PROTEA - एक अनोखे फूल

Submitted by दिनेश. on 13 February, 2011 - 13:23

आज एका अनोख्या फूलांची ओळख करुन घेऊ या. हे आहे प्रोटिए. (उच्चाराबाबत खात्री नाही.) मी पहिल्यांदा हे अनोखे फूल न्यू झीलंडलाच बघितले. खरे वाटू नये इतके सुंदर.

तिथे अनेकांच्या अंगणात हे झाड दिसायचे. लाल, गुलाबी, पिवळा, फ़िका जांभळा असे अनेक रंग दिसायचे. बघताक्षणीच, हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे, हे जाणवायचेच.

पहिल्यांदा नजरेत भरतात ते या फूलांचे चमकदार रंग. मग त्याचा भलामोठा आकार. आता वरच्या पहिल्या फ़ोटोत दिसतेय त्याच्या पाकळ्यांची लांबी सहज १५ सेमी होती.

मग पुढे पुढे या फूलाबद्दल अनोखी माहीती मिळत गेली. पृथ्वीवर निर्माण झालेल्या अतिप्राचीन वनस्पतिंपैकी हि एक आहे. सहज उल्लेख करतो, म्हणजे जास्त स्पष्ट होईल. आपला हिमालय पर्वत निर्माण व्हायच्या आधीपासून या वनस्पती पृथ्वीवर आहेत. निदान ३० कोटी वर्षांपूर्वी या निर्माण झाल्या आहेत.

सध्याचा ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, आफ़्रिका खंड, मादागास्कर आणि आपला भारत, हे सगळे एका भूभागाचा भाग होते. त्याला गोंडवन असे सुंदर नाव दिलेय. त्या भूभागावर या वनस्पती होत्या. मग पुढे हे सगळे भूप्रदेश वेगळे झाले आणि उत्तर दिशेने सरकले. त्यामूळे या सर्व भूभागावर या वनस्पती आहेत. भारतातही अर्थात असणार. पण माझ्या बघण्यात कधी आल्या नाहीत. बहुदा दक्षिण भागात असाव्यात. कदाचित भारतात याचे काहि खास नाव असेल, किंवा याचे रुपडे बरेच वेगळेही असू शकेल.

रुपडे वेगळे असे मी लिहिलेय याला कारण म्हणजे या फूलांची अनेक रुपे आहेत. मूळात हे नाव या वनस्पतीला ग्रीक देवता प्रोटेस वरुन पडलेय. आणि या देवतेला आपले रुप बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.

खास म्हणजे, भारताचा अपवाद वगळता, यातले बहुतेक भूभाग दक्षिण गोलार्धातच राहिले आणि हे फूल दक्षिण गोलार्धाची मक्तेदारी राहिलेय. तसेच सध्या जरी हे भूभाग समुद्राने वेगळे झालेले असले, तरी यांचा प्रसार समुद्रमार्गे झालेला नाही असे मानतात. म्हणजे या वनस्पतीचे स्थलांतर या भूखंडाबरोबरच झालेले आहे. पण आता मात्र हौसेखातर याची लागवड युरप आणि अमेरिकेतही केली जाते.

दक्षिण आफ़्रिका देशाचे हे राष्ट्रिय फूल आहे (यातला एक प्रकार) तो जो प्रकार असतो तो लाल रंगाचा असतो आणि त्याचा आकारही भला मोठा असतो.

या फूलांचे परागीकरण जास्त करुन सनबर्ड सारख्या छोट्या पक्ष्यांकडून होते, पण पक्षी निर्माण व्हायच्या आधीपासून हे झाड इथे असल्याने पालीसारखे काही सरपटणारे प्राणी देखील, या झाडाने दिमतीला ठेवले आहेत. इतकेच नव्हे तर एका जातीत, चक्क उंदरांना या कामावर जूंपले जाते. त्या प्रकारातली
फूले अर्थातच, जमिनीलगत उमलतात. आणि ती वरुन दिसतही नाहीत. (उंदीर तसे फारच अलिकडे अवतरले या पृथ्वीवर. पण या झाडाने त्यांना कामाला लावलेय हे खरे. )

काही फूलांत एकच बी असलेल्या छोट्या बेरीज तयार होतात, आणि त्यांचा प्रसार मोठ्या पक्ष्यांमार्फ़त होतो.

पण या झाडाला जास्त सुपीक जमिन मानवत नाही. कमी कस असणारी जमिन याला चालते. या झाडाची मूळे अगदी खोलवर जातात आणि इतर झाडे जशी जमिनीखालच्या बुरशीची मदत घेतात, तशी हि झाडे घेत नाहीत.

फूले उमलून सुकली तरी याच्या पाकळ्या गळत नाहीत. त्या मधल्या बियांच्या रक्षणासाठी तशाच राहतात. आणि हे रक्षण कुणापासून तर वणव्यापासून. वणवा लागल्यास याच्या पाकळ्या जळून जातात. पण आतल्या बिया मात्र सुरक्षित राहतात. काही झाडांच्या बाबतीत तर अशी आग लागल्याशिवाय बिया मोकळ्या होत नाहीत.

या फूलाची आणही एक खासियत म्हणजे यात पाकळ्या आणि बाह्यदले वेगळी नसतात. पाकळ्याच हि जबाबदारी निभाऊन नेतात.

मी इथे काही वेगवेगळे नमुने पेश करतोय, पण यापेक्षा यात खूपच विविध रंग आढळतात. शिवाय फूल असे देखणे आणि भरगच्च कि पुष्परचनेत एखादे फूल असले, तरी चालते. असे काही फोटो नेटवर अवश्य बघा.

आणि हो याचे भारतीय नाव वा त्याचा आढळ याबद्दल काहि कळले तर मला अवश्य सांगा.

ये थी हम दोनोंकी पहली मुलाकात -

और ये दूसरी

इथे तूम्हाला बाह्यदलाचा अभाव नीट बघता येईल

हे फूल सुकायला लागलेय

हे आणखी एक देखणे रुप

एकंदर झाड

ऑकलंडमधल्या वन ट्री हिल वरच्या स्मृतीस्तंभाच्या जवळ ठेवलेली हि फूले.. (यात चार प्रोटिए ची फूले आहेत.)

गुलमोहर: 

वा एक वेगळे फूल आणि छान माहिती.

द. अफ्रिकेत गेले असताना पहिल्यांदा या फुलाबद्दल ऐकलं कारण जोहन्सबर्गला याच नावाच्या हॉटेलात राहिले होते. तिथे ही फुलं दिसली नाहीत पण जागोजागी त्यांची पेंटिग्ज, चित्र होती. त्यावेळी प्रोटिया नावाची मजाच वाटली होती. पण किती सुरेख फुल आहे. आणि विविध रुपात वेगवेगळं दिसतय अगदी. शेवटच्या फ्लॉवर अरेंजमेंटमध्ये तर थेट अर्धोन्मिलीत कमळासारखं दिसतय.

सुन्दर्.प्रदर्शनात दिसल तर बघेन.
आणखी एक कान्चन सारख दिसणारे फूल पाहिले. सफेद कान्चन सारखे. पण पान वेगळी.काहीतरी ईस्ट आफ्रिकन अस नाव आहे. आठवत नाही. एकूण आफ्रिकन काळे तरी फुले सून्दर.

मामी, हे फूल बघायलाच हवे होते.
विजय. मला आधी कधी हे फूल तिथल्या प्रदर्शनात दिसले नव्हते. आता आले तर फार छान.
तो कांचनच असणार. इथल्या कांचनाचे फूल आपल्या कांचनापेक्षा खुप मोठे आणि गडद रंगाचे असते. सगळीच फूले इथे जास्त गडद रंगाची असतात. तरीपण फोटो हवाच.

आणि सगळे आफ्रिकन काळे नसतात. अल्जीरियन, इजिप्शियन, इस्राइली, लेबनानी वगैरे चक्क गोरे असतात !!!

सुंदर... Happy मधल्या २ अवस्थांमध्ये तर अप्रतिम दिसतय.. Happy

आपल्याकडे निळ्या रंगाचे नीलकमल की काही तरी अशाच नावाचे फूल असते. त्याच्यासारखेच वाटते

खरच किती वेगळय ते फुल! दिनेशदा, भारतात येतांना याची रोपटी आणा आमच्यासाठी! Happy

आर्या, आता पुढच्या भेटीत बिया आणायलाच हव्यात. (तशी भारतात पण बंदी आहे म्हणा, बाहेरून बिया आणायला. पण चलता है. )

मंदार, या शब्दाने गुगल केलं तर फूले सोडून बाकी सगळ्या लिंक मिळतात !

बहुतेक नसावे. आपण ज्याला कमळ म्हणतो (वॉटर लिली) त्यातल्या निळ्या फूलाचा मधला भाग असा दिसतो. पण ते कूळ वेगळेच. आणि कृष्णकमळाचेही वेगळेच.