स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना (खोखो - २)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2011 - 22:32

कृपया स्वतःला खो मिळाल्याशिवाय लिहू नये. तुम्हाला लिहायची इच्छा असल्यास तुम्ही खो मागू शकता. प्रत्येकाने खो शिवाय लिहिले तर संपूर्ण उपक्रम गोंधळाचा होईल. हे या खेळाचे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावे. खो घेण्याची इच्छा असूनही खो मिळाला नाही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला आपले मत मांडण्याची संधी नक्कीच मिळेल.

संयोजक खो (२)- चेतन
चेतन खो (१)- आशुतोष०७११, चेतन खो (२)- श्यामली
श्यामली खो (१) - अल्पना, श्यामली खो (२) - श्रद्धा
श्रद्धा खो (१) - दक्षिणा श्रद्धा खो (२) - गजानन
गजानन खो (१)- ललिता (Lalitas), गजानन खो (२)-इंद्रधनुष्य
आशुतोष०७११ खो (१)- ललिता_प्रीति, आशुतोष०७११ खो (२)- फारएण्ड
ललिता_प्रीति खो (१)- अश्विनी_के, ललिता_प्रीति खो (२)- अँकी_नं_१
अश्विनी_के खो (१)- नंद्या, अश्विनी_के खो (२)- मी अमि
मी अमि खो (१)- भावना गोवेकर, मी अमि खो (२) दक्षिणा
भावना गोवेकर खो (१) - जाईजुई भावना गोवेकर खो (२) - साधना
अल्पना खो (१) - चंपी अल्पना खो (२) - दीप्स
साधना खो (१) - निकिता साधना खो (२) -वर्षा_म
निकिता खो (१) - ध्वनी

वाचायला सोपे जावे ह्यासाठी ४ धागे केले आहेत. कृपया या गटातील सहभागी होणार्‍यांनी इथे लिहा.

चेतन | 8 March, 2011 - 07:50

माझ्यामते स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्री-पुरुष समानता आणि समाजाने दोघाना लावलेले समान निकष.

माझ्या आईने जगलेले आयुष्य आणि आता बायको जगत असेलेले आयुष्य ह्यात हाच फरक जाणवतो. माझी आई चुलमुल सांभाळणारी एक स्त्री होती. तिचा दिवस सकाळी ५.३० ला चालू व्हायचा तो रात्री १०.३०-११.०० लाच संपायचा. सकाळी बाबा ७ वाजता कामाला बाहेर पडायचे तेव्हा त्याना अल्पोपहार आणि चपाती-भाजीचा डबा तयार असायचा. पुढे मी जेव्हा ६.१५ वाजला घराबाहेर पडायला लागलो तेव्हाही मला हेच मिळायचे. दुपारच्या जेवणाचा आणि रात्रीच्या जेवणाचा मेन्यु वेगवेगळा. ह्याशिवाय मुलांची शिक्षणे सांभाळणे, बाजारहाट करणे, बँकेची कामे करणे ह्या सर्व गोष्टी तिच्याच पदरात. बाबा जेवल्याशिवाय ती जेवायची नाही. कितीही उशीर झाला तरीही ती त्यांची वाट बघत ताटकळत बसायची. घरातील महत्वाचे निर्णय घेताना बाबानी फारच थोड्या वेळा तिला विचारले असेल, पण प्रत्येक निर्णय तीने हुं का चु करता स्वीकारला. आम्हा सर्वांची आजारपणे ती न कंटाळता काढायची पण स्वतः आजारी असता कोणालाही कळू न द्यायची चूकही करायची. अश्याच एका शुल्लक आजारपणाचे निमित्त करुन जेव्हा ती गेली तेव्हा आम्हा सर्वाना जोडणारा एक दुवा गेला आणि प्रचंड पोकळी जाणवली. ह्या उलट माझी बायको प्रचंड धडाधडीची. करिअर व संसार एकाच जिद्दीने आणि ताकदीने पेललेली स्त्री. करिअर करायच्या वेळी करिअर केले आणि मुले झाल्यावर तेवढ्याच एकाग्रेतेने त्याना सांभाळले आहे. कोणताही महत्वाचा निर्णय आम्हा दोघांच्या खलबतीनंतरच होतो. घरातील कामपण वाटून घेतली जातात. तीला कंटाळा येतो तेव्हा बाहेर जेवायला जातो. विकांतात मुलाना सांभाळण्याची जबाबदारीपण माझ्यावर सोपवली जाते. थोडक्यात तिच्या मताला महत्व आहे.

पण हे सर्व मुळात शक्य झाले आहे ते शिक्षण, तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात होणार्‍या आमुलाग्र बदलांमुळे आणि पिढीतील अंतरामुळे (Generation Gap). आज शहरांमध्ये स्त्री-पुरुष समानता सहजतेने बघायला मिळते. त्याचाच प्रत्यय म्हणजे प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून तेवढ्याच धडाधडीने कामे करताना दिसतात. पण आज खरी गरज आहे तो हा बदल खेडोपाडी न्यायची. आजही स्त्रिया अबला म्हणून जगत आहेत, त्यांच्यावर आजही तितकेच अत्याचार होत आहेत. खेडोपाडी हा बदल झालाच तरच भारतात खरी स्त्रीमुक्ती झाली अस समजायला हरकत नाही.

संयोजक_संयुक्ता | 8 March, 2011 - 06:38
आशुतोष०७११ यांनी पाठवलेले हे पोस्ट.

स्त्री मुक्ती हा शब्दप्रयोगच मुळात मला मान्य नाही. तशी ही स्त्री आपल्या देशात बर्‍यापैकी मुक्त होती/आहे. अर्थात, माझा आक्षेप यातील मुक्ती शब्दाला आहे, संकल्पनेला नाही. या मुक्ती ऐवजी स्त्री ला मुबलक वैचारिक स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. मुळात स्त्री ही निसर्गतःच पुरुषापेक्षा कणखर असते,प्रगल्भ असते या मतावर माझा ठाम विश्वास आहे.

कोणत्याही स्त्रीला खरी गरज असते ती वैचारिक स्वातंत्र्याची. तिचे निर्णय तिनेच घेण्याची क्षमता तिच्यात असतेच. अशावेळी तिला आवश्यक असलेल्या कौटुंबिक पाठिंब्याची. पाश्चात्य देशात स्त्री तशीही बर्‍यापैकी स्वतंत्र आहे. आफ्रिकन किंवा इस्लामिक देशात हुकुमशाही आणि पुरुषप्रधान संस्कॄतीमुळे स्त्री कधीही स्वतंत्र नव्हती. खरंतर या देशांमध्ये कितपत स्त्री मुक्ती आहे हा संशोधनाचा विषय होईल.

हल्ली बर्‍याचशा क्षेत्रात स्त्रियाच आघाडीवर दिसतात. अगदी ज्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती त्या क्षेत्रातदेखील. मी काम करत असलेल्या पेट्रोलियम उत्खनन आणि विकास या क्षेत्राचंच उदाहरण घेऊ.
हे क्षेत्र पुरुषांची मिजास असलेलं आणि प्रामुख्याने शारिरीक क्षमतेचं कस पाहणारं. पण जसजसं यांत्रिकीकरण आणि संगणकीकरण यामुळे शारिरीक श्रम कमी होत गेले, तसतशा स्त्रियाही या क्षेत्रात खंबीरपणे काम करु लागल्या. प्रत्येक कामात शक्तीच उपयोगी पडते असं नाही तर शक्तीबरोबर बुद्धीही लागतेच. तसंही नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क या देशांत स्त्रिया या क्षेत्रात काम करीत होत्याच पण त्या गरज म्हणा किंवा तिथे उपलब्ध झालेल्या संधीमुळे.

आमच्या कंपनीनेही बर्‍याचशा स्त्रियांना संधी दिलीय. Field Operations मध्ये स्त्रिया आहेत तशा ऑफिसमध्ये operations शी निगडीत क्षेत्रातही आहेत. केवळ फायनान्स, पर्सनल/एच.आर अशाच क्षेत्रात नाहीत. Competitive advantage म्हणून वेगवेगळ्या देशात नियुक्ती झाल्यामुळे ह्या स्त्रिया मुक्त आहेतच, शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केल्याचा अनुभव गाठीशी आहे.

माझ्या दॄष्टीने ही खरी स्त्री मुक्ती. आपल्याच घरतील स्त्रीला विचार किंवा निर्णय स्वातंत्र्य न देणारे बरेच जण पाहिलेत. त्यापेक्षा तिला योग्य तो निर्णय तिचा तिनेच घेण्याचे स्वातंत्र्य देउन तिला कमकुवत न बनू देणं आणि एक आत्मनिर्भर स्त्री बनवणं हेच मला अपेक्षित स्त्री मुक्तीचं फलित.

श्यामली | 9 March, 2011 - 13:43
खो साठी हो म्हणायच्या आधी बरेच मुद्दे डोक्यात होते....पण आलेले खो वाचून आता बहुतेक लिहायला काही शिल्लक नाही असं वाटतय. ब-याच वर्षांपूर्वी बघीतलेले दोन प्रसंग इथे द्यावे वाटतायत तेवढेच लिहिते.

आम्ही काही वर्ष सटाण्याला होतो तिथलेच परस्पर विरोधी असणारे हे दोन प्रसंग यातला पहिला अगदी अशिक्षीत समाजातला तर दुसरा सुशिक्षीत आणि श्रीमंत घरातला.

घराच्या कुंपणाला लागून वडारवस्ती होती, त्या वस्तीत आणि आमचं घर यामधे अंतर फक्त भल्या मोठ्या अंगणाचच.

एका रात्री समोरच्या वस्तितून प्रचंड कलकलाट, रडारड ऐकू येऊ लागली, असं खर तर ब-याचवेळा व्हायच, आम्हालाही सवय झाली होती, पण आजचा आरडाओरडा वेगळा वाटत होता, मी आईला म्हटल आई कोणीतरी वारलेलं दिसतय, बघू या का, काय झालय ते कळेल तरी. आईच उत्तर एवढ्या अपरात्री बाहेर जायची गरज नाही, हेच होत अर्थात.

सकाळ झाली आणि टाकिवरच्या नळावर पाणी भरायला वस्तीतली एक आज्जी आली, तेव्हा मात्र मी तिला रात्री काय झालं विचारायला लगेच धावले होते. त्या आज्जीनी सांगितलेला प्रसंग ऐकून अवाक व्हायला झालं.

काल रात्री तिच्या सुनेला तिस-यांदा मुलगी झाली होती आणि मुलगीच झाली म्हणून सगळ गोंधळ चालला होता. मुलगा आणि सासरा ते बाळ टाकून द्यायला निघाले होते आणि त्या बाळाची आई आधी आर्जवं करुन, मग रडून ओरडून नाही म्हणत होती; पण ऐकतच नाहीत हे पाहिल्यावर नाळ तोडण्यासाठी तिच्याजवळच ठेवलेला कोयता होता तो घेवून त्या दोघांच्या अंगावर धावून गेली होती आणि या झटापटीत तिने तिच्या नव-याला बरंच जखमी केलं होतं.

मला त्याही वयात त्या बाईच कौतुक वाटल होतं.
स्त्री मुक्ती हा शब्द तिच्या शब्दकोषात नसणारच याची खात्री होती. पण स्वतःचा हक्क तिने ज्या तडफदारपणे दाखवला होता तो नक्कीच मनात घर करणारा.

ही घटना घडली साधारण त्याच्याच मागेपुढे, आमच्या एका ओळखिच्या घरात मात्र वेगळीच तयारी चालू होती. घरातली मुलगी पिशवी साफ ( हा तिथलाच खास शब्द प्रयोग) करण्यासाठी जवळच्याच गावाहून माहेरी आली होती. हे असं कितव्यांदा विचारल्यावर आठवत नाही ग, अस उत्तर आल होतं; मोठी मुलगी १३ वर्षांची होती.
काकूंना विचारल आईनी तर आठव्यांदा म्हणून उत्तर आलं होतं................. श्रीमंत घर,शेतीवाडी,बहिणीला भाऊ हवाच.....पोटच्या मुलीच्या जीवाचा विचार?????

इथे या मुलीला आपले अधिकार, स्त्रीभृणहत्या केल्यामुळे कमी झालेलं स्त्रीयांच प्रमाण हे शब्द ऐकून, वाचून माहित होते. आई वडील, नवरा, सासर, माहेरची मंडळी आणि डॉक्टर हे सगळेच या गोष्टीला जबाबदार होते पण त्यांना यात आपण काही वावग करत आहोत याचा पुसटसा देखील सल नव्हता.

या उपक्रमासाठी संयोजकांना धन्यवाद आणि खो साठी चेतनला धन्यवाद,
ललिता-प्रीति | 9 March, 2011 - 10:40
शाळेतल्या माझ्या ४-५ मैत्रिणींचा ग्रूप. तब्बल पंचवीस वर्षांनंतर त्या सर्वांना मी नुकतीच भेटले; त्यांच्यातल्या एकीच्याच घरी. भेटल्यावर आम्ही एकमेकींच्या अक्षरशः गळ्यात पडलो आणि मधली ती अडीच दशकं जणू गेलीच नाहीत अश्या थाटात आमच्या गप्पा, बडबड, दंगा सुरू झाला. जिच्या घरी जमलो होतो तिचं एकत्र कुटुंब. पण त्यादिवशी तिचे सासू-सासरे आणि नवरा सगळेच आपापल्या कामासाठी बाहेरगावी गेलेले होते. ’तिच्या घरी कुणीच नाहीये, आपण तिथेच जमू या’ - आदल्या आठवड्यात आमची निरोपा-निरोपी अशीच झालेली. तिनंही त्याला लगेच संमति दर्शवलेली.
खरं तर, तिच्या नववीतल्या मुलाची परिक्षा चालू होती आणि रविवार असल्यामुळे तो घरात होता. सुदैवानं घर मोठं असल्यामुळे आणि एका खोलीत दार बंद करून घेऊन आपला मुलगा दिवसभर अभ्यास करेल, किंबहुना मैत्रिणींच्या घोळक्याचा त्याला काही त्रास होणार नाही हा विश्वास तिला होता. मोठं घर आणि स्वतंत्र खोली हे निकष तर घरातल्या वरिष्ठांनाही लागू होतेच.
पण तिचे सासू-सासरे घरी असते तर तिनं तिच्या घरी जमण्याचा प्रस्ताव स्वीकारला असता?
आम्ही तरी इतक्या मोकळेढाकळेपणाने अर्धा दिवस मनमुराद गप्पा मारल्या असत्या?
तिच्या नवर्‍यानं मुलाच्या परिक्षेसाठी आपली स्वतःची कामं बाजूला टाकली असती तर कदाचित आम्ही सगळ्या जणी बाहेर कुठेतरी भेटू शकलो असतो. अर्ध्या दिवसाऐवजी संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम आम्हाला ठरवता आला असता. पण त्यानं हे आपणहून, मनापासून, उस्फूर्तपणे केलं असतं?
जेव्हा अश्या काही प्रश्नांची खात्रीशीर ’हो’ अशी उत्तरं येतील, त्यानंतरच्या ८ मार्चला मी सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन.

अभ्यासात, खेळात सर्वात हुशार असलेली आमच्यातली एक. शिक्षण पूर्ण झाल्याझाल्या तिला उत्तम नोकरी मिळाली. तिच्याही सासरी एकत्र कुटुंब, तिला स्वतःला एक मुलगी. असं असूनही इतकी वर्षं तिची नोकरी यशस्वीरीत्या चालू होती. गप्पा मारता मारता माझ्या लक्षात आलं की तिनं हिरवा चुडा भरलेला होता. आधी वाटलं की घरी नुकतंच काही लग्नकार्य झालं असेल किंवा होऊ घातलं असेल. म्हणून दुर्लक्ष केलं. पण पुनःपुन्हा त्या बांगड्या, पाटल्यांवरच माझी नजर जात होती. शेवटी न राहवून तिला मी विचारलंच. ‘आमच्या घरी फाऽऽर ऑर्थोडॉक्स आहेत सगळे. त्यामुळे हे नेहमी माझ्या हातात असतं’ असं उत्तर मिळालं.
मनात अनेक प्रश्न उभे राहीले.
लग्नापूर्वीच मिळालेली नोकरी टिकवून ठेवण्यासाठीही तिला आपल्या त्या फाऽऽर ऑर्थोडॉक्स घराशी झगडा करावा लागला असेल का?
त्या झगड्याने अतीव थकल्यामुळे तिनं इतर वेषभूषेवरच्या मर्यादा इ. गोष्टींकडे कानाडोळा केला असेल का?
याहून वेगळी अशी काही शिकवण आपल्या मुलीला देण्याची इच्छाही तिनं त्यापायी सोडून दिली असेल का?
जेव्हा अश्या काही प्रश्नांची खात्रीशीर ’नाही’ अशी उत्तरं येतील, त्यानंतरच्या ८ मार्चला मी सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन.

****

स्त्री आणि पुरूष यांच्यात अगदी अत्यावश्यक असे जे फरक असायला हवेत तेवढ्यांची निसर्गाने व्यवस्थित योजना केलेली आहे. त्या योजनेत हस्तक्षेप करण्याची मुळीच आणि कधीच गरज नव्हती. तरीही घरटी एक-एक ‘आहे मनोहर तरी...’ निर्माण होतील अशी आज परिस्थिती आहे.
या ‘आहे मनोहर तरी...’ शीर्षकातला ’तरी’ हा शब्द आणि त्यापुढची तीन टिंबं ज्यादिवशी गायब होतील, त्यानंतरच्या ८ मार्चला मी सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन.
कुणी म्हणेल, अश्या सगळ्या ’नंतरच्या ८ मार्च’ची मग गरजच भासणार नाही! पण ’फ्रेंडशिप डे’ किंवा ’भाऊबीज’ हे देखील कुणाची गरज म्हणून साजरे केले जात नाहीत. ‘मदर्स्‌ डे’ किंवा ’फादर्स्‌ डे’ची ही त्या माता-पित्यांनी याचना केलेली नसते.
गरजेपोटी, हक्कांपोटी, त्या हक्कांची जाणीव करून देण्यापोटी जेव्हा ८ मार्च ’साजरा’ होणं थांबेल त्यादिवशी मी जगातलं सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन !!!

------------------------------------------------------------------------

अश्विनी के | 9 March, 2011 - 13:40
सगळ्यांचे खो खूप छान आहेत.

माझ्या दृष्टीने खरा स्त्री मुक्तीदिन कधी असेल?

- माझ्या रोजच्या संपकातले सुशिक्षित, कर्तबगार नवरा बायको, पदरात आधिच्या दोन मुली असतानाही अजून कुणाचं तरी बघून ठरवतात की एक चान्स घ्यायचा आणि चौथ्या महिन्यात गर्भाचं लिंग काय आहे ते बघून, मुलगी असल्यास अ‍ॅबॉर्शन आणि मुलगा असल्यास दिवस भरु द्यायचे. मी विचारले, चौथ्या महिन्यात मुलगी आहे असं कळलं तर गर्भ पाडण्यात तुला धोका नाही का गं? तर उत्तर आलं डॉक्टर म्हणाल्यात की हे सुरळीत होऊ शकतं. मग मुलगा आहे समजल्यावर पुढे तिला तिसरं मूल होऊ दिलं गेलं. त्या डॉक्टरचाही निषेध, त्या आई वडिलांचाही निषेध. आपण त्रयस्थ म्हणून त्यांच्या पर्सनल गोष्टीत काही बोलण्याचा अधिकार नाही. सगळ्यांचीच ती अवस्था झाली होती. मुलगा असल्याने ते बाळ वाचलं. पण जर ते मुलगी असतं तर ते मारलं गेलं असतं. हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं असतं म्हणून माझाही निषेध. वरती जेव्हा देवाच्या नावावर हे खपवलं गेलं तेव्हा तर संताप झाला होता. देवानेच मुलाचं दान पदरात घातलंय तर कशाला अव्हेरा म्हणे ! मग मुलगी असती तर ते देवाचं दान नाही का? का? जर आत्ताच्या काळातही तिसरं मूल होणं चालतं तर ते कुणीही असलं तरी चालेल हे जेव्हा समाजाचे सगळे थर मनापासून स्विकारतील तेव्हा त्या स्त्री जातीला समानता मिळेल.

- स्वतःच्या बाळाचं दुपटं, लंगोट बदलणं हे आई सारखंच बाबाही काहीच कमीपणा मनात आणता करत असेल आणि आपल्या मुलाचा/जावयाचा हा सद्गुण जर "काय काय बिचार्‍याला करावं लागतं? अगदी वाईट वाटतं हो त्याला या खस्ता खाताना पाहून !" अशा रितीने हेटाळला जात नसेल तेव्हा स्त्री / पुरुष यांच्या जबाबदार्‍यांमधील अनावश्यक फरक दूर होतोय असं मला वाटतं.

- जेव्हा नैसर्गिकरित्या असलेल्या स्त्री पुरुषांमधील फरकांव्यतिरिक्त, जेव्हा खरोखरंच स्त्रीची क्षमता पुरुषांच्या अ‍ॅट पार आहे हे मान्य करुन त्यांना समान संधी दिली जाते तेव्हा खरंच त्यांची क्षमता आपण फुकट न घालवल्याची खरीखुरी जाणिव समाजाला होईल तेव्हा "प्रकृती व पुरुषाच्या" समान काँट्रिब्युशनने बनलेल्या सृष्टीचा बॅलन्स निदान मानवापुरतातरी साधला जाईल. स्त्रीला कमकुवत मानून मागे सारणार्‍या समाजाने त्याच वेळी आठवून पहावे की हिनेच तिचा दुसरा जन्म झाल्यासारख्या कळा सोसून आपल्याला हे जग दाखवलं आहे.

श्रद्धा | 9 March, 2011 - 18:55
'खो-खो'च्या उपक्रमाबद्दल संयुक्ता संयोजकांचे आणि मला लिहिण्यासाठी खो दिल्याबद्दल श्यामलीचे आभार.

________________________________

लहानपणी उन्हाळ्यात रात्री तहान लागल्यावर दरवाजाबाहेर अंधारात ठेवलेल्या माठापर्यंत जायची भीती वाटल्याने मी आणि धाकटा भाऊ जाऊन वडिलांना उठवत असू. आईला एकदा झोपमोड झाल्यावर पुन्हा लवकर आणि नीट झोप लागत नाही, म्हणून तिला उठवायचे नाही हे वडिलांनी बजावून सांगितले होते. आम्ही मुद्दाम तिला त्रास द्यायला उठवायला गेलो तर बाबा दटावायचे. 'त्रास देऊ नका रे.. तीही माणूस आहे. दमते.' वगैरे नेहमी सांगत असत. तेव्हापासून आजपर्यंतच्या अनेक प्रसंगांचा विचार करताना वडिलांनी कायम नात्यागोत्यांतल्या, ओळखीच्या/अनोळखी बायकांना 'माणूस/व्यक्ती' म्हणूनच वागवल्याचं दिसून येतं. कार्यामध्ये पुरुषांच्या पंगती आधी, बायकांच्या नंतर हे त्यांना पटत नाही. 'सगळे मिळून एकत्र बसून, पदार्थांची भांडी मध्ये ठेवून जेवूया. कुणी कुणाला वाढायला नको' हे त्यांचं ठरलेलं वाक्य असतं. माझ्या आणि माझ्या लहान भावाच्या एकंदरीत शिक्षण वगैरे वाटचालीत त्यांनी कधीही मुलगा/मुलगी म्हणून वेगवेगळे निर्णय घेतल्याचे, दुजाभाव केल्याचे आठवत नाही. आईच्या वडिलांची, माझ्या आजोबांचीही तीच पद्धत होती. त्या काळातील रीतीप्रमाणे आजीच्या घरच्यांनी पत्रिका पाहिल्यानंतर ती अजिबात जुळत नसली तरी माझ्या आजीशीच लग्न करणारे, लग्नानंतर तिला दहावीची परीक्षा द्यायला लावणारे, तिने नोकरी वगैरे काही केली नाही तरी तिच्या नावे वेगळा पैसा गुंतवून, त्याचे सर्वाधिकार तिच्याकडे देऊन ती आर्थिकदृष्ट्या कायम स्वयंपूर्ण असेल असं पाहणारे, तिच्याशी वेगवेगळ्या बाबींवर सल्लामसलत करणारे आजोबा! त्याचप्रमाणे आईनेही माझ्याबाबत 'तू मुलगी आहेस त्यामुळे तुला अमुकतमुक शिकलंच पाहिजे/आलंच पाहिजे' असा प्रकार केला नाही. अर्थात, नातेवाइकांमधले सर्वच लोक असेच होते असंही नाही. परंतु, अगदी नेहमी संबंध येणार्‍या स्त्रियांची आणि पुरुषांचीही विचारसरणी वरीलप्रमाणे असल्याने 'मी मुलगी आहे/मी स्त्री आहे' याहीपेक्षा 'मी पण एक व्यक्ती आहे' हा विचार सुरुवातीपासूनच रुजला. त्यामुळे 'स्त्रीमुक्ती म्हणजे मुलगी/स्त्री असण्याच्या जाणिवेकडून व्यक्ती असल्याच्या जाणिवेकडे झालेला/केलेला प्रवास' असं मला वाटतं.

अर्थात हा प्रवास तितका सोपा नाही. कारण यादरम्यान स्त्री म्हणून वेगवेगळ्या आघाड्यांवर आपल्यातील बहुतांश जणींना छोट्याछोट्या गोष्टींसाठी लढा द्यावा लागतो. घरात आलबेल असलं तरी बाहेर हे अनुभव मलाही आलेले आहेत. कधीकधी बायका सर्वसाधारणपणे डोक्याला शांतता राहावी म्हणून काही मान्य नसलेल्या तडजोडी करतात(ललिता-प्रीतिने लिहिलेली कायम चुडा घालून राहणारी तिची मैत्रीण), कधीतरी बाई म्हणून असलेल्या बंधनांना, बाई म्हणून होणार्‍या त्रासाला संधी मिळताच तीव्र प्रतिक्रिया उमटते(श्यामलीने लिहिलेल्या कोयता घेऊन नवर्‍याच्या अंगावर धावून जाणार्‍या बाईचं उदाहरण! बंधनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर साडी हे बाईवर असलेल्या बंधनासारखं मानणारी आणि म्हणून कधीही कटाक्षाने साडी न नेसणारी एक मैत्रीण आहे), कधीतरी स्वतःसाठी लढतालढता त्या भरात दुसर्‍या व्यक्तीला केवळ व्यक्ती म्हणून वागवायचं विसरायला होतं (स्वतःचा नैसर्गिक कल तसा आहे म्हणून लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून स्त्री बनलेल्या एका व्यक्तीवरची एका 'मैत्रिणीची' हिणकस प्रतिक्रिया)! स्त्रीमुक्ती म्हणजे आपल्याला नेमकं काय हवंय? आपण कुठल्या प्रसंगात नेमकं कसं वागायला पाहिजे, याबद्दल मनात गोंधळ उडू शकतो. पण पहिल्या परिच्छेदात म्हटलं तसं या सार्‍या घडामोडींमुळे गोंधळून न जाता 'आपण इतर चारचौघांसारखीच एक व्यक्ती आहोत' ही जाणीव कायम आपल्या मनात जागी ठेवणं, हा कळीचा मुद्दा आहे. एकदा तेवढं मनात पक्कं रुजलं की, ते आपल्या वागण्यातून इतरांपर्यंत पोचू लागतं. मग 'स्त्री आहेस म्हणून तू त्यागी, सहनशील, कष्टाळू, सद्गुणांची पुतळी असायलाच हवीस' वगैरे अपेक्षा आपल्यापर्यंत हळूहळू येईनाशा होतात. उलट इतर चारचौघांसारखे आपल्यातही व्यक्ती म्हणून गुणदोष, क्षमता, मर्यादा असणार, हे पहिल्यांदा आपण स्वतःशी आणि मग संपर्कात आलेल्या इतर व्यक्तीही आपसूक मान्य करू लागतात. तेव्हा आपल्या मनात उमटलेली स्वतःची प्रतिमा ही प्रामाणिक आणि खरी असते. 'सुपरवुमन' बनण्याची आवश्यकता मग भासत नाही आणि कुठलीही गोष्ट 'बायकी आहे' म्हणून ती कटाक्षाने टाळण्याचंही प्रयोजनही राहात नाही.

एकदा ही विचारसरणी अंगिकारली की, आजूबाजूच्या कमी वेगाने बदलणार्‍या सामाजिक परिस्थितीमुळे काही संघर्षाचे प्रसंग उद्भवणारच. तिथे प्रत्येक बाईची नक्कीच कसोटी लागणार. त्या प्रसंगाला आपण कसं हाताळतो, आपली भूमिका नीट जपतो की नाही, यावरून आपल्याला अजून केवढा पल्ला गाठायचा आहे, याचा अंदाज येतो. तडजोडी कराव्या लागल्या, चुका झाल्या, आपल्याला तेवढं बळ नाही म्हणून कधी माघार घ्यावी लागली तरी पुन्हा नेटाने आपण ठरवलेल्या लक्ष्याकडे प्रवास चालू ठेवणं महत्त्वाचं! आपल्या हयातीत लक्ष्य साध्य होईल/न होईल, किमान १०० टक्के प्रामाणिकपणे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिल्याचं समाधान नक्कीच असेल.

हे झालं वैयक्तिक पातळीवर! पण हा विचार बर्‍याच स्त्रियांपर्यंत अजून पोचलाच नाहीय आणि तो तसा पोचायला हवा, याची जाणीव आहेच. तो विचार पोचवण्याचं काम इतर करू शकतात, किंबहुना त्यांनी ते करावंच. पण पुढचा प्रवास जिचा तिचा स्वतंत्रपणे व्हायला हवा. काळ, परिस्थिती, देश कुठलेही असले तरी खर्‍या अर्थाने मुक्त होण्यासाठी ही जाणीव जिची तिला होणं फार महत्त्वाचं आहे आणि महिला दिन किंवा इतर प्रसंगांच्या निमित्ताने होणार्‍या चर्चेतून, विचारांच्या देवघेवीतून ती जाणीव प्रत्येकीपर्यंत नक्कीच झिरपत जाईल, अशी आशा नक्कीच आहे.
__________________________________

मी अमि | 9 March, 2011 - 22:37
अश्विनी, खो दिल्याबद्द्ल धन्यवाद. इथे बर्‍याच जणांनी खुप चांगले विचार मांडले आहेत... माझेही दोन शब्द मांडते....
-------------
७ मार्च २०११
इमेलमधून एक सर्क्युलर आले की, उद्या महिला दिनानिमित्त सर्व स्त्रियांसाठी १ वाजता लंच आहे आणि त्यानंतर एका तज्ञ डॉक्टरचे 'तणाव मॅनेजमेंट' यावर २ वाजता व्याख्यान आहे.

८ मार्च २०११
सकाळी ट्रेनमध्ये बहुसंख्य स्त्रिया भरजरी साड्या नेसून दिसल्या.

साधारण ११च्या दरम्यान वहिनीशी बोलणे झाले. तिच्या ऑफिसात महिला दिनानिमित्त रेट्रो स्टाईल पार्टी ठेवली होती. कुणी अनारकली बनले होते, तर कुणी नीतु सिंग तर कुणी मुमताझ स्टाईल साडी नेसून आले होते

दुपारी लंचसाठी ऑफिसातील सर्व स्त्रिया जमल्या (जवळ पास १००). एकमेकींच्या साड्या, दागिने इ. गोष्टींची आस्थेने चौकशी सुरू होती. हास्यविनोद रंगले होते. महिलादिनाची मेजवानी झकास होती. एक जण जीन्स आणि टीशर्टमध्ये आली होती. तिला एका मध्यमवयीन स्त्रीने म्हटले की, 'आज जीन्स घालून आलीस? आज तर साडी नेसायला हवी'. त्यावर त्या मुलीने उत्तर दिले की, आज तर मुद्दमहून जीन्स घालायची असते'

डेस्कवर काहितरी काम होते, ते आवरून २.१५ वाजता ऑडोटोरीयम मध्ये पोहोचले... मनात ओशाळवाणं वाटत होतं की, व्याख्यान सुरू झालं असेल. तिथे जाऊन पाहिले तर, १५-२० जणीच आल्या होत्या. २.४५ पर्यंत वाट बघून व्याख्यान सुरू केले गेले. १५-२० जणींमधल्या काही जणी अर्ध्यातून उठून गेल्या. त्यातली एक मीही होते. मोबाईलवर सारखे सारखे डिपार्टमेंटमधून फोन येत होते. त्यामुळे तणावमुक्तीचे व्याख्यान ऐकता ऐकता माझा ताण वाढू लागला होता.
---------

अशाच प्रकारचे अनुभव मला दरवर्षी येतात. साडी नेसण्याचा आणि जीन्स घालण्याचा महिला दिनाशी काय संबंध आहे, हे मला आजपर्यंत कळले नाही. महिला दिनाच्या दिवशी लंच किंवा थीम-बेस्ड पार्टी का करावी, हेही मला लक्षात आले नाही.

कर्मचारी स्त्रियांच्या कल्याणासाठी काहितरी केलय हे दाखवण्यासाठी ऑफिसात व्याख्यान ठेवले गेले (एक फॉर्मलिटी म्हणून) इतर कर्मचार्‍यांसाठी 'काहितरी टाईमपास चाल्लय' इतकच त्याचं महत्व. म्हणून व्याख्यानाला गेलेल्यांना फोन करण्यात त्यांना गैर वाटले नाही.

मुळात ९०% स्त्रियांचे त्यांच्या आरोग्याशी संबधीत असलेल्या व्याख्यानाशी काहिच देणेघेणे नव्हते.
______

गजानन | 10 March, 2011 - 02:04
खूप चांगला प्रतिसाद मिळतोय या उपक्रमाला. त्याबद्दल संयुक्ताचे अभिनंदन! मला खो दिल्याबद्दल श्रद्धाला धन्यवाद. आणि शैलजाचेही आभार.

एवढ्या लोकांनी मनापासून लिहिलंय यात बरेच मुद्दे आले आहेत.

माझेही विचार मी थोडक्यात लिहितो.

१) माझ्या भाचीच्या जन्माच्या वेळेची गोष्ट : इस्पितळातून सोडल्यावर घरी निघताना प्रसूतिकक्षातल्या आयांनी बाळाच्या आजीला (म्हणजे अचूक निशाणा) घेरलं. बाळाच्या आगननाने हरकून गेलेली पहिलटकरीण आजी म्हणजे माझी आई अर्थातच त्यांच्या आग्रही मागणीला बळी पडली. आणि काही रुपये त्यांच्या हातावर टेकवले. ते त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी असावेत. कारण आमची पाठ फिरतेय तोवरच त्यांच्यातला संवाद आमच्या कानावर आला - "असू दे. मुलगी झालीय.. मग काय जोर करू शकत नाही.."

२) मुलीच्या जन्माच्या वेळेची गोष्ट : माझी मुलगी मुदतपूर्व प्रसूतीत जन्माला आली. जन्माच्या वेळची तिची अवस्था फारच नाजूक होती. तिच्या जगण्याविषयी डॉक्टरांना खात्री वाटत नव्हती. पुढच्या अडचणी, त्यांवरचे उपचार आणि त्यासाठी येणारा अवाढव्य खर्च याची त्यांनी आम्हाला स्पष्ट कल्पना दिली. शिवाय हे केवळ प्रयत्न म्हणून करायचे आहे - तेव्हा पुढचे उपचार करायचे का, असे त्यांनी आम्हाला विचारले. अर्थातच पुढच्या उपचाराकरता मुलीला दुसर्‍या इस्पितळात तातडीने पाचारण करण्यात आलं. पण त्यापूर्वी तिथून निघताना प्रसूतितज्ञ डॉक्टरच्या मदतनीसेच्या तोंडून सहज निघालेला उद्गार - "इतना मतलब कुछ भी करने को तय्यार हो गये.. कम से कम लडका तो होता.."

३) मागे कोणत्या तरी बाफावर मूल दत्तक घेण्याविषयीची चर्चा चालली होती. त्यात जाता जाता रैनाने एका खरवडणार्‍या सत्यावर प्रकाश टाकला - जन्मल्याबरोबर मुलग्यांना जेवढ्या प्रमाणात बेवारस म्हणून सोडण्यात येते त्यापेक्षा मुलींचे प्रमाण कितीतरी जास्त असते.

शिक्षितांच्या बाबतीतले एक उदाहरण - तरूणपणीच नवरा निवर्तल्यावर तिने मोठ्या जिद्दीने आपल्या मुलीला मोठी करून उच्च शिक्षण दिले. मुलीला चांगली नोकरी लागली. थोडी स्थिरस्थावर झाल्यावर मुलीने आईच्या नावे एक घर घेतले. दरम्यान मुलीचे लग्न ठरले आणि झालेही. अर्थातच उच्चशिक्षित, चांगल्या पगाराची नोकरी असणारा वगैरे वगैरे जोडीदार. लग्नानंतर लगेचच बायकोच्या पगारातून तिच्या आईच्या नावावर असलेल्या घराकरता हप्ते जाता कामा नयेत या गोष्टीवरून पुढे त्यांचा घटस्फोट झाला.

सगळ्या गोष्टी अफाट चीड आणणार्‍या. आणखी बर्‍याच ठिकाणी चीड येत गेली. मग विचार केला. याच्यावर चिडून काय होईल? असे उद्गार काढणार्‍यांना ते असेच शिकवले गेलेय. हेच त्यांनी पहिल्यापासून पाहिलेय. हेच त्यांनी पहिल्यापासून ऐकलेय. आजूबाजूला याच्यातच ते वाढलेत. बर्‍याचदा हे चूक आहे हे त्यांच्या गावीही नाही. रंगांधळ्या माणसाला जगात आणखी रंग आहेत हे कोणी सांगितले नाही तर कळेल का? अशी अवस्था असते. आपण शक्य तेवढा हा थरांवर थर चिवट होऊन बसलेला रंगांधळेपणा काढायचा.

सगळ्या थरातल्या स्त्रीमुक्तीविषयीची माझी पायाभूत समज :
०. स्त्री ही एक माणूस आहे. तिला इतरांसारखेच मन, भावना, तहान, भूक, इच्छा, स्वाभिमान आहे आणि त्याचा आदर ठेवला पाहिजे.
१. कोणत्याही निर्णयात स्त्रीला 'नाही' म्हणता येण्याइतकी मोकळीक मिळायला हवी.
२. कोणत्याही क्षणी तिच्या होणार्‍या मानसिक किंवा शारीरिक कुचंबनेविषयी 'आपण घरच्यांशी मोकळेपणाने बोलू शकतो,' असा तिला विश्वास वाटायला हवा.
३. तिची जीवनशैली / करिअर तिला ज्या प्रकारे जगायचे आहे, तसे तिला ते जगण्याची मोकळीक मिळायला हवी.
४. स्त्रीने यापैकी कोणत्याही बाबतीत आपल्यावर "स्त्री आहे म्हणून" कुरघोडी करण्यात येतेय हे जाणवेल तेथे ठामपणे त्याला विरोध करायलाच हवा.
५. कोणीतरी सतत आपली काळजी वाहणारा असेल तरच आपण जगू शकतो, या विचारातून स्त्रीने बाहेर पडावे.

घरातले बोलायचे तर आई गृहिणी. वडिलांनी स्त्री म्हणून आईचा अनादर केल्याचा एकही प्रसंग आठवत नाही. वडिलही उत्तम स्वयंपाक करणारे. कपडे, धुणी, स्वयंपाक वगैरे घरात दिसेल ते काम करण्यात त्यांना कधीच काही वाटले नाही. पत्नी माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे त्याचा मला कमीपणा वाटत नाही. मला सख्खा मेहुणा नाही याचं मला ओझं वाटत नाही. माझ्या लहान मुलीचं सगळं करण्यापासून संसारातलं कोणतंच काम करायला मला कमीपणा वाटत नाही.

भावना गोवेकर | 10 March, 2011 - 16:17 नवीन

स्त्रीमुक्तीबद्दल बर्‍याच ठिकाणी लिहिल जातं. बोललं जातं. त्या अनुषंगानेच गावी असताना मी आजीला म्हटलं होतं अगं बायकांमध्ये आता बरीच जागरुकता येतेय. स्वत:च्या न्याय हक्कांसाठी बायका आंदोलन करतात, लढा देतात तर तिच उत्तर तयार, भरल्या पोटार ढेकर देवक हेंचा गो काय जाता? आमका दोन टायमाच्या जेवणाची तोंडमिळवणी करुकच किती लढो देवचो लागता तर बाकीचे गोष्टी बरेच दुर आसत.
खेड्यापाड्यात अजुनहि स्त्री पिचलेली, संसारासाठी खस्ता खाणारीच आहे.

आमच्या शेजारी एक मुस्लिम जोडपं रहात होतं. एक मुलगा, एक मुलगी अस सुखी कुटुंब. दोघेहि शिकलेले. पण काय झालं कोण जाणे. त्याला अजुन मुलगा हवा होता म्हणुन तिच्यावर अनन्वित अत्याचार. कितीतरी वेळा तिचं अबॉर्शन मुलगी नको म्हणुन.. नंतर नंतर तर तो तिला भर रात्रीचा घराबाहेर काढु लागला.. कित्येक वेळा ती शेजार्‍यांकडे राहिली तर त्या लोकांनी तिला थारा दिला म्हणुन त्या लोकांबरोबर याचं भांडण. अश्यात मग तिला तिचे माहेरचे लोक घरी घेवुन गेले. मुल याच्याकडेच. खुप छोटी होती मुल. त्याने त्या मुलांनाहि तिच्यापासुन तोडलं. खुप वाईट वाटायच तिची मुलांसाठी चाललेली उलघाल बघुन. आता ती मुलं मोठी झालीत. इथे हे उदा. द्यायचं कारण म्हणजे स्त्रीला दिली जाणारी वागणुक. अन मुख्य म्हणजे स्वताला शहाणी म्हणवणारी हि लोकं स्त्रीला काय यंत्र समजतात?

खरच ललिताने जे वर लिहिलय, 'गरजेपोटी, हक्कांपोटी, त्या हक्कांची जाणीव करून देण्यापोटी जेव्हा ८ मार्च ’साजरा’ होणं थांबेल त्यादिवशी मी जगातलं सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन ' हे पटलं.

अल्पना | 10 March, 2011 - 21:15

इतक्या चांगल्या उपक्रमासाठी संयोजकांचे मनापासून धन्यवाद आणि मला खो दिल्याबद्दल श्यामलीला धन्यवाद. काही कामांमूळे आणि नेटच्या प्रॉब्लेममूळे मी आधी लिहू शकले नव्हते. मला जास्तीचा वेळ दिल्या बद्दल थँक्यू संयोजक.
आत्तापर्यंत चारही खो च्या धाग्यावरच्या सर्वच पोस्ट्स सुंदर लिहिल्या आहेत. याआधी कधीही ज्या लोकांनी लिहिलेले वाचले नव्हते अश्या नव्याने लिहित्या झालेल्या मंडळींची पोस्ट्स वाचायला खूप आवडलं. यानिमित्ताने बरेच जण लिहिते झाले हे या उपक्रमाचे यश आहे.

खरंतर बहूतांशी मुद्दे याआधी मांडले गेले आहेत त्यामूळे काय लिहावं हा प्रश्नच आहे.

स्त्रीमुक्ती या शब्दाचा अर्थ कळायच्या आधीपासूनच हा शब्द कानावर पडत आला आहे. लहानपणी घरी चळवळीचे वातावरण, आई-बाबांची सगळी मित्र-मंडळी चळवळीशी संबंधित. आई-बाबा धरून ओळखीतल्या ५-६ कुटूंबांमध्ये कमवून आणायची आणि घर चालवायची जबाबदारी घरातल्या बाईवर होती तर पुरूष पूर्णवेळ चळवळ, समाजसेवा, राजकारण (थोडक्यात लष्कराच्या भाकरी भाजणारा) यात व्यस्त. बाबा आणि त्यांचे मित्र ज्यावेळी दौर्‍यावर नसायचे (महिन्यातले १५-२० दिवस) त्याकाळात घर पूर्णपणे सांभाळायचे. घर झाडणे, भाज्या चिरणे, स्वैपाक करणे, आम्हा पोरांना आंघोळी घालणे हे सगळं घरी असलेल्या व्यक्तीचं काम. हे सगळं घरात बघत असतानाच, आईबरोबर मानवलोक, धडपड या संस्थांमध्ये आठवड्यातून एकदा तरी मिटींगच्या निमित्ताने जाणे व्हायचे. तिथल्या मुलामुलींबरोबर खेळताना बर्‍याचदा मोठ्यांच्या चर्चांमधून संस्थेत नव्याने आलेल्या एखाद्या बाईबद्दल, नवर्‍याने किंवा सासरच्यांनी केलेल्या तिच्या छळाबद्दल ऐकायला मिळायचे. मारहाण झालेल्या बायका, परित्यक्ता स्त्रिया यांच्याबद्दल नकळत्या वयात समजलं होतं. त्यामूळे आपल्या घरात जसं असतं तसं सगळीकडे नसतं याची पुसटंशी जाणिव लहानपणी आली होती.

नंतर नंतर जसंजसं मोठं होवू लागलो तसंतसा हा फरक खूप स्पष्ट व्हायला लागला. सुरवातीला मला वाटायचे अशिक्षित लोकांमध्येच स्त्रियांवर अन्याय होतात. नंतर समजलं सुशिक्षित घरांमध्ये पण स्त्रीला माणूस म्हणून वागवले जाईल याचि खात्री देता येणं अवघड आहे. अगदी लग्न होईपर्यंत माझी अशी समजूत होती की ज्या घरातले वातावरण ऑर्थोडॉक्स आहे तिथे स्त्री -पुरूष समानता पोचूच शकत नसांभाळपण लग्नानंतर ही समजूतही पुसली गेली. सासरच्या अगदी ऑर्थोडॉक्स वातावरणातही घरातल्या प्रत्येक निर्णयामध्ये स्त्रीचा सहभाग बघितला. खरंतर बहूतांशी आर्थिक निर्णय बायकांनाच घेताना बघितले.

आता वाटतंय स्त्री-पुरूष समानतेसाठी कोणतंच समिकरण मांडणं अवघड आहे. कधीकधी अशिक्षित बायका पण अन्यायाविरुद्ध लढताना दिसतात तर याविरुद्ध सुशिक्षित बायका स्त्रीने संसारात बॅकसीट घ्यावी हे मत व्यक्त करताना दिसतात. पण हे असेच असेल असंही नाही, याच्या उलटही असू शकतं. आर्थिकदृष्ट्या सक्षम स्त्रीला घरात समान वागणूक मिळत असेल असंही पूर्वी वाटायचं, पण स्त्री च्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याचा तिला घरात मिळणार्‍या वागणूकीशी खूप डायरेक्टली संबंध असेलच असे नाही हेही हल्ली लक्षात आलंय.

सोशल कंडिशनिंग हा खूप महत्वाचा घटक आहे त्यामूळे बदल घडवायचे असतिल तर स्वतःच्या घरापासून, मुलांपासून सुरवात करावी. आपल्या वागण्यातून त्यांना शिकवावे हे आपल्या हातात आहेच. आपल्या घरांपासून सुरवात केली तर हळूहळू समाजातही बदल घडतिल. काही बदलांना सुरवात झाली आहे हे या उपक्रमाला मिळणार्‍या प्रतिसांदांमधून दिसतेच आहे.

दीप्स | 11 March, 2011 - 04:00

धन्यवाद अल्पना आणि संयोजकांचेही आभार इतका चांगला उपक्रम चालू केल्याबद्दल.

लहाणपणापासून आजीला पहात आलोय, आजोबांची साथ नसताना प्रचंड संघर्ष करुन , तिन्ही मुलांना शिकवलं, १९६५-६८ च्या काळात! तिची खूप इच्छा असूनही मुली चौथी पाचवीच्या पुढे शिकल्या नाहीत शाळा गावात नव्हती इ. कारणांमुळे पण आजी निरक्षर असूनही आजारी पती, सासु व सहा मुलं मुली पाच एकर शेताच्या जोरावर सांभाळत होती, तिने सर्व निर्णय खंबीरपणे घेउन प्रसंगी स्वत:च्या भावाशी, वडलांशी भांडून मुलांना शिकवलं, मोठं केलं. पुढे सुनांनाही तिने कधी हे करु नकोस , तसं वागु नकोस असं विनाकारण बोललेलं ही कधी पाहीलं नाही. ती ज्या काही गोष्टी सांगते तिच्या काळातल्या त्यावरुन तरी ती किती इंडीपेंडंट होती हे लक्षात येते, कदाचित आजोबा व्यवस्थित असते तरी तिच्या मुळच्या बंडखोर स्वभावाने तिने कधी काही अन्याय सहन केला असता असे वाटत नाही. शेवटी काय स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला आपल्या चॊईस नुसार जगता यावं एवढच.

आजीच्या विरुद्ध टोक म्हणजे तिची नात! कॊलेजात असताना निरनिराळ्या स्पर्धांमधे भाग घेणारी, सग्ळ्या गोष्टीत पुढे असणारी हीच का ती मुलगी असा प्रश्न पडावा इतकी लग्नानंतर बदललेली पाहीली अन धक्काच बसला. मुलगा हवाच म्हणून तिसरा चान्स घेणारी, जुळ्या मुलातले एक मुल तिच्यामुळेच दगावले (त्यात तिची काहीही चूक नसताना) हा आरोप सहन करुन गप्प बसणारी हीच का ती ? सुशिक्षित असूनही स्त्री मुक्ती वगैरे तिच्यापर्यंत कधी पोचणार की तिला कळत असूनही हा गाडा मुद्दाम ओढायचा अट्टाहास का? ही प्रश्न अनुत्तरीतच राहतात. एक माणूस म्हणून जगण्याची समान संधी सर्वांनाच मिळायला हवीये ह्यात स्त्री,पुरुष असा भेद नकोच. आपण आपल्यापासुन सुरुवात करावी हे तितकच खरय.

जाईजुई | 11 March, 2011

"स्त्री मुक्ती" - हम्म!

स्त्री मुक्तीची माझी व्याख्या म्हणजे स्त्री असण्याच्या आणि मुक्त असण्याच्या सगळ्या स्थळ काळसापेक्ष दडपणातून मुक्ती.

मी अजुनही मुक्ती शोधतेच आहे जरी मला माझ्या आईवडीलांनी त्यांच्या दृष्टीने सगळं स्वातंत्र्य दिलयं. माझा नवरा जरी माझ्या मुलीचे सगळे काही करतो म्हणजे जागरण, शी शु, अभ्यास.. तरीही मला अजुन काही तरी हवेच आहे. ह्या "काही तरी अजुन हवे" असण्याची जाणीव होणं आणि ती जाणीव मी व्यक्त केल्यावर माझ्या आजु बाजुच्या समाजाने त्यावर काही विशेष टिपणी न करणे म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि मुक्ती!

मुलीला मी डॉक्टर्/पत्रकार/अभियंता बनू दिलं.. ह्यात कौतुक काहीच नाही.. कारणं २ - पहिलं म्हणजे "मी बनू दिलं" ! अरे परवानगीच का लागावी? (आर्थिक परिस्थिती नसताना वै. असे काही असेल तर गोष्ट वेगळी) कुठचेही शिक्षण हा अन्न - वस्त्र - निवारा एवढच महत्वाचे आहे.. मग मी घेऊ दिलं हे का बरे यावे? ती हे शिकली असे साधे सरळ का असू नये?
आणि दुसरं म्हणजे ह्याच मुलीने जर मी "बार टेंडींग" शिकणार आहे असे सांगीतलं तर वरचे शिकू देणारे किती पालक तिला हे शिकू देतील? उद्या माझी मुलगी वेट्रेस आहे हे किती जण अभिमानाने सांगतील?
तात्पर्य - मला भुषणावह किंवा समाजमान्य असे काही केले तरच मी "स्त्री"ला सपोर्ट करणार! मग ती पूर्णपणे मुक्त कशी झाली?

बरे हा झाला शिक्षणाचा भाग, वागणे - बोलणे, मान - मर्यादा, कपड्यांच्या बाबतीतही तेच! जावयाच्या किंवा सुनेच्या निवडीबाबतीतही हेच! समाजमान्य काही केले तरच चालेल मगच तिला आम्ही सपोर्ट करणार. हातभर बांगड्या नाहीत? गळ्यात ठसठशीत मंसू नाही? मग ही वाईट्ट बाई! हिला मुलगा नाही.. वंश खंडीत.. (इथे पहिल्या एका मुलीच्या लग्नाचे/शिक्षणाचे वांदे मग ह्यांची काय जहागिर मुलाशिवाय बेवारस असते?) बहुदेशी कंपनीत काम करते आणि घर बघा.. पोळी भाजीचा डब्बा येतो सकाळ संध्याकाळचा! ह्याने काळी सून आणली!!!!!!

मग स्त्री नक्की कशातून मुक्त झाली? कालपरत्वे किंवा स्थलपरत्वे असलेली बंधने तिला आलीच ना?

आणि ह्याच्या अगदी विरुद्ध मला "मुक्त समजणारा" गट वाटतो. हे सुद्धा कंपूच करतात आणि मुक्त असण्याच्या चौकटीच्या बंधनात पुन्हा अडकतात. म्हणजे अमुकच प्रकारचे कपडे घालावेत, एवढे शिकून केलेच काय? मुलासाठी घरीच बसली ना? इतके नटून सजून रोज साड्या नेसून जातात ह्या बायका? मला लग्न नाही करायचे किंवा जबाबदारी नको म्हणून मला मूल नको किंवा एकत्र घर नको.. गेला बाझार एकादी सिगारेट हवीच मुक्टीसाठी.. हे ही मला पुन्हा बंधनात अडकल्यासारखेच वाटते.

जर एकाद्या स्त्रीला संधी मिळाली आणि तिने व्यावसायिक, स्पर्धात्मक शिक्षण घेतले तर तिने आयुष्यभर स्वतःला जुंपून का घ्यायचे ऑफिसच्या कामाला? तिला वाटत असेल की रमावं आपल्या मुलामध्ये, घालावं नवर्‍याला गरम काही करून, ठेवावे स्वतःचे घर सावरून नि आवरून.. काहिही! किंवा स्त्री असण्याचा गैरफायदा घेतात नि पाहुणे, मुले अशा निमित्ते सवलत घेतात. अरे, देउ नका सवलती जर नियम बाह्य असतील आणि जर त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या असतील तर तुमचा त्यात स्त्री असण्याचा प्रश्णच कुठे आला? तुम्ही एक मुक्त स्त्री आहात ना? मग दुसर्‍या स्त्रीला तिच्यापुरता मुक्त विचार करू द्या की! निसर्गाने केवळ स्त्रीलाच प्रजननाची क्षमता दिली आहे आणि अजुन तरी विज्ञानाने त्यात काही मेजर ढवळाढवळ केली नाहीये. केवळ मुक्त आहोत हे दाखवण्यासाठी सृजनाला आपण नकार देतोय का? हा विचारही जरासा व्हावा असे मला वाटते.

आपण मूल वाढवताना लिंगसापेक्ष वाढवावे..पण मुलीला मुलासारखे वै. वाढवण्याच्या भानगडीत पडू नये. आणि मुलगी आहे म्हणून सगळे गुलाबी किंवा जाचकही करू नये. मुलीला स्वतःच्या स्त्रीत्वाचा रास्त अभिमान आणि ओळख पटावी. तिला स्त्री म्हणून काही वेगळे पर्याय आहेत ह्याची जाणीव असावी नि इतर सगळे पर्यायही तिच्या निवडीसाठी खुले असावेत. कुठचाही पर्याय निवडताना तिला आपली साथ असावी नि कुठच्याही प्रसंगी ती पुरुष अपत्यापेक्षा वेगळी नसावी. आणि मुलगे वाढवताना देखिल त्यांच्या स्वभावातील मृदू छटेचे समूळ उच्चाटन होणार नाही असे पहावे. भिन्नलिंगी व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे भान त्यांना असावे नि ते रुजावे. त्यांना समाजाची, कुटुंबाची धुरा वै. वहाण्याच्या घाण्याला जुंपू नये.

एकुण एक काय मला प्रत्येकाने स्वतःला हवे तसे, उमजेल तसे आपले स्त्रीत्व जाणवून घ्यावे आणि त्यानुसार वागावे. अशा वागण्याला समाजाने केवळ स्त्री म्हणून बंधने घालू नयेत आणि जर बंधने घालायचीच असली तर मग स्त्री, पुरुष, तृतीयपंथी अशा प्रत्येक समाजघटकाला समान असावीत.

मग बहुदा स्त्री खरच मुक्त होईल.

साधना | 12 March, 2011

इथे इतरांनी लिहिलेले वाचताना मला काय लिहावेसे वाटेल असा विचार करत होते आणि दरवेळी वाटत होते की नाही, मला काहीच जमणार नाही लिहायला. कारण सगळे आधीच लिहुन झालेय्.काही मी स्वतः अनुभवलेय, इतरांना अनुभवताना पाहिलेय. सगळे म्हणतात 'जग खुप पुढे गेलंय'. वरचे सगळे वाचुन प्रश्न पडतोय, जग पुढे गेले असेलही, पण सोबत सगळ्यांना पुढे घेऊन गेलेय का खरेच? की आपण सगळे शरीराने पुढे जातोय पण विचार मात्र आहे तेच ठेवतोय? स्त्रियांची नावे बदलताहेत, चेहरे बदलताहेत पण काळ मात्र तोच राहिलाय. अनुभव तेच. भोगणे तेच. सारे कसे मागील पानावरुन पुढे चालु...
___________________________________
स्त्रीमुक्ती हा शब्द मी लहानपणापासुन ऐकतेय. हे काहीतरी बायकांचे फॅड आहे असा तेव्हा सार्वत्रिक समज होता. मला तर भितीच वाटायची या शब्दाची. मुक्त होऊ पाहणा-या स्त्रिया घरदार वा-यावर सोडुन बाहेर पडु इच्छिणा-या असतात असा समज तेव्हा प्रचलित होता.

माझ्या घरी मिश्र वातावरण होते. अगदीच मोकळे नाही आणि अगदीच बांधलेलेही नाही. वडिल एकटे कमावणारे आणि आई पैसे कमावणे सोडुन बाकीच्या सगळ्या सांसरीक जबाबदा-या संभाळणारी वडलांची जबाबदारी घरात पैसे देणे एवढीच होती. बाकी घरचे, बाहेरचे सगळे व्यवहार आईच करायची. वडलांना आमच्या इयत्ता कुठल्या हेही कधी माहित नव्हते, माहित करुन घ्यायची त्यांना गरजही वाटली नाही. आणि यात वावगे काही नव्हते बहुतेक. तेव्हा ब-याच घरातल्या वडलांची साधारण अशीच स्थिती असायची. आम्ही ही गोष्ट विनोद म्हणुन वर्गात एकमेकांना सांगायचो. वडलांनी आईकडे कधी दिलेल्या पैशांचा हिशोब मागितला नाही. घरासाठी आवश्यक खर्च काय हे ठरवायला ती स्वतंत्र होती पण तिला स्वतःसाठी काही करायचे असल्यास मात्र वडलांच्या परवानगीशिवाय करता यायचे नाही. एक साधी ५० रुपयांची साडी आवडली तरी ती मिळणे नव-याच्या मूडवर अवलंबुन. आणि मूड चांगला असतानाही साडी मिळायची शक्यता फक्त ५०%. मिळाली नाही तर मन मारायचे आणि गप्प बसायचे. नो अपिल.

आपली बायको आपल्या मदतीशिवाय घर एकटी चालवतेय. आपण घराला लागणारे पैसे कमावण्याशिवाय तिला दुसरी कुठलीही मदत करत नाही. तिला कधीतरी स्वतःसाठी काही करावेसे वाटल्यास आपल्या परवानगीची गरज पडायला नको. इतर कामाच्या वेळी तिला अशा परवानगीची गरज पडत नाही, मग इथेच का पडावी? हा विचार वडलांच्या डोक्यात कधी आला नाही कारण तशी पद्धत नव्हती. अर्थात पद्धत असती तर वडलांनी नक्कीच हे केले असते. कारण ते काही वाईट क्रुरकर्मा नव्हते किंवा मुद्दाम बायकोला त्रास द्यायचाच म्हणुन असे करत होते असेही नाही. त्यांना वेळ नसल्याने त्यांनी घरातले पैशांचे व्यवहार आईकडे दिले होते तरीही तिला स्वतःसाठी काही करायचा अधिकार मात्र त्यांनी दिला नव्हता. पैशांशी संबंधीत प्रत्येक गोष्ट ही घरातल्या पुरुषानेच ठरवली पाहिजे अशी जी काही अलिखित, अघोषित पद्धत होती त्यात परिस्थितीप्रमाणे काही बदल केला पाहिजे हे त्यांना सुचले नाही. माझ्या आजुबाजुच्या जवळजवळ सगळ्या घरात हेच चित्र होते. आणि यात खटकण्यासारखे काही आहे हे कोणाच्या गावीही नव्हते.

दुर्दैवाची गोष्ट ही की आजही हे चित्र बदलले नाहीय. आजची स्त्री घराला लागणारे पैसे स्वतःच कमवुन आणायला लागलीय. तरीही त्या पैशांवर तिचा स्वतःचा अधिकार काहीच नाही. तिला दोन पैसे स्वतःसाठी खर्चावेसे वाटले तर नव-याच्या परवानगीची वाट पाहावी लागते. इथे लिहिणा-या ब-याच जणांनी यावर लिहिले आहे. इतके लिहुनही हा विषय उरतोच आहे.

स्त्री शिकली, अर्थार्जन करायला लागली पण तरीही ती स्वतंत्र झाली का? खुप व्यक्तिगत, केवळ स्वतःशी संबंधित अशी एखादी गोष्ट करावीशी वाटली तर ती करण्यासाठी कुणाचीही परवानगी लागु नये हा माझ्या दृष्टीने स्वातंत्र्याचा एक अर्थ आहे. मग ती गोष्ट एखादा ड्रेस घेणे असु शकेल, हेअरकट असु शकेल, पुस्तक घेणे असु शकेल, चित्रपट/नाटक पाहणे असु शकेल, पदार्थ खावासा वाटणे असु शकेल. मी मागे एकीला 'माझ्या नव-याला मी फक्त अमुकअमुक प्रकारची मासिके वाचलेलेच आवडते' हे बोलताना ऐकलेय. तर सगळा पगार नव-याच्या हातात देणा-या एका कलिगने 'मला एक दिवशी रिक्षा करावीशी वाटली तरी नवरा विचारतो, कशाला केलीस? चालत गेली असतीस तर बिघडले असते काय? कधी २ रुपयाचे चॉकलेट खावेसे वाटले तरी नव-यापुढे त्याचा जाब द्यावा लागतो.' लग्नानंतर काय कपडे घालावेत हे सासु-सासरे ठरवणार. मग मुंबईत दोन-दोन गाड्या बदलुन प्रवास करणा-या स्त्रीला पंजाबी ड्रेस सोयीचा असला तरी तिने साडीतच स्वतःला गुंडाळायचे. कारण सासरी ड्रेस चालत नाही, पण सुनेने नोकरी केलेली मात्र चालते.

ज्या गोष्टींचा संबंध कुटूंबाशी आहे त्या गोष्टी मी इथे विचारात घेतलेल्या नाहीत. तिथेही परवानगी देण्याघेण्यापेक्षा चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणे अशी प्रक्रिया असावी असे मला वाटते.

माझी वहिनी स्वतःसाठी कपडे घेताना नेहमी नव-याला आवडतील का हे कपडे याचा विचार करते. ती घालत असलेले कपडे म्हणजे फक्त साड्या आणि पंजाबी. पण यातही केवळ नव-याला आवडणारे रंग आणि पॅटर्न घेतले जातील हे ती पाहते. आता ती नव-याची आवड संभाळतेय हे म्हटले तर ठिक आहे पण तिला खास आवडणारा रंग जर त्याला आवडत नाही तर तो तिने कधीही घालायचा नाही हे कितपत योग्य? अमुक एक रंग मला आवडतो पण त्याला नाही आवडणार मी हा रंग घातलेला असे म्हणुन तिने काही रंगांवर कायमची काट मारलीय.

मी तिला विचारले, तुझा नवरा त्याचे कपडे घेताना तुला विचारतो का, हा रंग आवडला का नी तो पॅटर्न आवडला का म्हणुन? तर तिचे म्हणणे, मला काय कळतेय त्याच्यातले? मग तुझ्या कपड्यातले त्याला कसे काय कळायला लागले? तर तिचे म्हणणे, जाऊदे ना, त्याला नाही आवडत ना, मग नको.

मी अशा वेळी कोणाला जास्त उसकवायला जात नाही. त्यांच्या जगात त्या सुखी आहेत ना? मग झाले. पण खरंच कधीही वाईट वाटत नाही का यांना? आपल्या आवडीची एखादी क्षुल्लकशी गोष्टही मनासारखी करता येऊ नये याबद्दलची खंत चेह-यावर दिसते तेव्हा वाटते का गप्प बसतात या बायका? मला हे आवडते आणि मी हे करणार, यात काहीही गैर नाहीय हे ठणकावुन का नाही सांगता येत यांना? पुरूषाला प्रत्येक गोष्टीत स्त्रीवर ताबा ठेवणे का आवश्यक वाटते? सगळे त्याच्याच मर्जीने झाले पाहिजे हा आग्रह का? प्रत्येक पावलापावलाला सोबतच्या पुरूषाची परवानगी का लागावी? आणि पुरूष जर बायकोने परवानगी मागावी ही अपेक्षा ठेवतोय तर तोही तिची परवानगी मागतोय का प्रत्येक वेळी?

स्वतःच्या आर्थिक परावलंबित्वाला कावलेल्या माझ्या आईने मला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचेच हे ठरवलेले. तिच्या मते आपल्या हातात आपला पैसा असला की कोणाच्याही कृपादृष्टीची वाट पाहात बसावे लागत नाही. आणि ही आर्थिक सक्षमता स्त्रीकडे शिक्षणामुळे येते. तिचे हे मत किती खरे आहे ह्याचा मी गेल्या २५ वर्षात वारंवार अनुभव घेतेय. शिक्षण आणि आर्थिक सक्षमता हे स्त्रीला मजबुत करणारे दोन खंदे आधार आहेत. हे आधार सोबत असले तर इतर आधारांनी मध्येच साथ सोडली तरी स्त्री मोडुन पडत नाही. पण आज समाजात काय दिसतेय? सक्षमता असुनही आर्थिक पारतंत्र्य आहेच की वाट्याला. हे सगळे मुकाट सहन करणा-या बायांना गदगदा हलवुन सांगावेसे वाटते की बायांनो, जागे व्हा. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे हे तर नकोच पण त्याचबरोबर अगदी गांडूळ होऊन राहणेही नको. जरा स्वतःचा आवाजही ऐकु द्या इतरांना. कदाचित तुम्हाला तुमची स्पेस हवीय, थोडेफार स्वातंत्र्य हवेय हे समोरच्याला माहितही नसेल. त्याला जे चाललेय ते नॉर्मलच आहे असे वाटत असेल. तुमचे मत त्याच्या कानावर घाला. कदाचित परिस्थितीत फरक पडेल.

हल्लीच कॉमन ओळखीच्या एका कुटूंबातल्या स्त्रीबद्दल एक मैत्रिणीने मला सांगितले की ती बिचारी नव-याचा खुप जाच सहन करते. नवरा कामधंदा न करता घरी ग्लास घेऊन बसुन असतो. ही चांगल्या पदावर नोकरीला आहे पण सगळा पगार त्याच्या हातात द्यावा लागतो. वर बाहेर असतानाचा मिनिटामिनिटाचा हिशोबही द्यायचा कारण नवरा खुप संशयी. म्हटले बाई का सहन करतेय हे सगळे? तर ती म्हणाली, दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. तिचा पहिला घटस्फोट झालाय. ती म्हणते यालाही सोडला तर लोक म्हणतील बाईच वाईट आहे. दोन्ही नव-यांना सोडुन बसलीय. पदरी दोन मुले आहेत म्हणुन कसेतरी दिवस काढतेय. पुढे सगळा अंधार दिसतोय. काही बोलायला जावे तर नवरा मारायलाही कमी करत नाही आणि आता मुलगाही बाबाचे बघुन आईचा अपमान करु लागलाय.

मला काय बोलावे सुचेना. लोक काय म्हणतील या भितीने आपले आयुष्य अंधारात ढकलायचे? आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही कुढत आयुष्य काढायचे? कोण मदत करु शकेल अशा स्त्रियांना?

निकिता | 14 March, 2011 -

साधना, खो बद्द्ल धन्यवाद.

मला कुणी खो देईल असं वाटलंच नव्हतं . पण हे सगळ वाचुन काढत होते. आणि डोक्यात हजारो विचार पण चालत होते. अगदी स्वत:पासुन ते काम करणार्‍या मावशीं पर्यंत. माझ्या घरात पण साधारण साधना सारखंच वातावरण होतं. पण आईने स्वतःसाठी काही घेतलं तर बाबांची हरकत नव्हती. परिस्थिती नव्हती म्हणुन आईने कधी स्वतःसाठी घेतलं नसेल हि गोष्ट वेगळी. आई बाबांची काम ठरलेली होती. बँक वगैरे बाबांकडे. पण आई कडे पैसे आणुन देण्यासाठी. खुप समानता किंवा खुप असमानता नाही पाहीली. चौघाही मुलांना आईबाबांनी व्यवस्थीत शिकवलं. मुलगा मुलगी म्हणुन फरक नाही केला. पण घरकामाचा प्रश्न आला तर मुलींची काम होती. मी कधी केली नाहीत आणी माझ्यावर लादली गेली नाहीत. पण "सासरी गेल्यावर त्रास होईल" हे ऐकाव लागलंच. कुठे कशी सुरवात झाली माहीत नाही, पण मन थोडफार बगावत करायला लागलं. एका मावशीला पहिली मुलगी झाली तेव्हा आईने म्हट्ल्यांच अजुनही आठवतयं "पहिला मुलगा झाला की बरं असतं दुसर्‍या वेळी टेंशन नाही". तेव्हा पण तिडिक गेली होती आता पण जाते. मला पहिली चुलत बहिण झाली, तिच्या बारश्याल ९०% लोकांनी काकांना सांगितलं, पुढच्यावेळि मुलगा होईल हो. पुढच्यावेळी पण मुलगीचं झाली. तिचं सगळ नीट केलं झालं पण नाराजी लपत नव्हती. त्यानंतर ५ ६ वर्षांनी काकुने परत चान्स घेतला (किंवा खात्री केली). मुलगा झाला. पण उशीराच गर्भारपण काकुला नाही पण बाळाला त्रास झाला. नाही जगलं बाळं फार वर्ष. का हा अट्टहास? अशाच गोष्टी आजुबाजुला घडत राहिल्या आणी कुठेतरी मन ठाम होत गेलं मला मुलगा नकोचं. मुलगीचं हवी. चुक बरोबर माहीत नाही, पण मुलगी होईपर्यन्त अगदी मुलगा झाला तर ह्या भिती ने ग्रासलं होतं मला. असो.

बाळंतपणासाठी दवाखान्यात असताना पण डोळ्यासमोर सुतंक पाहीलं, दुसरी मुलगी झाल्याचं. फक्त बाळाचे आई बाबा सोडले तर प्रत्येक जण सुतकात. डो़क फिरल. माझ्या सासुबाई तेव्हादेखील म्हणल्या मुलागाचं होईल तुला. छळ आहे हा मानसीक कुणालाचं कळत नाही का? १८ वर्ष मुलं नव्हतं एका बाईला मुलगी झाली. आणि वर्षाची व्हायच्या आत दुसर्या बाळाची चाहुल लागली. ते बाळ जगात आलं कारण मुलगा होतं. हे तिनेच तिच्या तोंडाने सांगितं आणि काळजातं धस्स झालं. मुलगी असती तरं?.. काय प्रकारचे विचार मुरले आहेत आपल्या मनात..

एकच दळण का दळतेय अस कुणीतरी विचारेल.... मुक्ती बिक्ती सोडा राव..इथे अस्तित्वाचा लढा आहे.
वरील सगळ्या घटना मुंबईतल्या आणि २००० साला नंतरच्याच आहेत

आत्ता आमच्या घरी काम करणार्‍यांबद्द्ल. मावशी वय वर्ष ४०+. रोज येतात नवर्याची एक गोष्ट घेउन. आज मारलं आज भांडला. एकदा म्हटल त्यांना बोजा बिस्तरा उचला त्याचा आणि बाहेर ठेवा. ज्या दिवशी त्या करतील त्यादिवशी खरचं बरं वाटेल मला. एक तरी बाई थोडितरी मुक्त झाली म्हणुन.

मी मुक्त आहे, माझ्याविचारात आचारांत, पण वागताना मी वेगळी वागतेय हे जाणंवणं पण एक प्रकारचं बंधनच आहे नं. समानता मुक्ती कधी जेव्हा हे शब्द वापरायची गरजंच राहणार नाही तेव्हा. अजुन खुप गोष्टी आहेत डोक्यात पण लिहित गेले तर लिहितचं राहिन आणी लगदा होईल सगळा म्हणुन इथेच थांबते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खो साठी हो म्हणायच्या आधी बरेच मुद्दे डोक्यात होते....पण आलेले खो वाचून आता बहुतेक लिहायला काही शिल्लक नाही असं वाटतय. ब-याच वर्षांपूर्वी बघीतलेले दोन प्रसंग इथे द्यावे वाटतायत तेवढेच लिहिते.

आम्ही काही वर्ष सटाण्याला होतो तिथलेच परस्पर विरोधी असणारे हे दोन प्रसंग यातला पहिला अगदी अशिक्षीत समाजातला तर दुसरा सुशिक्षीत आणि श्रीमंत घरातला.

घराच्या कुंपणाला लागून वडारवस्ती होती, त्या वस्तीत आणि आमचं घर यामधे अंतर फक्त भल्या मोठ्या अंगणाचच.

एका रात्री समोरच्या वस्तितून प्रचंड कलकलाट, रडारड ऐकू येऊ लागली, असं खर तर ब-याचवेळा व्हायच, आम्हालाही सवय झाली होती, पण आजचा आरडाओरडा वेगळा वाटत होता, मी आईला म्हटल आई कोणीतरी वारलेलं दिसतय, बघू या का, काय झालय ते कळेल तरी. आईच उत्तर एवढ्या अपरात्री बाहेर जायची गरज नाही, हेच होत अर्थात.

सकाळ झाली आणि टाकिवरच्या नळावर पाणी भरायला वस्तीतली एक आज्जी आली, तेव्हा मात्र मी तिला रात्री काय झालं विचारायला लगेच धावले होते. त्या आज्जीनी सांगितलेला प्रसंग ऐकून अवाक व्हायला झालं.

काल रात्री तिच्या सुनेला तिस-यांदा मुलगी झाली होती आणि मुलगीच झाली म्हणून सगळ गोंधळ चालला होता. मुलगा आणि सासरा ते बाळ टाकून द्यायला निघाले होते आणि त्या बाळाची आई आधी आर्जवं करुन, मग रडून ओरडून नाही म्हणत होती; पण ऐकतच नाहीत हे पाहिल्यावर नाळ तोडण्यासाठी तिच्याजवळच ठेवलेला कोयता होता तो घेवून त्या दोघांच्या अंगावर धावून गेली होती आणि या झटापटीत तिने तिच्या नव-याला बरंच जखमी केलं होतं.

मला त्याही वयात त्या बाईच कौतुक वाटल होतं.
स्त्री मुक्ती हा शब्द तिच्या शब्दकोषात नसणारच याची खात्री होती. पण स्वतःचा हक्क तिने ज्या तडफदारपणे दाखवला होता तो नक्कीच मनात घर करणारा.

ही घटना घडली साधारण त्याच्याच मागेपुढे, आमच्या एका ओळखिच्या घरात मात्र वेगळीच तयारी चालू होती. घरातली मुलगी पिशवी साफ ( हा तिथलाच खास शब्द प्रयोग) करण्यासाठी जवळच्याच गावाहून माहेरी आली होती. हे असं कितव्यांदा विचारल्यावर आठवत नाही ग, अस उत्तर आल होतं; मोठी मुलगी १३ वर्षांची होती. Uhoh
काकूंना विचारल आईनी तर आठव्यांदा म्हणून उत्तर आलं होतं................. श्रीमंत घर,शेतीवाडी,बहिणीला भाऊ हवाच.....पोटच्या मुलीच्या जीवाचा विचार?????

इथे या मुलीला आपले अधिकार, स्त्रीभृणहत्या केल्यामुळे कमी झालेलं स्त्रीयांच प्रमाण हे शब्द ऐकून, वाचून माहित होते. आई वडील, नवरा, सासर, माहेरची मंडळी आणि डॉक्टर हे सगळेच या गोष्टीला जबाबदार होते पण त्यांना यात आपण काही वावग करत आहोत याचा पुसटसा देखील सल नव्हता. Sad

या उपक्रमासाठी संयोजकांना धन्यवाद आणि खो साठी चेतनला धन्यवाद,
माझा खो १)अल्पना २) श्रद्धा

शाळेतल्या माझ्या ४-५ मैत्रिणींचा ग्रूप. तब्बल पंचवीस वर्षांनंतर त्या सर्वांना मी नुकतीच भेटले; त्यांच्यातल्या एकीच्याच घरी. भेटल्यावर आम्ही एकमेकींच्या अक्षरशः गळ्यात पडलो आणि मधली ती अडीच दशकं जणू गेलीच नाहीत अश्या थाटात आमच्या गप्पा, बडबड, दंगा सुरू झाला. जिच्या घरी जमलो होतो तिचं एकत्र कुटुंब. पण त्यादिवशी तिचे सासू-सासरे आणि नवरा सगळेच आपापल्या कामासाठी बाहेरगावी गेलेले होते. ’तिच्या घरी कुणीच नाहीये, आपण तिथेच जमू या’ - आदल्या आठवड्यात आमची निरोपा-निरोपी अशीच झालेली. तिनंही त्याला लगेच संमति दर्शवलेली.
खरं तर, तिच्या नववीतल्या मुलाची परिक्षा चालू होती आणि रविवार असल्यामुळे तो घरात होता. सुदैवानं घर मोठं असल्यामुळे आणि एका खोलीत दार बंद करून घेऊन आपला मुलगा दिवसभर अभ्यास करेल, किंबहुना मैत्रिणींच्या घोळक्याचा त्याला काही त्रास होणार नाही हा विश्वास तिला होता. मोठं घर आणि स्वतंत्र खोली हे निकष तर घरातल्या वरिष्ठांनाही लागू होतेच.
पण तिचे सासू-सासरे घरी असते तर तिनं तिच्या घरी जमण्याचा प्रस्ताव स्वीकारला असता?
आम्ही तरी इतक्या मोकळेढाकळेपणाने अर्धा दिवस मनमुराद गप्पा मारल्या असत्या?
तिच्या नवर्‍यानं मुलाच्या परिक्षेसाठी आपली स्वतःची कामं बाजूला टाकली असती तर कदाचित आम्ही सगळ्या जणी बाहेर कुठेतरी भेटू शकलो असतो. अर्ध्या दिवसाऐवजी संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम आम्हाला ठरवता आला असता. पण त्यानं हे आपणहून, मनापासून, उस्फूर्तपणे केलं असतं?
जेव्हा अश्या काही प्रश्नांची खात्रीशीर ’हो’ अशी उत्तरं येतील, त्यानंतरच्या ८ मार्चला मी सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन.

अभ्यासात, खेळात सर्वात हुशार असलेली आमच्यातली एक. शिक्षण पूर्ण झाल्याझाल्या तिला उत्तम नोकरी मिळाली. तिच्याही सासरी एकत्र कुटुंब, तिला स्वतःला एक मुलगी. असं असूनही इतकी वर्षं तिची नोकरी यशस्वीरीत्या चालू होती. गप्पा मारता मारता माझ्या लक्षात आलं की तिनं हिरवा चुडा भरलेला होता. आधी वाटलं की घरी नुकतंच काही लग्नकार्य झालं असेल किंवा होऊ घातलं असेल. म्हणून दुर्लक्ष केलं. पण पुनःपुन्हा त्या बांगड्या, पाटल्यांवरच माझी नजर जात होती. शेवटी न राहवून तिला मी विचारलंच. ‘आमच्या घरी फाऽऽर ऑर्थोडॉक्स आहेत सगळे. त्यामुळे हे नेहमी माझ्या हातात असतं’ असं उत्तर मिळालं.
मनात अनेक प्रश्न उभे राहीले.
लग्नापूर्वीच मिळालेली नोकरी टिकवून ठेवण्यासाठीही तिला आपल्या त्या फाऽऽर ऑर्थोडॉक्स घराशी झगडा करावा लागला असेल का?
त्या झगड्याने अतीव थकल्यामुळे तिनं इतर वेषभूषेवरच्या मर्यादा इ. गोष्टींकडे कानाडोळा केला असेल का?
याहून वेगळी अशी काही शिकवण आपल्या मुलीला देण्याची इच्छाही तिनं त्यापायी सोडून दिली असेल का?
जेव्हा अश्या काही प्रश्नांची खात्रीशीर ’नाही’ अशी उत्तरं येतील, त्यानंतरच्या ८ मार्चला मी सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन.

****

स्त्री आणि पुरूष यांच्यात अगदी अत्यावश्यक असे जे फरक असायला हवेत तेवढ्यांची निसर्गाने व्यवस्थित योजना केलेली आहे. त्या योजनेत हस्तक्षेप करण्याची मुळीच आणि कधीच गरज नव्हती. तरीही घरटी एक-एक ‘आहे मनोहर तरी...’ निर्माण होतील अशी आज परिस्थिती आहे.
या ‘आहे मनोहर तरी...’ शीर्षकातला ’तरी’ हा शब्द आणि त्यापुढची तीन टिंबं ज्यादिवशी गायब होतील, त्यानंतरच्या ८ मार्चला मी सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन.
कुणी म्हणेल, अश्या सगळ्या ’नंतरच्या ८ मार्च’ची मग गरजच भासणार नाही! पण ’फ्रेंडशिप डे’ किंवा ’भाऊबीज’ हे देखील कुणाची गरज म्हणून साजरे केले जात नाहीत. ‘मदर्स्‌ डे’ किंवा ’फादर्स्‌ डे’ची ही त्या माता-पित्यांनी याचना केलेली नसते.
गरजेपोटी, हक्कांपोटी, त्या हक्कांची जाणीव करून देण्यापोटी जेव्हा ८ मार्च ’साजरा’ होणं थांबेल त्यादिवशी मी जगातलं सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन !!!

------------------------------------------------------------------------

आशुतोष०७११, 'खो'बद्दल धन्यवाद.

माझा खो -

१. अश्विनी_के
२. अँकी_नं_१

श्यामली- Sad दोन्ही अनुभव.

ललिता- Happy
एक ‘आहे मनोहर तरी...’ निर्माण होतील अशी आज परिस्थिती आहे. >> अनुमोदन.

श्यामली, खूप अस्वस्थ व्हायला झालं वाचून.
गर्भाचं लिंगनिदान करणार्‍या डॉ. बद्दल तर अगदी! अशा डॉ. ची डीग्री काढून घ्यायला हवी खरं तर. Angry

गरजेपोटी, हक्कांपोटी, त्या हक्कांची जाणीव करून देण्यापोटी जेव्हा ८ मार्च ’साजरा’ होणं थांबेल त्यादिवशी मी जगातलं सर्वात मोठं ‘सेलिब्रेशन’ करेन !!!

ललिता, नेमकं.

गर्भ लिंग निदान हा कायद्याने गुन्हाच आहे.. आणि त्यासाठी व्यवस्थित शिक्षा देखील आहे.. पण मोठी शहरे सोडल्यास त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही... आणि मोठ्या शहरातही काही ठिकाणी हे घडतेच... पण जागरुक क्लिनिक्स मध्ये डॉक्टरच्या परवानगी शिवाय सोनोग्राफी करतच नाहीत..

ललिता मस्त लिहील आहेस..

office madhe maabo blockd ani mobile madhe devnaagari chi soy naslyaani sadhya TIME PLZ ghetoy...
:mangataachyaa maage thunki laaun haat var karnaara smily:
gharna baghto, ashu ni to parynt taakla nasel tr lihito..

सगळ्यांचे खो खूप छान आहेत.

माझ्या दृष्टीने खरा स्त्री मुक्तीदिन कधी असेल?

- माझ्या रोजच्या संपकातले सुशिक्षित, कर्तबगार नवरा बायको, पदरात आधिच्या दोन मुली असतानाही अजून कुणाचं तरी बघून ठरवतात की एक चान्स घ्यायचा आणि चौथ्या महिन्यात गर्भाचं लिंग काय आहे ते बघून, मुलगी असल्यास अ‍ॅबॉर्शन आणि मुलगा असल्यास दिवस भरु द्यायचे. मी विचारले, चौथ्या महिन्यात मुलगी आहे असं कळलं तर गर्भ पाडण्यात तुला धोका नाही का गं? तर उत्तर आलं डॉक्टर म्हणाल्यात की हे सुरळीत होऊ शकतं. मग मुलगा आहे समजल्यावर पुढे तिला तिसरं मूल होऊ दिलं गेलं. त्या डॉक्टरचाही निषेध, त्या आई वडिलांचाही निषेध. आपण त्रयस्थ म्हणून त्यांच्या पर्सनल गोष्टीत काही बोलण्याचा अधिकार नाही. सगळ्यांचीच ती अवस्था झाली होती. मुलगा असल्याने ते बाळ वाचलं. पण जर ते मुलगी असतं तर ते मारलं गेलं असतं. हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं असतं म्हणून माझाही निषेध. वरती जेव्हा देवाच्या नावावर हे खपवलं गेलं तेव्हा तर संताप झाला होता. देवानेच मुलाचं दान पदरात घातलंय तर कशाला अव्हेरा म्हणे ! मग मुलगी असती तर ते देवाचं दान नाही का? का? जर आत्ताच्या काळातही तिसरं मूल होणं चालतं तर ते कुणीही असलं तरी चालेल हे जेव्हा समाजाचे सगळे थर मनापासून स्विकारतील तेव्हा त्या स्त्री जातीला समानता मिळेल.

- स्वतःच्या बाळाचं दुपटं, लंगोट बदलणं हे आई सारखंच बाबाही काहीच कमीपणा मनात आणता करत असेल आणि आपल्या मुलाचा/जावयाचा हा सद्गुण जर "काय काय बिचार्‍याला करावं लागतं? अगदी वाईट वाटतं हो त्याला या खस्ता खाताना पाहून !" अशा रितीने हेटाळला जात नसेल तेव्हा स्त्री / पुरुष यांच्या जबाबदार्‍यांमधील अनावश्यक फरक दूर होतोय असं मला वाटतं.

- जेव्हा नैसर्गिकरित्या असलेल्या स्त्री पुरुषांमधील फरकांव्यतिरिक्त, जेव्हा खरोखरंच स्त्रीची क्षमता पुरुषांच्या अ‍ॅट पार आहे हे मान्य करुन त्यांना समान संधी दिली जाते तेव्हा खरंच त्यांची क्षमता आपण फुकट न घालवल्याची खरीखुरी जाणिव समाजाला होईल तेव्हा "प्रकृती व पुरुषाच्या" समान काँट्रिब्युशनने बनलेल्या सृष्टीचा बॅलन्स निदान मानवापुरतातरी साधला जाईल. स्त्रीला कमकुवत मानून मागे सारणार्‍या समाजाने त्याच वेळी आठवून पहावे की हिनेच तिचा दुसरा जन्म झाल्यासारख्या कळा सोसून आपल्याला हे जग दाखवलं आहे.

सद्ध्या वेळेअभावी इतकंच लिहितेय Happy

माझा खो (१) नंद्या , खो (२) मी_अमि

श्यामली, त्या वडारी बाईचं कौतुक वाटलं, एक अशिक्षित बाई असूनही ती ज्या पध्दतीने व ज्या कारणासाठी लढली त्यासाठी.

ललिता, सर्व पोस्ट आवडली.

'खो-खो'च्या उपक्रमाबद्दल संयुक्ता संयोजकांचे आणि मला लिहिण्यासाठी खो दिल्याबद्दल श्यामलीचे आभार. Happy

________________________________

लहानपणी उन्हाळ्यात रात्री तहान लागल्यावर दरवाजाबाहेर अंधारात ठेवलेल्या माठापर्यंत जायची भीती वाटल्याने मी आणि धाकटा भाऊ जाऊन वडिलांना उठवत असू. आईला एकदा झोपमोड झाल्यावर पुन्हा लवकर आणि नीट झोप लागत नाही, म्हणून तिला उठवायचे नाही हे वडिलांनी बजावून सांगितले होते. आम्ही मुद्दाम तिला त्रास द्यायला उठवायला गेलो तर बाबा दटावायचे. 'त्रास देऊ नका रे.. तीही माणूस आहे. दमते.' वगैरे नेहमी सांगत असत. तेव्हापासून आजपर्यंतच्या अनेक प्रसंगांचा विचार करताना वडिलांनी कायम नात्यागोत्यांतल्या, ओळखीच्या/अनोळखी बायकांना 'माणूस/व्यक्ती' म्हणूनच वागवल्याचं दिसून येतं. कार्यामध्ये पुरुषांच्या पंगती आधी, बायकांच्या नंतर हे त्यांना पटत नाही. 'सगळे मिळून एकत्र बसून, पदार्थांची भांडी मध्ये ठेवून जेवूया. कुणी कुणाला वाढायला नको' हे त्यांचं ठरलेलं वाक्य असतं. माझ्या आणि माझ्या लहान भावाच्या एकंदरीत शिक्षण वगैरे वाटचालीत त्यांनी कधीही मुलगा/मुलगी म्हणून वेगवेगळे निर्णय घेतल्याचे, दुजाभाव केल्याचे आठवत नाही. आईच्या वडिलांची, माझ्या आजोबांचीही तीच पद्धत होती. त्या काळातील रीतीप्रमाणे आजीच्या घरच्यांनी पत्रिका पाहिल्यानंतर ती अजिबात जुळत नसली तरी माझ्या आजीशीच लग्न करणारे, लग्नानंतर तिला दहावीची परीक्षा द्यायला लावणारे, तिने नोकरी वगैरे काही केली नाही तरी तिच्या नावे वेगळा पैसा गुंतवून, त्याचे सर्वाधिकार तिच्याकडे देऊन ती आर्थिकदृष्ट्या कायम स्वयंपूर्ण असेल असं पाहणारे, तिच्याशी वेगवेगळ्या बाबींवर सल्लामसलत करणारे आजोबा! त्याचप्रमाणे आईनेही माझ्याबाबत 'तू मुलगी आहेस त्यामुळे तुला अमुकतमुक शिकलंच पाहिजे/आलंच पाहिजे' असा प्रकार केला नाही. अर्थात, नातेवाइकांमधले सर्वच लोक असेच होते असंही नाही. परंतु, अगदी नेहमी संबंध येणार्‍या स्त्रियांची आणि पुरुषांचीही विचारसरणी वरीलप्रमाणे असल्याने 'मी मुलगी आहे/मी स्त्री आहे' याहीपेक्षा 'मी पण एक व्यक्ती आहे' हा विचार सुरुवातीपासूनच रुजला. त्यामुळे 'स्त्रीमुक्ती म्हणजे मुलगी/स्त्री असण्याच्या जाणिवेकडून व्यक्ती असल्याच्या जाणिवेकडे झालेला/केलेला प्रवास' असं मला वाटतं.

अर्थात हा प्रवास तितका सोपा नाही. कारण यादरम्यान स्त्री म्हणून वेगवेगळ्या आघाड्यांवर आपल्यातील बहुतांश जणींना छोट्याछोट्या गोष्टींसाठी लढा द्यावा लागतो. घरात आलबेल असलं तरी बाहेर हे अनुभव मलाही आलेले आहेत. कधीकधी बायका सर्वसाधारणपणे डोक्याला शांतता राहावी म्हणून काही मान्य नसलेल्या तडजोडी करतात(ललिता-प्रीतिने लिहिलेली कायम चुडा घालून राहणारी तिची मैत्रीण), कधीतरी बाई म्हणून असलेल्या बंधनांना, बाई म्हणून होणार्‍या त्रासाला संधी मिळताच तीव्र प्रतिक्रिया उमटते(श्यामलीने लिहिलेल्या कोयता घेऊन नवर्‍याच्या अंगावर धावून जाणार्‍या बाईचं उदाहरण! बंधनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर साडी हे बाईवर असलेल्या बंधनासारखं मानणारी आणि म्हणून कधीही कटाक्षाने साडी न नेसणारी एक मैत्रीण आहे), कधीतरी स्वतःसाठी लढतालढता त्या भरात दुसर्‍या व्यक्तीला केवळ व्यक्ती म्हणून वागवायचं विसरायला होतं (स्वतःचा नैसर्गिक कल तसा आहे म्हणून लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून स्त्री बनलेल्या एका व्यक्तीवरची एका 'मैत्रिणीची' हिणकस प्रतिक्रिया)! स्त्रीमुक्ती म्हणजे आपल्याला नेमकं काय हवंय? आपण कुठल्या प्रसंगात नेमकं कसं वागायला पाहिजे, याबद्दल मनात गोंधळ उडू शकतो. पण पहिल्या परिच्छेदात म्हटलं तसं या सार्‍या घडामोडींमुळे गोंधळून न जाता 'आपण इतर चारचौघांसारखीच एक व्यक्ती आहोत' ही जाणीव कायम आपल्या मनात जागी ठेवणं, हा कळीचा मुद्दा आहे. एकदा तेवढं मनात पक्कं रुजलं की, ते आपल्या वागण्यातून इतरांपर्यंत पोचू लागतं. मग 'स्त्री आहेस म्हणून तू त्यागी, सहनशील, कष्टाळू, सद्गुणांची पुतळी असायलाच हवीस' वगैरे अपेक्षा आपल्यापर्यंत हळूहळू येईनाशा होतात. उलट इतर चारचौघांसारखे आपल्यातही व्यक्ती म्हणून गुणदोष, क्षमता, मर्यादा असणार, हे पहिल्यांदा आपण स्वतःशी आणि मग संपर्कात आलेल्या इतर व्यक्तीही आपसूक मान्य करू लागतात. तेव्हा आपल्या मनात उमटलेली स्वतःची प्रतिमा ही प्रामाणिक आणि खरी असते. 'सुपरवुमन' बनण्याची आवश्यकता मग भासत नाही आणि कुठलीही गोष्ट 'बायकी आहे' म्हणून ती कटाक्षाने टाळण्याचंही प्रयोजनही राहात नाही.

एकदा ही विचारसरणी अंगिकारली की, आजूबाजूच्या कमी वेगाने बदलणार्‍या सामाजिक परिस्थितीमुळे काही संघर्षाचे प्रसंग उद्भवणारच. तिथे प्रत्येक बाईची नक्कीच कसोटी लागणार. त्या प्रसंगाला आपण कसं हाताळतो, आपली भूमिका नीट जपतो की नाही, यावरून आपल्याला अजून केवढा पल्ला गाठायचा आहे, याचा अंदाज येतो. तडजोडी कराव्या लागल्या, चुका झाल्या, आपल्याला तेवढं बळ नाही म्हणून कधी माघार घ्यावी लागली तरी पुन्हा नेटाने आपण ठरवलेल्या लक्ष्याकडे प्रवास चालू ठेवणं महत्त्वाचं! आपल्या हयातीत लक्ष्य साध्य होईल/न होईल, किमान १०० टक्के प्रामाणिकपणे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिल्याचं समाधान नक्कीच असेल.

हे झालं वैयक्तिक पातळीवर! पण हा विचार बर्‍याच स्त्रियांपर्यंत अजून पोचलाच नाहीय आणि तो तसा पोचायला हवा, याची जाणीव आहेच. तो विचार पोचवण्याचं काम इतर करू शकतात, किंबहुना त्यांनी ते करावंच. पण पुढचा प्रवास जिचा तिचा स्वतंत्रपणे व्हायला हवा. काळ, परिस्थिती, देश कुठलेही असले तरी खर्‍या अर्थाने मुक्त होण्यासाठी ही जाणीव जिची तिला होणं फार महत्त्वाचं आहे आणि महिला दिन किंवा इतर प्रसंगांच्या निमित्ताने होणार्‍या चर्चेतून, विचारांच्या देवघेवीतून ती जाणीव प्रत्येकीपर्यंत नक्कीच झिरपत जाईल, अशी आशा नक्कीच आहे.
__________________________________

मी १. दक्षिणा २. गजानन यांना खो देऊ इच्छिते.

ललिता, आश्विनी छान पोस्ट!
श्यामली, बरेचदा अडाणी बायका खूप धैर्य दाखवतात याउलट शिकल्या सवरलेल्या मध्यमवर्गातील स्त्रीया निमुटपणे सोसतात वर त्याला सोइस्कर लेबलही लावतात.

श्रध्दा,
सुरेख पोस्ट आणि पूर्ण अनुमोदन. माझ्या पोस्टमधेपण मी हेच लिहीलं आहे- स्त्री आधी माणूस आहे हे स्त्रियांनी आणि समाजाने जाणून, समजून घेतलं पाहिजे. मग पुढची पायरी.

श्रद्धा, पोस्ट आवडली. लहानपणापासुनच स्त्री/पुरुष या पलीकडे प्रत्येकाकडे माणूस म्हणुन बघायची सवय लावणे गरजेचे आहे.
माझ्या नवर्‍याच्या ऑफिसातला किस्सा. त्याच्या हाताखालच्या एका माणासाला त्याने मुलाला डॉक्टरकडे न्यायचय म्हणुन कॉल-इन करु दिले. बाकीचे वैतागले होते. त्यांचे म्हणणे त्याची बायको नाही का नेऊ शकत. जेव्हा माझा नवरा म्हणाला की तिची एक महत्वाची मिटिंग आहे तेव्हा परत कॉमेंटस मूल आजारी असताना हिला मिटिंग महत्वाची...वगैरे.. या कॉमेंट करणार्‍यात स्त्रीयाही होत्या. हे सर्व प्रगत म्हणवल्या जाणार्‍या अमेरिकेत. म्हणजे मूल आजारी आहे तेव्हा जबाबदारी आईची हे समाजाने ठरवून टाकलेले. त्या नवरा बायकोच्या सामंजस्याला सपोर्ट करणे राहिले बाजूलाच. खरे तर त्या माणसावाचुन ऑफिसमधे फार काही अडणार नव्हते. माझ्या नवर्‍याने बदली कामगार बोलावला होता त्यामुळे इतरांचे काम वाढले असेही काही नव्हते. पण मूल आजारी असताना स्त्रीने बाकी सर्व बाजूला ठेऊन फक्त त्याचाच विचार करावा ही अपेक्षा. त्याच वेळी मूल आजारी असताना कामावर येणारे पुरुष मात्र .....

चेतन, कोणताही आव न आणता लिहिलेले साधे, सरळ पोस्ट आवडले. Happy

आशुतोष यांचे विचारही काही प्रमाणात पटले.

बाकी मैत्रीणींनी लिहिलेले प्रसंग/अनुभव वाचून वाईट वाटले. Sad

अश्विनी, खो दिल्याबद्द्ल धन्यवाद. इथे बर्‍याच जणांनी खुप चांगले विचार मांडले आहेत... माझेही दोन शब्द मांडते....
-------------
७ मार्च २०११
इमेलमधून एक सर्क्युलर आले की, उद्या महिला दिनानिमित्त सर्व स्त्रियांसाठी १ वाजता लंच आहे आणि त्यानंतर एका तज्ञ डॉक्टरचे 'तणाव मॅनेजमेंट' यावर २ वाजता व्याख्यान आहे.

८ मार्च २०११
सकाळी ट्रेनमध्ये बहुसंख्य स्त्रिया भरजरी साड्या नेसून दिसल्या.

साधारण ११च्या दरम्यान वहिनीशी बोलणे झाले. तिच्या ऑफिसात महिला दिनानिमित्त रेट्रो स्टाईल पार्टी ठेवली होती. कुणी अनारकली बनले होते, तर कुणी नीतु सिंग तर कुणी मुमताझ स्टाईल साडी नेसून आले होते

दुपारी लंचसाठी ऑफिसातील सर्व स्त्रिया जमल्या (जवळ पास १००). एकमेकींच्या साड्या, दागिने इ. गोष्टींची आस्थेने चौकशी सुरू होती. हास्यविनोद रंगले होते. महिलादिनाची मेजवानी झकास होती. एक जण जीन्स आणि टीशर्टमध्ये आली होती. तिला एका मध्यमवयीन स्त्रीने म्हटले की, 'आज जीन्स घालून आलीस? आज तर साडी नेसायला हवी'. त्यावर त्या मुलीने उत्तर दिले की, आज तर मुद्दमहून जीन्स घालायची असते'

डेस्कवर काहितरी काम होते, ते आवरून २.१५ वाजता ऑडोटोरीयम मध्ये पोहोचले... मनात ओशाळवाणं वाटत होतं की, व्याख्यान सुरू झालं असेल. तिथे जाऊन पाहिले तर, १५-२० जणीच आल्या होत्या. २.४५ पर्यंत वाट बघून व्याख्यान सुरू केले गेले. १५-२० जणींमधल्या काही जणी अर्ध्यातून उठून गेल्या. त्यातली एक मीही होते. मोबाईलवर सारखे सारखे डिपार्टमेंटमधून फोन येत होते. त्यामुळे तणावमुक्तीचे व्याख्यान ऐकता ऐकता माझा ताण वाढू लागला होता.
---------

अशाच प्रकारचे अनुभव मला दरवर्षी येतात. साडी नेसण्याचा आणि जीन्स घालण्याचा महिला दिनाशी काय संबंध आहे, हे मला आजपर्यंत कळले नाही. महिला दिनाच्या दिवशी लंच किंवा थीम-बेस्ड पार्टी का करावी, हेही मला लक्षात आले नाही.

कर्मचारी स्त्रियांच्या कल्याणासाठी काहितरी केलय हे दाखवण्यासाठी ऑफिसात व्याख्यान ठेवले गेले (एक फॉर्मलिटी म्हणून) इतर कर्मचार्‍यांसाठी 'काहितरी टाईमपास चाल्लय' इतकच त्याचं महत्व. म्हणून व्याख्यानाला गेलेल्यांना फोन करण्यात त्यांना गैर वाटले नाही.

मुळात ९०% स्त्रियांचे त्यांच्या आरोग्याशी संबधीत असलेल्या व्याख्यानाशी काहिच देणेघेणे नव्हते.
______

माझा खो- (१) मनिषा लिमये (२) मंजूडी (३) भावना (भावना गोवेकर)

इकडे पण सगळ्या पोस्ट्स छान आहेत.ललिता, श्रद्धा ची विशेष आवडली.
भरजरी साड्या महिला दिनानिमित्त Uhoh

आमच्या ऑफीसात तर कुणाला त्या महिला दिनाचा कसला गंध नसतो. किती जणींना तो ८ मार्च ला असतो हे माहित असेल कोण जाणे. मी आत्तापर्यंत ३-४ ठिकाणी काम केलयं पण इकडे अमेरिकेत ह्या दिवशी ऑफीसात वगैरे काही खास करतात हे कधीच बघितलं नाही किंवा विशेष कोणाकडून ऐकलं पण नाही.

खूप चांगला प्रतिसाद मिळतोय या उपक्रमाला. त्याबद्दल संयुक्ताचे अभिनंदन! मला खो दिल्याबद्दल श्रद्धाला धन्यवाद. आणि शैलजाचेही आभार.

एवढ्या लोकांनी मनापासून लिहिलंय यात बरेच मुद्दे आले आहेत.

माझेही विचार मी थोडक्यात लिहितो.

१) माझ्या भाचीच्या जन्माच्या वेळेची गोष्ट : इस्पितळातून सोडल्यावर घरी निघताना प्रसूतिकक्षातल्या आयांनी बाळाच्या आजीला (म्हणजे अचूक निशाणा) घेरलं. बाळाच्या आगननाने हरकून गेलेली पहिलटकरीण आजी म्हणजे माझी आई अर्थातच त्यांच्या आग्रही मागणीला बळी पडली. आणि काही रुपये त्यांच्या हातावर टेकवले. ते त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी असावेत. कारण आमची पाठ फिरतेय तोवरच त्यांच्यातला संवाद आमच्या कानावर आला - "असू दे. मुलगी झालीय.. मग काय जोर करू शकत नाही.."

२) मुलीच्या जन्माच्या वेळेची गोष्ट : माझी मुलगी मुदतपूर्व प्रसूतीत जन्माला आली. जन्माच्या वेळची तिची अवस्था फारच नाजूक होती. तिच्या जगण्याविषयी डॉक्टरांना खात्री वाटत नव्हती. पुढच्या अडचणी, त्यांवरचे उपचार आणि त्यासाठी येणारा अवाढव्य खर्च याची त्यांनी आम्हाला स्पष्ट कल्पना दिली. शिवाय हे केवळ प्रयत्न म्हणून करायचे आहे - तेव्हा पुढचे उपचार करायचे का, असे त्यांनी आम्हाला विचारले. अर्थातच पुढच्या उपचाराकरता मुलीला दुसर्‍या इस्पितळात तातडीने पाचारण करण्यात आलं. पण त्यापूर्वी तिथून निघताना प्रसूतितज्ञ डॉक्टरच्या मदतनीसेच्या तोंडून सहज निघालेला उद्गार - "इतना मतलब कुछ भी करने को तय्यार हो गये.. कम से कम लडका तो होता.."

३) मागे कोणत्या तरी बाफावर मूल दत्तक घेण्याविषयीची चर्चा चालली होती. त्यात जाता जाता रैनाने एका खरवडणार्‍या सत्यावर प्रकाश टाकला - जन्मल्याबरोबर मुलग्यांना जेवढ्या प्रमाणात बेवारस म्हणून सोडण्यात येते त्यापेक्षा मुलींचे प्रमाण कितीतरी जास्त असते.

शिक्षितांच्या बाबतीतले एक उदाहरण - तरूणपणीच नवरा निवर्तल्यावर तिने मोठ्या जिद्दीने आपल्या मुलीला मोठी करून उच्च शिक्षण दिले. मुलीला चांगली नोकरी लागली. थोडी स्थिरस्थावर झाल्यावर मुलीने आईच्या नावे एक घर घेतले. दरम्यान मुलीचे लग्न ठरले आणि झालेही. अर्थातच उच्चशिक्षित, चांगल्या पगाराची नोकरी असणारा वगैरे वगैरे जोडीदार. लग्नानंतर लगेचच बायकोच्या पगारातून तिच्या आईच्या नावावर असलेल्या घराकरता हप्ते जाता कामा नयेत या गोष्टीवरून पुढे त्यांचा घटस्फोट झाला.

सगळ्या गोष्टी अफाट चीड आणणार्‍या. आणखी बर्‍याच ठिकाणी चीड येत गेली. मग विचार केला. याच्यावर चिडून काय होईल? असे उद्गार काढणार्‍यांना ते असेच शिकवले गेलेय. हेच त्यांनी पहिल्यापासून पाहिलेय. हेच त्यांनी पहिल्यापासून ऐकलेय. आजूबाजूला याच्यातच ते वाढलेत. बर्‍याचदा हे चूक आहे हे त्यांच्या गावीही नाही. रंगांधळ्या माणसाला जगात आणखी रंग आहेत हे कोणी सांगितले नाही तर कळेल का? अशी अवस्था असते. आपण शक्य तेवढा हा थरांवर थर चिवट होऊन बसलेला रंगांधळेपणा काढायचा.

सगळ्या थरातल्या स्त्रीमुक्तीविषयीची माझी पायाभूत समज :
०. स्त्री ही एक माणूस आहे. तिला इतरांसारखेच मन, भावना, तहान, भूक, इच्छा, स्वाभिमान आहे आणि त्याचा आदर ठेवला पाहिजे.
१. कोणत्याही निर्णयात स्त्रीला 'नाही' म्हणता येण्याइतकी मोकळीक मिळायला हवी.
२. कोणत्याही क्षणी तिच्या होणार्‍या मानसिक किंवा शारीरिक कुचंबनेविषयी 'आपण घरच्यांशी मोकळेपणाने बोलू शकतो,' असा तिला विश्वास वाटायला हवा.
३. तिची जीवनशैली / करिअर तिला ज्या प्रकारे जगायचे आहे, तसे तिला ते जगण्याची मोकळीक मिळायला हवी.
४. स्त्रीने यापैकी कोणत्याही बाबतीत आपल्यावर "स्त्री आहे म्हणून" कुरघोडी करण्यात येतेय हे जाणवेल तेथे ठामपणे त्याला विरोध करायलाच हवा.
५. कोणीतरी सतत आपली काळजी वाहणारा असेल तरच आपण जगू शकतो, या विचारातून स्त्रीने बाहेर पडावे.

घरातले बोलायचे तर आई गृहिणी. वडिलांनी स्त्री म्हणून आईचा अनादर केल्याचा एकही प्रसंग आठवत नाही. वडिलही उत्तम स्वयंपाक करणारे. कपडे, धुणी, स्वयंपाक वगैरे घरात दिसेल ते काम करण्यात त्यांना कधीच काही वाटले नाही. पत्नी माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे त्याचा मला कमीपणा वाटत नाही. मला सख्खा मेहुणा नाही याचं मला ओझं वाटत नाही. माझ्या लहान मुलीचं सगळं करण्यापासून संसारातलं कोणतंच काम करायला मला कमीपणा वाटत नाही.

माझे खो : ललिता (Lalitas), इंद्रधनुष्य.

>> ४. स्त्रीने यापैकी कोणत्याही बाबतीत आपल्यावर "स्त्री आहे म्हणून" कुरघोडी करण्यात येतेय हे जाणवेल तेथे ठामपणे त्याला विरोध करायलाच हवा.
>> ५. कोणीतरी सतत आपली काळजी वाहणारा असेल तरच आपण जगू शकतो, या विचारातून स्त्रीने बाहेर पडावे.

>> बर्‍याचदा हे चूक आहे हे त्यांच्या गावीही नाही. रंगांधळ्या माणसाला जगात आणखी रंग आहेत हे कोणी सांगितले नाही तर कळेल का? अशी अवस्था असते. आपण शक्य तेवढा हा थरांवर थर चिवट होऊन बसलेला रंगांधळेपणा काढायचा.

पते की बात! Happy

Pages