आर्थरायटिस हा सांध्याशी संबंधित एक आजार आहे जो ऑटो-इम्युन म्हणजे शरीरातल्या प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे. आर्थरायटिसचे मुख्य तीन प्रकार आहेत.
1. रूमाटाइड आर्थरायटिस (आमवात)
2. ऑस्टिओ आर्थरायटिस
3. गाऊट
यातला ऑस्टिओ आर्थरायटिस हा आजार मुख्यत्वे वाढत्या वयात होतो आणि त्यात गुडघ्यामधलं वंगण कमी होऊन हाडं एकमेकांवर घासली जातात. या घर्षणामुळे गुडघे खराब होऊन त्यांचं ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. गाऊट हा मुख्यत्वे पुरुषांना आणि रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या स्त्रियांना होऊ शकतो. याची लक्षणं आमवातासारखीच असली तरी तो थोडा वेगळा प्रकार आहे.
आमवात- हा अत्यंत गंभीर आणि कोणत्याही वयात होणारा आजार आहे. आयुर्वेदानुसार आपलं शरीर वात, पित्त आणि कफ अशा तीन प्रवृत्तींचं असतं. त्यातली वातप्रधान पित्तप्रकृती वाढली की हा आजार होतो, असं डॉक्टर्स सांगतात. आपलं शरीर अनेक गोष्टी अन्नाद्वारे स्वीकारत असतं आणि काही गोष्टी बाहेर फेकत असतं. या बाहेर फेकल्या जाणार्या गोष्टी पचन न होत्या शरीरात साचल्या की सांध्यांमध्ये साठून राहतात आणि शरीर सुजतं. सर्वसाधारणपणे प्रसूतीनंतर नीट काळजी न घेतल्यास, सतत जास्त टेन्शन घेतल्यास हा आजार होतो. अनेक स्त्रियांमध्ये वर्षानुवर्षं एकच हात दुखतोय आणि मग आजाराने डोकं वर काढलं असं होऊ शकतं. शिवाय एकदा तो झाला की अनेकदा फोफावत शरीरभर पसरतो आणि माणसाला कळतच नाही की काय होतंय. जगभरात जवळपास 70 टक्के लोकांना हा आजार आहे आणि प्रसूती झालेल्या महिला याला जास्त बळी पडल्या आहेत.
माझा आजार 2007 मध्ये पायाच्या बोटापासून सुरू झाला. अंगठा आणि बोट यांच्यामधला सांधा सुजायचा आणि असह्य दुखायचा. एक्सरेत काहीही आलं नाही. आधी काहीच कळलं नाही. 2008च्या जून-जुलै महिन्यात माझा एक खांदा दुखू लागला. उसण भरली असेल म्हणून दुर्लक्ष केलं. मग ऑगस्टमध्ये एक गुडघा दुखू लागला. असं करत करत सप्टेंबरमध्ये माझ्या शरीरातले सर्व सांधे असह्य दुखू लागले. आज हात दुखतो तर उद्या पाय, परवा मान मग मनगट, बोट असं सर्व काही आळीपाळीने दुखू लागलं. एक्सरे काढावेत तर काहीही नाही. जे. जे. मध्ये डॉ. सचिन जाधव, डॉ. चंदनवाले यांच्याकडे सतत जात होते. डॉ. सचिनला शंका आली. मग आम्ही आरए टेस्ट केली. पहिली टेस्ट पॉझिटीव्ह आणि दुसरी निगेटिव्ह. परत केली. ती मात्र वेगळ्या पद्धतीने केली. त्यात आरए दिसून आला. तिथल्याच एका डॉक्टरने सल्ला दिला, ‘सरळ आयुर्वेदिक ट्रीटमेंट कर.’
डॉ. वहीद- पोद्दार रुग्णालयाचे डीन - यांनी मला आठ दिवस केवळ मध आणि गरम पाणी पिण्याचा (मधुचर्या) सल्ला दिला. रोज पाव किलो मध संपवायचा आणि दुसरं काहीही घ्यायचं नाही. ते केलं. मग त्यांनी आयुर्वेदिक औषधं सुरू केली. काही दिवसांनी पोद्दारमध्येच डॉ. सकपाळ यांच्याकडे माझे पंचकर्मसाठी उपचार सुरू झाले. त्यांनी मला पथ्य सांगितलं आणि तीन टप्प्यांत उपचार सुरू केले. त्यात वजन कमी करणं, आजारावर औषधं आणि मग प्रतिकारशक्ती वाढवणं. पुढील पथ्य होतं-
1. टोमॅटो, दही, दूध, केळी, चिंच, इडली, डोसा, पाणीपुरी, बिस्किट, ब्रेड, पिझ्झा, मटण, अंडी यांना बंदी- अगदी कमी प्रमाणात चिकन आणि मासे चालतील.
2. दोन जेवणांच्या मध्ये काहीही खायचं नाही. खायचंच असल्यास चुरमुरे, पॉपकॉर्न, राजगिरा लाडू असं खावं. जेवताना डाळीचं वरण भरपूर प्यायचं, पोटभर जेवायचं.
3. फक्त आणि फक्त गरम पाणी प्यायचं. आंघोळीलाही गरम पाणीच.
4. दिवसा झोपायचं नाही
5. कुठल्याही परिस्थितीत ऑफिस, नित्याचं काम चुकवायचं नाही. कितीही त्रास झाला तरी उठून जायचंच.
6. हाता-पायाचे, मानेचे व्यायाम. पण आजाराचा जोर कमी होईर्पयत इतर व्यायाम बंद. प्राणायाम करावा.
7. समुद्रावर मिळणार्या वाळूने सर्व सांधे दिवसातून दोन तीनदा शेकायचे- कोरडा शेक. ओला शेक (गरम पाण्याने-तेलाने) चालणार नाही उलट दुखणं वाढवेल.
8. तेलाने किंवा बामने चोळायचं नाही. फक्चत डॉक्टरांनी दिलेलं तेल सांध्यांमध्ये हलक्या हाताने जिरवायचं.
9. घरी असताना सुंठीचा काढा प्यायचा. सुंठीचा, आल्याचा आणि लसणीचा जास्तीत जास्त वापर.
10. दिवसातून तीन-चार चमचे एरंडेल तेल प्यावंच लागेल. (ते नुसतं जात नसल्यास चहासोबत किंवा पोळीला लावून खाल्लेलं चालेल.)
11. ट्रेन, बसने प्रवास बंद. बाईकवर बसायचं नाही. टॅक्सीने जाऊ शकता. (तसंही दुखणं इतकं असतं की तुम्हाला ट्रेनचे धक्के आणि बसचे जर्क सोसवतच नाहीत.)
12. पंखा, एसी या गोष्टी वर्ज्य एसीत बसायची वेळ आलीच तर स्वेटर घालावा. थंडीत सांधे लोकरीने, सॉक्सने झाकून ठेवावेत. सुंठ-गूळ, आलं गूळ एकत्र करून रोज सकाळ-संध्याकाळी खावं.
उपचारांमध्ये मला काही आयुर्वेदिक औषधं दिली. त्यात सिंहनाद गुग्गुळ, महा वातविध्वंस, निरनिराळ्या प्रकारचे जेवणाआधी आणि नंतर घ्यायचे काढे असं सर्व काही होतं. ते सर्व इथे देणं शक्य नाही. पण वरचे उपाय स्टॅण्डर्ड आहेत. ते कुणीही करू शकतं.
पंचकर्मासाठी त्यांनी मला वैतरण बस्ती आणि लेखन बस्ती दिली होती. वैतरण बस्तीमध्ये चिंचेच्या कोळाचा काढा आणि लेखन बस्तीमध्ये एक दिवस तेलाचा बस्ती आणि एक दिवस त्रिफळाच्या काढ्याचा बस्ती असे दोन प्रकार होते. हे दोन्ही बस्ती मी आठ दिवसांच्या अंतराने प्रत्येकी 16 दिवस केले. त्यासाठी मी रोज सकाळी आठ वाजता पोद्दार रुग्णालयात जात होते. 12 वाजेपर्यंत घरी यायचे. जेवायचे आणि ऑफिसला जायचे. संध्याकाळी घरी आलं की थोडा आराम आणि मग जेवून झोपणं, असा माझा दिनक्रम होता. डॉक्टरांचं बारीक लक्ष होतं. रात्रीतून असह्य कळा यायच्या पायात. मी खूप रडायचे. एक-दोनदा डॉक्टरला म्हटलंही- एकतर मला ताबडतोब यातून बाहेर काढ नाहीतर विष दे. डॉक्टर योगेशने (सकपाळांचा उजवा हात) खूप मानसिक आधार दिला. औषधांमुळे केस प्रचंड झडले. पण टक्कल पडलं नाही, हे नशीब. केवळ छोट्या मुलीकडे बघून मला धीर यायचा. तिला जवळ घेता येत नाही, उचलण्याची ताकद नाही या मुळे अपराधी वाटायचं. एक तांब्याही उचलता यायचा नाही. चालायला, जिने उतरायला, चढायला खूप वेळ लागायचा.
याच दरम्यान डॉ. उदय कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली अॅक्युपंक्चर करून घेतलं. माझ्या पायाची टाच प्रचंड दुखत होती. असह्य कळ यायची. पाय टेकवत नव्हता. डॉ. योगेशने एकदा सहकार्यांच्या मदतीने माझ्या टाचेला चांदीचा चटका दिला. (याला आयुर्वेदात दाहकर्म असं म्हणतात.) अवघा एक मायक्रोसेकंद असेल पण त्याचा मानसिक धक्का इतका होता की मी चक्कर येऊन पडले. पण आजवर माझी टाच कधीही दुखली नाही. (त्याचा डाग अजूनही पायावर आहे.)
डिसेंबर 2008 मध्ये महिनाभर बस्ती घेतल्यावर मी सप्टेंबर 2009 मध्ये पुन्हा 16 दिवस बस्ती घेतला. वजन 12 किलो कमी झालं होतं. (आता ते पुन्हा वाढलंय. आजार बरा झाल्याचं लक्षण म्हणून.) औषधं सुरूच होती. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने मी सतत कुठल्यातरी इन्फेक्शनला बळी पडायचे. माझा आरए ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये परावर्तित झाला. डॉक्टर त्याची लक्षणं विचारतच होते. ते लक्षात आल्याबरोबर त्यावर उपचार झाले. त्यातच लिम्फन्जायटिस सुरू झाला. यात दर 15 दिवसांनी मला रात्रीचा ताप यायचा आणि माझ्या उजव्या हाताची लसिका (लिम्फ नोड) सुजून असह्य वेदना व्हायच्या. ती सुजत गेलेली दिसायची. फायलेरिया झाला होता. त्यासाठी ट्रीटमेंट घेतली.
माझ्या आजाराचं मूळ होतं टेन्शनमध्ये. ते कमी करण्यासाठी आम्ही शिरोधारा केली. त्याचाही फायदा झाला. शेवटच्या टप्प्यात मात्र प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी हिंदुजा रुग्णालयात डॉ. बालकृष्णन यांच्याकडे गेले. त्यांनी मला व्हिटॅमिन डी-3, आयर्न, कॅल्शियम सुरू केलं. त्यामुळे सुमारे दीडेक महिन्यात माझं दुखणं पूर्णपणे थांबलं. लक्षात आल्यानंतर जवळपास दोन र्वष मी न थकता अव्याहतपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहिले, उपचार केले, कडक पथ्य पाळलं आणि माझा आर ए फॅक्टर निगेटिव्ह आला. दर तीन महिन्यांनी या सर्व तपासण्या आम्ही करायचो. (आरए हे निदान असलं तरी कित्येकदा हा आजार त्यात दिसतोच असं नाही. डॉक्टर क्लिनिकली तपासून सांगतात- हे डॉ. बालकृष्णन यांचं मत. ते आर्थरायटिसच्या क्षेत्रात सर्वोत्तम मानले गेलेल्या डॉक्टरांपैकी एक आहेत. मुंबईत केवळ हिंदुजा रुग्णालयात आरएचं वेगळं डिपार्टमेंट आहे.) आता डॉक्टरांनी सर्व औषधं बंद केली आहेत. केवळ गरम पाणी आणि पथ्यच पाळायला सांगितलं आहे. पथ्य आता खूप पाळलं जातं असं नाही. पण स्ट्रेस येऊ द्यायचा नाही आणि पचनक्षमता कमी होऊ द्यायची नाही, या दोन गोष्टी पाळल्या की झालं!
बापरे....ठमे, तुझ्या
बापरे....ठमे, तुझ्या सहनशक्तीला आणि चिकाटीला सलाम!!!
तुझे लेखन ही अभ्यासपूर्ण आहे. एवढी औषधे, आयुर्वेदीक काय , बस्ती काय, चांदीचा चटका काय्...कल्पनाच करवत नाही!!
मी तुझ्या जागी असते तर अंथरुणच धरलं असतं ...कायमचं!!
यु आर ग्रेट!!!
तुम्ही तरुणपणीच जे सहन केलत
तुम्ही तरुणपणीच जे सहन केलत ते महानच.. काम वगैरे करत असताना सर्दी/ताप आला तरी स्वतःचा राग येतो, इथे तर तुम्ही केव्हडे सहन केलेत.. तसेच त्याबरोबर पथ्य वगैरे ही ग्रेटच..
केवळ अशक्य. तुम्च्या
केवळ अशक्य. तुम्च्या इच्छाशक्तीला दंडवत. तुम्ही हे लिखाण प्रकाशित केल्याने अनेकांना फायदा होणार आहे. तब्येत सांभाळा.
माहितीबद्दल
माहितीबद्दल धन्यवाद.
सर्वसाधारणपणे प्रसूतीनंतर नीट काळजी न घेतल्यास, सतत जास्त टेन्शन घेतल्यास हा आजार होतो. अनेक स्त्रियांमध्ये वर्षानुवर्षं एकच हात दुखतोय >>>
माझ्या एका मैत्रीणीला हा त्रास होतोय सध्या. सुरुवातीला नुसता डावा हात सुजायचा आणि दुखायचा. आता पूर्ण डावी बाजू दुखते.सांध्यातून सूज येते. डावा हात हलवणं मुश्कील होतं. सतत पेनकिलर्स घेत असते. गोळी घेतली नाही की असह्य वेदना होतात. पाच दिवसांपूर्वी वेदना सहन न होऊन चक्कर येऊन पडली. बीपी कमी झालं, ताप भरला. आता उपचार चालू आहेत. तुमच्या लेखाबद्दल सांगेन तिला. (ती तमिळी आहे, नाहीतर वाचायलाच दिला असता.) तिचे मनोबल वाढायला खूप उपयोग होईल.
तिचा त्रास बघतेय सध्या. त्यामुळे तुम्हांला किती आणि कायकाय सहन करावं लागलं असेल याची कल्पना आहे. तिच्या आजाराचे अद्याप निदान कोणाही डॉक्टरने केलेले नाहीये. एकानेच फक्त रुमाटाइड आर्थरायटिसची शक्यता वर्तवली होती आणि काही टेस्टस् करायला सांगितल्या आहेत, पण सध्या ती त्या करवून घेण्याच्याही अवस्थेत नाहीये. त्यांनीही प्रसूतीनंतर नीट काळजी न घेतल्यास, सतत जास्त टेन्शन घेतल्यास हा आजार होतो, असेच सांगितले आहे. लेखात उल्लेख झालेल्या डॉक्टरांविषयी तिला सांगून पाहेन. गरज लागली तर तुम्ही पूर्ण पत्ता द्याल का?
आणि हो, तुमच्या जिद्दीला सलाम.
प्राची नक्की सांग... ती
प्राची नक्की सांग... ती मुंबईत असेल तर पोद्दार रुग्णालयात महिन्यातून एकदा आरएच्या रूग्णांसाठी मीटिंग होते... त्याला आर्थरायटिस रिहॅबिलिटेटर्स असं म्हणतात. तिथे ती जाऊ शकते... आणि हो आयुर्वेदिक औषधं घेताना डॉक्टरचं रेप्युटेशन तपासावं, प्रिस्क्रिप्शन्स घावीत. कारण कधी कधी ते तुमच्या औषधात स्टेरॉइडस मिसळतात आणि त्याने नुकसान होतं. कुठलीही चूर्णं घेऊ नयेत... सरकारी रुग्णालय असेल आसपास तर उत्तम...
प्राची, नक्की देईन पत्ता, नंबर...
ठमादेवी काय बोलायचे ... ईतक
ठमादेवी काय बोलायचे ... ईतक सगळ सहन करायची ताकद आणि पेशन्स बापरे. खरच सलाम ..
प्रसुती नंतर होणारा आजार... म्हणजे नक्की काय कारण असेल त्याचे , म्हणजे प्रसुतीनंतर किंवा आधी कोणत्यातरी औषधाची किंवा विटामिनच्या कमतरतेमुळे होतो का...
माहिती म्हणून विचारते या सर्व उपचाराला होणारा खर्च सांगाल का? अंदाजे म्हणजे औषधे, बस्ती वगैरे..
जुई, अगं पूर्वीच्या काळी
जुई, अगं पूर्वीच्या काळी बायका नाही का शेक्-शेगडी करायला सांगायच्या? मालीश वगैरे सगळंच... त्याचं महत्त्व मला या आजारात कळलं... माझ्या मुलीच्या शरीरात उष्णता खूप होती... मलाही त्रास होता त्यामुळे ते करता आलं नाही... माझा नवरा दुबईला जायचा होता लगेचच म्हणून मला आरामही नाही मिळाला... सतत धावपळ आणि टेन्शन यामुळे मला गिफ्ट म्हणून आला हा आजार...
असो..
बस्तीसाठी पोदारमध्ये दर दिवशी ५० रुपये घेतले जातात. (खासगी डॉक्टरांकडे ते रेट जास्त असतील.) औषधं आणि इतर गोष्टींसाठी महिना हजारेक रुपये खर्च येतो... हे मी सरकारी हॉस्पिटलचं सांगते आहे... इथे तुम्हाला औषधं बाहेरून लिहून दिली जातात. शिरोधारासाठी दिवसाला २०० रुपये एवढा खर्च आहे. तेल तुम्ही द्यावं लागतं...
माहितीबद्द्ल धन्यवाद...
माहितीबद्द्ल धन्यवाद...
माहितीबद्दल धन्यवाद ठमादेवी.
माहितीबद्दल धन्यवाद ठमादेवी. आणि तुमच्या सहनशक्तीला, चिकाटीला आणि उपचारांवरील श्रद्धेला सलाम.
गेल्या वर्षीच्या एका दिवाळी अंकात डॉ.मनोज भाटवडेकर या बालमानसोपचारतज्ञांचा, त्यांनी त्यांना झालेल्या RA वर कशी मात केली यावर असाच एक खूप सुंदर, माहितीपूर्ण लेख आला होता.
आजार बरा होऊ शकतो हे वाचून एखाद्या रुग्णाला किती मानसिक बळ मिळू शकतं! धन्यवाद पुन्हा एकदा.
आजार बरा होऊ शकतो हे वाचून
आजार बरा होऊ शकतो हे वाचून एखाद्या रुग्णाला किती मानसिक बळ मिळू शकतं! धन्यवाद पुन्हा एकदा >>> अगदी अगदी
ठमादेवी तुम्हाला विपु मध्ये लिहीलं आहे.. उत्तराची वाट पहात आहे.
ठमादेवी, किती सहन केलंत
ठमादेवी, किती सहन केलंत तुम्ही, खरंच. इतक्या चिकाटीने पथ्यपाणी सांभाळणे सोपं नाहीये. लेखही माहितीपूर्ण. धन्यवाद आणि शुभेच्छा.
बापरे, हे वाचून जरा भितीच
बापरे, हे वाचून जरा भितीच वाटायला लागली. एकतर आर्थरायटीसबद्दल काहीही माहिती नव्हती.
तुम्ही चिकाटीने हार न मानता सोसलंत, डॉक्टरांवर, स्वतःवर विश्वास ठेवलात म्हणून सहीसलामत बाहेर पडलात.
तुमच्याच दुसर्या बीबीवर मी लिहिलं होतं की माझ्या जवळच्या मैत्रिणीला हल्लीच आर्थरायटीसचा खूप त्रास व्हायला लागलाय. ती स्वतः डॉ. आहे. आणि ३ वर्षाची जुळी मुलं आहेत तिला. त्यांच्याही मागे नाही म्हटलं तरी नाचावं लागतं. तिला मराठी वाचता येत नाही बहुधा. पण तिला हे वाचायला देईन ट्रान्सलेट करुन. फायदा झाला तर उत्तमच.
छान माहितीपुर्ण लिहीलं
छान माहितीपुर्ण लिहीलं आहे.
तुमच्या सहनशक्तीला, जिद्दीला सलाम आणि शुभेच्छा!!
ह्या आजारपणावर ज्या हिंमतीने
ह्या आजारपणावर ज्या हिंमतीने मात केलीत, चिकाटीने पथ्यपाणी सांभाळलंत त्याबद्दल तर कौतुक वाटलंच पण इथे लिहून RA बद्दलची जागरुकता वाढवायचा तुमचा हेतू त्याहून जास्त कौतुकास्पद वाटला.
मन:पूर्वक शुभेच्छा
बापरे . किती ते पथ्य अन किती
बापरे . किती ते पथ्य अन किती किचकट ट्रीटमेंट !! तुमच्या हिमतीची दाद द्यायला हवी !
ठमा, खरंच तुझ्या हिंमतीला
ठमा, खरंच तुझ्या हिंमतीला सलाम
तुमच्या इच्छाशक्तीला सलाम!
तुमच्या इच्छाशक्तीला सलाम! मन:पूर्वक शुभेच्छा!!
अगोला अनुमोदन. धन्यवाद
अगोला अनुमोदन.
धन्यवाद ठमादेवी. तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुमच खरच कौतुक आहे. तुमच्या
तुमच खरच कौतुक आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा.
एक प्रश्न - हा आजार जेनेटीक आहे का? मला अलिकडेच एक मैत्रिण म्हणालेली आठवतय की हा जेनेटीक आहे. पण ती किती सिरियसली म्हणाली ते माहीत नाही.
तुम्ही चिकाटीने या आजारावर
तुम्ही चिकाटीने या आजारावर मात केलीत. त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.
हे असं काही वाचलं की नवीन (आणि उपयुक्त) माहिती मिळाल्याचं समाधान मानायचं की 'अज्ञानात सुख असतं' हे जाणवून चिंतीत व्हायचं हेच समजेनासं होतं काहीवेळा...
आभार सगळ्यांना... मी कोणताही
आभार सगळ्यांना... मी कोणताही कौतुकाचा हेतू मनात ठेवून हे लिहिलं नव्हतं. पण हा आजार बरा होऊ शकतो आणि जिद्द ठेवली की काय होऊ शकतं हे सांगायचं होतं. बाकी पोदार रुग्णालयात आम्ही बरं झाल्यावर आर्थरायटिस रिहॅबिलेटर्स नावाचा ग्रुप सुरू केलाय. रुग्णांचं मनोबल वाढवणं हाच हेतू आहे या ग्रुपचा... सावली हा जेनेटिक असू शकतो. कारण तो तुमच्या जीन्समध्ये असतो...
तुमच्या अनुभवाचा अनेकांना
तुमच्या अनुभवाचा अनेकांना उपयोग होईल्.व हा विकार बरा होऊ शकतो,ह्याचा मानसिक आधार मिळेल.
तुम्हाला धन्यवाद , व पुढ्च्या निरोगी आयुष्यासाठी शुभकामना.
ठमे तुला सलाम. जिद्द, चिकाटी
ठमे तुला सलाम. जिद्द, चिकाटी आणि त्या जोडीला तुझ्यासमोर सतत असलेलं तुझं पिल्लु यामुळे तू या भयानक आजारातून तरून गेलीस. आता काय पथ्य वगैरे करावं लागतं का?
तूझ्याकडे बघून अजिबात वाटत
तूझ्याकडे बघून अजिबात वाटत नाही, कि तू कधी या सर्वातून गेली असशील. सलाम !!
ठमादेवी, तुम्हाला कोणत्या
ठमादेवी, तुम्हाला कोणत्या दिव्यातून जावे लागले, हे मी समजू शकतो . मलाही पॉलीआर्टिक्युलर आर्थ्रायटीसचा फटका (की तडाखा)बसलाय. मी उपचार अॅलोपथीचे घेतले होते.
वर तुम्ही लिहिलेय की माझा "आरए ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये परावर्तित झाला"
म्हणजे आता ऑआही पूर्ण बरा झाला का? होतो का की फक्त आटोक्यात ठेवता येतो?
कोणत्याही प्रकारच्या आर्थ्रायटीस मध्ये सांध्यांची हालचाल करताना वापरले जाणारे स्नायू बळकट केल्याने खूप फरक पडतो. त्यासाठी अगदी जिम मध्ये जायची अजिबात गरज नाही. घरच्या घरी साधे व्यायाम करता येतात. मी गेली दोन वर्षे करतोय आणि फरक अनुभवतोय.
खुप कौतुक वाटत तुझे ठमे!
खुप कौतुक वाटत तुझे ठमे! तुझ्या जिद्दिला खरच सलाम!
तुमचे कौतुक आणि पुढील निरोगी
तुमचे कौतुक आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!
ठमादेवी, तुमचं खरच कौतुक आहे.
ठमादेवी, तुमचं खरच कौतुक आहे. किती सहन केलं तुम्ही. तुम्हाल सलाम आणि शुभेच्छा !!!
सलाम माझाही
सलाम माझाही
भरत, तो कळला लगेच म्हणून
भरत, तो कळला लगेच म्हणून उपचार झाले. नीट प्लॅनिंग करून उपचार केले म्हणून फायदा झाला.. मी अजून जिम सुरू केलं नाहीये पण पॉवरयोगा करते.
Pages