अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

नंतर एकेक कळत गेल.
त्या मित्राच्या बहीणीचा डीव्होर्स झालेला आणि ती, तिची आजी आणि मुलगा काही दिवस तिथे रहात होते. शिवाय त्याच्या बहीणीची आजेसासू काळ काही तरी करणारी होती.

एकदा मला खालचा दुकानदार म्हणाला की सगळे एकदम का सोडून जातायत या बिल्डींग मधे काही कळत नाही. त्यानंतर काही दिवसातच माझी गच्छंती झा॑ली.

बार फ्लॅट्स मधे अवघे दोन तीन रहाते होते.

बिल्डींगच बांधकाम करताना एक मजदुर मेलेला तो तिथे फिरतो असही ऐकल.

मला कधीतरी अचानक थंड वाटयच.

माझ्या जॉबचा बो-या वाजला तरीही मी ती जागा ठेवलेली. दुस-या नोकरीसाठी संघर्ष चालू होता. पुण्यात इतर अपॉर्च्युनीटीज होत्या. पण मला काहीही मिळेना

एकदा असा झोपलेलो असताना दिसल की काहीतरी गडद काळ पंख्याच्या भवती फिरतय. क्षणाभर वाटल वटवाघूळ आत कस येइल. पण ते गोलाकार होत.
मी नुकताच गाणगापूरला जाऊन आलेलो. केल देवाला आवाहन म्हटल आता तुम्हीच पहा. मला दत्ताचा चेहरा त्या वस्तुच्या आणि माझ्या मधे दिसला मग शांत झोप लागली.
दुस-या दिवशी पासून एकच संवेदना 'इथे यायच नाही अजिबात कधीही ...'

त्यानंतर मी मित्राला सांगितल की आता मी भाड देऊ शकत नाही मी जागा सोडली आणि मला फ्रीलान्स असान्मेंट्स यायला लागल्या. कायद्याने त्या जागेशी संबध संपला त्यानंतर लगेच मला कॅपजेमिनीच बोलावण आल जिथे मी आजतागायत ठाण मांडून आहे.

आजही ती जागा विकण्यापर्यंत बोलणी होतात आणि अग्रीमेंट होणार त्या दिवशी सगळ फिसकटत .
तो आणि इतरही काही फ्लॅट्स आजही पडून आहेत.

दिनेशदा
अरे याचा अर्थ तिथे कुठलतरी चांगल अस्तित्व होत.

दत्तसंप्रदाई नाथपंथी नेहमी सांगतात की स्वामींच अस्तित्व असेल तर असे फुलांचे वास येतात.

दिनेशदा भन्नाट अनुभव आहे.
तो काजवा नसून सुरवंटाचा प्रकार होता>> Biggrin

त्यांना कालांतराने पंख फुटत असतिल.

चातका, अरे काही सुरवंट चमकतात. न्यू झीलंडला ग्लो वर्म्स असलेली एक मोठी गुहाच आहे.

गुगु, मी अगदी इतरांना भितीदायक वाटणार्‍या जागी गेलो, तरी मला नेहमीच प्रसन्न अनुभव येतात.

>>गुगु, मी अगदी इतरांना भितीदायक वाटणार्‍या जागी गेलो, तरी मला नेहमीच प्रसन्न अनुभव येतात.

ह्या माणसाचा आता मला संशय येऊ लागला आहे. Proud

>>मंदार, "त्यांना" माझ्या अस्तित्वाचा त्रास होत असेल काय ?

दिनेशदांना कुठल्या कुठे पोस्टलं असं झालं वाटतं. Proud

अरे मंदार नाही रे दिनेशदा spiritually advanced असेल अस मला वाटत.

ते सुगंध येण हे फार चांगल लक्षण आहे.

थोड विषयांतर

आम्ही काही जण पालघरहून येत होतो. एके ठिकाणी माझा मित्र सहज म्हणाला चंदनाचा वास अचानक का आला?? झाल दुसरी एक मैत्रीण स्वाती ती लगेच हुंगू लागली. नक्कीच स्वामींच अस्तित्व वगैरे वगैरे

मी म्हटल मला तरी तिथे काही घाण वास आला म्हणजे मग स्वातीचे स्वामी नक्की काय करून गेले....

>> मी म्हटल मला तरी तिथे काही घाण वास आला म्हणजे मग स्वातीचे स्वामी नक्की काय करून गेले....

चांगल्या भुताच्या गोष्टी चाल्ल्यात तर उगाच काय तो आचरटपणा ? Uhoh
वेगळा बीबी काढा त्यासाठी. अमापवासीय. (अमाप वासीय)

लोक्स...खरेच कैच्याकै विषयांतर करू नका...
सगळेच छान छान भुतांच्या गोष्टी सांगतायत...
उगाच बीबी भरकटावून अॅडमिनना टाळे लावायला भाग पाडू नका...
अर्थात भुतेच ती...बंद दारातून येतात त्यांना टाळ्याची काय फिकीर..:)
पण तरीही नम्र विनंती

माफी अरे सहज आठवल म्हणून बोललो

बाकी रात्री मला खोपोलीला एकदा एक माणूस लिफ्ट मागताना दिसला
मी आणि मित्र बाईक वरून पुण्याहून येत होतो.

त्याचे डोळेच मला नीट कळले नाहीत अस वाटल की तिथे टुबलाईट्स लावल्यात. बर एखाद्या लाईटची रीफ्लेक्शन पडली म्हणावी तर तिथे लाईटच नव्हता.
नंतर मित्रही म्हणाला की त्यालाही ते वेगळच वाटल.

पुण्याकडे जाताना खालापुर टोल नाका पार केल्यावर उजव्या बाजूला एक इमारत आहे. ती अशी भारलेली आहे अस म्हणतात.
ज्याना ज्याना यातल कळत ते नक्की ओळखतील

सातार्‍यात कन्याशाळेत एका शिक्षीकेने आत्महत्या केली होती. तिचे भुत अजुनही शाळेच्या ३र्‍या मजल्यावर दिसते असं म्हणतात...

सातार्‍यात कन्याशाळेत एका शिक्षीकेने आत्महत्या केली होती. तिचे भुत अजुनही शाळेच्या ३र्‍या मजल्यावर दिसते असं म्हणतात...
>> LOL
वाई कन्याशाळेत पण भूत होतं Wink

लहानपणी आळीतल्या कवठीच्या झाडावर भूत आहे असं ऐकलेलं.. मग ते नाहिये हे सिद्ध करायला अस्मादिक (पैज वगैरे लावून) तिथे जाऊन आलेले.. आता मजा वाटतेय - काय तो (दाखवण्याचा) आवेश .. काय ती (मनातल्या मनात वाटलेली) भीती - आणि मग एकदा तिथे जाऊन आल्यावर एकदम कॉलर ताठ! (जणू काही तीर मारलेत)..

काहीच्या काही असतात ह्या भूताच्या कथा... गावात तर खूप ऐकायला येतात Happy

बायकोने नुकतीच नवीन "इंटर्नॅशनल स्कूल" जॉईन केलीये. ही शाळा ग्रँट रोडला आहे पुर्वीच्या चाळी पाडून बांधलेल्या इमारतीत. रोज सध्या तिथले किस्से घरी ऐकायला मिळतायत.

त्या बिल्डिंगमधे दोन भुतं आहेत म्हणे. पूर्वी जवळच तिथे स्मशान होतं. एक बाई आहे आणि एक बाप्या.

रात्री त्या विंगच्या सिक्युरीटी वाल्यांना दिसत्तात. चुकून हे लोक त्यांच्या वाटेत झोपले तर त्यांना रात्री अचानक कोणीतरी गळा दाबत असल्याचा किंवा छातीवर कोणितरी चढून बसल्याचा भास होतो.
शिवाय एक सिक्युरिटी बसतो त्याच्या खुर्चीजवळ एक दगड आहे मोठा, त्यावर ती बाई रात्रे येऊन बसते.

गेल्या आठवड्यात सिक्यिरुटीला कानफटात मारली त्या भुताने.

आता काय आणि किती खरं देव जाणे. पण तिथे जुने चाळ असल्यापासून राहणारे म्हणतात की पूर्वीपासून ही दोन भूते लोकांना दिसतात. रात्री त्यांच्या रस्त्यात झोपले तरच त्रास देतात.

भुतांनाच माहित बाबा.

छान" हे विशेषण भुतांना आहे की गोष्टींना???
ते ही नविन बाफ काढुन ठरवायचे काय? Proud
आता आशुन सज्जड दम दिला हे ही अमानविय नाही काय Biggrin

वाई कन्याशाळेत पण भूत होतं>>बरोबर आहे, दोन्ही गावं जवळ ना...पाहुणे असणारच जवळजवळाच्या गावी...

रच्याकने जोशी विहीरिच्या आसपास पण बरीच भुतं आहे अस ऐकुन आहे. खरंय का नानबा? Happy

*********

रात्री त्यांच्या रस्त्यात झोपले तरच त्रास देतात. >> मग, बरोबर आहे..लोकांनी त्याचा रास्ता रोको केल्यावर जायच कस त्यांनी. काय ती पण शेवटी भुतंच की...

अजुन एक किस्सा आठवला, पुर्वी (आजोबांच्या लहानपणी - १९२० च्या सुमारास) सातार्‍यात गावाबाहेर करंजे नावाची छोटी वस्ती होती (सध्या सातार्‍यातच धरतात)तिथे घनदाट झाडी होती. तिथे "बिनशेर्‍या" नावाच भुत फिरायच. त्याला मुंडक नसायच आणि तलवार घेऊन दिसंल त्याच्या मागं लागायच. अर्थात ते प्रेमळ भुत असल्याने त्याने कुणावर तलवारीने वार केला नाही.

>>चुकून हे लोक त्यांच्या वाटेत झोपले तर त्यांना रात्री अचानक कोणीतरी गळा दाबत असल्याचा किंवा छातीवर कोणितरी चढून बसल्याचा भास होतो.

हा अनुभव बर्‍याच लोकांचा आहे. मी परदेशात असतानाची गोष्ट. ते अपार्टमेन्ट घेउन खूप दिवस झाले होते. मला पोटावर झोपायची सवय आहे. एका शनिवारी रात्री अचानक झोपेतून जाग आली आणि एकदम आपल्या पाठीवर कोणीतरी बसलंय असं वाटलं. मी खडबडून जागी झाले. पण काही वेगळं जाणवलं नाही तेव्हा परत झोपले. दुसर्‍याच दिवशी म्हणजे रविवारी रात्री सुध्दा एकदा अशीच जाणीव झाली. काही वेळ जागी राहिले आणि पुन्हा झोपले. काही वेळाने पुन्हा तीच जाणीव. मग मात्र मी हबकले. लागोपाठ २ दिवसांत मिळून ३ वेळा असं झालं होतं. रात्रीच्या रात्री गाडी काढून एक ओळखीचं कुटुंब होतं त्यांच्याकडे जाऊन राहिले. नंतरचे ३-४ दिवस त्यांच्या घरूनच ऑफिसला जायचे. अर्थात पुन्हा अपार्टमेन्टमध्ये परत आल्यावर असा किंवा दुसरा कसलाच त्रास झाला नाही. बर्‍याचदा जड जेवण झालं असेल आणि लगेच झोपलं की असे अनुभव येतात. माझा हा अनुभव कदाचित त्यातलाच असावा.

दिनेशदा, स्पष्टीकरणाबद्दल धन्स Happy

आता हा एक अनुभव माझ्या आजोबांना आलेला. आधी सांगितल्याप्रमाणे आजोबा फॉरेस्ट खात्यात होते. बर्‍याचदा ते आपल्या बाईकवरून फिरत असत. पण त्या दिवशी ते चालत कुठेतरी चालले होते. वेळ बहुधा सूर्यास्ताची असावी. अचानक एका वळणावर एक बाई सामोरी आली. इथे दत्तमंदिर कुठे आहे असं तिने आजोबांना विचारलं. तिथे कुठलंही मंदीर नव्हतं त्यामुळे आजोबांनी तिला तसं सांगितलं. काही पावलं पुढे गेल्यावर त्यांच्या एकदम लक्षात आलं की ती बाई खूपच उंच होती. एकट्या बाईने जंगलात असं फिरणं धोक्याचं आहे हे तिला सांगावं म्हणून आजोबा वळले तर बाई गायब. मागे जायला सरळ रस्त्याशिवाय वाट नाही. कडेच्या जंगलात शिरली असावी म्हटलं तर तिथे झाडी बरीच विरळ त्यामुळे त्यांना तिच्या उंचीमुळे सहज दिसली असती.

दुर्देवाने आजोबा आता हयात नाहीत त्यामुळे ह्याबाबत आणखी माहिती मिळण्याची शक्यता नाही. हा अनुभव अनेक वेळा आईकडून ऐकला आहे, त्यावर बर्‍याचदा चर्चा केली आहे (एखादा भुताचा पिक्चर पाहून झाल्यावर Happy )

१. माझे आजोबा साधारण ५'६ च्या आसपास. भारतीय स्त्रियांची अ‍ॅव्हरेज उंची लक्षात घेता एखादी ५'९-६ फूट परदेशी बाई त्यांना जास्त उंच वाटू शकली असती. पण आईच्या मते तेव्हा बरेच युरोपियन लोक सपत्त्निक/सहकुटुंब फॉरेस्ट खात्यात भेटी द्यायला येत. त्यामुळे उंच परदेशी बायका ही काही नवलाई नव्हती. आजोबा भूताखेतांना मानत नसत. त्यामुळे ती बाई ५'९-६ फूट असून भारतीय असती तरी आजोबांनी तो अपवादच मानला असता. ती बाई ६ फूटापेक्षाही बरीच उंच असणार म्हणून "खूप उंच" असं आजोबांनी म्हटलं असावं.

२. बाई भारतीय होती का परदेशी हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

३. ती बाई भूत असती तर तिने दत्तमंदिराचा पत्ता नक्कीच विचारला नसता. घाबरवण्याचा उद्द्देश असता तर तिने काही वेगळं, हिडिस रूप घेऊन घाबरवलं असतं.

४. ह्या प्रकारानंतर आजोबांनी तिथल्या आदिवासींकडे दत्तमंदिराची चौकशी केली पण त्यांनी कुठलंही मंदिर तिथे नसल्याचं सांगितलं.

५. ती बाई त्या रस्त्यावरून काही क्षणांत गायब व्हायला कुठेच जागा नव्हती.

आम्हाला तरी खूप विचार करूनही तर्कसंगत उत्तर सापडलेलं नाहिये. तुम्हाला काही सुचतंय का?

>>तिथे "बिनशेर्‍या" नावाच भुत फिरायच. त्याला मुंडक नसायच आणि तलवार घेऊन दिसंल त्याच्या मागं लागायच.

ओरिजिनल Sleepy Hollow Proud

रच्याकने जोशी विहीरिच्या आसपास पण बरीच भुतं आहे अस ऐकुन आहे. खरंय का नानबा? स्मित
>> मला का विचारलय हे? माझे भाऊबंद आहेत असं वाटतय का गौतम? Proud Light 1

स्वप्ना, तुला आला तसा अनुभव (एकाच वेळी) एका पेक्षा जास्तजणांना आला असला तर? मग काय सगळेच जण जास्त जेवले असं म्हणायचं का? Happy

एक सॉल्लिड अनुभव..
मन्या (आमचा शेजारी) - अशा सगळ्या गोष्टींवर खूप विश्वास ठेवायचा... एके दिवशी त्याला एक मांजर(छबू) आडवं गेलं आणि मग त्याचं काम झालं नाही...
झालं! मन्याचा ह्या गोष्टीवरही चांगलाच विश्वास बसला!
पुन्हा एकदा तो महत्त्वाच्या कामाला निघालेला.. पुन्हा छबू आडवी आली.. मन्या ह्यावेळेस चांगलाच सावध होता.. घाई घाई करून तो पुढे पळाला..
ह्या भानगडीत झालं असं की छबू मन्याला आडवी जायच्या ऐवजी मन्याच तीला आडवा गेला... तेवढ्यात समोरून एक गाडी आले.. आणि छबूला धडकली हो.:(

आता ती बरी आहे.. पण मन्या दिसला की ३ पावलं मागे जाते म्हणे..
गावाला गेले की प्रत्यक्षच चौकशी करणार आहे!

>>स्वप्ना, तुला आला तसा अनुभव (एकाच वेळी) एका पेक्षा जास्तजणांना आला असला तर? मग काय सगळेच जण जास्त जेवले असं म्हणायचं का?

नाही ना, म्हणून तर "माझा हा अनुभव कदाचित त्यातलाच असावा." असं म्हणून मी माझ्यापुरतंच बोललेय Proud

मला का विचारलय हे? माझे भाऊबंद आहेत असं वाटतय का गौतम? >> हाहाहा, नाही सहजच विचारल जोशी विहीर वाईजवळ आहे म्हणुन माहिती असावी त्या एरियातली Happy

रच्याकने, अमेरिकन्स पण भुताखेतांचे दीवाने आहेत, टेक्सासमधले गोरे यावर बराच विश्वास ठेवतात. आपल्या ईथे गणापतीत जशी भुताची गुहा बनवतात तस हाँटेड मँशन्स बरेच बनवतात तिकडे (शक्यतो पिकनिक स्पॉटला कारण
तिकिटे जोरात विकली जातात)...खोटीखोटी भुतं ठेवतात...

काहि काहि गोष्टी खूप पापिलर होतात आणि सगळ्यांनाच असे अनुभव आल्यासारखे भास होतात. हा प्रकार मी नाशिक आणि कोल्हापूर मधेही ऐकलाय.
एक पांढरी साडी नेसलेली बाई, रात्रीच्या वेळी रिक्षा थांबवते. एका ठिकाणी जायचे म्हणते आणि तिथे रिक्षा नेल्यावर, मागे वळून बघितल्यावर ती नसते.
असा बाई गायब होण्याचा अनुभव, वंदना गुप्ते यांनी पण खूप वर्षांपूर्वी, लोकप्रभात लिहिला होता.

एकदा पहाटेचे विमान पकडायचे होते म्हणून मी पहाटे तीन वाजता शिवसृष्टीमधून रिक्षा पकडली. आमच्याच कॉलनीत एस टी स्टँड असल्याने, रात्री कधीही रिक्षा मिळू शकते. तर रिक्षाच्या समोरुन एक पांढर्‍या वेशातली व्यक्ती आडवी गेली, तिने रिक्षाकडे बघतच रस्ता क्रॉस केला. मला तरी त्यात काहि विशेष वाटले नाही. पण रिक्षावाला घाबरला. मला विचारले, "आदमी हि था ना वो ?" मी म्हणालो, या कॉलनीत ३० वर्षे राहतोय, कुणीही असले तरी माझ्या ओळखीचे असेल.
त्याचा काहि विश्वास बसला नाही, त्याने कॉलनीतल्या देवळासमोर रिक्षा थांबवली, आणि नमस्कार करुन आला.
पण आम्ही सुखरुप पोहोचलो होतो.

हे मात्र खरं आहे दिनेशदा, काही वर्षांपूर्वी मी प्रोजेक्ट टीमसोबत नाशिकहून पुण्याकडे येत होते. वाटेत एका पुलावर मिट्ट अंधार. आणि गाडी पुलावर चढायच्या आधीच शेजारी एक माणूस पांढरा शर्ट घालून उभा होता. कार येतेय म्हटल्यावर तो बाजूला झाला. गाडीचा हेडलाईट त्याच्यावर पडला तेव्हा तो गाडीच्या उजव्या बाजूला बसलेल्या आम्ही सगळ्यांनीच पाहिला. गाडी पुढे गेल्यावर आमचा एक सहकारी म्हणतो "अरे, वहा वो आदमीही खडा था ना? तुम सबने देखा ना?" तेव्हा सगळे दमलो होतो म्हणून. नाहीतर "कौनसा आदमी" वगैरे म्हणून त्याची सॉलिड खेचायचा चान्स होता. मग त्याला तिखटमीठ लावून सांगायला एक गोष्ट झाली असती.

हे पाठीवर्/पोटावर्/छातीवर बसून गळा दाबण्याचा अनुभव बर्‍याच जणांना येतो...
आमचं जुनं हॉस्टेल, स्टाफ क्वार्टर्समध्ये होतं. तिथे २ रूमच्या एका क्वार्टरमध्ये पुढच्या रूममध्ये ३ जणी व मागे आम्ही दोघी राहायचो. आजूबाजूला घनदाट झाडी, गवत... आमची रूम मागच्या बाजूला तोंड करून होती. एक दिवस सकाळी माझी रूमी घाबरून मला म्हणाली काल झोप लागली का गं? मी विचारलं हो का? कारण वाचताना नाईट मारली की मधेच कधीतरी झोप लागायची मग कधीतरी अर्धा एक तास झोपून होतेय न होतेय तोपर्यंत फटफटीत उजाडायचं...

तर म्हणाली काल मला कोणीतरी गळा दाबल्यासारखं वाटत होतं... मी डोळे उघडून तुला सांगायचा प्रयत्न करत होते पण शब्दच फुटत नव्हता तोंडातून... तू गाढ झोपलेलीस... असो त्या रात्रीपासून ती पुढच्या रूममध्ये झोपायला लागली आणि पुढच्या रूममधील एकीची रवानगी मागे... तिला सुद्धा त्साच अनुभव आला म्हणे.. मी सुटीसाठी घरी गेलेले. त्या मुलीचा एक पेपर असल्याने मागच्या रूममध्ये ती व पुढे दोघी होत्या... माझा मनुष्यगण असून मला कधीही हा अनुभव आला नाही.

Pages

Back to top