बाभूळ भाग १ - फोटोसहित

Submitted by दिनेश. on 30 December, 2010 - 07:48

बाभळीचे कूळ अकाशिया. या कूळाचा विस्तार खूप मोठा. सुंदर नाजूक गुलाबी फूलांचा कॅशिया, ते ज्यापासून काथ करतात ते खैराचे झाड, सगळे याच कूळातले. आणि या पूर्ण कूळाचा एका लेखात आढावा घेणे, केवळ अशक्य.

म्हणून आपण ज्याला साधारण बाभूळ म्हणतो ती झाडे आणि त्याचा पूर्व आफ़्रिकेतील भाऊबंद, यांचीच
वरवरची ओळख करुन घेऊ या.
महाराष्ट्रातल्या सगळ्याच ग्रामिण भागांबद्दल मी सांगू शकणार नाही, पण कोल्हापूर सांगली भागात, तसेच
नगर भागात, शेताच्या बांधावर बाभळीचे झाड असतेच. इथले मातीचे बांध, पावसात धूपतात, त्यानंतर
शेताच्या सीमा ठरवण्यासाठी या झाडांचा उपयोग होतो, असे आजोबा सांगत असत.

लहानपणी आजोळी शेतात फिरताना, बाभळीच्या झाडाचे काटे बघून भितीच वाटायची. अनेकदा पायात
रुतणारा काटा हाच असे. मराठी चित्रपटातही, नायिकेच्या पायात हाच काटा रुतत असे. आणि बाभळीच्याच काट्याने तो काढताही येत असे. बाभळीवर सुगरणीची घरटी पण खूप वेळा दिसत.
रस्त्याच्या बाजूने शेताला कुंपण म्हणून बाभळीच्याच फांद्या लावलेल्या असत. त्यातले काटे बघून, त्याच्या
जवळ जायचे धाडसही व्हायचे नाही.

पण बाभळीचे तसे इतरही उपयोग असायचे. आजोळी, माझी आजी घरीच दातवण करत असे. आणि त्यासाठी तिला बाभळीची साल लागत असे. मामाबरोबर जाऊन मी ती जमा करुन आणत असे.
त्यावेळी आम्ही झाडाचा डींकही गोळा करत असू. सटर फटर कागद चिकटवायला हा डिंक उपयोगी पडत असेच, पण तो तोंडात घालून चघळायला पण मजा यायची. याच डींकाचे लाडू पण करत असत.

बाभळीचे लाकूण उत्तम जळण असते. त्याची उष्णता दमदार असते तसेच ते बराच वेळ जळत राहते. घरच्या बेकरीसाठी पण बाभळीची लाकडे आणली जात असत.
त्या भागात आहे ती साधारण पिवळी गोल फूले येणारी बाभूळ. एप्रिल महिन्यात हि झाडे पिवळ्याधम्मक फूलांनी भरुन जात असत. वळवाच्या पावसाआधी भरुन आलेल्या आभाळासमोर हि झाडे खूपच सुंदर दिसत असत.

खरे तर हे एक फुल नसून, अनेक फुलांचा गुच्छ असतो.

पुढे पुढे त्या झाडाला शेंगाही लागलेल्या दिसत.

तिथे जी झाडे आहेत ती खडबडीत खोडांची. त्याच्या सालीच्या भेगांत अनेक किडे दिसत. पण त्यापेक्षा वेगळे प्राणीजीवन त्या झाडांवर दिसत नसे. माकडे पण या झाडावर फ़ार दिसत नसत. आजूबाजूला आंब्याची वगैरे भरपूर झाडे असल्याने. तसे त्यांचे आणि आमचेही या झाडांकडे फारसे लक्ष जात नसे.
पुढे मायबोलीकर कूल आणि चंपक बरोबर नगर भागात भटकताना, तिथेही मला बाभळीची बरीच झाडे दिसली.

हा माझ्या नजरेच्या दोष आहे का ते माहीत नाही, पण तिथल्या बाभळी मला, कोल्हापूरच्या बाभळींपेक्षा जास्त पर्णसंभाराच्या दिसल्या. तसेच सरळसोट फांद्या असणारी रामकाठी नावाची बाभूळ पण तिथे दिसली. (रामकाठी बद्दल, कुणाला जास्त माहिती असेल तर इथे लिहा, प्लीज)

कोकणात मात्र तितक्या बाभळी दिसल्या नाहीत. तिथे क्वचित दुरंगी बाभूळ दिसते. म्हापश्याला माझ्या आत्याकडे याचे मोठे झाड आहे. तिच्याकडे ते केवळ फूलांसाठी जोपासलेले आहे. संपूर्ण झाड गुलाबी पिवळ्या फूलांनी भरुन जाते, त्यावेळी ते खुपच छान दिसते.

या फूलातला जो गुलाबी भाग असतो तो संध्याकाळी पांढरा होतो. आणि रात्र पडल्यावर तो जरासा चमकतो देखील. या जादूगिरीत, या झाडाचा, दिवसाचे आणि रात्रीचे दोन्ही प्रकारचे किटक आकर्षित करुन घ्यायचा हेतू असणार.

या गुलाबी पिवळ्या रंगाप्रमाणेच लाल पिवळ्या रंगाची पण बाभूळ असल्याचे वाचले होते, पण मला ती कधी बघायला मिळाली नाही.

आफ़्रिकेत आल्यावर मात्र बाभळीची नव्याने ओळख झाली. पूर्व आफ़्रिकेच्या जंगलात चित्रीत झालेले चित्रपट
वा माहितीपट जर तूम्ही बघितले असतील तर त्यात विस्तिर्ण गवताळ प्रदेशात मधेच उभे असलेले एक झाड
बघितले असेल. ते अर्थातच अकाशियाचे असते. या झाडाचा एक सर्वसाधारण आकारही ठरलेला असतो. एक उभा सरळसोट बुंधा आणि त्यावर जमीनीपासून काही उंचीवर चहुबाजूने फूटलेल्या फांद्या. वरती विरळ पर्णसंभार पण वरची बाजू मात्र काहिशी सपाट.

या झाडाची अशी का वाढ होते याचेही कारण आहे. आधी त्याच्या बिया इथे कशा रुजतात ते बघू.
बाभळीच्या बिया या पौष्टिक गराने युक्त असतात. आणि त्या प्राण्यांना खूप आवडतात. या झाडांना फ़ूले
येताच आणि शेंगा कोवळ्या असतानाच अनेक किटक त्यावर अंडी घालतात. या किटकांच्या अळ्या
या शेंगातच वाढतात. या अळ्या म्हणजे या झाडाच्या शत्रु कारण त्या शेंगातल्या गराबरोबरच बियाही हि
खाऊन फस्त करतात. म्हणजे या अळ्यांच बंदोबस्त करायला हवाच, आणि हे काम हे झाड एका खास
दोस्ताकडून करुन घेते.

या अळ्या येऊच नयेत अशी व्यवस्था करणे या झाडाला शक्य नसते कारण परागीभवनासाठी किटक
तर हवेच. या शेंगा माकडांचा पण आवडता खाऊ. झाडावर ठिय्या देऊन, हाताने एकेक शेंग तोडून माकडे
खात असतात. पण माकडांचाही तसा या झाडाला उपयोग नसतो. कारण माकडे शेंगा खाताना त्या चावून
चावून खातात. अशा चर्वणात अळ्याही भरडल्या जातात आणि बियाही.

पण माकडे प्रचंड उचकापाचक करतात. अनेक शेंगा उगाचच तोडून झाडाखाली टाकतात. आणि मग या
झाडाच्या दोस्ताचे म्हणजेच हत्तीचे काम सुरु होते.हत्तीला पण या शेंगा खुप आवडतात. आपल्या सोंडेने
तो या झाडाखालच्या शेंगा अलगद टिपून घेतो. तो झाडावरच्याही शेंगा काढून घेतो. पण या शेंगा खाताना
हती फार चर्वण करत नाही.

हतीच्या पोटातील पाचकरसाने या शेंगातील अळ्या मरुन जातात, पण बिया मात्र सुरक्षित राहतात. हतीच्या
अमाप भटकंतीत या बिया दूरवर वाहून नेल्या जातात आणि विसर्जित केल्या जातात.
आता या बिया, सर्वच अर्थाने सुरक्षित झालेल्या असतात. अळ्यांचा बंदोबस्त झालेला आसतोच शिवाय
हत्तीच्या शेणाच्या रुपात, त्यांना आयतेच खत मिळालेले असते. त्यानंतर जर पाऊस पडला, तर या बिया
अत्यंत जोमाने वाढू लागतात.

अशी जोमदार सुरवात झाली तरी पुढचा मार्ग सूकर नसतो. असे हिरवे पान असलेले रोप म्हणजे हरण
वर्गातील प्राण्यांना आमंत्रणच. असा हिरवा चारा त्यांच्या नजरेतून सूटणे कठीण. म्हणून या झाडांच्या
पहिल्या काहि फांद्या जमिनीलगत पसरत जातात. आणि त्यावर भरपूर मोठे काटे असतात.
काट्यांमूळे अमर्याद चरण्यावर बंदी येते तसेच लांबवर फांद्या पसरल्याने मधला वाढणारा भाग सुरक्षित राहतो.

समजा काही काळ असा तग धरता आला, कि यातला मधला भाग जोमाने वाढू लागतो. या बुंध्याची वाढ वरच्या दिशेने जोरात होऊ लागते, व जोपर्यंत आवश्यक असते तोपर्यंत भोवतालचे फांद्यांचे कुंपण राखले जाते. कालांतराने ते नष्ट होते. आता या झाडाची पाने हरणासारख्या प्राण्यांच्या आवाक्यात राहिलेली नसतात.

असे वाढलेले झाड आता जिराफ़ासारख्या प्राण्यांच्या नजरेत भरु लागते. आणि अर्थातच त्यांची धाव इथपर्यंत पोहोचते.

कितीही तीक्ष्ण व लांब काटे असले तरी, जिराफापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचा काही उपयोग नसतो.
जिराफाची खरखरीत जीभ, या काट्यांपासून पूर्णपणे सुरक्षित असते. यावर उपाय एकच, तो म्हणजे
फांद्यांचा विस्तार जास्तीत जास्त पसरट करुन, जिराफाला जरा लांब ठेवायचे. हा उपाय सध्यातरी
उपयोगी पडतोय. जिराफ फक्त कडेकडेचीच पाने खात असतात. मधल्या भागात पोहोचण्याचा ते
प्रयत्न करत नाहीत.

आणि गरजच नसल्याने, या मधल्या भागात या बाभळीला काटेच नसतात.

पण जर जिराफांचा धोका नसेल, तर मात्र हे झाड गोलाकार वाढते.

या झाडाची बाकीची दोस्तमंडळी, त्यांचासाठी या झाडाने केलेल्या सोयी आणि या झाडाचा प्रतिस्पर्धी
असणार्‍या गवताशी याची स्पर्धा, याबाबत पुढच्या भागात.

गुलमोहर: 

हतीच्या पोटातील पाचकरसाने या शेंगातील अळ्या मरुन जातात, पण बिया मात्र सुरक्षित राहतात. हतीच्या
अमाप भटकंतीत या बिया दूरवर वाहून नेल्या जातात आणि विसर्जित केल्या जातात.
आता या बिया, सर्वच अर्थाने सुरक्षित झालेल्या असतात. अळ्यांचा बंदोबस्त झालेला आसतोच शिवाय
हत्तीच्या शेणाच्या रुपात, त्यांना आयतेच खत मिळालेले असते. त्यानंतर जर पाऊस पडला, तर या बिया
अत्यंत जोमाने वाढू लागतात.>>>>>>>>>>>

बाभूळ माळरानावर अतोनात वाढण्याचे हे रहस्य आहे होय.... !!!!

दिनेशदा... छायाचित्रे येउ द्या.

तू चित्र टाकून पोस्ट बदलून टाकलास म्हणून माझी कमेंट पण बदलून... Lol
फोटो मस्तच... Happy गावची आठवण आली एकदम..

मला वाटते बांधावर बहुत ठिकाणी बाभळी असतेच.. बाबांच्या आजोळी (वेढी - माकुणसार) सुद्धा बाभळीची झाडे असत. एकदा लहान काटा माझ्या हातात रुतला पण होता. तो बाबांनी काढला पण त्याचा डाग अजूनही डाव्या हातावर आहे.

बाभूळ माळरानावर अतोनात वाढण्याचे हे रहस्य >>> हे हे ... भारीच माहिती मिळाली.. तू मस्त विषयावर लिहितोस.. पुढचा भाग लवकर टाक.. Happy

फोटो येउदे फोटो येउदे फोटो येउदे फोटो येउदे फोटो येउदे फोटो येउदे फोटो येउदे फोटो येउदे फोटो येउद्या लवकर

या बाभळीची फुले इतकी नाजुक्,सोन पिवळ्या रंगाची असतात आणी काटे मात्र एकदम सणसणीत्.त्या विरोधाभासाची लहान पणी गम्मत वाट्लेली. कधितरी त्या काट्यांचा पायाला प्रसाद मिळाला होता,तेंव्हा आम्ही झाडाखालून जाताना अगदी साम्भाळून जायचो.संध्याकाळी रेल्वेने घरि परतताना या बाभळी अशा ओळीने शेतान्च्या बान्धाला दिसायच्या. तिन्ही सान्जेच्या वेळी आभाळाच्या बॅकड्रॉप वरती बाभळीच्या सम्भाराची नक्शी अगदी तशी च्या तशी आठवली.

य फुलाना गोड्सर वास येतो ना?आम्ही ती फुले लहानपणी कानात घालायचो ते ( आमचं गावठी कर्णभुषण) आठ्वून आता हसू आल्. शांता शेळकेंच्या एका कवितेत बाभळीच्या फुलान्चा आणी ती कानात घातल्याचा उल्लेख केलेल आहे.पण आता आठ्वत नाही.

शेवरी नावाचे पण एक झाड खुप कॉमन होते.जिकडे तिकडे दिसत असे.आमच्या बागेत हि एक दोन होती.आमच्याकडे येणार्या कामवाल्या मावशी आठवणीने आपल्या शेळ्या बकर्या न्च्या करिता त्या शेवरीचा पाला घेऊन जात असत्.

नेहेमी प्रमाणेच... सुंदर आणि विचारांना चालना देणारा लेख. झाडाच्या विस्तारामागे एवढे रामायण असते हे वाचून नवल वाटते. आम्हाला एकदा शाळेत आजुबाजूची झाडे, फांद्या घेऊन येण्याचे फर्मान सुटले होते. त्यावेळी मी बाभळीची फांदी घेऊन गेले होते. तेव्हापासून मला बाभळीच्या फुलांचा वास आवडतो. वेगळाच, उग्र असतो. ती दुरंगी बाभुळफुले काय सुरेख आहेत.

'.......वळवाच्या पावसाआधी भरुन आलेल्या आभाळासमोर हि झाडे खूपच सुंदर दिसत असत.' किती बारीकपणे आणि अचुक निरिक्षण केलय.दिनेशदा, तुमच्या निरिक्षण शक्तीला, व्यासंगाला ___/\___.

नेहमीप्रमाणेच मस्त ! ती दुरंगी फुलं कसली गोड दिसतायेत.
<<आणि गरजच नसल्याने, या मधल्या भागात या बाभळीला काटेच नसतात.>>
मस्त निरीक्षण.पुढचा भाग वाचते आता.

बाभळीचे फोटो आणि वर्णन फारच सुंदर ! मला बाभळीविषयी काहिच माहिती नव्हती. खरं सांगायचं तर माझ्या जनरल नॉलेजविषयी असणार्‍या अज्ञानाचि मझी मलाच कीव येते. तुमच्या लेखांमुळे ते थोडे थोडे दूर होतेय. Uhoh

दिनेशदा, खरच फोटो आणि वर्णन दोन्ही फारच छान. प्रत्येक झाडाचा इतिहास, त्याचे उपयोग, सर्वच माहिती तुम्ही इतकी उपयुक्त देता की प्रज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्यामुळेच आमच्या ज्ञानात भर पडत आहे. (खर तर नवीन नवीन माहिती मिळत आहे.) फार फार धन्यवाद!!!!!!!!!!!!!!

दिनेशदा,
छान माहिती !
बाभळीच्या पांढरट करड्या रंगाच्या आणि पिवळ्या (गुळगुळीत आवरण) असे बियांवरुन दोन तरी प्रकार गावाकडे सरास दिसतात.
यातल्या एकाची पाने मात्र थोडी मला तरी पांढरट फिक्कट, हिरवी दिसली
Happy

नलिनी, बरे झाले इथे भेटलीस, मला रामकाठी बद्दल आणखी सांग. मूळात त्या बाभळीला काटे असतात का ते पण सांग.
काट्यांचा झाडाला स्वतःला काही उपयोग नसतो. ते संरक्षणासाठीच (माणसाच्या पायी यायचे पण त्यांना काही कारण नसते. माणसाचेच पाउल वाकडे पडत असते.)
मधल्या भागात बाभळीला काटे नसतात हे तर मी लिहिलेच आहे, त्याचा फोटो पण मिळाला आहे. पण जर धोका "वाटला" नाही तर खालच्या फांद्यांना पण काटे नसतात. त्याचाही फोटो मिळाला.
गरज नसताना संरक्षणावर खर्च करायला बाभळी म्हणजे काय भारत / पाकिस्तान आहेत का ?