रेतीतून चालणारी ती...

Submitted by Kiran.. on 6 January, 2011 - 11:54

ए ऐकतियेस का ?

समोर समुद्र..
निळाशार समुद्र, मऊ रेतीचा बीच. खूप विस्तीर्ण..
समुद्राचा किनारा इतका रूंद कि चांदीचा पट्टाच चमचम करताना दिसावा. किना-याला ताडामाडाच्या झाडांची अर्धवर्तुळाकार रांग..

आणि झाडीच्या मागे डोंगराची रांग. ..
एक उंचवटा उघडा बोडका.. लाटांना समांतर
रत्नाकर त्याचे पाय धुवेल .. जेव्हा येईल त्याला प्रेमाचं भरत.
तेव्हा आकाशात डोईवर तुझा तो चांदोबा असेल.
फुल्ल टू वाटोळा.
तू तर हरखून जाणारेस.

कारण तिथं आपलं घर असणारे.
नारळा पोफळीचं आंगण असेल. लाकडाच्या भिंती असतील. ज्योतीवर ते उचललेलं असेल. तुला आवडत ना म्हणून वॉलनट टच देणारे मी त्याला.
आणि छप्पर ?

उतरत्या छपराचं..
झावळ्यांनी शाकारणार आहे मी स्वतः.

चारही बाजूंनी लाकडी कठड्याचा व्हरांडा आवडेल ना तुला ?
ही माझी कल्पना गं..

समोर अफाट समुद्र आणि आपण दोघं
बाकि कुणीच नाही...
फक्त आपणच..!

पहाटे पहाटे ताजं समुद्री वारं खिडकीवर आदळेल आणि मग तू जांभई देत उठशील. मी झोपलेला असेन. तू उगीच शॉल ओढून घेशील आणि व्हरांड्यात येशील.
समोर लाटा तुला खुणावत असतील.
तुझ्या मागे डोंगराची रांग आणि त्यातून लाजलेली पूर्वा ...तिच्या गालावरचा रक्तिमा पश्चिमेला पसरेल आणि मग लाटा उसळतील.
तुला राहवणार नाही.

मऊ मऊ रेतीतून तू अनवाणी पायांनी चालत येशील तेव्हा तुझ्या पायांना गुदगुल्या होतील. तुझ्या अ‍ॅक्यूप्रेशरच्या चपला वरच राहीलेल्या असतील. तू अगदी ताजीतवानी झाली असशील.
इतका मोठा निर्मनुष्य किनारा

तुला मोह टाळता येणार नाही.
तू गाऊन काढून टाकशील आणि समुद्रकिनारी निर्वस्त्र चालायला सुरूवात करशील. खट्याळ लाटा तुला स्पर्श करायचा प्रयत्न करत असतील. तू त्यांना लटकेच रागवत असशील. थोडीशी लाजरी, थोडीशी घाबरी आणि खूपशी आनंदी असशील..

मी कूस बदलताना माझा हात तुझ्या बाजूला पडेल. ती जागा मोकळी असेल.
मला जाग येईल.

आळोखेपिळेखे देत मी व्हरांड्यात येईन
आणि वेडा होईन..
काय पाहू !!

काय पाहू मी फक्त दोन डोळ्यांनी?
घराच्या मागून येणारी पूर्वेची गुलाबी उषःप्रभा ..?
कि
त्या जादूई रंगात चमचमणारे लाटांचे सोनसळी तुषार
आणि..
आणि
किना-याने आपल्याच नादात चालणारी वस्त्रहीन तू..
पाठमोरी.. !!

वाराही बेभान होऊन तुझ्या केसाशी खेळेल ..मला नाई आवडणार ते..
त्याचं तुला स्पर्शणं..
पण अनिमिष नेत्रांनी पाहीन मी वा-यासवे केसांचं भुरभुरणं.

आणि नुकतीच शैशवात असलेली किरणे तुझ्या अंगाला स्पर्श करताना
तुझा अनावृत्त गौरवर्ण सुवर्णकांतीने झळाळून उठलेला असेल
जणू
रविवर्म्याची चित्रं जिवंत झालेली !
कि
कुठंतरी लताच्या आवाजात उलगडत जाणारी एक नाजूक तान !

मला मोह आवरत नाही..
मला तुझा चेहरा दिसलेला नसतो. आता तो पहायची तीव्र इच्छा होते
लाकडी जिन्यावर मी पाऊल टाकतो आणि

माझ्या चेह-यावर पाणी उडतं..
थेंब नाहीत
कुणीतरी ओतत असतं.

"अहो उठा ....
उठा म्हणते ना ! "

मी खाडकन जागा होतो.

"आज लवकर जायचं होतं ना ?"

रोज हा चेहरा पहायच्या आधीच ही उठवते.

***************

मुलांच्या शाळेची गडबड. माझं आवरणं. हिची भुणभुण..
चहा, नाश्ता, डबा, दप्तर
मला येणारे फोन्स
आंघोळ, दाढी, कपडे

काय खाल्लं काय नाही मला लक्षात नसतं.
मी गाडी चालवत असतो.
समोर समुद्रकिनारा ..
छे ..आता नको.

क्लाएंट यायच्या आत मी पोहोचलेला असतो.
थँक्स बायको.. मी मनात म्हणतो.

पुन्हा बाथरूमला जाऊन नीटनेटका होतो.
मग दिवसभर मीटिंग्ज..धावपळ
स्टाफवर आरडाओरड ..

रिस्पेशनिस्टला मी ओरडतो. बिचारी कुठल्यातरी तंद्रीत असते. तिची तंद्री भंग पावते.
हा मी आहे ?
असा?
असा कसा??
आणि का?
काय झालं ?
किंवा नाही झालं...राहीलं. राहतंय.
समथिंग मिसिंग ??

दुपारी सगळे जेवायला जातात...

एकांत आणि मी असे दोघेच उरतो.
समुद्रकिनारा खुणावत असतो.
,
,
मला तंद्री लागली होती का ?
ऑफीसमधे ही सेक्रेटरी विघ्नसंतोषी आहे. अगं मी बॉस आहे बाई तुझा. बघत जा ना जरा..

नाही ,पण तिला असं नाही म्हणू शकत. चांगली सेक्रेटरी आहे बिचारी. काही सांगावं लागत नाही. अर्ध ओझं कमी करत असते.. चेहरा पाहून फोनवर कुणाला काय सांगायचं ठरवते.

बायको इतकं नाही तरी मला ओळखते चांगलं.
आत्ताही रिस्क घेऊन मला उठवते. तिचा काय फायदा ?
झाला तर माझाच कि..

बडं गि-हाईक आलेलं असतं..

अशी संध्याकाळ होऊन जाते.

आणखी एक संध्याकाळ.
खाली पार्किंग लॉटपाशी येतो. मरीन लाईन्सला गाड्या पळताना दिसतात. इकडून तिकडे.. तिकडून इकडे.
आता माझी भर पडणार असते त्यात. मोठ्या हौसेनं इथं सी फेसिंग ऑफीस घेतलेलं असतं. पण आजतागायत खिडकीत उभं रहायला सुद्धा वेळ मिळालेला नसतो..

*********

आंबलेलं अंग सोफ्यात कोंबताना बायको दिवसभराची कॅसेट सांगत असते. मी हुं हुं करत असतो.

हल्ली ती कमी बोलते.
झोपेत काय बोलता ..विचारत असते.

मला पण अनामिक अस्वस्थता वाटत असते..

यंत्रवत जेवणं , अभ्यास, टीव्ही असा वेळ जातो.

चोरपावलांनी रात्र खुणावत असते. मी वाट पाहत असतो.

निळाशार समुद्र, मऊ रेतीचा बीच. खूप विस्तीर्ण..
समुद्राचा किनारा इतका रूंद कि चांदीचा पट्टाच चमचम करताना दिसावा. किना-याला ताडामाडाच्या झाडांची अर्धवर्तुळाकार रांग..

आणि झाडीच्या मागे डोंगराची रांग. ..
एक उंचवटा उघडा बोडका.. लाटांना समांतर.
,
,
,
,
,
आळोखेपिळेखे देत मी व्हरांड्यात येईन..

आणि तोंडावर पाणी..

आजही चेहरा दिसत नाही
मी अस्वस्थ !

************

हल्ली खटके उडू लागलेत. हिचा फोन कधी येईल सांगता येत नाही.
सेक्रेटरीचा चेहरा पडलेला असतो.
यंत्रासारखी वावरत असते. तिच्यात आता उत्साह नाही. कामावरचं ते प्रेम नाही
काय झालंय सांगायची गरज नसते.

घड्याळ चालू असतं
मी तारखा उलटत असतो.

एक अस्वस्थता दाटत चाललीय

माझ्या मनात
आणि तिच्याही

हल्ली ती जागी असते. रात्री मलाही कधीतरी जाग येते.

झोप होत नाही. डोक्यात घण घातल्यासारखं वाटतं
मी कविता खरडतो.. वाचतही नाही
मन भरत नाही..

तो चेहरा समोर येत नाही.

आज मी बेडमधे जात नाही. तिचा हल्ली आग्रह नसतो.
टेबलाशी एक खुर्ची घेऊन बसलेला असतो.
कोरा कागद फडफडत असतो.
हात पेन्सीलशी चाळा करत असतात..

मी अर्धवट झोपेत असणार.
शेजारी कोण उभंय ?
मी कुठाय ?

तू आलीस ?
आता स्पर्श होताहेत
तुझा चेहरा..

प्लीज दाखव..

तोच आहे ना चेहरा ?

बघू दे..

प्लीज !

चित्रं काढत होतो का मी ? कि ते ही स्वप्नं ?
मी झोपेत असणार.
टेबलाशी खुर्चीत तसाच झोपलेला.

केसात कुणीतरी हात फिरवतंय. बांगड्यांची नाजूक किणकिण
आणि गालावर ओठ टेकवत
तिचा आवाज कुजबुजता आवाज

"आय लव्ह यू "

धुंदावलेले डोळे उघडताना समोर लाजलेली ती. प्रसन्न चेह-याने...!!

फक्त ती आणि मी
आणि तिच्या हातात एक चित्र..

निळाशार समुद्र, मऊ रेतीचा बीच. खूप विस्तीर्ण..
समुद्राचा किनारा इतका रूंद कि चांदीचा पट्टाच चमचम करताना दिसावा. किना-याला ताडामाडाच्या झाडांची अर्धवर्तुळाकार रांग..

आणि झाडीच्या मागे डोंगराची रांग. ..
एक उंचवटा उघडा बोडका.. लाटांना समांतर.
,
,

आळोखेपिळेखे देणारा मी व्हरांड्यात
आणि

रेतीतून चालणारी ती
आणि मान वेळावत हसणारा तो चेहरा

तिचाच असतो
बायकोचा !!!

आज डोळ्यावर पाणी नाही कि खेकसणं नाही
उधाणलेल्या समुद्राला भरतं आलेल असतं फक्त..!

_________/\_____________

- Kiran
...........................................................
स्वप्नं पाहणं चूक नाही..त्यासाठी वेळ न देणं हा गुन्हा आहे

गुलमोहर: 

सुबह हो गई मामु Lol
पुन्हा वाचली..स्वप्न आवड्ले
"ति" सोडुन...! Happy

चांगला प्रयत्न.. येउद्या आणखी.

चातक

पुन्हा पुन्हा वाचल्याबद्दल धन्स ..

( हे लिखाण ..कुठलाही विचार न करता टंकलंय आणि पोस्टल्यावरच वाचलं Happy कसं झालंय मला खरंच कळत नाही..)

अनिलभाई, दिनेशदा, मामी असू दे... मित्रांनो थँक्स

दिनेशदा
छोटी छोटी स्वप्न असतात. त्यासाठी माणूस धडपड करतो आणि मग या स्वप्नांसाठी वेळच मिळत नाही असं काहीसं... Happy

मस्त...

वर्षु, ड्रीमगर्ल, रोहीत, रुणुझुणु

मनापासून आभार रे मित्रांनो..

बदलून असं स्टेटस दिसतंय का ?
काही नाही..घाईत टंकताना हल्ली नाव टाकायचं राहून जातंय तेव्हढं टाकलं. Happy
( भर टाकायचा मोह कटाक्षाने टाळला..)

संपूच नये असं स्वप्न..

स्वप्नं पाहणं चूक नाही..त्यासाठी वेळ न देणं हा गुन्हा आहे
------------------------------
आम्ही तर स्वप्नातच वावरतो Happy

टिपिकल संसारी माणूस दिसतोय हा... स्वप्नात सुद्धा बायकोशिवाय पर्याय नाही हे जीवनातला अंतिम सत्य त्याने अगदी नीट पचनी पाडून घेतलं आहे.. जमुना तू ही है तू ही मेरी मोहिनी>>>>>> अगदी अगदी Happy

छान लिहिलंय Happy

मला आवडली कथा, ह्याचं आयुष्य अगदि माझ्या एका आवडत्या कवितेसारखं झालयः

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो,
चाकोरिचे खरडुन कागद सहीस पाठवतो

आमचिहि हीच कथा आहे म्हणा, आणि बायकोचा दरारा बघा, स्वप्नात सुद्धा बायकोशिवाय कुणाचा चेहरा बघायची हिम्मत होत नाहि, हे पण अगदि डिट्टो, बरका Happy

मस्तच.

सुमेनिष -- Happy

चैत्रगंधा - नक्की.. असाच मूड लागला पाहीजे फक्त.. ( आयडी मस्त )

सांजसंध्या - धन्स

मंजिरी सोमण - त्याला कदाचित भीती असेल.. ती एखाद्या गुप्त आयडीने स्वप्नात वावरत असेल म्हणून .. Proud

अमित अरूण - अगदी त्याच्यासारखंच ना ? Sad

"छोटी छोटी स्वप्न असतात. त्यासाठी माणूस धडपड करतो आणि मग या स्वप्नांसाठी वेळच मिळत नाही असं काहीसं"

ह्म्म्म्म .....
हे वाचल्यावर थोडंफार समजलं.
नीट समजून घ्यायला
(अल्पमति, वार्धक्य इ कारणांमुळे)
थोडा वेळ लागेल.

सुमेनिष , ड्युआय- विशेष आभार Happy ( आवडत्या दहात नोंदवल्याबद्दल ), जो, स्वाती -२, नताशा, उल्हासकाका, रघु

आपल्या सर्वांचे आभार..

उल्हासकाका - म्हातारे होतील तुमचे दुष्मन !! तुमचा फोटो पाहिला.. तरूण देखील लाजतील इतके जवान दिसता अजून !! काका, असेच छान रहा ..

Pages