"कृष्ण! कृष्ण!" घारुअण्णानी कपाळावरचा घाम पुसला. उन्हे वाढली होती. ऊष्ण रखरखीत वाटेवरून बराच वेळ चालून त्यांचे म्हातारे पाय थकले होते. बरेच अंतर अजून बाकी होते. कोणी पांथस्त साथिला मिळाला तर बरे होईल असा त्यानी विचार केला. कपाळावर हात ठेवून दूरवर चौफेर नजर फिरवली. कोणीही नव्हते. "हूँ" एक सुस्कारा सोडुन त्यानी पुन्हा वाट तुडवायला सुरुवात केली. थोडेसे अंतर काटल्यावर आपल्याला कोणितरी हाक मारत आहे असा त्याना भास झाल. त्यांनी मागे वळून पाहिले. कोणिही दिसेना. "भासच असावा. अशा निर्जन ठिकाणी आपल्याला ओळखणारे कोण भेटणार?" पण लांबून परत एक हाळी आली. "सर! सर!!" दूरवरून एक आकृती त्यांच्यादिशेने धावत येत होती. "आपला विद्यार्थी? ह्या ठिकाणी?" त्यानी डोळ्यावरचा चष्मा काढला, साफ केला आणि परत डोळ्यावर चढवला. हळूहळू ती आकृती सुस्पष्ट होत गेली. एक सतरा आठरा वर्षाचा पोरगा होता. धावत धावत आल्यामुळे त्याला धाप लागली होती. ".....सर!......."
"अरे हो हो हो! दम घे! कोण तू? मला कसा ओळखतोस?"
"वा सर! तुम्हाला कोण ओळखत नाही? मी मधू!" एक मोठा श्वास घेऊन त्याने उत्तर दिले. "कुठे चाललात एवढ्या उन्हात?"
"पलीकडच्या गावी जायचे होते! पण तू कुठे चाललास?" घारूअण्णा गावच्या शाळेत संस्कृत शिकवायचे. "आपलाच विद्यार्थी हा! आता नाव आठवत नाही हे खरे. पण कुणाकुणाचे नाव लक्षात रहाणार?"
"मी ही तिकडेच चाललो आहे. चला! तुम्हाला सोबत करतो. एकटेच चाललात?"
"हो रे!"
"वाईट वाटून घेऊ नका. पण मुलगा, सून, बायको कुणी बरोबर नाही म्हणून विचारतो."
"कृष्ण! कृष्ण!!" एवढेच शब्द घारूअण्णानी कसेबसे उच्चारले.
"माफ करा! आपल्याला अडचणीत आणायचे नव्हते मला! चार गप्पा मारल्या की उन्हाचे चटके जाणवत नाहीत. म्हणून काहितरी विचारले" मधू शरमून म्हणाला.
"अरे! माझ्या म्हातार्याच्या आयुष्यात काय आहे लपवण्यासारखे? एक मुलगा होता रे! जगातला सगळ्यात गुणी मुलगा होता. श्रावणबाळासारखा काळजी घ्यायचा आमची. अवघ्या सोळाव्या वर्षी अपघातात दगावला." घारूअण्णांचे डोळे पाणावले. "कृष्णाला दया कशी आली नाही रे त्याचा प्राण घेताना? काय वाईट केले होते त्याने कुणाचे?" घारूअण्णाना एकदम भरून आले.
"परमेश्वराचा खेळ आहे सगळा सर!"
"सर! तुम्ही छत्री नाही आणली बरोबर? काय उन आहे!" मधूने विषय बदलायचा प्रयत्न केला. त्याने आपली छत्री घारूअण्णांच्या डोक्यावर धरली.
"तो धक्का माझी पत्नी सहन करू शकली नाही." घारूअण्णांचे डोळे पाण्यानी डबडबले.
मधूला घारुअणांची ती परिस्थिती पहावेना. त्यानी अलगद अण्णांच्या पाठीवरून हात फिरवला. आपल्याकडील रुमालाने त्यांचे डोळे पुसले. अण्णाना जरा मन मोकळे झाल्यागत वाटले. सूर्य ढगाआड लपला. अचानक त्या भट्टीसारख्या तापलेल्या वातावरणात थंड वार्याची नाजाणे कुठून झुळूक आली. अण्णांच्या समोर त्यांचा जीवनपट तरळू लागला. मुग्ध बालपण, आईच्या मायेच्या पदराआड लपून घालवलेले ते रम्य दिवस, वडिलांचा मार, शाळेतली मौज, कॉलेजचे तारुण्यानी सजवलेले, जग जिंकायचा उत्साह असलेले, ध्येयाने भारावलेले आणि यौवनाच्या मस्तीत ओतप्रोत भरलेले धुंद दिवस, लग्न, प्रणय, सुपुत्राचा जन्म. काय सुंदर दिवस होते ते! घरी आल्यावर प्रेमाने भाकरतुकडा ओवाळणारी आणि हसत हसत स्वागत करणारी आई अचानक एके दिवशी भिंतीवरच्या तसबीरीमधे जाऊन बसली. किती विनवले अण्णांनी! पण खाली उतरायला तयारच होईना ती. "कृष्ण! कृष्ण!!" अण्णांच्या अयुष्यातला पहिला आघात होता तो. पण ही फक्त सुरुवात होती. असे अनेक आघात त्याना सहन करायचे होते. काही दिवसानी त्याना फटकावून काढणारे, पण आभाळाएवढे प्रेम करणारे त्यांचे वडील देवाघरी आणि अण्णा पोरके झाले. पण किरणच्या, त्यांच्या मुलाच्या बोबड्या बोलांनी त्यांचे दु:ख हलके झाले. किती गोड होता किरण! त्याचे ते अडखळणारे पहिले पाऊल, तो पहिल्यांदा आई, बाबा बोलला त्यावेळी त्याना झालेला आनंद, तो त्यांच्या बोटाला धरून त्यांच्या शाळेपर्यंत येत असे. त्यांनी धरून किरणला सायकल चालवायला शिकवले होते. संध्याकाळी त्याला शेजारी बसवून शुभंकरोति म्हणत अण्णा. नकळत त्यांच्या चेहेर्यावर हास्याची पुसट रेषा उमटली.
पायाला ओले ओले काहितरी लागले तसे अण्णा भानावर आले. समोर एक लहानसा ओहोळ होता. ते पोटभरून पाणी प्याले. आणि मग अचानक त्याना आठवण झाली. "मधू!!! बाळा कुठे आहेस रे?"
"हा काय! मी तुमच्या पाठी होतो. तुम्ही विचारात गर्क होतात."
"हं!" आता हा ओहोळ कसा पार करायचा? त्यानी जरा इकडे तिकडे जाऊन प्रवाह कुठे अरुंद होतो आहे का पाहिले. शेवटी तो प्रयत्न सोडून दिला. "मला नाही जमणार हा ओहोळ ओलांडायला." त्यानी नैराश्याने उद्गार काढले.
"छोटासा तर आहे. एक काम करुया. मी तुम्हाला पाठीवर उचलून घेतो. घाबरू नका हो! पाडणार नाही मी तुम्हाला"
मधूने अण्णांना पाठुंगळीला घेतले आणि ओहोळ पार करून दिला.
आता उन्हे उतरली होती. गाव बराच मागे राहिला होता. गावात त्यांचे कोणिही नव्हते पण का कुणास ठावूक त्याना अचानक गावाची ओढ वाटू लागली. दूरवर वेशीवरचे दिवे लुकलुकत होते. आपल्या घराचे काय झाले असेल? रोज न चुकता पोळी भाजी करून देणारी शोभा त्याना घरात शोधत असेल काय? गुणी पोर! "अण्णा तुम्ही एवढ्या लोकाना फुकट गीता शिकवता, मग तुम्हाला मी पोळ्या भाजी दिली करून मग काय झाले? पुण्यच लागेल मला!" ती अण्णना रोज म्हणायची. पैसे देऊ केले तरीही घ्यायची नाही. तिच्या लग्नात देईन तिला एक मस्तपैकी शालू. अण्णानी मनात ठरवले होते. तिला कोण देणार शालू? अध्यात्म मंदिराचे लोक येतील गीता शिकायला. कोण शिकवणार त्याना गीता? दहावी बारावीची पोरे येतील संस्कृत शिकायला. त्यांचे महत्वाचे वर्ष. मी सुद्धा वेड्यासारखा घर सोडून आलो. अजून किती कामे राहिली आहेत. परत फिरायला हवे. अण्णा वेड्यासारखे मधूला सांगत होते.
"सर! गाव खूप दूर राहिला. सूर्यास्त होत आला आहे. आता परत फिरणे अशक्य आहे." मधू ठामपणे बोलला.
"अरे वेड्या! भराभर पाऊले उचलली तर पोहोचू. उद्या निघू परत." अण्ण हट्ट सोडेनात. गावाच्या आठवणीनी ते हळवे झाले. केवढे प्रेम दिले गावाने त्याना! किती सुंदर अयुष्य होते त्यांचे तिथे. छे! परत गेलेच पाहिजे! अण्णा मधूला विनवणी करू लागले.
"सर! माझ्या डोळ्यात डोळे मिळवून पहा एकदा. ओळखा मला! मी मधुसूदन कृष्ण! ज्याची गीता तुम्ही लोकाना शिकवता तो! तुमची आई बनून तुम्हाला प्रेमाने जवळ घेणारा मीच! तुमचा बाप बनून तुम्हाला जगात जगण्यासाठी लायक बनवणारा मीच! तुमची पत्नी बनून तुमचे सुखदु:ख वाटणाराही मीच! मीच तुमच्या किरणच्या तोंडून बोबडे बोललो. मीच शोभा बनून तुम्हाला भाकर खावू घातली. उन्हात तुम्हाला चटके बसल्यावर मीच तुमच्या डोक्यावर छत्र धरले. तुम्हाला दु:ख झाल्यावर मीच तुमचे डोळे पुसले. सुखद आठवणी आल्यावर तुम्हाला माझा विसर पडला, पण तरीही मी तुमच्या पाठीशी राहीलो. निसरड्या जमिनिवरून मी तुम्हाला उचलून वाहून नेले. तुमचा गाव दूर रहिला सर! पैलतीर जवळ आले आता."
"मधू?" अण्णांचे सर्व अंग कंप पावू लागले. "तू?.........." शब्द जिभेवर गोठले. हवेत एक दैवी सुगंध पसरला होता. त्यांच्या जिभेवर एक अवीट गोडी तरळत होती. "देवा!!!!!!!!" त्यानी हंबरडा फोडला! "देवा! सर्व काही संपले रे! तरीही जिवाला ही कसली ओढ लागली आयुष्याची? सुकले पान तरीही देठ अजून हिरवा का रे? का धरून राहिले आहे हे पान वृक्षाला? का सुटत नाही मोह? कसले बंध आहेत हे? का तुटत नाहीत?" त्यांच्या डोळ्यातून आश्रूंचा बांध फुटला होता. मग बराच वेळ ते तसेच रडत होते. मग अचानक नव्या चैतन्यानी त्यांचा देह थरारून उठला. मान वरती करून त्यानी मधूच्या डोळ्यात पाहिले. "देवा! मी तुला आता पूरते ओळखले. माफ कर मी तुला आधी नाही ओळखू शकलो. ह्या म्हातार्यापायी तुला कष्ट झाले. देवा! एकच विनंती आहे. इथपर्यंत साथ दिलीत. आता ह्या म्हतार्याला वेशीपलिकडे सुद्धा घेऊन जा! माझे चित्त विचलीत होत आहे. त्याला भरकटू न देता पैलतीरी पोहचवा!" मधूला प्रेमभराने मिठी मारून अण्णा शेवटचे शब्द बोलले "कृष्ण! कृष्ण!!"
पैलतीर
Submitted by येडाकाखुळा on 21 April, 2008 - 09:02
गुलमोहर:
शेअर करा
छान नेटकी
छान नेटकी कथा लिहीलीस रे
आधीच्या लिखाणा पेक्षा एकदम वेगळी
असाच छान छान लिहीत रहा
खरच छान
खरच छान आहे कथा!!!!!!
छान. छान
छान.
छान कथा! एका 'गुरूजीं'ना जसा भेटायला हवा तस्साच भेटला तो... फक्तं आपल्याला तो कसा भेटायला हवा तेच मुळात आपल्याला माहीत नसतं... असाच कधीतरी... किंवा शेवटीतरी भेटत असेल... फक्तं आपल्याला कळायला हवा रे..
कथा आवडली.
काय सुरेख!!
काय सुरेख!! आवडली कथा एकदम...
खुपच सुंदर
खुपच सुंदर , आटोपशीर लिहिलय .. आवडेश
वा! सुरेख
वा! सुरेख लिहिलंय!
सुन्दर
सुन्दर कथा.
सुरुवातिला वाचताना आजिबात अन्दाज येत नाहि.
शेवट सुन्दरच.
खरच मरणाआधी असे मरण कळायला हवे.
समाधानानि मरण येइल.
खुपच मस्त!!
खुपच मस्त!! आवडली कथा!!
तो आपल्याला कधी कुठे कुठ्ल्या रुपात भेटतो, कळत नाही. पण भेटतो जरुर. आपण वाट पहायची.
आधीच्या
आधीच्या लिखाणानंतर एकदम वेगळी आणि सुंदर कथा. खरच मरताना आयुष्याचा असा सगळा पट डोळ्यासमोर उलगडत असेल का?
छान,
छान, प्रगल्भ लेखन! एक वेगळीच हूरहूर लावून जाते कथा.
सुंदर कथा.
सुंदर कथा. मस्तच रे
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
छान झालीये
छान झालीये कथा, सुरेख अगदी.
एकदम छान
एकदम छान कथा आहे!
अभिनंदन!!
1dum chan katha aahe
1dum chan katha aahe
शेवट
शेवट अप्रतिम
कथा आवडली
अतिशय
अतिशय वेगळी कथा. खुप खुप खुप सुरेख. शेवट तर अनपेक्षित... "असेच होत असेल का" हा विचार प्रत्येकाच्या मनात आला असेल.
-प्रिन्सेस...
केवळ
केवळ अप्रतिम!!!
तो
तो घननीळ....
श्यामसावळा.............
तो चक्रधर...
"श्रीकृष्ण".......
त्याच्या जवळ जाणं ही कल्पनाच किती सुंदर आहे.
सही!!!!!!!!!!!!!!!
छान ,आवडली.
छान ,आवडली.
खरच खुपच
खरच खुपच छान होती कथा खुप बरं वाटले
अतिशय
अतिशय सुरेख कथा !
छान कथा
छान कथा आहे. असे मरण नवस करुन पण मीळणार नाही.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
तो आपल्याला कधी कुठे कुठ्ल्या रुपात भेटतो, कळत नाही. पण भेटतो जरुर. आपण वाट पहायची. किति ते सांगता येत नाही.
मस्त!!!
मस्त!!!
खुपच मस्त!!
खुपच मस्त!! आवडली कथा!!
तो आपल्याला कधी कुठे कुठ्ल्या रुपात भेटतो, कळत नाही. पण भेटतो जरुर. आपण वाट पहायची.