वारस.

Submitted by भैरव on 24 February, 2011 - 08:34

पं. भास्करबुवा बखले सभागृह. पं. केदारनाथांची संगीत रजनी. कार्यक्रमाचा शेवट करताना पंडितजींनी ‘नैहर छूट जात’ची अशी काही काळीज चिरीत जाणारी भैरवीची ताण सभागृहावर बेदरकारपणे भिरकावली की श्रोते आपले भान विसरले. संपूर्ण सभागृहात क्षणभर अतीव जीवघेणी शांतता पसली आणि दुसऱ्याच क्षणी ‘न भूतो न भविष्यती’ अशी टाळी पडली. पंडित केदारनाथांनी तंबोरा शेजारील शिष्याकडे हळूवारपणे सोपवला आणि मांडीवरची शाल डाव्या खांद्यावर टाकीत समोर बसलेल्या, अजूनही भानावर न आलेल्या श्रोतुवृंन्दाला अतिशय विनयाने अभिवादन केले.

गाडी पोर्चमधे येईपर्यंत मग पंडितजी चाहत्यांच्या गराड्यात अडकले. शाल, श्रीफळ आणि हारतुरे सांभाळत संयोजक गर्दीतून त्यांना वाट करुन देत होते. गाडीची चाहूल लागताच पंडितजींनी संयोजकाच्या हातातील दोन हार चाहत्यांच्या गर्दीवर फेकले आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनम्र अभिवादन करून ते गाडीत बसले. कादरणे तत्परतेने दार लावले. तो स्टेअरिंग व्हीलवर बसत असतानाच पंडितजींचे हळूवार शब्द त्याच्या कानावर पडले,
“बेटा कादर, गाडी सरळ ‘तपस्यावर’ घे, आज जरा थकल्यासारखं वाटतय.”
कादरने गाडी पोर्चसमोर उभी केली आणि खाली उतरून त्याने दार उघडलं गाडीचा हॉर्न ऐकून महेश कधीच बाहेर येवून उभा राहिला होता. त्याने पुढे होऊन पंडितजींना हात दिला व त्यांना सावरत मंद पावले टाकत तो दिवाणखान्यात प्रवेशला.

“बाबा, थोडी विश्रांती घ्या” असं म्हणत त्याने पंडितजींना त्यांच्या बेडरूमकडे वळवले. पण मध्येच थांबत पंडितजी म्हणाले,
“महेश, अरे मला जरा अप्पांच्या फोटोसमोर घेऊन चलतोस कारे?”
महेशने त्यांना अप्पांच्या तैलचीत्रासमोर आणले. सकाळी फोटोला घातलेला शेवंतीचा हार आता थोडा कोमेजला होता. शेजारील निरांजनाची सोनेरी आभा फोटोवर पसरली होती. पंडितजी फोटोसमोर बराचवेळ नि:शब्द उभे राहिले. त्यांना त्या अवस्थेत बघून क्षणभर महेश गोंधळला, थोडासा घाबरलाही, त्याने पंडितजींच्या खांद्याला हलकासा स्पर्श करीत हक मारली,

“बाबा...!”

तपोभंग झालेल्या ऋषीप्रमाणे पंडितजींनी डोळे उघडले. आपण कुठे आहोत हे निमिषमात्र ते विसरले होते. मग भानावर येते त्यांनी हातातील महावस्त्र, श्रीफळ आणि ‘संगीत विश्वात’ अतिशय मानाचा समजला जाणारा ‘स्वरमणी’ पुरस्काराचं मानपत्र अप्पांच्या फोटोपुढे ठेवलं. पंडितजी भावनाविवश झाले होते. त्यांना बरच काही बोलायचं होतं पण ‘अप्पा’ एवढाच शब्द ओठांतून बाहेर पडला. त्यांचा कंठ दाटून आला होता. सप्तसुरांना आपल्या दासिसारखा लीलया नाचवणारा तो ‘स्वरभास्कर’ आज आपल्या गुरूंच्या फोटोसमोर मात्र निसुर, नि:शब्द झाला होता. जे काही सांगायचं होतं ते डोळ्यातून ओघळणारा प्रत्येक अश्रू सांगत होता. त्या अश्रुंबरोबर एक एक आठवण देखील डोळ्यातून झरत होती.

पुरते उजाडलं देखील नव्हतं तोच यमुताई कवठेकरांच्या वाड्यात शिरल्या आणि पाठोपाठ त्यांचा चार वर्षांचा केदार देखील. एक हलकीशी आषाढसर नुकतीच रुणझुण पाउल वाजवून गेली होती. अंगण ओलं होतं. मधूनच डोकं हलवून अंगणाच्या कडेचं प्राजक्ताचं झाड अंगावरचं पाणी झटकीत होतं. बटमोगरीच्या वेलाचाही बहर ओसरला होता, तरीही झुडपात एखाद दुसरं चुकार फुल सापडायचं. बटूआत्याची शोधक नजर असचं एखादं चुकलं माकलं फुल शोधत होती. तेवढ्यात फाटकाचा आवाज झाला म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं. यमुताईंना पाहून त्या म्हणाल्या,
“य्म्ने, आलीस बायो? बरं झालं हो, माझ्या उरावर जसा रात्रभर धोंडा ठेवला होता. एवढं १२-१५ शेरांच दुध आटवायचं, सोवळ्यातला स्वयंपाक...कसं होईल कोण जाणे? पण आलीस बयो वेळेवर तू. जीवात जीव आला” असं म्हणून बटूआत्या जास्वंदीकडे वळणार तोच त्याचं लक्ष यमुताईंच्या मागून येणाऱ्या केदारकडे गेले.
“अगोबाई, लेकालाही आणलय वाटतं आज बरोबर?”
“हो” यमुताईंचा आवाज थोडा वरमला. तिला आपल्या पोराचे गुण माहित होते. एवढ सोन्यासारखं पोरगं पण एक वाईट खोड, सारखी खा-खा सुटलेली. यात त्या बिचाऱ्याचा तरी काय दोष म्हणा. वाढतं वय आणि यमुताईंचि ओढगस्तीची परिस्थिती, यामुळे दोनवेळचं पोटभर जेऊ घालायलाही त्या असमर्थ होत्या.

यमुताई गरीब जरूर होत्या, पण गरिबीमुळे येणारी लाचारी मात्र कणभर देखील नव्हती त्यांच्याकडे. त्यांचा स्वभाव मानी होता. कवठेकरांच्या वाड्याने त्यांना स्वयंपाकाचे काम देऊन मोठा आधार दिला होता. वाडा बांधताना विटा सांधायला चुना भरावा तसा कवठेकरांच्या वाड्यात चांगुलपणा भरला होता. नारायणबुवांच्या प्रेमळ धाकाखाली वाड्याचा सर्व कारभार चालायचा. जुन्या घोंगडीला असावी तशी मायाळू उब वाड्याच्या भिंतींना होती. काळ्या फरशीत आपलेपणाचा गारवा पदोपदी जाणवायचा. यमुताई गरीब विधवा असली तरी स्वाभिमानी होती. स्वयंपाकाला जाताना त्या शक्यतो केदारला बरोबर नेत नसत. कारण केदारचं वय लहान, जान कमी, भुकेला बंधन नाही. या भरल्या उपकार कर्त्या घरात न जाणो त्याच्या हातावर गुळ-खोबरं, दाणे असलं काही ठेवायचा आपल्यालाच मोह झाला तर? त्यापेक्षा त्याला सोबत नेणच नको, असा यमुताईंविचार असायचा. पण आज अगदी नाईलाज झाल्याने त्याला आणणे भाग पडले.

आज वाड्यावर महत्वाचा दिवस होता. दिगुचा ‘गंडाबंधन’चा विधी. दिगू आणि केदार बरोबरीचेच. आज स्वतः नारायणबुवा आपल्या मुलाला गंडा बांधून सुरांची दीक्षा देणार होते. नारायणबुवा म्हणजे संगीत क्षेत्राचे अध्वर्यू, अधिकारी व्यक्ती. त्याचं नाव ऐकून भल्या भल्या पंडित आणि उस्तादांचे कान बोटांच्या चिमटीत जायचे. 'राग' त्यांच्या घरात पाणी भरतात असा त्यांचा लौकिक. असे नारायणबुवा आज स्वता:च्या मुलाच्या हातात गंडा बांधणार होते. एका अर्थाने आपल्या वारसाची घोषणाच करणार होते.

आयुष्यभर कुठे कुठे भटकून मिळविलेले ज्ञान त्यांनी आपल्या दीर्घ संगीत साधनेतून समृद्ध करीत नेलं होतं. कल्पकता, प्रतिभा आणि संगीतविषयक मनन चिंतनातून त्यांनी आपली अशी खास शैली विकसित केली होती. गायकीचा वैविध्यपूर्ण अविष्कार करणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक म्हणून ते संगीत विश्वात सुपरिचित होते. नाविन्य आणि चमत्कृती ही त्यांच्या गायकीची बलस्थाने होती. लहानपणापसुन त्यांनी उत्तमोत्तम गायक-उस्ताद मंडळींना ऐकले होते. त्यांची ग्रहणशक्ती प्रचंड होती. रागविस्तार करण्याची त्यांची हातोटी अप्रतिम होती. गायनातून तालातील स्पष्टता, नाविन्यपूर्ण सरगम आणि रंगतदार सादरीकरणाबरोबरच अभिजात रागसंगीताप्रमाणेच नजाकतदार ठुमरी गायनासाठीही नारायणबुवा प्रसिद्ध होते. हे सर्व काही क्रमाक्रमाने ते दिगुला सोपवणार होते. कारण दिगुच हे सारं समर्थपणे पेलू शकेल याचा त्यांना विश्वास होता. याच कार्यक्रमाचा स्वयंपाक यमुताईंना सोवळ्यात करायचा होता. “आजचा दिवसतरी केदारला नीट वागू देरे देवा!” अशी परमेश्वराला मनोमन विनवणी करून त्या स्वयंपाकाला लागल्या.

नारायणबुवा आज खुप प्रसन्न होते. त्यांच्या उघड्या अंगावर जानवे रुळत होते. कानातल्या भिकबाळीच्या मोत्याला आज विशेष पाणी चढल्याचा भास होत होता. त्यांनी आज पिवळा कद नेसला होता, त्यामुळे त्यांची कांती आज थोडी उजळल्यासारखी दिसत होती. ते आपल्या गुरूंच्या तसबिरीसमोर अर्धपद्मासनात बसले. शेजारीच चांदीच्या समईतील पाचही ज्योती तेजाने तळपत होत्या. त्यांनी मंद स्मित करत श्रीगुरूंना वंदन केले व समोरच्या ताम्हणातील हळदी-कुंकवाने माखलेला ‘गंडा’ आपल्या भव्य भालप्रदेशावर हलकेच टेकवला आणि दिगुकडे सूचक नजरेने पाहिलं.

दिवाणखान्यात बटूआत्यापासून ते यमुताईंपर्यंत सर्वजण कौतुकाने हा सोहळा पाहत होते. चार वर्षांचा दिगंबर चेहऱ्यावर पोक्त भाव आणून बुवांसमोर बसला होता. बराच वेळ अर्धपद्मासनात बसावं लागल्याने आलेला अवघडले पणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नारायणबुवांनी त्याला नजरेने खुनावताच तो थोडा पुढे झुकला व आपला उजवा हात पुढे केला. बुवांनी क्षणभर डोळे मिटले. त्यांचे ओठ अस्पष्टपणे काही मंत्र पुटपुटले आणि त्यांनी दिगंबरने पुढे केलेल्या कोवळ्या मनगटावर ‘गंडा बांधला’ क्षणभर दिगू भांबावला पण दुसऱ्याच क्षणी वयाला न शोभणाऱ्या गंभीरपणे उठून प्रथम श्रीगुरूंच्या तसबिरीपुढे दंडवत घातला. नंतर त्याने नारायणबुवांच्या पायावर मस्तक टेकवल. त्याच्या डोक्यावर आपले दोन्ही हात ठेवताना बुवांचेही डोळे भरून आले. भारावलेल्या या प्रसंगाने पाहणार्यांचेही डोळे पाणावले. सर्व विधी उरकल्यातच जमा होता. आता शेवटचा आणि महत्वाचा विधी शिल्लक राहिला होता. तेवढा उरकला की पहिली पंगत बसणार होती. बुवांनी दिगुला अतीव प्रेमाने आपल्या मांडीवर बसवून घेतलं आणि आणि ते बटूआत्याकडे पाहून म्हणाले,
“अक्का, सकाळच्या नैवेद्याच्या खिरीची वाटी घेऊन ये आणि सर्वांची पाने वाढायला घ्या”

बटूआत्या स्वयंपाकघरात गेल्या आणि थोड्याच वेळात त्या कावर्या-बावऱ्या होत बाहेर आल्या. बुवांसहीत सर्वांचं लक्ष त्यांच्या हातातील रिकाम्या वाटिकडे गेलं. यमुताईंच्या लक्षात क्षणात सर्व प्रकार आला. त्यांनी अत्यंत केविलवाण्या नजरेने बुवांकडे पाहिलं. बुवाही जे समजायचं ते समजून गेले. यमुताईंच्या नजरेत प्रचंड लाज, शरम कारुण्याच्या छटा एकामागोमाग उमटून गेल्या. खाली मान घालून त्या अगतिकतेने बुवांच्या समोर उभ्या होत्या. बुवा काही क्षण गंभीर झाले. मग भानावर येतांच ते मंद हसले. समोरच्या ताम्हणातील थोडी खडीसाखर त्यांनी मांडीवर बसलेल्या दिगुच्या तोंडात घातली आणि स्वता:शीच पुटपुटले,

“बाळ दिगू, गंडा तर तुला बांधला मी पण गुरुप्रसाद दुसऱ्याच कुणाच्या मुखात पडला. असो, जो तो येताना आपल्या भाळी भाग्याचं विधान घेऊन येतो, त्याला काय करणार? ईश्वरेच्छा बलीयेसी!”
वाड्यात पहिल्या पंगतीचा श्लोक चालू होता आणि आणि त्याच वेळी नदीकाठच्या शंकराच्या मंदिरात छोटा केदार, ‘घंटेचा आवाज इतका घुमावदार का येतो?’ हे वारंवार घंटा वाजवून पाहण्यात तल्लीन झाला होता.

शिशिर ऋतूतील पानगळी मुळे काहीशी उदास, विरक्त दिसणारी झाडं नुकतीच चैत्रचाहूल लागल्यामुळे आपली मरगळ झटकत होती. शाळा लवकर सुटली म्हणून केदार रमत-गमत घराकडे निघाला होता. गावाबाहेरील महेश्वराचं दर्शन घेऊन नारायणबुवाही वाड्याकडे निघाले होते. वळणावर त्यांना केदारचं ध्यान दिसलं. पोटावरून घसरणारी चड्डी, ढगळ सदरा. हातातलं दप्तर आणि घसरणारी चड्डी सांभाळताना केदारची तारांबळ उडत होती. ते पाहून बुवांना हसू आलं. खिरीच्या प्रसंगानंतर यमुताईंच्या धाकामुळे तो महिनाभर केदार वाड्याकडे फिरकला नव्हता. बुवांनी त्याला हाक मारून थांबवलं आणि विचारलं

“काय रे, आज शाळा लवकर सुटली वाटतं? मला दुर्वा निवडायला थोडी मदत हवीये जरा, वाड्यावर येतोस?” “होss” केदारने आनंदाने मोठा होकार भरला. त्याला वाड्यातल्या स्वयंपाकघरातील वास यायला लागला. त्या आनंदातच तो उड्या मारत घराकडे निघाला. घरासमोर येताच मात्र त्याची पावलं थबकली. घरासमोरची गर्दी पाहून तो भांबावला व दप्तर तेथेच टाकून घराकडे सुसाट पळत सुटला.

नारायणबवूवांनीच यमुताईंचं सर्व केलं. तेराव्या दिवशी डोकं भादरलेल्या केदारला घेऊन त्यांनी वाड्यात प्रवेश केला. त्या दिवसापासून वाडा केदारचा आणि केदार वाड्याचा झाला. सकाळी उठून बुवांच्या पूजेची तयारी करायची, दुपारच्या वेळी तम्बोर्याची सफाई करून त्यांना गवसणी चढवणे आणि उरलेल्या वेळेत बुवांचा रियाज ऐकणे. जमलं तर दिगुची शिकवणी ऐकणे. बुवा हळू हळू दिगुला एक एक गोष्ट सोपवीत होते.अनवट राग, दुर्मिळ बंदिशी, आणि बरच काय काय. बुवांच्या घराण्याची खासियत असलेल्या ठुमऱ्या दिगुच्या ओंजळीत टाकताना तर त्यांचा मुलायम आवाज आणखीच मुलायम होई. नकळत केदारच्या मेंदूत हे सर्व साठत होतं. त्यातील हरकती, मुरके विजेसारख्या ताना सर्व काही केदारला भारावून टाकत होतं. एक नवीनच विश्व त्याच्या समोर उभं राहील होतं. अलीबाबाची गुहा सापडल्या सारखा केदार गोंधळला होता. संध्याकाळी महेश्व्रच्या मंदिरात केदार दिवसभर ऐकलेल गळ्यातून काढायचा प्रयत्न करत होता. न समजलेलं दुसऱ्यादिवशी पुन्हा कान देवून ऐकत होता.

कामाच्या गडबडीत जर वाड्याबाहेर पडता नाहीच आलं तर रात्री सर्व निजानीज झाल्यावर परसदारी असलेल्या विहिरीवरच्या द्रोनावर बसून त्याचा रियाज चाले. आजकाल त्याच्या हेही लक्षात आलं होतं की दुपारच्या वेळी माडीवर कुणी नसतं. त्यामुळे तो आजकाल दुपारीही माडीवरच्या तम्बोर्याची जवारी जुळवून तासतासभर एकच सूर आळवीत बसे. जस जस केदारच वय वाढत होतं तसतशी त्याची सुरांची जानही वाढत होती.
दिवसेंदिवस त्याच्या कामाचा बोजाही वाढत होता. सर्व वाड्याचा तो हक्काचा आणि बिनपगारी नोकरच होता.
बुवा कधी-मधी त्याची आपुलकीने चौकशी करीत. त्यामुळे केदारला हतीच बळ येई. मग वाड्यावर त्याची कितीही परवड झाली तरी मग त्याला त्याचं काही वाटत नसे. बटूआत्या होत्या तोवर त्यांनी त्याला दिगुईतकाच जीव लावला. पण त्याही क्षुल्लक आजाराचं निमित्त होऊन गेल्या.

राहता राहिले नारायणबुवा. पण त्यांना त्यांच्या बैठका, मैफिली, कार्यक्रम यातूनच वेळ मिळत नसे. सुरवातीला दिगुने त्याला बरोबरीने वागवले, पण जस वय वाढलं तसा त्याचा तुसडेपणाही वयाबरोबर वाढतच गेला. आजकाल दिगुच रीयाजातही म्हणावं असं लक्ष नसे. केदारला हे जानवे पण तो वाड्यातली आपली पायरी ओळखून वागत होता. दिवसभर वाड्यातल्या कामाची गडबड , परसदारातला मोठा हौद भरणे, इतर कामे यात केदारचा दिवस कसा जात होता हे त्याचं त्यालाही समजत नसे.पण या व्यापातही त्याने आपल्या रियाजात खंड पडू दिला नाही.
वाड्याबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभं राहण्याइतकं त्याचं वय होतं. पण त्याचे दैवत असलेले ‘बुवा’ जोपर्यंत वाड्यावर आहेत तोपर्यंत वाडा सोडण्याचा विचारही केदारला ‘ब्रम्हहत्येच्या पताका’ सारखा होता.
नेहमी प्रमाणे आजही केदारची कामे चालू होती. दिवाणखान्यातील फरशी पुसत असताना जिन्यावर पावले वाजली. केदारने वळून पहिले आणि इंगळी डसल्या सारखा त्याचा चेहरा वेदनेने पिळवटून गेला. आयुष्यभराची कमाई गमावलेल्या माणसासारखे बुवा एक एक पायरी हताशपणे उतरत होते. कोणत्याही क्षणी त्यांचा तोल जाईल असं वाटत होतं. हातातलं काम तेथेच टाकून केदार,

“अप्पा” अस मोठ्याने ओरडत जिन्याकडे धावला. तोपर्यंत बुवा जीना उतरले होते. केदारला त्यांना स्पर्श करण्याचं धाडस झालं नाही. ते त्याची दखल ही न घेता आपल्या दालनाकडे वळले. जणू त्यांना केदार दिसलाच नव्हता.
केदार आतल्या दालनाकडे धावला. बुवा त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत विमनस्क पणे बसले होते. एवढा मोठा स्वरराज पण आज त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजाची जागा दैन्याने घेतली होती. जुगारात सरस्व हरवलेल्या माणसासारखी त्यांची अवस्था झाली होती. त्या पहाडासारख्या खंबीर माणसाला इतक केवीलवाणा झालेलं पाहून केदारच्या काळजात चर्र... झालं. तो मनाच्या तळापासून हेलावला. पुढे होऊन त्याने बुवांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून तितक्याच हळूवारपणे म्हणाला,
“अप्पा...बरं वाटत नाहीये का?”

त्याच्या आवाजातल्या मार्दवाने बुवांना जास्तच भरून आलं. भावनावेग आवरण्याच्या प्रयत्नात काही क्षण त्यांचं शरीर गदगदून हलत राहील आणि मग एखादा प्रपात कोसळावा तसे बुवा केदारच्या खांद्यावर कोसळले. वाहत्या पाण्याला बांध घातला की ते साठत जातं आणि शेवटी सारा बांध तोडून चौफेर उसळतं तसं बुवांचं झालं. केदारचे दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन ते लहान मुलासारखे हमसून हमसून रडायला लागले.
“अरे बाळ, मधमाशीसारखं कुठून कुठून महत्प्रयासाने मिळवलेलं ज्ञान मी दिगुसारख्या पालथ्या घड्यावर ओतले रे... सारं सारं वाहून गेलं, व्यर्थ गेलं. फळांच्या आशेने आयुष्यभर ज्या झाडाला पाणी घातलं, फळं खायची वेळ आली तेंव्हा कळालं मी कपाशीला पोसलं. हाती गोड गर यायचा तर कापूस आला रे केदार.”
दिगुचं आजकाल रीयाजाकडे लक्ष नव्हतं हे केदारलाही जाणवत होतं. पण गोष्टी या थराला गेल्या असतील याची त्याला कल्पना नव्हती. त्याने बुवांना मनासारखे रडू दिलं. पंधरा मिनिटाने बुवा शांत झाल्यावर केदारने प्रेमळपणे विचारलं,

“आप्पा...तुम्ही पडता का जरा? मी थोडं सुंठ वाटून कपाळाला लावतो. बरं वाटेल.”
बुवांनी असहाय्यपणे केदारकडे पाहिलं आणि आधार घेण्यासाठी हात पुढे केला. केदारने हळूच आपला खांदा बुवांच्या बगलेला दिला आणि त्यांना उभं केलं. दिवाणखाना ओलांडला की समोरच बुवांचि खोली होती. ते केदारच्या आधाराने चार पावलं चालले आणि तेथेच शक्तिपात झाल्यासारखे कोसळले.
त्या दिवसानंतर नारायणबुवांची जगण्याची आसच संपली जणू. जीवनरस आटून गेल्यासारखे त्यांचे डोळे शुष्क झाले. चार चार महिने तंबोऱ्याच्या गवसण्या निघेनाश्या झाल्या. वाड्याला एक अवकळा आल्या सारखं झालं. दिगुने अगोदरच गाण्यातून अंग काढून घेतलं होतं. आतातर बुवांनीही गानं बंद केलं.
ज्या वाड्यातून कधीकाळी निळ्या धुपाबरोबर भूपाळीचे सूर ऐकू येत त्याच वाड्याच्या छतावर बसून कावळ्यांची कर्कश्श भांडणे ऐकू येवू लागली. केदारला हे सर्व असह्य होई. तो खुपदा बुवांना सावरायचा प्रयत्न करे. आणि नाही म्हटलं तरी आजकाल बुवा त्याला प्रतिसाद देवू लागले होते.

इतके दिवस त्यांनी जो कोश आपल्या भोवती विणला होता त्यातून ते थोडे थोडे बाहेर येत होते. अधीमधी निराश होत, नाही अस नाही. दिगुची आठवण आली की,
“सूर्याच्या पोटी शनिच आला पाहिजे कारे केदार?”
असं केदारला असहाय होवून विचारीत. माझ्या हातून माझ्या गुरूंची नीट सेवा झाली नसावी म्हणून हे दिवस पहावे लागतायत अशीही समजूत त्यांनी करून घेतली होती. आणि सगळ्यात मोठी खंत त्यांच्या बोलण्यात सदैव जानवे,

‘इतका अमुल्य ठेवा जमवला पण त्याला वारस मात्र योग्य मिळाला नाही. माझ्या मागे माझे सूर ‘बेवारस’ होणार.’तरीही आजकाल अधूनमधून बुवा तंबोरा छेडत बसत. मनस्थिती छान असेल तर एखाद्या रागाचा विस्तार कसा करायचा हे केदारला सांगत.
त्यातल्या त्यात केदारला आजकाल एक आशेचा किरण दिसू लागला होता. आठ दिवसांपूर्वी देशमुखांचा फोन येऊन गेला होता. देशमुख म्हणजे शहरातलं बडं प्रस्थ. त्याचबरोबर रसिकही तेवढेच होते. नारायणबुवांचे तर ते पहिल्यापासून नि:स्सीम चाहते. त्यांच्या मातोश्रींचा तिसरा स्मृतीदिना निमित्त बुवांनी गावं हा त्यांचा हट्ट होता. आणि गेल्या दोन वर्षात पंडितजी नारायणबुवा कवठेकर गायला तयार झाले होते.
श्रोत्यांनाही ही दोन वर्षानंतर पर्वणीच होती. केदारसह सारेजण त्या दिवसाची वात पाहत होते. केदारची आज सकाळपासूनच धावपळ चालू होती. आज दोन वर्षानंतर त्याचे ‘अप्पा’ प्रथमच जाहीर गाणार होते. त्यांची शाल, लवंग, जेष्ठ्मधाची चांदीची डबी, कुर्त्याची बटणे हे आणि ते.
संध्याकाळी बरोबर सात वाजता तो नारायणबुवांना घेऊन स्टेजवर आला. त्यांना व्यवस्थित बसवून त्याने एक छोटासा लोड त्यांच्या मागे आधारासाठी ठेवला. लवंगांची डबी त्यांच्या उजव्या हाताला ठेवली. शेजारीच पाण्याचं भांड ठेवायला तो विसरला नाही. सगळं व्यवस्थित असल्याचं पाहून तो बुवांच्या शेजारीच पण थोडा मागे सरकून बसला.

आज बुवांच्या आवाजाचा अंदाज घेवूनच त्याने सकाळी तंबोरा जुळवला होता. तरीही त्याने एकदा तारांवरून बोटे फिरवून अंदाज घ्यायला बुवांकडे पाहिलं. बुवाही त्याच्याकडेच पहात होते. पण आज पंडितजींच्या मनात वेगळेच विचार चालले होते. केदारने त्यांची मुलासारखी सेवा केली होती. पण होता तर पाणक्या? आणि आजची मैफल खुप महत्वाची. आणि हा ताम्बोर्यावर बसणार. या दोन वर्षांच्या विश्रांतीमुळे ‘दमसाज’ चा अंदाज नाही. त्यांनी काळजीने विचारलं’
“केदार, बेटा जमेल ना?”

केदार फक्त मंद हसला. बुवांनी मांडीवरचि शाल नीट करत थोड्या चिंतेतच आकार लावला आणि कलेकलेने रंगणाऱ्या मैफिलीत ते केदारला विसरून गेले. आज न्यांनी नेहीमेचे राग टाळून ‘मारव्या’तली चीज काढली. कधी रंगली नव्हती अशी बैठक बुवांनी आज रंगवली. आज ते श्रोत्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवूनच गात होते.
मध्यरात्र कधी उलटून गेली हे समजलच नाही. आज त्यांनी गाण्याचे सर्व नियम मोडून आवडलेले राग घेतले.
पहाटवारा सुरु झाला आणि बुवांनी ‘तोडी’ची पेशकस सुरु केली.

रात्रभर चाललेल्या मैफिलीचा ताण असेल कदाचित, पण पहिल्याच आलापित त्यांचा आवाज भरून आला. सूर गळ्यात अडकल्यासारखे झाले. बुवा गोंधळले, घाबरे झाले. ज्या गोष्टीची भीती त्यांना वाटत होती तेच होऊ घातलं होतं. त्यांच्यासाठी ही शेवटची मैफिल होती. आणि ज्या स्वरांना त्यांनी आजपर्यंत लीलया खेळवलं त्यांचीच ऐनवेळी साथ सुटते की काय याची त्यांना भीती वाटली.
हताश होऊन त्यांनी साथ करणाऱ्यांना थांबण्यासाठी हात वर केला---

मात्र पाठीमागून अतिशय जबरदस्त फिरत असलेली, कसलेली कणीदार अशी तोडीची आलापी मृदुंगाच्या बोलांना मागे सारत रसिकांचं काळीज चिरीत गेली.

पंडितजींनी डोळे विस्फारून मागे पाहिलं. आयुष्यभर तोडीची आळवणी करूनही जी ‘सुरावट’ त्यांच्या हाताशी येता येता हुलकावणी देवून जात होती, तीच सुरावट त्यांचा केदार अतिशय आत्मविश्वासाने छेडीत होता. तम्बोर्याला कान लावून, अर्धोन्मिलीत नेत्राने त्यांचा केदारच गात होता. त्यांचा ‘वारस’

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मला कथा दिसत नाही आहे. माझ्याकडे प्रॉब्लेम आहे की अपलोड करताना काही प्रॉब्लेम झाला असावा?

भैरव - मदतपुस्तिकेतल्या 'लेखनासंबंधी प्रश्नोत्तरे' विभागातील "कथा/लेखन दिसत नाही" हा दुवा बघून त्याप्रमाणे उपाययोजना केल्यास लेखन दिसू लागेल. प्रत्येक परिच्छेदांमध्ये दोन रिकाम्या ओळी सोडून बघा.

अमितची प्रतिक्रिया पहिली आणि नंद्या ने सुचवल्या प्रमाणे दोन रिकाम्या ओळी सोडल्या. पण खुप वेळा प्रयत्न करूनही कथा दिसत नव्हती. परिच्छेद छोटेही करून पहिले होते. संयम संपला होता कथा 'संपादित' करून,(असाध्य रोग झालेला माणूस कसा कोनीही सुचवलेले उपचार वैतागून करतो शेवटी, तसं) आधीच टायपताना कंटाळलो होतो. त्यामुळे. आता शेवटचा प्रयत्न म्हणून वाटेल तिथे ओळी सोडल्यात. वाचताना अडचण आली तर माफ करालच सार्वजन.
धन्यवाद नंद्या!!!

सु रे ख! Happy

शाळेत असताना "लिहिशील का असा निबंध परत" असं म्हणत गुरुजींनी गाल रंगवला होता. त्यानंतर अवांतर लिहिण्याचं धाडसच होत नव्हत. तुमच्या सर्वांमुळे खुप उत्साह आला.
सगळ्यांचेच धन्यवाद!

रुनी, ते शक्य नाही आता.
आता चित्रगुप्त गुरुजींचे गाल रंगवीत असेल.
(किंवा गुरुजीच त्याचे गाल रंगवीत असतील,
"तुमच्या पिताश्रींनी लिहिले होते का असे हिशोब? साधं गणित मांडता येत नाही आणि चालले पाप-पुण्याचा हिशोब मांडायला." असं काहीतरी म्हणून.)
थँक्स.

Pages