भरले टोमॅटो

Submitted by मंजूडी on 1 February, 2011 - 01:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६-७ मध्यम आकाराचे टोमॅटो (लहान असतील तर १०-१२ टोमॅटो) चांगले लालबुंद, कडक बघून घ्यावेत.
दिड ते दोन वाट्या मटार
१ मोठा कांदा (ऐच्छिक)
दोन टेबलस्पून पांढरे तीळ
दोन टेबलस्पून शेंगदाणे
चार टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं
चार टेबलस्पून बेसन
एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
दोन टी-स्पून कच्छी दाबेली मसाला
मीठ, साखर, लाल तिखट, हळद चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१. मटार वाफवून घ्या.
२. टोमॅटो मोठे असतील तर दोन तुकडे करून घ्या. लहान असतील तर फक्त देठाकडचा भाग कापून घ्या.
३. टोमॅटोमधला गर काढून बाजूल ठेवा. टोमेटो चांगले पोकळ झाले पाहिजेत.
४. सुकं खोबरं, दाणे, तीळ खरपूस भाजून घ्या. मिक्सरमधून बारीक पूड करून घ्या.
५. बेसन कोरडंच खमंग लालसर भाजून घ्या.
६. कांदा बारीक चिरून घेऊन टोमॅटोच्या गरात मिसळा. त्यात सुकं खोबरं-दाणे-तीळाचं कूट आणि बेसन मिसळून चांगलं कालवून घ्या.
७. वाफवलेले मटार त्यात घाला. दाबेली मसाला आणि चवीप्रमाणे मीठ, साखर, हळद आणि लाल तिखट घाला.
८. चिरलेल्या कोथिंबीरीपैकी पाऊण वाटी कोथिंबीर त्या सारणात मिसळा.
९. सारण चांगलं व्यवस्थित कालवून घेऊन टोमॅटोत दाबून भरा.
१०. भरलेले टोमॅटो मायक्रोवेव सेफ बोलमधे व्यवस्थित लावा. उरलेलं सारण टोमॅटोभोवती घालून टाका.
११. या भाजीला रस हवा असल्यास एक कपभर पाणी बोलमध्ये सगळीकडून घाला.
१२. आता हा बोल न झाकता मायक्रोवेवमधे हाय पॉवरवर आधी तीन मिनिटे ठेवा. मग बोल बाहेर काढून टोमॅटो किंचित हलवून पुन्हा हाय पॉवरवर दोन मिनिटासाठी ठेवा.
१३. भाजी बाहेर काढून उरलेली कोथिंबीर पेरून खायला घ्या.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे तीन ते चार माणसांसाठी
अधिक टिपा: 

१. ही भाजी बिनफोडणीची आहे. तीळ-दाणे-सुक्याखोबर्‍यातून पुरेसं तेल मिळतं.
२. वर दिलेल्या सारणाऐवजी उकडलेले बटाटे, वाफवलेले पिवळ्या मक्याचे दाणे, बारीक चिरलेली भोपळी मिरची, ओलं खोबरं इत्यादी घटक वापरून आपापल्या आवडीप्रमाणे सारण करता येईल.
३. वरून किसलेलं चीज घातलं तर या भाजीला अधिक बहार येते. Happy
४. ही भाजी गॅसवर करायची असल्यास थोड्या तेलात फोडणी करून त्यात भरलेले टोमॅटो घालून वर झाकण ठेवून चांगली दणदणीत वाफ आणायची.
५. टोमॅटो पटकन शिजतात. जास्त वेळ मायक्रोवेव केले किंवा गॅसवर ठेवले तर भाजीचा गिचका होईल.
६. दाबेली मसाल्याऐवजी गरम मसाला, धने-जिर्‍याची पावडर वापरता येईल. पण दाबेली मसाल्याचा स्वाद एकदम निराळाच आणि छान लागतो.

stuffed tomato.jpg

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोषा, भोपळी मिरची मऊ होईल ना?>>

केश्वे, भरली भोपळी मिरची करताना पाणी अजिबात घालायचं नाही. वाफेवरच ती होऊ द्यायची. गॅसवर करताना झाकण अजिबात ठेवायचं नाही. परतून परतून चांगली खरपूस भाजी करायची. आमच्याकडे भरल्या भोपळी मिरचीचं तोंडीलावणंच होतं. सगळे नुसतीच खातात, मग पोळीबरोबर दुसरं काहीतरी करावं लागतं.

यम्मी!!! मी पण करते असेच टॉमेटो आणि कॅप्सिकम पण Happy

मी मटार नाही घात्ले कधी पण भात किंवा ब्रेड घातलाय थोडा घट्ट्पणा येण्यासाठी. आणि शेवटी वरतुन किसलेले चीज घालते... गरम असतानाच... मस्त मेल्ट झालेले चीज... यम्म्म्म्म्म्म्म्म..... Happy

मंजु, मेहषी नामक अरेबिक रेसिपीमध्ये भोपळी मिरची आधी थोडी वाफवून घेतात,त्यात किंचित शिजलेला मसालेभात भरुन पुन्हा ती मिरची वाफेवर शिजवतात. भात व्यवस्थित शिजला की मेहषी तयार!!!!!

हो मंजू, मी कोरडी भरली भोमिच पाहिलीय आणि खाल्ली आहे. आतलं सारण सुद्धा कोरडंच असतं.

अरेबिक पदार्थांमध्ये मसालेभात पण? Happy

अहाहा!!! काय रेसिपी आहे! मी उद्याच करेन! दाबेली मसाल्याला पर्यायी मसाले सांगितले, हे बरं झालं... Happy

हा फोटो भाजी तयार झाल्यानंतर काढलाय की आधी ?

रेसिपी भारीये. मला मृ ने एक बाकर भाजीची दिली होती. ती साधारण अशीच आहे (का गं मृ ?)

छान आहे हा प्रकार. कोल्हापूरच्या गोकूळ हॉटेलमधे बघितल्यासारखा वाटतोय. त्याला शोला का असेच काहितरी नाव ठेवलेय. टेबलावर नेताना, एक टोमॅटो कोरून त्यात छोटी मेणबत्ती लावून नेत असत.

मंजू छान रेसिपी. फोटो पण खूप छान!! भरली भोपळी मिरची केली आहे टोमॅटो पण करून बघीन. मी उकडलेला बटाटा, कच्चा कांदा, किसलेलं पनीर, असल्यास डाळिंबाचे दाणे, धणे जिरे पूड आणी चाट मसाला, मीठ,तिखट असं सारण वापरते.वरून चीज घालायचं. वेगवेगळ्या रंगाच्या भो.मि. वापरल्या तर दिसायला पण छान दिसतं. दाबेली मसाल्याचा वापर करायची कल्पना पण चांगली आहे.

मस्त पाकृ. दाबेली मसाल्याला पर्याय लिहिल्यामुळे लवकरच करून बघता येईल.

सिंडे, बाकरभाजी जरा वेगळी. एकतर ती कोरडी असते. हिरवे टोमॅटो वापरतात. टोमॅटोचा गर वापरत नाहीत. बाकरात भरपूर कोथिंबीर, खसखस- ओलं/सुकं खोबरं-तीळ-शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ, आमचूरपावडर, आलं लसणाचं वाटण आणि लवंग-दालचिनी पूड असं एकत्रं करून टामाट्यांच्या वाट्यांमधे भरून अंमळ जास्त तेलात खरपूस शिजवून काढतात.

IMG_5866 copy.JPGमंजुडी आजच केली होती संध्याकाळी ही भाजी. अप्रतीम !! थोडासा चेंज केला. तो म्हणजे ग्रेव्ही साठी उरलेल्या स्टफिंग मधेच थोडसं पाणी घालून पॅन मधे गरम केलं. उकळल्यावर थोडं दही घोटून घातलं आणी उतरवलं. बेसनामुळे छान मिळून आली ग्रेव्ही. पार्टीसाठी हिट्ट आयटम.ईतक्या छान रेसिपी बद्दल धन्यवाद !!

Pages