(ही कथा नुकतीच मेनका दिवाळी अंक २०१० मधे प्रसिद्ध झाली आहे.)
त्या मॉलच्या झगझगीत प्रकाशात पाऊल ठेवतानाच तिने गाडीची किल्ली जीन्सच्या मागच्या खिशात सरकवली. गेल्याच आठवड्यात घेतलेल्या या जीन्सचं फिटिंग इतकं मस्त होतं की या जीन्स घेतल्यापासून मागच्या खिश्यात त्या किल्ल्या अश्या सरकताना होणार्या स्पर्शाची तिला फारच गंमत वाटू लागली होती. गेल्या वीकेंडला या मॉलमध्येच तर तिने ह्या जीन्सची खरेदी केली होती. आज तिला फार जास्त काम नव्हतं .. फक्त शाँतिलीची रेड वाईन घेऊन घरी परतायचं होतं .. लगेचच. ती झपझप पावलं टाकत मॉलच्या उजवीकडच्या कोपर्यात गेली आणि खरेदी करून बाहेर पडली. आज अमित येणार होता. त्याची आवडती शाँतिली रेड वाईन !
पुन्हा गाडीत बसून आता ती स्टेशनकडे निघाली. रेडियो स्टेशन. नुकतंच सुरू झालेलं एफ एम स्टेशन ! आर जे म्हणून या आठवड्यातला शेवटचा प्रोग्राम ऑनलाईन सादर करून, मग रविवार सकाळचा स्पेशल प्रोग्राम रेकॉर्ड करून तिला घरी निघायचं होतं. खरेदी, गाडी पार्क करणं, काढणं आणि ट्रॅफिक या सगळ्यातून तिला अंमळ उशीरच होत गेला होता. चारच मिनिटांत तिने स्टुडिऒच्या दारावर कार्ड स्वाइप केलेलं असणं आणि माईक, मिक्सर नि वर्कस्टेशनचा ताबा घेतलेला असणं अगदीच जरूरीचं होतं. गाडी आपल्या पार्किंग स्लॉटमधे लागताच बाहेर पडत सिक्युरिटी ऑफिसर सावंताना हाक मारत ती धावत सुटली .. "सावंत, गाडी बंद करून किल्ल्या ठेवा .. मी येतेच नंतर .. किंवा पाठवून द्या .. " सावंतांची नजर ती धावत असताना नेहेमीप्रमाणे तिच्या कमरेकडे खिळलेली तिने पाहिली होती पण त्याचं आता एकतर तिला काहीही वाटेनासं झालं होतं आणि आत्ता त्याचं काहीही करायला वेळही नव्हता. ती धावतच लिफ्टपाशी पोहोचली. तिने लिफ्ट्च्या स्विचवर काही अत्याचार करायच्या आतच लिफ्टही आली आणि काही क्षणांमधेच ती स्वतःच्या वर्कस्टेशनपाशी जाऊन पोहोचलीही होती. तिच्या आधीचा आर जे तिची वाट पाहातच असे.. म्हणजे एकतर त्याचा शो संपणं हे तिच्या येण्यावर अवलंबून होतं हे एक कारण आणि दुसरं कारण ती ! तिचं दर्शन झाल्याशिवाय हलता येत नसे त्याला तिथून .. आणि म्हणूनच ही सुद्धा अनेकदा लवकर येऊनही स्टूडिऒमधे शिरायला उशीरच करायची. म्हणजे मग घाईघाई दाखवत "गुड मॉर्निंग, अब नही होगा और इंतजार .. क्यों की आ गयी हैं आप की अपनी आर जे प्रतीक्षा !" हे तिच्या नेहेमीच्या मादक शैलीत म्हणत पुढली गाणी, टाईम लाईन वगैरेमधे अडकल्याचं नाटक करून त्याला एका अर्थी फुटवत असे. हा सकाळचा आर जे खरंतर तिच्यापेक्षा खूपच लहान आणि त्यामुळे जरा अपरिपक्वच होता .. आणि विशेषतः तिने गेली तीन वर्षं स्वतःवर घेतलेल्या मेहेनतीमुळे तिचं खरं वय कोणाला नीटसं कळतच नसे. कंपनीच्या एच आर आणि काही बॉसेसशिवाय कोणालाच ते माहित नव्हतं. ती त्या सकाळच्या आर जे पेक्षा चांगली सात वर्षांनी मोठी होती. पण अगदीच कमनीयता जपलेलं शरीर, सुंदर डोळे आणि सतत हसत राहिल्यामुळे हे सर्व चित्र असंच राहिलं होतं.
हे चित्र असंच राखण्यात आणखी एक महत्वाचा वाटेकरी होता .. अमित. आणि तो आज येणार होता. आजचा दिवस खूपच स्पेशल होता. साधारण साडेचार वर्षांपूर्वी कोणालाच काय तिलाही स्वप्नांतही दिसले नसतील असे दिवस ती आज पाहात होती.
दोन वर्षांपूर्वी ती या शहरात आली ती ही अमितमुळेच. ही नोकरी तिला चट्कन मिळाली तीही अमितमुळेच. तिने स्वतःकडे नव्या दृष्टीने बघायला सुरूवात केली तीही अमितमुळेच ! तो अमित आज तिला तब्बल दोन वर्षांनी भेटणार होता.
"आजकल पाँव जमींपर नहीं पडते मेरे .." हे गाणं तिने लावलं आणि ती पुढली गाणी लाईन अप करू लागली .. तेव्हढ्यात एस एम एस वाजला .. "निघालो .. फ्लाईट अबाऊट टू टेक ऑफ .. अमित"
एका विलक्षण झपाट्याने तिने ठरवलेलं सगळं काम संपवलं आणि हा दुपारचा शो संपायच्या आतच ती स्टूडिऒमधून बाहेर पडली होती. बॉसला केबिनचा दरवाजा अर्धाच लोटून भेटली .. "हर्ष, आय अॅम डन .. आज आणि सन्डे मॉर्निंग .. बोथ .. मी जात्ये .. मी सांगितलं होतं .." .. काही क्षणांमधेच ती पुन्हा गाडीपाशी होती. गाडीच्या किल्ल्या द्यायला पुढे आलेले सावंत आत्ता तिच्या टी शर्टच्या खोल गळ्याकडे पाहात होते .. हे ही काही नवीन नव्हतं .. किल्ल्या घेत ती म्हणाली, "काय सावंत बायको काय म्हणते ? आणि मुलगी ?" सावंतच काय, अश्या रितीने आपल्याकडे पाहणार्या अनेकजणांवर ही मात्रा चालतानाही तिने पाहिलं होतं. पण हे सगळं माहित असूनही, दिसत असूनही सावंतांविषयी का कोणास ठाऊक तिला राग नव्हता .. दया यायची त्यांची .. अर्थातच त्यांनी असं तिला नेहेमी पाहाणं तिला नक्कीच पसंत नव्हतं पण त्यावर आत्ता ती जे करत होती त्यापेक्षा जालिम काही करावं असं तिला सध्यातरी वाटत नव्हतं.
गाडी फार सफाईने चालवत "राँदेवू" हे फ्रेंच नाव मिरवणार्या आपल्या बिल्डिंगच्या गेट मधून ती आत आली. अकराव्या मजल्यावरच्या तिच्या थ्री बेडरूम फ्लॅटमधून या शहराचं फार मस्त दृष्य दिसतं. विशेषतः तिच्या बेडरूमच्या टेरेस मधून .. काही क्षण ती त्या टेरेस मधे जाऊन उभी राहिली .. वारा तिच्या केसांना सतत उडवीत होता. तिने केस वर धरून एकत्र बांधले .. बस त्याक्षणी तिला पाहायला आणखी कोणीच तिथे नव्हतं.
अजून एखादा तास ती आराम करणार होती आणि मग ती तयारीला लागणार होती. पास्ता, सॅलेड आणि वाईन असा बेत अमितच्या आजच्या विशेष भेटीसाठी उत्तमच ठरणार होता. ती बेडरूममधे परत आली आणि जरा पलंगावर लवंडली .. सतत वाहणार्या वार्यामुळे हवेत एक गारवा आला होता आणि त्यातच तिला केव्हा झोप लागली हे तिला समजलंच नाही. शांत झोप तीही या वेळेला .. हे तिच्या आताच्या आयुष्यात जरा अपवादात्मकच होतं. आत्ताच्याच का तिचं सहा वर्षांपूर्वी लग्न झालं त्यानंतर दीडेक वर्षातच एका दिवसापासून तिची स्वस्थ झोप कायमची मिटल्यासारखी होऊन बसलं होतं.
.....
दुपारी एकटीच घरी असताना कमीतकमी कपडे अंगावर ठेवून झोपायला तिला आवडत असे .. खरंतर अंगावर काहीच नसेल तर ते जास्त बरं .. पण तिला कधीतरी अशीही भिती वाटत असे की आपण असं विवस्त्र झोपलेलं असताना काही भूकंप वगैरे झाला आणि घरच कोसळलं तर ? आणि ती चटकन एखादा कपडा अंगावर घालून मोकळी होत असे. त्या दिवशी मात्र अशी भीती वाटत नसल्यामुळे तेव्हा ती तिला अत्यंत आवडत्या मोकळ्याढाकळ्या स्थितीतच झोपी केव्हा गेली ते तिला कळलंच नव्हतं. आणि अचानक दारावरची बेल कर्कश्श्य आवाज करत वाजली. पहाटेच केव्हातरी सोहमचे हात आपल्या अंगावरून फिरत असल्याचं जाणवल्यानंतरचा जवळजवळ एक तास आजवरच्या त्यांच्या एकांतातला सर्वात मस्त तास झाला होता .. त्याची झिंग तिच्या मनात नि अंगावर अजूनही होती .. पहिल्यांदा दारावरची घंटा वाजली तेव्हा तिला काहीही जाणवलं नाही .. बेल वाजवणर्याला मात्र धीर नव्हता .. तो जोरजोरात बेल सारखीसारखी वाजवत राहिला .. पण निघून गेला नाही. इकडे ही मात्र गडबडून धडपडत जागी झाली .. घाईघाईने अंगावर कपडे चढवले आणि बाहेर आली .. दार उघडलं तर दारात दोन पोलिस त्यातली एक महिला पोलिस. सोबत एक साध्या कपड्यातला माणूस. मनातून खूप घाबरलेली ती काही बोलूच शकली नाही. महिला पोलिस पुढे झाली .. "आभा सोहम फडणीस ? .. तुम्हीच का ?" ती चाचरतच हो म्हणाली. तिला काही कळतच नव्हतं. त्या पोलिस बाईने एक कागद पुढे धरला "नोटिस आहे कोर्टाची .. घ्या .. " हिला काही कळेनासं झालं .. पण त्या सगळ्यांना दारातून जायला भाग पाडायचा एकच रस्ता होता तो म्हणजे ती नोटिस स्वीकारणं .. आणि तसंही अश्या प्रसंगी काय अवधान वगैरे राखायचं ते तिला माहित असायचं काही कारणही नव्हतं. तिने ती नोटिस घेतली. सही केली. ते तिघं जाऊ लागले. जाता जाता पोलिस बाई म्हणाली, " बाई टी सरट उलट घातलाय तुमी ..." आता मात्र तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तिला काही वेळ काही कळेचना. नंतर होती एक घटनांची मालिका ज्यात उलगडत गेला तिच्या "आपल्या" सोहमचा एक भयानक चेहरा. नोटिसवर नोटिसा येत राहिल्या .. सोहम खोट्यावर खोटं बोलत राहिला .. तिच्यापासून हज्जारो गोष्टी लपवत राहिला. आणि त्यादिवशी पोलिसबाईच्या त्या वाक्याने जितकं नागडं झाल्यागत तिला वाटलं असेल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त नागडं-उघडं करतील असे आरोपावर आरोप तिच्यावर होत गेले. सोहमने नव्याने सुरू केलेल्या मीडिया कंपनीत आभा त्याची बायको म्हणूनच पार्टनर होती. पण कंपनीच्या हज्जारो कागदपत्रांवर सोहम वर विश्वास ठेवून तिने सह्या केल्या होत्या आणि आता तिच्या हे लक्षात येत चाललं होतं की सोहमशी नातं, त्यावर तिने टाकलेला विश्वास ही सगळीच एक घोर फसवणूक होती .. लोकांचे पैसे बुडवल्याच्या, खोटे चेक दिल्याच्या आणि कर्ज बुडवल्याच्या एकावर एक अश्या तब्बल चौदा केसेस तिच्यावर आता होत्या. तिच्या वडिलांच्या कानावर जेव्हा या गोष्टी पोहोचल्या तेव्हा मात्र अत्यंत कुशल अश्या वकीलांच्या हातात हे सर्व गेलं आणि मग सुरू झाली एक घटनांची मालिका. सोहम तसा तिच्या जाणतेपणी किंवा तिच्याशी तसं काहीच गैर वागलेला नव्हता .. त्यांच्यात प्रेम आणि आवेग कधीच कमी पडले नव्हते .. त्यामुळे त्याच्यात गुंतलेलं मन आणि शरीर दूर जाणं खूपच कठीण जात होतं. त्याच्यावर पूर्ण अविश्वास मनात येऊच शकत नव्हता .. हे सर्व काहीतरी अघटित आहे आणि सोहम त्यात उगाचच फसला आहे असंच तिला वाटत असे .. ती त्याला चोरून हॉटेल्समधे भेटत असे .. तिथे त्यांच्यातलं आकर्षण त्या दोघांनाही अनावर होत जात असे. एकदा ती सापडली. तिच्या वकीलांनीच तिला त्याच्यासोबत पाहिलं आणि मग मात्र सर्वांनी तिला सोहम ने तिला कसं अनेक आर्थिक प्रकरणांमधे गोवलं आहे हे कानउघाडणीच्या स्वरूपातच सांगितलं आणि मग एका भयंकर दुःस्वप्नमय सहा महिन्यांच्या काळातून ती गेली. सोहमचा खरा चेहरा आता तिला दिसू लागला होता. अखेर तिचे वडील आणि तिचे वकील या दोघांच्या चातुर्यामुळे तिची सुटका झाली. सोहम आता गजाआड झाला होता. आणि तिची त्याच्या कचाट्यातून कायदेशीर मुक्तताही झाली होती. पण या सगळ्यानंतर ती मात्र तशी शांत झोप कायमची घालवून बसली होती ..
...
आज तिला तशी झोप लागली. आणि मोबाइलच्या बेल ने तिला जाग आली. अमितचा हसरा चेहरा मोबाइल स्क्रीनवर झळकत होता ..
"हॅलो ! .. हं .. हाय .. "
"ऑन टाइम आलास !"
"हो ना .. आता जे पी नगरला जाऊन येतो .. दोनेक तास लागतील."
" उं ? हां हां .. ये तू .."
फोन संपवून ती थेट किचन मधे आली नि कामाला लागली. पास्ता, सॅलेड हे सर्व आता तिला फारच सुंदर करता येत असे. या शहरात आल्यापासून. वडिलांशी पटत नसल्याने, अमितच्याच मध्यस्थीने तिला ही सर्व व्यवस्था करता आली होती. तिला अमित ने खूपच हात दिला होता आणि तिच्या दुःखापेक्षा अनेक चांगल्या गोष्टी तिच्याकडे आहेत याची जाणीवही त्यानेच करून दिली होती. लग्नाच्यावेळी सोहमला वचन दिल्याप्रमाणे नाटक सोडून बसलेली तेव्हाची आभा पुन्हा नाटकांकडे वळली होती आणि त्यातच ती आणि अमित पुन्हा इतके जवळ येत गेले होते. आता तिच्याकडे आत्मविश्वासाचा एक नवा स्रोत होता. मग ती या रेडियो कंपनीत नोकरीला लागली आणि या शहरात आली. नव्या मैत्रिणी, नवे मित्र, नवी लाइफस्टाइल आणि नवीन नाव ! कंपनीच्या प्रोग्रॅमिंग हेडने तिला आर जे प्रतीक्षा हे नवीन नाव .. नाही फक्त नाव नाही ओळख दिली होती.
दोनेक तासांनी अमित दारात उभा होता. दोघं एकमेकांना असं समोर पाहून काहीच बोलू शकली नाहीत. एक घट्ट मिठी ते सर्व बोलून गेली.
सोहमसोबतच्या दुःस्वप्नातून जागं झाल्यावर अमित सावलीसारखा उभा राहिला होता तिच्यासाठी. तिला स्वतःला पुन्हा नव्याने पाहायला शिकवलं त्याने. स्वतःवर मेहनत घेत ती त्या सगळ्यातून सावरली. पुन्हा उभी राहिली. पण त्यादरम्यान अमित आणि ती मात्र एकमेकांच्या फार जवळ आले. अमितचा संसार होता. बायको आणि एक छोटा गोड मुलगाही होता. आभामावशी म्हणायचा तो तिला. अमितच्या बायकोला कल्पना नसेल का आपल्या नि त्याच्या नात्याची हा विचार तिला अपराधी करून जायचाही अनेकदा. पण अमितकडे हा विचार तिने कधीच बोलून दाखवला नाही. का ते तिलाही सांगता येत नाही. मागच्या आठवणींनी ती अथक रडायची तेव्हा तिच्या भुवयांवर, कपाळावर आणि कानांवर हळूवार हात फिरवत तो तिला धीर द्यायचा. ती खूप वेळा त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडायची. इतकी की मग तो शर्ट त्याला बदलावा लागेल इतका भिजलेला असायचा. अमित कडूनच एक दिवस एक पाऊल पुढे टाकलं गेलं. अशीच ती रडली होती. आणि त्याने तिला शांत केलं होतं. कॉफी बनवून आणली आणि तिला दिली होती. संध्याकाळच्या उन्हाची एक तिरीप तिच्या चेहर्यावर येऊन पडली होती. अचानक अमित त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या समोर आला. तिला काहीही कळण्याआतच अमितचे ओठ तिच्या ओठांवर टेकलेले होते. त्यानंतर त्यांच्यातल्या नात्याला चढलेला हा एक नवा अर्थ दोघांनीही हळूवार आणि संयमाने जपला होता. कमालीच्या सफाईने हे एक गुपितच राखलं होतं त्यांनी. मग ती जेव्हा नोकरी करू लागली तेव्हा त्यांचं त्याच्या किंवा तिच्या घरी भेटणं थांबलं. ते चक्क बाहेरगावी भेटू लागले. ती या शहरात आली तेव्हा निरोप देताना अमित खरंतर म्हणाला होता की आता तुझं एकटीचं घर झालं .. आता मनसोक्त भेटी होतील, पण ती इथे आल्यापासून अमितला या शहरात येताच आलं नव्हतं आणि ती आईकडे गेली असताना अमितला बाहेरगावी जावं लागत होतं. या विचित्र योगायोगांमुळे ती कधीकधी अस्वस्थ होत असे पण ते तेव्हढ्यापुरतंच !
आज मात्र अमित तिच्या मिठीत होता ... आणि ती त्याच्या !
मग ती संध्याकाळ दोघांनी मस्त घालवली. तिच्या नव्या गाडीतून तळ्याच्या बाजूला मस्त फेरफटका मारून आली दोघं. खूप गप्पा. आणि मग परत घरी. पास्ता, सॅलेड सोबत, घरातल्या मंद प्रकाशात. टेरेसच्या फ्रेंच विंडोमधून सतत वाहत्या वार्यावर आणि लालेलाल शाँतिलीच्या भरलेल्या ग्लासांवर गप्पांच्या फैरी झाल्या .. "सगळं विसरल्यासारखं आपण जगत राहातो रे पण ते सगळं विसरण्यातली अगतिकता कशी विसरायची ?" असं म्हणून ती रडू लागली. त्याने तिला जवळ घेतलं. मग ती रात्र त्या टेरेसचे पडदे उडवत राहिलेल्या त्या वार्यासारखी वाहातच राहिली.
अचानक तिला जेव्हा जाग आली तेव्हा ती टेरेसमधे होती .. तिच्या अंगावर फक्त एक चादर होती. जवळच पडलेले तिचे कपडे तिने पाहिले. क्षणभर गेलाच तिला पूर्ण भान येण्यापूर्वी. ती भानावर आली तेव्हा तिच्या उशाशी ठेवलेली एक चिठी तिने पाहिली. अमितची चिठी.
"माझ्या बायकोला यापेक्षा जास्तवेळा मी आता फसवू शकत नाही. मला माफ कर. अमित"
चिठी वाचताना तिची दृष्टी धुरकट होत गेली .. डोळे भरत गेले .. तिच्या मनात का कोण जाणे रागच नव्हता. काहीतरी शरीरातून शोषून नेल्यासारखं पोकळ वाटू लागलं अचानक. तिला ही पोकळी भरून टाकायची होती .. आत्ता .. जे काही झालं होतं त्यात विश्वासघात आहे की नाही, त्याने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे की नाही या सगळ्या प्रश्नांचं तिला आत्ताच काय केव्हाही काहीही करावसं वाटत नव्हतं .. तिला आतून भरलेलं काहीतरी जाणवायला हवं होतं .. आत्ता .. जवळच असलेल्या शाँतिलीच्या बाटलीकडे पुन्हा तिचा हात गेला आणि बाटली तोंडाकडे.
जरावेळाने रिकामी बाटली तिच्या बाजूला पडलेल्या तिच्या कपड्यांवर पडली होती. तिच्या हातातल्या मोबाइलवर दरम्यान केव्हातरी तिने अमितला पाठवलेला एस एम एस तसाच होता .. "थँक्स फॉर एव्हरीथिंग .. एल यू व्ही."
ती तशीच विवस्त्र त्या चादरीवर पडली होती. रेड वाईन आता तिच्या रक्तातून धावत होती. तिच्या मनाचा पूर्ण ताबा घेत होती आणि घटाघट पिऊन टाकताना ओठांच्या बाजूने घसरून तीच रेड वाईन तिच्या उघड्या शरीरावर जिथे तिथे सांडली होती. त्या लाल खुणा तिचं उघडं शरीर हजारो वार झेलल्यासारखं मिरवत होतं !
आवडली!
आवडली!
चांगली लिहीली आहे. एकदा फसवली
चांगली लिहीली आहे. एकदा फसवली गेलेली नायिका दुसर्यांदा इतक्या सहजपणे लग्न झालेल्या माणसाच्या प्रेमात पडून परत एकदा स्वतःची फसवणूक करून घेते हे काही झेपले नाही.
भयानक वर्णन केलय, शेवटि तर
भयानक वर्णन केलय, शेवटि तर अन्गावर काटाच आला....
आवडली.
आवडली.
रुनी, दुसर्या वेळेला
रुनी, दुसर्या वेळेला नायिकेची फसवणूक झाली असं मला वाटत नाही. तिला माहितेय की अमितचं लग्न झालेलं आहे नी त्याला त्याचा संसारही आहे. बरं कथेत कुठेही त्याने तिला लग्नाचं वचन दिल्याचा उल्लेख नाही. नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड टाईप नातं वाटलं त्यांचं..
सायो मुळात विवाह बाह्य संबंध
सायो मुळात विवाह बाह्य संबंध ठेवणे हे माझ्यामते तिने स्वतःचीच फसवणूक केल्यासारखे आहे म्हणून मी तसे लिहीले, यात अमितने तिला फसवले असे मला म्हणायचे नव्हते. तू म्हणतेस तसे असेलही "No strings attached". मला कथेवरून तसा बोध झाला नाही.
कथा आवडली आणि शीर्षक सुध्धा
कथा आवडली आणि शीर्षक सुध्धा
.माणसे खुपदा तर्क लावता येणार नाही अशी वागतात .त्यामुळेच ते नियतीच्या हातातील खेळणे आहेत. हि भावना प्रबळ होते .एकाकी जीवाला आधार हवा असतो. तो देणारा विव्हाहित का अविवाहित हे फारसे पहिले जात नाही
माफ कर प्रदीप पण मला खूप काही
माफ कर प्रदीप पण मला खूप काही नाही आवडली. बाकी तपशील प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवर.
मलाही वाटतय हे नो स्ट्रिन्ग्स
मलाही वाटतय हे नो स्ट्रिन्ग्स अटॅच्ड नातं होतं.. अमित ला ती दोन वर्षांनी भेटत होती..म्हणजे अगदी वारंवार ही ते भेटत नव्हते. अमित ने तिच्या अडचणीच्या वेळी खूप मदत केल्याने,तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला असेल आणी पुढचं घडलं असेल्..त्याबद्दल किन्वा तो सोडून निघूनगेल्याबद्दल तिच्या मनात राग्,विश्वासघाता अश्यासारख्या भावना टेंपररी आल्या असतील..
I think she will get over it soon
वर्णनाची शैली आवडली. तिला
वर्णनाची शैली आवडली.
तिला विवस्त्रावस्थेची भीती होती हे आधी लिहिल्यामुळे मला वाटलं ती नातं तुटल्याचं असह्य होऊन टेरेसवरून विवस्त्रावस्थेतच, थोडक्यात भान विसरून, उडी मारून जीव देते की काय! ती फारच शोकांतिका झाली असती!
हा शेवट मस्त!
आवडली लेखनशैली.
आवडली लेखनशैली.
छान....! अमित अणि आभा
छान....!
अमित अणि आभा संबंधाचा जरा गुंता होतोय, तेवढं बघा.
कथा ठिक... जरा साचेबद्ध. आणि
कथा ठिक... जरा साचेबद्ध.
आणि ते विवस्त्रावस्था वगैरे अगदीच मँडेटरी दळवीस्टाईल वाटले.
संपुर्ण कथेत नायक नायिकेतील
संपुर्ण कथेत नायक नायिकेतील नो स्ट्रिन्ग्स अटॅच्ड नातं कुठेही अधोरेखीत झालेलं दिसून येत नाही!! शिवाय,
"माझ्या बायकोला यापेक्षा जास्तवेळा मी आता फसवू शकत नाही. मला माफ कर. अमित"
याचा काहिहि संदर्भच लागत नाही! यापेक्षा जास्तवेळा म्हणजे काय?? फसवणूकीचं काही लिमिट थोडीच असतं?? एकदा काय किंवा अनेकदा, फसवणूक हि फसवणूकच !! हे वाक्य वाचून असं वाटतं की नायकावर बायकोला फसवण्याची कोणीतरी जबरदस्ती केली आहे !! नायकाचा अपराधीपणा वाचकांपर्यंत पोचवणं हा जर या वाक्याचा हेतू असेल तर तो साध्य झालेला नाही, उलट नायिकाच काही अंशी खलनायिका ठरवली गेली आहे असं मला वाटतं!
एवढा भाग सोडला तर बाकि ओके!!
धन्यवाद .. प्रतिक्रियांबद्दल
धन्यवाद .. प्रतिक्रियांबद्दल .. आवडलेल्या, न आवडलेल्या सर्वांच्याच .. आझ्या आणखीही काही कथा आहेत पण त्या वेगळ्या फाँट मधे आहेत .. त्या पुन्हा पूर्ण टंकलिखित करत बसण्याचा उद्योग करायला वेळ नाही .. पण थोद्याच दिवसात एक फाँट कन्व्हर्टर मिळाला की मी त्याही इथे आणू शकेन .. मला आवडेल विविध प्रतिक्रिया मिळवणं ..
छन लिहीलय
छन लिहीलय
नाही आवडली. कथावस्तू सरधोपट
नाही आवडली. कथावस्तू सरधोपट याबद्दल काही म्हणायचं नाही पण मानसिक विश्लेषणाने ती अजून खूप जास्त फुलवता आली असती तसं झालेलं नाही. माफ करा पण अगदी मेनका-किशोर शिंत्रे कॉम्बो स्टाईल झाली आहे.
वैद्य तुमच्या कवितांमधे खूपच सुंदर तरलता असते त्यामुळे कदाचित जास्त अपेक्षा वाढल्याने कथा आवडली नाही असंही असू शकेल.
शक्य आहे शर्मिला .. मेनका
शक्य आहे शर्मिला .. मेनका साठीच ही कथा लिहिली आहे .. त्याच्यावर तो छाप जाणवतोय हे नक्कीच .. पाहू .. माझ्या इतर कथाही इथे देणार आहेच हळू हळू ..
लेखनशैली व बारकाव्यांतून
लेखनशैली व बारकाव्यांतून वातावरणनिर्मिती फार प्रभावीपणे साधली आहे. शेवटची मनाची घालमेल केवळ बाह्य वर्तनाबरोबरच [विवस्त्र होणं ,रेड वाईन इ.] अधिक तरलपणे उलगडून दाखवली असते, तर
कदाचित अधिक भिडली असती. कथा मला आवडली.
मला पण आवडली कथा. पौर्णिमा
मला पण आवडली कथा. पौर्णिमा म्हणते तसा हा शेवट जास्त चांगला वाटतो. यातुनही नायिका बाहेर पडेल असं वाटतं.
भाऊ आणि फुलपाखरू, धन्यवाद ..
भाऊ आणि फुलपाखरू, धन्यवाद .. भाऊ, तुमच्या सूचना मनात बंद केल्या आहेतच .. त्यामुळे त्या सूचनांचा पुढे पुन्हा काही लिहिताना मनात आपोआप विचार घडेलच ..
मस्तच... आवडलि कथा....
मस्तच... आवडलि कथा....
प्रायोगिक वाटली...
प्रायोगिक वाटली...
मस्त आहे कथा आसेच लिहित रहा
मस्त आहे कथा
आसेच लिहित रहा
चिठी वाचताना तिची दृष्टी
चिठी वाचताना तिची दृष्टी धुरकट होत गेली .. डोळे भरत गेले .. तिच्या मनात का कोण जाणे रागच नव्हता. काहीतरी शरीरातून शोषून नेल्यासारखं पोकळ वाटू लागलं अचानक.
नायिकेची ही स्थिती चांगल्या शब्दांत दर्शवलीत. कथेचं म्हणाल तर, अशा कथा याआधी सिनेमांत पाहील्यासारख्या वाटतात, त्यामुळे नवं काही जाणवलं नाही. बाकी लेखनशैली मस्तच.
अनेकांना अनुमोदन. लेखनशैली
अनेकांना अनुमोदन. लेखनशैली छान आहे...
<<"सगळं विसरल्यासारखं आपण जगत राहातो रे पण ते सगळं विसरण्यातली अगतिकता कशी विसरायची ?" >>
पण कथा म्हणून मला खूप अशी नाही आवडली. खरच दिवाळी अंक"टाईप" इतकच वाटत राहिलं.
कथा आवडली .
कथा आवडली .
छान आहे.
छान आहे.
सर्वांचे आभार ! माझीच रशीदा
सर्वांचे आभार ! माझीच रशीदा नावाची कथा अनुभव च्या जानेवारी ११ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. ती काही दिवसांनी इथे देईन पण ज्यांना जमेल त्यांनी वाचा ..
छान आहे.
छान आहे.
Pages