सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
परवा आणखी एका संस्थळावरील एका सभासदाच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो.
सध्या जोरात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतसुद्धा सचिनने दोन शतके ठोकली-एक इंग्लंडविरुद्ध व एक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध! पहिल्या सामन्यात धावांची बरोबरी झाली तर दुसर्यात दक्षिण आफ्रिकेऐवजी आपणच 'गुदमरलो' आणि २९ धावात ९ बळी देऊन विजयाच्या जबड्यातून पराजयाला खेचून आणले! तसे पहिले तर सचिन तर वारंवार शतकी खेळी करतो, मग आपण सगळे सामने धडाधड हरतो कीं काय? आकडे काय बोलतात याबद्दल?
नुकताच "क्रिकबझ्झ" या संस्थळावर नेमक्या याच विषयावर एक मस्त लेख प्रसिद्ध झाला. लेखक आहेत गोकुळ गोपाळ. त्यांनी दिलेली आकडेवारी आणखीच कांहीं सांगून जाते. सध्या विश्वचषक स्पर्धेचा हंगाम असल्याने त्यानी या लेखात फक्त एकदिवशीय सामन्यांचाच विचार केलेला असावा. पण आमचे "आनंदजी डोसां" (माझे सहकारी श्री नाफडे) यांच्याकडे कसोटीची आकडेवारीही आहे. पणे तिकडे हा हंगाम झाल्यानंतर वळू.
सचिनचे हितशत्रू साधारणपणे "सचिनने शतक = भारताची हार" असे वाक्य समीकरणच असल्याच्या आविर्भावात 'सोडून' देतात! पण आकडे कांहीं दुसरीच हकीकत सांगतात! सचिनच्या एकूण ४८ एकदिवशीय सामन्यांतील शतकात फक्त तेरा वेळा भारत हरला आहे. तर चक्क ३३ वेळा त्याला विजय प्राप्त झाला आहे. २००२ मध्ये झालेल्या एका सामन्याचा निकाल लागला नाहीं तर अलीकडचा इंग्लंडबरोबरचा सामना बरोबरीत संपला. म्हणजे विजय-पराजयाचे प्रमाण जवळ जवळ ३:१ किंवा अगदी समीकरणाच्या भाषेत सांगायचे तर भारताचे विजय = ३(भारताची हार)!
(४८व्या 'एकदिवशीय' शतकानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना सचिन)
आता जरा खोलात जाऊन पाहू!
सचिनने शतक केले तरी भारत हरला असे सामने
धावा धावगती विरुद्ध मैदान कधी?
१३७ १०० लंका दिल्ली मार्च ९६ *१
१०० ९० पाक सिंगा. एप्रि. ९६ *२
११० ८० लंका कोलंबो ऑग ९६ *३
१४३ १०९ ऑस्ट्रे. शारजा एप्रि ९८ *४
१०१ ७२ लंका शारजा ऑक्ट०० *५
१४६ ९५ झिंबा. जोध. डिसें ०० *६
१०१ ७८ द. आ. जो.बर्ग ऑक्टो०१ *७
१४१ १०४ पाक रा.पिंडी मार्च ०४ *८
१२३ ९५ पाक अहमदा. एप्रि ०५ *९
१०० ८८ पाक पेशावर फेब्रू. ०६ *१०
१४१* ९५ विंडीज क्वाला सप्टे. ०६ *११
१७५ १२४ ऑस्ट्रे. हैद्राबाद नोव्हे०९ *१२
१११ १०१ द.आ. नागपूर मार्च ११ *१३
या १३ पराजयातल्या शतकाखेरीजच्या उर्वरित ३५ शतकात भारताने ३३ सामने जिंकले, एक अनिर्णित राहिला व एकात बरोबरी झाली हे आपण वर पाहिले आहेच.
आता या १३ सामन्यांत इतर फलंदाजांच्या "पराक्रमा"कडे एक नजर टाकू!
*१: या श्रीलंकेविरुद्धच्या ९६च्या विश्वचषक स्पर्धेतील 'लीग' सामन्यात भारताच्या ५० षटकांतल्या २७१ धावांत सचिनने १००च्या धावगतीने १३७ चेंडूंत १३७ धावा काढल्या होत्या. फक्त अझारुद्दीनने अर्धशतक केले. श्रीलंकेने आपल्या धावसंख्येचा पाठलाग करीत ४९व्या षटकात २७२ धावा केल्या. या सामन्यावरील अनुभवावरून अझारुद्दिनने नाणेफेक जिंकूनही क्षेत्ररक्षण निवडल्याचा उल्लेख माझ्या "पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!" या लेखात आला आहेच.
*२ पाकिस्तानविरुद्ध सिंगापूरला झालेल्या एप्रिल ९६च्या या सामन्यात भारताचे सर्व फलंदाज ४८व्या षटकात २२६ धावात गारद झाले त्यात सचिन बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या होती १८६/४. त्यानंतरच्या पराक्रमींनी मिळून ३८ धावा केल्या यात आश्चर्य ते काय? कारण त्यात ३ खेळाडू 'मॅच-फिक्सिंग'वाले होते.
*३ श्रीलंकेविरुद्धच्या ऑगस्ट ९६च्या या सामन्यात भारताच्या एकूण २२६-५ धावांपैकी सचिनने ८०च्या धावगतीने (त्याच्या नेहमीच्या मानाने अंमळ मंदगतीने) १३८ चेंडूंत ११० धावा केल्या. फक्त अझारुद्दीनने ९९ चेंडूत ५८ धावा काढल्या होत्या (धावगती ५९). शिवाय गोलंदाजीतही सचिनने ६ षटकात २९ धावा देऊन श्रीलंकेचा एकुलता एक बळी घेतला (श्रीलंकेने १ बळीच्या मोबदल्यात २२६ धावा केल्या होत्या.) श्रीनाथच्या गोलंदाजीनंतर 'काटकसरी' गोलंदाजीतही सचिन दुसरा होता.
*४ शारजाला झालेल्या या अविस्मरणीय 'लीग'मधील दिवस-रात्र सामन्यात प्रकाशझोतात खेळत सचिनने १३१ चेंडूत १४३ धावा केल्या. सचिन बाद झाला तेंव्हां भारताची धावसंख्या होती ५ बाद २४२. ४३ षटके झाली होती. उरलेल्या ३ षटकात ३२ धावांचे लक्ष्य पार करताना भारताच्या इतर फलंदाजांनी फक्त ८ धावा केल्या (२५०-५)
*५ शारजाला २००० साली झालेल्या या सामन्यात भारताच्या २२४-८च्या धावांपैकी सचिनने ७२च्या धावगतीने १४० चेंडूंत १०१ धावा केल्या. इतर कुणीही अर्धशतकाचा पल्लाही ओलांडला नाही. श्रीलंकेने ४४व्या षटकात २२५-४ धाव करून सामना जिंकला. सचिनने ५ षटकात २२ धावा देत काटकसरी गोलंदाजीही केली. त्याच्यापेक्षा जास्त काटकसरी गोलंदाजी फक्त श्रीनाथची होती.
*६ डिसेंबर २००० साली झिंबाब्वेविरुद्ध जोधपूरला झालेल्या या सामन्यात भारताच्या २८३-८ या धावसंख्येत सचिनच्या १५५ चंडूंत १४६ धावा होत्या. तो बाद झाला त्यावेळी साडेशेहेचाळीस षटके झाली होती. उरलेल्या साडेतीन षटकात आगरकर व जहीर या जोडीने ४८ धावा फटकारल्या. साडेशेहेचाळीस षटकात सचिनने २३५ पैकी १४६ धावा केल्या होत्या. मग इतरांनी काय पराक्रम केला असेल ते लक्षात येईलच. सचिनच्या पाठोपाठ जास्तीत जास्त धावा केल्या होत्या जहीरने (३२). सचिनने ६ षटकात ३५ धावा देत १ बळी घेतला. झिंबाब्वेने शेवटच्या षटकात २८४ धावा करत सामना जिंकला.
*७ द. आफ्रिकेविरुद्ध ऑक्टो २००१ च्या या सामन्यात भारताच्या २७९-५ च्या धावसंख्येत गांगुलीने १२६ चेंडूंत १२७ धावा केल्या होत्या तो बाद झाला तेंव्हा धावसंख्या होती १९३-१. सचिन २६३च्या धावसंख्येवर ७८च्या धावगतीने १०१ धावा काढून सर्वात शेवटी बाद झाला. द. आफ्रिकेने २८० धावा करत हा सामना जिंकला.
*८ मार्च २००४ मध्ये रावळपिंडीला झालेल्या या सामन्यात भारत पाकिस्तानची ३२९ ची धावसंख्या ओलांडू पहात होता पण ४९व्या षटकात ३१७ धावांवर भारताचा डाव आटोपला. सचिनने १३५ चेंडूंत १४१ धावा केल्या व तो बाद झाला तेंव्हां भारताची धावसंख्या होती ३८.४ षटकात २४५-४. ६८ चेंडूंत ८५ धावा करायचे हे आव्हान ६ फलंदाज हातात असूनही भारताला पेलले नाहीं. इतर कुणीही अर्धशतकही केले नाही!
*९ एप्रिल २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादला झालेल्या ४८ षटकांच्या या सामन्यात भारताने ३१५-६ अशी धावसंख्या रचली. त्यात सचिनचा वाटा होता १३० चेंडूंत १२३ धावा. त्यानंतरच्या दोन सर्वोच्च धावसंख्या होत्या ६४ चेंडूत ४७ धावा (धोनी) आणि अवांतर धावा ३९! पाकिस्तानने ४८ षटकात ३१९ धावा केल्या. बालाजी, नेहरा आणि जहीर या तीन शीघ्रगती गोलंदाजांनी २६ षटकांत १८८ धावा दिल्या आणि केवळ २ बळी घेतले. सचिनच्या गोलंदाजीचे पृथःकरण होते ६-०-३६-१.
*१० फेब्रूवारी २००६मध्ये पेशावरला झालेल्या या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या सर्व बाद ३२८ धावांपैकी सचिनने ११३ चेंडूंत १०० धावा केल्या. पठाण आणि धोनी यांनीही प्रत्येकी ६० धावा केल्या. ४५ षटकांनंतर सचिन ३०५-५ या धावसंख्येवर बाद झाला त्यानंतर इतरांनी ५ षटकात केवळ २३ धावा केल्या. सामना ४७ षटकात संपवावा लागला व ३११-७ या धावसंख्येवर डकवर्थ-लुईस कायदा वापरून या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाक विजयी झाला.
*११ सप्टेंबर २००६मध्ये क्वाला लुंपूर येथे विंडीजविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ५० षटकात ३०९-५ अशी धावसंख्या रचली. सचिन नाबाद राहिला, पण सचिनच्या १४९ चेंडूत १४१च्या डावानंतर फक्त पठाणचेच अर्धशतक होते, विंडीजला फक्त २० षटके मिळाली व त्यात १४१-२ अशा धावा करून डकवर्थ-लुईस कायद्यानुसार या अत्यंत चुरशीच्या सामन्यात वींडिज विजयी झाला.
*१२ नोव्हेंबर २००९मध्ये हैद्राबादला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारताला ३५१ धावा करायच्या होत्या. सचिनने केवळ १४१ चेंडूंत १७५ धावा केल्या. भारत तीन धावांनी सामना हरला. सचिनखेरीज ५९ धावा करत फक्त रैना चांगला खेळला. बाकीच्यांनी चैन केली!
*१३ २०११च्या विश्चचषक स्पर्धेतील १२ मार्चला झालेल्या या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिनने १०१ चेंडूंत १११ धावा काढल्या. तो बाद झाला त्यावेळी १ बाद २६७ या धावसंख्येवर सचिन बाद झाला. त्यानंतरच्या फलंदाजांनी फक्त २९ धावा केल्या व भारताची धावसंख्या झाली सर्व बाद २९६! दक्षिण आफ्रिकेने नेहराच्या शेवटच्या षटकात चार चेंडूंत १४ धावा फटकावत आपली धावसंख्या पार करून सामना जिंकला!
सचिनच्या शतकी खेळीने भारताला पराजयापेक्षा विजयच जास्त मिळवून दिले आहेत हेच वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता सचिनने अर्धशतक साजरे केलेल्या पण शतकापर्यंत न पोचलेल्या खेळींत काय झाले ते पाहू.
आजपर्यंत सचिनने ९३ वेळा सचिनने अर्धशतक साजरे केले आहे त्यापैकी ५६ वेळा भारताला विजय मिळाला असून ३५ वेळा त्याचा पराजय झालेला आहे. दोन सामन्यात निकाल लागू शकला नव्हता. याहून अधीक खोलात जाऊन अभ्यास केल्यास त्याने ७० ते ९९ धावा काढलेल्या खेळींत २८ वेळी भारत जिंकला आहे असे लक्षात येईल.
आता इतर शतकवीरांबरोबर सचिनच्या शतकांची तूलना आणि किती फलंदाजांच्या शतकी खेळींचे विजयात परिवर्तन झाले आहे हे पाहू. इथेही तेंडुलकर आपल्या टीकाकारांची तोंडे बंद करून टाकतो. कारण सगळ्यात जास्त विजय मिळवून देणारा शतकवीरही सचिनच आहे. खाली जी यादी दिलेली आहे ती आहे विजय किती वेळा मिळविला आणि किती शतके केली याची! शिवाय आपला संघाला विजयी करून खेळीत जास्तीत जास्त वेळा नाबाद राहिलेला फलंदाजही सचिनच आहे!
फलंदाज देश शतके नाबाद सर्वोच्च
सचिन भारत 33 13 200*
जयसूर्या लंका 24 5 189
पॉंटिंग ऑस्ट्रे. 25 8 145
सौरव भारत 18 10 183
लारा विंडीज 16 3 169
गिलख्रिस्टऑस्ट्रे. 16 1 172
डे. हेन्स विंडीज 16 10 152*
सईद पाक 16 6 194
मार्क वॉ ऑस्ट्रे. 15 4 173
ह. गिब्ज द. आ. 15 1 175
सचिनची १४ शतके दुसर्या डावात प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या ओलांडताना केलेली आहेत. आता त्याच्या तुलनेत इतरांची कामगिरी पाहू.
फलंदाज देश शतके
सचिन भारत १४
पॉंटिंग ऑस्ट्रे. ८
लारा विंडीज ७
इंजमाम पाक ३
रिचर्ड्स** विंडीज ३
द्रविड भारत २
(** सर व्हिवियन रिचर्ड्स)
वरील पराक्रमाबरोबरच एकदिवशीय सामन्यांत सचिनने सामनावीराचा आणि स्पर्धावीराचा सन्मान इतर कुणाहीपेक्षा जास्त वेळा मिळविलेला आहे.
या सर्व आकडेवारीवरून भारताच्या विजयात तेंडुलकरचा असामान्य हिस्सा होता हेच सिद्ध होते. भारताच्या विजयाचा तो नेहमीच एक मोठा शिल्पकार ठरलेला आहे.
त्याचे टीकाकार कांहींही म्हणोत, पण भारताच्या आणि एकंदरच क्रिकेटच्या खेळाच्या संदर्भात पहायचे झाल्यास सचिनचे योगदान अतीशय उच्च प्रतीचे आहे यात शंका नाहीं. आपल्या झंझावाती खेळाने सचिनने भारतीयांना क्वचितच मनस्ताप दिला असेल. जास्तीत जास्त वेळा त्याने भारतीय प्रेक्षकांना आनंद मिळवून दिला आहे. परवाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही हेच पुन्हा दिसून आले. तो बाद झाल्यावर बाकीचे "भले-भले शिपाई ढळाढळा रडले" हेच आपण पाहिले! पण असल्या भल्या-भल्या शिपायांच्या अपयशाचे खापर सचिनच्या डोक्यावर का फोडायचे?
जय सचिन!
ऋणनिर्देश: या लेखासाठी माहिती पुरविल्याबद्दल श्री. नाफडे व श्री. धोंगडे यांचे आभार!
छान माहीती. तेवढं ते 'फक्त
छान माहीती.
तेवढं ते 'फक्त ग्रूप सभासदांसाठी' (सार्वजनिक करा) टॅग काढा, म्हणजे इतरांनाही लेख दिसेल.
काढला. आश्चर्य म्हणजे काढता
काढला. आश्चर्य म्हणजे काढता आला!
छान माहिति !! आणी सुधिरजी ,
छान माहिति !! आणी सुधिरजी , त्या हितशत्रू लोकांच जाऊ द्या हो . त्यांच्या मते सचिन भारताला शतक करून जिंकून देऊ शकत नाही . आणी पाँटींग त्याच्या टीमच्या हारमधेही हीरो प्रमाणे एकाकी झुंज देतो पण दुर्दैवाने अयशस्वी होतो !!! वाईट म्हणजे यात आपलेच लोक जास्त आहेत
छान माहिती. सचिनच्या शतकांची
छान माहिती.
सचिनच्या शतकांची इतरांच्या शतकांबरोबर जी तुलना आहे, त्यात प्रत्येकाने एकूण किती शतकं केली आहेत त्याचेही आकडे कृपया टाकावेत. म्हणजे पॉन्टींगच्या २५ शतकीय खेळींनी विजय मिळवलेला आहे, पण त्याने एकूण किती शतकं केली आहेत तो आकडाही तिथे टाकावा.
माझे काही मित्र आहेत. ते तेंडुलकरला नावं ठेवतात आणि द्रविड त्याच्यापेक्षा श्रेष्ठ खेळाडू आहे असे म्हणत असतात. तर जमल्यास त्या दोघांमधील आकडेवारीची तुलना टाकावीत.
कोणी तेंडुलकर फाल्तु आहे/आवडत नाही असं म्हटलं की मला पुल देशपांड्यांच्या 'काही नवे ग्रहयोग' मधील वैषम्ययोगच आठवतो. विशेषतः हे वाक्यः 'अहो आंबा न आवडणारी माणसं आहेत ही!'
केदार, अनुमोदन.
फार मस्त माहिती आहे. काही
फार मस्त माहिती आहे. काही लोकांची तोंडं बंद करायला ह्याचा उपयोग होईल. पण बाकीच्यांचं काय? तर-->
> 'अहो आंबा न आवडणारी माणसं आहेत ही!'
खरंच! आमचा मॅनेजर पण असाच वायझेड आहे.
नंद्यानं वाचलेला दिसत नाहीये लेख अजुन
सुधीरकाकाजी, कळकळीने
सुधीरकाकाजी, कळकळीने लिहीलेल्या माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.
कुणाच्याही १००च्या आसपासच्या सरासरीने काढलेल्या शतकांमुळें त्याचा संघ हरतो, असं म्हणणार्यांच्या
तोंडावर असली आंकडेवारी फेकण्याची तरी तसदी कां घेतली तुम्ही ! एक तर आपल्यातलाच एक इतकं असाध्य शिखर गांठू शकतो ही कल्पनाच स्वतःच्या न्यूनगंडामुळे कांहीजणाना सहन होत नसावी किंवा लाखों लोक एखाद्यामुळे इतका निखळ आनंद उपभोगतात व त्याच्यावर विशुद्ध प्रेम करतात, हे नसावं बघवत काही नतद्रष्टाना !!
" खळांची व्यंकटी सांडो " म्हणायचं आणि उपरवाल्यावर सोंपवायचं अशाना !!!
नमस्कार दादा, पहिला परिच्छेद
नमस्कार दादा,
पहिला परिच्छेद वाचला मात्र आणि प्रतिसाद द्यायची हुक्की आली तेव्हां पुढचे काही न वाचताच लिहायला बसलो आहे. थोडक्यात इतरांच्या मतांचा पूर्वग्रह नकोआ आहे.
१. सचिन खेळला तर भारत हरतो हा बाष्कळपणा आहे. गेल्याच्या गेल्या कपात त्याचे वडील गेले असतांना तो तडफेने खेळला आणि आपण जिंकलो. ( शकत झाले होते कि नाही हे माहीत नाही आणि गरजेचंही नाही). समजा असं पूर्वी वारंवार झालेलंही असेल तर त्यात त्या फलंदाजाचा दोष काय हे मला समजलेलं नाही. आणि असले समज गैरसमज माझ्यासाठी महत्वाचे नाहीत.
२. सचिन चांगला खेळतो तेव्हां त्याचं कौतुक करायला काहीजणांना प्रॉब्लेम येतो. ( यात मीपण आहे). आता आमची बाजू सांगतो. एखाद्या खेळाडूचं कौतुक प्रमाण सोडून झालं कि मधुमेह होतो. ही नापसंती त्या खेळाडूबद्दल नसून त्या भाटांबद्दल असते जे खेळाडूला मारक आहेत. खेळाडूच्या खेळाचंच कौतुक व्हावं. आत्ता परवा सचिन खेळला नव्हता तेव्हां तो पंचांच्या निर्णयाची प्रतिक्षा न करता कसा चालता झाला यावर भाटगिरी झाली. कधीकधी भारत जिंकला कि हरला हे ही मथळ्यात न देता ठळक अक्षरात विक्रम काय झाला याची बातमी दिली जाते जे सच्च्या क्रिकेटप्रेमीला कधीच आवडणारं नाही. परवा मटाने हेडींग दिले अठरा हजार .... भारत जिंकला, सेमी फायनल मधे गेला हे महत्वाचं नव्हतं का ? पूर्वी वैयक्तिक विक्रमांसाठी चौकट असायची आणि लोक ती आवडीने वाचायचे. यात कौतुकही व्हायचं आणि बातमीचा आबही राखला जात असे.
३. लहानपणापासून कपिलदेव हा माझा आवडता खेळाडू ! तेव्हां तो झोकून देऊन खेळायचा. पण हाच कपिल जेव्हा शेवटी शेवटी चारशे बळींचा विक्रम डोळ्यासमोर ठेवून खेळायला लागला तेव्हां त्याच्यातलं देवपण संपलं. याला रिटायर व्हायची सुबुद्धी दे देवा असं मी म्हणत असे. फॉर्ममधे असलेला अॅलन बोर्डर ज्याने सुनीलच्याही आधी दहा हजार धावा केल्या, त्याने २९ शतकांच विक्रम दृष्टिपथात असतांना निवृत्ती घेतली. आणि असं करणारातो एकटाच नाही. या क्लबचे सदस्य असलेले शेन वॉर्न, रिचर्ड हॅडली ( रिटायर झाला तेव्हां जास्त भेदक होता), कोर्टनी वॉल्श असे अनेक गुणी खेळाडू सापडतील. ऑस्ट्रेलियात तर संघाचा विजय हाच सर्वोच्च असतो. सचिन आजही खूप चांगला खेळतो. त्याच्याबद्दल ही तक्रार नाही. पण बैयक्रिक विक्रमांच्या भाटगिरीला त्यानेच वेसन घातली तर थोडातरी फरक पडेल.
४. तसच टीकाकारांनीही सचिन स्वतःसाठी खेळतो वगैरे जे म्हणणं आहे त्याचा पुन्हा एकदा फेरविचार करावा. सुनील गावस्कर तसं नक्कीच करायचा. संघ हरला जिंकला त्याला घेणं देणं नव्हतं. सचिनवर असा आरोप होऊ नये. त्याच्या भाटांवरचा राग खेळाडूवर निघू नये. त्याच्या वडिलांच्या निधनाचं जे उदाहरण वर दिलंय ते पुरेसं आहे त्याची कमिटमेंट सांगायला. कसंही करून एखाद्यावर टीका करणं हेही खेळाडूला आणि पर्यायाने संघाला मारकच कि.. कुणीच टोकाची भूमिका घेऊ नये.
५. त्याचप्रमाणे सचिन म्हणजे देव आणि त्याच्याविरूद्ध काही ऐकूनच घ्यायचं नाही.. ही असली टवाळकी पण बरी नव्हे.
बाकि चालूद्या..
<< सचिन खेळला तर भारत हरतो हा
<< सचिन खेळला तर भारत हरतो हा बाष्कळपणा आहे >> माझा रोख फक्त असा बाष्कळपणा करणार्यावरच होता; सचिनच्या खेळाचं टीकात्मक रसग्रहण होणं हितावह व आवश्यकही आहे. भाटगिरीपेक्षा तो त्याच्या कामगिरीचा खरा गौरव आहे, हे माझंही मत. पण विभूतिपूजा हे इथलं व्यसनच आहे, त्याला काय करणार !
मिब्रराजी, कपिल व रिचर्ड हेडली हे माझेही खूपच आवडते खेळाडू. कपिल मैदानावरचा प्रत्येक क्षण मनापासून व खिलाडीवृत्तीने एंजॉय करतोय असं वाटायचं म्हणून व हेडली अप्रतिम जलदगती गोलंदाज असूनही कधीही आक्रस्ताळेपणा न करता आपलं काम चोख करण्यात समाधान मानणारा होता म्हणून.
भाऊ मी प्रतिसाद आताशी वचले.
भाऊ
मी प्रतिसाद आताशी वचले. कदाचित त्यामुळेच लिहू शकलो..
अवांतर : आकडेवारी कधीच थरारकिंवा परिस्थिती व्यक्त करीत नाही. कपिलचा नाबाद १७५ चा विक्रम मोडला गेलाय.. पण ज्या क्रमांकारव तो खेळायला यायचा तो क्रमांक, पाच बाद सतरा ही धावसंख्या आणि अक्षरशः तळाच्या फलंदाजाला हाताशी धरून अंगात १०४ ताप असताना मिळवून दिलेला विजय.. हे आकडेवारी सांगू शकेल ?
लेख अभ्यासपुर्ण आहे पण एवढी
लेख अभ्यासपुर्ण आहे पण एवढी मेहनत घेण्याची गरज नाहि. सचिन खेळला की भारत हरतो असे जे म्हणतात त्यांना हेच उत्तर आहे की याचा अर्थ बाकिचे खेळाडु त्या सामन्यात खेळले नाहित! म्हणुन भारत हरला. त्यामुळे त्यात एवढे वाइट वाटण्यासारखे काहि नाहि.
आता बाकिच्या सर्व खेळात भारत कितीतरी वेळा हरतोच की. एवढी चर्चा करण्यासारखे त्यात काहि नाहि.
.
असो. सचिन (आणी इतर २-४) खेळाडु सोडले तर माझा आजकाल कोणावरच विश्वास नाहि. सर्व काहि फिक्स आहे.
काळेसाहेब, छान माहिती!
काळेसाहेब,
छान माहिती! सचिनच्या शतकांविषयी अशी माहिती अनेकवेळा प्रसिध्द झाली आहे. पण सचिनद्वेष्ट्यांचा त्याच्याविषयीचा पूर्वग्रह बदललेला नाही.
छान माहिती! सचिनच्या
छान माहिती! सचिनच्या शतकांविषयी अशी माहिती अनेकवेळा प्रसिध्द झाली आहे. पण सचिनद्वेष्ट्यांचा त्याच्याविषयीचा पूर्वग्रह बदललेला नाही.>>>>>>>>>>>> हेच माझ्याही मनात आलेलं
सचिनद्वेष्ट्यांसाठी एक प्रश्न :
सचिन काय ह्या धावा घरी घेऊन जातो काय (जसा लोकं पगार नेतात)?
त्या धावा ह्या भारतासाठी नि त्या सुरु असलेल्या मैचसाठीच असतात ना?
<< आकडेवारी कधीच थरारकिंवा
<< आकडेवारी कधीच थरारकिंवा परिस्थिती व्यक्त करीत नाही >> मिब्रराजी, मी तर एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन कीं खेळाची खरीं सौंदर्यस्थळं झाकाळण्याचंच काम आंकडेवारी करते; विश्वनाथची स्केअर कट, सोलकर/अझरुद्दीनची क्षेत्ररक्षणातील लयबद्ध चपळाई, प्रसन्ना/ वेंकट यांनी चेंडूला दिलेली कमानदार फसवी फ्लाईट, राक्षसी शरीरयष्टीच्या कॅरीबियननी तुफान वेगाने टाकलेल्या चेंडूवर पोरगेल्या गावस्करने मारलेले शैलीदार कव्हर ड्राईव्ह, इ.इ. सांपडतं का कधी आकडेवारीत? ठराविक व मर्यादित
संदर्भापलिकडे मला तरी आंकडेवारीत रस वाटत नाही. त्यापेक्षा एखादी गल्लीतली अटीतटीची मॅच पहाणं मला खरंच आवडेल !
सुनील गावस्कर तसं नक्कीच
सुनील गावस्कर तसं नक्कीच करायचा. संघ हरला जिंकला त्याला घेणं देणं नव्हत>>> एक्दम बरोबर
छान माहिती अवांतर : खेळाच्या
छान माहिती
अवांतर : खेळाच्या मैदानात - क्रिकेट या ग्रुपमध्ये हा/असे धागे योग्य ठरतील.
छान लेख..
छान लेख..
चांगले संकलन. कोरिलेशन आणि
चांगले संकलन.
कोरिलेशन आणि कॉजेशन या बद्दल लोक नेहमीच संभ्रमात पडतात. येथे तर कोरिलेशनही नाही.
या विश्वचषकात पाकीस्तानचे एकही शतक नाही म्हणुन बहुदा ते जिंकले. त्यांना एखादे करु दिले तर बहुदा ते हारतील.
दिवे घ्या
बरे झाले ही माहिती इथे दिलीत
बरे झाले ही माहिती इथे दिलीत
(खरे तर सचिन शतकी खेळत असताना, नन्तर येणार्या इतर फलन्दाज खेळाडून्ना "मानसोपचारतज्ञाची" आवश्यकता आहे असे माझे अन लिम्बीचे एकमत झाले आहे )
<< या विश्वचषकात पाकीस्तानचे
<< या विश्वचषकात पाकीस्तानचे एकही शतक नाही म्हणुन बहुदा ते जिंकले. त्यांना एखादे करु दिले तर बहुदा ते हारतील. >> आणि तो शतकवीर मग पाकचा सचिन ठरेल !!!
(No subject)
हे उत्तर स्पेशल मिब्ररा यांना
हे उत्तर स्पेशल मिब्ररा यांना आहे. कारण मधल्या काही काळात मला आपल्यासारख्यांचे म्हणणे पटु लागले होते, पण थोडा विचार करताच त्यालाही उत्तर आहे.
२. सचिन चांगला खेळतो तेव्हां त्याचं कौतुक करायला काहीजणांना प्रॉब्लेम येतो. ( यात मीपण आहे). आता आमची बाजू सांगतो. एखाद्या खेळाडूचं कौतुक प्रमाण सोडून झालं कि मधुमेह होतो. ही नापसंती त्या खेळाडूबद्दल नसून त्या भाटांबद्दल असते जे खेळाडूला मारक आहेत.
>> इथे सचिनच्या समर्थकांचे उत्तर आहे की का नाही करायची भाटगिरी?
जेव्हा फिरंगी ब्रॅड्मन, ग्रेस यांची भाटगिरी करतात तेव्हा का नाही हे लोक पुढे येत. सचिनला ब्रॅड्मनशी कंम्पेर करु नका सांगतात पण ब्रॅड्मन जवळ जवळ सम्पुर्ण कारकीर्द ६/७ दिवसीय सामन्यात (ज्यात मधल्या दिवशी मिळणार्या विश्रांतीमुळे दुसर्या डावात फलंदाज ताजे तवाने असत आणि खेळपट्या रिपेअर
केल्या जात) ८० % सामने फक्त एकाच संघाबरोबर खेळला हे सांगायचे टाळतात.
त्याकाळची फिल्डींग चांगली नव्हती असे म्हणणार नाही कारण तेव्हा साधने देखिल चांगली नव्हती पण वरील मुद्दा मात्र बिनतोड आहे.
बाहेरच्यांची भाटगिरी चालते आणि आपल्या लोकांची चालत नाही.
३. सचिन आजही खूप चांगला खेळतो. त्याच्याबद्दल ही तक्रार नाही. पण बैयक्रिक विक्रमांच्या भाटगिरीला त्यानेच वेसन घातली तर थोडातरी फरक पडेल
>> सचिन बैयक्रिक विक्रमांसाठी खेळतो हा मला खटकणारा मुद्दा होता पण जशी जशी कलेची द्रुष्टी आली तशी समजही आली. कोणत्याही कलाकाराचे आपल्या कलेवर पोटच्या पोरासारखे प्रेम असते.
सचिन अजिबात विजयाच्या वर शतकाला महत्व देतो असे जाणवत नाही. पण कोणी हे लक्षात घेत नाही की मैदानावर असणारा खेळाडु मी संघाला जिंकुन देइन असा प्लॅन करुन खेळु शकत नाही, त्याचा काहीतरी रोल असतो, तुम्ही विरुद्ध संघाने ३२५ धावा केल्या म्हणुन शाहिद अफ्रिदीसारखे बॅटिंग करायला जाल तर शहिद होण्याचेच चान्सेस जास्त आहेत. याऐवजी जर इतक्या चेंडुत मी २५ करीन इतक्या वेळात मी ५० करीन. या बोलरला ताजा असताना जपुन खेळिन आणि दमल्यावर मारीन. या बोलरला टार्गेट करीन ही लक्षे मैदानावर जास्त साध्य आणि योग्य असतात. कपिल ची खेळी अद्वितीय आणि असे खेळाडु मॅच जिंकतात. पण अफ्रिकेत ३ मॅच सिरीजमध्ये पहिली मॅच सचिनने लांबविली पण ड्रॉ करायला त्याला इतरांची साथ मिळाली नाही तर तिसरी फक्त त्यानेच हरण्यापासुन वाचविली हे विसरतात आणि फक्त लक्ष्मण्लाच लक्षात ठेवतात.
५ त्याचप्रमाणे सचिन म्हणजे देव आणि त्याच्याविरूद्ध काही ऐकूनच घ्यायचं नाही.. ही असली टवाळकी पण बरी नव्हे.
>> बरेच (सर्व नाही तरी बरेच) इतरप्रांतीय सचिन वर जळतात त्याची ती प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया नष्ट करण्याआधि क्रिया तर थांबवा. गुंडापा विश्वनाथ निवडसमितीवर असताना मुंबै संघ एका मागोमाग एक रणजी सामने जिंकत होता आणि आपल्या संघात सर्व गोलंदाज कर्नाटकाचे होते तेव्हा का नाही योग्य अयोग्यतेचा किस काढला गेला आणि तेव्हा एखादा कन्नड असा तावातावाने कुरुविलाच्या बाजुने भांडला असता का? तो संघात येइपर्यंत म्हातारा झाला, मुजुमदार, दिघे यांआ नीट संधी कधी मिळालीच नाही.
वेंकटेश प्रसादच्या स्लो बॉलचे (जरी तो सगळेच बॉल स्लो टाकायचा) जेव्हा प्रसन्ना तोंड फाटेपर्यंत कौतुक करु शकतो तर खराखुरा असामान्य खेळाडु मिळाला असताना आपण का मागे रहावे?
कपिलच्या निर्भयतेचे कौतुक करतात ना? अशी निर्भय व्रुत्ती जोजवायला स्वतःबद्दल आणि आपल्या माणसांबद्दल सार्थ आत्मविश्वास आणि प्रेम पाहिजे. फार पुर्वी मला असे वाटायचे की लोकशाहीत प्रांतियता नको, पण हळु हळु कळले की प्रांतियता आणि लोकशाही हे अविभाज्य आहेत. जर प्रत्येक प्रांतातील माणसाने आपल्या प्रांतातील लोकांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला नाही तर लोकशाहीची ठोकशाही होइल.
nilima_v , अतिशय योग्य मत
nilima_v , अतिशय योग्य मत मांडल आहे. सहमत. आपण का कौतुक करायचे नाही?
सचिनचे दुर्दैव असे की तो इतक्या धावा काढून देतो त्याचे कौतुक करायचे सोडून त्याने धावा काढल्या की आपण हारतो, किंवा तो शतकांसाठी खेळतो असे भाबडे (मुर्ख) पणाने म्हणत राहायचे अन आपले हे फालतू मत इतरांवर लादत राहायचे.
सचिन नेहमी छोटे छोटे टारगेट ठेवतो, उदा १० धावा, १५ धावा असे. तो कधीही आलोच आहे तर ५० ओव्हर खेळून्च जातो कसा असे म्हणून प्लेड प्लेड करत बसत नाही. सचिन असे करतो असे अनेक नवीन खेळाडू त्यांचा मुलाखतींमध्ये सांगतात. आणि त्यामुळे धावांचे टेन्शन येत नाही असेही म्हणतात. कालही (ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये) त्याचे ५३ रन तितकेच महत्वाचे होते जेवढे युवीचे ५७. तो अश्या धावा काढून पुढच्या लोकांना आणखी पुढे जायला प्लॅटफॉर्म तयार करून देतो हेच मुळी ह्या रड्या लोकांना मान्य नाही त्यामुळे सचिनचे शतक म्हणजे आपली हार, तो खेळला की आपण हारणार असे बोलत फिरत असतात. असो. देव त्यांना दुधाला दुध म्हणण्याची शक्ती देवो.
छान लेख! निलिमा आणि केदार,
छान लेख!
निलिमा आणि केदार, दोघांनीही उत्तम मुद्दे मांडलेत
ह्या सगळ्यात मला सचिनची भुमिका नेहमीच आवडते.. ज्याला जे बोलायचं, टीका करायची आहे अवश्य करा.. माझी बॅट आणि फक्त बॅटच ह्या सगळ्याला उत्तर द्यायला समर्थ आहे!!! हॅट्स ऑफ सच्चू!!!
बरेच (सर्व नाही तरी बरेच)
बरेच (सर्व नाही तरी बरेच) इतरप्रांतीय सचिन वर जळतात त्याची ती प्रतिक्रिया आहे.>> एक भारतिय म्हणुन ह्या मताचा त्रिवार नीषेध. मी स्वत: दिल्लीत रहातो इथे तर सगळे त्याची स्तुतीच करतात. मला तर आता असे वाटायला लागले आहे की महाराष्ट्रीयांना superiority complex प्रचंड आहे. असो तो ह्या बाफ चा विषय नाही.
लेख छानच, क्रिकेट हा नुसता
लेख छानच,
क्रिकेट हा नुसता खेळ नसुन तो एक अभ्यासाचाही विषय आहे हे माझ मत पक्क झाल.
काही काही प्रतिक्रिया वाचुन मनोरंजन झाले. टिकाकार आता सचिन सोडुन सुनील गावस्कर वर आले.
सुनील किती एक दिवसीय सामने खेळला कुणास माहीत ? पाच दिवसीय सामने अनिर्णीत होण्यासाठीच असतात हे आकडेवारीवरुन बहुदा सिध्द होईल. तरी पण सुनील गावस्कर ला त्यात ओढायचे म्हणजे तु नाही तुझ्या बापाने या ओढ्याचे पाणी पिले असेल यातला प्रकार.
असो सचिनचे आणि आपले अभिनंदन.
आज सचिनचे शतक आणि भारताचा पकिस्तान विरुध्द विजय दोन्हीही होवो.
नीलिमा माझी पोस्ट पुन्हा वाचा
नीलिमा
माझी पोस्ट पुन्हा वाचा आणि मगच मत द्या. भाटगिरी आणि कौतुक यात फरक आहे असम मी मानतो. इथं गैरलागू मुद्दे मांडू नका. ब्रॅडमन वगैरे इथं आणण्याचं कारण नाही. त्या काळी खेळात पैसा नव्हता आणि मॅचेसही कमी होत. म्हणजेच विक्रमाला संधीही कमी असायची असा कीस आम्हालाही काढता येऊ शकतो. कीस काढण्यात मला रस नाही..लक्षात ठेवा ब्रॅडमननी झळकावलेली शतकं ही फक्त वेगवान खेळपट्टीवर आणि हिंसक गोलंदाजीसमोर झालेली आहेत. आजचे बॉडीलाईनचे नियम हे ब्रॅडमनला टारगेट केल्यानंतर आणि खूप टीका झाल्यानंतर आलेले आहेत. तसंच ब्रॅडमन फक्त ५६ सामने खेळला आणि त्यात त्याने २९ शतकं काढलेली आहेत हे ही लक्षात ठेवा. त्या काळी इतर संघ तेस्ट क्रिकेटच्या दर्जाचे नव्हतेच. तेव्हा अयोग्य मुद्दे उपस्थित करू नका. हे सगळे खेळाडु विक्रमाच्या उंबरठ्यावर असताना निवृत्त होतात. जगात अपवाद फक्त भारतिय खेळाडुंचा आहे. त्यांना एखाद्या सामन्यात विश्रांती घेऊन ताजेतवाने रहायला कुणी बंदी केलीये का ? सध्या भारतीय क्रिकेटमधे प्रचंड पैसा आहे. तो त्यांना मिलायला हवा. हा पैसा मिळतोय याचं कारण सुनील गावस्कर आहे. बोर्डाला मिळणा-या पैशात खेळाडुंचा वाटा आहे हे त्यानं पटवून दिलं होतं. त्याआधी अगदी कमी मानधनावर खेळाडू खेळत. इतर वेळी त्यांना पोतापाण्यासाठी नोकरी किंवा इतर धंदे करावे लागत. १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मात्र भारतीय क्रिकेटकडे जाहीरातदारांची नजर वळली आणि त्यातला शेअरही सुनीलनेच खेळाडूंना मिळवून दिला. या अर्थकारणावर बोलायचं झालं तर एक लेख कमी पडेल. तेव्हा आता खेळाद्वारे कमाई होत असताना माझ्यासारख्याने चांगल्या खेळाची आणि विजयांची अपेक्षा ठेवली तर काही बिघडतं का ? इथं सचिनवर टीकेचा किंवा जळण्याचा प्रश्न कसा आनि कुठे आला ?माझ्या आधीची पिढीही फुकट खेळना-या लाला अमरनाथ वगैरे मंडळींकडून जिंकण्याची अपेक्षा ठेवत असत. हरले कि शिव्या घालत असत. तेव्हां देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं हा एक मोठा सन्मान होता. देशाचं प्रतिनिधित्व करत असताना प्राधान्य कसाला असायला हवं ? ते करत असताना बायप्रॉडक्टस म्हणून खेळातल्या विक्रमांकडे मी पाहतो. सचिन विक्रमासाठी खेळतो असं मी कुठं म्हटलंय ? उलट असं म्हणणं चुकीचं आहे हेच तर सांगितलंय ना ? कि तुम्हाला पूर्ण वाचवलंच नाही ?
जिथं मी सचिनची बाजू घेतलीये त्याबद्दल तुम्ही सोयीस्कर मौन पाळताय आणि थोडंसं खुट्ट झालं तर चवताळून उठताय.. असल्या सुमार पोस्टला उत्तर देतोय हेच खूप मोठं आहे. इथं तुम्हाला अजिबातच विस्लेषण देखील नको आहे. माझ्या पोस्टमधे नसलेले मुद्दे घेऊन तुम्ही भांडायलाच उठलात कि.. ही भाटगिरीच आहे. कौतुक नव्हे. जमल्यास माझी ती पोस्ट पुन्हा शांतपणे वाचा. नंतर १० मिनिटे स्वस्थ बसा. त्यावर विचार करा मह मी काय म्हणतोय आणि तुम्ही काय बरळताय ते लक्षात येईल..
सचिनची ५० शतकं झाली तेव्हां आणि परवा अठरा हजार धावा झाल्या तेव्हाही.. भारत मॅच जिंकला कि हरला हेच हेडींग देणार नसाल तर ते भाटगिरीत मोडतं. खेळाडूला संघाच्या हारजीत पेक्षा मोठं करायला माझा ठाम विरोध आहे. मग मला राष्ट्रद्रोहॉ ठरवलंत तरीही चालेल. खेळाडूंच्या वैयक्तिक विक्रमाला भारताच्या हारजीत नंतर स्थान असावं असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी पहिल्यापासून आणि खेळाडू कुठलाही असेल तरीही. तेव्हां जळतात वगाइरे शब्दप्रयोग सांभाळून.. तुमच्या क्रिया आणि प्रतिक्रियाच्या हास्यास्पद लॉजिकमधे तर नखाचाही इंटरेस्ट नाही. असल्या मानसिकतेला गावाकडचं उदाहरण दिलं तर माझ्यावर कारवाई होईल. दुसरा विहिरीत उडी ताकतो म्हणून तुम्ही टाकत असाल तर माझा काहीच विरोध नाही.. पन असल्या लोकांना किती सीरियसली घ्यायचं याचं माझं लॉजिक पक्कं आहे.
खेळणारा सचिन आहे, त्याचे भाट नव्हेत. त्या भाटांना सचिनने वेसन घालावी असं माझं म्हणणं आहे. कदाचित सचिन ऐन बहरात असतानाचा त्याचा जो खेळ आम्ही एन्जॉय केला तो आताच्या पिढीने पाहीलाही नसेल. मी जेव्हापासून क्रिकेत पहायला लागलो तेव्हापासून तरी झोकून देऊन खेळणारा सर्वात चांगला खेळाडू हा कप्ल्देवच होता हे मी ठामपणे म्हणेन.. तोच कपिल जेव्हां ४०० बळी डोळ्यासमोर ठेवून शेवटी शेवटि खेळायला लागला तेव्हां तो ही मनातून उतरला हे मी पुन्हा सांगतोय. कपिलच्या जागी सुनील असो, रवी शास्त्री असो किंवा कुणीही... संघाच्या विजयापेक्षा खेळाडू मोठा नाही. बाकि गोंधळ घाला
>>> ४. तसच टीकाकारांनीही सचिन
>>> ४. तसच टीकाकारांनीही सचिन स्वतःसाठी खेळतो वगैरे जे म्हणणं आहे त्याचा पुन्हा एकदा फेरविचार करावा. सुनील गावस्कर तसं नक्कीच करायचा.
या मताशी पूर्णपणे असहमत आहे. असे कोणते आणि किती सामने आहेत ज्यात सुनील फक्त स्वतःसाठीच खेळलेला आहे? सुनील स्वत:साठी न खेळता देशासाठी खेळला असे अनेक डाव आठवतात. १९७९ मध्ये ४ थ्या डावात ४३९ धावांच्या पाठलागाचे अशक्यप्राय आव्हान पेलताना सुनीलने केलेल्या २२१ धावा, १९७६ मध्ये विंडीजच्या तोफखान्याविरूध्द ४०४ धावा करताना सुनीलने केलेले शतक, १९७८ मध्ये पाकड्यांविरूध्द हरलेल्या सामन्यात सुनीलने दोन्ही डावात केलेली शतके . . . हे डाव काय स्वत:साठीच होते का? १९८५ मध्ये शारजातल्या एका सामन्यात भारताचा डाव १२५ मध्ये संपलेला असताना भारताने पाकड्यांचा डाव ८७ धावात संपवला होता. त्यात सुनिलने स्लिपमध्ये ४ अप्रतिम झेल घेतलेले होते. ते स्वत:साठी होते का देशासाठी?
सुनीलने त्याच्या शेवटच्या कसोटी डावात सुध्दा ९६ धावा करून भारताला विजयाच्या जवळ नेले होते. त्या खेळपट्टीवर चेंडू भयानक वळत होता. त्याने पाय रोवून ९६ धावा केल्या त्या स्वत:करता का? तो गेल्यावर उरलेले तिघे जण २-३ षटकांतच बाद झाले यावरून त्याच्या डावाचे महत्व लक्षात येते.
मिब्ररा यांच्या सर्व पोस्ट
मिब्ररा यांच्या सर्व पोस्ट अगदी योग्य वाटल्या. मला पण द. अफ्रिके विरुद्ध भारताने सामना हरण्याच्या नामुष्की पेक्षा सचिनच्या ५० व्या शतकाचे (त्याच सामन्यात) कौतुक पचायला जड जाते. सचिनच्याच शब्दात शतकांची ५० केवळ संख्या आहे, त्याच्या लेखी संख्येला जास्त महत्व नाही पण चहाते....
सुनिल आणि सचिन यांची तुलना करता येत नाही, दोघांचाही कालखंड वेगळा होता. दोघेही केवळ संघासाठी खेळले... सुनील गावस्कर यांनी मल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, लेन पाक्सो, डेनीस लिली, जेफ थॉम्सन, इम्रान खान यांच्या सारख्या भेदक तोफांचा सामना डोक्यावर कुठलेही शिरस्त्राण न वापरता यशस्वी पणे केलेला आहे. स्कल कॅप जरुर वापरायचे पण ते म्हणजे शिरस्त्राण नव्हे.
आज शतक नाही.. म्हणजे ?
आज शतक नाही.. म्हणजे ?
आज भारत जिंकणार... ! सामना
आज भारत जिंकणार... ! सामना चांगलाच चिरशीचा होत आहे.
Pages