विंदांच्या त्या पाच कविता!!!

Submitted by ह.बा. on 19 January, 2011 - 02:50

मला सहज सापडलेले अर्थ देतो आहे. कुणालाही चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न नाही. बेफिकीर यांच्याविषयी आदर आहेच पण त्यानी मांडलेल्या एका लेखात या कविता अर्थहीन आहेत असे म्हटले होते. मला त्या तश्या वाटत नाहीत म्हणून हा उद्योग केला आहे. हा अर्थ अर्थात माझ्या मतीप्रमाणे उमगला आहे. महात्म्यानी त्यांचे अर्थ द्यावेतच.

१.
अस्तित्वकोनाचा
विकास होऊन
एक दिवस
येतील, येतील
अस्तित्वाच्या
दोन्ही भुजा
एका रेषेत;
जाणीव, जगत
होतील एक;
राहील उभा
काळाचा द्विभाजक
आणि बनेल
विश्व निर्ब्रह्म
सरळ कोनाच्या
साक्षात्कारांत!

अस्तित्वकोनाचा
विकास साधताना
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे.

पाहिजेत शब्द
करडे, काळे
रसाळ, रटाळ
रेखीव, रांगडे
चपळ, लंगडे
प्रगाढ, प्रशांत
पाहिजेत शब्द
जहाल, ज्वलंत

पाहिजेत शब्द
ओंगळ, ओवळे
सात्विक, सोवळे
चेंगट, हट्टी
तर्कटी, मर्कटी
सुखरूप, स्वादिष्ट
पाहिजेत शब्द
गरोदर, गर्विष्ठ

पाहिजेत शब्द
बकुळीच्या कुशीतले
दर्याच्या मिशीतले
पाहिजेत शब्दः
पहाटेच्या ओटीतले
थडग्याच्या मिठीतले

पाहिजेत शब्द
मुसमुसणारे
धुसफुसणारे
कुजबुजणारे
पाहिजेत शब्द:
कडकडणारे!

पाहिजेत शब्दः
विश्वाला आळवणारे
अणूला उचलणारे
रक्तांत मिसळणारे
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे

कारण शब्दांनिच
अमूर्त आशयाचे
मूर्त ध्वनीशी
लागते मंगल
आणि वाढतात
विचार - विकार
वर्गाच्या क्रमाने;
होतात जाणिवा
जागृत, समृद्ध,

अज्ञान, जुनाट संकल्पनांचा नाश करून विज्ञानाधिष्ठीत जगताच्या निर्मितीसाठी अव्याहतपणे झटणार्‍या प्रगत मानसिकतेच्या या शोधाच्या भुकेचा अंत काय असावा याचा शोध या कवितेत घेतलेला दिसतो. जे जे घडते आहे ते ते सर्व अस्तित्वात असणार्‍या शक्तिंमुळेच आणि तसे असेल तर मग अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट सापडायलाच हवी हा आपला अट्टाहास आहे. या शोधाच्या संग्रामात मानवानिर्मितीपासून जोपासलेल्या जाणीवा आणि स्पष्टपणे अस्तित्व जाणवणारे जगत एकमेका समोर येतील आणि मग अमुर्त ते सर्व खोटे ठरेल हे विश्व निर्ब्रम्ह होऊन जाईल. अस्तित्व सिध्द करेल तो तरेल. हे सर्व का मान्य करायचं? कारण फक्त शब्द! शब्दानी गोष्टी खर्‍या होतात आणि खोट्याही होतात. शब्दाची निर्मीती मानवाची आहे ते मानवाचे दास आहेत. नवनव्या कल्पनांना जन्माला घालून विश्वात योग्य व अयोग्याचे अस्तित्व ठसवण्याचे काम शब्द करतात. बदलाचे कारस्थान रचणार्‍या शब्दानी सगुणाचे/मुर्ताचे डोहाळे लागल्याचं स्पष्ट करून अमुर्त शक्ती नाकारल्या. न उमजणार्‍या सर्व गोष्टी अस्तित्वातच नाहीत ही त्यानी ठोकलेली आरोळी आहे. हा घोष बिंबवण्याचे कार्य जोतो आपापल्या परिने करतो आहे. लागतील, पेलतील तसले शब्द वापरतो आहे. आणि यात ते यशस्वीही होतील कारण
कारण शब्दांनिच
अमूर्त आशयाचे
मूर्त ध्वनीशी
लागते मंगल
आणि वाढतात
विचार - विकार

अमुर्ताला, अज्ञाताला मोठ व्हायचं असेल तर शब्दाना त्याचं गुणगाण करता यायला हवं अन्यथा तो अस्तित्वहीन आहे. आणि जर तो शब्दाना सपडला तर मग विचार वाढतात विकार वाढतात... खरं तर आजवर विकारच वाढत आहेत. आणि शेवटी
वर्गाच्या क्रमाने;
होतात जाणिवा
जागृत, समृद्ध,

जाणिवा "जागृत" आणि समृध्द होतील. विश्वाला निर्ब्रम्ह करणार्‍या. सगुणाला स्विकारणार्‍या. अमुर्ताला नाकारून विकारांचा उदोउदो करणार्‍या.

ओशट रात्र,
वषट प्राण
तिन्ही त्रिकाळ
उघडे कान

उघड्या कानात
उजाड वारा
दोन्ही डोळ्यात
दोन गारा

या गारा
वेचील कोण?
....आता वाजले
फक्त दोन...

म्हातारीची
लांब बोटे
काय झडली?
गेली कोठे?

पावसा पावसा
पड पड
दार लावून
रड रड

एखाद्या उदास एकाकी रात्री ही कविता मला वाचायला मिळाली असती तर मी नक्कीच रडलो असतो. या कवितेचा अर्थ न सांगताही लागायला हवा. अगदी प्रत्येकाला. हतचं सगळं गमावून माणूस जेव्हा एकाकी होतो निराधार होतो तेव्हा तो असाच होत असेल... प्रियकराच्या विरहाने व्याकूळ झालेली प्रेमिका तिन्ही त्रीकाळ कान सताड उघडे ठेऊन त्याच्या पावलांची चाहूल शोधत असेल पण उनाड वार्‍याशिवाय तिला काहीच सापडत नसेल. खिन्नतेने निर्विकार झालेले डोळे गारांपेक्षा वेगळे नसतात आणि कौतुकान त्या गारा वेचणाराही जवळ नसल्याने त्यांची किंमतही शुन्य ठरते. आधार वाटणार्‍या सार्‍याच गोष्टी अचानक नाहिश्या झाल्या... अगदी लहान सहान आठवणींसहीत. अशा आभाळाएवढ्या दुखःत सहभागी व्हायला आभाळाला आपल्यासोबत रडायला सांगणारी नायिका उमजायला फार मोठ्या पंडीताची आवश्यकता आहे असे वाटत नाही.

(हीच कविता वेश्येच्या मनोगतासरखीही वाटली)


स्तनाकार आकाश ! पर्वत स्तनाकार
स्तनाकार उसवत्या ढगांचा भास
स्तनाकार फळे ! स्तनाकार बुबुळे
प्रस्फुटत्या कळ्या स्तनाकार
स्तनाकार सन्तु पालुचा घुमट
उमटणारा उद्गार स्तनाकार
गुह्ये स्तनाकार ! गुहा स्तनाकार
गुहेतील तपस्वी अंधार स्तनाकार
समानी हृदये स्तनाकार
चिंता स्तनाकार! चिता स्तनाकार
स्तनाकार अग्निशिखा! स्तनाकार जगत
स्तनाकार ब्रह्म!

ज्या स्तनाच्या माध्यमातून मिळणार्‍या दुधावर जगाला जगण्याची शक्ती मिळते त्या स्तनांचं महत्व फक्त ठराविक बाबीसाठी नाही तर त्याला पावित्र्याचाही महिमा आहे. कविता वाचताना मला तर लहान बाळही डोळ्यासमोर आले. ज्याच्या नजरेला या जगताचा कोणताच पैलू पडला नाही. अशा बाळासाठी विश्वाचा किंवा विश्वातल्या कोणत्याही गोष्टीचा आकार स्तनासारखाच असेल ना? ब्रह्म आणि स्तन दोहोंचे पावित्र्य एकाच पातळीवरचे आहे. हा कवितेतला अर्थ खरोखरच उत्तूंग आहे.

(उरलेल्या दोन कवितांचा अर्थही तासाभरात काम झाले की देतो आहे.)


भुते झाडांची
पितात चांदणे
माणसांच्या कवटीतून
घासतात नाके
परस्परांच्या प्राक्तनावर
आणि धावतात
फक्त धावण्यासाठीच

भुते पशूंची
करतात प्रयत्न
दोन पायांवर
उभे राहण्यासाठी

भुते पक्ष्यांची
काढतात तोका
झिजलेल्या चोचांना
जातात उडून
एकाच पंखाने
दुसर्‍या पंखाच्या
न संपणार्‍या शोधात

भुते माणसांची
असतात माणसांसारखीच
घेतात विकत
नरकाचे गाईड

असमाधानी वृत्ती मांडतानाही, माणसाचा पुर्णत्वाचा शोध कसा चुकिच्या दिशेने चालला आहे हे या कवितेत मांडले आहे. झाडांची भुते धावण्याचा प्रयत्न करतात, घायाळ पंख तुटलेल्या पक्षांची भुते दुसर्‍या पंखाच्या शोधात आहेत, जनावरे दोन पायवर उभा राहण्याच्या यत्नात आहेत. सगळे पुर्णत्वाची संकल्पना उराशी बाळगून प्रयत्न करताहेत पण माणसाची भुते मात्र माणसासारखीच आहेत. ती नरकाचं गाईड विकत घेतात. जगताना आणि मेल्यावरही तीच धडपड...
( उर्वरीत नंतर)
५.
सोपेच असतात तुझे केस
सोपीच असते लकेर डोळ्यांची
सोप्याच असतात तुझ्या गाठी
कठीण असते तर्‍हा चोळ्यांची

सोपेच असते मानेचे वळण
सोपीच उतरण निमुळत्या पाठीची
सोपेच असते तुझे पाऊल
कठिण असते वाट दाटीची

सोपाच असतो राग, अनुराग
सोपीच असते तुझी कळ
सोप्या सोपस मांड्यामध्ये
दहा हत्तींचे असते बळ..

६.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सुदर मांडणी केली ह्.बा.
खरे तर कविला आपल्या कवितेतुन काय व्यक्त करायचे आहे तो कविच जाणे.
हे विचार ही अगदी तंतोतंत जुळायला हरकत नाही

नाही तर उगाच कोणाला स्वतःचे ह्सु करुन घ्यायचे असेल तर Lol

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव !
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड !

हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे !
रडणा-या रडशील किती ?
झुरणा-या झुरशील किती ?
पिचणा-या पिचशील किती ?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो !

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत !
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य !
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद !

बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी ?
काय तुझे हे निःश्वास
मरणा-याला देतील श्वास ?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे ?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ

ऐका टापा! ऐका आवाज !
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार !
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड

कवी - विंदा करंदीकर

ह.बा.. छान रे.. नि धन्यवाद ! खास करुन दोन नंबरची कविता.. तुझ्या मतीप्रमाणे तुझ्या शब्दात मांडलेला अर्थ.. मला तरी आवडले !!

सर्वांचा आभारी आहे!!!
आज सकाळला बातमी आहे.
विंदांच्या कवितांचा कार्यक्रम होणार आहे. रविवार, सायं. सहा वाजता, फडके साभागृह.

मस्त मस्त!

मला ती ओशट रात्र वषट प्राण कविता एका वृद्ध एकाकी स्त्रीचं मनोगत वाटून गेली.

म्हातार्‍या माणसाला झोप खूप कमी असते, त्यामुळे तो दोन वाजल्याचा संदर्भ वाटला.
या गारा वेचील कोण? म्हणजे म्हातार्‍या माणसाशी बोलायला कुणाला वेळ आहे?
म्हातारीची
लांब बोटे
काय झडली?
गेली कोठे?

यात त्या म्हातारीची मुलं म्हणजे लांब बोटे असावीत का?
पावसा पावसा
पड पड
दार लावून
रड रड

या ओळीतला पाऊस म्हणजे वय वाढल्याचंच अजून एक चिन्ह असावं असं वाटलं.
जसं आपण म्हणतो, मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले आहेत.
आणि दार लावून रड रड मधे, आपलं दु:ख स्वतःपाशीच ठेवावं लागतंय त्या म्हातारीला...असं सुचवलंय असं वाटतं.

(तळटीपः मी महात्मा नाही, पण उमगलेला अर्थ दिला. पटला तर आनंद आहे, नाही पटला तर दु:ख नाही.
मला कविता वाचून, जेवढी समजली त्यातून आनंदही मिळाला आणि म्हातार्‍या माणसांच्या एकटेपणाची थोडी तरी जाणीव झाली. कवितेचं प्रयोजन ते असेल वा नसेल हा वेगळा मुद्दा, पण कविता सफळ आहे हे नक्की.)

हबा, तळमळीला सलाम...
अर्थ बरोबर्-चूक, श्रेष्ठ-कनिष्ठ असं काही नसतं हो...
"मला सहज सापडलेले अर्थ देतो आहे." - हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे...
शुभेच्छा.. Happy

हबा, खुप खुप धन्यवाद !
खुप छान लिहिलत.... गेले काही दिवस सुन्न वाटत होतं...
आता छान आकाश मोकळं झाल्या सारखं वाटलं Happy
मनापासून धन्यवाद !

माझ्या मते प्रत्येक कलाकाराच्या / लेखक कवी यांचा कला प्रदर्शनाचा एक ट्रेंड असतो. सुरवातीला ती कला सर्वांनाच आवडते अस नाही. त्यानंतर त्या कलाकाराची कला आवडणारे वाढतात. याच काळात कलाकाराचे मास्टर पीस तयार होतात.
जेव्हा कलाकारातली नवनिर्मीतीची क्षमता कमी होते तेव्हा त्याचे चाहते त्याच्या पासुन लांब जातात. गेल्या वर्षात आपण काहीच निर्माण केल नाही याची बोच लागुन कलाकार काही ना काही निर्माण करत रहातो. जे काही वेळा हाच का तो ज्याची प्रतिभा उत्तुंग आहे असे प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतात.

" मधु मागशी माझ्या " ही कविता अशी वास्तवता दाखवते असे माझे मत आहे.

याचा अर्थ त्यालेखकाचे सर्वच लिखाण अथवा कविता किंवा कोणत्याही कलाकाराचे सर्वच प्रदर्शन टाकाउ होते हे म्हणणे योग्य नाही.

फार तर काही कलाकृतींना दुर्बोध म्हणणे योग्य ठरेल.

कुणी काय म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. ते वाचुन इतरांनी त्यामुळे खट्टु होण्याचे कारण नाही.

"पिंपात मेले ओल्या उंदिर" ही कविता अश्लिल आहे अशी टीका बा.सी. मर्ढेकरांना त्याच्या हयातीत सहन करावी लागली होती.

शेवटी विंदांच्याच शब्दांना जर बदलुन वाचले तर मानसीक त्रास कमी होईल.

लिहाणार्‍याने लिहीत जावे
वाचणार्‍याने नेमके तेव्हडे घ्यावे.
वाचता वाचता एक दिवस
या गोष्टीचे गमक समजावे

याचा अर्थ त्यालेखकाचे सर्वच लिखाण अथवा कविता किंवा कोणत्याही कलाकाराचे सर्वच प्रदर्शन टाकाउ होते हे म्हणणे योग्य नाही.

फार तर काही कलाकृतींना दुर्बोध म्हणणे योग्य ठरेल.>>>>>>

प्रचंड अनुमोदन Happy

हबा, मनापासून धन्यवाद.
नितीनचंद्र, पोस्ट आवडली आणि पटली. Happy