ठिणगी - २

Submitted by दाद on 11 January, 2009 - 17:50

मानसी घरात शिरली. गेले दोन दिवस अगदी जरूरीचं तेव्हढं आवरून बाबा जिथे शून्यात नजर लावून बसत होते, तिथेच आत्ताही बसले होते... आरामखुर्चीत. आतल्या खोलीत जाताना तिने आशेने बघितलं पण तिच्या नजरेला नजर मिळताच त्यांनी तोंड फिरवलं....
’दार लाव, आत जाण्यापूर्वी’, अतिशय कडवट दुखावल्या स्वरात त्यांनी तिला सांगितलं. तिला माहीत होतं तितक्या वर्षांत ह्या घरचंच काय पण चाळवजा ह्या बिल्डिंगमधल्या कुठल्यास घराचं दार, घरात माणसं असताना लावण्याची पद्धत नव्हती.

मानसी वळली आणि तिने दार लावलं, ’बाबा...’ तिनं बोलायचा प्रयत्नं केला पण तितक्याच कडवट स्वरात ते परत म्हणाले, ’आत जा...’
निमूटपणे मानसी आत आली.
वास्तविक सकाळची न‌ऊ-दहाची वेळ म्हणजे आ‌ईची कोण गडबड असायची. बाबा, बल्ल्याचे डबे, कामवालीचं येणं, स्वयंपाक, सगळीच घा‌ई. याक्षणी स्वयंपाकघरातल्या छोट्या पलंगाच्या कडेला ती डोक्याला हात लावून बसली होती.

बल्ल्या तिच्याशी जुजबी बोलून कॉलेजला गेला होता. पण एकूण प्रकाराने तोही बावचळला होता. मानसीने आपले कपडे घेतले आणि आंघोळीला निघाली, ’आ‌ई, आंघोळ करून....’

तिचं वाक्य पूर्णं होण्यापूर्वीच आ‌ईने ’कर काय हवं ते...’ अशा अर्थाचा हात हलवला.

बाथरूममधे कितीही प्रयत्नं केला तरी तिचे डोळे वहायचे थांबेनात. हातांच्या ओंजळीत चेहरा घे‌ऊन खाली बसताना, तिच्या गुढग्यातून निघालेली कळ मस्तकात गेली... आणि मानसी ताठ उभी राहिली. तिने स्वच्छ डोळे पुसले. आणि आंघोळ उरकली.
कपडे घालण्यापूर्वी, खांद्यावर, डाव्या स्तनावरच्या काळ्या-निळ्या खुणांवर तिने हळूवार हाताने मलम लावलं. घरातला सुती पंजाबी ड्रेस घालून ती बाहेर आली. केस पुसून पंचा दोरीवर वाळत घातला.

’आ‌ई, काय मदत करू? भाजी देते चिरून, चालेल?’, मानसीने आ‌ईच्या उत्तराची वाट न बघता विळी घेतली आणि चवळीच्या निवडलेल्या शेंगा मुठीत घे‌ऊन मान खाली घे‌ऊन चिरायलाही लागली.

’मदत करतेस बायो? कर. मी सांगते ती मदत करशील?’ गेल्या काही तासांत पहिल्यांदाच फुटलेला आ‌ईचा आवाज ऐकून मानसीच्या घशात आवंढा आला. तिने नुस्तीच मान हलवली.

’.... परत जा. त्यांच्याकडे परत जा. लग्नं म्हणजे तुझे खेळ नव्हेत.... एका स्पर्धेत हरल्यावर दुसरीत भाग घ्याला..... एव्हढे उपकार कर आ‌ई-बापावर. तुला....’, आ‌ईचं बोलणं अजून पूरं व्हायचं होतं.... अर्ध्यावरच मानसीचा हात धसला विळीवर....
तिला कळलंच नाही बहुतेक, पण आ‌ई चित्कारली, ’अगं... केव्हढं कापून घेतलस....’

आ‌ईच्या बोलण्याकडे लक्षं न देता मानसीने स्वयंपाकघराचं दार बंद केलं, तसाच रक्तं गळणारा हात वर करून दिवा लावला..... आणि... आणि... डोक्यावरून कुर्ता काढला...

ह्यावेळी तोंडावर हात घे‌ऊन आ‌ई जागच्या जागी थरथरत बघत राहिली... लाडा-कोडात वाढवलेल्या आपल्या कोवळ्या वेलीवरचे आघात... सहज दिसणार नाहीत असे... जबरदस्तीचे... पाशवी...

खांद्यावर, स्तनांवर दातांच्या खुणा.... मानसी स्थिर नजरेने आ‌ईकडे पहात होती. तिने सलवारच्या नाडीला हात घातला....
आ‌ई ओरडल्या, ’मने, थांब.... मनू, काय पोरी हे....’ त्यांना पुढे बोलवेना. त्यांनी पुढे हो‌ऊन तिला कुशीत घेतली आणि रडू लागल्या.
’कसं होणार तुझं.... कुठे तोंड दाखवणार आपण....’

मानसी वेगाने आ‌ईच्या कुशीतून बाजूला झाली. तिचा तोल सुटला. ती तारस्वरात किंचाळली, ’अजून तुला लोक काय म्हणतील ह्याचीच काळजी आहे? अजून? म्हणजे काय झालं की तू माझी काळजी करशील? मेले की? जीव घेतला त्यांनी तर करशील की... मी जीव दिल्यावर?.... बोल ना.... बोल आ‌ई.... आ‌ई’

बाबा जोरजोरात दार खडखडावत होते., ’काय चाललय? मानसी... दार उघड... दार उघडा आधी’

मानसीने कुर्ता घातला आणि दार उघडलं. बाबांचा आवाज वाढला होता. ’काय तमाशा लावलाय? झालं तेव्हढं पुरे नाही झालं? आता बिल्डिंगमधे शेजार-पाजार गोळा करायचाय..... काय सांगणारेस त्यांना?... काय बोल... लोकांच्या पोरी नवर्‍याने मारहाण केली म्हणून परत येतात.... माझी पोरगी नवर्‍याला मारहाण करून....

इतक्यात लोटलेला दरवाजा उघडून शेजारचे वैद्य, गोकर्णं आले. मागोमाग सामंत काकूही आल्या.
’बोल मने... बोल. कुठे तोंड लपवू आम्ही आता? जातीत, नातेवा‌ईकांत जायची सोय राहिली नाही.... नादान.... नालायक... उरावर धोंड बनून रहाणार आहेस... आयुष्यभर... जीव घे आधी आमचा... मग...’, बाबांच संयम संपला होता, तोल सुटला होता. गेल्या दोन दिवसातलं सगळं सगळं गरळ हो‌ऊन बाहेर पडत होतं.

मानसीला सगळच असह्य झालं बहुतेक.... कारण क्षणात अख्खी खोली तिच्या भोवती फिरली आणि ती चक्कर ये‌ऊन पडली.

’अहो... काय असं... थांबा...’ ह्या पलिकडे आलेल्यांपैकी कुणालाच काही बोलायचं सुचेना.

एकमेकांच्या अडी-अडचणीला धावणार्‍या ह्या शेजार्‍यानी मग सगळं जरा ताब्यातच घेतलं. सामंतकाकूंनी कांदा ठेचून लावला. वैद्यांनी बाबांना आपल्या घरी ओढून नेलं. गोकर्णं इथेच थांबले, मिसेस गोकर्णं ये‌ईपर्यंत. पंधरा मिनिटांत त्या ही आल्याच.

मानसी तोंडावर पांघरूण घे‌ऊन भिंतीकडे तोंड करून पडून राहिली. हळू हळू कुजबुजत्या स्वरात सामंतकाकू, ललिताकाकू आ‌ईशी बोलत राहिल्या, समजावत राहिल्या. एक एक कळलं तशी, ’बरं झालं मुलगी हातीपायी धडपणे मिळाली आपली आपल्याला’ ह्या निर्णयापर्यंत त्या दोघी आल्या. आ‌ई अजून नातेवा‌ईकात काय म्हणतील, कसं तोंड दाखवायचं... हेच अधुनमधुन काढत होती.

शेवटी मानसीला राहवेना... ती उठून बसली.
सामंत काकू धावल्या, ’कसं वाटतय मने? तू काही मनाला लावून घे‌ऊ नकोस, हो... आम्ही बघितलीये तुला लहानाची मोठ्ठी होताना... कोण उगाच कशाला नवर्‍याचं घर सोडून निघून ये‌इल असं..... तू...’

मानसीने त्यांना थांबवलं. ’काकू... हे माझ्या आ‌ई-वडलांना पटायला हवय’

’मग? काय चूक सांगतोय? रितीप्रमाणे वागायला नको?... तुझ्या आणि सगळ्यांच्याच भल्याचं सांगतोय, मने...’, आ‌ई म्हणाल्या.

’आ‌ई... पुन्हा तेच. काय रिती प्रमाणे? कोण ठरवणार रीत? माझा जीव रितीप्रमाणेच जा‌ईल... तेव्हा ...तेव्हा शुद्धीवर येशील की, रितीप्रमाणे गेली पोर... आपल्या घरीच मेली... म्हणून समाधान...’,

सामंतकाकूंनी आवेगाने तिच्या तोंडावर हात ठेवला, ’मने, भरल्या घरात काहीही काय बोलतेस? असं कस अशुभ बोलवतं तुला?’

’काकू, मी अशुभ बोलले? आ‌ई-बाबाच बोलतायत, मी फक्तं त्या अशुभाचं फळ सांगितलं... तर मी अशुभ?.. त्यांना मी इथे नको असेल तर...’

’मानसी... मने...’ आ‌ई धावली आणि तिनं मानसीला जवळ घेतली.

मानसीने आ‌ईच्या मिठीतून सुटायचा प्रयत्नं केला.... तिची धडपड पाहून आ‌ईनं अधिकच घट्टं धरली आणि त्याही रडू लागल्या...

सामंतकाकू, ललितावहिनींनी सावरलं कसंतरी दोघींना.

मानसीने आ‌ईच्याच पदराने चेहरा पुसला, ’आ‌ई... मी सांगते ते ऐक, आधी. लग्नं ठरल्यावर, दोन-तीनदा भेटलो तेव्हा, तेव्हा ही.... मला उगीच वाटलं की अधीरेपणा असेल... पण एका बाजूला असही वाटत होतं की, अगदी दुखवणारच का असायला हवं... साधा किसही...’

’बोलली नाहीस, मने’, आ‌ई म्हणाल्या खरं पण त्यांच्याच लक्षात आपलाच हलणारा स्वर आला.

’आ‌ई, अशा गोष्टी... अशा गोष्टी... बोलत नाहीत... आणि नाही बोलले तेव्हा काही... मला... मला माहीतच नव्हतं काही...
लग्नं झाल्यावर बाहेर गेलो.... चारच दिवस. मी मैदानी खेळात अनेक बक्षिसं मिळवलीयेत, कराटे शिकलेय, करते... ह्याचा त्यांना आनंद का माहितीये?... सांगायलाही लाज वाटते... पण ऐकच तू.
कारण... कारण अशा मुली... श्शी... छान भरलेल्या असतात म्हणे...
तेव्हाही... श्शी... कसं सांगू... थोडी मारहाण, जबरदस्ती, पाशवीपणा केल्यशिवाय मजा येत नाही, म्हणे... काकू, माझ्या महिन्याचा गोंधळ झाला म्हणून जरा सुटले, नाहीतर...’

ललिताकाकू आणि सामंतकाकू दोघीही शहारल्या.

आ‌ईंनी काहीतरी शब्दात मांडायचा प्रयत्नं केला, ’अगं... असतात काही नवरे असे... जरा नवीन नवीन आहे म्हणून... थोड्या दिवसांनी हो‌ईल शांत... पण म्हणून तू हात उगारायला नको...’

’काय? तू मारलस नवर्‍याला?’, सामंतकाकू आणि ललिताकाकूचेही डोळे विस्फारले.

’नाही. मी फक्तं माझं संरक्षण केलं. सरळपणे करायचं तर मी तयार आहे... पण वाट्टेल तशी इजा केलेली चालणार नाही असं सांगितल्यावर..... चिडले.
आणि... आणि त्यांनी हात उगारला... आ‌ई, काकू देवाशप्पथ सांगत्ये.. मी आधी हात उचलला नाही. माझ्याच नकळत माझे हात उठले आणि त्यांचा हात चेहर्‍यावर पडायच्या आधीच मी हातांच्या कैचीत अडकवला... कराटे! सेल्फ़ डिफ़ेन्सचा पहिला काटा....
हे इतकंच झालय. मी हात उठवला नाही. मी त्यांच्यावर वार केलेला नाही...’
मानसीच्या स्वरातल्या आवेशापेक्षा तिचे डोळे खरं बोलण्याची साक्ष देत होते.

’आ‌ई, हे आम्ही परत आल्यावर झालंय... त्यांनी आधी केस धरले माझे... तेव्हाच मी नाही म्हटलं. वाट्टेल तसं दुखवणार असलात तर चालणार नाही म्हणताना माझ्या थोबाडीत देण्यासाठी हात उचलला... मग माझेही हात आपो‌आप उठले आणि... आणि मी फक्तं अडवला त्यांचा प्रहार, आ‌ई, तुझी शप्पथ...
आधी हे माझ्याच नकळत झालं... पण मग मी सावध झाले. हाताचा उपयोग नाही म्हटल्यावर त्यांनी कोपर्‍यातली धुणं वाळत घालायची काठी घेतली हातात.
आ‌ई, माझा नवरा मला लग्नानंतर अवघ्या आठव्या दिवशी मारण्यासाठी हातात धुण्याची काठी घेतोय?... सुशिक्षित म्हणवणारं घराणं ना हे? आपल्या कुणाच्यातही न ऐकलेली गोष्टं ही....
घडलं ते मला इतकं आश्चर्यचकित करणारं होतं की... माझं लक्षं उडालं आणि गुढग्यावर बसली काठी...’
बोलता बोलता मानसीने सलवार गुढग्यापर्यंत वर खेचली. अजून मेंदीचा रंग उतरला नाही असे गोर पान पाय... गुढग्यावर टरटरून सुजलेला दाट काळा-निळा व्रण होता...

’अग्गो... ’ म्हणताना ललिताकाकूंच्या डोळ्यात पाणी आलं. आ‌ई उभ्या होत्या तिथेच मटकन खाली बसल्या.

’पण पुढचा वार नाही करू दिला, मी. त्यांना कळायच्याही आधी काठी माझ्या हातात होती.... चालती हो असं म्हणून नेसत्या कपड्यांवर बाहेर काढली मला... तू... तुम्ही समजून घ्याल म्हणून इथे आले.... माझं घर समजून.
काय करू आता? माफी मागून जा‌ऊ परत? पाय चाटू त्यांचे? रोज मार खा‌ऊ? असंच जोर-जबरी, घाणेरडं, उबग आणणारं वैवाहिक म्हणायचं म्हणून तसलं आयुष्य जगू?’

’मने, काही सामंजस्याने घे‌ऊया. आम्ही मोठी माणसं त्यांची समजूत घालू गं... पण असं एकदम तोडून टाकून. आमचे संस्कार...’

आ‌ई आपलं वाक्य पुरच करू शकल्या नाहीत. मानसीने त्यांना मधेच तोडलं, ’आ‌ई, संस्कार म्हणजे नक्की काय म्हणायचय तुला? जे आज्जी-नानांनी तुला शिकवलं तेच ना?... मी सुद्धा माझ्या संस्कारांच्या बळावरच करतेय हे... वयाच्या पाचव्या वर्षापासून कौतुकाने मैदानी खेळ आणि कराटेला कोणी घातलं? प्रसंगी स्वत:ला नवीन कपडे घेतले नाहीत पण कराटेची फी भरत होते बाबा. जपानला जायच्या खर्चासाठी स्वत:च्या बांगड्या मोडणारी तूच ना?
बल्ल्याला आणि मला मुलगा-मुलगी असं वेगळं वेगळं भासवू दिलत नाहीत कधी... ’कराटे शिकायला नव्हे, आता शिकवायला जातेय माझी मुलगी’ हे अभिमानाने सांगता ते खोटं?
फार पूर्वी एकदा बल्याला त्रास देणाऱ्या त्या चाळीतल्या टारगट पोरांबरोबर झुंजले त्यावेळी डोळ्यात पाणी आणून बाबांनीच ना माझी पाठ थोपटली होती?... तुला भय नाही... समर्थ आहेस स्वत:चं संरक्षण करायला, असं बाबाच ना म्हणाले होते तेव्हा?’
स्वत:चं रक्षण फक्तं घराबाहेरच करावं लागेल... घरातले जपतात एकमेकांना... हेच माहीत होतं आजवर.
कायम बाबांनी कसं तुला जपलय ते बघितलय, मी आ‌ई... माझे हे संस्कार कसे पुसू ते सांग आधी.... कशाला असल्या समजुतीत वाढवलत मग मला? बोल ना?’

आ‌ईसकट सगळ्याच नि:शब्द झाल्या.... इतक्यात इतकावेळ आड दाराबाहेर उभं राहून सगळं ऐकणारे बाबा घरात शिरले, त्यांच्याबरोबर पापाजी, वैद्यकाका, तेलंगही आले.

’मानसी, हे सगळं ऐकल्यावर तुला परत जा म्हणणार नाही. तेव्हढा निर्दय बाप नाही मी. मगाशी बोललो ते त्राग्याचं होतं पोरी..... आजच्या काळात न ऐकलेलं न घडलेलं घडतय आपल्या घरात.... तुझी मोठी आत्त्या... तिचा छळ केला सासरच्यांनी, मी लहान होतो. पण मोठा झाल्यावरही कधी ’ये सगळं सोडून, मी बघतो तुला’..... असं म्हणायला धजावलो नाही...
मोठा धाडसाचा निर्णय आहे तुझा. सगळ्यांनाच जड जाणारय...’

दोन दिवसांत पहिल्यांदाच सरळपणे, मायेनं बोलणारे बाबा बघून मानसीला हुंदका फुटला. तरी तो तसाच जिरवत ती म्हणाली, ’बाबा, हे सगळं खूप दु:ख देणारं आहे... दुर्दैवी आहे. तुम्हा सगळ्यांचं म्हणणं असेल तर मी परत जायला तयार आहे.... अगदी न केलेल्या चुकांची माफी मागूनही...’

सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले, आ‌ईंची तिच्या हातावरची पकड घट्ट झाली.
’... पण एकाच अटीवर. त्यांच्या जोरजबरदस्ती आणि मारहाणीला माझ्याकडून विरोध होणार नाही ह्याची मी खात्री दे‌ऊ शकत नाही... तो माझ्या रिफ़्लेक्स चा एक भाग आहे...’

’...असं तर, कोणीच...’, नकळत गोकर्णं म्हणायला गेले.

मानसीने मान हलवली,’...बरोबरय, काका. पण माझं हे ठरवून लग्नं आहे. एकमेकांत प्रेम निर्माण होण्यासाठी दोघांनी प्रयत्नं करायला हवेत. त्यांची ही जी काय आहे ती एक विकृती आहे... त्यावर औषधोपचार, मानसोपचार असतील तर ते करून घ्यायला त्यांनी तयार व्हायला हवं... मी मदत करायला तयार आहे.... लग्नं संस्थेवर माझाही विश्वास आहे.... पण अंध विश्वास नाही. बोलाल हे सगळं त्यांच्याशी आणि त्यांच्या घरच्यांशी?’

बाबांनी नकारार्थी मान हलवली... पटूनही हतबल झाल्यावर माणूस हलवतो तशी. ,’मला माहीत नाही. तू करतेयस ते... आपण करतोय ते बरोबर का चूक... माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे आहे हे सगळं...’

इतकावेळ खुर्चीवर बसलेले पापाजी, काठीचा आधार घेत उठले. आपल्याच एखाद्या मोठ्ठ्या काकाच्या किंवा आजोबांच्या अंगावर खेळावं तशी त्यांच्या अंगा-खांद्यावर मानसी खेळली होती. त्यांचे सुखी आणि बाली, दोघेही राखीला न चुकता यायचे.

’चलो अब, अपने अपने घर चलो सब. थकी होगी बच्ची... उसे थोडा आराम करने दो...
दो दो फ़्रंट्सपर लड रही है,.... बाहरवाले बाहरके सही..... लेकीन घरवालोंसेभी मुकाबला?’

बाबांनी चमकून त्यांच्याकडे बघितलं. ’माफ करना, मनूके बाबा. मुझे पता है आपपे क्या गुजरी है... लेकिन कुछ गैर तो नही कर रही बच्ची... अपना सिखाया, धरम पाल रही है, बस्स...
और... खुदको बचाना गैर कबसे हु‌आ? ऐ?...
एक जमाना था, जब हमारेमे ऐसी बेटियोंकेलिये गुरूसे मन्नत मांगा करते थे... ये तो शेरनी है, शेरनी...’
त्यांच्याकडे अपलक बघणार्‍या मानसीला त्यांच्या डोळ्यात पाणी तरळताना दिसू लागलं.
’अठ्ठे आ, बेटी. मुझे पता है की तेरी बात सही है. लेकिन जब तुम्हारे अपने नही समज पा रहे वहा....’, त्यांना वाक्य पुरं करता आलं नाही. थकल्या खांद्यांनी पुढे हो‌ऊन त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.
’अठ्ठे आ, बेटी. तू फिकर ना कर. दिल साफ है तेरा... गुरू देखते है, सुनते है सबकी... सब ठीक होगा...’, पुढे होऊन त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. लहान मुलीसारखी मानसीने मान हलवली.

वळता वळता पुढे म्हणाले, ’एक बात सुन... इस घरमे तेरा आबोदाना नही रहा तो, तेरा दुसरा बाप उप्परवाले मालेपे रहेंदा है... दो दो पाई है...’

आता मात्र बाबा तीरासारखे उठले आणि मानसीच्या जवळ जाऊन बसले... तिच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवताना त्यांना रडू आवरेना....
ह्यावेळी त्यांच्या गदगदणाऱ्या खांद्यांना धरून पापाजी, वैद्यकाका, तेलंग उभे होते.

*****************************************आठच दिवसांत दिवाळी आलीही... एव्हाना नातेवाईकांमधे कळलच होतं. आपली रजा रद्द करून मानसीने कामावर जायला सुरूवात केली होती. कामावरच्या अगदी मोजक्या काहीच सोडल्यास जवळ जवळ सगळ्यांनी पाठिंबा दाखवला होता.

दिवाळी म्हणजे कोण गडबड... आईबरोबर जाऊन बाबा-बल्ल्यासाठी आवर्जून खरेदी, दिवाळीचा फराळ, बल्ल्या आणि इतर मुल-मुलींबरोबर बिल्डिंगचा मोठ्ठ्या सामुहीक कंदिल बनवायचा, रांगोळीची तयारी, घरची छोटिशी रोषणाई, पणत्यांची तयारी....

ह्यावेळी ह्यातलं काही घडलं नव्हतं, सुतकात असल्यासारखच घर गप्प गप्प होतं! आई-बाबा अजून पूर्णं सावरले नव्हते. कळतय पण वळत नाही, बुद्धीला पटतय पण मन मानत नाही... अशा चक्रात आई-बाबा आलेला प्रत्येक दिवस ’कसं होणारय हिचं आयुष्यात पुढे?’ ह्याच एका विचारात गुरफटलेले होते.

भाऊबीजेच्या दिवशी मानसीने बल्ल्याला सकाळी ओवाळलं.... नेहमीसारखी दंगामस्ती झाली नाही. मानसीने ओवाळणीत घातलेला छोटा बॉक्स नेहमीप्रमाणे गडबडीने उघडला नाही. तसाच हळूच नेऊन देवाकडे ठवला.... आणि तिच्या मामे, मावस भावांची झुंड आरडाओरडा करीत घरत शिरली. हा मात्रं दरवर्षीचा भाऊबीजेचा शिरस्ता. तीन-चार गाड्या मोटारसायकली काढून हे आठ-दहा भाऊ सगळ्या बहिणींकडे हिंडायचे. कुणालाच वेळ दिलेली नसायची... मग प्रत्येक बहिणीने दिवसभर वाट बघायचीच.

’हे काय, काका! कंदील नाही या वेळी?...’ सद्याने आल्या आल्या घरातलेच सगळे दिवे लावले.

’आत्ये, चहा टाकते गं, आलं घालून, सगळ्यांची तोंड अगदी कावलीत गोड-गोड खाऊन आणि आम्ही खूप सक्काळी निघालोय’, वंदू स्वयंपाकघरात शिरलीही. ही एकच शेंडेफळ बहीण टॉमबॉयसारखी सगळ्या भावांबरोबर त्यांच्या विरोधाला न जुमानता फिरायची.

’कर कर... तेच एक नीट जमतय तुला इतक्या वर्षांनंतर’, आदित्यने तिला चिडवलं.

बावरलेले आई-बाबा हो हो नाही नाही करीत अजून उभेच होते.

’काका, बसा, हो. आपलच घर समजा...’ विन्याने त्याचा घासून घासून गुळगुळीत झालेला टाकला आणि कोणी हसणार नाही माहीत असल्याने स्वत:च मोठ्ठ्याने हसला.

’मन्न्या कुठय?’ बाळदादाने आत डोकावत विचारलं. हा सगळ्यात मोठा. मानसीला मन्न्या म्हणणारा एकमेव, ’लवकर ओवाळणीची तयारी कर गं... अजून सगळ्यांच्यात जायचय.. अणि तुझ्या वैनीचे अहिरावण-महिरावण संध्याकाळी जेवायला आहेत घरी. त्याआधी पोचायचय मला’

मानसी आरतीचं घेऊन आली, थोडी आळेबळेच हसली. तरी नेहमीच्या थट्टा मस्करीत, आरड्या-ओरड्यात ओवाळणी संपली. मानसी आरती घेऊन वळणार इतक्यात बाळदादाने तिला थांबवलं.
’मन्न्या, आपल्या सगळ्यांत घाबरट मी आणि सगळ्यात शूर म्हणायचे ते सोंड्या आणि तू... एकच सांगतो, जे काही झालय ते फार सुखाचं नाही. मानलं तुला. तुझी धन्य आहे पण, मने. ह्यातून बाहेर पडायला वेळही लागणार आहे आणि सगळ्यांचीच कसोटी आहे....’

’बाळदादा, तू नेहमीच शेपटी घालणार... मन्ने, तू फक्तं सांग... त्याला धडा शिकवायला वेळ नाय लागणार... कुठे रहातात ते हरामखोर लोक, मला माहित्येय...’, सोंड्याचं बोलून होतय तोच बल्ल्याही उसळला, ’मला तर वाटतं... चेचून काढावा साल्याला... ताईच्या अंगावर हात? आई-बाबा शांत आहेत... मी मोठा असतो ना, तर कोणाचं न ऐकता... आधी त्याला ठेचला असता... साला... आमच्या घरातले पुळचट आहेत रे... तुम्हाला राग येत नाही, बाबा? कसा येत नाही राग तुम्हाला?’

लाल झालेला चेहरा, कधीही वाहू लागतिल असे डोळे... कमरेवर हात घेऊन अर्धवट वयाचा बल्ल्या... त्याचा राग शरिरात मावत नव्हता... नुक्ती मिसरुड फुटू लागलेलं हे पोर आपल्या आई-वडिलांना जाब विचारीत होतं.

सोंड्याचा अवतार, बल्ल्याचा आवेश बघून बाबांना कापरं भरायची वेळ आली.

’अरे, अरे... असे हातघाईवर येऊ नका. डोक्यात राख घालून घेऊन काहीतरी वेडवाकडं कराल हं... सोंड्या, शांत हो, आधी.’, बाळ्दादा म्हणाला.

’अरे, पण... आपण काहीच नाही करायचं म्हंजे काय... असं कसं? मनूदिदी... आपली...’ वंदूला शब्दही सुचेनात आणि रडूही येऊ लागलं.

बाळदादाने तिला बाजूला बसवून घेतलं, ’वंदना, अगं काका, काकू... करतायत आवश्यक ते. असं त्रागा करून कसं चालेल? मोठ्या माणसांनी शांतपणानेच घेतलं पाहिजे सगळं... वकिलाकडे वगैरे गेले असणार...’

अजूनपर्यंत बावचळलेल्या नजरेने बघणाऱ्या बाबांच्या डोळ्यांत आता मात्रं पाणी आलं.
’होय, रे. बाळ, म्हणतोयस ते खरंय.... जसं जमेल तसं करायलाच हवं...’

’काका, तुम्ही काय लागेल ती मदत सांगा... पैशापासून काहीही... नुस्ती हाक मारा, आम्ही हजर आहोत’, बाळदादा अगदी मोठ्ठ्या वयस्करासारखा बाबांच्या खांद्यावर थोपटून गेला. सगळे गेले तसं घर परत शांत भकास झालं.

’पुढची पिढी शहाणी दिसतेय’, बाबा म्हणाले.

इतक्यात जयूआत्ये, वसंतकाका, सुलू असे घरात शिरले. सुलूच्या लग्नाचं आमंत्रण करायला आले होते.

इकडचं तिकडचं थातुरमातुर बोलणं झाल्यावर रीतसर अक्षत हातावर ठेवत जयूआत्येनं बाबांना आणि आईला नमस्कार केला. आमंत्रण हातावर ठेवलं. डोळ्यांमधलं पाणी लपवण्यासाठी वळणाऱ्या आईला तिने थांबवलं.

’वैनी, मन लहान नको करूस. मुद्दाम हेच सांगायला आलेय. मनूलाही घेऊन यायचयस, दोन दिवस आधीपासून. दादा, बोहल्यावर तूच न्यायचीस तिला. वैनी, तू मोठी मामी तिची. तुझ्या हाताने घरच्या केळवणाची पहिली ओटी भरायचीस. सुलूची मेंदी काढायला तिनच सांगितलय मनूला.... होय ना गं मने?’

मानसीने मान हलवली आणि बाजूलाच बसलेल्या सुलूनं तिला मिठी मारली.

’माझ्या सुलूच्या बाबतीत असलं काही घडलं असतं तर तू हेच केलं असतस. आपणच मान ताठ ठेवायला हवी. लोकांना बोलायला जागाच नाही मग. आपली काही चूक नाही, आपल्या बाळीत खोट नाही.... मग कशाला कुणाचं ऐकून घ्यायला हवं?
आणि तू रे दादा... तू उगीच लावून घेऊ नकोस काही. आपण व्यवस्थितच चौकशी केली होती स्थळाची. ह्या असल्या गोष्टी चौकशीत बाहेर निघत नाहीत. आपलं नशीब खोटय... काहीतरी विपरीत घडायच्या आधी आपली मुलगी हाती-पायी धड आपल्याला मिळाली.... देवाची कृपा... एव्हढच म्हणायचं....
मी लहान रे तुझ्यापेक्षा... पण तुला ओळखते ना... राहवलं नाही म्हणून म्हणते...
आणि सगळ्यात शाब्बास तुझ्या लेकीची. तिच्याकडे बसून धडे घ्यावेत मुलींनी... आमची सुलू तरी काय? मुळू मुळू आहे सगळं काम. म्हटलं, मानसीकडे बघ... हिम्मत हवी तर अशी. उग्गीच स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-मुक्ती म्हणणाऱ्यांनी येऊन बघा म्हणावं, ज्वाळा आहे इथे एक...’

जयूआत्या, काका, सुलू गेले आणि बाबा कपडे घालून बाहेर निघाले...

’अहो, हे काय? आत्ता उन्हाचे कुठे निघालात?’ आईने विचारलं.

’काहीतरी गोडाचं घेऊन येतो गं.... मने, गेरूचं सारवून घे... मला माहीत आहेत कोणते रंग तुला हवेत ते. बल्ल्या येतोस माझ्या बरोबर?... नाहीतर अस कर... मनूताईला मदत कर माळ्यावरच्या पणत्या-बिणत्या काढायला...
आणि... हो! आज सांजवायच्या आधी कंदिल लागायला हवा...’

समाप्त.

गुलमोहर: 

ह्या मूळ कथेत, जे घडलय ते घरातले ऍक्सेप्ट करतात... पण जेव्हा पुढली पीढी, शेजारचे, इतर नातेवाईक ऍक्सेप्ट करून आहेत हे कळल्यावर्(च)...
एका बाजूने मला हा त्या ठिणगीचा झालेला "काला" वाटला.
पण तरीही, नुस्तं नशीबात आहे म्हणून मान झुकवून भोगायला तयार नसलेली मुळातली ठिणगी मला जास्तं भावली.... म्हणून ही कथा तिथेच तोडून दिली होती.
असो... सांगितल्याप्र्माणे ही मूळ कथाही देतेय.

दाद, छानच लिहिली आहेस. माझ्या एका जीवलग मैत्रिणीत बघितली आहे मी ही ठिणगी. काही मोजके मित्र-मैत्रिणी आणि एक ओळखीतील कुटुंब सोडले तर तिला कुण्णी म्हणुन साथ दिली नाही. आई-वडिलांनी देखील नाही. ह्यातुन जात असताना तिला मानसोपचार देखील घ्यावे लागले. पण हिम्मत न हारता एकटी लढली, स्वत:साठी आणि लेकासाठी. सुदैवाने आता तिच्यावर खूप प्रेम करणारा जोडीदार मिळाला आहे. तिच्या पिल्लावर पण खूप माया करतो.

शलाका मला अस वाचूनच बेचैन व्हायला होत .तू हा विचार मनात कसा घोळवू शकलीस .ग्रेट .
कुणाच्याही मुलीवर असा प्रसंग न येवो .

शलाका मला अस वाचूनच बेचैन व्हायला होत .तू हा विचार मनात कसा घोळवू शकलीस .ग्रेट .
कुणाच्याही मुलीवर असा प्रसंग न येवो .

च्च! मला नाही आवडली. एखाद्या चित्रपट -सीरीयल सारखी वाटली. त्यापेक्षा आधीचीच जास्त आवडली.
फारच स्पष्ट बोलले का? Sad सॉरी.. पण जे वाटतं तेच लिहायची सवय आहे ना! Happy 'दाद' टच आला नाही एवढंच..
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

धन्यवाद.
आशू, स्पष्टच छान. ही मूळ कथा हेच वास्तव आहे, घडलेलं आहे. पहिल्या कथेत पुढे काय घडतं ते वाचकांनी ठरवावं. कुणी म्हणेल, कुणास ठाऊक काय झालं...
कुणी म्हणेल, ठिणगी आहे.. पेटवलच असणार तिने... कुणी म्हणेल, घरातल्यांशीच मुकाबला करता करताच विझली असणार.

ही कथा मात्रं सरळ साधी आहे... जराही नाट्य नाही ह्यात. घरातले तिला समजून घेतात.... पण लगेच नाही. जेव्हा शेजार्-पाजार, नातेवाईक ह्यांचा रोख लक्षात येतो तेव्हाच. आजच्या काळात हेच घडेल कदाचित.
किंवा तिला कुणीच समजून घेणार नाही आणि ती अगदी पेटून उठेल, एकटी लढेल.
मला वाटलं ती आधीची तुला जर सिरियलसारखी वाटली असती Happy

पण तुझं स्पष्टं मत? ते आवडलच!

Happy तेच ना! आधीची कथा वास्तव वाटते. आणि ही केवळ "कथा". निश्चित शेवट असलेली. चित्रपट / सीरीयल मधे कसं विषय कितीही ज्वलंत असला तरी त्यात हीरोच जिंकतो किंवा बलिदान देतो आणि गोष्ट संपते. तसं काहीसं वाटलं म्हणून "दाद टच आला नाही" म्हटलं. बाकी तुझ्या लेखनाबद्दल आम्ही काय बोलणार! Happy
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

डोळे कधी वहायला लागले ते समजलेच नाही.:(

मानसीची भावंड आणि शेजारी पाजारी आणि इतर नातेवाईक अश्या प्रसंगी तिच्या बाजूने उभे राहिले ते एका परीने चांगलं झालं म्हणायचं, द्विधा मनस्थितीतल्या तिच्या आई वडिलांना त्यामुळे थोडं का होईना मानसिक बळ मिळालं असेल....

दाद, नेहमीप्रमाणे छान कथा...

आशू, नव्हे गं Happy
ठिणगी ही कापलेली कथा... इथे द्यायची म्हणून.
ठिणगी २ - ही मूळ कथा आहे, वास्तव... घडलेली.

योगायोग असेल की, वास्तवातल्या कथेला एक निश्चित वळण मिळालय. मी त्याला सुखान्त तरी कसा म्हणू?

ह्म्म, मुलींनी आणि त्यांच्या घरच्यांनी तयारीत रहावं.

छान लिहिलं शलाकाताई. ही घडलेली गोष्ट आहे हे वाचून वाईट वाटले.

पहिली 'ठिणगी' जास्त भावली Happy

दाद, तुझ्या लिखाणाबद्दल तर सांगायलाच नको की तू किती मस्त लिहीतेस. खरंच जबरदस्त ठिणगी होती. माझ्याही एका ओळखीच्या मुलीत अशी ठिणगी अढळली होती मला. आणी त्याची धगच पुरेशी असते सगळ्या प्रसांगांना सामोरं जायला, हे मी पाहीलं आहे.

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

शलाका...काय लिहू? वाचतानाच खूप अस्वस्थ झाले होते. अस्वस्थतेचं आणखी एक कारण सांगू? अशाच खूप ठिणग्या आजकाल घरी दारी दिसताहेत ग. काही धुमसतात नि काही विझून जातात (विझवल्या जातात म्हणणं जास्त सयुक्तिक )... पण निदान उरात आग सोसायची शक्ती येतेय हेही नसे थोडके...

दाद,

तुझी कथा सुंदर आहे. विचार करायला भाग पाडते. या विषयावर मला बरेच काही लिहायचे / सांगायचे आहे. खूप पैलू आहेत. कधीतरी मीसुद्धा लिहीन म्हणतो.

शरददा.