तो एक सत्यवान सावित्रीचा......

Submitted by सुनिल जोग on 22 February, 2011 - 04:38

वटपौर्णिमा म्हटलं की आपल्याला आठवते ती सत्यवान सावित्रीची कथा.... सावित्रीनं साक्षात यमाला घातलेलं साकडं आणि सत्यवानाला मिळालेलं जीवदान.
नवीन पिढीला हे सारं अकल्पित आणि खोटंही वाटेल की जे इतकी वर्षे मलाही तसंच वाटत होते. परंतु कलियुगात देखील सावित्रीइतकीच भक्ती बायकोवर करणारा सत्यवान अस्तित्वात आहे आणि रोजच्या जीवनात मी त्याला भेटतोय,इंटरअ‍ॅक्ट देखील करतो आणि त्याची भक्ती पाहून मी पार कोसळून गेलो. चांगुलपणा नावालाही शिल्लक राहिला नाही, कलियुगात हे असंच चालायचं,किंवा एकतर्फी प्रेमातून प्रेयसीवर अ‍ॅसिड फेकणार्‍याला ही व्यक्ती समोर आली तर शरमेनं आत्महत्या करायला लावेल..

.... तर त्याचं असं झालं... एक आट्पाट नगर होते.त्या नगरात एक राजपुत्र राहात होता. तो एकदा शिकारीला गेला असता त्याला एका आश्रमात एक तरूणी फुले वेचताना दिसली आणि तिच्या साधेपणाने त्याला मोहिनी घातली. तो तिच्यावर लुब्ध झाला. आणि त्याने तिला मागणी घातली. पुढे आइवडिलांच्या आशिर्वादाने विवाहसोहळा पार पडला आणि त्यांचा संसार सुखाने वाटचाल करु लागला. कालांतराने त्यालाएक पुत्ररत्न आणि यथावकाश एक पारिजातकासारखे सुंदर्,कोमल कन्यारत्न प्राप्त झाले. दिवस सुखात जात होते. राज्यकारभार सुरळित चालला होता. सुखाला कमतरता नव्ह्ती. पण.... पण... या सुखाला द्रुष्ट लागली....

राणीला किरकोळ तापाचं निमित्त झाले आणि उपचार करुन घरी जाणार अशा बेतात असतानाच तिचा मानसिक तोल ढळला. असंख्य औषधोपचार झाले,तपासण्या,वैद्य,परिक्षा झाल्या. पण राणीला काही गुण येईना. पण राजपुत्र ह्ताश झाला नाही. त्याने नेटाने संसार आणि उपचार सुरुच ठेवले. पण यश त्याच्याशी लपंडाव खेळत असावं. राजपुत्राचे आइवडिल अंतर्यामी दु:खी झाले. पण नातवंडांकडे पहात त्यांनी आयुष्य पुढे रेटायचे ठरवले.

राजपुत्र रोज जातीने मुलांची निगा राखायचा,कारभार हाकायचा आणि ही सर्व कसरत करत असताना त्याचा मानसिक आणि शारिरीक तोल ढळू न देता हसत खेळत जीवन जगायचा. दिवस जात होते. मुलही मोठी होत होती. पण हे ग्रूहछिद्र त्यांनी त्याच्या मित्राना किंवा आसपासच्या लोकांना देखील कळू दिले नव्ह्ते.

पण नियती काही वेळेस विनाकारणच कुणावर का वक्रद्रुष्टी ठेवते कुणास ठाउक? पुन्हा एकदा तापाच निमित्त होउन राणि आजारी पडली आणि तिची द्रुष्टीच नियतीने काढून घेतली. आतातर संसारात 'खराखुरा' लपंडाव सुरू झाला. राजपुत्र कुठे,मुले कुठे याचा विचार करीत राणि पदोपदी ठेचकाळु लागली. संसाराच्या रथाचे एक चक्र पुर्णपणे निकामी झालेल होतं. पल्ला लांबचा गाठायचा होता. पण राजपुत्र हिंमत हारत नव्ह्ता. त्याने या संकटालाच मित्र केलं. तो मुलांचाही दोस्त बनला. आणि चेहर्‍यावरची स्मितरेषा ढळू न देताअ त्याने नेटाने हा संसार अजुनहि कुशलतेने सुरु ठेवला.

त्याला जेव्हा जेव्हा भेटण्याचा योग येतो त्या त्या वेळी तारेवर कसरत करणार्‍या डोंबार्‍याच्या लटपटणार्‍या मुलाची आठवण येते. मी तसं त्याला बोलूनही दाखवले. पण त्याच्या बोलण्यात न होता खेद ना खंत.. उलट... आलिया भोगासी असावे.. ही व्रूत्ती! मी विचारले 'राजा संसाराचं वाळवंट झालंय.. कसा जगणार आहेस ?.... त्यापेक्षा दुसरं लग्न का करत नाहिस ??

त्यावर तो फक्त हसला आणि नजर दुसरीकडे वळवली.. यथावकाश त्याची कन्या १२-१३ वर्षाची झाली. नवीन जीवनाची ओळख कशी करुन देणार ही विवंचना त्याने माझ्याकडे व्यक्त केली. मी म्हटलं माझी पत्नी ,तुझे शेजारी ही जबाबदारी पार पाड्तील.. तर हा त्यापुढेही एक पाउल पुढे निघाला. तो मुलांचा मित्र होताच.शाळेतील शिक्षिकेकडून शास्त्रीय माहीती त्याने मुलीला दिली आणि शेजार्‍याक्डून इतर व्यवस्था करवली. अगदी तिला विश्वासात घेउन.

मित्रानो आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीधंदा सांभाळून आपण जेव्हा घरी येतो तेव्हा दारातच बुट फेकून मोजे आणि पँट कॉटवर भिरकावत आपण .. 'चहा टाक गं जरा.." असं म्हणतो त्यावेळी हा राजपुत्र मुलांना आवडणारी भाजी आणि किराणा सामान आणतो. सुटीच्या दिवशी डेटॉलने लादी साफ करतो. पावसाळ्यात रोज रात्री पाणि उकळून सकाळी मुलांच्या वॉटर्बॉटल्स भरतो... अगदी न कुरकुरता.

अंध पत्नीची काठी बनून आधार देत तिला तो गजरा माळतो. तेव्हा कळतं प्रेम काय चीज आहे.८० च्या दशकातील गाणि पत्नीला आवडतात म्हणून खास टीव्ही चॅनेल लावतो आणि रात्री स्वयंपाक घरात खास शेफ बनून..' सुन्या भजी आणि चहासाठी घरी चक्कर मार म्हणतो' . त्यावेळी हसायचे कुणाला? 'देवाला की नियतीला?'

मी परत एकदा विषय काढला.. 'राजा दुसरं लग्न कर. बरंच आयुष्य काढायचय.'
त्याने माझ्याडोळ्यात पहात सागितले...'तिने जे मनापासुन प्रेम केलं ना त्याची ही गुरुदक्षिणा समज' . मी फक्त ती देतोय. हीच वेळ माझ्यावर आली असती आणि तिने तुझा सल्ला मानला असता तर... ?
माझे तिच्यावर प्रेम अतिशय प्रेम आहे रे आणि तिचंपण माझ्यावर..
त्याच्या बोलण्यात कुठेही विषाद्,त्रागा,निषेध नव्हता. केवळ नितळ प्रेम टपटपत होतं ... श्रावणसरीसारखं आणि मी त्यात चिंब होउन भिजत होतो.

मित्रानो खरं सांगा इतके प्रेम कधि तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तिवर्,पत्नीवर/पतिवर केलंय? अहो साधा फ्लु झाला तर चिडचिड करणारे आपण.. ज्या दु:खाचा अंत नाही हे माहीत असुनही हसत झेलणारा हा आधुनिक 'सत्यवान' सावित्रीसाठी तपश्चर्या करतोय आणि ही शक्ती मला दे असे साकडे मी इश्वराला घालतोय. दर वटपौर्णिमेला त्याला मनोमन दंडवत घालतो. ती सावित्री भाग्यवान... जिला असा सत्यवान लाभला. तो आपणा सर्वाना लाभो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण....

गुलमोहर: 

खरोखर सलाम!

पण त्याला इतक्या जवळून पाहूनसुद्धा सारखा सारखा दुसर्‍या लग्नाचा आग्रह करण्याचा उद्देश नाही समजला....

सत्यवानाला शुभेच्छा.. सावित्रीच्या आजाराचे निदान ( डायग्नोसिस) काय होते?

त्या सत्यवानाचा अभिमान वाटला. 'दुसरं लग्न कर' असा सपशेल चुकीचा सल्ला मिळत असूनही त्याने डोकं ताळ्यावर ठेवून योग्य तो निर्णय घेतला.

____/\____

दुसर्‍या लग्नाचा सल्ला देण्याचा उद्देश म्हणजे त्याच्या मुलांचे संगोपन ही समस्या होय.
त्याच्या पत्नीला मानसिक आजार जडला होता. आणि कालांतराने तिची द्रुष्टीही गेली.
शेवटी ही कथा आहे. काही गोष्टी /मुद्दे कथेसाठी आवश्यक वाटले. तिथे कथेला एक टर्न मिळतो आणि सत्यवानाचे एक आगळे व्यक्तिमत्व पुढे आणण्यासाठी ते जरुरीचे वाटले.
आणि लेखनाच्या झपाटयात हे मुद्दे लक्षात येत नाहित. तुम्ही आणून दिलेत धन्यवाद.

आजच्या काळात असे लोक आहेत हे वाचून खरं सांगायचं तर विश्वास बसला नाही...
तुम्ही म्हणता मानसिक आजार होता तर आणि हे माहिती होते तर मानसोपचारतद्न्य वगैरेंची मदत का घेतली नाही का त्याने काहीच फरक पडला नाही?
देव त्याला असेच खंबीर ठेओ.

धन्यवाद शिल्पाजी. मानसिक आजारावर तज्ञांकरवी इलाज केले पण उपयोग झाला नाही. माझ्या पहाण्यात कित्येक अशी व्यक्तिमत्वे आहेत की खरंच विश्वास बसणार नाही. आणि म्हणूनच माणुसकी अजून जिवंत आहे यावर माझा गाढ विश्वास आहे आणि तो राहिलच्.अशा व्यक्तिंच्या कथा पुन्हा केव्हातरी पुढे लिहिणार आहे. पाहू कसे काय जमते ते.

फार फार ह्रदयस्पर्शी कथा, खरच अशी माणस जगात असतात, म्हणुनच माणुसकी!!चांगुलपणा!!निस्वार्थ
प्रेम!! हे सगळे शब्द शब्द न वाटता ते जवळचे मित्र वाटतात्....सुंदर कथा.....दुसर ल्ग्न कर असा सल्ला देण्यामागे केवळ मित्राची होणारी ओढाताण त्रास देत असावी म्हणुनच हा सल्ला ....असे आपले मला वाटते.

खुपचं छान रे सुन्या....

प्रेम म्हणजे प्रेम असतं
ते कमी किंवा जास्त नसतं...

जिला असा सत्यवान लाभला. तो आपणा सर्वाना लाभो.>>मला सत्यावाना पेक्षा सावित्री लाभली तरी चालेल. Wink

माझ्या बहिणीच्या कॉलनीत एक आणखी सत्यवान रहातो जो गेले १२ वर्षे आपल्या बेडरिडन पत्नीची सेवा करतो आहे. होळी आली की पुरणपोळी आणि संक्रांतीला गुळाच्या पोळ्या स्वतः करणारा हा सत्यवान पाहिला की नतमस्तक व्हावस वाटत. दुसरा दिवस उजाडला की माझ्या १५ मिनट आधी घरी आलेल्या बायकोला मी चहाची ऑर्डर देत सार काही विसरलेला असतो.

सुनीलजी,
तुमच्या मित्रांला,त्याच्यातल्या सत्यवानाला तर सलाम !
आजकालच्या मुखवटा घालुन फिरणार्‍या जगात असं अस्सल उदाहरण खुप दुर्मीळच !
त्यांना सांगा तुमच्याकडुन हजारो लोक प्रेम म्हणजे काय असतं हे शिकले असतील, इतर अजुनही शिकतील ....
Happy