त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सी.डी.वर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं, काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी.
मन हळवं झालं होतं. असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना तुमच्या मनात जी भावना असते, ती दुपटीने वाढते; म्हणजे तुम्ही आनंदी असाल तर तो आनंद अजून उत्कट होतो. त्यामुळे की काय कोण जाणे, पण मी जरा जास्तच हळवा झालो, पापण्या ओलावायच्या बाकी होत्या, पण हृदय कधीचं भरून गेलेलं होतं. मारव्याची हुरहूर पण अशी होती, की तानेला दाद जात होती तीसुद्धा मनात खोलवर काहीतरी रुतल्यासारखी 'आह' अशीच ! बाहेर विजा आणि आत वसंतरावांच्या ताना एकीवर एक अशा कडाडत होत्या. मनात वादळच उठलं होतं. मारव्यानं कसल्याशा अपूर्णत्वाची जाणीव करून दिली होती. एरवी ते जाणवत नसल्यानंच पूर्णत्वाच्या भ्रमात आपण जगतो असं वाटलं. मनः पटलावर येण्याऱ्या प्रतिमा आता काहीशा मूर्त-स्वरूप घेऊ लागल्या होत्या. त्यात तिन्हीसांजेला सौधावर आपल्या प्रियाची वाट बघणारी विरहिणी होती.कृष्णाच्या विरहाने वेडी-पिशी झालेली गौळण होती. ती विरहिणी किंवा गौळण म्हणजे जिवंत हुरहूरच असते जणु. कुठेतरी त्यांच्या मनातलं ते खोल दडून बसलेलं, गहिरं, अनाम, सनातन दुःख कळल्याचं जाणवत होतं; नव्हे मीच ते सोसतोय असाही भास झाला क्षणभर. दुरून कुठूनतरी, अंधारात वाट चुकलेल्या कोकराचं केविलवाणं ओरडणं ऐकू येत होतं....
त्या प्रतिमांमध्ये अगदी क्षणभरच, पण मला नोकरीच्या निमित्ताने घरच्यांपासून दूर आलेल्या माझाही चेहरा दिसला... पाऊस सुरू झाला होता. मन अजूनच हळवं झालं ...
आत एकतालाची, अन् बाहेर पावसाची लय वाढत होती. वसंतरावांच्या ताना अजूनच आक्रामक होत होत्या.विरहिणीचे अस्पष्टसे हुंदके ऐकू आल्याचा भास झाला. मग जाणवलं, की आपलीच पापणी ओलावली आहे. एक क्षण वाटलं आत जाऊन सी.डी. थांबवावी. पण तेही जमेना.
काही वेळातच तिहाईवर येऊन वसंतराव थांबले आणि मारवा संपला ... सी.डी. मधला....
कानात मात्र मारव्याचे सूर अजूनही घुमतच होते, पाऊस पडतच होता...!
(जालावर पूर्वप्रकाशित)
चैतन्य, वसंतरावांचा तो मारवा
चैतन्य,
वसंतरावांचा तो मारवा आहे माझ्याजवळ..क्लासच आहे!!
पंत म्हणत होते की तुम्ही गायलेली एक यमन ची रेकॉर्डेड बंदीश आहे म्हणे!!! ऐकायला आवडेल
ते गेले आणि मारवा संपला, असे
ते गेले आणि मारवा संपला, असे उद्गार पंडीत भीमसेन जोशी यांनी काढले होते.
(No subject)
चैतन्य, किती छान लिहिलंय हो
चैतन्य, किती छान लिहिलंय हो तुम्ही. मस्तच.
वा वा ! मस्त !
वा वा ! मस्त !
ह्या इथे मारव्याची लिन्क
ह्या इथे मारव्याची लिन्क देणार होतास ना ??? वाट पहातोय ...
आवडलं, पण मधेच संपल की काय
आवडलं, पण मधेच संपल की काय असंही वाटलं..
प्रतिसादाबद्दल मनापासून
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
वसंतरावांचा मारवा इथे ऐकता येईल.
http://www.esnips.com/doc/49d7203d-08b7-446c-96bc-c87bae6fa7a0/Pandit-Va...
मारव्याबद्दल खुद्द वसंतरावांचे उद्गार खालीलप्रमाणे:
"मारवा ही संधिकाळात उफाळून येणारी व्यथा आहे. मारवा गाताना जो षड्ज असतो तो कधी लावायचा नाही. लावायचा क्वचितच. गाताना असे वाटले पाहीजे की गायक अनेक दरवाजे असलेल्या चाळीत प्रत्येक दरवाजा ठोठावत फिरतो आहे त्याचा 'सा' शोधण्यासाठी. आहे आसपासच आहे त्याच्याभोवतीच पण मिळत नाहीये. मिळतो पण टिकत नाही त्याच्याजवळ. हीच ती व्यथा. मारवा फिरतो आहे दारोदार गल्लोगल्ली त्याचा षड्ज शोधत" -इति वसंतराव.
दुव्याबद्दल धन्यवाद
दुव्याबद्दल धन्यवाद चैतन्य.
वसंतरावांचे उद्गार भारी.
मात्र लेख अजून खुलवता आला असता असे वाटले. आवडलेच, पण अजूनही वाचायला आवडले असते.
सुरेख लिखाण, आणि वसंतरावांचे
सुरेख लिखाण, आणि वसंतरावांचे उद्गारही.
मी हे उद्गार उसने घेतलेत, बाकीच्या मित्रांना कळावे यासाठी.
छान
छान
मस्त.
मस्त.:स्मित:
वसंतरावांच्या उद्गारांबद्दल
वसंतरावांच्या उद्गारांबद्दल धन्यवाद!
चैतन्यं... वाह! मारव्याचम
चैतन्यं... वाह! मारव्याचम मूर्तीमंत विरही रूप. दाद द्यावी तितकी थोडी.
संध्याकाळच्या त्या कातर वेळी गर्दीतही एकलं करणारी वेळ... आपल्याला आपल्यापासून तोडून दूर नेऊन, मग वर आणखी हुरहुर लावणारी वेळ...
वसंतरावांचं मारव्यावरचं भाष्यं वर वाचलं अन गंमत वाटली....
माझ्याच एका गोष्टीतलं (हरवलेला) मारव्याचं वर्णन आठवलं. आगाऊपणानं इथं देतेय....
....
हे सारं दुसर्या कुणापर्यंतही पोचेपर्यंत, सावनीने परत डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेऊन आपल्या निकोप आवाजात निखळ निषाद लावला. श्वास पूर्ण संपायच्या आधीच थांबली. असं निषादाने भिजवून आता एकदाची षड्जाच्या सावलीत उभी रहातेय, असं वाटत असतानाच षडजाच्या नुसत्या सावलीला स्पर्श करून परत एकदा निषादाचं आर्जव केलं.
अन मग तिन्ही तानपुर्यांतून वहात असलेला, समोर हा असा... असा.... वाटलं तर कधीही त्याच्या कवेत शिरता येईल असा... षड्ज उभा असतानाही, त्याला टाळून कोमल रिषभाच्या उन्हात उभी राहिली सावनी.... रिषभाच्या उन्हाचा आसरा घेत......
त्याक्षणी अश्विनच्या रोमारोमात उभा राहिला सावनीचा, मारवा. निषादाचं आर्जव करणारा आणि रिषभाचा आसरा शोधणारा, असा.... स्वत:पासून हरवलेला षड्ज!
........
तुम्हा सगळ्यांची सुरांशी एवढी
तुम्हा सगळ्यांची सुरांशी एवढी छान गट्टी पाहिली की मोठ्ठा ' जे ' होतो !!
मी नुसतीच कानसेन.....तीही यथातथाच. पण हे अस्लं काही वाचलं की खूप चुटपुट लागते,आपल्यालाही हवं होतं हे असं अनुभवायचं भाग्य.
खूपच छान लिहिलंय.
वसंतरावांची वाक्यं...माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला तो प्रत्येक दार ठोठावणारा मारवा.
आणि दाद, तुझी वाक्यंही खूपच जीवघेणी गं.
गात रहा, ऐकत रहा...आणि आमच्यासाठी असंच लिहीत रहा.
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार!
वसंतरावांची मुलाखत इथे ऐका:
http://www.esnips.com/doc/41d90852-a728-4ef0-ab87-e366e058b2fb/06.Pratib...
सुंदर!!! धन्स चैतन्य
सुंदर!!!
धन्स चैतन्य
रुणूझुणू :अगदी अगदी. मागच्या
रुणूझुणू :अगदी अगदी.
मागच्या वर्षी मी आयुष्यात प्रथम अशी ती मैफल ऐकली. गीत रामायण सादर केले होते त्या ग्रुपने.तो अनुभव अप्रतिम्,अवर्णनीय होता.गाते गळे इतके गोड होते,शिवाय ग.दि.मां चे शब्द्...माझ्या डोळ्यात पाणी येत होते सारखे.आयुष्यात असे शब्दांच्या पलिकडचे अनुभव किति कमी येतात..