दे कॉल मी इ. झेड - शेवट

Submitted by कौतुक शिरोडकर on 4 February, 2010 - 05:00

सुरुवात - http://www.maayboli.com/node/13598
मध्य - http://www.maayboli.com/node/13766

३१ जानेवारी २०१०
खान अल खलीली बाजार, कैरो, इजिप्त
सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी
कॉफी हाऊस

वेटरने कॉफीचे दोन मग समोर ठेवले.
"शिशा ?" त्याने विचारलं. दोघांनी नकारार्थी मान डोलावली.
"बोल." समोरच्या मगातील अरेबिक कॉफी ढवळत प्रिन्सने विचारलं.
"जमालने तुमच्यासाठी निरोप पाठवलाय. सध्याच्या यंत्रणाचा जोर पहाता आत्मघाती दस्ते पाठवणं थोड किचकट झालय. माणसं काम होण्याआधीच कामी येताहेत." सुरमेवाल्याने टेबलावर झुकून बोलायला सुरुवात केली. त्याची नजर प्रिन्सच्या चेहर्‍यावर 'क्ष' किरणासारखी फिरत होती. प्रिन्सच्या ते लक्षात आल तरी त्याने तस चेहर्‍यावर दाखवलं नाही.
"बर मग ? "
"आम्ही एक वेगळा मार्ग शोधून काढलाय. सुरुवातीस किचकट आणि खर्चिक असला तरी यात नंतर धोका नाही."
"काय आहे तो मार्ग ? "
"जैविक आत्मघाती हल्ला."
"तुम्हाला हे करता येईल ? " प्रिंसच्या आवाजात अविश्वास होता.
"हो. आमच्याकडे तसं मनुष्यबळ आहे."
"ठिक आहे. फक्त वायरस कोणता ते मी सांगेन."
"हरकत नाही."

२ फेब्रुवारी २०१०
ट्रान्सकॉर्प हिल्टन हॉटेल, अबुजा, एफसीटी, नायजेरीया
दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी
बुक्का रेस्टॉरंट

"जेवताना बोललं तर तुम्हाला चालतं ना ?" एडवर्डने डॉ. लुंगा यांना विचारलं.
"हो." डॉ. लुंगा यांनी तोवर काटे चमचे हातातही घेतले.
"गुड. मी तुमचे डिटेल्स चेक केलेत. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टबद्दल खात्री आहे ?"
"शंभर टक्के. निसर्गाचा साधा नियम आहे तो. जिथे उत्पत्ती आहे तिथे लय आहे. गार्सिनिया कोलावर डॉ. मॉरिस यांनी जरी संशोधन केल असलं तरी ते अपुरं आहे. पैशाच पाठबळ इथे म्हणावं तस नाही. एबोलावर औषध या जंगलातच आहे. तुम्हाला काय वाटते ? १९७६ च्या आधी हा रोग इथे कुणाला झाला नसेल ? शक्य आहे का ते ? कदाचित तेव्हा वेगळं नाव असेल. पण एबोलाच्या भयानक रुपाला इथले लोक घाबरले नाहीत. इथेच राहीले. पिढ्या न पिढ्या टिकल्या. विषाणू जसा जीवाणूला खातो तसे जीवाणू देखील
विषाणूंचा नाश करतात. माणसांसारखा जंगलात सहजीवनाचा कायदा चालतो. वनस्पतीच्या जीवावर जगणार्‍या किड्याला अटकाव करण्यासाठी वनस्पतीत उत्क्रांती होते आणि त्याचवेळेला त्या किड्यातही उत्क्रांती होत असतेच. किटूम गुफेतून एबोला बाहेर पडलाय असा इतिहास आहे. पण शोधात तो तिथे सापडला नाही. याचाच अर्थ तो तात्पुरता तिथे नाश पावला असेल. त्याचा नाश करणारा कोण ? ते शोधलं की बाकी सगळं सहज सोपं होईल. वर्षारण्यातल्या अनोळखी वनस्पतीपैकी एखादी नक्कीच असेल जी एबोलाला जुमानत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक घटकाचे काही ना काही उपयोग आहेत. भारतात जसा आयुर्वेदात अनेक घटकांचा उपयोग विशद केला आहे, तसाच इथल्या जंगलात राहणार्‍या आदीवासींकडेही अनेक दुर्मिळ वनस्पतींच्या औषधी उपचाराच्या माहीतीचा मोठा खजिना आहे. तो ते परक्या माणसांसमोर उलगडून दाखवणार नाहीतच. त्यांच्या स्वतःच्या अशा अनेक दंतकथा आहेत ज्यामुळे ते असलं काही करायला धजावत नाही. मी त्यांच्यातलाच एक आहे आणि मला त्यांच्या भाषा येतात. " हातातले काटे चमचे बोलताना हातवारे करत हवेत फिरवणारे डॉ. लुंगा एडवर्डला क्षणभर 'सनकी' वाटले पण जगाच्या इतिहासात लागलेले शोध अशा सनकी लोकांनीच लावले असल्याचे त्याने कधीतरी वाचले होते.
"डॉक्टर, मि. ब्राऊन यात पैसा घालायला तयार आहेत. फक्त त्यांना खात्री हवीय. तुमच्या लक्षात येतय ना मी काय म्हणतोय ते ?"
"नक्कीच. त्यांनी गुंतवलेली पै न पै त्यांना दुप्पटीने परत मिळेल. ते मी आधी सिद्ध करेन."
"ठिक आहे मग. हे ठरल तर." एडवर्डने ग्लास उंचावला.


१६ फेब्रुवारी २०१०
झियाउद्दीन मेडीकल युनिवर्सिटी, कराची. पाकीस्तान
दुपारी २ वाजून २२ मिनिटांनी
पार्किंग विभाग

दोघे शांतपणे बाहेरचा परिसर न्याहाळत होते. लोकांची ये-जा सुरु होती. तेवढ्यात एकजण त्यांच्या दिशेने येताना दिसला. दोघांपैकी एकाने काच किंचित खाली केली. पलिकडच्या पांढर्‍या कोटातल्या माणसाने एक जाडजूड ए ३ साईज पाकीट आत सारलं आणि तो घाईघाईने निघून गेला. पाकीट घेणार्‍याने ड्रायव्हरला इशारा केला आणि गाडी पार्किंगमधून बाहेर पडून शहराच्या दिशेला वळली.
"यात तुझ्या प्रश्नांची उत्तरे आहेत." हातातील पाकीट प्रिंसकडे सोपवत तो म्हातारा बोलला.
प्रिंसने पाकीट खोलून आतली फाईल बाहेर काढली. दोन-तीन पाने चाळली. एका हाईलाईट केलेल्या ओळीवर त्याची नजर गेली. त्याने ते वाचलं.
"गोल्डफार्मा अपाँईंटेड डॉ. लुंगा अ‍ॅज हेड ऑफ रिसर्च टिम हु विल वर्क ऑन वॅक्सीन फॉर एबोला. एबोला ? "
"मेजर, त्याच्यात सगळी माहीती आहे. जमालला त्याची एक प्रत दे. पुढचं काय ते तो बघेल."

१९ मार्च २०१०
न्युयॉर्क, अमेरिका
सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी
गोल्डनेट ऑफिस

"एडी, अमेरिकन गवर्मेंट अनेक खर्चात हात आखडता घेतेय."
"डेरेक बोलला मला. भविष्यातल्या संभाव्य धोक्याचा आताच विचार करण्याएवजी सध्याची विस्कटलेली घडी बसवणे जास्त महत्त्वाचे आहे अस राष्ट्राध्यक्ष म्हणताहेत. शांततेचा नोबल मिळालेला हा माणूस ३० बिलियन दहशतवाद्याविरुद्ध लढण्यासाठी मागतोय. अल कायदाविरुद्ध युद्ध छेडलय त्याने. हे आपल्यासाठी चांगल आहे. अशाने सीडीसी व इतर संलग्न संस्थांचा पतपुरवठा अर्ध्यावर येईल आणि तसं झालच तर एबोलावर औषध फक्त आपल्याकडेच असेल आणि ते वॅक्सीन सोन्याची खाण ठरेल."
"मला कॉमटेकचा आपला नियम आठवला बघ."
"कोणता ? "
"हाच. आधी वायरस पसरवा आणि मग एन्टीवायरस विका. कंपनी बदलली, स्वरुप बदललं पण नियम तोच." एडीने ब्राऊनकडे पाहीलं.
"कधी कधी मला तुमची भीती वाटते मि. ब्राऊन." एडीला ब्राऊन यांचा हा पवित्रा नेहमीपेक्षा वेगळा वाटला.
"मलाही." आणि ब्राऊन मंद हसले. "धंद्यासाठी बरचं काय करावं लागतं एडी. आशा करू या की लुंगा लवकरच काहीतरी चमत्कार करेल."
"तो करणारच. त्याला करावच लागेल." एडवर्डचा चेहरा किचित चमत्कारिक झाला. त्याच्या डोळ्यासमोर आजवरच्या खर्चाचे आकडे होते. कॉमटेकचं अपयश धुऊन काढण्यासाठी ह्यात यशस्वी होणं आता गरजेचं होतं.

१९ मार्च २०१०
हेसारक मेडीकल हेल्प, अफगाणिस्तान
संध्याकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी
तळघर

"एन.एच.एल्.एस. मधून जास्त सोयिस्कर ठरेल." सुरमेवाल्याच्या या वाक्यावर जमालने मान डोलावली.
"जे करायचय ते लवकर करा. तीन महिन्यात यंत्रणेची पहिली पायरी उभारून होईल."
"डॉ. गाझी, हा रोग हवेतून फैलावण्यासाठी काही करता येईल का ?"
"विषाणूला आपल्या पद्धतीने उत्क्रांत करण्यात धोका आहे. पण आता काही चर्चा करण्यात अर्थ नाही. तुम्ही विषाणू आणल्यावरच बोलता येईल. शिवाय योग्य अशी यंत्रणा उभारणं इतकं सोप नाही. शक्य तेवढ्या गोष्टी आपणच बनवू. फक्त बाहेरून आणाव्या लागणार्‍या वस्तू मात्र काळजीपुर्वक आणाव्या लागतील. त्याचा गाजावाजा होता कामा नये."
"जमाल, यासाठी आपल्या माणसापैकी कोणी वापरता कामा नये. आपण दुसर्‍या कोणाकडून तरी ते करून घेऊ." सुरमेवाल्याने आपलं मत नोंदवलं. जमालने पुन्हा मान डोलावली.

२१ जुन २०११
कैरो, इजिप्त
दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी
विमानतळाबाहेर

"भेटवस्तू रवाना झाली आहे. मीही येतोय. इथलं सार काही नीट आवरण्यात आलय. " सुरमेवाल्याने फोन कट केला आणि तो विमानतळाच्या दिशेने निघाला.

२ जुलै २०११
वॉशिंग्टन डिसी, अमेरिका
संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी
हॉटेल मेफ्लॉवर

"डेरिक, ब्राऊनला आता आयटीत काहीच रस उरलेला नाही. त्याला त्याच्या संपत्तीच्या आकडेवारीत घट आवडत नाही. फॉर्ब्सच्या यादीत त्याला वरच्या क्रमांकावर जायचय. यात मला तुझी मदत हवीय."
"एडी, त्याच्या महत्त्वाकांक्षा मी समजू शकतो. पण सध्या अमेरिकेला काळजी आहे ती पहिल्या क्रमांकाची. महासत्ता असल्याचा दर्जा हिरावला जाण्याची भीती राष्ट्राध्यक्षांच्या तोंडी हल्ली असते. मलाही भविष्यात एखाद्या दुय्यम देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणवून घेण्यात रस नाही. चीन व भारत यांची घौडदौड वेगात आहे. चीनपेक्षा जास्त त्रास भारताचा आहे. चीन उत्पादनसंख्येकडे लक्ष देतो तर भारत उत्पादन दर्जाकडे. गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी निर्यात वाढवली आहे. चीनचा स्वस्ताईचा मुलमंत्र मागे पडतोय. भारताने मागे २०० टन सोनं आयएमएफकडून घेतलं होतं हे लक्षात आहे ना ? त्याची पुनरावृती पुन्हा होणार आहे. आज अमेरिकेला अनेक धोरणात भारतामुळे बदल करावे लागताहेत. इथल्या उच्चपदस्थात भारतीयांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या बुद्धीसमोर अनेक नतमस्तक झालेत. आयटीमध्ये त्यांची झेप प्रचंड झालीय. हे सगळं भ्रष्टाचाराच्या यादीत तो देश वरच्या क्रमांकावर असूनही. उद्या जर का तिथे एखाद चांगल स्थिर सरकार टिकलं तर काय होऊ शकेल ?"
"डेरिक, तो राजकारणाचा विषय आहे आणि मी धंद्याबद्दल बोलतोय."
"मित्रा, हे दोघे एकमेकांना पुरक आहेत हे विसरू नकोस. हे बघ, येत्या काही दिवसात राष्ट्राध्यक्षासह बैठक आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. ते मी तुझ्या कानावर घालेन. तुला त्याचा उपयोग कसा करता येईल ते तू बघ."
"नक्कीच. मला जैविक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करायचा. 'नॅनो' प्रणाली गोल्डनेटला पहिल्या क्रमांकावर नेऊ शकते. डेरिक, यात तुला काय करता येईल ते सांग."
"एडी, मी तुझ्यासाठी काही करण्यापेक्षा तुच राजकारणात का येत नाहीस ? तुला बर्‍याच गोष्टी सहजसाध्य होतील. मला वाटते ब्राऊन याला आक्षेप घेणार नाही."
"दहा जणाच्या संमतीने निर्णय घेणं मला जमत नाही डेरिक. मंत्रीमंडळाच्या हातातील कठपुतली होण्यापेक्षा सुत्रधार बनणं केव्हाही चांगल. सगळ्या नाड्या तुमच्या हातात असतात. तुम्ही सांगाल तीच दिशा."

१६ ऑगस्ट २०१२
हेसारक मेडीकल हेल्प, अफगाणिस्तान
रात्री १० वाजून ४१ मिनिटांनी
तळघर

"हे झाल कसं ?" सुरमेवाला किंचित चिडलेला होता.
"अचानक दिवे गेले. डॉ. गाझी तेव्हा तळघरात होते. एबोला पेशंटचं शवविच्छेदन करत होते. अंधारात ते धडपडले. त्यांचा हात कशात अडकला हे त्यांनाही कळलं नाही. लाईट आले तेव्हा त्यांच्या हातमोज्यांना चीर गेलेली दिसली आणि रक्त आत झिरपलं होतं."
"मग?"
"एबोलाने हाल हाल होऊन मरणं त्यांना नको होतं. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली." जमालने स्पष्टीकरण दिलं आणि सुरमेवाल्याने हताशपणे हाताची मुठ आदळली.
"आता दुसरं कोणीतरी शोधावं लागणार. पण कोण ?"
"मला माहीत आहे कोण ते ? " सुरमेवाल्याने डोळे मिचकावले.

१९ ऑक्टोबर २०१२
जोहानेसबर्ग, दक्षिण आफ्रिका
संध्याकाळी ८ वाजून १७ मिनिटांनी
नेल्सन मंडेला ब्रिज

पुढच्या पाच मिनिटात सॅङी नेल्सन मंडेला ब्रिज क्रॉस करणार होता. तोच त्याच्या मानेला रिवॉल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श झाला. त्याने वर आरशात पाहीलं. आपल्या नकळत हा माणूस आपल्या गाडीत नेमका केव्हा बसला असेल ? आधी हे त्याच्या डोक्यात आलं.
"जास्त विचार करू नकोस. गाडी बाजुला थांबव." सॅगीने मुकाट गाडी बाजुला थांबवली. दुसर्‍याच क्षणी त्याच्या नाकावर रुमाल दाबला गेला. बेशुद्ध होण्यापुर्वी शेजारी आणखी एक गाडी उभी राहील्याचं त्याला जाणवलं.
"त्याला इथे झोपवा नीट आणि ही बॉडी ड्रायविंग सीटवर ठेवा. गाडी आणि बॉडी जळाली पाहीजे. कोणतीही चुक मला चालणार नाही. चला निघा." सुरमेवाल्याची नजर चौफेर फिरत होती. त्याची दोन माणसं सॅगीच्या गाडीचा टायर काढत होते. पहाणार्‍याला एवढच दिसत होतं की एका गाडीचा टायर बदलण्याचे काम मॅकेनिक करत आहेत.

१५ नोव्हेंबर २०१२
हेसारक मेडीकल हेल्प, अफगाणिस्तान
दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी
तळघर

"डॉ. सॅगी तुम्ही ऐकल नाहीत म्हणून नाईलाजाने तुमच्या बायकोला व मुलीला इथे आणाव लागलय. आता तुमची बायको व मुलगी या दोघांपैकी कोणाला आम्ही इंजेक्शन टोचाव ते तुम्हीच सांगा." सुरमेवाल्याने सिल्वियाचा हात हातात घेत डॉ. सॅगीला विचारलं.
"नको." सॅगी ओरडत उठला. जमालने त्याला पुन्हा खुर्चीत दाबलं.
"डॉक्टर, आमच्याकडे वेळ कमी आहे आणि काम जास्त. तुमच्या देशात आधीच तुम्ही स्वर्गवासी झालेले आहात. जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही तर खरोखर व्हाल."
"मला ते जमणार नाही."
"जशी तुमची इच्छा." सुरमेवाल्याने इंजेक्शन सिल्वियाच्या हातावर टेकवायला उचललं.
"डॅडी." सिल्विया ओरडली.
"मी तयार आहे." डॉ. सॅगी ओरडत खुर्चीतून खाली कोसळले. नंतर त्यांच्या हुंदक्यांच्या स्वरात त्यांच्या मुलीचे व बायकोचे हुंदके मिसळले.

१६ नोव्हेंबर २०१२
कर्नल अमानुल्ला रोड, इस्लामाबाद, पाकीस्तान
रात्री ९ वाजून २३ मिनिटांनी
आर्मी क्लब

"डॉ. सॅगी तयार झालाय खरा. पण आपल्याला हवे ते तो देऊ शकेल की नाही याबद्दल मला शंका आहे."
"मलाही. हवेतून पसरणारा विषाणू हाहाकार माजवू शकतो. "
"तो आपल्यापर्यंतही पोचू शकतो मेजर हे विसरू नकोस."
"मी त्यासाठी तयार आहे. कोणत्याही परिस्थिती ऑपरेशन सॅटन यशस्वी व्हायला हवं."
"होणार मेजर. तुझ्यासारखे धाडसी शिपाई हे काम नक्कीच शेवटास नेतील."

२२ एप्रिल २०१३
हेसारक मेडीकल हेल्प, अफगाणिस्तान
रात्री ८ वाजून ३९ मिनिटांनी
तळघर

"डॉक्टर, खुप वेळ फुकट घालवताय. तुम्हाला एक शेवटची संधी देतो. जर काम मनासारखं झाल नाही तर मग पहिला बळी तुमच्या बायकोचा जाईल. इथेच तुमच्या डोळ्यासमोर ती तडफडत जीव देईल याची मी सर्वतोपरी काळजी घेईन."
"मी प्रयत्न करतोय. इथे साधन सामुग्री अपुरी आहे. यात जर एबोलाला हात घातला तर मग ते इथल्या प्रत्येकाला धोकादायक ठरेल."
"जे आहे ते आहे. यातच काय ते करायचं. आणखी काही मिळणार नाही."
"तुमच्या लक्षात येत नाही का ? तुम्ही माझ्या बायकोला वा मुलीला जरी मारलं तरी साधनसामुग्रीशिवाय मी काहीच करू शकणार नाही. डॉ. गाझीने उभारलेल्या यंत्रणेत त्रुटी असल्याने ते एबोलाचे बळी ठरले. पुढचा बळी मी ठरेन. जैविक पातळी चारवर काम करण्यासाठी आणि विषाणूच्या उत्क्रांतीसाठी हे सगळं गरजेचं आहे. तुम्ही हवं असल्यास याची चौकशी करू शकता. " जमाल चरफडत बाहेर पडला. त्याला तसा चिडलेला पहाताच सुरमेवाल्याने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहीले.
"आपल्या हालचालींची बाहेर कुणकुण लागलीय. त्यात याला अजून काही सामान हवयं. कसं आणणार ? सगळ्या यंत्रणा बाजारातल्या खरेदीवर नजर ठेवून आहेत."
"तो जे सांगतोय ते बरोबर आहे. त्याला हवं ते लवकरचं मिळेल. चरफडून काही होणार नाही. धंद्यात डोकं शांत ठेवावं लागतं." सुरमेवाला जमालच्या मानाने फारच शांत होता.

२९ जानेवारी २०१४
न्युयॉर्क, अमेरिका
सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी
मि. ब्राऊन यांची बेडरुम

फोनच्या व्यत्ययाने मि. ब्राऊन यांना जाग आली. अमांडाने, त्यांच्या बायकोने काहीतरी पुटपुटत फक्त कुस बदलली. काल रात्रीची पार्टी पहाटे संपली होती. अनिच्छेने त्यांनी फोन उचलला.

"हॅलो."
"बॉस, आपण जिंकलो. पुढच्या वर्षी आपण आपला वॅक्सीन बाजारात उतरवणार आहोत."
"गुड न्युज एडी. फक्त मला त्यात किती मिळणार आहेत ते जर सांगितलस तर जास्त आनंद होईल. अजून तरी तुझा एबोला आफ्रिकेतच भटकतोय. तू म्हणाला तसा तो विमानातून गावोगाव फिरत नाहीए. हे लक्षण चांगल नाही. ओ.के. आता मला झोपेची गरज आहे." फोन ठेवून ब्राऊन पुन्हा पांघरुणात शिरले.

***************पुन्हा २०१५ मध्ये******************

१९ मार्च २०१५
रॉ, लोधी रोड, नवी दिल्ली, भारत
सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी
अवतारसिंगची कॅबिन

"या कागदपत्रांचा संबंध नक्कीच ऑपरेशन सॅटनशी आहे. या प्रकरणाचे लागेबांधे येमेनपर्यंत असल्याने ह्यातलं गुढ वाढतय."
"ते कागद सुस्थितीत आहेत का ?"
"संपुर्णपणे नाही. ब्लास्ट फारच भयानक होता. कदाचित आरडीएक्सचा वापर झाला असावा. जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये हे कागद सापडलेत. तीन जणांचे जळालेले अवशेषही सापडलेत. अजून तपास चालू आहे. मी स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून आहे. या कागदपत्रात काही नकाशे, काही पत्ते, व्यवहाराचे हिशोब, खरेदीची व वास्तवाची बिल असलं बरचं काही आहे. इंटरपोलशी माझं बोलणं झालय आणि सीआयएचा माणूस इथे येणार आहे. यातले लागेबांधे लवकरच कळतील."
"मला वेळोवेळी कळवत जा. शक्य झाल्यास कागदपत्रांची एक प्रत पाठवता आली तर बघ. स्कॅन करून पाठवली तरी उत्तम."

अर्ध्या तासाने
मल्होत्रांची कॅबिन

"सर ये वायरस हवा के जरिये नही फैलता. गोल्डफार्माने भेजा हुवा वॅक्सीन लोगोंका दिया जा रहा है और उसे सुधार भी है | जल्द ही सब ठिक हो जायेगा |"
"ये अच्छी खबर है अवतार. मुझे लगा था के अब कुछ दिनोके लिए सिर्फ बुरी खबरे सुननी पडेगी |"
"और एक खबर है सर. दुबईमे लोकेशन्स मिले है | उन लोगोंके साथ कुछ और लोग थे | उसमेसे एक सुरमा लगाता है | चार शक्स ऐसे है के उनही हाईट और बॉडी स्ट्र्क्चर तकरीबन सेम है | शक है की ये एकही बंदा है | उसकी असली शक्लला स्केच बना रहे है | "

२१ मार्च २०१५
काबूल, अफगाणीस्तान
सकाळी ९ वाजता
प्रवक्ता

"काल रात्री हेसारक मेडीकल हेल्प येथे अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला केला. स्फोटकांनी भरलेला ट्रक मध्यरात्रीच्या सुमारास आत घुसवण्यात आला. यात ती संपुर्ण बैठी इमारत उध्वस्त झाली असून स्वसंरक्षणार्थ त्यांनी बनवलेले तळघरही यात संपुर्ण बेचिराख झाले. हॉस्पिटलसाठी तळघरात जमा करण्यात आलेला मदतीचा संपुर्ण साठा भस्मसात झाला असून हॉस्पिटलचे कार्यवाह डॉ. जमाल वाहीद अन्वर हे त्यावेळी तिथे आत असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एकुण मृतांचा आकडा अजून हाती आलेला नसला तरी वित्तहानी सोबत जिवितहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे कळाले आहे."

त्याच वेळेस
उध्वस्त हेसारक मेडीकल हेल्प

"आपल्याला त्यांचा ठावठिकाणा कळलाय हे त्यांच्या लवकरच लक्षात आलं म्हणायचं. यांच नेटवर्क खरच जोरदार म्हणावं लागेल." सीआयए च्या जेफ मुरने पहाणी करता-करता शत्रूची प्रशंसा केली.
"एबोलाचा त्यांचा कारखाना इथेच असावा. येमेनमधल्या कागदपत्रांवरून तरी हेच सिद्ध होतय. आपण थोड आधी आलो असतो तर....." भारतीय राजदूत शिवशंकर प्रसाद हळहळले.
"मला वाटत नाही जमाल यात ठार झाला असावा. इथली संपुर्ण यंत्रणा त्यांनी सुट्या भागात हलवली आहे. आता आपल्या हिट लिस्टवर हे दोघे आहेत."

२४ मार्च २०१५
अरांडू, पाकीस्तान
संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी
सीमेलगत असलेलं घर

त्याचं लक्ष सारखं दाराकडे होतं आणि दाराजवळ उभे असलेले दोघे त्याला निर्विकारपणे पहात होते. प्रत्येक सेकंद त्याला तासासारखा वाटत होता. वाट पहाणं त्याला कधीच आवडत नसे. पण नाईलाज होता. तेवढयात बाहेर हालचाल झाली. तो सावध झाला. त्याने खिडकीतून बाहेर नजर टाकली. जीपमधून उतरणार्‍याने बाकीच्यांना तिथेच थांबायला सांगितलं व तो स्वतः त्या कच्च्या घराच्या दिशेने चालू लागला. खिडकीतून पाहणारा पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला.

"ये प्रिंस." तो आत शिरताच त्याने आवाज दिला.
"तुला पुन्हा पाहून आनंद झाला जमाल. हेसारकची बातमी काही चांगली नव्हती."
"खराय. जागा चांगली होती ती."
"आता काय करायचं ठरवलय ? माझ्यासाठी तयार केलेली ती ९ माणसं आहेत ना ?"
"आहेत प्रिंस. आम्ही आमच्या कामाबाबत काटेकोर असतो. तुमच्या एका चुकीमुळे आमचा नाईलाज झाला."
"माझी चुक ? तुला कळतय तू काय बोलतोयस ते?"
"त्यालाही आणि मलाही." आतल्या खोलीतून सुरमेवाला समोर आला. त्याबरोबर प्रिंस दचकला. तो काही हालचाल करायच्या आतच दाराजवळ उभ्या असलेल्या दोघांनी पुढे येऊन गन त्याच्या पाठीला लावली.
"मेजर, तुला मी पहिल्या भेटीतच ओळखलं होतं. तू कितीही वेष पालटलास तरी सवयी सोडू शकत नाहीस. तुझ्यातला लष्करी बाणा तुझ्या चालण्या-बोलण्यात असतोच. त्याही वरचढ म्हणजे विश्वासघातकी स्वभाव. नझीर जेव्हा बशीरशी बोलला तेव्हा त्याच्या ओठांच्या हालचाली व त्याची देहबोली मला अर्थ समजण्यास पुरेशी होती. म्हणूनच बशीरने जेव्हा स्फोटके रोवली तेव्हा मी ती जागा सोडली. तुला खात्री पटावी म्हणून बाकीच्यांना तिथेच सोडावं लागलं." सुरमेवाला बोलत असतानाच जमाल इंजेक्शन घेऊन आला.
"दुर्दैवाने कागदपत्र पोलिसांच्या हाती लागले. ते हेसारकला पोहचण्याच्या आत मला तळ उडवावा लागला. पुन्हा काही बळी द्यावे लागले. परमेश्वर सॅगीच्या कुटुंबाला शांती देवो. आता तुला भेटणं गरजेच होतं. त्या नऊ जणांसाठी तू येशील याची खात्री होतीच." जमाल काय करणार आहे हे लक्षात येताच मेजरने आपल्या माणसांना आवाज दिला. बाहेर हालचाल झाली. पण थोड्याच वेळात काही पडल्याचे आवाज फक्त ऐकू आलेत.
"या नवीन अमेरिकन गन आहेत. तुम्हीच दिल्या होत्या ना चार महिन्यापुर्वी. गोळीचा सोडा, मरणार्‍याचाही आवाज येत नाही." जमालने पुढे येऊन सुटकेची धडपड करणार्‍या मेजरला इंजेक्शन टोचले.
"खुदाहाफिज मेजर. आणखी एक महत्त्वाचं. तुला कोणी मारलं हे मरण्यापुर्वी तुला माहीत असायला हवं.जमाल वाहीद अन्वर हा नसून मीच आहे. या संघटनेचा सर्वेसर्वा. " तो त्या दोघांकडे वळला. "अशा ठिकाणी नेऊन सोडा जिथे त्याला चिटपाखरू दिसणार नाही. हा मरेपर्यंत एकटा जगायला हवा." त्या दोघांनी मेजरला उचलला.
"आणि त्या म्हातार्‍याचं काय ?"
"अमेरिकन एंबसीला मी काही कागदपत्रे पाठवलीत. तेवढी पुरेशी आहेत जनरल अशफाक महमुद खानसाठी."
"पुढे काय ?"
"जमाल, जपानच्या उद्योगपती फुकुजो कावामोटोला त्याच्या कुटुंबाच्या हत्येचा सुड घ्यायचाय. त्या हत्येला ७० वर्षे होत आलीत. पण त्याचा सुडाग्नी अजूनही पेटता आहे. या कामाचे तो आपल्याला हवे तेवढे पैसे मोजायला तयार आहे."

२४ मार्च २०१५
इस्लामाबाद, पाकीस्तान
संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी
आर्मी क्लब

जनरल अशफाक महमुद खान रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गोळी उजव्या कानावरून मेंदू चिरून पलिकडे गेली होती.
"मेजर बेगची काही बातमी ? " जेफने समोर उभ्या आर्मी चीफला विचारलं.
"शोध चालू आहे. कदाचित तो फरार झाला असावा. आम्ही सगळ्या सीमा सील केल्यात. तो बाहेर जाऊ शकणार नाही." चीफने ताबडतोब उत्तर दिले.
"चीफ, मला जनरल अशफाक यांच्या एकुणएक मालमत्तेची झडती घ्यायचीय. या ऑपरेशनला पुर्ण पैसा त्यांनी पुरवलाय. मला वाटत नाही तुम्ही त्यांना एवढा पगार देत असाल."
"यात काही कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे..."
"पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्ही आता करणार आहात. अमेरिकेने पाकीस्तानची मदत गोठवली तर ते आज पाकीस्तानला परवडणारं नाही. तुम्ही मदत करा आणि पाकीस्तान आर्मीचा यातला सहभाग शक्य तेवढा गहाळ करण्याची जबाबदारी माझी. हे प्रकरण तालिबानवर ढकलण्यात काहीच अडचण येणार नाही. "
"मी करतो."
"मला खात्री होती तुम्ही हो म्हणाल याची." जेफने खिशातला सेल काढला.

न्युयॉर्क, अमेरिका
२८ मार्च २०१५
सकाळी १० वाजून १०
गोल्डनेट ऑफिस

"हे बघ ब्राऊन, सीआयएकडे पुरावे आहेत. तुझ्या अटकेसाठी कोणत्याही क्षणी एफबीआय तिथे पोहचेल. तुझ्या उपकारांची जाणिव ठेवून हा फोन मी तुला करतोय."
"पण कशासाठी ?"
"भारतातल्या एबोला आउटब्रेकला तुला जबाबदार धरण्यात आलयं. तुझ्या वॅक्सीनचा खप व्हावा म्हणून तू हा वायरस पसरवलास असं त्यांच म्हणणं आहे. आधी वायरस सोडून मग एंटीवायरस देणारा हॅकर. आता काय करायच ते तुझ तू बघ. तुझ्याकडे वेळ कमी आहे." डेरिकचा कॉल कट झाला तरी बटण दाबायचं भान ब्राऊनला उरलं नाही. समोरच्या स्क्रीनवर त्यांच्या वेगवेगळ्या चॅनल्सचं प्रक्षेपण चालू होतं. तोच त्यांना गलबला जाणवला. त्यांनी त्या दिशेने पाहीलं. समोरुन येणार्‍या घोळक्यात कंपनीतील सगळे उच्चपदस्थ होते. त्यांच्याबरोबर असलेले चौघे मात्र अनोळखी होते. दार उघडून टेक्निकल डायरेक्टर बॉब स्वीनीसोबत चौघेजण घाईघाईने आत शिरले. बाकीचे बाहेरच थांबले.

"मि. ब्राऊन, हे एफबीआयवाले आलेत."
"का? काय झाल ?"
" एबोला भारतात पसरवण्यासाठी पाक जनरल अशफाक मुहमद खानशी हातमिळवणी केल्याच्या आरोपावरून तुम्हाला अटक करण्यात येतेय मि. ब्राऊन. खानने स्वतःला गोळी घालून घेतलीय आणि फरार मेजर शाहीद अल्ताफ बेगचा शोध चालू आहे." एकजण बोलला.
"मी असलं काहीही केलेलं नाही. तुम्ही माझ्या वकीलाशी बोला. बॉब, स्टीव्हला फोन कर."
"आम्ही बोलूच." त्यातल्या एकाचा फोन वाजला.
"काय झाल ? .... कुठे ? छताकडे ?... आम्ही येतो...." सेल बंद करून तो दोघांकडे वळला. "तुम्ही थांबा." तो बाहेरच्या दिशेला धावला.
"बॉब, एडीला फोन कर. बघ तो कुठे आहे ? " मि. ब्राऊन आता वैतागलेले होते.
"फोनची रिंग वाजतेय सर." बॉबी कानाला लावलेला फोन घेऊन त्यांच्याकडे वळला. त्यांनी फोन खेचून घेतला.
"हॅलो...... हॅलो एडी, कुठे आहेस तू ?"
"हॅलो...." मि. ब्राऊन यांना आधी स्वत:चाच आवाज ऐकू आला. थोडीशी खरखर.. फोनचा स्पीकर बहुधा ऑन झाला होता. समोरच्या स्क्रीनवर दृश्य बदललं. ती त्यांच्या इमारतीची छत होती. एडी छताच्या टोकावर होता.

"थांब एडी.... " हा आवाज अनोळखी होता. तो एक एफबीआय ऑफिसर होता. एडीवर रोखलेल्या रिवॉल्वर न हटवता तो एडीला खाली उतरण्याचे आवाहन करत होता.
"सॉरी मित्रांनो.... सॉरी मि. ब्राऊन, तुम्हाला नंबर वन करायचं होतं. हा प्रोजेक्ट मला सोन्याची खाण बनवायचा होता. आधी वायरस आणि मग एंटीवायरस. नियम आठवतोय ना तुम्हाला ? तीन वर्षापुर्वी खानने माझ्याशी संपर्क साधला होता. पण मी लक्ष दिलं नाही. पण गेल्या वर्षी वॅक्सीन हाती लागल्याचं कळलं आणि मी खानला पैसा पुरवायला सुरुवात केली. पण सगळच फसलं. खान आधीपासून बायोलॉजिकल वॉरमध्ये गुंतलाय याची मला कल्पना नव्हती. मी फक्त त्याला चारजण प्लांट करायला सांगितले तेही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये. म्हणजे त्या आत्मघाती लोकांएवजी इतर कोणाला त्रास होणार नाही. मग एबोलाची भीती लोकांत पसरेल आणि एबोलावर प्रभावी वॅक्सीन देणारी गोल्डफार्मा नंबर एकवर जाईल. तस झालही. गोल्डफार्माचे शेअर्स आज नंबर वनवर आहेत. पण खानने विश्वासघात केला. मरणारा माणूस खोट बोलत नाही. मि. ब्राऊन यांचा ह्यात काहीच संबंध नाही. सगळे व्यवहार मी केलेत. गुडबाय एन्ड सॉरी मि. ब्राऊन." एडीने दोन्ही हात वर केले आणि उडी मारली. मि. ब्राऊन यांनी कानाला लावलेल्या मोबाईलमधून सरसरणार्‍या वार्‍याचा आवाज येत होता. अचानक " धप्प" असा आवाज आला आणि मोबाईल स्वीच ऑफ झाला.

३१ मार्च २०१५
शिकागो, अमेरिका
सकाळी ११ वाजता
वुडफिल्ड मॉल

त्याचा मुळचा गोरा रंग किंचित रापलेला वाटत होता. नाक थोड पुढे बाक आलेलं होतं. केस एखाद्या सैनिकासारखे बारीक होते. चेहरा एखाद्या फिल्मी हिरोसारखा क्लिन शेव केलेला होता. डोळ्यांवरचा गॉगल काढून त्याने नीट पुसला आणि समोरच्या उसळलेल्या गर्दीवर नजर टाकली.

"अमेरिकन लोकांनो, ७० वर्षापुर्वी जपानवर टाकल्या गेलेल्या अणूबाँबची किंमत तुम्हाला चुकवावी लागतेय याच मला खरच वाईट वाटतेय."

आपल्या सुरमा न लावलेल्या डोळ्यावर गॉगल चढवून तो मॉलच्या दिशेने निघाला.

समाप्त

संदर्भ -
शिशा - हुक्का

गुलमोहर: 

खत्तरनाक, जबरी, वंटास, फुल्टु ह्या शब्दांच्या पलिकडल व्यकत करण्यासाठी शब्दच नाहियेत दोस्ता.
अफाट!!!!
पेलली आहेस कथा. Happy

जबरदस्त!

आता एक खरी खोच!

क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष चे वॅक्सीन जगभरात एकाच कंपनीने विकले. तिच्या डायरेक्टर बोर्डावरील एकाचे वर्ल्ड हेल्थ ऑर्ग. बरोबर संबंध होते. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्ग. ने सगळ्या देशांना ते वॅक्सीन रेकमंड केले. अब्जावधी दॉलर चा धंदा झाला.
उदा. ऑस्ट्रेलियात त्या रोगाने ४०,००० लोक बाधीत होतीन अन त्यातील ६००० लोक मरतील असे अंदाज व्यक्त केले गेले. पण आज अखेर १९४ लोक मृत्यु पावले. (त्यात बहुतांश वयोवृद्ध अन फार थोडी लहान मुले होती.)

नैतीक भ्रष्टाचार म्हणायचा कि आतंकवाद?

बरेच दिवस ठरवत होते तुझी ही कथा वाचायची ते, आज मुहुर्त लागला.. Happy
कथानक वेगवान आणि मांडणी छान आहे.
तपशिल लक्षात ठेवायला दमछाक झाली, पण उत्कंठा इतकी वाढली होती
की त्याशिवाय पर्याय नव्हता... आज ६ ची बस चुकली वाचण्याच्या नादात.

काहीच्या काई शेवट
मजा आलि वाचुन
काहीच्या काई शेवट
मजा आली .काही महिन्यापूर्वी युके मधील एका जीवशास्त्राच्या मासिकातून विशिष्ट प्रकारचा जीवाणू का विषाणू विकसनशील देश (भारतातून )आपल्या देशात येतो असे विधान केले होते .युकेच्या सरकारी आरोग्य सेवा फुकट आहे. पण महिनी महिने थांबणे शक्य नाही. , मग यूकेतील खाजगी रुग्णालये खूपच महाग. मग साहजिकच ज्यांना वैद्यकीय सेवा गरजेची आहे व तातडीने हवी आहे ते भारतात येतात ( भारतातील परकीय चलनाचा भावातील तफावत पाहता त्यांना भारत स्वत नि मस्त वाटतो ) .वोक्यार्द सारख्या भारतीय पंचतारंकित हॉस्पिटल साखळ्या त्यांना उत्तोमौत्तम सेवा पुरवतात .
ह्यामुळे ब्रिटीश व इतर प्रगत देशातील रुग्ण भारतात येतात त्यालाच आपल्याकडे मेडिकल टुरिझम म्हणतात .प्रगत देशातील रुग्णालयाच्या साखळ्या आखतात आहेत पण हे शेख भारतात येतात (त्यांना म्हणे सर्व सोयी रात्री च्या पण पुरवल्या जातात हे फक्त भारतात त्यांना मिळू शकते .)
म्हणून ह्या प्रगत देशातील आरोग्य सेवेतील खाजगी माफियांनी हे कुंभाड भारताविरुध्ध रचले होते .
उद्या हॉलीवूड मधील नामवंत अभिनेते /नट्या भारतात यायला लागल्या तर नवल वाटायला नको .(मुंबईतील कोकिला बेन अंबानी हे हदया रोगांचे इस्पितळ (मूळ कल्पना मराठी डॉक्टर नीतू मांडके ह्यांची ) हे जगात पहिल्या ३ नात येते .