थोडक्यात पात्रपरिचय: नाव आणि कंसात माबो आयडी
यो : योगेश कानडे (यो रॉक्स)
ज्यो: गिरीश जोशी
अवि: अविनाश मोहिते (अवि_लहु)
रोमा किंवा रो: रोहित निकम (रोहित एक मावळा)
मी: नचिकेत जोशी (आनंदयात्री)
२८ डिसेंबर: मांगी-तुंगी आणि निरोप
पायवाटा आणि पायऱ्या या शब्दांची सुरूवात सेम आणि शेवट वेगळा असला तरी दोन्ही चढून संपल्यावर होणारा आनंद मात्र अगदी सेम असतो. आणि पायऱ्या जर अडीच हजार वगैरे असतील, तर मग तो चढल्यावर आनंद सुळक्यावरून थेट आभाळात पोचतो. आणि या अडीच हजार पायऱ्या जर पाऊण तासात आणि तेही एकदाही न थांबता पार झाल्या तर मग काय सांगावे? सुदैवाने या तिन्ही घटना एकाच दिवशी एकाच ठिकाणी माझ्या बाबतीत घडल्या आणि पाऊणतासात अडीच हजार पायऱ्या चढल्याच्या आनंदापेक्षाही गुडघा एकदाही दुखला नाही अथवा दुखणार असं वाटलं नाही हा आनंद कितीतरी जास्त होता!
चार वाजता गजर झाला आणि योला पाच वाजता तयार राहण्याचे वचन दिल्यामुळे बरोबर चार वाजताच उठलो. बरोब्बर पाच वाजता सगळे तयार झालो. खोलीमध्ये चक्क लाईट मिळाल्यामुळे सगळ्यांच्या बॅटऱ्या चार्ज झाल्या होत्या. कॅमेरा, पाण्याच्या बाटल्या आणि थोडेसे खायला यासाठी अविची एकच सॅक घेतली. भिलवडीच्या जैन मंदिरांच्या आवारातूनच पायथ्यापर्यंत जीप असतात. अनेक जैन कुटुंबे अत्यंत भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात. आदल्या दिवशी भिलवडीदर्शन आणि दुसर्या दिवशी पहाटे मांगीजी-तुंगीजी दर्शन असा बहुतेकांचा प्रोग्राम असतो. आम्हीही तसेच केले. भिलवडीमधील मंदिरांचे फोटो-
परंतु त्यांपैकी बऱ्याच कुटुंबातील सदस्यसंख्या जीपच्या क्षमतेपलिकडे असल्यामुळे आम्हाला सुरूवातीच्या दोन जीपमध्ये जागा मिळाली नाही. तिसऱ्यावेळी मात्र मुंबईच्या लोकलमध्ये शिरण्याचे कसब वापरून आम्ही जीपमध्ये जागा मिळवली. सुळके अंधारात बुडाले होते. त्याच डोंगरावर आदिनाथांची १०८ फुटी उंच मूर्ती उभारण्याचे काम सुरू आहे. त्या बांधकामाचा लाईट तेवढा सुरू होता.
पायथ्याशी उतरलो तेव्हा साडेपाच वाजले होते. भिलवडीला पोचेपर्यंत पायऱ्यांची संख्या ३५०० आहे असं वाचलं होतं. काल भिलवडीमध्ये एका पुस्तकामध्ये हाच आकडा ४५०० वाचला होता. त्यामुळे नक्की किती पायऱ्या आहेत हे प्रत्यक्षच मोजूया असे अवि आणि रोमाचे मत बनले. (अर्थात वयस्कर आणि गरजूंसाठी डोलीचीही सोय आहे.) हा उत्साह पहिल्या पन्नास पायऱ्यांपर्यंत टिकला. पन्नासाव्या पायरीवर बेंचमार्क दिसल्यावर मग त्यांनी एकदमच हुश्श केले. इथून पुढे नियमीत बेंचमार्क्स असल्यास मोजण्याची आवश्यकता नव्हती. शंभराव्या पायरीच्या आसपास चौघे दम खायला बसले. मी मात्र I think i can go असे म्हणून पुढे निघालो. १००, २००, ५००... १०००... १५००... दम लागला तरी बसण्याची गरज वाटत नव्हती. एकही पायरी स्किप करून चढत नव्हतो. (त्या प्रयत्नात दम जास्त लागतो) आणि गुडघाही All is well सांगत होता. त्यामुळे मग कुठेही न बसता, तोंड बंद ठेऊन, संथ पण एकाच गतीने, अजिबात चुकीचे, अतिरिक्त पाऊल न टाकता चढत राहिलो. आमच्या आधी केवळ २ जीप आल्या असल्यामुळे त्यातून उतरलेले सर्व भाविक हळूहळू मागे पडत गेले. अपवाद फक्त तीन छोटी मुले आणि एका आजीबाईंचा. ती तीन मुले दोन हजाराव्या पायरीलाही अत्यंत उत्साहात होती. फक्त त्यातल्या एकाकडची पिशवी तो दमल्यामुळे तिथपासून अस्मादिकांनी स्वत:कडे घेतली होती. खरं सांगायचं तर मांगी-तुंगीच्या दर्शनाला जात असलो तरी आम्ही यात्रिक अथवा भाविक नव्हतो, फक्त पर्यटक होतो. त्यामुळे दर्शनासाठी शूचिर्भूत वगैरे होण्याच्या इतरांच्या आणि आमच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या. तरीही वर चढणाऱ्या भक्तांना जमेल तेवढी मदत करावी म्हणून तो पिशवीप्रपंच!
अशा प्रकारे एकाग्रतेने, स्वत:च्या क्षमतेवर चढत मांगीच्या गुहांजवळ पोहोचलो तेव्हा सव्वासहा वाजले होते. माझ्या स्वागताला तिथे फक्त रात्रपाळीचा वॉचमन हजर होता. मुले पाठोपाठ चढून आली. आणि अवघ्या पाच दहा मिनिटात त्या आजीबाईही चढून वर आल्या. मी त्यांच्या या कर्तृत्वामुळे खरोखर थक्क झालो. मीही नुकताच त्याच पायऱ्यांनी चढून आलो असल्यामुळे त्या कर्तृत्त्वाचे मोल जाणत होतो. या वयातही ज्या गतीने त्या चढून आल्या होत्या ती खरंच कौतुकास्पद होती. पायवाटांपेक्षा पायऱ्यांनी चढणे सोपे असते असा एक मतप्रवाह मी ऐकला आहे. मला तो व्यक्तिश: पटत नाही. चार मजल्यांच्या जास्तीत जास्त सत्तर पायऱ्या आणि अडीच हजार पायऱ्या यात नक्कीच फरक आहे. एवढ्या पायऱ्या चढायलाही तेवढाच स्टॅमिना, तेवढीच मनाची तयारी लागते. in fact, कधीकधी सरळसोट चढ परवडला पण पायऱ्या नको असे वाटण्याइतका ताण दर पायरीला गुडघ्यांवर येत असतो! आजीबाईंच्या त्या ’करामतीकडे’ बघून श्रद्धा श्रद्धा म्हणतात ती हीच असावी असे क्षणभर वाटून गेले. आणि त्यांच्या या चढाईला सलाम म्हणून मी त्यांना फक्त वाकून नमस्कार केला. त्यांनीही ’बहुत जियो बेटा’ असे तोंडभर आशीर्वाद दिले.
कमालीची थंडी होती आणि वाराही सुटला होता. अंधारात मी एकटाच आसमंत पाहत उभा होतो. त्या चढाईमध्ये कुठेतरी माझा उजवा हॅण्डग्लोव्ह पडला आणि त्यामुळे थंडिपासून बचाव करण्यासाठी एका वेळी एकाच हातात ग्लोव्ह घालावा लागला. पंधरा-वीस मिनिटात उरलेले चार ’गडवाले’सुद्धा दाखल झाले आणि सुव्रतनाथांचे दर्शन पटापट उरकून आम्ही सूर्योदय बघायला धावलो. मांगीच्या सुळक्यावर घालवलेला पुढचा जवळजवळ पाऊणतास आयुष्यभर लक्षात राहणार आहे. मांगीच्या "बालेकिल्ल्याला" प्रदक्षिणा घालता येते. त्या वाटेवर तुंगीच्या दिशेने एक माचीवजा सोंड जाते. त्या ठिकाणी जोरदार वारा होता. त्या सोंडेच्या टोकापर्यंत जाऊन आम्ही उड्या मारल्या, फोटो काढले. त्या उड्या आपण इथे पाहिल्या आहेतच. -
http://www.maayboli.com/node/22277
http://www.maayboli.com/node/12975
सूर्योदयाचे हे काही फोटो-
यो महाराज-
उडीमास्तर यो, मग ज्यो, मग रोमा आणि मग अविने बिनधास्त उड्या मारल्या. शेवटी मलाही उड्या मारायचा आग्रह झाला आणि मी त्या सोंडेच्या टोकावरच्या छोट्या जागेमध्ये उभा राहिलो. वारा सुटला होता. मला अशी (प्रामाणिक) भीती वाटत होती की मी उडी मारल्यावर हवेत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर उडून तर जाणार नाही ना? अखेर योने तू अजिबात उडणार नाहीस अशी खात्री दिल्यावर एक दोन ’पायलट’ उड्या मारून पाहिल्या आणि मग मारली उडी!!
आठ वाजत आले होते. आम्ही तुंगीकडे निघालो. मांगी चढताना दोन हजारव्या पायऱ्यीपाशी तुंगीकडे वाट जाते. तिथपर्यंत उतरून आलो.
तुंगी सुळक्यासाठी तिथून पाचशे पायऱ्या आहेत. अशी एकूण तीनहजार शंभर पायऱ्यांची चढाई आहे. तुंगीपर्यंतची वाट लांब आहे. वाटेत एक वृंदावन लागते. - मागे तुंगी.
मांगी-तुंगीवरील मूर्तींचे हे काही फोटॉ-
तुंगी बघून उतरतांना एका डोलीवाल्याने मला माझ्या उजव्या हाताचा सकाळी पडलेला ग्लोव्ह आणून दिला. मला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला.
तुंगीवरून मांगी-
(हा माझा एक आवडता फोटो)
मांगी-तुंगी ’फाट्यापाशी’ आलो तेव्हा नऊ वाजले होते. माणसांचे पूर्वज सगळीकडे विहरत होते. ज्यो आणि रोमाने त्यांचे (आणि त्यांच्याबरोबर) फोटो काढण्याची हौस पूर्ण करून घेतली. आता ट्रेकमधली शेवटची उतरण - २००० पायऱ्या - नऊ वाजून दहा मिनिटांनी उतरायला सुरूवात केली.
उतरतांना अजून काळजी घ्यावी लागणार होती कारण चढण्यापेक्षा उतरताना गुडघ्यावर जास्त जोर येतो. त्यामुळे योने मला तू तुझ्या स्पीडने उतर, आम्ही तागडाक् तागडाक् करत जातोय असे सांगितले. तागडाक् च्या नादात आणि उत्साहाच्या भरात सुटलेला अवि एका पायरीवर घसरला आणि *** वर आपटला. सुदैवाने किरकोळ दुखापत होती. मग तिथून मी जे सुटलो ते माझ्या पुन्हा एका नियमीत गतीने त्या उरलेल्या दोन हजार पायऱ्या उतरून (अवघ्या) वीस मिनिटात खाली पोचलो. मला ज्ज्ज्ज्जाम आनंद झाला होता. माझा स्वत:वर विश्वासच बसत नव्हता. पण येस्स्स्स!!
एकूणात, मागच्या तोरणा-रायगड ट्रेकपेक्षा या ट्रेकमध्ये मी माझ्या चालण्यात आणि चढ-उतारात सुधारणा केली होती आणि त्याचमुळे ६ वेडेवाकड्या वाटांचे आणि कस पाहणाऱ्या पायऱ्यांचे किल्ले चढून-उतरूनही गुडघा ठणठणीत होता. लगेच सर्व ट्रेकमेट्सने मग मला ’पायऱ्या स्पेशालिस्ट’ अशी पदवी बहाल केली. भिलवडीहून मांगीला येताना जीपच्या टपावर बसलेली माणसे पाहिली होती. त्यामुळे परत जाताना (आतमध्ये जागा असूनही) आम्ही टपावरच बसण्याचे ठरवले. जीपवाल्याला सांगून (विचारून नव्हे ;)) टपावर चढलो देखील.
मला मागच्या वर्षी तोरणा-रायगड ट्रेकमध्ये रायगडवाडीपासून महाडपर्यंत वाळूच्या डंपरमध्ये बसून आलो होतो, त्याची आठवण झाली.
खोलीची चावी जमा करून एका टमटमने ताहराबादला आलो. लगेच साडेअकराची सटाणा-नाशिक एसटी मिळाली. ती एसटी जुन्या सीबीएसला गेली. चौघांची मुंबईची एसटी महामार्ग स्टॅण्डवरून तर माझी पुणे एसटी जुन्या सीबीएसवरून होती. अशा प्रकारे नवीन सीबीएसच्या बाहेर, ट्रेकपूर्वी कधीही न भेटलेल्या पण त्याची जराही जाणीव न ठेवता एकमेकांच्या साथीत, एकमेकांना सांभाळून घेतलेल्या, आणि ट्रेकच्या शेवटी छान मित्र बनलेल्या पाच मायबोलीकर अट्टल भटक्या ट्रेकमेट्सचा निरोपसमारंभ (उरलेला हिशेब सेटल करून) पार पडला. चौघे मुंबईला आठपर्यंत पोहोचले आणि पाचवा मावळा ’गडावर’ सुखरूप पोहोचला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते.
********
बागलाण प्रांतातल्या आमच्या सहा किल्ल्यांच्या आनंदयात्रेची ही कहाणी इथे संपते! माझ्या परीने मी ती अधिक वर्णनात्मक करण्याचा प्रयत्न केला. वाचकाच्या डोळ्यासमोर उभं राहिल अशा शब्दात वर्णन करण्याची धडपड केली. वाचकांपुढे इतकं सगळं विस्तृत लिहून नंतर या ठिकाणी जाणाऱ्यांचा ट्रेकमधला स्वत: वाटा शोधण्याचा निखळ आनंद तर आपण हिरावून घेणार नाही ना, ही भीतीही सतत मनात होती. त्यामुळे काही ठिकाणी जुजबी वर्णन करून तो आनंद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ही लिखित आनंदयात्रा रोमहर्षक होती, रंजक होती, सुखद, थरारक, अप्रतिम, उत्कंठावर्धक की अजून काही, याचा निर्णय सर्वस्वी वाचकमित्र-मैत्रिणींनो, तुमचाच आहे. या चार-पाच दिवसांत आम्ही खूप फिरलो, खूप काही बघितले, निसर्गाच्या अनेक खेळांपैकी काहींचे साक्षीदार झालो. प्रत्येक वेळी निसर्गापुढे आपण खुजे आहोत या भावनेला पुष्टी देणारे प्रसंग, जागा अनेकवेळा पाहिल्या. सालोट्याच्या कड्याखाली उभे राहताना, साल्हेरवरच्या गुहेबाहेरून सहस्रावधी चांदण्यांनी भरलेले आकाश पाहतांना, मुल्हेरवरून सूर्यास्त आणि मांगीवरून सूर्योदय पाहतांना, सालोटा उतरतांना समोर ’आ’ करून ’तयार’ असलेली दरी पाहतांना, मुल्हेरवर अंधारात वाट शोधताना, मांगीच्या सुळक्याखाली उड्या मारतांना त्या खुजेपणाची जाणीव अधिक दृढ होत गेली. अर्थात, निसर्गाच्या अधीन राहूनही, निसर्गाच्या करामतीमध्ये आपली करामत अजरामर करणाऱ्या निर्मीकांच्या खुणाही दिसल्या. साल्हेर-मुल्हेर-मोरा-सालोटा इथल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण होय. तसं पाहायला गेलं तर निसर्गाची कारागिरी पाहण्याच्या हेतूबरोबरच स्वत:ला, स्वत:च्या क्षमतेची वेस शोधण्याचाही हेतू होता. मागल्या ट्रेकपेक्षा आपण किती ’म्हातारे’ झालो आहोत हे शोधण्याचा एक प्रयत्न होता. इतका जवळजवळ प्लॅनप्रमाणेच ट्रेक झाल्यावर अजून काय हवं होतं? आणि धकाधकीच्या जीवनापासून दूर, शांत ठिकाणी ’शब्दांच्या पलिकडले’ जे मिळालं ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणंही अवघड आहे. पण अशा ’अजून’ काहीतरी हवं असल्याच्या मागणीमुळे ह्या आनंदयात्रा अशाच सुरू राहणार आहेत. आणि मागे एकदा म्हटल्याप्रमाणे अशा आनंदयात्रांच्या स्वागताला हा सह्याद्री आडवाटाही सजवून सदैव उभा असणार आहे!
(समाप्त)
नचिकेत जोशी
सर्व फोटॉ - यो रॉक्स, रोहित मावळा आणि आनंदयात्री
सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग १
सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग २
सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग ३
सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग ४
अप्रतिम मित्रा !! नि शेवटचा
अप्रतिम मित्रा !! नि शेवटचा परिच्छेद पण मस्तच !! भेटू पुन्हा कधीतरी .. सह्याद्रीच्या रांगेवरी..
बाकी तू शेवटपर्यंत देब्रा नि कोब्राचा उल्लेख नाही केलास..
एक नंबर... मी मुद्दामच पैल्या
एक नंबर... मी मुद्दामच पैल्या पासून प्रतिसाद देत नव्हतो. सगळे भाग वाचून एकत्र प्रतिसाद द्यायचा म्हणुन... मस्त लिहिली आहे ही मालिका.. आणि एकूण ट्रेक पण जबरीच झालाय...
छानच लिहीलंयस ! मालिका फोटू
छानच लिहीलंयस !
मालिका फोटू दोन्ही आवडले.
वा... समारोपही मस्तच !! खरच
वा... समारोपही मस्तच !! खरच आनंदयात्री नाव सार्थ करतोस तू..
सही होती ही मालिका! हा भाग
सही होती ही मालिका! हा भाग सर्वात जास्त आवडला! शेवटचा परिच्छेद मस्तच!
आजीबाईंच्या त्या ’करामतीकडे’ बघून श्रद्धा श्रद्धा म्हणतात ती हीच असावी असे क्षणभर वाटून गेले. >> तुम्हा पाचही जणांकडे तीच श्रध्दा होती की रे - म्हणूनच तर इतकी करामत केलीत.
खरच शब्दांच्या
खरच शब्दांच्या पलीकडले.....
भेटुया लवकरच............
गुरुवर्य अप्रतिम वर्णन.
गुरुवर्य अप्रतिम वर्णन. समारोप एकदम सरस.
ही आनंदयात्रा अजोड, अविस्मरणीय होते. निसर्ग आपल्याला खुप काही शिकवतो. फक्त ते आपणाला समजुन घ्यावे लागते.
आणी लवकरच भेटाल अशी आशा आहे.
खूप छान होते सगळेच भाग. या
खूप छान होते सगळेच भाग. या भागातील मांगी-तुंगीचे फोटोज जबरदस्त.
खरं सांगायचं तर
खरं सांगायचं तर मांगी-तुंगीच्या दर्शनाला जात असलो तरी आम्ही यात्रिक अथवा भाविक नव्हतो, फक्त पर्यटक होतो. त्यामुळे दर्शनासाठी शूचिर्भूत वगैरे होण्याच्या इतरांच्या आणि आमच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या. तरीही वर चढणाऱ्या भक्तांना जमेल तेवढी मदत करावी म्हणून तो पिशवीप्रपंच! >>> अगदी अगदी दगडाचे ट्रेकर्स होते सगळे
शेवटचा परिच्छेद खूप आवडला... एक सुंदर सफर घडविलीस बागलाणची
शेवटचा पॅरा तर खलासच... मीही
शेवटचा पॅरा तर खलासच...
मीही ह्याच आनंदयात्रेचा असाच अनुभव घेतला (तुमच्या नंतरच्याच विकांताला :)).. तुमच्या आनंदयात्रेत हरगड आणी न्हावीगडची भर घालुन आमची आनंदयात्रा सफल झाली...
@मनोज ...न्हावीगड पण केला
@मनोज ...न्हावीगड पण केला तुम्ही सही......वृतांत टाका लवकर.
लेख तर सुन्दर होतेच.. शेवटही
लेख तर सुन्दर होतेच.. शेवटही खूप छान केलात.. आपल्या नावाला साजेसा... मस्तच..
http://merakuchhsaman.blogspot.com
@इंद्रधनुष्य, अगदी अगदी
@इंद्रधनुष्य,
अगदी अगदी दगडाचे ट्रेकर्स होते सगळे --->>> हाडाचे म्हणायच आहे का तुम्हाला??
http://merakuchhsaman.blogspot.com
लेख ,फोटो दोन्ही आवडले
लेख ,फोटो दोन्ही आवडले .प्रत्येक ओळीतून व्यक्त झालेला आनंदानुभव सुखवून गेला .मस्त .
मांगी-तुंगी जबराट....
मांगी-तुंगी जबराट.... पायऱ्यांचे फोटो सहीच... हा संपूर्ण ट्रेक छान झाला.. तुम्हाला अगदी शेवटपर्यंत लक्ष्यात राहील हे नक्की.. पुढच्या वेळी असे ट्रेक प्लान करताना जरा सांगायचे कष्ट घेतले तर बरे होईल... आणि हो नाही सांगितले तर पुढे काय होईल ते सांगू शकत नाही...
वाचकांपुढे इतकं सगळं विस्तृत लिहून नंतर या ठिकाणी जाणाऱ्यांचा ट्रेकमधला स्वत: वाटा शोधण्याचा निखळ आनंद तर आपण हिरावून घेणार नाही ना, ही भीतीही सतत मनात होती.
>>> अजिबात नाही... हे असे लिखाण उलट रेडी रेकनर बनतात... इतकी किमान माहिती असावीच सोबत. विशेष करून आपण सुट्ट्या घेऊन अगदी मोजके दिवस हातात ठेवून प्लान केलेले असताना.. शिवाय ट्रेक्स आणि हाईक्स यात मुलभूत फरक हाच आहे की..
ट्रेक संपतो तेंव्हा काय भावना असतात ते मी थेट जाणतो... सह्याद्री आपल्याला भरभरून देतोय आणि आपण दोन्ही हातांनी फक्त भरभरून घेतोय.. ५ भागातली आनंदयात्रा संपली... आता पुढची घेऊन लवकरच याल अशी अपेक्षा..
..... आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड़किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.
सही पक्क्या भटक्या
सही पक्क्या भटक्या खरय...पुर्ण अनुमोदन
दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड़किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.
नंद्या, दगडा, माधवजी, रोहित,
नंद्या, दगडा, माधवजी, रोहित, बाजीराव, मेकुसा, छायाजी, मनोज, हिम्स्कूल, जीएस, भटक्या, इंद्रा, आडो - सर्वांचे आभार!!
हिम्स्कूल, जीएस, तुम्हाला पाहून विशेष आनंद झाला... जीएसचे सगळे लेख मी अनेकदा वाचले आहेत, त्यात अनेकवेळा तुमची नावे वाचली आहेत...
भटक्या - शेवटच्या पॅराला पूर्ण अनुमोदन... इथल्या पडक्या बांधकामांमध्येही तोच इतिहास तितक्याच प्रखरतेने जिवंत आहे आणि राहिल.. कारण तो मनामध्ये रूजला आहे - बाहेरून कितीही प्रयत्न झाले तरी तो पुसता येणार नाही!
मनोज - हेवा वाटतोय... आहे त्याच परिस्थितीमध्ये हरगड आणि एक दिवस जास्तीचा असता तर न्हावीगडही झाला असता आमचा... 'त्या' वीस मिनिटात मोराची वाट का सापडली नाही, याचं उत्तर आजही माझ्याकडे नाही... पण झाला तो ट्रेकही सुंदरच झाला... we all enjoyed!! तुमच्या वृत्तांताची वाट पाहतोय..
माधवजी, खरंय तुमचं...
दगडा, कोब्रासाठी लेखामध्ये एके ठिकाणी उल्लेख करायचं ठरवलं होतं, पण नंतर विसरून गेलो...असो...
मेकुसा/इंद्रा - दगडाचे म्हणा हाडाचे म्हणा... दोन्हीमध्ये कौतुकच आहे..
मी गेल्या ९-१० वर्षांपासून ट्रेक करतोय.. काही लेख माबोवर टाकलेही आहेत.. पण या ट्रेकमुळे आणि लेखमालेमुळे 'माझिया जातीच्या' अनेक धुरंधरांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेट झाली, हा आनंद मोठा आहे...
धन्यवाद!
हुश्श. तुमची खरंच कमाल आहे.
हुश्श. तुमची खरंच कमाल आहे. मी नुसते फोटो बघुन दमलो.
आनंदयात्री.. जीएस च्या
आनंदयात्री.. जीएस च्या लेखांमध्ये असलेला कुल मी नव्हेच.. तो नुसताच कुल आहे.. आणि मी हिम्सकूल आहे.. आणि ट्रेकींगाचा आणि माझा सध्या तरी संबंध राहिलेला नाही.. कॉलेजात असताना होता... परत चालू करायची इच्छा तरी आहे पण काही कारणास्तव जमत नाहीये...
तरीही माझा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद..
दगडाचे ट्रेकर्स होते सगळे
दगडाचे ट्रेकर्स होते सगळे --->>> हाडाचे म्हणायच आहे का तुम्हाला?? >>> मेकुसा मला हाडाचेच म्हणायचे होते... पण तो त्यांचा अपमान झाला असता... म्हणून दगडाचे ट्रेकर्स म्हणालो :p
आहे त्याच परिस्थितीमध्ये हरगड आणि एक दिवस जास्तीचा असता तर न्हावीगडही झाला असता आमचा... >>> ह्ह्ह्म्म्म्म चांगला ५ दिवसांचा पर्याय दिला होता... तो धुडकावून गेलात उड्या मारत
हिम्या बी कूल :d
परत चालू करायची इच्छा तरी आहे
परत चालू करायची इच्छा तरी आहे पण काही कारणास्तव जमत नाहीये...
तरीही माझा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.. >> हिम्या.. "पाठीवर ओझं घेउद्या की र... मलाबी ट्रेकला येउद्या की हो.. "गाणे म्हण..
जल्ला इंद्रा.. बोलणा, सोचणा और करणा इसमे बहोत फरक होता है !!
बादवे.. इतका मस्त ट्रेक झाल्यावर कुणाच्या नाही तर आनंदला अप्सरा आठवली.. ती पण चक्क ताहराबादला परतताना.. म्हटले जल्ला आता एस्टी स्टँडवर फड उभा राहणार.. पण नशिबाने एसटी लगेच हजेरी लावली नि कार्यक्रम रद्द !
इंद्रधनुष्य, हाडाच्या
इंद्रधनुष्य,
हाडाच्या ट्रेकर्स ना हाडाचे म्हणण्यात कसला अपमान..? उलट सन्गितासारखा म्रुदु क्षेत्रातदेखिल हाडाचा गायक किव्व सन्गितकार असा शब्द वापरतात...
हिम्स, असं होय!! बरं! यो, हो
हिम्स, असं होय!! बरं!
यो, हो ना राव! अप्सरा राहिली बघायची!! अप्सरेची ख्यातीच एवढी आहे की क्या करे!! हरकत नाही!! पुन्हा भेटूच!!
अरे पहाड, दगड - आवडते शब्द आहेत...
पण तो त्यांचा अपमान झाला असता... म्हणून दगडाचे ट्रेकर्स म्हणालो >> त्यांचा म्हणजे हाडांचा असं वाचलं मी!! असो.. इंद्रा, श्वेता - चला मुल्हेरच्या टाक्यातलं गिलासभर पाणी प्या... पुढच्या ट्रेकला या आणि ठरवा काय ते!
मंदार धन्यवाद!
शेवटचा कोलाज फोटोमधला उजव्या
शेवटचा कोलाज फोटोमधला उजव्या वरच्या कोपऱ्यातला तुझा फोटो हा 'मध्ये' असायला हवा होता.. फोटोची मज्जा वाढली असती... करून बघ...
भटक्या, हम्म्म... करतो
भटक्या, हम्म्म... करतो प्रयत्न!
मस्त रे. सगळे फोटोही जबरी
मस्त रे.
सगळे फोटोही जबरी आहेत.
सुरेख.... अप्रतिम
सुरेख....
अप्रतिम वर्णन...ट्रेकमधल्या सर्व वैशिठ्यपूर्ण गोष्टिंचं...
ट्रेकमधली मजा व त्यातला गोडवाही शेवटपर्यंत अगदि तसाच...
फोटोग्राफ्सने वर्णन अधिकच प्रभावी झाले...
(जल्ला, दोन मिनिटे आम्हाला कल्लेच नाही कि आम्ही वाचक आहोत कि तुमच्याच ग्रुप मधले भटके..?)....:-)
थोडक्यात सांगायचं तर तुम्ही आम्हा वाचकांना "ई-ट्रेक" अनुभवायची संधी दिलीत....!
यो, जो आन्ई मित्रान्ओ खुप
यो, जो आन्ई मित्रान्ओ खुप छान. पुधिल त्रेक्ला बोल्व्आ मि येइन - ९९६७५४४४११ दाय्ल करा- नीउ
यो, जो आन्ई मित्रान्ओ खुप
यो, जो आन्ई मित्रान्ओ खुप छान. पुधिल त्रेक्ला बोल्व्आ मि येइन - ९९६७५४४४११ दाय्ल करा- नीउ
mi navin maybolikar aahe.
mi navin maybolikar aahe. krupaya navin 3 or 4 divasache trek asalych jarur cotact kara - 9967544411
Pages