जपान मधे नविन वर्षाच्या स्वागतासाठी घराघरांवर फुलापानांची सजावट करुन लावतात. घराच्या आत सुद्धा एका स्पेशल कोपर्यात, टेबलावर अशी सजावट करुन नविन वर्षाच स्वागत करण्याची प्रथा आहे. आता दरवाज्यावर लावण्यासाठी प्लॅस्टीकच्या पण हुबेहुब खर्यासारख्या दिसणार्या रचना विकतही मिळतात पण खरी सजावट काही वेगळीच. अशा घरामधे करणार्या सजावटीला इकेबाना असं नाव आहे.
म्हणुनच अशाच एका रचने द्वारे तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नविन वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ.
इकेबाना हि एक जपानी कला. शब्दश: म्हटलं तर फुलांच्या रचना करणे. पण या कलेमधे त्याहुन अधिक बरच काही अभिप्रेत आहे.
सुरुवातीला जपानमधे आल्यावर वाटायचं काय शिकायचं असेल यात. नुसती फुलांची रचनाच तर करायची. सुंदरतेची दृष्टी असेल तर आपसुकच जमेल. पण इथे अनेक रचना बघितल्यावर माझ्या या कल्पनांना तडा गेला. इकेबाना म्हणजे फुलांच्या रचनेहून अधिक काहीतरी आहे याची जाणिव व्हायला लागली आणि या कलेशी निदान थोडीतरी ओळख व्हावी असं वाटायला लागलं.
मनापासुन इच्छा असेल तर कुठेतरी मार्ग मिळतोच. त्यानुसार ऑफिसमधे पुर्णवेळ नोकरी करत असुनही इकेबाना शिकायचा योग आलाच. खरतर माझ्याकडे फक्त ५ महीने होते. मुलीचा जन्म झाल्यावर या सगळ्या गोष्टीना वेळ मिळणारच नव्हता. तर निदान या कलेशी ओळख व्हावी असा विचार करुन शिकवणी चालु केली.
आधीच्या सगळ्या कल्पना झुगारुन देउन पाटी पुर्ण रिकामी करुन एका नविन भाषेत हे शिकणे म्हणजे जरा अतिच होतं. शिक्षिकेला सांगायच्या गोष्टी आणि माझं तेव्हाचं जपानीचं ज्ञान या गोष्टी एका प्रतलात नव्हत्याच. पण हळुहळू समजायला लागलं.
हि कला निसर्ग आणि मानव यांना जोडणारा एक दुवा म्हणा हवं तर. थोडसं अध्यात्माकडे झुकणारी कला. या कलेच्या माध्यमातुनही कलाकार आपलं स्टेटमेंट (काय मराठी शब्द?) मांडतो. तसं तर ते सगळ्याच कलातुन मांडतो नाही का? पण बर्याच वेळा ते प्रत्यक्ष असतं. इकेबाना मधे मात्र कुठेतरी मुर्ततेतुन अमुर्ततेकडे असा काहीसा उलटा प्रवास वाट्तो. अर्थातच हा मला जाणवणारा अर्थ. प्रत्येकाला जाणवणारा अर्थ आणि आकार वेगळा असु शकेल.
इकेबानाचं वैशिष्ठ म्हणजे "काय आहे" पेक्षा "काय नाही" यातुन आकार, रंग, रुप, अनुभुती मिळवुन देणं. म्हणजे असलेल्या सगळ्या फुला पानासकट रचना करण्या पेक्षा. काय नकोय ते आधी काढुन टाकणं मग उरलेल्यातुन सुद्धा एका स्पेस / अवकाशाची निर्मिती करणं. मिनिमलस्टिक रचना हे या कलेचं महत्वाच अंग आहे. असलेली सगळी साधने वापरुन गर्दी करण्यापेक्षा काय नको ते काढुन टाकुन कलाकार निर्मिती सुरू करतो. सुरुवातीला एखाद्या फांदीला असलेली सगळीच पानं मला सुंदर वाटायची. कुठलही पान कापुन टाकायला मन धजावायचं नाही. आणि शेवटि मात्र गर्दी आणि गिचमिड शिवाय काही मिळायचं नाही. सेन्सेईंच्या नेहेमीच्या सांगण्याने मात्र हळुहळू यात फरक पडायला लागला. कुटली पानं काढुन टाकली तर काय होईल ते जाणवायला लागलं.
इकेबाना हि कला निसर्गाच्या सृजनाला दाद देण्यासाठी किंवा त्याची मानवाला जाणीव करुन देण्यासाठी निर्माण झाली असं वाटतं. किंवा कदाचित माणसाने बांधलेल्या घर नामक चौकटीत तो एकटा पडु नये आणि बाजुच्या निसर्गाची त्याला सदैव जाणिव रहावी म्हणुन तो निर्सगच घरात आणण्याच्या प्रयत्नानेही या कलेला जन्म दिला असु शकतो. याच मुळे या रचनेत नुसती फुलं पानंच नाही तर निसर्ग निर्मित सगळ्याच वस्तु वापरल्या जातात.
या निर्माणाला लागणारं भांड म्हणजे कंटेनर मात्र तितकाच महत्वाचा असतो. म्हणजे जर तुम्हाला योग्य ऋतुला साजेसं मटेरियल मिळालं तर त्या मटेरियलला कुठल्या भांड्यात सजवल्यास हवा तो परिणाम साधला जाईल हा विचार अगदी महत्वाचा आहे. म्हणजे सृष्टीच्या निर्माणाला जसे मर्त्य शरिर जरुरी आहे तसचं काहिसं वाटतं.
इकेबानाची अनेक घराणी आहेत. प्रत्येक घराण्यांची शिकवण आणि विचार करण्याची पद्धत अर्थातच वेगळी आहे. पण तरिही रचनेमध्ये तीन मुख्य ऑब्जेक्ट्स असतातच. मी सुरुवात केली होती ते सोगेत्सु स्कुल. यात तीन ऑब्जेक्टसला शिन, सोए आणि हिकाए अशी नावे आहेत. आणि पाच महीन्यात माझे केवळ मोरिबाना नावाची एक बेसिक पद्धत शिकुन झाली या पद्धती मधे एका ठराविक पद्धतीने रचना मांडली जाते. अशाप्रकारे अनेक पद्धती आहेत. या सगळ्या पद्धती शिकुन झाल्या आणि त्यात मास्टरी मिळवली की मग तुम्ही तुम्हाला हवे ते प्रयोग करायला मोकळे. पण विद्यार्थ्यांनी मात्र या नियमांना धरुनच रचना करायला शिकायची असते.
आज अर्थात मी थोडीशी मोकळीक घेऊन, मनाप्रमाणे रचना करायचा प्रयत्न केलाय. पण बारिक नजरेने पाहिल्यास मला ही मोरिबाना स्टाईलच आहे अशी शंका येतय. माझं या क्षेत्रामधलं ज्ञान अगदीच संक्षिप्त आहे पण तरी तुमच्यापुढे निदान ओळख करुन देऊन नविन वर्षाची सुरुवात करावी असं वाटल्याने हा छोटासा प्रयत्न केलाय. तुम्हाला आवडला तर नक्की सांगा.
नविन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.
छान लिहिलं आहेस सावली. मी ही
छान लिहिलं आहेस सावली. मी ही केलाय इकेबानाचा कोर्स जपान टाईम्सचा. खूप वर्ष झाली त्याला, अर्थातच काही
लक्षात नाही आता. काही काही सामान मात्र अजून आहे माझ्याकडे.
जाता जाता 'आकेमाश्ते ओमेदेतो गोझाईमास'
मी पण या रचनांबद्दल बरेच
मी पण या रचनांबद्दल बरेच वाचले आहे या बघितल्याही आहेत. त्यातला अध्यात्मिक भाव माझ्यासारख्या दगडाला कधी जाणवलाच नाही, पण सौंदर्य मात्र पुरेपूर भिडले.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
छान माहिती सावली. तुला पण
छान माहिती सावली. तुला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!!
ह्या रचनेतुन तू काय 'स्टेटमेंट' मांडलं आहेस ते पण सांग
नवीन वर्षाच्या सुंदर शुभेच्छा
नवीन वर्षाच्या सुंदर शुभेच्छा दिल्यास तुला पण शुभेच्छा!!!
असा आहे होय इकेबानाचा अर्थ,
असा आहे होय इकेबानाचा अर्थ, आधी मला ती जपानी शिवीच वाटायची.
<< थोडसं अध्यात्माकडे झुकणारी कला. या कलेच्या माध्यमातुनही कलाकार आपलं स्टेटमेंट (काय मराठी शब्द?) मांडतो. तसं तर ते सगळ्याच कलातुन मांडतो नाही का? पण बर्याच वेळा ते प्रत्यक्ष असतं. इकेबाना मधे मात्र कुठेतरी मुर्ततेतुन अमुर्ततेकडे असा काहीसा उलटा प्रवास वाट्तो. अर्थातच हा मला जाणवणारा अर्थ. प्रत्येकाला जाणवणारा अर्थ आणि आकार वेगळा असु शकेल. >>>
शेवटी प्रत्येक कलेचा प्रवास ह्याच मार्गाने जातो, नाही ? ...
इकेबाना झेन तत्वज्ञानाशी रिलेट होते काय ?
नवीन वर्षाच्या शुभेच्छा! छान
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
छान माहितीपूर्ण, सचित्र लेख!
छान माहिती
छान माहिती
सावली,छान माहिती. नववर्षाच्या
सावली,छान माहिती.
नववर्षाच्या शुभेच्छा
छान लेख!! मला आमच्या बॉटनीचा
छान लेख!! मला आमच्या बॉटनीचा क्लास ची आठवण आली!! रचना खुपच छान झाली आहे!!
皆さん、明けましておめでとございます。
सावली, आमच्या तोकड्या ज्ञानात
सावली, आमच्या तोकड्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल अनेक आभार.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुलाही.
आकेमाशिते ओमेदेतो गोझाईमास.
आकेमाशिते ओमेदेतो गोझाईमास. !
छान तोंडओळख.
सर्वच जपानी गोष्टींमध्ये जो एक परिपूर्णतेचा (perfection) ध्यास असतो, आणि चवीढवींपासून सर्व जे अति-subtle असते, त्यातले मर्म कधी फारसे समजलेच नाही असे वाटते. असो.
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद (एवढ्या उशिरा उत्तराबद्दल क्षमस्व)
सिंडरेला, मी वर म्हटल्याप्रमाणे अगदीच शिकाऊ आहे. जपानमधे ते डोंगररांगावरुन उडणारे क्रेन पक्षी आणि आजुबाजुला फुलं उमललेली (वसंताचे आगमन) अशी असंख्य चित्र दिसतात. हि रचना करताना मला तसेच काहीसे अपेक्षित होते. सोनेरी गोल फांद्या आहेत त्या डोंगर आणि आजुबाजुला उमललेली फुले. तो क्रेन पक्षी आणि त्यावर लिहिलेली अक्षरे असं मिळुन लवकर वसंत ऋतुचे आगमन व्हावे अशी आशा. दुकानात अशा प्रकारच्या बर्याच तयार रचना मिळतात, त्यामुळे माझी रचना काही खुप ओरिजिनल नाही असं वाटतं.