विश्वामित्रांची तपश्चर्या
१६ जुनचा तो दिवस आठवला की मनात नुसती कालवाकालव होते. आपण मोठया असुनही असे कसे वागलो याची खंत मनाला लागते. तो प्रसंग अजुनही जसाच्या तसा आठवतो. ’तो’ माझ्या अगदी जवळच्या रक्ताच्या नात्यातला. गेली पाच वर्षे डोंबिवलीत आला होता बदली होऊन, बॅंक फ़ोर्टला रहायला डोंबिवलीत. त्याचा मुलगा इथेच इंजिनियर झाला, मुलीने दहावीची परिक्षा दिली होती, रिझल्टही जवळ आला होता. आता दुस-या ठिकाणी बदली झाली होती, दोन दिवस आधीच जेवणाचा कार्यक्रम करुन त्याला शर्ट, सगळ्यांना छोटया भेटवस्तु देऊन निरोपाचा तो कातर क्षणही साजरा केला होता. आज तो आला होता निघायच्या अगोदरच भेटायला!!
मी पुजा करत होते, पटकन उठले, म्हटल याच्याशी थोडया गप्पा मारुया. डोंबिवलीला नावं ठेवणे त्याची नेहेमीची, जुनी सवय होती. त्याच्या मुलीच्या शाळेतल्या अॅडमिशनपासुन ते डोंबिवलीत घर घेउन देण्यापर्यंत ह्यांनी मदत केली होती. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवण हा त्याचा स्वभाव होता.....शाळा कशी चांगली नाही, घर कसं वाईट आहे. त्याच्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे तो बोलत होता. डोंबिवली शहर कसं वाईट आहे याच वर्णन सुरु होतं, मी शांत सुरात त्याला समजावत होते.........अरे, शहराच काय, चांगल्या वाईट गोष्टी असतातच तिथे, पण आपण जिथे रहातो त्या शहराने काहीतरी दिलेलच असतं आपल्याला....म्हणुनच देणेकरी असतो आपण त्या शहराचे.....आता बघ तुझा मुलगा इंजिनियर झाला, मुलगी पण दहावी होईल......ह्या सगळ्या चांगल्याच गोष्टी ना......ऋणी रहायचं त्या शहराचं. तरीही तो बोलतच होता.....रागावल्यासारखा, काहीबाही, वस्तु कशा चांगल्या मिळत नाही.....शाळा तर अजिबातच चांगली नाही.......माझी सहनशक्ती संपत आली होती, गेल्या पाच वर्षात अनेकवेळा या सगळ्या गोष्टी ऐकुन झाल्या होत्या. गेली तीस वर्षे मी डोंबिवलीत रहात होते. माझी सगळी सुख दु:ख , भावनिक ओलावा या शहराशी जोडला गेला होता, कुणास ठाऊक पण मीही जोरजोरात बोलायला लागले, आमचा निष्फळ वाद विकोपाला जात होता, दोघाचाही आवाज टिपेला पोहोचला होता.......शब्दाने शब्द वाढत होता..........एक क्षणभर....डोळ्यांवर हात ठेऊन तो लहान मुलासारखा रडायला लागला..........भरल्या गळ्याने बोलत सुटला......"अग डोंबिवली आम्हाला सगळ्यांना खुप आवडलीय.....रहावसं वाटतय सगळ्यांना..........पण बदली झाली की बि-हाड उचलुन जावं लागत......बदलीच्या गावी......मनात इच्छा असली तरी नाही राहु शकत आम्ही आवडत्या गावात.......मग त्याला नावं ठेवुन समाधान करुन घ्यायच मनाचं....त्याचं बोलणं ऐकल आणि स्तब्धच झाले. मी त्याच्याजवळ जाऊन पाठीवर हात फिरवण्याचा प्रयत्न केला, माझे हात झिडकारुन तो निघुन गेला, रडत रडत.......!! आजही यासगळ्या गोष्टी आठवल्या की डोळे भरुन येतात आणि सहा महिन्यातल्या घटना मनात तरळायला लागतात.
३१ डिसेंबरला आम्ही अल्जेरियात होतो. पावभाजी आणि आईस्क्रिम असा साधासाच बेत ठेवला होता. संध्याकाळी ’आनंद’ चित्रपटाची सी.डी. बघत होतो. अल्जेरिया भारतीय वेळेच्या तुलनेत साडेचार तास मागे, भारतात सगळ्यांना फोन करायचे म्हणजे साडेसातलाच करायला हवे, सगळ्यांना फोन करत होतो.....प्रथम ह्यांच्या आईला.....मग माझ्या आईला, वहिनी म्हणतो आम्ही सगळी मुलं तिला, माझे भाऊ, ह्यांचे भाऊ....भराभर फोन लावत होतो......एक वेगळाच उत्साह आला होता. नविन वर्षाच स्वागत मनापासुन, उत्साहाने, नविन संकल्पाने, तो संकल्प पार पाडायचाच ही जिद्द मनात बाळगुन करायचं!. ह्यांच्या धाकटया बहिणीला फोन लावला,उत्साहाने शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली आणि तिने पटकन विचारलं "वहिनी, नविन वर्षाचा संकल्प काय केलात?" आणि एक क्षणभर माझ्या तोंडुन उत्तर निघाल......"सगळ्यांशी आईच्या भुमिकेतुन वागायच" फोन ठेवला. नंतर आम्ही पाव-भाजी एन्जॉय केली, आईस्क्रिम खाल्ल. छान गेला वेळ, प्रसंन्नता मनात दाटुन आली होती, झोपायला गेलो,गादीवर पाठ टेकली आणि केलेल्या संकल्पाची आठवण झाली.
"सगळ्यांशी आईच्या भुमिकेतुन वागायच" एकच वाक्य...... पण जरा शांतपणे विचार करायला लागले आणि जाणवलं किती कठिण आहे हा संकल्प!! "आई" म्हणजे विशुद्ध प्रेम, निस्वार्थ सेवा, निराकाराच साकार रुप म्हणजे "आई". ईश्वर सृष्टीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टीची निर्मिती त्याच्या मुलाबाळांसाठी करत असतो, पण तो असतो निराकार. कुणाच्याही, कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तो बांधील नसतो. याउलट आईचं! त्याच्याच सारखा रोल करायचा, पण कुठेतरी थोडासा जरी तोल गेला की तिला उत्तरं द्यावी लागतात, तिच्याच अपत्यांना! म्हणुनच ईश्वरापेक्षाही कठिण असा रोल!!
केलेला संकल्प कठिण आहे याची जाणिव झाली होती. समर्थांचा ’दासबोध’ दोनदा अर्थासकट मनापासुन वाचला होता. तेव्हा जसं बोलले तसं वागण्याचा प्रयत्न करायचाच असा निश्चय केला. तसे आम्ही एप्रिलपर्यंत अल्जेरियातच होतो, त्यामुळे संकल्प पार पाडायला विघ्न येणार नव्हती. इथल जिवन म्हणजे एका अर्थाने एकांतातली साधनाच होती. ह्यांच्या आईला, माझ्या आईला फोन करायचे तब्येतीची विचारपुस करायची, ’आईच्या’ भुमिकेचा पहिला भाग सुरुच होता. खरी परिक्षा होती ती भारतात परतल्यावर, अठ्ठाविस एप्रिलला आम्ही भारतात आलो. सासुबाई धाकटया दिरांकडे पुण्याला होत्या, खर तर तीन दिवसांच्या विमानाच्या प्रवासाने खुप थकवा आला होता, पण त्याचा विचार न करता, पुण्याला निघालो, त्यांना भेटायला. त्यांच्यासाठी खाऊची बॅग भरतांना खुप आनंद होत होता, त्यांना भेट म्हणुन आणलेली प्रवासी बॅग पण बरोबर घेतली. वहीनीला, (माझ्या आईला) बर नव्हतं म्हणुन तिला भेटायला जळगांवला गेले, तीन दिवस तिच्या सहवासात रहातांना काय काय करु असे झाले. औषध आणलीत, साडयांवरचे ब्लाउज शिवुन आणलेत, कपबशा जुन्या झाल्या होत्या त्याही नविन आणल्यात, तिला आंबे आवडतात म्हणुन चांगले दोन डझन हापुसचे आंबे घेउन गेले होते. निघतांना "माझी डोंबिवलीतली सगळी काम झाली की तुला इथे घ्यायला येईल, पंधरा दिवस शांतपणे रहा माझ्याकडे" असं प्रेमाने सांगुनही आले.
मग बंगलोरहुन लेक जावई आलेत, मग माझ्यातल्या ख-याखु-या आईचा रोल सुरु झाला. तिच्याबरोबर शॉपिंग, त्यांना दोघांना आवडणारे पदार्थ........दहिवडे, बटाटेवडे......आलु-पराठे.......त्यांच्यासाठी खास आंब्याच्या पेटया मागवल्या होत्या. हे सगळ करत असतांना मनातल्या मनात मी स्वत:लाच तपासुन बघत होते,,,,,,,,,खरच याच भावनेने मी सगळ्यांशी वागते आहे कां????? तो अधिक महिना होता, गावातल्या दोघी नंणदांना, त्यांच्या घरच्या सगळ्यांना जेवायला बोलावले होते, आंब्याचा रस आणि बाकी सगळे त्यांना आवडणारे पदार्थ केले होते. सगळ्यांना जेऊ घालतांना मी मनापासुन आणि भरपुर करण्याचा प्रयत्न करते. ती सगळी आवडीने, पोटभर जेवली की माझ्यातली ’आई’ समाधान पावते. त्यादिवशीही असेच सगळे चांगले पदार्थ केले होते, सगळे आवडीने जेवत होते. तशा दोन्ही नंणदा आणि त्याचे मिस्टर माझ्यापेक्षा वयाने मोठे पण त्यांना अधिकाचे वाण लावतांना मनातल्या वात्सल्याला किनार होती आईच्या ममत्वाची. २५ मे ला वहिनीला जळगांवहुन घेऊन आले, तीची थकलेली, सुरकुतलेली बोटं धरुन आणतांना, गाडीत तीला लहान मुलासारख चढवतांना........माझ्यातली आई भेटली होती मला. त्याच दरम्यान सासुबाईपण आल्यात पुण्याहुन माझ्याकडे, हळुच म्हणाल्या, अग माझी एक साडी खराब झालीय, ड्रायक्लिन करुन देशिल का? तु खुप छान करतेस म्हणुन म्हटलं......त्यांची नऊवारी साडी ड्रायक्लिन करण अवघड जात होतं, पण तरीही मनापासुन केली. त्यांच्या दोन-तीन साडयांवर ब्लाउज शिवुन आणुन दिलेत. नविन साडी घेण्यासाठी पैसे दिले. आता माझ्या लेकीचा आणि वहिनीचा हट्ट होता, दोघींनाही मोरगांवच्या गणपतीला पुजा घालायची होती. वहिनीने तर सांगुनच टाकलं....."वरचं बोलावणं यायच्या अगोदर मला एकदा मोरगांवला नेउन आण ग बाई".
मग मोरगांवच्या पुजेच ठरवलं. ह्यांची सुट्टी संपल्यामुळे हे २२ मे लाच अल्जेरियाला परतुन आले होते, आता हा सगळा डोलारा मलाच सांभाळायचा होता. वहिनी, मी, लेक आणि सासुबाई अस जायच ठरल. दोन्ही वयस्कर आज्यांना घेउन जायच फार अवघड होतं, पण निश्चय केला होता, तेवढयात वन्सबाईंचा फोन आला "आईला या वयात प्रवास झेपणार नाही, मी घेउन जाते तिला, तुम्ही जाउन या". मग आम्ही तिघीच निघालो. डोंबिवली ते मोरगांव प्रवास - ड्रायव्हर शोधण्यापासुन ते पुजेची तयारी पार दमले होते मी, शिवाय एवढा सहा-सात तासांचा प्रवास आम्ही तिघी बायकाच होतो. अगदी फुलासारखं निट सांभाळुन नेलं, पुजेच्या आदल्या रात्रीच तिचं आजारपण, दवाखान्यातुन औषध आणलं, खुप वेळ जागत होते तिच्या उशाशी. खुप काळजी वाटत असतांनाही मोरयाच्या कृपेने दोघींचीही पुजा व्यवस्थित यथासांग झाली. एक लेक, एक आई, दोघींचाही लहान मुलासारखा हट्ट पुरवतांना मनात समाधान दाटुन आले होते.
खरा क्षण होता तो १३ जुनचा, सगळ्या बहिण भावंडानी एकत्र यायचं ठरवलं, हे नव्हतेच मदतीला, माझीही अल्जेरियाला परतायची तारीख जवळ येत होती, तरीही उत्साहाने तयारीला लागले. सगळे एकत्र जमल्यावर अचानकच ठरले - वहिनीच्या पंचात्तरीचा सोहळा कां करु नये आणि आदल्या दिवशीच्या दोन तासात कार्यक्रमाचे नियोजन केले......आणि अत्यंत अविस्मरणिय असा तो सोहळा झाला.....अचानक ठरवल्याने काय करायचे हे ठरवले नव्हते.......पण एक ’अनामिक शक्ति’ या कार्यक्रमाचे नियोजन करत आहे, हे जाणवत होते.......सकाळी उठल्यावर सनईच्या सुंदर नादात आम्ही चौघ भावंडांनी तिला सुवासिक तेल लावल........बाबांच्या फोटोला सोनचाफ्याच्या फुलांचा हार घातला.....सगळ्या भावंडांनी आणि नातवंडांनी तीची पाद्यपुजा केली.......पंच्चाहत्तर दिव्यांनी औक्षण केल, सोनचाफ्याची फुलांची कंठी घातली......सगळ्यांनी तिला साडी घेतली......अंगठीसाठी पैसे दिले......मोरगांवहुन प्रसादरुपात मिळालेली शाल पांघरली. आयुष्यभर तिने आमच्यासाठी जे जे कांही केलं त्याबद्दलची ’कृतज्ञता’, एक प्रकारे ’कृतज्ञता सोहळा’च होता तो.
घडणा-या सगळ्या घटनांकडे मागे वळुन बघतांना एक जाणवत होते, प्रयत्नपुर्वक कठिण असा संकल्प पार पाडत होते, "सगळ्यांशी आईच्या प्रेमाने वागण्याचा, अगदी आईचीही आई होण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते" मग मनात विचार डोकावला.........ही तर सगळी तुझ्या जवळची......नात्यातली......त्यांच्याशी आईच्या भुमिकेतुन वागणं तस खुप कठिण नाही, पण जी नात्यातली नाहीत, त्यांच्याशी वागु शकशील तु या भुमिकेतुन ? या वात्सल्याने ? आणि त्या घटना आठवल्या....एक मैत्रीण अमेरिकेला जायला निघाली होती, दुस-या दिवशीचं रात्रीचं प्लेन होतं आणि आज संध्याकाळी तिच्या मिस्टरांना हार्ट-अॅटॅक आला.....डॉक्टरी उपाय तर चालुच होते, पण तिच्या मनाला धीर देण्यासाठी, त्यांच्या साठी म्हणुन ’गणेश-गीतेच’ पारायण केले होते......हा ग्रंथ हातात जरी घेतला तरी मनाला एक अनामिक शांतता येते! दुस-या एका मैत्रीणीचा तरुण, इंजिनियर मुलगा घरातुन निघुन गेला होता रागावुन, तिच्या डोळ्यातले अश्रु थांबत नव्हते. माझ्या धावपळीत, पुर्ण दिवसभर तिच्याबरोबर होते, त्याच्या ऑफीसमध्ये त्याला समजवायला तीच्या बरोबर गेले होते.
या सर्व घटनांच्या तुलनेत कांही प्रसंग आठवले की खुप त्रास होतो.....ह्यांना त्यावेळेस नेमकी बाहेरच्या देशात नोकरीची संधी उपलब्ध झाली, आणि लेकीला नाशिकच्या कॉलेजला अॅडमिशन मिळाली. आम्ही दोघीही तिथे शिफ़्ट झालो, निर्णय थोडासा कठीण होता, पण मनाचं धैर्य करुन घेतला, तरीही मन थोड सैरभैरच होतं, त्यादिवशी ब-याच दिवसांपासुन काढलेल्या फोटॊंचा रोल स्टुडिओमध्ये देउया म्हणुन घेउन गेले आणि घरी आले. दुस-या दिवशी सकाळी कॅमेरा शोधतेय, सापडेचना, आठवतच नव्हतं......मला रडायलाच येत होतं......माझी अवघी १७-१८ वर्षाची लेक, मला जवळ घेउन म्हणाली "रडु नकोस ग ममा, सापडेल, तु एखादवेळेस स्टुडिओत विसरली असशील, होतं अस कधी, कधी, आणि नाही सापडला तरी टेन्शन नको घेउस" मी अगदी अवाक होऊन गेले माझी लेक त्याक्षणी माझी माय झाली होती. मी मनात म्हटले, "बेटा, छोटय़ा छोटया वस्तु हरवल्यास म्हणुन किती धपाटे खाल्लेस ग माझ्या हातुन.......कधी वॉटरबॅग, कधी पेन्सिल, कधी कंपास एकदा तर सारखी सारखी पेन्सिल हरवते म्हणुन इतका जोरात धपाटा घातला होता पाठीत की माझ्याच हाताला मुंग्या आल्या होत्या......अन रागाने दरवाजाबाहेर काढुन दिलं होतं.....तो चिमुकला जीव किती भेदरला होता एकटेपणाच्या भीतीने! ती परत मला म्हणत होती.... आई, उद्या जाउया त्या स्टुडिओत......तु रडु नकोस बर......मी मनात म्हटल.....छोट्या वस्तु हरवल्या तरी किती रागावले गं मी तुला, तु मात्र सगळ विसरुन आईची समजुत घालतेयस....तिचा निरागस चेहेरा बघुन माझ्या पश्चातापी अत:करणात विचार आला, खरच आवरायला हवा होता मी राग त्यावेळी....अशा चुका मोठयांकडुनही होत नाही का कधी?.........त्या दिवशीचा रविवार.....मस्त मजेत चाललेला.....घरात पसारा करताय... करु दे.....! वस्तु अस्ताव्यस्त करताहेत....करु दे! सोमवारी आवरु....अशा विचारांमध्ये सकाळचा नाश्ता छान झाला......"अहो तेवढे कॉफीचे मग भरुन ठेवलेय ते आणता का?.....एक मिनिटच.......खळकन आवाज झाला, मग खाली पडुन फुटला होता, कॉफी सांडली होती, काचांचे तुकडे इतस्तत: पसरले होते, मग मात्र रागाचा पारा वर गेला, एक काम सांगितलं तर कुणी धड करेल तर शपथ. सा-या दिवसभर रागातच होते........सगळ्या भुतकाळातल्या आठवणींना उगाळत बसले होते......जरा विचार डोक्यात आला नाही की अनेक वेळा अशाच कपबश्या फुटल्या नंतर ह्यांनी प्रेमाने म्हटल होतं..... चल जाऊ दे.....नाहीतरी कपबशा जुन्याच झाल्या होत्या.....अन मग नविन सेटच आले होते कपबशांचे घरात!
आताही तो माझ्या इतक्या जवळच्या नात्यातला, त्याला जेवायला बोलावले त्या दिवशी किती उत्साहाने केलं होत सगळं, तो आता वरचेवर भेटणार नाही म्हणुन डोळ्यात आसवंही आली होती. मग आत्ता त्याच्याशी भांडतांना कुठे हरवली होती माझ्यातली "आई"??
एक जाणवलं आमचे संकल्प म्हणजे कलियुगातील एकप्रकारची "तपश्चर्याच" आणि ही तपश्चर्या भंग करायला सहा मेनकांच नर्तन चालु असत.......कधी क्रोध.......मोह.......मत्सर......कधी काम.......लोभ......मद............!!!!या सहा शत्रुंपैकी कुणीतरी मेनकेच लोभसवाणं रुप धारण करतं.......त्याचं नर्तन आमच्या आयुष्यात सुरु होतं आणि आमची "संकल्परुपी तपश्चर्या" कधीच भंग पावलेली असते.
मी त्याला पत्र लिहायला घेतलं........"झालेले सगळे वाद-विवाद विसरुन आपलं नातं आपण परत नव्याने सुरु करुया........को-या पाटी सारख......!! तु भाऊबिजेला तरी येत रहा दरवर्षी डोंबिवलीला अणि "विश्वामित्राच्या तपश्चर्येला परत प्रारंभ झाला होता.........! ही तपश्चर्या अशीच चालु रहाणार आहे.........विश्वाच्या अंतापर्यंत.....जोपर्यंत या विश्वाशी विश्वबंधुत्वाच्या नात्याने आम्ही जोडले जात नाही तोपर्यंत!
विश्वामित्रांना त्रास द्यायला एकच मेनका होती.......आमच्या आयुष्यात तर सहा मेनकांचं नर्तन चालु असत.....सतत!!!!
सुंदर, कलियुगातील ह्या
सुंदर, कलियुगातील ह्या तपश्चर्येला शुभेच्छा
सुंदर लेखन दिप्ति..!
सुंदर लेखन दिप्ति..!
.
.
आवडली
आवडली
धन्यवाद मित्र मैत्रिणींनो.
धन्यवाद मित्र मैत्रिणींनो. खुप दिवसांनी भेटतेय तुम्हाला.
चांगली जमली आहे कथा.. आपल्या
चांगली जमली आहे कथा..
आपल्या सगळ्या लिखाना पैकी हे सर्वात चांगले वाटले
पु.ले.शु.
मस्त.. आवडली.
मस्त.. आवडली.
सुंदर
सुंदर
उत्तम!
उत्तम!
खूपच भावूक , अतिशय सुंदर .
खूपच भावूक , अतिशय सुंदर .
आवडली
आवडली
किती सुंदर कथा गं दिप्ती
किती सुंदर कथा गं दिप्ती !!...
मी नोकरी लागल्यापासुन आई ला बरेच छान क्षण देउ शकले... आत्ता ती माझ्याकडे आली होती (माझं लग्न होउन ४ वर्षे झालीत पहिल्यांदा आली होती ती ४ दिवस राहण्यासाठी म्हणुन..) जातांना म्हणाली,"माहेरपणाला आल्यासारखं वाटलं गं बेटा" डोळे समधानाने भरुन आले होते... तसंच काहीसं झालं पुन्हा, हा लेख वाचून......
हाच अभिप्राय!
बागेश्री, तुझा प्रतिसाद वाचुन
बागेश्री, तुझा प्रतिसाद वाचुन माझेच डोळे भरुन आलेत. सगळ्या प्रसंगात, संकटात आपल्यापाठीमागे खंबीरपणे उभे रहाणारे आई-वडिल किंवा सासु-सासरे....त्यांच्या उतारवयात त्यांना असे प्रेमाचे क्षण देणं म्हणजे एक प्रकारची कृतज्ञताच व्यक्त करणे!!!
आवडला तुझा प्रतिसाद.
आणि हो आवळा, कौशी, रचु, निलिमा व्ही, नानाजी आणि वर्षा_म तुम्हाला कथा आवडली, धन्यवाद.
छानच लिहिलयंस गं. तुझ्या
छानच लिहिलयंस गं. तुझ्या सगळ्या कथा आवडतात मला.
Dipti, तुमचा वरचा प्रतिसाद
Dipti,
तुमचा वरचा प्रतिसाद वाचुन, मला मी काही दिवसांपुर्वी लिहिलेली "निश्चय भिजल्या मनाचा" कथा आठवली... तुम्ही वाचलीत का ती?
आमच्या आयुष्यात तर सहा
आमच्या आयुष्यात तर सहा मेनकांचं नर्तन चालु असत.....सतत!!!!
हे वाक्य फार आवडलं...
बागेश्री, तुझी "निश्चय
बागेश्री, तुझी "निश्चय भिजल्या मनाचा" कथा वाचली होती, मला खुप आवडली आणि मी प्रतिसादही दिला आहे तसा....खुप टचिंग कथा!!!
सुंदर आहे..
सुंदर आहे..
सुरेख लेखन. मनाला भावलं. खरंच
सुरेख लेखन. मनाला भावलं. खरंच खूपदा आपण मनाचे विकार बाजूला ठेउन वागायचे प्रयत्न करतो. माहीत असुनही विकारावर ताबा ठेवता येत नाही याचा खेद वाटतो आणि क्षण हातातून निसटतात.
दीप्ती,डोळ्यात पाणी आलं गं
दीप्ती,डोळ्यात पाणी आलं गं आपसूकच.. सुरेख लिहिलयस,आतपर्यन्त स्पर्शून गेली कथा ..
सहीच.........
सहीच.........
विश्वामित्रांना त्रास द्यायला
विश्वामित्रांना त्रास द्यायला एकच मेनका होती.......आमच्या आयुष्यात तर सहा मेनकांचं नर्तन चालु असत.....सतत!!! >>> १०१% अनुमोदन! मस्तच!
कथालेखनातून तुमचे
कथालेखनातून तुमचे व्यक्तिमत्वच प्रकट होतंय....मॅच्युअर्ड.
सुंदर कथा..
सुंदर कथा..
किती सुंदर लिहिता तुम्ही,
किती सुंदर लिहिता तुम्ही, मानवी भावभावनांच विश्लेशण सुंदर करतात. तुमचे लेखन वाचायला नक्कीच आवडेल.
किती सुंदर लिखाण. प्रत्येक
किती सुंदर लिखाण. प्रत्येक प्रसंग इतक्या ताकदीने ऊभा केलाय कि जणु आपण स्वतः त्यात भाग घेतोय अशी जाणीव व्हावी.
फार फार आवडली.
विजू आणि निराली, मनापासून
विजू आणि निराली,
मनापासून धन्यवाद.
आपण लिहिलेल्या कथा व लेख मला
आपण लिहिलेल्या कथा व लेख मला नेहमीच आवडतात. मी डोंबिवलीचा त्या मुळे ह्या गुणी गावा बद्दल मनात अजून ही आदर. लेख आवडला व आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नात्यांमध्ये होणा-या दुराव्याला आपण सगळेच कधी ना कधी सामोरे येतो त्या संदर्भात आपला लेख खूपच आवडला.
अवांतर...............
मी सध्या बंगळूरलाच असतो - आपली मुलगी कोठे आहे बंगळूर मध्ये सध्या.
धन्यवाद रणजित, कथा तुम्हाला
धन्यवाद रणजित,
कथा तुम्हाला आवडली. डोबिवलीत अनेक काळ वास्तव्य करणा-यास त्या शहराबद्दल एक आपुलकी वाटते हे मात्र खरे. तुम्ही पण डोंबिवलीत रहात होता छान. बाकी विपुत कळवते.
मस्त लिहीलय ,,,,,,पाणीच आल
मस्त लिहीलय ,,,,,,पाणीच आल डोळ्यात
Pages