दोन मिनिटात ................. (शेवटचा भाग)

Submitted by कौतुक शिरोडकर on 10 January, 2009 - 03:40

(रिकॆप - निलमला बसमध्ये बसवून राजेश पेपर आणण्यासाठी बसमधून उतरतो. पण परत येत नाही. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचते. पण तपास फ़क्त शुन्यावर येऊन थांबतो. एक दिवस रावराणेंनी पाठवलेल्या चिठ्ठीमुळे जमदाडेंना शशांक या निलमच्या प्रियकराबद्दल माहीती मिळते. ते सरळ त्याबद्दल निलमकडे शहानिशा करतात. निलम आपले प्रेमप्रकरण कबूल करते. पण तरीही राजेशच्या नाहीश्या होण्यात त्यांना, घाटपांडेना व बाणेंना अचूक असा एकही पुरावा सापडत नाही. त्याचवेळेस घाटपांडेंचा मोबाईल वाजतो आणि मग....)

आणि त्यांचा मोबाईल वाजला. त्यांनी मोबाईल खिशातून काढून पाहीला.
"पोलिस स्टेशनवरून आहे." ते जमदाडेंना म्हणाले,"हॅलो. इन्स्पे. घाटपांडे बोलतोय."
"बोला जाधव."
"हं... ठिक आहे. कनेक्ट करा. हॅलो..... हॅलो...हां.. एक मिनिट." त्यांनी फ़ोन जमदाडेंना दिला. "जांभुळवाडीवरून फ़ोन आहे तुमच्यासाठी. भिवरे आहेत फ़ोनवर." जमदाडेंनी फ़ोन घेतला.
"हॅलो भिवरे, बोला."
"हं.....हं... कोण म्हणालात?................कधी.......मग............ काय सांगताय काय ? खात्री आहे का त्यांना? शंभर टक्के..........यस." मोबाईल कट करून जमदाडे दोघांकडे वळले. त्यांच्या चे‍हर्‍यावरून आनंद ओसंडत होता.
"काय झाल ? " दोघांनी एकच प्रश्न केला.
"चला लवकर." एवढ बोलून जमदाडे वळले आणि धावत सुटले.
"काय झाल ? " बाणेंनी घाटपांडेंना विचारलं.
"त्यांच्यामागे धावा म्हणजे कळेल ? " घाटपांडे जामदाडेंच्या मागे धावता धावता वळून म्हणाले.जमदाडे जिन्याच्या दिशेने धावले आणि मागोमाग घाटपांडे व बाणेदेखील.
एखाद्या तरूण लाजेल अशा आवेशात ते दोन माळे चढून वर पोहोचले. त्यांच्या मागोमाग ते दोघे पोहोचण्याच्या आत त्यांनी बेल वाजवली देखील. पुढच्या दोन मिनिटात ते पुन्हा निलम व तिच्या आईच्या समोर होते.
"एक प्रश्न विचारायचा राहीला?" जमदाडेनी सुरूवात केली.
"बोला." निलम तयारीत असल्यासारखी बोलली. दिड महिन्यापुर्वीची ती हिच का असा संशय येण्याइतपत तिच्यात झालेला बदल आता जाणवला जमदाडेंना.
"राजेश कायम कॅप घालून का असायचा ?" जमदाडेंच्या या प्रश्नावर निलमचं काय तिची आई, घाटपांडे व बाणेही उडाले.
"काय ?" निलमचा गोंधळून प्रतिप्रश्न.
"राजेश कायम कॅप घालून का असायचा ?" जमदाडेंनी एकही शब्द न बदलता पुन्हा प्रश्न केला.
"त्याला आवडायचं तसचं. ते हिमेश रेशमियासारखं कॅप घालून राहणं, वावरणं." निलमने स्वत:ला सावरत उत्तर दिलं.
"शक्यतो जास्तीत जास्त चेहरा झाकून. बरोबर...?" जमदाडेंची गुगली.
"तसं नाही काही, पण कॅप घालायचा. हे मी आधीही सांगितलय." निलम किंचीत चिडली.
"ते खरयं. आम्हाला माहीत नसलेली दुसरी गोष्ट तुम्ही आजच मघाशी सांगितलीत. आता मला हे सांगा, अमरावती ते जांभुळवाडीच्या दरम्यान काय झालं ? " जमदाडेंनी गाडी आता वेगळ्याच ट्रॅकवर होती.
"मला वाटतं ते मी आधीच सांगितलय." निलमचा स्वर दृढ होता.
"मलाही तसचं वाटलं होतं. पण तुम्ही सगळं नाही सांगितलत. " जमदाडेनी आपली पोलिसी नजर तिच्यावर रोखली. तिनेही निर्विकारपणे त्यांच्या नजरेला आपली नजर भिडवली. पण ते क्षण दोन क्षण. कोणत्याही क्षणी ते आपल्या मनाचं पुस्तक वाचायला सुरूवात करतील याची जाणिव होताच तिची नजर खाली झुकली.
"काय चाललय तरी काय तुमचं ?" निलमच्या आईला आता राहावलं नाही. निलमने आपली मान मात्र वर केली नाही.
"दोन मिनिटात सगळं कळेल. सौ. निलम राजेश चव्हाण, माहेरचे आडनाव खरे, तेव्हा तुम्ही खरे सांगताय की मी सांगू ?" जमदाडेंनी निलमवरील नजर अजूनही हलवली नव्हती.
"तुम्ही काय म्हणताय तेच मला कळत नाही." निलमचा स्वरात आता पुर्वीइतका आत्मविश्वास नव्हता.
"कसं आहे माहीत आहे मिसेस. चव्हाण, मला तुमच्याएवढं सविस्तर सांगता यायचं नाही. मी शिपाईगडी आहे, एक घाव दोन तुकडे. साधा हिशोब. माझं बोलणं तुम्हाला कळतय ना ? तेव्हा टोपीखाली काय दडलय ते तुम्हीच सांगावं ?" जमदाडेंच्या आवाजातला मॄदूपणा नाहीसा झाला होता.
"बाबांचे दिवस झाल्यावर रावराणे काकांनी बाबांच्या मृत्युपत्राबद्दल सांगितलं. बाबांनी सगळी इस्टेट माझ्या व माझ्या नवर्‍याच्या नावावर ठेवलेली." शेवटी निलम बोलू लागली." इथेच घोळ झाला. आम्ही जांभुळवाडीला जायचं ठरवलं तेव्हा मी शशांकला कळवलं. मध्येच सोपानवाडीच्या घाटात त्याला भेटायचं ठरलं. राजेशही या गोष्टीस तयार झाला. ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो व सोपानवाडीला पोहोचलो. शशांक त्याच्या मित्राची गाडी घेऊन आला होता. आम्ही रस्त्यातल्या एका ढाब्यावर एकत्र जेवण घेतलं आणि पुढे मग त्याच गाडीने निघालो. पण राजेशच्या मनात काहीतरी वेगळचं शिजत होतं. त्याने दिला शब्द फ़िरवला. लाखोची इस्टेट सोडून द्यायला तो तयार नव्हता. शशांकने घाटाच्या शेजारील पायवाटेवर गाडी वळवली. शेवटी कड्याजवळ थांबलो. जागा निर्मनूष्य होती. आम्ही दोघे राजेशची समजुत घालू लागलो. पण राजेश फ़क्त मला सोडायला तयार होता. पण इस्टेट नाही. त्यामुळे वाद वाढला. प्रकरण हातघाईवर आलं. राजेशने तिथलाच एक वाळका बांबू उचलून शशांकवर हल्ला केला. संधी साधून मी त्याच्या पायात पाय घातला व शशांकने त्याला ढकललं. तोल जाऊन राजेश कातळावर आदळला व तेथेच संपला." वातावरणात स्मशानशांतता पसरली.
"काय केलसं तू हे पोरी ?" निलमच्या आईने हंबरडाच फ़ोडला.
"पुढे ? " जमदाडेंचा स्वर किंचीत वर गेलेला. निलमची नजर अजूनही खालीच. बाणे या कबूलीजबाबाने पुतळ्यागत झाले. घाटपांडेंचा स्वत:च्या कानावर विश्वास बसेना.
"पुढे काय झालं ? " जमदाडे संपुर्ण सत्याच्या शोधात होते.
"घडला प्रकार एवढा अनपेक्षित होता की आम्हाला काय करावं तेच कळेना. पण जे झालं ते निस्तरणं भाग होतं. राजेश गेल्याची खात्री झाल्याने आम्ही त्याचे कपडे व सगळ्या वस्तू काढून घेतल्या व त्याला शशांकचे कपडे घालून दरीत ढकलले. घडल्या प्रकाराला आम्ही दोघेच साक्षीदार होतो." क्षणभर थांबून तिने दिर्घ श्वास घेतला. "शशांकची शरीरयष्टी व चेहरेपट्टी राजेशशी बर्‍याच प्रमाणात मिळती जूळती असल्याने शशांकने राजेशसारखे चेहर्‍यात बदल केले. मिशी किंचीत कापली. केस उलटे फ़िरवले. कल्ले छोटे केले. जास्तीत जास्त चेहरा झाकला जाईल अशा पद्धतीने राजेशची कॅप घातली. गाडी तिथल्याच एक गॅरेजमध्ये टाकून, टेम्पोवाल्याकडून लिफ़्ट घेऊन आम्ही जांभुळवाडीला गेलो. शशांक राजेश म्हणून तिथे वावरला. ठरल्याप्रमाणे सगळं नाटक व्यवस्थित वठवलं. पेपर व स्नॅक्सची उठाठेव पण व्यवस्थित पार्श्वभुमी निर्माण व्हावी म्हणून केलेली." निलम बोलायची थांबली.
"सुरेख प्लान आणि यशस्वी देखील. यात एक घोडचूक आम्हीपण केली. तुमच्या निरागसपणावर एवढा विश्वास बसलेला की राजेशचा फ़ोटो गावातल्या गावात कोणाला न दाखवता, म्हणजे अक्षरश: जनूभाऊलाही न दाखवता बारा गावाच्या पंचक्रोशीत फ़िरवला. बसस्टॅडवरच्या पेपरवाल्याला व दुकानवाल्याला फ़ोटो दाखवला तर ते मात्र ठाम की माणूस हाच म्हणून. दोन मिनिटात त्यांनी नीट पाहीलं तरी कुठे होतं राजेशला म्हणजे शशांकला." यावेळेस जमदाडेंनी बाणेंकडे पाहील. बाणेंनी नजर चोरली. "चार दिवसापुर्वी जनुभाऊ चौकीत आले, तेव्हा त्यांनी फ़ोटो पाहीला. पण म्हातार्‍याला वयाने व नजरेने त्या क्षणी जरी धोखा दिला तरी आताच त्यांनी या गोष्टीची खातरजमा केली. त्यांच्या म्हातार्‍या नजरेने फ़ोटोतला व पाहूण्यातला फ़रक ओळखला. वर भिवरेंना म्हणालेही, चुकीच्या माणसाचा फ़ोटो घेऊन फ़िरताय मग कसा मिळेल तुम्हाला माणूस ?" जमदाडेंनी एका दमात मघाशी आलेल्या फ़ोनचं रहस्य उलगडलं.
"अजून एक गोष्ट. अमरावती ते जांभुळवाडीच्या दरम्यान काय झाल ते आम्हाला कुणाला माहीत नव्हतं आणि कळायला काही मार्गच नव्हता. जनूभाऊमुळे एक कळलं की जांभुळवाडीत राजेश कधी पोहोचलाच नाही मग पोहोचला कुठे ? पण आता सगळं कसं एकदम स्वच्छ व साफ़ झालय."

घाटपांडेंच्या हाती पुढचं कामकाज सोपवून जमदाडे, बाणेंसोबत बाहेर आले.
"तसा बाणे तुमचा तर्क खराच होता म्हणा. म्हणजे एकदम जवळच पोहोचला होता, पण काही हाती नाही आलं." जमदाडे बाणेंना त्यांच्या हुशारी पावती देत होते. बाणेंची मान उंचावली." पण बाणे, जर जनूभाऊंना आधीच फ़ोटो दाखवला असता तर केव्हाच मोकळे झालो असतो यातून. सगळ गडबड तिथेच झाली. हो का नाय ? "
"होय साहेब, पुढच्या वेळेला अशी घोडचूक व्हायची नाय." बाणेंनी कान पकडले.
"जाऊ द्या बाणे, मोकळं मोकळं वाटतयं आता. तुम्हाला कसं वाटतयं?" जमदाडेंनी बाणेंना अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त करण्यास सहज प्रश्न विचारला.
"काय बोलणार साहेब ? एवढे जांभूळवाडीवरून इथे येऊन यांची केस सोल्व केली तुम्ही. पण एक कप चहा नाही विचारला कुणी. केव्हापासून तलफ़ आलेली आहे. चहा घेऊया का ??"
"चला, चहा घेऊ." जमदाडे समोरच्या टपरीकडे वळले.

समाप्त

गुलमोहर: 

खुप छान!
पण मला कथेच्या शेवटाची साधारण कल्पना आली होती.

कौतुक,

कथा चांगली आहे तुमची. लिखाणाची शैलीही छान!
पण वर वैशू म्हणाली तसं शेवटाचा अंदाज आधीच आला. (बराच Holmes, Agatha Christie वाचल्याचा परिणाम! :-)) रहस्यकथा ड्राफ्टमध्येच लिहून पूर्ण करून एकदम टाकलीत तर हवा तो परिणाम साधला जाईल, असं वाटतं.

>>>>एक दिवस रावराणेंनी पाठवलेल्या चिठ्ठीमुळे जमदाडेंना शशांक या निलमच्या प्रियकराबद्दल माहीती मिळते. ते सरळ त्याबद्दल निलमकडे शहानिशा करतात. निलम आपले प्रेमप्रकरण कबूल करते.

ह्याचा उल्लेख पहिल्या भागात आलाय?

सायोनारा,
त्याचा उल्लेख दुसर्‍या भागात आहे ना... हा अंतिम म्हणजे तिसरा भाग आहे...

दुसरा भाग इथे वाचा..
http://www.maayboli.com/node/5172

कौतुक,
कथा आवडली, शेवटच्या भागात कथा थोडी नेहमीच्या मळलेल्या वाटेने गेल्यासारखी वाटली तरी ती तुम्ही छानच मांडलीत.
कथा सगळी एकत्र टाकल्यामुळे जो परिणाम साधला गेला असतात तो कथा एकत्र न टाकल्यामुळे साधला गेला नाही. पहिल्या भागानंतर उत्सुकता खूपच वाढली होती पण दुसर्‍या भागात न संपवता चक्क तिसर्‍या भागापर्यंत तुम्ही ती वाढवली त्यामुळे वाचनातला उत्साह निघुन गेला. पुढच्यावेळी पूर्ण कथा एकदम टाका (अर्थात हे माझे मत आहे तुम्हाला पटलेच पाहीजे असे काही नाही).
अजुन एक कथेचे पहीले २ भाग "दोन मिनीटात" या नावानेच आलेत, त्यांच्या शीर्षकात भाग १/ भाग २ असे लिहीलेत तर वाचतांना वाचकांचा गोंधळ होणार नाही.

कथा आवडली, छान साधली आहे.
२ भागांत संपवली असती तर अधिक परिणामकारक झाली असती, असे मलाही वाटले.

थोडासा अपेक्षित असाच शेवट आहे... तरी तुझी शैली असली अफाट आहे की, गोष्टं जाम पकड घेते. सुरेखच लिहितोस.

कौतूक, कौतुकास्पद आहे कथा.

कौतुका, पुढच्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहातोय रे. चांगला कामाला लावतोस यार मेंदुला.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

छान झालीये कथा... मस्तच एकदम.

फक्त वर इतर जण म्हणाले तसंच, कथा एकसंध सादर केली असती तर निश्चितच हवा तो परीणाम साधला गेला असता.

मायबोलीवर सध्या रहस्यकथांचं पर्व चालू झालंय तर... Happy

मनापासुन कौतुक... कथेचा शेवट अपेक्षेप्रमाणे झालाय.. पण वाचकांना खिळवुन ठेवण्याचे तुमचे कसब वाखणण्यासारखे आहे.

पल्लवी

सर्वांचा आभारी. पुढच्यावेळेस शक्य तेवढ्या सुचना अमलात आणण्याचा प्रयत्न करेन. या कथेत मी बरेच क्लु देत गेलो होतो. पुढच्या वेळेस तेही टाळणार आहे. अजून काही सुचना असल्यास नक्की द्या.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

कौतुक, छानच आहे शैली तुझी..... लिखते रहो Happy

कौतुक,
मस्त झालीये कथा.. आवडली Happy
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

कौतुक,
मस्त झालीये कथा.. आवडली Happy
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

मस्त एकादमात वाचुन काढली .. तुझी इष्टाईल भारी... पण जरा अजुन रंगवायला हवी होतीस.. पोलिस तपास खुलवायला हवा होतास.. पहील्या भागात जबर्दस्त सस्पेन्स होता आणि दुसर्‍या भागाच्या सुरवातीलाच रहस्यभेद केलास अजुन रंगवली असतीस तर खुप अफला झाली असती.... काय काय करतोस यार.. कविता, पोवाडे, कथा... मानल तुला...

छान.

नंद्याला स्पेशल थँक्स !! त्याच्यामुळे वाचता आली पुर्ण गोष्ट. त्याने पहिल्या भागात नंतरच्या दोन्ही भगांची लिंक दिलीये.
बाकी गोष्ट छानच !!

आज वाचली तुझी ही संपुर्ण कथा..
छान जमलिये.. Happy

>>शशांकची शरीरयष्टी व चेहरेपट्टी राजेशशी बर्‍याच प्रमाणात मिळती जूळती असल्याने >> हे फारंच फिल्मी.... Proud
बाकी निलमला काही पोलिसी बडगा दाखवावा नाही लागला का? Uhoh

*