जाणीव

Submitted by सुमेधा आदवडे on 15 December, 2008 - 14:43

दुपारचं जेवण झाल्यावर सोनल थोडा वेळ झोपावं म्हणुन आतल्या खोलीत जायला निघाली. तेवढ्यात फोनची घंटी ऐकुन तिथेच थांबली.
"हॅलो, सायलीची मम्मी ना?"
"हो, मी सायलीची मम्मी बोलतीये"
"हा काकु, मी अनघा. सायलीला आज ऑफिसमध्ये चक्कर आली होती. ती बेशुद्ध झाली होती. आता ठीक आहे ती. मी तिला डॉक्टरकडे नेलं होतं. आता आम्ही दवाखान्याच्या बाहेरच आहोत. मी तिला घरी घेऊन येते."
सोनलला काय बोलावं तेच सुचेना. ती पायात त्राण नसल्यासारखी मटकन सोफ्यावर बसली.
"हॅलो...काकु ऐकताय ना? तुम्ही आहात ना घरी? "
" अं..हो हो..मी आहे..लवकर आण तिला घरी."

थोड्या वेळाने अनघा आणी सायली आल्या. "बसा दोघीही. मी कॉफी करुन आणते. काय झालं ग अचानक?" सोनल अनघाला विचारु लागली. सायली तिथे थांबलीच नाही. तडक आपल्या खोलीत निघुन गेली!
" काही घाबरण्यासारखं नाही हो काकु. तिचा बी.पी कमी झाला होता. डोक्टर म्हणाले की स्ट्रेस मुळे झालं. हे मलाही जाणवतंय काही दिवसांपासुन सायलीचं ऑफिसमध्ये कशातच लक्ष नसतं, आमच्या गप्पांतही ती काही बोलत नाही, कोणाच्या जोक्स वर हसतही नाही. आधी अशी नव्हती हो सायली. म्हणजे सदैव हसरा चेहरा असणारी, सगळ्यांशी मनमोकळेपणे बोलणारी मुलगी आहे ती. मी किती विचारलं तिला काय झालंय म्हणुन . सतत टाळते ती. काकु, तुमच्या घरात काही प्रॉब्लेम आहे का?" अनघाने सगळं सांगितलं सोनलला
"नाही गं. कुणास ठाऊक काय झालं असेल ह्या मुलीला. हल्ली घरातही धड बोलत नाही कुणाशी, धड जेवत नाही, कशात ही लक्ष नसतं तिचं. किती वेळा विचारलं तरी सांगत नाही.आमच्या दोघांपैकी तिला कोणी काही बोललेलं पण नाही. तसं माझ्यापासुन ती काही लपवत नाही. पण ह्या वेळी खंरच समजत नाही आहे काय झालंय"
"ऑफिसमध्येही तसं काही फार टेन्शन नाही सध्या. उलट सायली मॅडमना यावर्षीही "एमप्लॉई ऑफ द ईयर" चं पारीतोषीक मिळालंय. तिनं तर खुश असायला हवं. आम्हा सगळ्यांना किती आनंद झाला होता समजल्यावर. पण सायली हसली देखील नाही, सर्वांना फार अनपेक्षीत होतं सायलीचं असं वागणं. आणी थोड्या वेळाने ती जागेवरून उठली आणी खालीच कोसळली! मग तिला आम्ही खुर्चीत बसवुन पाणी दिलं आणी मी सरांना सांगुन तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. काकु , मला काय वाटतं, तीची ना आतल्याआत कुठेतरी घुसमट होते. जो पर्यंत ती तिचा प्रॉब्लेम कोणाजवळ बोलत नाही, मोकळी होत नाही, तो पर्यंत तिला बरं नाही वाटणार. तुम्ही बघा ना बोलुन तिच्याशी"

सोनल अनघाचं बोलणं ऐकुन आणखी विचारात पडली. तिला फार काळजी वाटु लागली सायलीची. एकुलती एक मुलगी माझी, एवढी गुणी आणी लहानपणापासुन हुशार अगदी. सगळ्यांनाच कौतुक तिचं. दृष्ट लागली असेल माझ्या पोरीला.
"काकु, बोलाल ना तिच्याशी?" अनघाच्या आवाजाने सोनल पुन्हा भानावर आली.
"हो, मी बघते"
"ठीक आहे, मी निघु आता?"
"अगं थांब ना, कॉफी बनवते. बोलण्याच्या गडबडीत राहुनच गेलं. बस पाच मिन्टं. आलेच मी" सोनल ऊठू लागली.
" अहो राहुद्या आता काकु. मी सरांना सांगुन एका तासासाठी बाहेर आली आहे. उशीर होतोय मला. सायलीची दोन दिवसांची सुट्टी मी मंजुर करुन घेते. तिला सरांनीही सांगितलंय आराम करायला. तुम्ही सायलीकडे बघा. येते मी"

अनघा निघुन गेली. सोनलने दार लावले आणी सायलीच्या खोलीत गेली. सायलीला झोप लागली होती. तिने खोलीचे दार ओढले आणी पुन्हा बाहेर येऊन बसली. काहीतरी प्रॉब्लेम आहे हिला हे नक्की. पण ही सांगत का नाही आहे? आता सारखं सारखं विचारुन तिला हैराण नको करायला. आणी कुणास ठाऊक मला सांगते की नाही. मी नीलुला सांगते तिच्याशी बोलायला. नाहीतरी नीलु मावशी आवडती आहे तिची. तिला सगळं सांगतेच ती भेटल्यावर. ह्यावेळी ही तिचा प्रॉब्लेम ती नीलुसोबत शेअर करेल बहुदा. मी बोलवतेच नीलुला.
मनात ठरवुन तिने नीलुला फोन केलादेखील. नीलुने दुसऱ्या दिवशी यायचं कबुल केलं.
संध्याकाळी सुभाष घरी आले तरी सायली झोपलेलीच होती. नेहमीसारखी त्यांची नजर सायलीला शोधु लागली. " काय ग सोनल, सायली कुठे आहे? आली नाही का अजुन ऑफिसमधुन?" त्यांनी विचारलंच तिला.
सोनलने सुभाषला सगळं सांगितलं. नीलुला बोलवण्याचा निर्णय त्यांनाही पटला. आपल्याजवळ नाही निदान तिच्याजवळ तरी सायली मोकळी होईल अशी आशा होती त्यांना.
त्या रात्रीही सायली त्या दोघांशी काहीच बोलली नाही. जेमतेम चार घास जेवुन पुन्हा खोलीत गेली. सोनल आणी सुभाषना फार चिंता वाटत होती तिची. ईन मीन तीन माणसांनी सजलेलं घर. त्यातल्या जर कुणालाही काही त्रास होत असेल तर कसा जीव राहणार बाकी दोघांचा.
एकुलती एक मुलगी म्हणुन तिचे किती लाड व्हायचे घरात. आजवर त्यांनी तिला जे हवं ते दिलं होतं. जितकं शिकायचं आहे तितकं तिला शिकु दिलं. कामाला लागल्यानंतर देखील सायलीने बरेच कोर्सेस करुन त्यात उत्तमोत्तम यश मिळवलं. आता तर ती इतक्या छान हुद्द्यावर आहे की कुणालाही हेवा वाटावा. वयाच्या चोवीसाव्या वर्षीच तिने भरपुर काही मिळवलं होतं आयुष्यात. मग आता काय हवं असेल तिला? आपण तर काही चूक केली नाही ना? नक्की कुठे कमी पडलो आपण? काही सुचत नव्हतं दोघांना.
दुसऱ्या दिवशी सुभाषने सुट्टी घेतली.सायलीशी बोलण्याचा ती दोघंही कालपासुन आटोकाट प्रयत्न करत होते. पण ती काही नीट बोलत नव्हती. एकटीच शांत आपल्या खोलीत बसुन होती काहीतरी वाचत.
दुपारी नीलु आली. सोनलला तिला सर्व सांगताना डोळे भरुन आले. नीलुने तिला सावरलं आणी सायलीच्या खोलीत गेली. नीलुला पाहुन सायलीला अश्चर्य वाटलं पण बरंही वाटलं.
**********************************
नीलु बराच वेळ सायलीच्या खोलीत होती. बाहेर सोनल आणी सुभाषना सारखी हुरहुर लागुन राहीली होती. शेवटी बऱ्याच वेळाने नीलु बाहेर आली. सोनल आणी सुभाष दोघं अगदी आशेनं पाहत होते तिच्याकडे.
"काय झालं? काही बोलली ?" सोनलला रहावलं नाही.
" काही नाही झालंय ग ताई. खरं तर घाबरण्यासारखं काही नाही."
" अगं मग ती अशी का वागते?"
"ताई, सर्वात अधी तू टेन्शन घेऊ नकोस. मी काय म्हणते ते पटतंय का बघा तुम्हा दोघांना. तुम्ही दोघांनी तुमच्या मुलीसाठी किती आणी काय केलंय त्याची मी साक्षीदार आहे. आपल्या मुलांसाठी आपण सगळी कर्तव्ये करतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची काळजी करतो, काही हवं नको ते बघतो. त्यांना कशाची कमी पडु नये ह्याच्याकडे नेहमी लक्ष देतो. पण ताई, एवढं पुरेसं होत नाही ग मुलांना."
"म्हणजे? काय म्हणायचं आहे तुला? आणखी काय करायला हवं आम्ही तिच्यासाठी?" सुभाष चकित होऊन म्हणाले.
" जीजु, आपल्या मुलांचं विश्व सारखं बदलत असतं. त्यानुसार त्यांच्या गरजा पण वेगवेगळ्या असतात. तिथे आपण लक्ष द्यायला हवं. तुमची मुलगी लहानपणापासुन अतिशय हुशार. शेवटपर्यंत तिचा पहिला नंबर हुकला नाही. आणी तेही फक्त स्वतःच्या मेहनतीने, ती चांगले मार्क्स मिळवणार हे तुम्हाला आधीच माहित असायचं. पुढेही तीने डीग्री मध्ये फर्स्ट क्लास कधी चुकवला नाही, आणी कॅंपस मधुन जॉब पण मिळवला. ती पावलोपावली प्रगती करत गेली आणी अजुन करतीये.
जीजु, तुम्हाला तुमच्या मुलीचा अभिमान वाटावा असे किती तरी प्रसंग आहेत ना?"
"हो, ती आहेच हुशार"
" त्यातल्या किती प्रसंगी तुम्ही तिच्या खांद्यावर हात ठेऊन "आय ऍम प्राऊड ऑफ यु बेटा, अशीच पुढे जा, भरपुर प्रगती कर" असं म्हणालात?"
"कम ऑन नीलु, ह्यात प्रत्येक वेळी म्हणण्यासारखं काय आहे. बाहेर माझी मित्र-मंडळीत, आपल्या नातेवाईकात किती कौतुक होतं तिचं. आम्हाला माहीत आहे ती यशस्वी होणार. तिच्या यशाची सवय झाली आहे आम्हाला."
" ताई, कुठल्या आई-वडीलांना अभिमान नसतो आपल्या मुलांचा? कोणाला वाटणार नाही आपली मुलं पुढे जावी. पण मुलांना प्रोत्साहनाची गरज असते. आणी प्रोत्साहन हे अन्नासारखं असतं, पोषक. ते आपलं काम करतं आणी थोड्या वेळात कमी होतं, मग संपतं. मग ते पुन्हा मिळायला नको? भुक लागल्यावर आपण जेवतोच ना? आणी जगाकडुन मिळालेल्या शाबास्की पेक्षा आई-वडीलांकडुन पाठीवर मिळालेली कौतुकाची एक थाप खुप महत्वाची असते मुलांसाठी. सायलीने एवढी वर्षे आपला अभ्यास, आपलं काम अगदी मन लावुन केलं आणी भरपुर यश मिळवलं, पण फक्त तिच्या हुशारी मुळे आणी इच्छाशक्ती मुळे. तिच्या टॅलेंटवर तुम्हाला पुरेपुर विश्वास असल्यामुळे तुम्हाला तिला प्रेरणा द्यायची गरज वाटली नाही. किंबहुना तिच्या प्रेरणास्थानी कोणीच नव्हते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. "
" बरोबर म्हणतेस तू नीलु. पण आता सगळं झालेलं आहे. मग तिला आता कितीही वाईट वाटले तरी आम्ही काय करणार? सांग ना, काय करु म्हणजे तिला बरं वाटेल?" सोनल म्हणाली
" तिच्या आनंदात सहभागी व्हा. तिच्या यशाचे साथीदार बना. गेल्या महिन्यातच ती ऑडीटींगची परीक्षा एवढ्या छान गुणांनी पास झाली. काम आणी अभ्यास दोन्ही करुन सुद्धा कुठेही दुर्लक्ष झालं नाही तिचं. आणी जेव्हा ह्यासाठी पार्टी द्यायचं तिने तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही म्हणालात की तुझ्या मित्र-मैत्रीणींना घेऊन बाहेर पार्टी कर. का जीजु? तिला तुम्ही दोघं हवे होतात तिच्या पार्टीमध्ये. का नाही गेलात? गेली दोन वर्षे सलग सायलीला "एमप्लोयी ऑफ दे ईअर" चं अवॉर्ड मिळालय. ही काही लहान गोष्ट नाही ताई. काय सेलीब्रेशन केलंत तिच्यासाठी? जीजु हे सगळं मला तुम्हाला सांगावं लागतंय कारण सायली तुमची एकटीच मुलगी आहे. तिला कोणी भाऊ-बहीण असती तर कदाचित त्यांनी ह्या सगळ्यात पुढाकार घेतला असता. पण तसं नसल्यामुळे हे तुम्हा दोघांनाच बघायला हवं.
तीला तिच्या प्रत्येक छोट्या-मोट्या आनंदात तुम्हा दोघांना वाटा द्यायचा असतो. तुमच्या बरोबर शेअर करायचा असतो. ताई, ती पार्लर मधुन साधा फेशीयल करुन आली तरी तुझ्या कडुन तिला ऐकायचं असतं की ती छान दिसतीये. तुमच्या मुलीचं विश्व तसं फार छोटं आहे जीजु. आणी तुम्ही दोघं त्यातले प्रमुख घटक आहात. तुम्हा दोघांना तिचं फार कौतुक असेल, अभिमान असेल, नाही आहेच. पण ते तिलाही कळुदे ना. हा ही तुमच्या प्रेमाचा भाग आहे, तो दिसुदे तिला. पटतंय का मी काय बोलतीये ते?" नीलुने दोघांकडे पाहुन विचारलं.
" पटतंय ग नीलु. आम्हाला तरी कोण आहे तिच्याशिवाय. सगळ्या आशा-अपेक्षा तिच्यावरच येऊन थांबतात ना." सोनलला भरुन आलं बोलताना.
"मग आता मी सांगते ते करा......"
*********************************
दुसऱ्या दिवशी सायलीला बरं वाटत होतं म्हणुन ती ऑफिसला गेली. संध्याकाळी परत आली तेव्हा सोनल आणी सुभाषने छान पार्टी अरेन्ज केली होती तिच्यासाठी. तिचे सगळे मित्र-मैत्रीणी आले होते. समोर "कॉन्ग्रॅजुलेश्न्स"चं बॅनर होतं. "एमप्लॉयी ऑफ द ईयर" चा अवॉर्ड देणारे तिचे सरही आले होते तिला विश करायला. सायलीच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी पुन्हा तिचं गोड हसु सर्वांना पहायला मिळालं. ती सोनल आणी सुभषच्या जवळ गेली. दोघांनी एकत्र मिठीत घेतल्यावर आपसुकच तिचे डोळे भरुन आले. ह्या सर्वांना त्यांच्यातच असलेल्या अपुलकीची जाणीव करुन देणारी नीलु एका बाजुस ऊभी राहुन मंद हसत होती.

समाप्त.

गुलमोहर: 

फारच बालिश वाटली .. एव्हढ्या मोठ्या झालेल्या, हुशार मुलीला आई-वडील लहान मुलांना देतात तशी शाबासकी मिळाली नाही म्हणून depression येतं हे काही पटलं नाही ..

मला नाही वाटली बालिश ! प्रत्येक मुलाला किंवा मुलीला, विशेषतः एकुलते एक असेल तर आपल्या आई वडीलांबद्दल असलेली ओढ काही वेगळीच असते. इतरांकडुन मिळालेली शाबासकी , बक्षिसे, पारितोषिके, पदव्या या सर्वांपेक्षा आई वडीलांनी प्रेमाने पाठीवरुन फिरवलेला हात खुप महत्वाचा असतो. ती त्यांचे त्या अपत्यासाठी केलेले कष्ट सार्थकी लागल्याची सर्वोच्च पावती असते. आई वडीलांवर जिवापाड प्रेम करणार्‍या प्रत्येक अपत्याला ही पावती खुप महत्वाची असते. कारण तीच त्याला आपण आपल्या आई वडीलांच्या प्रेमाच्या , मायेच्या लायक आहोत याचे समाधान देते.

हे केवळ डिप्रेशन नाही, तर आपण कुठेतरी कमी पडतोय ही भावना आहे. ही गोष्ट सायलीचं आपल्या आई वडीलांवर असलेलं निरतिषय प्रेम, तिची कृतज्ञतेची भावना दाखवतेय. सुमेधा, खुप छान उतरलीय कविता. फक्त अजुन थोडासा फ्लो येवु द्या. खुप सुंदर.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

सुमेधा विषय चांगला आहे पण त्याला वळण वेगळ हव होत.
सायलीने दु:खी न होता हिच गोष्ट आपल्या मावशीला सांगण्या पेक्षा आपल्या आई वडिलांना सांगितली असती तर त्यांनी ते आधिच केले असते.

माणुस कितीही मोठा झाला तरी त्याला अप्रिसिएशन लागतेच. नेमकी जवळची लोकच ते विसरतात. आणि जवळच्या लोकान्च्या कडुन मिळनारी शाबासकीची थाप खुप बळ देते. मला आवडली गोश्ट आणि पटली पण.

लहान वयातली मुलगी असती तर ठिक असतं. पण मुलगी शिकलेली सवरलेली, एकुलती एक शिवाय नोकरी करणारी दिसतेय, मग आई-वडीलांशी उघड उघड संवाद नाही साधू शकत?
आईची ही कमाल आहे, मुलीला आधी विचारून प्रयत्न करून पहायचा, थेट आवडत्या मावशीला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बोलवायंच? Uhoh
आणि खरं तर आई आहे म्हणजे विचारायची गरज पडता कामा नये, आईला मुलांच्या मनातलं आपोआप कळतंच.

सुमेधा चांगला प्रयत्नं आहे. विषय कठिण निवडलायस. माझ्यामते ह्यातली गोम आहे- तिची व्यथा आई-वडिलांना कळणं ही नाही तर ती तिने व्यक्तं करणं... कशी केली असेल? निलूमावशीकडे?
एव्हढ्या वयाला हे तिच्या लक्षात आलं असेल की एका बैठकीत नीलूने काढून घेतलय?

जिथे कथेचं बीज आहे तिथेच ती गुलदस्त्यात गेलीये... असं मला वाटतं.

अजून येऊदेत कथा...

खुलवलीये छान.. Happy आवडली. आईने-बाबाने मैत्रीचे नातं जोपासल नाही अस वाट्टं. Happy

पण कौतुक आईवडिलांच्या डोळ्यातूनही दिसतच की.. Happy तिची नेमकी घुसमट कुठे झालीये नाही कळलं अन लहानपणी प्रोत्साहन दिल्याशिवाय्-कौतुक केल्याशिवाय इतकी प्रगती होणार नाही, म्हणून थोडी आश्चर्यकारक वाटली..:)

प्रतीक्रीयांबद्द्ल सर्वांचे धन्यवाद!
विशालला शंभर मोदक!! जर सायलीचं आई-वडीलांवर जीवापाड प्रएम नसतं तर हे depression कदाचित आलं नसतं. आई-वडीलांची कौतुकाची थाप आयुष्यात किती महत्वाची असते हे मी स्वतः बर्‍याच वेळा अनुभवलं आहे. मग ते कितीही बालीश वाटो!
दक्षीणा,
मला वाटतं सायलीचं आपल्या आई-वडीलांवर असलेल्या नितांत प्रेमामुळे तीने उघड उघड बोलुन आई-वडीलांना दुखवावं असं चित्रण करणं मला पटलं नाही. आणी तिच्या आईने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला हे मी म्हटलं आहे कथेत! पण ती काही न सांगत असल्यामुळे नीलुला बोलावलं तिच्या आईने.
दाद,
तुझं म्हणणं पटलं, कदाचित मी नीलु आणी सायलीचा संवाद ही उतरवुन त्यात सायलीला आणखी खुलवायला हवं होतं. पुढच्या कथेत आणखी विचार करुन चांगलं लिहेन Happy
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासुन आभार!:)

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

विषय चांगला अहे पण अजुन काही हवे होते, काही हरवले आहे असे वाटले. घरातल्यांमध्ये एवढा सुसंवाद कसा नाही? तिला जर आई वडिलांना दुखवायचे नव्हते तर ती अशी रूममध्ये उदास बसुन राहिल्याने आई वडील अधिकच काळजीत पडतील ना? सुमेधा, तुझ्याकडे स्टाईल आहे, विषयही आहे पण अजुन काहीतरी कमी पडतेय असं मला वाटलं. लिहित रहा म्हणजे आपण कुठे गडबडतो हे आपल्यालाच समजतं. Happy लगे रहो.

मला कथा खूप आवडली आणि पटली. आई वडिल मुलांना इतक गृहित धरतात की ते मुलांचं कौतुक करायला विसरतात. त्यांना वातत, त्यात काय, हे सगळं अचिव्ह केलं हे ती/ तो करणार होतेच - तेवढी हुषारी आहेच त्या/तिच्यात, ह्याचा दुसरा अर्थ असाही होतो की मुलांच्या मनात कुठेतरी भीतीसुद्धा जन्माला येते की, मी जर हे अचिव्ह केलं नसतं तर?

आईवडिलांनी मुलांच्या भावविश्वाचा भाग होणं खूप महत्वाचं आहे.

बरेचदा साध्या आणि सहज करता येणार्‍या गोष्टी (कौतुकाचे २ बोल) बालिश वाटू शकतात. पण कित्येकांचे (अगदी मी सुद्धा) अनुभव असतील की आई-वडिलांचे कौतुकाचे २ शब्द मुलांसाठी जगाच्या हजारो शुभेच्छांपेक्षा महत्त्वाचे असतात.

असो. लिहित रहा. आजकाल साधं सोपं वाचायलाच नको असतं की काय असं वाटुन गेलं. Sad