १ महिन्यामध्ये रिपोर्ट द्यायचा असे ठरवून झाला.
तिथून घरी आलो तर बायको वेगळ्याच मूड मध्ये होती (म्हणजे माझ्या बीपी च्या बाबत). घरात आमचे चुलत सासरे आयुर्वेदाचार्य विनायकराव कडकडे बसले होते. मी घरात शिरताना दोघांचे चेहरे पाहिले आणि विलक्षण दचकलो.
सोफासेट वर विनायककाका मांडी घालून बसले होते. चेहऱ्यावर कमालीचे दु:ख पसरले होते. त्यांच्या समोर बायको बसली होती. काकांच्या तोंडावरील दु:खाला लाज वाटेल असा हिचा चेहरा उतरला होता. खुर्चीवर सहस्त्रबुद्धे(वरील मजल्यावरील retired हेडमास्तर) उसासा टाकत होते. सीन तर असा जमला होता की मधल्या टीपोय वर एक पणती ठेवली असती तर यम सुद्धा यांच्याबरोबर माझीच वाट बघत बसला असता. मला पाहताच सर्वांचे आधीच पडलेले चेहरे आता जणू काही कोसळले आणि पोझ बदलल्या गेल्या. सहस्त्रबुद्धे उठून उभे राहिले, विनायककाकांच्या डोळ्यात कीव दिसू लागली आणि बायको चटकन माझ्याजवळ आली. मी सोफ्यावर बसलो. काका जवळ येऊन बसले आणि खांदा थोपटू लागले.
विनायककाकांचा पूर्ण आदर ठेवून मी हे आधीच सांगू इच्छितो कि हा माणूस नं.१ चा बिनडोक आहे. मुळात माझा आयुर्वेदिक वगैरेवर विश्वासच नाही. झाडपाला खाऊन असे रोग कसे बरे होतील. पण हे मत मी सुमारे वर्षभरापूर्वी पोटदुखीचे औषध द्यायला आलेल्या विनायककाकांना सांगितले आणि त्यांनी माझ्या हातातला 'वैद्य पाटणकर' काढून 'इच्छाभेदी'च्या ५ गोळ्या दिल्या. ५ गोळ्या लांब राहूद्यात, त्या पहिल्याच गोळीने अशा अशा जागी जाऊन माझा 'भेद' केला की आयुष्यात पुन्हा या विनोबाशी असहकार करायचा नाही हे मी मनोमन ठरवून टाकले. तेव्हापासून याने दिलेली कोणतीही औषधे मी आनंदाने स्वीकारतो.
तर काका जवळ येऊन बसले.
"बीपी ची बातमी कळाली."
"मागच्याच आठवड्यात आम्हालाही कळाले"-मी.
"हो. पण आम्हाला हे आधीच दिसत होते"-सहस्त्रबुद्धे
"म्हणजे???"-मी.
"तुमचे खाणे, पिणे, बैठी नोकरी अशातून अशीच व्याधी होणार. " -'पिणे' वर जोर देऊन विनायककाका म्हणाले.
"अहो पण मला कधी तुम्ही असे फार खाताना वगैरे बघितले आहे???" -मी. बायकोसमोर मी शक्यतो 'पिणे' हे क्रियापद टाळतो.
"अहो मागच्या महिन्यात आमच्या हिच्या आत्याचे श्राद्ध होते तर चक्क सत्तावीस भोपळवडे खाल्ले." सहस्त्रबुद्धे करकरला....आता याने आमंत्रण देतानाच सांगितले होते की,'श्राद्धानिमित्त जेवायला या बर का'! असे सांगितल्यावर पुन्हा या वाक्याला काय अर्थ होता....
"हो ना, प्रसंग बघून तरी जरा हात आवरायचा"....बायको.
"प्रसंग बघून कसला हात आवरायचा. त्या आत्याबाई सकाळच्या चहाला आपल्याकडे यायच्या तर दुपारचे जेवणच करून जायच्या. त्यांच्या आत्म्याला उलट शांती मिळाली असेल कोणालातरी इतके खाताना बघून.....नाहीतरी आता त्या कुठे खाणार आहेत???" आता माझ्यामते हा अतिशय उत्कृष्ट प्रसंगोचित विनोदाचा नमुना होता. पण तेलात काडी पडल्यासारखा सहस्त्रबुद्धे पेटला.
"वहिनी, हे असेच बोलणार असतील तर मी इथून जातोच पहा"
पण तेव्हढ्यात काका म्हणाले,"हे पहा, तुमच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला घेतलीच पाहिजे. अखेर आम्हाला सुद्धा आमच्या मुलीचा विचार करावा लागेल." हे शेवटचे वाक्य बायकोकडे बघत काका म्हणाले. आता हे माझ्या मृत्युनंतर बायकोच्या दुसऱ्या लग्नासाठी स्थळांची चर्चा घेऊन आले की काय अशीच भीती मला वाटू लागली.
"अहो काका, कुठला विषय कुठे नेताय; साधा बीपीचा प्रॉब्लेम आहे. त्याबद्दल काही उपाय आहेत का ते सांगा."
"फक्त बीपीचा प्रॉब्लेम नाही काका......." अर्धांगिनीने मुखकमल उघडले. " आजकाल दमतो सुद्धा लवकर!!!!!!"
सहस्त्रबुद्धे उभा होता तो चटकन खाली बसला. "म्हणजे काय????म्हणजे काय?????"
या हरामखोराचे दात पाडावे असा मला संताप आला. पण बीपीचा विचार करून शांत राहिलो.
"नाही म्हणजे आधी शनिवार-रविवार बाहेर फिरायला जायचो आम्ही. आता हा सारखा कंटाळा करतो."
"अच्छा" सहस्त्रबुद्धेच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
काका आता शिवसेनाप्रमुखांच्या थाटात उभे राहून आपल्या पिचक्या आवाजात गरजले.
"ते काही नाही. तुम्ही आमच्या हिचा हास्यक्लब जॉईन करायचा."
"ठीक आहे" मला काहीही करून या दोघांना बाहेर काढायचे होते.
"आणि जेवणात कच्च्या भाज्या जास्त.....अपेयपान बंद......व्यायामाला सुरुवात"
"ठीक" जित राष्ट्रांच्या प्रमुखाप्रमाणे मी बिनशर्त शरणागती पत्करली.
आता सर्व पुरुषमंडळीना मी सांगू इच्छितो की मी इतक्या चटकन हार मानली नाही. आम्हा पुरुष मंडळींचे एक वैशिष्ट्य असते, आम्ही स्वत: बायकोला कितीही घाबरत असलो, तरी आमचा मित्र, बॉस, ऑफिस मधला मित्र, मद्यमित्र(म्हणजे प्यायच्या वेळी असलेले दोस्त) अथवा इतर जातभाई( म्हणजे कोणीही दुसरा पुरुष) त्याच्या बायकोला घाबरलेला आम्हाला आवडत नाही. किंबहुना अश्या लोकांचा आम्ही धिक्कार करतो. म्हणूनच सांगतो की मी इतक्या चटकन हार मानली नाही. पण अखेर बायकोने अबोला धरला आणि मग मला हार मानावीच लागली. सगळ्याच गोष्टी अवघड होऊन बसल्या हो!!!
हास्यक्लबला पहिले दोन दिवस ओळखी वगैरे करून घेण्यात गेले. सर्व वयस्कर लोकांमध्ये मीच त्यातल्या त्यात तरुण. त्यामुळे मला तसे बरेच वाटले. आमच्या बिल्डिंग मधले खामकर, कोळी आणि राणावत तिथे यायचे.
हास्यक्लब चे वेळापत्रक अगदीच सोपे होते. जवळजवळ ४५ मिनिटे क्लब भरत असे. त्यातले पहिले १५-२० मिनिटे काल आपण तणावपूर्ण परिस्थितीवर कशी मात केली ते सांगायचे, नंतर अर्धा तास मोठमोठ्याने हसायचे.
२-३ दिवसानंतरची गोष्ट आहे. मी कसलेच तणावाचे प्रसंग सांगत नाही म्हणून मंडळी माझ्यावर जरा उखडलीच होती. पण आता माझ्या आयुष्यात तसले प्रसंग येत नाहीत त्याला मी काय करणार? मी MSEB मध्ये काम करतो यातच खरे तर माझ्या कामाचा अंदाज बहुतेकांना येतो. विद्युत मंडळामध्ये वीज कितीही वेगाने वाहत असली तरी आम्ही मात्र मीटर उडाल्याप्रमाणे वागत असतो. आमच्या सेक्शनचे काम म्हणजे सप्लाय केलेले मीटर नीट काम करतात का हे बघायचे आणि तसे रिपोर्ट करायचे. या कामाला ऑफिस सोडून बाहेर फिरायला लागते हे मला सुरुवातीची कित्येक वर्षे माहीतच नव्हते. एके दिवशी नवीन साहेब आले आणि त्यांनी अत्यंत "प्रेमाने" आम्हा सर्वांना हे सांगितले तेव्हा आमच्यामधील सिनियर लोक "हे काय बोवा नवीन आहे?" असा प्रश्नार्थक चेहरा करून बसले होते. "साहेब, असा काही नवीन जीआर निघाला का?" असे सुनीलने विचारल्यावर नवीन साहेबाने आमच्यासमोर जणू काही तांडवच केला होता. सदरहू साहेबांची बदली झाल्यावर आम्ही त्याचे क्रांतिकारक विचारदेखील त्यांच्याबरोबरच पाठवून दिले. नवीन सिन्हा साहेब कमालीचे प्रेमळ निघाले. त्यांच्या मते आमच्या सेक्शनला ऑफिसच्या बाहेर फिरणे सोडा, ऑफिसला येण्याची सुद्धा गरज नाही. त्यामुळे ते आमचे अत्यंत लाडके साहेब झाले आणि अजूनही त्याच खुर्चीवर बसून आहेत.
असो.
तर त्या दिवशी हास्यक्लब मध्ये मोठमोठ्याने हसणे सुरु झाले आणि नेहेमीप्रमाणे कोळी माझ्याशेजारी येऊन उभे राहिले. मोठमोठ्याने हसणे सुरु झाले.
मी : नमस्कार कोळीसाहेब
कोळी : नमस्कार, हा हा हा हा हा हा हा.
मी : काय म्हणते तब्येत? हा हा हा हा हा .
कोळी : तब्येत काय म्हणणार? कुरकुर चालूच असते.
मी : अहो असे काय म्हणता! एवढी सॉलिड तब्येत तुमची! हा हा हा हा हा हा...आम्ही तुमच्याकडून धडे घेतले पाहिजेत.
कोळी : कसले धडे घेताय!!!! सुनेने आता आम्हाला धडे द्यायला सुरुवात केली आहे. हा हा हा हा हा हा.
मी : का हो काय झाले?
कोळी : अहो, रात्रंदिवस उठता बसता कटकट....हा हा हा हा हा हा हा
मी : अहो मला वाटले ते तुमचेच घर आहे....
हे वाक्य तोंडातून गेल्यावर मला कसेसेच वाटले. मला यातून काहीच वाईट अथवा कुजके सुचवायचे नव्हते पण कोळी माझ्याकडे खाऊ कि गिळू नजरेने पाहायला लागला.
कोळी : वाटले म्हणजे काय!!!!!! माझेच आहे. हा हा हा हा हा हा
मी : हो हो. त्याबाबत प्रश्नच नाही. मला म्हणायचे होते कि प्रेमाने, समजावण्याने ऐकतात लोक बऱ्याचदा.
कोळी : अहो शहाणे ऐकतात. पण असल्या बिनडोकाना आम्ही आर्मीमध्ये असताना फोडूनच काढायचो. हा हा हा हा हा
मी : पण या हास्यक्लबचा फायदा होतच असणार ना तुम्हाला!!!(विषयबदलाचा क्षीण प्रयत्न)
कोळी : अर्थात!!!!हा हा हा हा हा हा हा हा
कोळीच्या चेहऱ्यावर रक्त पसरले होते. थोडा वेळ याच्याजवळ थांबलो तर हा मलाच बुकलून काढेल अशा भीतीने मी थोडा डावीकडे सरकून राणावताच्या शेजारी सरकलो. कोळी तशाही अवस्थेत मोठमोठ्याने हसत होता.
घरी येऊन बायकोला हे सांगितले तर तिने "तुला नको तेथे चांभारचौकशा कोणी सांगितल्या करायला?" असे म्हणून अखेर मला "काही नको जाऊस त्या क्लबला!!! बीपी कमी करायच्या नादात हाडे मोडून घ्यायचास" अशी आज्ञा दिली.
ड्रिंकिंग कमी करणे हे एकच काम मला त्रासदायक ठरणार हे आधीपासून माहित होते. पण माझ्या मित्रमंडळींमध्येच यावरून दोन तट पडले होते. एक ग्रुप होता अशा मित्रांचा ज्यांना मी कमी पिणे आजिबात मान्य नव्हते. या ग्रुपने "बीपी काही खरे असते का???" इथपासून ते "अरे लवकर मेलास तरी भरपूर पिल्याच्या समाधानाने मरशील" इथपर्यंत सगळे युक्तिवाद केले होते. दुसऱ्या ग्रुप मध्ये एकटा आनंद होता. त्याने मात्र माझी दारू कमी करायची ठरवलीच होती. बैठकीत त्याचे माझ्या दारूवर फार बारीक लक्ष असे. मग बाथरूममध्ये दारू पिणे, आनंदला गप्पांमध्ये रंगवून त्याच्याच मागे उभे राहून पटकन पिणे असे प्रकार सुद्धा मी इतरांच्या सहाय्याने केले. पण आनंदने रामबाण उपाय साधला आणि प्रत्येकाच्या बायकोला माझ्या बीपीची कल्पना दिली. आणि इथेच सगळा घात झाला.
त्यानंतर दारू सोडा, माझे पिण्याचे पाणी सुद्धा आधी टेस्ट करून मगच मला देणे सुरु झाले. माझ्यावर कडक नजर ठेवणे सुरु झाले. हे करताना मित्रमंडळीना काही समाधान मिळत नव्हते पण त्यांचासुद्धा नाईलाज झाला होता. अखेर एक दिवशी मी "ही माझी अखेरची बैठक" म्हणून जाहीर केले आणि सर्व गंभीर झाले. कोणीही एक शब्दसुद्धा बोलले नाही.
दुसऱ्या दिवशी लंच च्या वेळी नेहेमीप्रमाणे सर्व मित्रमंडळ जमले. आवडत्या हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वांनी आपापल्या पाण्याच्या बाटल्या काढल्या. आणि रम्याने त्याच्या बाटलीमधील पाणी माझ्या समोरच्या ग्लासात ओतले. ह्याचा अर्थ मला कळाला नाही पण मी तो ग्लास तोंडाला लावला आणि..........
अहो काय तो आनंद वर्णावा!!!!!!माझ्या या जिवलगांनी माझ्यासाठी पाण्याच्या बाटल्यांमधून दारू आणली होती. ती घशाखाली जाताना माझे डोळे भरून येत होते. असे मित्र असताना आयुष्याच्या कोणत्याही संकटाला सामोरे जायची हिंमत माझ्यात आहे याचीच जाणीव पुन:पुन्हा मला होत होती.
अजूनही कदाचित हाय बीपी मला असू शकते पण मला आता त्याची भीती वाटत नाही. आता मला आनंदचे एका महिन्यानंतरचे चेकअप, विनायककाका, व्यायाम, हास्यक्लब कशाचीही भीती वाटत नाही. बैठकीत दारू बंद केली म्हणून आनंद खुश, ऑफिसमध्ये आजाराचे कारण सांगून लवकर घरी येत असल्याने बायको खुश, अधूनमधून लंचच्या वेळी सामुदायिक मदिरापानामुळे मित्र खुश आणि हे सगळे खुश असल्यामुळे मी भलताच खुश असतो.......मला वाटते या खुशीला भिऊन तो बीपीच पळून जाईल.....
सर्व वाचकांना
सर्व वाचकांना दंडवत.........
'लेखनसीमा' हे माझे पहिले लिखाण 'विनोदी लेखन' या विभागात न टाकता 'लेख' या विभागात टाकले होते. याचे मूळ कारण म्हणजे त्या लेखनाला विनोदी म्हणण्याचे धाडस होत नव्हते. अनेक वाचकांनी मात्र ते लेखन विनोदी असल्याचा निर्वाळा दिला होता. हे लेखन मात्र विनोदी विभागात टाकत आहे. कोणालाही सदर लेखन त्या पात्रतेचे नाही असे वाटल्यास इथे खालीच सांगा. म्हणजे याला इतर विभागांमध्ये हलवता येईल.
कळावे, लोभ असावा
आपला नम्र,
निशदे
मस्त लिहिलय ! आजकाल दमतो
मस्त लिहिलय !
आजकाल दमतो सुद्धा लवकर!
मस्तच लिहीले आहे !!!
मस्तच लिहीले आहे !!!
श्या ...... वाईट्ट हसले.
श्या ...... वाईट्ट हसले.
एकूणात तुम्हाला बीपीवर एक अक्सीर इलाज सापडलाय तर हे लिखाण 'आरोग्यम धनसंपदा'मध्ये हालवता येईल असं वाटतंय.
मामे, मी 'ब्लॅक्क' हसलो खरच
मामे, मी 'ब्लॅक्क' हसलो
खरच सहीय्ये
सॉल्लीड हसलो लिहित रहा
सॉल्लीड हसलो
लिहित रहा रे!!! हसण्याने आमचे बीपी तरी नॉर्मल राहिल.
मस्त
मस्त
निशदे राव हसुन हसुन लोट पोट
निशदे राव हसुन हसुन लोट पोट झालो (ते सुध्धा office मधे) ....
"फक्त बीपीचा प्रॉब्लेम नाही
"फक्त बीपीचा प्रॉब्लेम नाही काका......." अर्धांगिनीने मुखकमल उघडले. " आजकाल दमतो सुद्धा लवकर!!!!!!"
सहस्त्रबुद्धे उभा होता तो चटकन खाली बसला. "म्हणजे काय????म्हणजे काय?????"
या हरामखोराचे दात पाडावे असा मला संताप आला. पण बीपीचा विचार करून शांत राहिलो.
"नाही म्हणजे आधी शनिवार-रविवार बाहेर फिरायला जायचो आम्ही. आता हा सारखा कंटाळा करतो."
"अच्छा" सहस्त्रबुद्धेच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
भन्नाट जमलाय लेख!!!!!
आवड्या रे..
आवड्या रे..
मस्त
मस्त
मस्तच
मस्तच
श्री, बस्के, धन्यवाद......
श्री, बस्के,
धन्यवाद......
मामी........हा लेख 'आरोग्यम..' मध्ये हलवला गेला तर जगातले सगळे डॉक्टर जीव देतील.........;)
चातक, धन्यवाद.....:)
आगाऊ, प्रतिक्रिया आवडली......धन्यवाद....:)
स्मिता, दीपक.........अतिशय धन्यवाद......मीसुद्धा ऑफिसमध्येच लिहिला आणि यापूर्वी माबो वरील विनोदी लेखन वाचून असाच हसलो होतो; स्वानुभवाने सांगतो, असे केल्यास लोकांचे आपल्या बौद्धिक परिस्थितीबद्दल फार गैरसमज होतात............
ह. बा., अनिलभाई , रुणुझुणू, रचु, धन्यवाद.......
छान जमलाय. आवडेश. पुलेशु.
छान जमलाय. आवडेश. पुलेशु.
धन्यवाद बागुलबुवा........
धन्यवाद बागुलबुवा........:)
मस्त.....
मस्त.....
मस्त जमलाय... ह. ह. पु. वा.
मस्त जमलाय... ह. ह. पु. वा. पु.ले.शु.
गणेश, अमित, धन्यवाद........
गणेश, अमित,
धन्यवाद........:)
हसण्याने आमचे बीपी तरी नॉर्मल
हसण्याने आमचे बीपी तरी नॉर्मल राहिल. >>> आगावा अशा हसण्याने वाढेल उलट.
>>सीन तर असा जमला होता की
>>सीन तर असा जमला होता की मधल्या टीपोय वर एक पणती ठेवली असती तर यम सुद्धा यांच्याबरोबर माझीच वाट बघत बसला असता.
>>बायकोसमोर मी शक्यतो 'पिणे' हे क्रियापद टाळतो.
मस्त आहे लेख. रच्याकने, मस्तानी हा पदार्थ नक्की प्यायचा असतो का खायचा? मी पुण्याची नसल्यामुळे जरा कन्प्यूजन झालंय. नेणत्यांना जाणते करावे.
भारीच लिहलय... जाम मजा आली..
भारीच लिहलय... जाम मजा आली..
धमाल लेख... पंचेस सही
धमाल लेख...
पंचेस सही जमलेय...
" आजकाल दमतो सुद्धा लवकर!!!!!!"
स्वप्ना - तु एकदा येच पुण्याला, तुला खिलवतो मग तुच ठरव खायचे का प्यायचे ते...
श्री.... स्वप्ना_राज,
श्री....
स्वप्ना_राज, बर्याच जणांचा गैरसमज आहे की मस्तानी पिण्यासाठी असते. पण इतक्या सुंदर पदार्थाला 'खाणे' अथवा 'पिणे' अशा वर्गवारीत बसवणेच चूक आहे. त्यामुळे माझ्या मते मस्तानीचा केवळ आनंद लुटावा....
निवांत, धन्यवाद.
आशुचँप, धन्यवाद....... खरच खिलवा त्यांना मस्तानी.....
मस्त!!
मस्त!!
मस्त लेख!
मस्त लेख!
खरच विनोदी .लेख मस्त जमला आहे
खरच विनोदी .लेख मस्त जमला आहे .
आवडलं..
आवडलं..
व्वा ! पण इतक्या सुंदर
व्वा !
पण इतक्या सुंदर पदार्थाला 'खाणे' अथवा 'पिणे' अशा वर्गवारीत बसवणेच चूक आहे. <<< हे मात्र टिप्पीकल उत्तर नव्हे मस्तानी ही अनुभवण्याची गोष्ट आहे तुम्हाला काय कळणार वगैरे अपेक्षित होतं
रेशिम, छाया, मी मुक्ता,
रेशिम, छाया, मी मुक्ता, धन्यवाद......:)
डुआय, 'अनुभवणे' ही 'आनंद लुटणे' याच्या आधीची क्रिया.........अनुभव आल्यानंतर मस्तानी आवडणार नाही असे शक्यच नाही. म्हणून मी आधीच्या क्रियेला दांडी मारून सरळ रिझल्ट कडे आलो.......
घरातून दोन चौक लांब मस्तानी
घरातून दोन चौक लांब मस्तानी खाण्यासाठी चालत जाणे म्हणजे व्यायाम नाही'
------------------------------------------------------------------------------------
जबरी आहे हे छान लिहिलेय.
Pages