गानभुली - आज अंतर्यामी भेटे

Submitted by दाद on 24 March, 2011 - 17:43

गाण्यांचं कसं... ती भेटतात... कधी हलकीच, कधी कडकडून...
हे गाणं फार पूर्वी भेटल्याचं आठवतय मला... म्हणजे उराउरी नाही. आपण रस्त्याच्या ह्या बाजूला आणि ते गाणं त्या बाजूला असं... नुसतीच नजरभेटीने घेतलेली दखल, तर कधी हात हलवून दाखवलेलं अगत्यं... पण इतकच हं. पण त्यानंतर हरवलं ते हरवलच.

तो काळ माझ्या शाळेतला, म्हणजे खूप जुना. शाळेत जायची, दुपारची वेळ झालीये....
दप्तर भरण्याची घाई. जो काय चाललाय तो धंदा कितीही मस्तं असला तरी, बंद करून आधी दप्तर भरायला हवं. दप्तर भरेपर्यंत, कूकर उघडून वरणाचा दरवळ, आणि आईची हाक एकदमच येतात. अन त्यापाठोपाठ येतो अकराच्या गाण्यांचा ’कामगार सभेचा’ गाव.....

रेडिओ थोऽऽडा मोठा करीत पानावर येऊन बसायचं. पण मनाचं बोट धरून गाण्यांनी कधीच त्या गाण्यांच्या गावी नेलेलं असायचं नाही? अशाच काही सफरीत भेटलेलं हे गाणं.
आजकालचं माहीत नाही पण त्या काळी, गाणं कुणी गायलय, चाल कुणी दिलीये आणि कोण गातय, ते सगळं सांगितलं जायचं. पण ती एक निव्वळ ’माहिती’ असल्याने, कान देऊन ऐकण्यासारखं त्यात काही आहे, असं वाटण्याचे दिवसही नव्हते ते. उलट त्या वेळेत ’अजून पोळी?’ सारख्या प्रश्नाला उत्तर किंवा ’तूपाची लोटी?’ सारखा प्रश्नं विचारायची सोय असायची.

आज विचार करतेय की, असं काय आहे ह्या गाण्यात?
काहीतरी जोरदार झिंच्याक झिंच्याक रिदम, गाणार्‍याचा किंवा गाणारीचा सणसणीत आवाज, पाश्चात्य संगीतावर आधारीत चाल, वगैरे वगैरेत वाहून जाण्याचं वय. शब्दं-बिब्दं म्हणायला सोप्पे असावेत इतकीही अपेक्षा नसायची कारण आपल्याला सगळीच गाणी ’ला ला ला ला’ करत गाता यायची, चाल ’टा ट्ट ड्डा ड्डा डाऽऽऽ’ वगैरेत छानच जमते ह्याची खात्री होती. भेंड्या-बिंड्यात संपूर्ण गाणं म्हणायचा आग्रह करणारी माणसं एकतर खूप मोठी असतात किंवा नुकतीच लहानपण सोडून मोठी व्हायच्या गतीला आलेली असतात किंवा मग नक्कीच ’जाम बोअर’ तरी असतात... असं तेव्हा माझ्या वयाच्या बहुतेकांचं मत.

मग? असं काय आहे ह्या गाण्यात, की त्या वयातही कानांनी वेचलय आणि एक छानसा ओळखीचा चेहरा म्हणून का होईना पण आठवणींच्या कुपीत जपून ठेवलय?
त्याला शब्द आत्ता सुचला- वेधक! हे गाणं विलक्षण वेधक आहे. त्या वयातल्या त्या तसल्या मॅड चाळण्यांतूनही झिरपलय मनात.

मधल्या काळात मोठी झाले. गाणी ऐकण्याचा प्रवास, रेडिओव्यतिरिक्तही गावं घेऊ लागला. ते अकराच्या गाण्यांचं गाव मनातच राहिलं अन त्याबरोबर अगदी कधी कधीच का होईना पण दिसणारं हे एक गाणं, कुठेतरी गुल झाल्यासारखं झालं. गप्पांच्या, मित्र-मैत्रिणींच्या मैफिलीत अनेक जुन्या-नव्या गाण्यांची उजळणी व्हायची. कुठेतरी हे गाणं बुजर्‍या मुलीसारखं दरवाज्याआडून, कुंपणाच्या फाटकाशी ओठंगून असं आमच्या मैफिलींच्या अंगणात डोकावत राहिलं. पण इतर गाण्यांसारखं हातात हात घालून बागडलं नाही.

परवा श्रीनिवास खळ्यांच्या गाण्यांच्या सीडीजचा एक संच हाती आला. हपापून विकत घेतला. सगळीच्या सगळी गाणी एमपी३ प्लेयरवर घेतली... ’आजची’ बनून ’कालची’ गाणी ऐकत बाजारात निघाले. तशीही मी जरा ध्यानच दिसत्ये.. पण गाणं ऐकताना मी म्हणजे एक ’भान विसरलेलं ध्यान’, म्हणजे अगदीच काय म्हणतात ते.... कारण माणसं थबकुन, वळून बघत होती... असो.

तितक्यात भेटलं बेटं! प्लेयरच्या रॅंडम मोडमध्ये मध्येच कुठेतरी. माझं आठवड्याचं सामान घेऊन गाडीकडे जाताना.... म्हणजे अगदिच रॅंडम. हे म्हणजे कसं? तर एका एस्कलेटरवरून आपण खाली जाताना पलिकडल्या वर जाणार्‍या एस्कलेटरवर जाताना दिसावं ना, तसं दिसलं ते गाणं.... म्हणजे परत एकदा लांबूनच. भरलेली सामानची ट्रॉली ढकलताना असली गाणीच काय पण अगदी हातात वीणा-बीणा घेऊन खुद्दं नारद मुनी दिसले आणि त्यांनी हात हलवला तरी ओशाळे होऊन मान हलवत ती जडशीळ तिडबिड्या चाकांची ट्रॉलीच ढकलणार आपण.... अशी अवस्था, तिथे गाण्यांचं काय घेऊन बसलेय!

रात्री सारं आवरून झोपले.
http://www.esnips.com/doc/8efe895f-f2cd-46aa-84bd-ba19e3c7627d/Aaj-Aanta...

गडद्द झोपेची वेळा उलटल्यावर माझ्याही आधी हे गाणं जागं झालं असावं.... इतक्या मोठ्याने गाणं चालू असताना झोपणं शक्यच नाही... डोक्यात चालू असलं म्हणून काय झालं? बाल्कनीत येऊन उभी राहिले...... गाणं, मी सोडून इतर कुणाच्याच डोक्यात चालू नसल्याने बाकी सगळे सगळे झोपले होते.

दुधाच्या धारांनी चांदणं शिंपडलं होतं. अजून थोडा हात पुढे केला तर चांदण्याच्या पागोळ्यात भिजेल असं वाटलं. शांततेला आपल्या मनाचा आवाज असतो म्हणतात ते अगदी सत्य आहे. कारण ते गाणं सोडल्यास अगदी रातकिड्यांचाही आवाज नाही अशी सुरेल शांतता होती!

तेव्हा... तेव्हा भेटलं ते गाणं... अगदी कडकडून. वाटलं की अनेकानेक वर्षांचं ओळखीचं, जुन्या शेजारातलं कुणी... अनोळखी देशात भेटलं.
ते तसं, त्या अकराच्या गाण्यांच्या गावात, चुकत-माकत, कुठल्यातरी वळणावर वळताना... असं नाही.
तर भागल्या डोळ्यांनी आणि शिणल्या पायांनी न संपणार्‍या वाटचालीत एखाद्या देऊळाची घुमटी दिसली की त्या गाभार्‍यासमोर उभं राहून घेतलेल्या, देवाच्या धूळ-भेटी सारखं.
किती सहज तरी ओढाळ, बरचसं निर्हेतुक तरी हवहवसं अन असलच सहेतुक तरी निर्मोही!

अगदी जीवा-भावाचं असं कुणी अवचित भेटलं की कसं आजूबाजूचं जग रहातच नाही, ना....तस्सं.
शब्द-सूर सारं एक-आकार होऊन भेटू आलं. एक निखळ ’खळ्यांचं’ गाणं. हार्मोनियम, व्हायोलीन, तबला असल्या साध्या सोज्वळ पेहरावात सजून आलेले, मंगेश पाडगावकरांचे, उषा मंगेशकरांच्या आवाजाने प्राण फुंकले घरंदाज, शालीन शब्दं.

पदराचा आडोसा धरून एखादी कुलीन गृहिणी हाती मिणमिणती पणती घेऊन अंधारल्या पडवीत केवळ पाऊल टाकते तेव्हा नुस्ती ती जागा प्रकाशत नाही... तर तिथल्या प्रत्येकाच्या मनाचा प्रत्येक अंधारला कोनाडा उजळते.
हे फक्तं त्या दिवलीचं सामर्थ्य नाही. ती पणती धरले हात, ज्योतीची लवलव जपणारा पदर, ज्योतीवर एकलक्ष्य ठेवून उचललेलं एक एक पाऊल.... हे सारं सारं त्याला कारणीभूत आहे. तसच काहीसं ह्या गाण्याचं आहे.

आजं अंतर्यामी भेटे
कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो॥ आज...

फुलाचे केसरा घडे चांदण्याचा संग
आज अवघे अंतरंग ओसंडले हो ॥ आज....

मिटूनही डोळे, दिसू लागले आकाश
आज सारा अवकाश देऊळ झाला हो ॥ अंतर्यामी....

काही न बोलता आता सांगता ये सारे
आतली प्रकाशासी दारे उघडली हो ॥ अंतर्यामी....

मध माखले शब्द!
कान्हो-वनमाळीची भेट अशी इथे तिथे... पाणोठ्यावर, देउळी-रावळी नाही. तर भेट.... थेट अंतर्यामी आहे.
एका सुक्षणी, मनाच्या आंगणी, कर कटी घेऊन उभ्या ठाकल्या नीळ्या-सावळ्या नाथाचं हे अवचित आगमन आहे...

चांदण्याचा संग फुलांच्या केसरांना लाभतो तेव्हा असतो तो... गंधाला झळाळ लाभलेल्याचा सोहळा! गंधाला रंगाचा संग नाही हं... चांदण्याच्या शीतळ झिलमिल आभेचा संग!
त्याच्या गंध-आभेने मन नुसतं तृप्त होऊन... नव्हे नव्हे तर.... मन ओतप्रोत भरून उतू जाऊ लागतं, ओसंडून वाहू लागतं...

डोळे मिटून आतल्या आत पुंजाळलेल्या दृष्टीला त्याच निळ्यानाथाचं रूप आकाशही व्यापून उरलेलं दिसू लागतं... त्याच्या प्रीतीचा साक्षात्कार झाल्या मनाची दारे-कवाडे आता वाणीची बांधिल नाहीत...
"येथे भक्तिचा सूर्य उदेजला हो..." हे उद-घोषत स्वयंमेव त्याचीच आभा मनाचा कोपरान कोपरा उजळत बाहेर पडते.
हे गाणं निव्वळ सुरांचा प्रवाह नाही, ऐकणार्‍याच्या मनाचा हरेक अंधारला कोपरा उजळणारी ही एक दिवली... ’त्याच्या’च आभेचा हाही एक अविष्कार!
मी अन ते गाणं... असे तस्सेच तिथे किती काळ बसून होतो माहीत नाही. परत न हरवण्याच्या शपथा घेतल्याचं स्मरतं, मात्र.

*****************************************

थोडकं गाण्याबद्दल -
उत्कटता हा असा भाव आहे की त्याला शब्दात बांधणं म्हणजे वार्‍याला पदराच्या गाठीला बांधण्यासारखं. तरीही जेव्हा शब्दा-शब्दात तो असा जाणवतो आणि स्वरा-स्वरात असा व्यक्त होतो तेव्हा ती एक ’अजोड’ कलाकृती बनून सामोरी येते.

गाणं संपूर्णं जरूर ऐकून बघा. खळ्यांची ही चाल गाताना, उषाताईंनी नक्की श्वास कुठे कुठे घेतलाय तेच कळत नाही.
’आज’ ह्या शब्दाची ’आजं’ (’ज’ पूर्ण) आणि ’आऽऽज’ अस वेगवेगळा उच्च्चार करून वेगळी गंमत आणलीये. अर्थात त्याला तशी स्वरांची साथ आहे. त्या ’आज’ला असा काही स्वरसाज आहे आणि उषाताईनी तो असा काही गायलाय की माझ्यामते... डोळ्यातून सहज ओघळणार्‍या आनंदाश्रू सारखा तो ’आssज’ ओघळतो...
श्रीनिवास खळ्यांच्या चाली आधी इथे-तिथे गाऊन मग एक दिवस खुद्दं त्यांच्याकडेच त्या चाली शिकण्याचं भाग्यं लाभलेल्या एका प्रसिद्धं गायिकेनं व्यक्तं केलेलं मत - त्यांची चाल त्यांच्याकडून शिकल्यावर हे लक्षात आलं की आधी किती चुकीचं गात होतो आपण.

खळ्यांच्या चालीत र्‍हस्व-दीर्घ, संभाळत, श्वासाचा योग्यं तो उपयोग करणं, अन हे सगळं तालात करणं ही तारेवरली कसरत असते.
"मिटूनही डोळे दिसू लागले आकाश"!! मी मी म्हणणार्‍या गाणार्‍यांची सुरात-तालात फेफे उडेल अशी रचना आहे सुरांची, इथे. नुस्ती तालावर अन सुरावर हुकुमत असून उपयोग नाही. श्वासाचा नेमका उपयोग न झाल्यास कुठेतरी शब्दं, लकेर तुटून ह्या एकसंध रेशीम वस्त्राची दशा लोंबल्यासारखं होईल.

चाल ऐका. अन ’आssज’, ’अंतर्यामी’, ’कान्होवनमाळी’ हे शब्दं किती काळजीपूर्वक उच्चारलेत.... नव्हे "ठेवलेत" ते ऐका. "उच्चार" व्याकरणदृष्ट्या निर्दोष वगैरे पुरतो. शब्दांचं "ठेवणं"... सूर-तालाच्या कोंदणात ठेवलेल्या हिर्‍यासारखं हवं. त्यांची जागा जssरा हलल्यास, गाण्याचं हे आखीव रेखीव घडीव शिल्पं ढासळेल.

तबल्याचा नेहमीचा भजनी ठेकाच. पण तबला "ऐकणार्‍यांनी" ध्यान देऊन ऐका. एक जास्तीचा ठोका आहे नेहमीच्या "धींsधा धींधीं धा" मधे.
ठेका, "धींधिगदा धींधीं धा"... असा वाजतोय. किती छोटी गोष्टं पण केव्हढी सुरेख कुसर... त्या एका हरकतीने, मला भजनीच्या ह्या ठेक्याचं बासुंदीचं एक भांडं आहे आणि एकदम त्यात डुबकी मारल्यासारखं काहीतरी (मॅडकॅपच) वाटतं.

एकदा हरवून मग कडकडून भेटू आलेल्या गाण्याचं किमान इतकं कोड पुरवल्याविना राहवलं नाही... हे गाणं आहेच तसं गुणी.
समाप्तं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कूकर उघडून वरणाचा दरवळ, आणि आईची हाक एकदमच येतात. अन त्यापाठोपाठ येतो अकराच्या गाण्यांचा ’कामगार सभेचा’ गाव.....>>>
माझं कॉलज पूर्ण होईपर्यंत मला दर सुट्टीत हा गाव भेटत असे. अगदी सेम..कूकर उघडून वरणाचा दरवळ..

मी हे गाणं आत्ता डोळे मिटून ऐकलं...पुढे जे काही अनुभवलं ते सांगायला शब्द नाहीत.

वा! दाद, तुम्ही आम्हाला गाणं ऐकायची जी 'नजर' देत आहात त्याबद्दल आभार मानावे तितके थोडेच. प्लीजच लिहित रहा - भरपूर. हा अमूल्य ठेवा आहे.

हे गाणं मी कधीच ऐकलेलं नाहिये Sad पण तुमच्या लेखाने अगदी लहान असताना संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर "सांजधारा" का काहीतरी असाच एक प्रोगाम लागायचा, त्यातली अनेक गाणी आठवून गेली. काही नंतर कुठेकुठे सीडीजवर अशीच सापडली, काही कायमची हरवली. Sad आता तो प्रोग्राम पण आहे की नाही कोणास ठाऊक. मस्तच लेख!

सुंदर लिहिलंय.

मी हल्लीच्या हल्लीच हे गाणे बरेचदा ऐकलेय. अतिशय सुंदर गाणे.. सगळेच लाजवाब आहे गाण्यातले, तुमच्या लेखनासारखेच.. Happy

गाणं घरी जाऊन ऐकेन. इथे ऑफिसमध्ये लिंक ओपन नाही होणार.. Sad

एवढ्या अलगद काळजात इतक्या आत आत जपुन ठेवलेल्या तारेला कसं झंकारता तुम्ही? Hats off.. Happy

नेहमीप्रमाणेच छान.

कामगार सभा, वनिता मंडळ यांच्याशी माझ्याही शाळेच्या आठवणी निगडीत आहेत. आणि मग संगीत सरिता बरोबर कॉलेजच्या.

त्या काळातली माझीही अशीच गाणी. काहि मिळाली काहि हरवली.
दे मला गे चंद्रिके, जिवलगा राहिले रे, देश हा देव असे माझा, रुणुझुणूत्या पाखरा, मळ्याच्या मळ्यामंदि.. हि अशीच काही.

हरवल्या पैकि एक म्हणजे, आशा आणि बालकराम चे, आले रे आले रंगवाले... हे आता हरवलंच कुठेतरी.
होळीलाही नाही वाजत कुठे.

दाद,

आजं अंतर्यामी भेटे
कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो॥ आज...

हे गीत कुणाच ? का हा पारंपारिक अभंग आहे ?

नितीनचंद्र लेख वाचला नाहीत का? लिहिलंय की पाडगावकरांचं ते.

दाद, कामगार सभा आणि शाळेत जायच्या आधीच्या जेवणाचा प्रसंग सेम आमच्याकडे.
गाण्याबद्दल पण खूप सुंदर लिहिलंत.
माझंही आवडतं. हे ऐकत असताना एखाद्या थंडगार , काळोख्या गुंफेत उभे आहोत तरी पण छान उबदार प्रकाशमय वाटतेय असं फील येतं मला.

काही ना बोलता आता सांगता ये सारे...
फुलांचे केसरा ....
अगदी काळजाला स्पर्श करणारे शब्द!

सुरेख!!! (नेहमीप्रमाणे :-))

मध माखले शब्द!
कान्हो-वनमाळीची भेट अशी इथे तिथे... पाणोठ्यावर, देउळी-रावळी नाही. तर भेट.... थेट अंतर्यामी आहे.
एका सुक्षणी, मनाच्या आंगणी, कर कटी घेऊन उभ्या ठाकल्या नीळ्या-सावळ्या नाथाचं हे अवचित आगमन आहे...>>>>>सुंदरच Happy

दाद, भरपूर वेळा ऐकलं आहे हे गाणं पण तुम्ही लिहिलं तसा फिल कधी आलाच नाही, पण आता हे सारं वाचताना (आणि मनातल्या मनात गाणं गुणगुणताना) जाणवतंय सारं. Happy

मनापासुन धन्यवाद.

मला तुमच्याकडुन आशा भोसले यांचे "दिन तैसी रजनी" या गाण्याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल. Happy

केवळ अप्रतिम ! गाणं आणि तुझे शब्द पण. प्रथमच ऐकलं गाणं. सुरेख वाटलं.
मला तुझा गानभुली हा शब्द तर भारीच भावलाय दाद.
मी गाणं सवार होतं असं म्हणायची. कारण मला गाणी पछाडतात बर्याचदा.
माझ्या ब्लोग मध्ये मी काही प्रमाणात मांडायचा प्रयत्न केला होता. लिंक देतेय खाली.

http://manachiyegunti.blogspot.com/2007/05/blog-post.html

"समाप्त"????

हा लेख? की लेखमाला?

मला अजुन बरीच गाणी.. हरीप्रसांदावरचा एखादा लेख असे बरेच काही हवयं.. (हट्टी बाहुली)

>>>> कामगार सभा, वनिता मंडळ यांच्याशी माझ्याही शाळेच्या आठवणी निगडीत आहेत. आणि मग संगीत सरिता बरोबर कॉलेजच्या. >>>> अगदी अगदी दिनेशदा.

असं अजून एक गाणं - 'वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन ...' हे लागलं की मन थेट बालपणात जातं. खरंच भर दुपारची वेळ, बॅकग्राउंडला हे गाणं, घरात कामवाली घासत असलेल्या भांड्यांचा आवाज आणि दूरवरून 'भांड्डीयेSSSSS' ची लकेर असे सगळे नाद एकावेळी कोसळतात.

फार फार सुंदर लिहिलं आहे... Happy
अभिनंदन...

प्रभातवंदन, चित्रलोक, कामगार सभा, गीतगंगा, मनचाहे गीत, जयमाला, छायागीत, बेला के फूल हे सगळे कार्यक्रम म्हणजे माझ्याही लहानपणाचा अविभाज्य भाग आहेत... कित्येक वर्षे टीव्ही नसताना आकाशवाणीने 'ऐकायची' सवय लावली...

आज त्यातला काही भाग पुन्हा recap झाला...

(BTW, समाप्त म्हणजे केवळ लेख समाप्त असंच ना? लेखमाला संपली नाही, बरोब्बर? :))

ओ हो हो हो हो.....गाणं व लेख दोन्ही अगदी अमृतात न्हाऊ घालतात.
कवी, संगीतकार, गायिका व लेखिका सर्वांनाच साष्टांग प्रणिपात....

तुमचे सर्वच लेख एकाचढ एक आहेत! तुमची संगितातली मिराशी त्यातून जाणवते. सर्वच लेखन वेगळ्याच उंचीवरचं आहे. वाचल्यानंतर मिळणारा आनंद शब्दांत व्यक्तच करता येणार नाही. पुढ्च्या लेखांची वाट पहात आहे.

तुमचे सर्वच लेख एकाचढ एक आहेत! तुमची संगितातली मिराशी त्यातून जाणवते. सर्वच लेखन वेगळ्याच उंचीवरचं आहे. वाचल्यानंतर मिळणारा आनंद शब्दांत व्यक्तच करता येणार नाही.>>>>शांकली यांना अनुमोदन. Happy

सुंदर

अरे... आभारी आहे सगळ्यांची.
जायले, अजून येतील ना, लेख. समाप्तं ह्या लेखासाठीच.
शांकली, (ह्या नावाचा अर्थं काय हो? उच्चारताना छान वाटतय नाव)
<<तुमची संगितातली मिराशी त्यातून जाणवते>>
नाही, नाही. प्लीज... मिराशी नाही. काही मोजकेच राग सोडल्यास, मला रागही ओळखता येत नाहीत.
थोडं निरखून बघितल्यास नेहमी दिसणार्‍या फुलावरल्या रंगांच्या छटा, पाकळ्यांची दुमड, केसर... अधिक तीव्रतेनं, गहिरं दिसायला लागतं. तसच आहे गाण्याचं. मला किंचित अधिक गहिरी पातळी ऐकू येते आणि तो आनंद इतका वेड लावणारा आही की, इतरांनाही तो मिळावा, ह्यासाठी ही धडपड... इतकच. मी कानसेन अधिक आहे, ("तानसेन" मुळीच नाही) Happy

पहिल्यांदाच ऐकतोय हे गाणं.

<<<हे ऐकत असताना एखाद्या थंडगार , काळोख्या गुंफेत उभे आहोत तरी पण छान उबदार प्रकाशमय वाटतेय असं फील येतं मला.>>> अगदी असंच वाटलं. वेगळाच अनूभव, थँक्स दाद!

कित्ती वेळा हे गाणं ऐकलं तरी समाधानच होत नाहीये..हा लेख वाचल्यापासून मी व अंजू दररोज किमान एकदातरी हे गाणं ऐकतोच.
किती धन्यवाद द्यावे तुला - इतके छान गाणे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल व ते ही असा अर्थ नेमका उलगडून दाखवल्याबद्दल - कसा तर - तळहातावरी आवळा ठेवावा तस्सा !

दाद, नेहमीप्रमाणेच मस्त लेख.

प्रभातवंदन, चित्रलोक, कामगार सभा, गीतगंगा, मनचाहे गीत, जयमाला, छायागीत, बेला के फूल हे सगळे कार्यक्रम म्हणजे माझ्याही लहानपणाचा अविभाज्य भाग आहेत... <<<<<<<<अगदी Happy

'बेला के फूल' कार्यक्रम ऐकल्याशिवाय दिवस पुर्णच व्हायचा नाही. Happy

बस्स! आता आणखी काहीही वाचायची इच्छा नाही. या गाण्याची भेट घालुन दिल्याबद्दल तुला अशीच आणखी खूप खूप सुंदर गाणी हव्वी तेव्हा ऐकायला मिळोत. मग ती गाणी पण तू 'गानभुलीत' लिही. Happy

दाद तुला कल्पना नसेल कदाचित पण माझ्यासारख्या गाण्यातलं काहीच न कळता गाण नुसतच आवडणार्‍यांना तू नवी दृष्टी देतेयेस. खूप खूप ऐक आणि आमच्यापर्यंत पोहोचव. प्लीजच.

काहो त्रास देता मनाला?
कुठेकुठे नेलंत ते मनाला ?
सकाळचे अभंग्,भावगीते,कामगार सभा,वनिता मंडळ्,संध्याकाळी सुंद्री वादन रात्री नभोनाट्य व्वा व्वा गेले ते दिन
नॉस्ट्लजिक होते मन

सुरेख लिखाण. लिहित रहा

Pages