आजचा दरबार

Submitted by देवनिनाद on 21 December, 2010 - 01:08

मॉब - आम्हाला वरीष्ठ नागरीक प्रमाणपत्र द्या. आम्हाला `अ' दर्जा द्या.

महाराज - प्रधानजी, बाहेर एवढा गोंगाट कसला ऐकु येतोय.

प्रधानजी - काही नाही महाराज, आम्हाला वरीष्ठ नागरीक म्हणून प्रमाणपत्र द्या अशी काही जण मागणी करतायत, तर ४५-५० गटातले सध्या आम्ही फार्मात आहोत म्हणून आम्हाला अ दर्जा द्या अशी बोंब देतायत. नाहीतर राजाला आम्ही उपाशी मारू असं म्हणतायत.

महाराज - त्यांची एवढी हिम्मत. कोण आहेत ही मंडळी ?

प्रधानजी - कांदा, कोंथिबीर, वाटाणा असे काही वरीष्ठ नागरीक .. तर फ्लावर, भेंडी, वांगी, दोडका, गवार, टॉमेटो असे काही ...

महाराज - प्रधानजी, भाज्यांची नावे कसली सांगताय ... बाहेर बोंबाबोंब कोण करतयं ते विचारतोय मी.

प्रधानजी - महाराज बाहेर आंदोलन करणारी माणसं नसुन भाज्याचं आहेत.

महाराज - काय ? भाज्या आंदोलन करतायत.

प्रधानजी - होय महाराज, आणि कांदे महाराज, लसुणराव या सर्वांचं नेतृत्व करतायत. वाढत्या भावामूळे सगळ्यांनाच अति मागणीचे मोड आलेएत. तेव्हा, चला त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊया. त्यांची वेळीच समजूत काढूया.

महाराज - गरज नाही.

प्रधानजी - महाराज, सर्व जनता भाज्यांचे वाढते भाव पाहून रुद्रावतारात आहे, समुद्रही घाबरेल एवढी खवळलेय.

महाराज - टेंशन घेऊ नका. जनतेला आम्ही शांत करु. आता आधी राज्यातले हॉटेल मालक, बडे व्यापारी आहेत त्यांना बोलवून घ्या.

प्रधानजी - ते कशाला.

महाराज - अहो, ह्या बड्या बड्या हॉटेल मालकांचीच इच्छा होती. सर्व भाज्यांना वरीष्ठ नागरीकांचा सन्मान द्या. तसेच ४५-५० गटातल्या भाज्यांना अ दर्जा द्या. म्हणून आम्हीच भाज्यांचे भाव वाढवायचं ठरवलं. आज सगळे आले की त्याच्यासमक्षच सर्व भाज्यांना त्या त्या मागणीनुसार तो तो सन्मान देऊ या.

प्रधानजी - पण महाराज, जनतेचं काय ?

महाराज - आधी हॉटेल मालकांच, बड्या मंडळीच भागवू. उरलं सुरलं जनतेला देऊ.

प्रधानजी - तोपर्यंत सगळ्या भाज्या ...

महाराज - सडतील असचं म्हणायचयं ना. हरकत नाही. नंतर ह्याच भाज्यांना क दर्जा देऊन जनतेचं पाहू. थोडे दिवस कुरकूर करतील. नंतर आपोआप त्यांना सवय होईल.

प्रधानजी - महाराज, जी जनता विश्वासाने तुम्हाला पाहते तिचा असा विश्वासघात.

महाराज - प्रधानजी खुप झाली चर्चा. पेपर काढा आणि वाचा आजचं राशीभविष्य

प्रधानजी - आजचं हवामान गुलाबी थंडीचं तसचं तुमचं प्रकृतीमान ही गुलाबी राहिलं. वातावरणातील थंडावा तुम्हाला आज काहीतरी चमचमीत खायला सांगेल. शक्य झाल्यास मशरूमची एखादी छान, रसरशीत, चमचमीत रेसिपी ट्राय करावी. नव्या कामातले निर्णय बिनधास्त घ्या, नक्की यश मिळेल.

महाराज - वा ! वा ! वा क्या बात है. प्रधानजी, चला. (दरबारा बाहेरील सर्व भाज्यासमोर येत) राज्याचा सर्वेसर्वा या नात्याने मी सर्वांना एक आनंदाची बातमी आणि हमी. आज संध्याकाळी सर्व व्यापारी, हॉटेल मालक यांची एक खास सभा आयोजित केली आहे. या शाही समारंभातच सगळ्यांच्या डोळ्यात महागाईचे अश्रू काढणार्‍या श्री कांदे महाराजास आम्ही भाजी रत्न पुरस्कार जाहीर करीत आहोत. तसेच लसुणराव आदींना व इतर भाज्यांना ही त्या त्या दर्जाप्रमाणे मी सन्मानित करू यासाठी आज आम्ही आमची सगळी पवार ... आपलं ते पावर वापरू पण तुमचा सन्मान तुम्हाला देऊच असं मी तुम्हाला वचन देतो. (सगळ्या भाज्या आनंदाने टाळ्या वाजवतात / नाचतात).

सर्व भाज्या - भाजी युनियन झिंदाबाद !! कांदेमहाराज, लसुण राव आगे बढो. हम भी पिछे से बढ रहे है ...

महाराज - सगळे खुष. चला तर या आता आणि संध्याकाळच्या कार्यक्रमाला सर्वांनी वेळेत हजर रहा. शेपू, भोपळा हे दिसत नाहीएत तुमच्या सोबत त्यांना ही घेऊन या, म्हणावं तुम्हाला विशेष लक्षवेधी पुरस्कार जाहीर करु. चला, येतो आम्ही. संध्याकाळी भेटू. (महाराज निघतात)

प्रधानजी - महाराज ?

महाराज - चला, अधिक चर्चा नको. संध्याकाळच्या समारंभाची तयारी करा.

प्रधानजी - पण ?

महाराज - माहीत्येय मला. जनतेचं काय ... आज आम्ही मशरुम मसाला खाता खाता काय तोडगा काढायचा ते ठरवतो (जातो)

प्रधानजी - म्हणतात ना. रोज मरे त्याला कोण रडे ... त्यात आमचा हा खादाड राजा ... स्वतः तुपाशी ... मग मरे ना का जनता उपाशी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: