ऐका विकटगडा हि तुला भेटायला आलेल्या ट्रेकर्सची कहाणी.
आटपाट मुंबई नगरीत पवई नामक मुलुखात एक आयटी कंपनी कार्यरत होती. तिथे मॅनेजमेंटपासुन प्रोडक्शनपर्यंत सगळेच गुण्यागोविंदाने नांदत होते (फक्त एक Appraisalचा काळ सोडला तर :फिदी:). ५ दिवस काम आणि शनिवार/रविवार सुट्टी असं सारं काहि आलबेल होतं. एक दिवशी अचानक HR चा इमेल आला. नेहमी नेहमी त्याच त्याच रूटिनला कंटाळलेल्या कर्मचार्यांसाठी Art & Craft Tribe, The Outdoors Tribe, The Foodies Tribe, The Helping Hands Tribe अशी छान छान नाव असलेली 4 Tribes आयोजित केली आहेत. ज्यांना ज्याची आवड आहे त्यांनी त्यात भाग घ्यावा.
अस्मादिकांच्या आयडीतच "जिप्सी" असल्याने अस्मादिकाने The Outdoors Tribe मध्ये नाव नोंदवले :-). धुमधडाक्यात या ट्राईबमध्ये पहिल्या ट्रेकची घोषणा झाली. ट्रेकचे ठिकाण ठरले माथेरानच्या डोंगरात वसलेला "मध्यम श्रेणीचा" विकटगड उर्फ पेबचा किल्ला. ठरल्याप्रमाणे १२ फेब्रुवारीला जाणे ठरले. तु येतोस? मी जातोय. मी नाही जात यार बोर होणार. तु येणार असशील तर मी जातोय, असं तु तू मी मी करत तब्बल ७०-७५ लोकांनी नाव नोंदवली. अस्मादिक आणि मित्रांनी नेमकं त्याच दिवशी "सरसगड" चा बेत केल्याने "पेब"ला जाणे रद्द होणार असेच दिसत होते आणि त्यामुळेच तेथे नाव नोंदवले नाही. पण........ काहि कारणांमुळे सरसगडचा बेत रद्द झाला आणि आमची वाट पेबला जायला मोकळी झाली. तब्बल ७० लोकांनी नावे नोंदवल्याने अस्मादिक आणि त्याचे १३ मित्र या गृपबरोबर जायला तयार नव्हते. एव्हढ्या ७० लोकांबरोबर जाणे म्हणजे फुकटचा टाईमपास होणार असा विचार १४ जणांच्या मनात आला आणि त्यांनी वेगळे जाणे पसंत केले. ठरल्याप्रमाणे सकाळी ५:५९ची कर्जत लोकल (विक्रोळीहुन) पकडुन ७:३० पर्यंत नेरळ आणि पुढे नाश्ता करून मार्गक्रमण असा साधा सरळ बेत होता. आमचे इतर लोकही त्याच ट्रेनमध्ये होतो. नेरळपर्यंत एकत्र गेलो आणि आरामात नाश्ता करत एका मित्राची वाट बघत तेथेच थांबलो. ७० चा ग्रुप पुढे गेला. "अरे, आरामात जाऊ रे, आपण त्यांना आरामात गाठू, बहुतेकजणांचा पहिला ट्रेक आहे, म्हणजे ते आरामातच जातील" इति आमचे मित्र. पण बहुतेक यांनी ससा कासवाची गोष्ट वाचली/ऐकली नसावी, कारण त्यांना आरामात गाठू या विश्वासाने रमत गमत गेलेलो आम्ही त्यांच्या खूपच मागेच राहिलो :फिदी:. इतर ट्रेकप्रमाणे वाटा चुकण्याच्या आमच्या मालिकेमध्ये गेल्या दोन ट्रेकदरम्यान खंड पडला होता तो या ट्रेकमध्ये पूर्वपदावर आला. मध्येच कुठेतरी वाट चुकलो आणि धबधब्याच्या वाटेने वर चढलो. (खरंतर पेबच्या वाटा या चुकवणार्याच आहे, प्रथम जाणार्यांनी गाईड नेणे मस्टच.) पुढे एका पाऊलवाटेला जाऊन मिळाल्यावर थोड्याच अंतरावर आमचा ७० चा गृप धापा टाकत चढताना दिसला. एव्हाना ऊन बरेच वर आले होते. तहानेने जीव कासावीस होत होता. थोडे थोडे पाणी पुरवून पुरवून पीत होतो. पुढे अस्मादिक आणि १३ मित्र त्या ७० च्या गृपमध्ये केंव्हा सामिल झाले ते शेवटपर्यंत समजलेच नाही. वाटेत एक ६-७ फुटांचा रॉकपॅच आहे तो मात्र सगळ्यांनी एकमेकांना मदत करत, बॅगा उचलत, मस्करी करत कसाबसा पार केला. रॉकपॅचच्या आधीच बर्याच जणांनी नांगी टाकली होती आणि "कुठुन या ट्रेकला आलो, विकएण्डला एखादा चित्रपट पाहत बसलो असतो", असे म्हणत मार्गक्रमण करत होते. त्यांची समजूत घालुन त्यांना सांभाळत आणायच्या कसरतीत आम्हीही केंव्हा सामील झालो ते कळलेच नाही. (आयटीच्या भाषेत म्हणायचे झाले तर "Team Work"चा उत्तम नमूना :फिदी:). सकाळी ९ वाजता चालावयाला सुरुवात केलेले बहुतेकजण १२:३० वाजता कसेबसे एकदाचे पेबच्या गुहेत पोहचले. गुहेच्या आजुबाजुला कुठेहि पाणी नव्हते, त्यामुळे पुढे कुठेतरी पाणी असेल या आशेपायी बहुतेकजणांनी जेवणाच्या ऐवजी नाश्ता करणेच पसंत केले (हाच निर्णय चुकीचा ठरला याचा प्रत्यय पुढे बहुतेक जणांना आला. :फिदी).
गुहेचा परिसर फिरल्यावर परतीच्या प्रवासात, मात्र आलो त्या वाटेऐवजी नेरळ-माथेरानच्या रेल्वेट्रॅकमार्गे जायचे ठरले. ती वाटही जवळपास ३/३.५ तासाची होती. सगळ्यांना वाटलो आलो त्या वाटेपेक्षा हि वाट नक्कीच सोप्पी असणार, पण थोडेच अंतर गेल्यावर हा गैरसमज दूर झाला. पुढे वर जाण्यासाठी एक लोखंडी शिडी पार करून सगळे आले आणि वरती दत्तगुरुंच्या पादुंका असलेल्या जागेवर जाता जाताच सर्वांची बरीच दमछाक झाली. एव्हाना बहुतेक लोकांकडचे पाणी संपत आले होते आणि आम्ही निम्मे अंतरही पार केले नव्हते. पुढे जाताच एक घरवजा मंदिर दिसले, काहि पाण्याची सोय होईल या आशेने तिकडे गेलो. पण काहि फायदा झाला नाही. तिकडेच एका झाडाखाली पुढे जाणार्या वाटेकडे पाहत निवांत बसलो. दूर डोंगरात एक बारीकशी दिसणारी पायवाट पाहून एकजण उद्गारला, "हायला, हि माणसांनी जायची वाट आहे कि मांजरांनी". पण त्याच वाटेने जाण्याशिवाय पर्याय नव्हता हे लवकरच त्यालाही उमजले. जवळपास ५०-६० फुट खाली उतरण्यासाठी लोखंडी शिड्या लावल्या होत्या. त्या उतरून आम्ही पुढे निघालो. अर्थात यावेळी आम्ही १४ जणच पुढे होतो. बाकी सगळा गृप केंव्हाच वेगवेगळा विभागला गेला होता. पुढे जाणारी पाऊलवाट निमुळती होत होती. दूपारचे तीन वाजत आले होते, सूर्य आग ओकत होता, माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी बिलकुल हवा नव्हती. आम्हा सगळ्यांची हालत पाणी नसल्याने खराब होत चालली होती. तहानेने जीव कासावीस होणे, घशाला कोरड पडणे, अंगाची लाही होणे, डोळे फिरणे, प्राण कंठाशी येणे अशा सगळ्या वाक्यांचा अर्थ तेंव्हा उमगत होता. एका बाजुला खाली पाहिलं तरी डोळे गरगरतील अशी खोल दरी, जेमतेम दोन पाऊल मावेल अशी पाऊलवाट, दुसर्या बाजुला कातळ अशा वाटेने आम्ही चाललो होतो. वर कडक ऊन आणि तहानेने कासावीस अशा अवस्थेत अचानक एका वळणावर अचानक अस्मादिकांचा आत्मविश्वास गेला, अस्मादिक अक्षरश: ब्लँक झाले. काहीच सुचत नव्हते. नक्की काय होतंय तेही कळत नव्हत. त्यावेळेस थोडीशी जरी चूक झाली असती तर आज हा वृतांत लिहायला अस्मादिक नसते :फिदी:. इतक्या वेळा ट्रेक केले, यापेक्षाही कठिण वाटवरून गेलो पण असा अनुभव पहिल्यांदाच आला. ते वळण पार केल्यानंतर एका खडकावर १० मिनिटे शांतपणे बसून राहिलो. कुणाशी काहिच बोललो नाही मात्र थोड्याच वेळात पुन्हा पहिल्यासारखाच फ्रेश झालो आणि चालायला सुरुवात केली. :-). काहि अंतर चालुन गेल्यानंतर नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचा आवाज आला व गणपती मंदिर दिसायला लागले आणि सगळ्यांना स्वर्ग दोन बोट उरला :फिदी:, "त्या वळणावर" काहि चूक झाली असती तर मला मात्र त्या दोन बोटांच्या पुढे जायला वेळ नसता लागला. .
रेल्वेट्रॅकवर आल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव आला. पुढे १४५नंबर बोर्डजवळ पाण्याची टाक आहे तिथे प्यायच्या पाण्याची सोय होईल असे तेथुन जाण्यार्या दोन गावकर्यांनी सांगितले तेंव्हा आम्ही १५६नंबरच्या बोर्डजवळ होतो. वाटलं असेल जवळपासच, पण अंदाजे दिड-दोन किमी अंतरावर शेवटी एकदाचे पाण्याचे टाके सापडले आणि सगळे अक्षरशः तुटुन पडलो. मनसोक्त थंडगार पाणी प्यायल्यावर तेथेच
ट्रॅकच्या आसपास बसुन डब्बे काढले आणि मस्तपैकी हादडलो. पोटात पाणी आणि अन्न गेल्यावर सगळेच एकदम फ्रेश झालो आणि दंगामस्ती सुरु झाली. ट्रॅकवर मस्तपैकी फोटोसेशन केल्यावर परतीच्या मार्गावर
निघालो. थोड्याच वेळात रेल्वे लाईन पुढे जिथे रस्त्याला मिळते तेथे आलो आणि उभ्या असलेल्या टॅक्सीत बसुन नेरळ स्टेशनकडे प्रयाण केले.
पेबच्या वाटेत फुललेला निसर्ग
अशा तर्हेने एक वेगळाच आणि कायमचा आठवणीत राहणारा एक ट्रेक "सफल" झाला. बहुतेकजण पहिल्यांदाच ट्रेकला आले होते त्यामुळे त्यांची हालत थोडी खराब होती. पण सरतेशेवटी सगळेजण सुखरूप परत आले. इंद्राने राजगड भ्रमंतीवेळी म्हटलेले लक्षात आले, " प्रत्येक ट्रेक कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायमचा लक्षात राहतो" आणि याच वाक्याचा पुरेपुर अनुभव या ट्रेकदरम्यान आला. कदाचित या ट्रेकची आमची वेळ/सीझन चुकला असावा आणि पाण्याचा पुरेसा साठा नसल्याने त्रासदायक झाला असावा. असा हा ट्रेक जसा आम्हास त्रासदायक ठरला तसा तो तुम्हास न होवो या सदिच्छेसहित, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!
या ट्रेकमधून अस्मादिक काय शिकले: सध्या उन्हाळ्याची चाहुल लागत असल्याने व्यवस्थित नियोजन करूनच ट्रेक करावा. :-). ट्रेकच्या वेळी कुठल्याही क्षणी आत्मविश्वास गेला तर काहि मिनिटे शांत बसून रहावे आणि थोड्या वेळाने परत मार्गक्रमण करावे.
आलेला अनुभव लक्षात घेता पावसाळा सुरु होईपर्यंत ट्रेक न करण्याचा निर्णय अस्मादिकांनी घेतला आहे.
पण . . . . .
("उतू नको मातू नको, घेतला (ट्रेकचा) वसा टाकू नको' याप्रमाणे वरील निर्णय किती दिवस टिकेल ते माहित नाही. :फिदी:).
/>
कारण ती पावडर स्नायू मधील
कारण ती पावडर स्नायू मधील पाणी शोषून घेते... घशालाही कोरड पडते... त्याचे कारण तेच आहे...>>>>हम्म्म.... हे असु शकते. कारण पाणी संपल्याने म्हणुन फक्त पावडरच खाल्लेली.
योगेश कृपेने मी ह्या शनिवारी
योगेश कृपेने मी ह्या शनिवारी विकटगडावर जाताना नेहमी पेक्षा जास्त इलेक्ट्रोल्ची पाकिटं, संत्री असा जामानिमा करुन गेलेले. धन्स रे, तुम्ही वाट चुकलात हे वाचून आम्ही गाईड बरोबर घेण्याचा शहाणपणा केला आणि ट्रेक धम्माल एन्जॉय केला. सर्वात लहान ट्रेकर २.५ वर्षाचा होता फोटो माझ्या पर्यंत येतील तेव्हा टाकेन लोक्स पण ते योगेश ने काढलेत तस्सेच असणारेत तेव्हा टाकले काय नाही काय
जय हो!!!! जय हो!!! सह्हीये
जय हो!!!! जय हो!!!
सह्हीये कविता!!!!
त्या दोन छोट्या मावळ्यांना सलाम!!!! कॅप्टन बरोबर होते? अर्थात कॅप्टन होते मग काहि काळजीचे कारणच नाही. जबरदस्त संयोजन असते (राजमाचीचा अनुभव :-)).
आता लवकर "एका धम्माल ट्रेकची कहाणी" येऊ देत
जिप्सी,मस्त वर्णन आणि
जिप्सी,मस्त वर्णन आणि फोटोज...:)
मी माझ्या इंजिनिअरिंगच्या क्लासमेट्सना घेउन ह्या किल्ल्यावर बरोबर २ वर्षांपूर्वी भ्रमंती केली होती, सह्याद्रीचा रांगडेपणा त्यांना इतका असह्य झाला की ती लोक पुन्हा कधी सह्याद्रीमधे यायला दचकतात
उतू नको मातू नको, घेतला
उतू नको मातू नको, घेतला (ट्रेकचा) वसा टाकू नको'
छानच वर्णन आणि फोटो सुद्धा
छानच वर्णन आणि फोटो सुद्धा .मस्तच लिहीले आहेस
Pages