प्रिय नयन
आज आठवडा झाला मला इथे येऊन. पण इथे आल्या आल्या तुला पत्र पाठवायचं नाही जमलं. रागावलीस ? नक्कीच रागावली असशील. अभीला तसं बोलूनही दाखवलं असेल. ए, प्लीज रागावू नको हं !
खरं तर तुला सोडून इथे यावसंही वाटत नव्हतं. पण तू हट्ट केलास म्हणून आलो येथवर. तुला कदाचित माहीत नसेल, पण हल्ली तू खूपच हट्ट करायला लागली आहेस. चांगली नाही ही सवय. खरं सांगू, एक वाईट सवय मलाही लागलीय. तुझे हट्ट लगोलग पुरवायची.
इथे आलोय खरा. पण सारखं वाटत्यं तू कुठेतरी जवळपासच आहेस. फ़ार जवळ. जणू काही चोहीकडून तुझेच डोळे रोखून पाह्ताहेत. सभोवतालच्या आसमंतात भरून उरलेत तुझेच श्वास. वार्याची झूळूक असो वा हिमवर्षाची चुणूक, पानांची सळसळ वा ओढ्याची खळखळ, पर्वतांची उत्तुंगता वा पक्षांची सुरेलता, तुझे अस्तित्व या सार्यात मला जाणवतयं. माझ्या अवतीभवती. थोडे काव्यात्मक वाटतयं ना हे माझं लिहीणं! सहवासाचा परिणाम. चित्रकाराचा कवी होतोय. तुझ्या सुरांनी मला कॅनव्हासवरचे रंग शब्दात बांधून कागदावर उतरवणं शिकवलय.
नयन, आज इथल्या एका आर्ट गॅलरीत गेलो होतो. इथल्याच एका नवोदित स्थानिक चित्रकाराचं चित्रप्रदर्शन होतं. विषय काय निवडला होता त्याने याची कल्पना करशील ? जस्ट गेस. हरलीस ? "डोळे". एक नितांत सुंदर, अथांग आणि गहिरा विषय. बहुधा कविमनाचा वेडा चित्रकार असावा किंवा तुझ्यासारख्या एखाद्या गहिर्या डोळ्यांच्या तरूणीचा प्रियकर. भिंतीवर टांगलेल्या प्रत्येक कॅनव्हासवर होते फ़क्त दोन वेधक डोळे. पण प्रत्येकाचे भाव वेगळे, भावानुभूती वेगळी, अर्थ वेगळा, त्या अर्थांचा स्पर्श वेगळा. पण हे सारं व्यक्त करायला साधन मात्र एकच. डोळे. गहिरे गहिरे डोळे, तुझ्या डोळ्यांसारखे. अप्रतिम. सुंदर.
तू जाणवलीस तेव्हा. प्रत्येक चित्रात जाणवलीस तू. स्पर्शून गेलीस. त्या सार्या रंगछटातील ते डोळे तुझेच वाटले मला. त्यांच्याकडे पहाताना वाटलं की मला वेडावतील व म्हणतील,"सुशांत, तू म्हणजे ना अगदी अस्सा आहेस बघ." तुझे डोळे, मला स्फ़ुर्ती देणारे, चेतना देणारे, माझ्या काळवंडलेल्या मनात आशेची चमक निर्माण करणारे, माझ्यातल्या 'मी' ला जागवणारे तुझे डोळे. मला खुणावू लागले. साद घालू लागले. माझ्याच नकळत मी हरवलो त्यात. भुतकाळाची पाने उलटून मागे गेलो. त्या मैफिलीत. चाफ़ेकर हॊलमधला तुझा कार्यक्रम. पाय दुमडून बैठकीत बसलेली तू.
"या डोळ्यांची दोन पाखरे फ़िरतील तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती"
तुझा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला आणि तुझे हसरे डोळे माझ्या अंतर्मनाच्या गाभ्यापर्यंत. माझ्यासारख्या चित्रकाराला सौंदर्य नवीन नव्हतं. पण तुझी गोष्ट वेगळीच होती. तुझे डोळे पहाताक्षणी मनाचा ठाव घेणारे. त्यातली ती चमक. मला ती कधीच कुठेच आढळली नाही. इतके खंबीर, आत्मविश्वासपुर्ण. एखाद्याच्या आत्मविश्वासाचं तेज त्याच्या डोळ्यातून ओसंडू शकते हे ठाऊकच नव्हत गं मला.
मैफ़ल संपली. सुर ओसरले. ताल मंदावले. पण मला मात्र जखडून राहीले ते तुझ्या डोळ्यांचे पाश. आजतगायत.
ही अतिशयोक्ती नाही नयन. जे घडलं, जे अनुभवलं तेच. तुला मी हरभर्याच्या झाडावर नाही चढवत. खरंच.
कार्यक्रम संपल्यावर जेव्हा अभीने,"तुझी ओळख करून देतो" म्हणून सांगितलं, तेव्हा तर मला काय बोलावं तेच सुचेचना. आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन. तसा प्रकार. तू संयोजकांशी बोलत होतीस. तो मला तुझ्याकडे घेऊन गेला. फ़िक्कट आकाशी रंगाची ती फ़ुलाफ़ुलांची साडी तुझ्या रंगाला खूलून दिसत होती.
"नयन" अभिने तुला हलकेच हाक मारली आणि तू वळलीस."नयन" किती सार्थ नाव. तुझ्याशी पुर्ण प्रामाणिक असं. त्या व्यतिरिक्त दुसरं कोणतही नाव म्हणजे त्या डोळ्यांचा अपमानच.
"नयन, हा माझा मित्र सुशांत. चित्रकार आहे." एक साधारण कलावंताची दुसर्या असामान्य कलावंताशी झालेली पहिली ओळख.
"नमस्कार " तू हात जोडलेस. पदराचे टोक उजव्या हातात धरून केलेला तो नमस्कार. तो नजरेतला आपलेपणा. तो क्षण म्हणजे राजा रविवर्माला अभिप्रेत असलेल्या अस्सल भारतीय लावण्याची मुर्तीमंत प्रतिकृती. त्यावेळेस वाटलेलं तुला आताच कॅनव्हासवर रेखाटावं.
मी तुझ्या नमस्काराला नमस्काराने प्रत्युत्तर दिले. गोड हसलीस व म्हणालीस,"अभि, तुझ्या मित्राला सुगंधाची चांगली जाण आहे."
"मैफ़िली खास असल्या की नेहमी सुगंध जपतो मी जवळ. मैफ़िलीच्या आठवणी दरवळत राहतात त्यांच्यासोबत." मी चटकन म्हणालो. तू खळाळून हसलीस. रातराणीच्या फ़ुलांचा वर्षाव झाला माझ्यावर.
"अभि, तुझ्या मित्राला शब्दांचीही चांगली जाण आहे." त्या फ़ुलातून पुन्हा शब्दफ़ुले.
"मी फ़क्त 'अभिचा मित्र' नसून मलाही एक छानसं नाव आहे." मी असं बोलताचं तू पुन्हा खळाळून हसलीस व मनात शिरलीस. पुन्हा तोच वर्षाव. मग तू बोलत होतीस. जणू गाण्यांची मैफ़िल संपलीच नव्हती. मी तुला न्याहाळत होतो. मनात साठवत होतो. तुझ्या नकळत. तुझ्या परवानगीशिवाय.
बघ. एकेक क्षण आठवतोय. तू जवळ नाहीस. पण आठवणी मात्र आहेत. गुलाबासारख्या ताज्या. मनाच्या परडीत. कायम जपलेल्या.
माझी वाट पहातेयस ना ? मी लवकरच येईन.
तुझा सुशांत
ता.क. : तुला काहीतरी सांगायचय. ओळखलसं काय ते !!
सिमला
दि. १९ मे १९७०
मी पत्र वाचून संपवलं. ती हसली. मी पत्र तिच्या हातात दिलं. तिने ते व्यवस्थित घडी केलं आणि पाकीटात सारलं.
"अजून जपलं आहेस तू हे पत्र ?" मी विचारलं. अंगावर चादर नीट ओढून घेत ती उठून बसली व मागे टेकली.
"हा माझ्या आयुष्यातला मौल्यवान ठेवा आहे. जपायलाच हवा. सगळ्या गोष्टी कशा कालपरवाच्या वाटतात. २८ वर्षे झाली ना या गोष्टीला ?" ती माझा सुरकतलेला हात हातात घेत म्हणाली
"हो झालीत खरी." मी होकारार्थी मान हलवत बोललो.
"आणि हे तुझं दुसरं पत्र. दोन दिवसांनी मिळालेलं." तिने दुसरं पत्र पुढे केलं.
"वाच." तिच्या डोळ्यात ओल जाणवली. जुन्या आठवणीने असावी. मी पत्र वाचायला सुरूवात केली.
प्रिय नयन,
तुला आठवतो तो दिवस. तू, मी आणि अभि बसलो होतो. सहज गप्पा मारत. इतक्यात अभि म्हणाला," सुशांत सिमलाला इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धा आहे. तू भाग घे."
"मी ?" मी चक्क नकार दिला त्याला. पण तू आग्रह केलास.
"अरे पण एखादा चांगला विषय नको का त्यासाठी ?" मी अजून नकारार्थीच.
"हे बघ, विषयाचं काय ते तू बघ. मला त्यातलं काही कळत नाही. पण तू भाग घ्यावास हे कळतं." अभिने शेवटच्या वाक्यावर जोर दिला.
मी तुझ्याकडे पाहीलं. तुझ्या डोळ्यात माझ्यावरच्या विश्वासाची खात्री होती. बस. त्याचक्षणी मी तुला मॉडेल बनण्याची विनंती केली आणि तू "हो" म्हणालीस.
मी तुला कॅनव्हासवर मुर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तुझे डोळे. ती चमक त्या चित्रात येत नव्हती. किती बैठका झाल्या त्यासाठी पण नाही. भयानक निराश झालेला मी आणि जिद्दीने माझ्यासमोर बसणारी तू. माझा हात हातात धरलास आणि म्हणालीस,"सुशांत क्षणभरासाठी तू हे विसर की मी 'मॉडेल' आहे आणि तू चित्रकार. माझ्या नजरेत तुझी नजर मिळव. विसरून जा स्वत:चं अस्तित्व. विसरून जा." मी किती वेळ तुझा हात धरून तसा बसलो तेच मला कळलं नाही. मी त्या डोळ्यात कधी हरवलो तेही कळलं नाही. भारावल्यागत. मग केव्हा कुंचला पुन्हा हाती आला व केव्हा मी तुझ्या चित्राला माझ्या ह्रुदयातून त्या कॅनव्हासवर उतरवत गेला त्याचही भान राहीलं नाही. जेव्हा चित्र पुर्ण झालं होतं तेव्हा त्याला मी नाव ही दिलं होतं "नयन".
आणि आज त्याच चित्राला सर्वोत्कृष्ट चित्राचा मान मिळालाय. नयन, सर्वोत्कृष्ट चित्राचा. तू जिंकलस. पुन्हा एकदा. टाळ्यांचा तो प्रचंड गजर. देश विदेशचे प्रसिद्ध कलावंत. अभिनंदनाचा वर्षाव. मी व्यासपीठाच्या दिशेने चालतोय. टाळ्यांच्या उत्तुंग लाटेवर स्वार. माझ्या हातात प्रथम पारितोषिक. नयन, तू हवी होतीस येथे. माझं यश.......... माझं कसलं ...... तुझं यश तुला अनुभवता आलं असतं.
अध्यक्षांच्या भाषणात ते म्हणाले," जग अजून गुंतलय मोनालिसाच्या गुढ हास्याचा अर्थ शोधण्यात. पण आजपासून ते नव्या शोधाला लागतील. या डोळ्यांच्या भाषेच्या. मला वाटतेय या डोळ्यात बर्याच गोष्टी दडल्यात. माझी चित्रकाराला विनंती आहे की त्याने हे गुढ उकलावं. या चित्रस्वामिनीची ओळख आज आम्हाला करून द्यावी." थरथरत्या हातांनी मी तो माईक हातात घेतला आणि म्हणालो,"शी इज माय लव्ह."
नयन, त्या जनसमुदायाला मी जे सांगितलं ते इतक्या दिवसात तुला बोलू शकलो नाही. पण आज या पत्रातून विचारतोय,'माझी होशील?" खरं तर हा पुरस्कार तुझ्या हातात देऊन तुला विचारायचं होतं पण आता राहवत नाही.'या कलावंताला साथ देशील. तुझ्या सुरांच्या महफ़िलीत मला माझ्या कुंचल्याचे रंग भरू देशील ? "
फ़क्त एकदाच या ओळींवरून तुझा हात फ़िरव. तो स्पर्श मला सारं सांगून जाईल.
मी येतोय.
तूझा आणि केवळ तुझाच
सुशांत
सिमला
दि. २१ मे १९७०
मी पत्र वाचून संपवलं. तिने माझा हात हातात घेतला. माझ्या डोळ्यातील आंसु तिच्या हातांवर पडले. तिने माझा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत धरत माझे डोळे पुसले.
"या पत्रातलं एकेक अक्षर खरं आहे नयन. पण यात मी एक गोष्ट लपवली. खोटेपणा केला मी या पत्रात आणि तू हा माझा खोटेपणा जपलास. मी कधीही तुला सत्य सांगण्याचे धाडस केले नाही. भ्याडासारखा वागलो. मी बोललो होतो. त्या सगळ्या लोकांसमोर.' शी इज माय लव्ह.' पण मी हेही बोललो होतो,' अनफ़ोर्चुनेटली शी इज ब्लाईंड.' मी हे बोललो होतो नयन. मी जाहीर पंचनामा केला या गोष्टीचा. माझं श्रेष्ठत्व पटवलं जगाला. फ़ार थोर झालो मी लोकांच्या नजरेत हे सागून. मी तुझ्यालायक नव्हतो नयन. 'दुर्दैवाने ती आंधळी आहे' असं म्हणालो मी. ज्याला तू कधी दुर्दैव मानलं नाहीस. पण मी मानलं. तू मला भेटलीस. मला स्विकारलसं. या सुदैवाला मी अभागी चारचौघात 'दुर्देव' म्हणालो. अठ्ठावीस वर्षापुर्वी केलेल्या या माझ्या गुन्हयासाठी मी आज माफ़ी मागतो. मला माफ़ कर." मी तिचे हात घट्ट धरले. तिच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत नव्हती आता माझी. तिने पुन्हा माझा चेहरा तिच्या ओंजळीत घेतला. मग मला जवळ घेऊन माझ्या खांद्यावर आपले डोके ठेवले.
"मला माहीत आहे ते सुशांत. मी ऐकला होता तो कार्यक्रम." ती थोड्यावेळाने हळूच म्हणाली.
"तू?" मला विश्वासच बसेना. "तुला माहीत असूनही तू कधीच या बाबतीत बोलली नाहीस. मला कबूलही केलसं ?"
"तू खोटं बोलला नव्हतास, सुशांत. मी जे सत्य स्विकारलसं ते तू जाहीर केलसं. कदाचित जागा चुकली होती. पद्धत चुकली होती. शरीराच्या एखाद्या व्यंगाला सगळेच दुर्दैव मानतात. यात वाईट काय वाटून घ्यायचं ? तू मला स्विकारलसं, हेच महत्त्वाचं. तूला होकार मी नंतर दिलेला. तू उगाच हे ओझं मनावर लादलंस. तुझ्या डोळ्यांनी मी हे जग पाहू शकेन याची खात्री होती मला. माझा हा विश्वास खरा ठरला. फ़क्त एकच सत्य तेव्हा मला जाणवलेलं. ते म्हणजे यु लव्ह मी. यु लव्ह मी अ लॉट.... हो ना सुशांत. ?''
तिची मिठी घट्ट झाली. तिच्या घट्ट मिठीत मनातील शिल्लक राहीलेलं शल्य विरघळून गेलं. आभाळ निरभ्र झालं.
एक नवी सुरुवात .....!
नि:शब्द!
नि:शब्द! अशक्य सही लिहीलंयस रे!
शब्द अपुरे
शब्द अपुरे पडताहेत प्रतिक्रियेला.... marvellous !
खुपच छान
खुपच छान लिहलय ..... अप्रतिम !!!!
फॅन्टॅस्ट
फॅन्टॅस्टिक..!!
अहा! तरल
अहा! तरल शब्दांत मांडलेली सुंदर कथा.. कौतुक, तुझी ही खासियत माहीत नव्हती आधी. अजून काय दडवून ठेवलंयस?
फारच
फारच छान...............
त्याला हे
त्याला हे कसं सुचतं हे दडवुन ठेवलंय त्याने. पण मला माहीत आहे...काय्..कौतुक, सांगु तो नाटकातला किस्सा ?
बाकी कथेबद्दल , कंबरेत झुकुन सलाम, मुजरा सर्व काही !!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?
एकदम सरस..
एकदम सरस..
कथा म्हणून
कथा म्हणून जबरदस्त ! फक्त ते आंधळी असून इतके बोलके डोळे वगैरे काही पटल नाही.
कथेची
कथेची मांडणी आवडली. कथेतील पात्र, प्रसंग सगळे आवडले.. पण मी सुद्धा savyasachi शी सहमत आहे... आंधळी असुन इतकं जे डोळ्याचे वर्णन केले आहे ते नाही पटले.
धक्का तंत्र म्हणुन वापरले आहे ते, पण logical mind ला नाही पटत. कथाच आहे वास्तव नाही आणि म्हणुन त्यात जास्त logic वैगरे लावू नये असे असेल तर कथा छानच आहे.
चु.भु.दे.घे.
कौतुक,
कौतुक, कथेचा फ्लो, मांडणी झकास. शेवटची कलाटणीही सुरेख... तरीही मुळात आंधळी नजर आणि "गहिरे डोळे", हसणारे डोळे वगैरे पटत नाहीये.
खूप मस्त
खूप मस्त लिहिलंय रे कौतुक.... आवडलं...
आक्षेप
आक्षेप मान्य कारण सहसा आपंण ज्यां अंध व्यक्ती पाहतो त्या पाहत्या क्षणी अंध आहेत हे जाणवतं. पण जन्मजात अंधत्व नसलेल्यांचं तसं नेहमीच असतं असं नाही. काही कारणांमुळे अंधत्व आलेल्या अशा व्यक्ती जेव्हा त्यांच्या या व्यंगावर मात करतात तेव्हा त्यांचे ते व्यंग जाणवत नाही. माझा संबंध भटकंतीमु़ळे बर्याच लोकांशी येतो. अंध व्यक्तीच्या संस्थांशीही. मी पाहीलेले डोळे मला भावले. कथा तिथेच जन्माच आली. इथे कथा सांगणारा प्रेमात पडलाय व तिच्या डोळ्यात जे त्याला गवसलं आहे ते इतरांना गवसेल असं नाही.
प्रतिसादाबद्दल सार्यांचे आभार.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
मस्त आहे.
मस्त आहे. आवडली
प्रेमाचा
प्रेमाचा वेगळाच रंग... भिडला हे सांगायला नकोच
खूपच
खूपच छान...........
खूप सुरेख
खूप सुरेख चितारलं आहेस शब्दातून....... खूप छान !!
मांडणी
मांडणी आवडली.. दाद ला अनुमोदन..
सही रे सही
सही रे सही
वरील सर्वांना अनुमोदन
अतिशय
अतिशय सुरेख कौतुक! आधी मलाही अंध डोळ्यांचा गहिरेपणा पटला नव्हता, पण तुमच्या स्पष्टीकरणाशी मी पुर्ण सहमत. सुंदर कथा!
*****************
सुमेधा पुनकर
*****************
अप्रतिम.....स
अप्रतिम.....सुंदरच्....तिचे सौंदर्य जाणवलं तुमच्या लेखणीतुन...
<<<कथेची
<<<कथेची मांडणी आवडली. कथेतील पात्र, प्रसंग सगळे आवडले.. पण मी सुद्धा savyasachi शी सहमत आहे... आंधळी असुन इतकं जे डोळ्याचे वर्णन केले आहे ते नाही पटले.>>>
<<तरीही मुळात आंधळी नजर आणि "गहिरे डोळे", हसणारे डोळे वगैरे पटत नाहीये.>>
लॉजिकली विचार करायला गेलं तर हे खरंच पटत नाही कधी कधी. पण वास्तव हे तर्क आणि कल्पना यांच्यापेक्षा नेहेमीच वेगळं असतं. आजच्या लोकमतमधली एका अंध तरीही डोळस जोडप्याच्या जिद्दीची कहाणी हेच सिद्ध करते.
http://onlinenews.lokmat.com/staticpages/editions/oxygen.php?articledate...
इथे टिचकी देवुन मग त्यातील संदेश आणि अंजली नारायणेंची जिद्द अनुभवायला काय हरकत आहे.
या सगळ्यांनाच लाखो सलाम !!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!!