मुंबईत आणि नव्या मुंबईत झाडे भरपुर आहेत. निसर्गाच्या गप्पा मारताना कित्येक झाडे नव्याने आठवत गेली. झाडे आपल्या आजुबाजुला असतात पण रोजच्या धावपळीत त्यांच्याकडे लक्ष जात नाही. कोणी पाहो न पाहो, त्यांचे वर्षभरातले कार्यक्रम नित्यनेमाने चालु असतात. अशाच आपल्या आजुबाजुच्या दिसणा-या आणि त्यामुळे आपल्या लक्षात न येणा-या झाडांची प्रकाशचित्रे. ही सगळी झाडे नेरुळ सिवुड्स परिसरातली आहेत.
१. काटेसावर उर्फ शाल्मली (Bombacacea/Bombax ceiba) - या झाडावर बरीच चर्चा झाली. हिवाळ्यात हे झाड सगळी पाने गळवुन टाकते. मग त्या पुर्ण रिकाम्या झालेल्या झाडाला एक कुठेतरी कळा येतो आणि मग बघताबघता झाड कळ्यांनी आणि फुलांनी भरुन येते. फुलाची जागा बोंडे घेत असतानाच नविन पाने येतात. यावर्षी मात्र माझ्या कॉलनीतल्या झाडाला जुनी पाने गळायच्या आधीच फुले यायला लागली. ही काटेसावरीची विविध रुपे, कळे, फुले. अजुन दोन महिन्यात फुलांच्या जागी हिरवी बोंडे लटकलेली दिसतील. बोंडे पिकली की चॉकलेटी होतात आणि आत एकदम चकचकित रेशमी कापुस तयार होतो. म्हणुन याला सिल्क कॉटन ट्री असेही म्हणतात. याच्या उशा वगैरेही बनवतात असे वाचलेय. पण या बोंडातला कापुस गोळा करणे खायचे काम नाही. आपल्या साध्या कापसाचे झुडुप असते, कापुस सहज खुडता येतो पण झाडावरची बोंडे ही वा-याने हलकी झालेली असतात आणि झाडावरच फुटू पाहतात ती गोळा करुन त्याचा कापुस काढणे मला तरी पेशन्सचे काम वाटते. बोंडे पिकुन फुटली की हा कापुस इतस्ततः पसरतो. मी मुद्दाम पाहिला हातात घेऊन. कृत्रिम कापसासारखा एकदम चिवट आहे, पण मऊ.
नव्या मुंबईत याचे भरघोस पिक येते. पारसिक हिलवर भरपुर आहेत. मुद्दाम लावावी लागत नाही. याच्या बिया सोबतच्या कापसाबरोबर हवाई उड्डाणे करुन जिथे-तिथे रुजतात. मुंबई-पुणे दृतगती मार्गावरही मी खुप काटेसावरी पाहिल्यात. फुलांच्या मोसमात या झाडावर पाने सहसा नसतात, मोठ्या आकाराची फुले फुललेली असतात त्यामुळे हे झाड अगदी लालभडक दिसते. हिरव्या झाडांच्या गर्दीत चटकन लक्ष वेधुन घेते.
याचे लाकुड वजनाला हलके असते आणि पाण्यातही चांगले टिकते. बांधकामात, काडेपेटीचे बॉक्स आणि काड्या, मोल्ड्स वगैरेसाठी याचा उपयोग करतात.
साधारण वर्षभराचे काटेसावरीचे झाड - अंगभर काटे वागवुन असते.
हे झाड मोठे झालेय. आता फुलावर येईल
आणि हे प्रौढ झाड. फुलांचे भरपुर ऋतु पाहिलेत याने.
ही फुले आणि कळ्या, झाड प्रौढ झाले तरी काटे मात्र सोडत नाही. उगीचच नाही काटेसावर नाव पडले..
२. सप्तपर्णी/सात्विण (Alstonia scholaris) - हे एक अतिशय सुंदर दिसणारे सदाहरीत झाड आहे. होलसेलमध्ये पानगळ करताना मी तरी पाहिले नाही. याच्या शेंगा फार सुंदर दिसतात. अगदी बारीक हिरवे दोरे लटकलेले दिसतात. पाने आणि फांद्या दोघेही एक बिंदु धरुन त्यापासुन फुटतात. त्यामुळे झाड अगदी नीटनेटके दिसते.
ठाण्याला बरीच सप्तपर्णी पाहिलीय मी. ठाण्याची झाडे सध्या खुपच सुंदर दिसताहेत. नेरुळ आणि सीवूडस पूर्वेला याची खूप झाडे लावलीत. खूप फुलतात. पांढरी बारीक फुले आणि त्यातच मधुन मधुन लटकणा-या हिरव्या माळा. याचा वास ब-याच जणांना आवडत नाही, पण मला आवडतो. थोडा उग्र आहे खरा पण दुरवर वास येतो याचा. मला तो दालचिनी+जायफळाचा वास एकत्रीत केल्यासारखा वाटला. डिसेंबरात हवा नुसती कुंद होऊन जाते यांच्या त्या मादक सुवासाने. मलातर नशा चढल्यासारखे वाटते. हे झाड व फुले थोडी विषारी आहेत. याला devils tree असेही म्हणतात. याचे लाकुड हलके असल्याने पेट्या, फळे इ. बनवण्यासाठी वापरतात. साल औषधी आहे. आमच्या गावी पोटदुखीवर वगैरे आजही साल उगाळून वापरतात.
याची पाने, कळ्या, फुले आणि शेंगा... कळ्यांमध्येही रचना पाहा कशी अगदी भुमितीय आहे.
३. सेमल - (Ceiba pentandra) - . कपोक हे याचे सर्वसाधारण नाव आहे.. हे झाडही साधारण सप्तपर्णीसारखेच दिसते. पण फांद्यां फुटण्याला काही निश्चित आकार आहे. झाड नीट लक्ष देऊन पाहिले तर त्याच्या फांद्यांची रचना लक्षात येईल. एकाच जागी गोलाकार फांद्या आहेत, मग थोडी मोकळी जागा सोडलीय, मग परत गोलाकार फांद्या. आणि याचा बुंधा पाहा. झाड तिन मजली इमारतीच्याही वर गेलेय, पण बुंधा मात्र अजुनही हिरवागार दिसतोय. हा फोटो मी महापे सिग्नलजवळच्या लोकमत कार्यालयाच्या आवारातील झाडांचा घेतला आहे.
ही सगळी झाडे आता तोडली गेलीत. फ्लायओव्हर बांधताना, बाजूला सर्व्हिस रोड बनवला, त्यात बरीचशी झाडे गेली. लोकमत कार्यालयासमोर आता एकही झाड शिल्लक नाही.
याची पाने अशी दिसतात
खालचे चित्र याच जातीच्या दुस-या झाडाचे ज्याला आता फुले आणि बोंडे धरली आहेत. मला आधी वाटले वर दिलेय त्याच झाडाची ही फुले आणि बोंडे आहेत. पण नाही, बाजुलाच १० झाडे हिरवीगार, एकही फुल नसलेली अशी असताना शेजारच्या त्याच जातीचे झाड पानांचे ओझे बाजुला करुन कळ्या, फुले आणि हिरवीगार बोंडे मिरवीत बसणार नाही. आता झाडाची रचना दिसायला सारखी आहे, म्हणजे फक्त बिल्डिंगच्या स्लॅबसारखे एका ठिकाणी गोलाकार फांदीरचना, मग ४-५ फुट मोकळा बुंधा, मग परत गोलाकार फांद्या ही रचना. पण एक झाड हिरवेगार तर दुसरे पर्णहीन. ही एकाच फॅमिलीतली पण चुलतभावंडे असावित. ह्या झाडाचा फोटो काढायचे राहुन गेले पण कळे, फुले आणि बोंडे मात्र कॅमे-यात मिळाली.
४. तुती (white mulberry/Morus alba) - मुंबईत सहसा न दिसणारे तुतीचे झाडही माझ्या कॉलनीत आहे. कोण्या सदगृहस्थाने मुद्दाम लावलेय, पण कोणाच्या मालकीचे असे नाही.
माझ्या गावी एक सरकारी रेशीमकेंद्र होते (आताही आहे, फक्त त्याची जागा बदललीय). त्या रेशीमकेंद्राच्या एका बाजुला तुतीची भरपुर झाडे लावलेली. या झाडांचा पाला रेशीमकिड्यांना खुप आवडतो म्हणे. मोठ्या गोल सुपांमध्ये गोल गोल खाचे करुन त्यामध्ये रेशीमअळ्या सोडलेल्या असत आणि त्यावर भरपुर तुतीचा पाला घालत. अळ्या प्रचंड वेगाने हा पाला खात. सकाळी भरुन ठेवलेला पाला दुपारपर्यंत फस्त
या झाडाची लागवड मुख्यतः रेशीम किड्यांसाठीच करतात. याच्या इंग्रजी नावाची सगळीच गंमत आहे. नाव white mulberry पण यातला पांढरा रंग हा फुलाला उद्देशुन आहे, फळाला नाही. आणि जरी मलबेरी नाव असले तरी हे बेरी वर्गातले फळ नाही. याचे आपल्याला फळासारखे जे दिसते तो अनेक बारीक फळांचा एक घोस आहे.
हीच ती फळे. बाळ फळे हिरवी असतात, चव अशी काही नसतेच. उगीचच काहीतरी तोंडात टाकुन चघळल्यासारखे वाटते. त्याच्यावर कुसळेच जास्त असतात त्यामुळे खावीशी वाटतही नाहीत. जरा मोठी झाली की बाहेरुन गुलाबीसर होतात. आत थोडाथोडा आंबटपणा येऊ लागतो. पुर्ण मोठी झाली की बाहेरुन लालभडक होतात आणि आतुन गुलाबी. पण खुप आंबट लागतात. तोपर्यंत कुसळेही काळी होऊन गळालेली असतात. पुर्ण पिकलेली फळे मात्र रंगाने काळीभोर, आत जांभळी आणि चवीला ... आ हा हा.. काय गोड लागतात..... अमृत अगदी...
५. वेडी बाभुळ (Earleaf acacia\Acacia auriculiformis) - ह्या झाडाचे नाव मला माहित नव्हते पण दिनेशनी सांगितले आणि मी त्याचे कुळ शोधुन काढले. पण मला हे झाड अजिबात आवडत नाही. नव्या मुंबईत याचे अमाप पिक आहे आणि मुंबईबाहेरही मी ही झाडे भरपुर पाहिलीत. मायबाप सरकारने जिथे जिथे 'सामाजिक वनीकरण' केलेय तिथे ही झाडे लावलीत आता मुद्दाम लावायचीच होती तर अगदीच आंबा, फणस जाऊदे पण गेला बाजार वड, पिंपळ आणि रानातली इतर झाडे काय संपावर गेली होती?? पण नाही...
शासनाला वनीकरण करताना हे झाड आणि निलगीरी याशिवाय दुसरे काही दिसलेच नाही... या झाडाला ना धड रुप ना धड रंग ना धड फुल ना धड फळ. पिवळीपिवळी अतिबारिक फुले येतात आणि मग वेटोळे घातलेल्या चपट्या शेंगा लागतात. पाने पण अगदी सोंग आहेत याची. पानगळ मात्र बाराही महिने चालु असते. खाण्यासारखे काहीच नसल्याने पक्षी या झाडावर पाय टेकवायचेही मनावर घेत नाहीत. घरटे बांधणे तर दुरच... पक्ष्यांनी पुर्णपणे वाळीत टाकलेल्या या झाडाला सिडकोने अभय देऊन अख्ख्या नव्या मुंबईत लावलेय. नंदन कलबागांनी 'ह्या झाडाला पाने नसतात. झाड जेव्हा बीयापासुन रुजवतात तेव्हाच काय ती दोनचार पाने येतात. त्यानंतर पानसदृष्य जे दिसते ते खोडा/फांदीचेच एक रुप असते' असे सांगितलेले. सुरवातीची अगदी दोन पानं सोडली तर पानंसदृश दिसणारा देठ तर फार कामाचा आहे. याला phyllode म्हणतात. पाण्याची कमतरता आणि उष्ण हवामानाशी जुळवून घ्यायला यांची मदत होते.
तरिही शासकिय वनीकरणात हे झाड अग्रभागी दिसते याचे महत्त्वाचं कारण म्हणजे ही झाडं पाण्याच्या दुष्काळी भागात, उष्ण हवामानात, पाण्याने साचलेल्या जमिनीत, आगीने होरपळलेल्या मातीत व्यवस्थीत वाढू शकतात. पोषणमूल्य कमी असलेल्या जमिनीत, चिखलात किंवा कोरड्या मातीत जोमाने वाढतात. एवढच नव्हे तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियांच्या या झाडाच्या मुळांमधल्या वास्तव्यामुळे मातीचं पोषणमूल्य पण वाढतं. जळाऊ लाकुड म्हणून तर उपयोग होतोच, पण पेपर पल्पमधे देखिल वापरतात. थोडक्यात काय तर लो मेंटेनन्स-हाय सस्टेनेबिलिटी असलेलं गुणी झाड आहे.
शासनाच्या वनीकरणाव्यतिरिक्त याचा दुसरा उपयोग जळावू लाकुड म्हणुन होतो.
गेल्या आठवड्यात झाडांचे फोटो काढत फिरत असताना अचानक खालिल झाड नजरेत भरले. झाड बरेच लांब होते त्यामुळे नक्की कसले आहे ते कळत नव्हते. फोटो काढले पण तेही नीट दिसत नव्हते. पण काहीतरी नवीन झाड सापडलेय याचा एक अनामिक आनंदही होत होता. थोडे पुढे गेल्यावर रस्ता दुभाजकावर त्याच जातीच्या झाडांची रांग दिसली. आता मात्र झाड अगदी जवळुन पाहायचा मौका मिळाला. जवळून निरखत असताना अचानक झाडाच्या शेंगा दिसल्या आणि सगळा उलगडा झाला.
हेही वेडे बाभुळच. पण जरा जास्त सुधारीत जात. पानांचा आकार जरा मोठा पण रचना तशीच. फुलांचे सरही मोठे, रंग क्रिमी पण रचना मात्र तशीच. बहुतेक ही नव्याने विकसित केलेली हायब्रिड जात असावी.
६. कदंब (Neolamarckia cadamba) - कदंबावर ब-याच जणांनी लिहिलेय. तरी माझ्या लाडक्या झाडाचा फोटो टाकण्याचा मोह आवरत नाही.
सरळसोट बुंधा आणि त्याला समांतर फांद्या असे या झाडाचे रुप आहे. फांद्या जमिनीला समांतर असतात. हे झाड दिसायला त्रिकोणासारखे दिसते. मी टाकलेला फोटो तरुणपणात प्रवेश केलेल्या झाडाचा आहे. पण यापेक्षाही मोठी झाडे आहेत. उंचीला अजुन जरा जास्त, फांद्या मजबुत आणि अजुन लांब पसरलेल्या. पण आकृती मात्र त्रिकोणीच दिसते.
कदंबाच्या फुलात लहानलहान कॅप्सुल्स गच्च बांधलेल्या असतात आणि प्रत्येकात बिया असतात. एका फुलात जवळजवळ ८,००० बिया असतात आणि एवढ्या हलक्या की एका ग्रॅममध्ये २०,००० बिया बसु शकतात असे मी वाचलेय. पोटाच्या रोगावर ह्याची फुले वापरतात.
कृष्ण कदंबावर बसुन यमुनेत आंघोळ करणा-या गोपींना न्याहाळत असे असे कुठेतरी वाचलेले. कृष्ण तेव्हा लहान असावा :).
पण हे खरे नसावे. श्री नंदन कलबागांनी लिहिलेय कि कृष्ण ज्या भागात राहत होता त्या भागात ह्या वृक्षाचे अस्तित्व नाहीय. त्यामुळे तो त्यावर बसून खोड्या काढायचा वगैरे केवळ कविकल्पनाच म्हणायला नवी. हा वृक्ष इतका सुंदर दिसतो आणि त्याच्या फांद्या अशा मस्त सरळसोट, जमिनीला समांतर असतात कि त्यावर चढून बसण्याचा मोह कोणालाही होईल.
लोणावळ्याला बालाजी तांब्यांच्या आश्रमात मोठ्ठे कदंब आहेत. कधीकाळी मी विमको मॅच कंपनीत कामाला होते. त्या कंपनीने आगकाड्या बनवण्यास लाकुड मिळावे या उदात्त हेतुने शेतक-यांना झाडांची लागवड करायला मदत केली होती. त्यात पॉप्लर आणि कदंब ह्या दोन झाडांना शॉर्टलिस्ट करुन शेवटी पहिल्या फेजमध्ये पॉप्लरची निवड केली होती. दुस-या फेजमध्ये कदंब होता. उत्तर भारतात ब-याच ठिकाणी त्यांनी शेतक-यांच्या शेतावर मोकळ्या जागी, मेरेवर वगैरेवर पॉप्लर लावले होते. शेतक-यांनी फक्त आपली जागा द्यावी एवढेच बंधन होते. ज्यांची पुर्णा देखभाल कंपनी करणार होती. झाडे शेतक-यांच्या मालकीची. योग्य वेळी त्यांना कंपनी शेतक-यांकडुन विकत घेणार होती. काही शेतक-यांनी सहकार्य केले, काहींनी कंपनीकडुन देखभाल तर करुन घेतली पण विकायच्या वेळी दुस-यांना विकुन जास्त पैसे कमावले दुसरी फेज मग आपोआप रद्द झाली.
पोस्ट खात्याने ह्या सुंदर झाडाच्या सुंदर फुलांना आपल्या १ रुपयाच्या स्टँपवर जागा देऊन भुषविले आहे.
आता इतकेच आवरते घेते. पुढचे पुढच्या वेळेस. वर टाकलेल्या काही झाडांच्या पानांचे वगैरे जरा जवळुन फोटो काढायला हवेत असे वाटतेय. झाडे ओळखायला मदत होईल त्याने.
क्रमशः
मी हजर..... साधने, एक मदत
मी हजर.....
साधने, एक मदत हवीये. लहान मुलांच्या ट्रेकनंतर असलच काहितरी करायचा प्लान आहे. एखाद्या छोट्याश्या जंगलात जाउया. येणार बच्चेकंपनीला झाडांची ओळख करुन द्यायला ?
अरे येणार
अरे येणार ना...............
आता मी झाडे कितपत ओळखेन माहित नाही, पण जंगलात यायला मात्र मी तयार आहे......
मराठी गाण्यांमधे कदंबाचे
मराठी गाण्यांमधे कदंबाचे वर्णन येते. तेव्हा ते वड, पिंपळासारखे मोठे झाड असेल असे वाटयचे.
फोटोमुळे झाडे ओळ्खत येतील.
साधना, छान लिहिले आहेस. ते न
साधना, छान लिहिले आहेस.
ते न आवडणारे झाड म्हणजे वेडी बाभूळ. हे आपल्याकडे ऑष्ट्रेलिया मधून आलेय. आपल्याकडे ते उगीच वेडेवाकडे वाढते, मुंबई गोवा मार्गावर, कणकवलीच्या आसपास बेसुमार लागवड झालीय याची.
ऑष्ट्रेलियात मात्र याच दिवसात ते खूप फूलते. त्या फूलांना मंद सुगंध पण येतो. पण तिथेही ते सैतानच आहे, बाकिच्या झाडांच्या मूळांना विळखा घालून त्यातला जीवनरस शोषून घेते (चंदनाचे झाडही असेच करते ) आणि त्याच्या तावडीतून टेलिफोनच्या केबल्स सुद्धा सूटत नाहीत.
म्हणजे या झाडाच्या सानिध्यात दुसरी झाडे जगणार नाहीत आणि कायद्याने हि झाडे तोडता येणार नाहीत.
म्हणजे इकडे पण झाड आणि तिकडे पण झाड (आड आणि विहिर नाही )
पुढच्या भागांची वाट बघतोय.
असू दे, या उपक्रमात मला पण घेणार का ?
साधारण वसंत ऋतू मधे, म्हणजे मार्च एप्रिल मधे धारावी निसर्ग उद्यान किंवा राणीच्या बागेत गेलात, तर बरीच झाडे मोहोरलेली दिसतील.
साधना, अप्रतिम लिहिलं आहेस.
साधना, अप्रतिम लिहिलं आहेस. एका वेगळ्याच विषयावर.
असुदेला अनुमोदन.
काटेसावरीच्या खोडावरील काटे
काटेसावरीच्या खोडावरील काटे दगडाने काढून कातकरी त्याचा पानात कात-सुपारीसारखा उपयोग करत असत..... आणि सावरीचा कापूस गोधडी शिवताना त्यात वापरत. नव्या मुंबईत ही वृक्षसंपदा विपुल आहे.... कधी लक्ष जात नव्हतं..... दिनेशदांनी सांगीतल्यावर वेडी बाभूळ काय हे समजलं.. पण इकडे वेडी बाभूळ म्हणून एका वेगळ्याच झाडाची ओळख आहे. मी लवकरच त्याचा फोटो टाकतो आहे.
फार सुंदर लेख ..... दुसर्या लेखाच्या प्रतीक्षेत.
डॉ., लवकर फोटो टाका. कदाचित
डॉ., लवकर फोटो टाका. कदाचित ती सुबाभूळ असेल.
नाही नाही दिनेशदा ,.. सुबाभूळ
नाही नाही दिनेशदा ,.. सुबाभूळ मोठं झाड असतं..... हे छोट्या झुडुपासारखं असतं आणि मोस्टली दलदलीच्या ठिकाणी अतोनात वाढते. .... मी टाकतोच फोटो...
फार सुंदर लेख .. अजून लिही
फार सुंदर लेख .. अजून लिही
छाने
छाने
साधना खुप छान लिहील आहेस.
साधना खुप छान लिहील आहेस. माझा सल्ला मानलास का मेमरी कार्डचा? मजेत घे.
दिनेशदा सुभाबुळ ची पाने चिंचेसारखी लहान असतात. मोठे झाड होते त्याचे. ह्या सुभाबुळला पांढरी गोंड्यासारखी फुले येतात. त्यालाही मंद सुंदर वास असतो. मग साधारण शिकेकईसारख्या पण चपट्या शेंगा येतात. त्यातील बी कलिंगडासारखे असते. आम्ही लहान असताना ह्या बिया पाण्यात फुगवुन त्याची माळ करायची उद्योग करायचो. सुभाबुळचा पाला दुधदेणार्या जनावरांसाठी फायदेशिर ठरतो. ह्याच्या फांद्या, खोड चिकुच्या रंगासारख्या असतात.
दिनेशदा वरच्या पिवळ्या फुलांची झाडे आमच्याइथेही भरपुर आहेत. त्याचा मंद वास मलाही आवडतो.
पुर्वी आमची माती आमची माणसं
पुर्वी आमची माती आमची माणसं कार्यक्रमात सुबाभूळीचा, जनावराचे खाद्य म्हणून बराच प्रसार केला जायचा. पण आता ते तेवढे नावाजले जात नाही. याच्या बिया गरम पाण्यात भिजवाव्या लागतात. तरच त्या रुजतात.
जागू, ते वेड्या बाभळीचे झाड शक्यतो नकोच आजूबाजूला. बाकिच्या झाडांना मारक ठरते ते. त्यापेक्षा आपली बाभूळ बरी.
या बाभळीचे अकाशिया कूळ हे पण खूप मोठे आहे. आपण नेहमी पिवळी फूले येणारी बघतो, पण दुरंगी (गुलाबी आणि पिवळी) फूले येणारी पण बाभूळ असते. पूर्व आफ्रिकेतल्या बाभळींबद्दल सविस्तर लेख लिहावा लागेल, एवढ्या अनोख्या आहेत त्या.
साधना छान लिहिलंय
साधना छान लिहिलंय
याच्या बिया गरम पाण्यात
याच्या बिया गरम पाण्यात भिजवाव्या लागतात.
दिनेशदा आमच्याकडे पावसाळ्यात सुभाबुळच्या झाडाखाली बी पडून खुप रोपे उगवायची. पावसाच्या पाण्यावरच.
जागू याला उत्क्रांती म्हणायची
जागू याला उत्क्रांती म्हणायची का ? नगरला मी, रामकाठी नावाची पण बाभूळ बघितली होती. सरळ वर वाढणार्या फांद्या होत्या त्याच्या.
दिनेशदा, बरेच उपक्रम करायचेत.
दिनेशदा, बरेच उपक्रम करायचेत. कधी येताय ?
साधना, काटेसावर या झाडाची छान
साधना,
काटेसावर या झाडाची छान माहिती मिळाली !
धन्यवाद !
पुर्ण पिकलेली फळे मात्र रंगाने काळीभोर, आत जांभळी आणि चवीला ... आ हा हा.. काय गोड लागतात..... अमृत अगदी...
ही तुतीची फळे लहानपणी खुप खाल्ली (आता पण त्यांना पाहिल की खाऊ वाटतं, पण लोक काय म्हणतील असं) पानाच्या मळ्याभोवती मुख्य कुंपण हे तुतीचच असतं,याच्या तिरका काप घेऊन काड्या टोचल्या की लागु होतात, त्याचा चारा म्हणुनही उपयोग होतो
आता पण त्यांना पाहिल की खाऊ
आता पण त्यांना पाहिल की खाऊ वाटतं, पण लोक काय म्हणतील असं
लोकांच्या भितीने आपण आपला आनंद गमवायचा नाही. गेलेले क्षण आणि गेलेल्या संधी परत येत नाहीत
मी काल फोटो काढत होते तेव्हा बरेच लोक थांबुन माझ्याकडे पाहात होते... आता ते बघताहेत म्हणुन मी फोटो काढायचे बंद केले असते तर इथे काय लिहिणार होते कप्पाळ?????
वा! ग्रेट!! सही लिहिते आहेस.
वा! ग्रेट!! सही लिहिते आहेस. अजून लिही.
साधना हे तुमचे विचार अगदि
साधना हे तुमचे विचार अगदि पटले.
साधना धन्यवाद काटेसावर चे
साधना धन्यवाद
काटेसावर चे फोटो छान आहेत.
सप्तपर्णीच्या खाली दुसर्या झाडाची फुले आणी बोंडे यांचा फोटो दिला आहेस ना, तेच झाड मी म्हणत होते.
आणि ४ मधलं तुझं नावडत झाडं. या झाडावर खुप मधमाशा येतात. त्याच नाव माहित नाही. त्याची पानं थोडी कोयत्याच्या आकाराची असतात
साधना, अतिशय सुरेख लेख.
साधना,
अतिशय सुरेख लेख. धन्यवाद. अजून लिही प्लीज.
छान लेख आणि माहिती...
छान लेख आणि माहिती...
साधना, छान माहिती आणि फोटोज
साधना, छान माहिती आणि फोटोज
सप्तपर्णी उर्फ शेफ्लेरा>>>>याच्याबद्दल मी दिनेशदांना विचारले होते, फोटो पाठवायचा होता पण....
आमच्या हापिसात जाताना दुतर्फा याची झाडे आहेत. बहराच्या वेळी रात्री याचा मंद सुवास येतो. :-). धन्यवाद ओळख करून दिल्याबद्दल.
पण मला आवडतो. थोडा उग्र आहे खरा पण लांबवर वास येतो याचा.>>>अगदी अगदी
अजुन माहिती आणि फोटो येऊ देत
खुप छान लेख साधना, पुर्ण
खुप छान लेख साधना, पुर्ण पिकलेली फळे मात्र रंगाने काळीभोर, आत जांभळी आणि चवीला ... आ हा हा.. काय गोड लागतात..... अमृत अगदी... अ हा हा काय आठवन करून दिलीस साधना . लहानपणी हि फळ खुप खायची मी , आमच्या घराच्या बाजुलाच झाड होत .
लेख छानच झालाय आणि क्रमशः
लेख छानच झालाय आणि क्रमशः वाचून आनंद झाला. चला म्हणजे आणखी माहिती येऊ घातलिये!
साधना, मस्त लिहिलं आहेस अजून
साधना, मस्त लिहिलं आहेस अजून लिही.
तू बॉटनीवाली आहेस का?
साधना,छान लेख! परत येऊर ट्रीप
साधना,छान लेख!
परत येऊर ट्रीप करायची का? ह्या वेळेस जंगलात बॉटनीचा क्लास
तोषा, यावेळेस डोंगरात शिरुया.
तोषा, यावेळेस डोंगरात शिरुया. नुस्तं खालच्या खाली झाडं बघून झालीत आपली. वरती काही वेगळी झाडं असतील ना?
हे सगळे वाचल्याबद्दल
हे सगळे वाचल्याबद्दल सगळ्यांचे आभार..
क्रमशः आहेच कारण निसर्ग असा एका लेखात मावणारा नाहीये आणि तसा विचार करु जाता काहीजणांनी आंब्याचेही झाड पाहिलेले नसते. मग जेवढी मिळतील तितकी माहिती इथे द्यावी असा विचार केलाय.
अश्विनी, माझी लेक मला नेहमी 'तु बॉटनी का घेतले नाहीस?' म्हणुन टोचत असते, त्यावर मी तिला नेहमी माझ्यावरुन धडा शिक आणि तुला जो विषय जवळचा वाटतो त्याच्यातच मेजर कर असा सल्ला देत असते
(रच्याकने अकाऊंट्स हा विषय किती रुक्ष असावा याची साक्ष द्यायला दिनेश आणि मी हे दोन अकाऊंटंट पुरेसे आहेत )
आशु, आपण २१ ला जाणार होतो, आता पुढची तारिख सांग. आणि यावेळी चालणारे लोक बरोबर घेऊया म्हणजे नॅपापर्यंत पोचता येईल. आपले चालणे म्हणजे त्यापुढे ४ वर्षांचे बाळही धावतेय असे वाटायला लागते
Pages