रत्ननगरी "रत्नागिरी" – (९) चिपळुण परीसर

Submitted by जिप्सी on 30 December, 2010 - 12:35

=================================================
=================================================
आजच्या रत्नागिरी सफरीत आपण आज भेट देणार आहोत ते चिपळुण परीसरातील हेदवी, वेळणेश्वर, श्री परशुराम मंदिरांना. (सदर फोटो माझ्या दोन वर्षापूर्वीच्या रत्नागिरी भटकंतीतले आहेत. महाराष्ट्रातील या ठिकाणांची माहिती व्हावी म्हणुन पुन्हा या चित्रमालिकेत देत आहे.)
=================================================
वशिष्ठी नदी आणि परीसर (परशुराम घाटातुन)
श्री परशुराम मंदिर
जयगडची खाडी
गणपतीपुळ्याहुन गुहागरला जायचा राई–भातगाव पूल

=================================================
=================================================
हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश

महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिर आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातेल हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी हि वास्तु. मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते. मंदिर परिसरात असलेली गर्द आमराई, शांत व मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळा फुलांच्या बागा यामुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या व येथल्या परिसराच्या प्रेमात न पडला तर नवलच. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर वसले आहे हे हेदवी गाव. पूर्वी हे गाव जास्त प्रसिद्ध नव्हते मात्र दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे.

(श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर)

श्री दशभुज गणेशाचे हेदवी गावात आगमन कसे झाले त्याबद्दल असे सांगण्यात येते कि, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त येथे राहत होते. त्यांनी पेशवे यांची पुणे येथे भेट घेतली. केळकर स्वामींनी पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना मंदिराच्या उभारणीसाठी त्याकाळी १ लाख रुपये दिले. त्या पैशातून केळकर स्वामींनी हेदवी येथे हे मंदिर उभारले.मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढर्‍या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते असे म्हटले जाते. अशी हि भक्तांच्या हाकेला धावणारी वैशिष्यपूर्ण मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती पुजायचा अधिकार केवळ सेनेचे अधिपत्य करणार्‍यांनाच असतो असा पूर्वापार संकेत आहे. त्यामुळे पेशवेकाळात अशा मूर्त्या फार कमी तयार केल्या गेल्या. मंदिराच्या उजव्या कोनाडयात असलेली लक्ष्मी विष्णुची मूर्ती हि विशेष रुपातली आहे. मूर्तीच्या बाजुला जय-विजय असून मूर्ती गरुडारुढ आहे. याचा अर्थ असा कि श्री विष्णू भगवान भक्ताची हाक ऐकताच त्याच्या मदतीला जाण्यास सिद्ध आहे. टप्याटप्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद व माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अशा या निसर्गरम्य हेदवी गावास स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. येथे आपल्याला पर्यटन व तिर्थाटन या दोन्हीचा लाभ घेता येतो.

अशा या हेदवी गावात श्री दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिराव्यतिरीक्त अजुनही बरेच काही बघण्यासारखे आहे.

हेदवीचा सुंदर समुद्रकिनारा
श्री उमा महेश्वर मंदिर – हेदवीच्या समुद्रकिनारी डोंगराच्या पायथ्याशी उमा महेश्वराचे मंदिर आहे. १७७० ते १७८० दरम्यान अहिल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. समुद्रकिनारी खडकाळ भागात थोड्या उंचीवर असलेल्या या मंदिरापर्यंत भरतीचे पाणी येते. गाभार्‍यात एक शिवलिंग असून मंदिराजवळच एक गोड्या पाण्याचे कुंडदेखील आहे.

बामणघळ – हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरक्षित आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. ऐन भरतीच्या वेळेस येथे उंच उसळलेली लाट आपले स्वागत करते. डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी आदळून एक अरुंद घळ तयार झाले आहे. हिच ती सुप्रसिद्ध "बामणघळ". येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे जरा जपुनच!

बामणघळ

असे हे लक्ष्मीगणेशाचे सुंदर मंदिर समुद्राजवळच असल्याने समुद्राची गाज ऐकत आपल्या मनातील भक्तीभावाला साद घालण्याचा आनंद अवर्णनीय असतो आणि तो अनुभवण्यासाठी एकदा तरी हेदवीला अवश्य भेट द्या.

जायचे कसे?
१) मुंबई ते गुहागर ( ३१३ किमी)
गुहागर - पालशेत - अडुर - हेदवी (२४ किमी)

२) मुंबई ते गुहागर ( ३१३ किमी)
गुहागर - पालशेत - साखरीआगार - वेळणेश्वर - हेदवी (३० किमी)

=================================================
=================================================
श्री क्षेत्र वेळणेश्वर
=================================================श्री वेळणेश्वर
वेळणेश्वरच अप्रतिम समुद्रकिनारा

=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================

गुलमोहर: 

रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
http://www.maayboli.com/node/22045

रत्ननगरी "रत्नागिरी" – (२) श्री क्षेत्र मार्लेश्वर
http://www.maayboli.com/node/22073

रत्ननगरी "रत्नागिरी" – (३) प्राचीन कोकण–एक अनोखे म्युझियम
http://www.maayboli.com/node/22107

रत्ननगरी "रत्नागिरी" – (४) डेरवणची शिवसृष्टी
http://www.maayboli.com/node/22137

रत्ननगरी "रत्नागिरी" – (५) रत्नदुर्ग किल्ला
http://www.maayboli.com/node/22164

रत्ननगरी "रत्नागिरी" – (६) थिबा पॅलेस, पावस, भाट्ये समुद्रकिनारा
http://www.maayboli.com/node/22195

रत्ननगरी "रत्नागिरी" – (७) कशेळीचा श्री कनकादित्य
http://www.maayboli.com/node/22224

रत्ननगरी "रत्नागिरी" – (८) श्री महाकाली (आडिवरे)
http://www.maayboli.com/node/22249

छान प्रचि.
या घाटातून या नदीचे खूप मोठे पात्र दिसते. त्या नदीच्या दुसर्‍या बाजूला एका छोट्या टेकडीवर एक देवीचे मंदीर आहे. देवीचे नाव विसरलो. पण ती मूर्ती आणि परिसरही रम्य आहे. घाटात एक मोठा धबधबा पण आहे.

यो, दा धन्यवाद Happy

त्या नदीच्या दुसर्‍या बाजूला एका छोट्या टेकडीवर एक देवीचे मंदीर आहे. देवीचे नाव विसरलो. पण ती मूर्ती आणि परिसरही रम्य आहे. घाटात एक मोठा धबधबा पण आहे>>>>दा, देवीचे नाव "विंध्यवासिनी"(श्रीकृष्णकथेमधील देवकी-वसुदेव यांची सातवी कन्या) का?
आणि धबधबा "सवतसडा". Happy

जिप्सीजी, पुन्हा एकदा सलाम ! राई-भातगांव पूलाचा परिसर खरंच सुंदरच आहे.
<< त्या नदीच्या दुसर्‍या बाजूला एका छोट्या टेकडीवर एक देवीचे मंदीर आहे. देवीचे नाव विसरलो.>>
नदीच्या कांठावरचं, घाटातून दिसणारं तें मंदिर श्री करंजेश्वरीदेवीचं असण्याची शक्यता अधिक आहे.

योग्या, संपुर्ण मालिका जबरदस्त होती. एकेक भाग वरचढ होता. Happy

तुच आमचो कोकणचो हापुस.. ! Happy

भाऊ, विंध्यवासिनीचे मंदिर देखील त्याच परिसरात आहे ना? मी अजुन पाहिले नाही पण ऐकुन आहे या देवळाविषयी.

माझं आजोळ आहे चिपळूण. मी गेल्या आठवड्यात २ दिवसांसाठी चिपळूणला गेले होते तेव्हा परतताना विंध्यवासिनीचं दर्शन घेतलं. योग्या, तीच ती वसुदेव देवकीची सातवी कन्या, नंदिनी महालक्ष्मी, विंध्यवासिनी. तिच्या मागच्या जंगलामुळे एकदम शांत परिसर राहिलाय अजून. पुर्वी आम्हाला गोवा रोडवरुन शेताडी तुडवत बांधांवरुन जावं लागायचं खूप आत. आता मंदिरापर्यंत कार नेता येते. बाहेर एकच ओटीचं सामान मिळायची टपरी.

जायला हवं होतंस तू तिथे. मी मे महिन्यात श्रीपरशुरामांचं दर्शन घेतलं यावेळेच त्यांच्या आईचं Happy

चिपळूणात एका टेकडीवर एक घर दिसतं. तो म्हणे लोटणचा दर्गा आहे. तिथेही एकदा जाऊन यायचंय.

:गण्या धाव रे.. गण्या पाव रे..... - बाल्या डान्स करणारी बाहुली:

<<विंध्यवासिनीचे मंदिर देखील त्याच परिसरात आहे ना?>> होय, पण नदीकांठी ,टेकाडावर घाटातून दिसणारे मंदिर मात्र करंजेश्वरीचं असावं. विंध्यवासिनीचं मंदिर पुरातन आहे, सुंदर आहे पण अगदीं नदीकांठी नसून डोंगराच्या उतारावर झाडीत असल्याने घाट उतरताना दिसणारं मंदिर तें नसावं, असं मला वाटतं.

योगेश...

सर्व माहिती व फोटो नेहमीप्रमाणे छान.....

राई भातगाव च्या पुलावरुन सुर्यास्त खुप छान दिसतो.... आम्ही नेमके त्या वेळी तिथे होतो...

करंजेश्वरी - नदीकाठी. आमची (पटवर्धनांची) देवी.
विंध्यवासिनी - चिपळूणातच.

आणि हे तर आमचं (सावंतांचं) भातगाव

विंध्यवासिनी मंदिर परशुराम मंदिरापासुन जवळच आहे का? मला पाहयचे होते, पण वेळ कमी असल्याने/आणि जास्त माहिती नसल्याने नाही जाता आले. Sad
करंजेश्वरी देवी/मंदिराबद्दल जाणुन घ्यायला आवडेल.
मी कधीही कोकणातील मंदिरात गेलो कि तेथील पुजार्‍यांशी अवश्य बोलतो/भेटतो. खुप काही माहिती मिळते Happy

विंध्यवासिनी खुद्द चिपळूणातच रे. स्टँडच्या अलिकडच्या स्टॉपच्या इथे डावीकडे रस्ता जातो. आधी पुजारी साठ्यांचं घर मग अजून पुढे जाऊन विंध्यवासिनीचं देऊळ. विंध्यवासिनीच्या पुजार्‍यांशी पण जाऊन बोल नेक्स्ट टाइम. मामा आहे तो माझा.

हेदवीच्या गणेशमूर्तिच्या फोटोकरता धन्यवाद
वेळ्णेश्वरची पिन्डी अन नाग माझ्या स्वप्नात आलेला / दिसलेला, काही वर्षान्नी तेथे प्रत्यक्ष गेलो तेव्हा जसच्या तस आठवलेल Happy
व्वा, मस्त सफर झाली, जुन्या आठवणी जागल्या

मग टेकडीवर कुठलं देऊळ आहे?

त्या लोटणच्या दर्ग्याबद्दल कुणाला माहिती आहे का? आजीच्या मागल्या अंगणातून लांबवर डोंगरावर दिसणारं ते एकुलतं एक घर हा माझ्या कुतुहलाचा विषय होता आणि अजून आहे.

विंध्यवासिनीच्या पुजार्‍यांशी पण जाऊन बोल नेक्स्ट टाइम. मामा आहे तो माझा.>>>>>नक्कीच Happy
आता माझ्या कोकण भटकंतीत संगमेश्वरचे कर्णेश्वर, विंध्यवासिनी, करंजेश्वरी, दसपटची रामवरदायिनी, हसोळची आर्यादुर्गा, गुहागरचा उरफाटा गणपती, व्याडेश्वर इ. मंदिराची लिस्ट नक्कीच. Happy

खुप खुप धन्यवाद सगळ्यांचे. Happy

जिप्सी, तुम्ही लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत आहात. दर मे महिन्यात चिपळूण, अंजनवेल, गुहागर -(अंजनवेल (पणजोबांचे गाव), पाटण, गुहागरला पप्पांचे काका) ट्रीप तर आजोळ गोवा तर रत्नागीरीला इतर मावसाज्या म्हणून भेट.
हि ठिकाणं अगदी व्हायचीच दर वेळी. मजा वाटतेय हे बघायला.

अंजनवेल कधी कवर करताय?

अंजनवेल कधी कवर करताय?>>>>मन:स्विनी, बघु आता अंजनवेल, गोपाळगडला कधी मुहूर्त मिळतोय ते. तसं दाभोळ बंदरावरून वेलदूरपर्यंत जाऊन आलोय, पण ते फक्त फेरीबोटीतुनच. Happy

जिप्सि
परत जाल तेव्हा कळकवन्याचि रामव्ररदायिनि नक्कि पाहुन या, आमचि कुलस्वामिनि आहे ति.
दापोलिला पडघवलिला जा. संगमेस्वरचे कन्रेश्व्रर, शास्त्रि नदिचा संगम पाहा
कोकणातलि प्रत्येक वळण सुंदर आहे

विभा

ह्या मालिकेतल्या प्रत्येक भागागणिक हे सगळं पहायची उत्सुकता वाढतेय. पुलाचा फोटो मस्तच आलाय.

Pages