टु द लास्ट बुलेट

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

टु द लास्ट बुलेट
अशोक कामटे यांची जीवनकहाणी
२६/११ अतीरेकी हल्ला, लोकेशनः कामा हॉस्पिटल परिसर.. एक शोधयात्रा..

लेखकः विनीता कामटे, विनीता देशमुख
मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादः भगवान दातार
अमेय प्रकाशन, पुणे.
पहिली आवृत्ती: २२ डिसेंबर २००९.

२६/११ च्या घटनेला तब्बल दोन वर्षे पुरी झाली तरी अजूनही हे सर्व काल परवाच घडले असावे असे वाटत रहाते- निमित्त काही का असेना- पुन्हा त्याच श्रध्धांजल्या, नेत्यांची पोकळ भाषणे, वृत्तपत्रातील रकाने, या घटनेत ज्यांचे सर्वस्व गेले त्यांचे गहीवर, लेख, कविता, चर्चा, वगैरे वगैरे. आपले कुणीही जिवा भावाचे या जगातून गेले की एक पोकळी कायमची रहाते. २६/११ या काळरात्री शहीद हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे (खेरीज तुकाराम ओंबळे, मेजर ऊनीक्रीश्णन, आणि पोलिस दलातील ईतर व लष्करातील लढवय्ये) यांना शौर्यमरण आले तेव्हा या तीघांच्या जीवलग आणि कुटूंबातील ईतर व्यक्तींच्या आयुष्यात अशीच एक पोकळी निर्माण झाली असणार पण त्याही पेक्षा एक प्रचंड मोठी पोकळी राष्ट्रीय सुरक्षेत निर्माण झाली असे म्हणावेसे वाटते अन "टु द लास्ट बुलेट" हे पुस्तक वाचल्यावर दुर्दैवाने या मताला दुजोरा मिळतो.

खरं तर अशोक कामटे यांच्याबद्दल या घटनेपूर्वी आणि नंतरही वाचलेले, ऐकलेले, या सर्वातून निर्माण झालेली एक उत्सुकता यापोटी हे पुस्तक विकत घेतले होते. पण पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर हे पुस्तक वाचले नसते तर किती महत्वाच्या माहिती, गोष्टींना आपण मुकलो असतो याची जाणीव झाली.

पुस्तकातील पहिलेच प्रकरण २६/११ च्या "त्या" काळरात्री बद्दल आहे. ते वाचता वाचता जणू पुन्हा सर्व काही टिव्ही वर लाईव्ह बघत आहोत असा भास होत होता अन त्या रात्री काय घडले हे आता सर्व जगाला एव्हाना माहित असले तरी पुस्तक वाचताना पुढे काय घडले असेल अशी एक विचीत्र जीवघेणी उत्सुकता लागून रहाते. या पहिल्याच प्रकरणातील एका पानावर मी थबकलो तो थबकलोच त्यानंतर पुढील पाने वाचायला प्रयत्नपूर्वक हिम्मत केली ती तब्बल दोन दिवसांनी. आयुष्यात प्रथमच ईतकी चलबिचल, तगमग मी अनुभवली.

ज्या अशोक कामटेंबरोबर आयुष्याची तब्बल १८ वर्षे पत्नी, सहचारिणी, मैत्रीण म्हणून काढली, ज्यांच्याशी रोज त्या फोन वर बोलत असत, ज्यांच्याशी "त्या" रात्री ११.२५ वाजता त्या फोन करून आपल्या लहान मुलाचा निरोप अशोक कामटे यांना देतात की "मम्मा, प्लिज डॅडांना बुलेटप्रूफ जॅकेट घालायला सांग ना..", त्या विनीता कामटे म्हणजे अशोक कामटे यांच्या पत्नीला तासाभरात "ती" वाईट बातमी कळते तेही टिव्ही वरून निव्वळ तीन शब्द "अशोक कामटे शहीद"!

ते तीन शब्द अन ते पान कितीही प्रयत्न केले तरी डोळ्यापुढून हलत नाही. कारण त्या वाक्या आधी विनीता कामटे यांनी पुस्तकात त्या रात्रीबद्दल अन मुंबईत कारवाई होत असताना, ईकडे पुण्यात त्यांच्या मनात ऊठलेले शंका, कुशंका यांचे काहूर, काळजी, आपल्या दोन लहान मुलांना धीर देताना स्वता: मनातून घाबरलेली आई, एकीकडे अशोक च्या शौर्याबद्दल निश्चींत तर दुसरीकडेच या थेट शौर्यापायी ते अडचणीत तर येणार नाहीत ना ही भिती, हे सर्व लिहील्याने या प्रसंगाआधीची तगमग, काळजी आपल्याला अस्वस्थ करते अन नंतर वरील तीन शब्द वाचल्यावर आपलेही मन सुन्न होते. नियती किती क्रूर असू शकते, अन ते कळूनही आपल्या हातात काहीच नसतं या जाणिवेतून येणारं वैफल्य अन नैराश्य एखाद्याला पार ऊध्वस्त करू शकतं. वास्तविक तीन डीसेंबरला आपल्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमीत्त त्याला सरप्राईज म्हणून अचानक मुंबईहून पुण्याला यायचा कामटे यांचा प्लॅन असतो. पण नियतीचा प्लॅन काही वेगळाच असतो.

पण त्याही वेळी आपल्या लहान मुलांकडे पाहून, अशोक च्या आई वडील अन ईतर आप्तजनांच्या जाणिवेने स्वताचे दु:ख आत लपवू पाहणार्‍या, आतल्या आत क्षणाक्षणाला उध्वस्त होणार्‍या अन शेवटी एकवार निव्वळ आपल्या पतीच्या थंड देहाला कवटाळून रडणार्‍या विनीता कामटे यांना मी तरी दोनच दिवसांनी महत प्रयासाने पुस्तकात सामोरे गेलो.

त्यापुढील "अखेरचा प्रवास" या प्रकरणात अशोक कामटे यांच्या अतींम यात्रेचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन आहे. विनीता कामटे लिहीतात-
" माझे सासरे तर दु:खाने पूर्ण कोलमडले होते. पण तेही एक लष्करी अधिकारी होते. अखेरच्या क्षणी त्यांच्या मनातला सैनिक जागा झाला आणि अखेरची मानवंदना चालू असताना त्यांनीही खाडकन सॅल्यूट ठोकत वीरमरण प्राप्त केलेल्या आपल्या पुत्राला अखेरची सलामी दिली. देशासाठी प्राणार्पण करणार्‍या एका पुत्राला त्याच्या पित्याने केलेले ते अभिवादन होते. पुत्रवियोगाचे दु:ख तर होतेच पण तो देशासाठी धारातिर्थी पडला याचा अभिमान त्याहून मोठा होता...."
"तो जसा जगला तसच त्याला बघणं मला आवडेल. त्याचा निष्प्राण देह मला बघवणार नाही. मला अजूनही असच वाटतं की कोणत्याही क्षणी अशोक येईल, दारावरची बेल तितक्याच अधीरतेने वाजवेल आणि दार उघडताच 'हाय मॉम' म्हणत माझ्या कुशीत शिरेल. त्याच्या त्या मिठीने माझ्या जीवनात नवं चैतन्य सळसळायला लागेल. त्याचं तेच चित्र मला माझ्या डोळ्यांपूढे कायम ठेवायचं आहे, त्याचा अंत्यविधी मला बघवणार नाही..." कामटेंच्या आईंचं मन असाहय्यपणे बोलत होतं.

पुस्तकातील हे पहिले प्रकरण अक्षरशः अंगावर येते, या एकूण घटनेतील तपशील अनेक वेळा टिव्ही वर पाहिलेला असून देखिल. ईथे लेखीकेच्या लिखाणाला दाद देण्याचा व्यावहारीक मूर्खपणा आपल्या हातून होणार नाही याची काळजी घेताना मात्र त्या अनुशंगाने पुढील अधिक तपशिलातील लिखाण लेखिकेने कसे केले किंवा "का" केले याचे उत्तर म्हणजेच हे अख्खे पुस्तक आहे.

२६/११ च्या घटनेत एकंदर कामा हॉस्पिटल परिसरात नेमके काय घडले याबाबत वृत्तपत्रे, टिव्ही व ईतर मिडीया यात कुठेही ठळक तपशील नाही. किंबहुना अनेक वेळा "ईतक्या अनुभवी अन हुषार अधिकार्‍यांनी एकाच जागी एकत्र जायची चूक केली कशी"? असे निव्वळ संतापजनक अकलेचे तारे लोकांनी तोडलेले आपण ऐकलेले आहेत. नेमकी याचेच ऊत्तर शोधायचा ध्यास या पुस्तकातून समोर येतो.
विनीता कामटे लिहीतात-
"अशोकची साथ आता कायमची संपल्याचं दु:ख्ख आता माझ्या काळजात सलत होतं पण त्याहीपेक्षा ही घटना का घडली याची बोच माझ्या मनात अधिक होती. सात्वनाला येणारे सुध्धा अगदी सहजपणे, नकळत बोलून जात होते, "करकरे, कामटे, आणि साळसकर यांना स्थितीचं गांभीर्य कळलच नाही." या अशा वाक्यांनी मी मनातल्या मनात पेटून ऊठत होते. हे कसं शक्य आहे? हा प्रश्ण माझा पिच्छा सोडत नव्हता. एकीकडे हे तिन्ही अधिकारी एका रात्रीत सगळ्या देशाचे हिरो झाले होते. चौकाचौकात लोक त्यांचे फोटो लावून त्यांना अभिवादन करत होते. माझ्या मनात मात्र विचारांचं रणकंदन चालू होतं.
हे तीनही अधिकारी एकाच वाहनात बसले अन अचानक झालेल्या गोळीबारात ठार झाले- असच चित्रं मुंबई पोलिसांकडून माध्यमांपुढे रंगवलं जात होतं. मला ते मान्य नव्हतं. करकरे- त्यांची अत्यंत काटेकोर कार्यपध्धती आणि दूरदृष्टी यासाठी प्रसिद्ध होते. साळसकर एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. तर, तातडीने प्लॅनिंग करणे हा अशोकचा लौकीक होता आणि शस्त्राचा वापर करण्यात तो कमालीचा तरबेज होता असं असताना हे तिन्ही अधिकारी कुठलिही योजना न आखता किंवा थोडाही संघर्ष न करता मृत्त्यू स्विकारायला तयार होतील यावर विश्वास ठेवायला मी तयार नव्हते. मुंबई पोलिसांकडून मात्रं तसच भासवलं जात होतं"..
..
त्यावेळी मी मनाचा निर्धार केला "मी वाट्टेल ते कष्ट घेईन, पण या प्रकरणातलं सत्त्य शोधून काढीनच". देशासाठी वीरमरण पत्करणार्‍यांच्या बलिदानाचं पावित्र्य कायम राखण्यासाठी हे सत्त्य शोधून काढणं हे आपलं एकमेव कर्तव्य आहे असं माझं मन मला सांगत होतं."

या नंतर या "सत्त्यशोधन" मार्गावरील विनीता कामटे यांचा प्रवास "सत्य कोणी सांगेल का" या पुस्तकातील पुढील प्रकरणातून समोर येतो.

पहिल्या प्रकरणातून आपण सतत बिलगणारा हळवेपणा, दु:ख्ख, वैफल्य हे अनुभवतो तर या सत्यशोधन प्रकरणातून आपल्या सडलेल्या सिस्टीम चा अत्यंत संतापजनक अन उद्गेवजनक चेहेरा समोर येतो. तपास करणार्‍या संस्थांकडून एकंदर याबद्दल दिली जाणारी विरोधी, संशय वाढवणारी माहिती, अशोक कामटे यांचे वरिष्ठ अधिकारी (नावे ईथे नमूद करत नाही) मंडळींनी माहिती देण्याबाबत केलेली टाळाटाळ, कसाबला नक्की कुणी गोळी मारली याबाबत तीन वेळा बदललेला तपशील, सुरूवातील अशोक कामटे यांना "ट्रायडंट ला जा" अशा सूचना असताना ते कामा हॉस्पिटल कडे का गेले? या प्रश्णावर सर्वांनी बाळगलेलं मौन, विनीतांच्या प्रयत्नात पोलिसांकडूनच वारंवार आणले गेलेले अडथळे, अन या सर्वात कळस म्हणजे अशोक च्या पोस्ट्मार्टेम रिपोर्टची प्रत देण्यास देखिल दिला गेलेला नकार!

एखादी स्त्री या प्रचंड दु:ख्खातून ऊभे रहाणे सोडाच साधा तर्कसुसंगत विचार करण्याची क्षमता देखिल काही काळ गमावू शकते अशा वेळी विनीता कामटे यांनी महिन्याभरातच म्हणजे थेट २४ डिसेंबर ला "घटनास्थळी" जावून, तेथिल रचना, रस्ते, ईमारती ई, चे आराखडे बघून, स्थानिक लोकांशी बोलून "कामा हॉस्पिटल परिरसात घडलेल्या घटनेचा नकाशा" (कोण कुठे लपले होते, करकरेंचे पथक कुठून आले वगैरे या बारकाव्यांसकट) बनवून पुस्तकात दिला आहे- त्यांच्या या सहनशीलतेला, धैर्याला अन कधीही हार न मानण्याच्या वृत्तीला काय म्हणावे हेच कळत नाही.

पुढे "सत्त्याची ऊकल" या प्रकरणातून विनीता कामटे यांनी अक्षरशः मिनीट बाय मिनीट त्या रात्रीचा थरार समोर ऊभा केला आहे. आणि तसे करायला या "अशोक चक्र" प्राप्तं पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीला चक्क सामान्य माणसाप्रमाणे "माहिती अधिकार कायद्याचा" आधार घ्यावा लागतो यावर विश्वास बसत नाही. विनीता लिहीतात-

"मीही एका पोलीस परीवारातील सदस्य होते. त्या शेवटच्या काही तासात नेमकं काय घडलं होतं ते कळल्याशिवाय माझ्या मनातील उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. पोलीस अधिकार्‍यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता नेमकं काय घडलं ते मला सांगावं असं मला वाटत होतं.. ते मला अधिकृतपणे सांगितलं जाईलच असं मी गृहीत धरलं होतं. काय घडलं ते मलाच शोधून काढावं लागेल आणि त्यासाठी मला माहितीच्या अधिकाराची मदत घ्यावी लागेल असं मला त्या क्षणी वाटलही नव्हतं. शासनाला आपल्या 'हिरों' विषयी विशेष आदर असतो असच मला तोपर्यंत वाटत होतं. पण नियतीची ईच्छ मी मान्य केली आहे आणि माझ्यावर नियतीनं सोपवलेली जबाबदारी मी स्विकारली आहे असं काही दिवसांनी मी माझ्या नातेवाईक, मित्रपरीवाराला सांगून टाकलं."

या कायद्याच्या आधारावर विनीता कामटे यांनी त्या रात्री कामटे (व करकरे) व कंट्रोल रूम यामधिल झालेल्या संवादाच्या, संभाषणाच्या ध्वनिफिती, कॉल रेकॉर्ड्स च्या मूळ प्रती, प्रधान कमिटीच्या अहवालात वापरलेले पुरावे ई. माहिती ऊपलब्ध करून दिली जावी असा अर्ज त्यांच्या वकीलामर्फत केल्यावर तो अर्ज कसा वेगवेगळ्या सरकारी कचेरीतून नुसता फिरत राहिला अन शेवटी जवळ जवळ तब्बल सहा ते आठ महिन्यांनी त्यातील थोडीशीच माहिती त्यांना ऊपल्ब्ध केली जाते याचे तपशीलवार वर्णन दिले आहे. पण पोलिसांसाठी असलेले काही विशेष अधिकार वापरून व हितचिंतक अन कारवाईत सामिल असलेले पोलिस यांच्याशी संभाषण करून सर्व माहिती, एरिकसन मोबाईल चे रेकॉर्ड्स, संभाषणे एकत्र करून विनीता कामटे यांनी त्या रात्री ११ वाजल्यापसून ते १ वाजेपर्यंतचा सर्व घटनाक्रम दिला आहे, रात्री ११.१३ ते मध्यरात्र १२.५६ पर्यंत.

त्यातून खालील अनेक प्रश्णांची ऊत्तरे थेट समोर येतात किंवा अधिक प्रश्ण पडतातः
१. मुळात पूर्व विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त असलेले अशोक कामटे दक्षिण मुंबई विभागात कसे जातात? ते ट्रायडेंट हॉटेल कडे जात असताना अचानक कामा हॉस्पिटल कडे का व कुणाच्या सांगण्यावरून जातात?
२. सर्व घटना घडत असताना नेमके हे तीनही अधिकारी काय करत होते?
३. तीनही ज्येष्ठ अधिकार्‍यांनी एकत्र त्या गल्लीत जायचे आणि एकाच गाडीतून जायचे धाडस का केले?
४. नेमकं काय घडलं, कसं घडलं?
५. या तीनही अधिकार्‍यांवर काय प्रसंग ओढवला होता याची कप्लना कंट्रोल रूम ला होती का?

या सर्व प्रश्णांची उत्तरे स्पष्ट आहेत. आश्चर्य म्हणजे वेळोवेळी बाजूच्या जागरूक नागरीकांनी ज्यांनी प्रत्त्यक्ष त्या अतीरेक्यांना गल्लीत फिरताना पाहिले, नव्हे तर प्रत्त्यक्ष या तीघांच्या गाडीवर झालेला गोळीबार पाहिला, त्यांनी कंट्रोल रूम ला तसे सांगीतले. (जवळ जवळ १०० कॉल्स आहेत) असे असताना देखिल अतीरेकी गल्लीत खुशाल फिरत आहेत हे कंट्रोल रूम ने या तीनही अधिकार्‍यांना सांगितले नव्हते- असा निश्कर्ष वरील सर्व तपशीलातून निघतो असे विनीता म्हणतात- जे प्रचंड धक्कादायक आहे. किंबहुना हे तीनही अधिकारी गल्लीत गेले तेव्हा अतीरेकी गल्लीत आहेत याची पूर्वसूचना त्यांना दिली गेली नव्हती? असे अनुमान निघते.

तर खालील प्रश्णांची ऊत्तरे अजूनही सापडत नाहीत असे पुस्तकात नमूद केले आहे:

१. करकरे यांनी परिस्थितीचा घेतलेला अचूक आढावा अन त्या अनुशंगाने केलेला प्लॅन हे संभाषणावरून अगदी स्पष्ट होते. मग ज्यादा कुमक पाठविण्याची अन "आर्मी ला त्वरीत पाचारण करा" या त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष का केले गेले?
२. कामा हॉस्पिटल हे दक्षिण विभागाच्या मुख्ख्य कंट्रोल रूम पासून जेमेतेम ५ मिनीटांच्या अंतरावर असताना पोलिसांची जादा कुमक तिथे का पोचू शकली नाही? या दोन्ही गोष्टी या हेतुतः दाखवेलला निष्काळजीपणा आहे का निव्वळ अकार्यक्षमता?

अन सर्वात मह्त्वाचा प्रश्ण म्हणजे या तीनही अधिकार्‍यांचे प्राण वाचू शकले असते का? यावर विनीता लिहीतात-
" संवेदनशील नागरीकांनी घटना घडण्यापूर्वी आणि त्याही नंतर तीनही अधिकार्‍यांवर झालेल्या गोळीबाराची माहिती पोलिसांना वारंवार फोन करून दिली. गोळीबारानंतर हे तीनही अधिकारी सुमारे ४० मिनीटे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. साळसकर तर हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत जिवंत होते.
करकरे, कामटे, आणि साळसकर हे तिन्ही अधिकारी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले असताना बाजूने पोलिसांची गाडी भरधाव गेली (प्रत्यक्ष घटना पाहिलेल्यांच्या जबानीनुसार, कंट्रोल रूम च्या संभाषण टेप नुसार). त्यावेळी अशोक युनिफॉर्म मध्ये होता. किमान पोलिस अधिकारी रस्त्यावर पडले आहेत एव्हडे तरी या गाडीतल्यांना कसं कळलं नाही?"

या प्रकरणाच्या शेवटी विनीता कामटे लिहीतात-
"करकरे यांनी मदत पाठविण्याबाबत अगदी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तशी मदत पाठवली असती तर या तीघांचेच काय पण सबईंस्पेक्टर धुरगुडेंचेही प्राण वाचू शकले असते. २०० पोलिसांना कामा हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. हे पोलिस कुठे होते? वरील सर्व प्रश्ण अद्याप अनुत्तरीत आहेत. या घोडचुकांबद्दल प्रधान समिती का मौन बाळगून आहे? पुन्हा एखादा हल्ला झाला तर याच दर्जाच्या कार्यक्षमतेने आपण त्याला तोंड देणार आहोत का?
कामा हॉस्पिटलच्या समोरच्या भागात काय स्थिती आहे याचे योग्य "ब्रिफींग" करकरेंच्या पथकाला केले गेले असते तरीसुध्धा त्या रात्रीचे चित्र बदलले असते. त्या दुर्दैवी कहाणीला वेगळच वळण मिळालं असतं. आपल्यावर हल्ला झालेला असतानाही करकरेंच्या पथकानं कसाबला जखमी केलं होतं.
तीन अधिकारी आणि त्यांचे सहकारी अतीरेक्यांच्या गोळ्यांना निष्कारण बळी पडले. खरं तर त्यांनीच अतीरेक्यांना यमसदनाला पाठवले असते. बाजू बरोबर उलटी झाली असती.
हीच गोष्ट अजूनपर्यंत माझ्या काळजात सलत आहे."

२६/११ च्या मुख्ख्य घटनेनंतर पुस्तकातील पुढील प्रकरणांतून विनीता कामटे यांनी अशोक कामटे यांच्या वेगवेगळ्या पोस्टींग्स मधील कारकीर्दीचे अनुभव अन आढावा घेतला आहे. त्यात मुंबईतील दंगल (२०००), सोलापूर मध्ये अशोक कामटे यांनी एका महिन्यात प्रस्थापित केलेले कायदा सुव्यवस्थेचे राज्य (२००६-२००८), खैरलांजी प्रकरणातून ऊठलेली दंगल कौशल्याने हातळण्याची केलेली कामगिरी, भंडारातील लग्नानंतरचे पहिले पोस्टींग (१९९२) तेथे नक्षलवाद्यांविरुध्ध कारवाईत अशोक कामटे यांनी केलेल धाडसी नेतृत्व, युनो च्या शांतीपथकात भारतातर्फे प्रतिनिधीत्व करताना बोस्नीयामध्ये केलेली यशस्वी कामगिरी (१९९९-२०००), २००१ मध्ये मेधा पाटकरांनी कामटे यांची विनंती/सल्ला न जुमानता केलेले आंदोलन, तेव्हा पोलिसांच्या कामात वेळोवेळी होणारा राजकीय हस्तक्षेप, २००८ मध्ये राज ठाकरे यांना अटक करताना कामटे यांनी हाताळलेली परिस्थिती, ई. सर्वाबद्दल तपशीलात माहिती दिली आहे. या सर्वच पोस्टींग्स बद्दल प्रत्त्येकी एक प्रकरण आहे. शिवाय त्यात अशोक ने जोडलेले मित्र, पोलीस परीवारातील ईतर कुटूंबीयांशी जडलेले संबंध, काही स्थानिक गुंडगिरी, कारवाया याबाबत तपशील, ई. सर्व घटनाक्रमातून अशोक कामटे यांची वेगवान अन यशस्वी पोलीस कारकीर्द समोर येते.

या सर्वातून अशोक कामटे यांच्यातील निधडा, शूर, अतीशय कर्तव्यतत्पर, सर्व शस्त्रात निपुण, कठीण प्रसंगी ठोस निर्णय घेणारा, धडक कृती करणारा, पोलिस दल, सेवा, आपले सहकारी, वरीष्ठ या सर्वांबद्दल अत्यंतीक प्रेम , आदर असणारा, तर व्यायाम, शरीर सौष्ठव, क्रीडा यात सर्वात अव्वल स्थानावर असणारा, टेनीस, क्रिकेट, गोळाफेक, अ‍ॅथलेटीक्स या सर्व खेळात नैपुण्य, पदके मिळवलेला, कायम कुठल्याही प्रसंगात स्वतः पुढे राहून नेतृत्व करणारा एक हुषार, दक्ष, अन लोकप्रिय पोलिस अधिकारी आपल्या समोर येतो.

कमावलेली शरीरयष्टी (अशोक कामटे यांचा व्यायाम कधीही चुकला नाही. रोज सं ६ वाजता ते सुसज्ज अशा जिम मध्येच असत.. त्यांचे सहकारी सांगतात अशोक १४० किलोची वजने घेवून सहज व्यायाम करत.. मुंबईत १० कीलोचे लोखंडी जॅकेट घालून मैदानाला अर्धा तास राऊंड मारत असत.. व्यायाम, शरीरसौष्ठव, खेळ याबद्दल त्यांना भयंकर आकर्षण आणि ज्ञान होतं..) उंचपुरे, अत्यंत देखणे व्यक्तीमत्व असे कामटे यांना सोलापुर मध्ये लोकं "डॉन" म्हणून संबोधत असत. अक्षरशः पूर्वीच्या मारधाड चित्रपटातून दाखवायचे तसे निव्वळ कामटेंच्या छायाचित्राचे कॅलेंडर दुकान, हॉटेल ई. मध्ये टांगते ठेवलेले पाहून गुंड, दादा, ई. लोकं काही त्रास द्यायला कचरत असत. कॉलेज युवक युवतींनी स्वताच्या मोबाईल्स वर सेव केलेले कामटे यांचे छायाचित्र असो वा, स्कूटर, रिक्षा च्या मागे लावलेले त्यांचे चित्र असो वा ईतर सार्वजनिक ठिकाणी राजकीय नेत्यांपेक्षा अशोक कामटे यांना दिला जाणारा मान असो, अशोक कामटे हा एकमेव पोलिस अधिकारी सर्व लोकांचा हीरो होता.

५०० च्या जमावाला, बेफाम झालेल्या माथेफीरूंना, दंगल करू पाहणार्‍या समाजकंटकांना निव्वळ एक लाठी, पिस्तुल, अन हेल्मेट घेवून सामोरा गेलेला, अन त्या दंगलीला फक्त १२ काँस्टेबल घेवून काबूत ठेवणार्‍या अशोक कामटे यांच्या पोलीस कारकीर्दीतील घटना त्यांच्या या वरील पोस्टींग्स मधील तपशीलातून पुढे यतात.

या खेरीज अशोक कामटे यांच्याशी विनीता यांची झालेली पहिली भेट, जुळलेले संबंध, अशोक च्या घराण्यात पणजोबांपासून चार पिढ्या लष्कर आणि पोलिस दलात सेवा केलेले अन तेच रक्त अन जीगर मनात अन मनगटात बाळगून असलेले त्यांचे "पोलीस कुटूंब" या सर्वावर पुढे पुस्तकात अनेक सुंदर, छोटे अनुभव आहेत- ज्यात प्रसंगी आपला ऊर अभिमानाने फुलतो तर कधी डोळ्यात टचकण पाणी आल्याशिवाय रहात नाही.

पत्नी विनीता, आपली दोन्ही मुले, आई, वडील, अन त्याच बरोबर लाडक्या कुत्र्यांबरोबर असलेले अशोक कामटे यांचे जीवा भावाचे संबंध, नाते, त्यांच्या मित्रपरिवार, पोलिस दलातील शिपाई ते अधिकारी या सर्वांनी त्यांच्याबद्दल सांगीतलेले अनुभव या सर्वातून अशोक कामटे अन त्याचबरोबर विनीता कामटे यांच्याही जीवनातील अनेक पैलू आपल्या समोर येतात.

सुरुवातीच्या प्रकरणांतून या पुस्तकाला असलेली हळवेपाणाची, व्याकूळतेची, अन मन हेलावून टाकणारी हृदयद्रावक प्रसंगांची गडद किनार पुढील या व्यावसायिक, खाजगी अन कौंटूंबीक प्रकरणातून थोडीशी फिकी होते अन अशोक कामटे यांच्या नसण्याची पोकळी काही खुसखुशीत, विनोदी, थरारक, तर कधी एखाद्या चित्रपटातील नायकाला शोभेल अशा कौतूकाच्या प्रसंगांनी थोडीफार भरून निघते.

अशोक कामटे यांसारखे अत्यंत कुशल पोलिस अधिकारी किंव्वा जागरूक नागरीक तयार होण्याच्या प्रक्रीयेत कोणत्या घटनांचा, विचारांचा, अन व्यक्तींचा मोठा वाटा असतो याचे एक संपूर्ण दर्शनच जणू या पुस्तकाच्या रूपाने होते. त्या सर्वाचा विचार करता, ईतक्या मेहेनतीने, कष्टाने, दिवस रात्र एक करून, अन प्रसंगी रक्ताचे पाणी करून वाढवलेल्या, घडलेल्या कामटेंसारख्या कर्तबगार, थोर समाजसेवी अन राष्ट्राभिमानी वीरांचा शेवट वा त्यांचे बलीदान काही अकार्यक्षम वा अनेक तृटींनी युक्त अशा ईतर गोष्टींमूळे व्हावे याची बोच मात्र एक वाचक म्हणून कायम मनात रहाते.

पुस्ताकाच्या पाठच्या कव्हर वर लिहील्याप्रमाणे "२६/११ च्या रात्री अतीरेक्यांशी लढताना वीरमरण पत्करणारे मुंबईच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांची ही जीवनकहाणी. भारतीय पोलिस दलातल्या एका अत्यंत साहसी आणि कार्यक्षम अधिकार्‍याची ही प्रेरणादायी जीवनकहाणी त्यांची पत्नी विनीता यांनीच सांगितली आहे. आपल्या पतीच्या मृत्त्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी विनीता कामटे यांनी केलेले प्रयत्न काळजाला भिडणारे आहेत. २६/११ च्या संदर्भात निर्माण होणार्‍या अनेक प्रश्णांची ऊत्तरं या पुस्तकात सापडतील पण त्याच बरोबर अनेक नवे प्रश्णही या पुस्तकातून उपस्थित होतील. केवळ कार्यक्षम अधिकारीच नव्हे तर एक उमदा माणूस असलेल्या अशोक कामटे यांची ही जीवनकहाणी नक्कीच हृदयाला भिडणारी आहे."

"दंगली आणि चकमकी" या प्रकरणाच्या शेवटी विनीता कामटे लिहीतात-
"वास्तविक पाहता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी तुम्ही आयएएसला का जात नाही?" असं परीक्षकांनी त्याला विचारलं होतं त्यावर "जिथे काही अ‍ॅक्शन असेल तिथेच मला काम करायला आवडेल म्हणूनच मला आय्.पी.एस. हवे आहे" असं उत्तर त्याने दिलं होतं. या 'अ‍ॅक्शन' साठीच तो जगला आणि या 'अ‍ॅक्शन' साठीच त्यानं मरण पत्करलं.

पुस्तकाच्या शेवटी अशोक कामटे यांचा जीवनपट अन त्या अनुशंगाने कामटे यांचे अगदी बालवयातील फोटो, कुटूंबाबरोबरचे फोटो, कारवाई करतानाचे फोटो, या सर्वामूळे या पुस्तकाला एक पूर्णत्व आले आहे.

२३ फेब्रुवारी १९६५- २६ नोव्हेंबर २००८ अशी आयुष्याची ४३ वर्षे अन ऊमेदीची अन सौख्याची तब्बल १८ वर्षे पोलिस दल अन देशसेवेसाठी अर्पण केलेल्या शहीद अशोक मारूतीराव कामटे यांना मानाचा मुजरा!

तयांचे व्यर्थ न हो बलीदान......

-----------------------------------------------------------------------------------
टु द लास्ट बुलेट हे पुस्तक लिहायला विनीता कामटे यांना "पुणे ईंटेलिजंस" च्या संपादिका व ज्येष्ठ पत्रकार विनीता देशमुख यांनी मदत केली आहे. तसेच भगवान दातार यांनी अनुवाद करायला सहाय्य केले आहे. या पुस्तकाला शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांची अतीशय प्रामाणि़क, संवेदनशील अन नेमकी प्रस्तावना लाभली आहे. तर स्वतः विनीता करकरे यांनी लिहीलेल्या "हृदगत" या प्रस्तावनेत आपली किमान अपेक्षा वाचकांसमोर मांडली आहे- " वस्तुस्थितीचा विपर्यास होवू नये आणि सत्त्य दडपले जावू नये एव्हडीच माझी अपेक्षा आहे. हे पुस्तक म्हणजे देशासाठी वीरमरण पत्करणार्‍या हुतात्म्यांना माझी श्रध्धांजली आहे."

संपूर्ण पुस्तक वाचताना एकंदर पोलीस दल, कारवाई पध्धती, पोलीस कुटूंबे यांबद्दलही बरीचशी माहिती समोर येते. अशोक कामटे यांचा संपूर्ण जीवनपट १९ प्रकरणातून या पुस्तकात साकारला गेला आहे. पुस्तक वाचताना चीड, संताप, दु:ख्ख, अभिमान अशा एखाद्या भावनिक रोलरकोस्टरवर बसल्यागत सर्वांग अनुभव येतो. पुस्तकाच्या नावातूनच सुरू झालेला एक वेग शेवटपर्यंत कायम रहातो. मनात अनेक प्रश्ण येत राहतात. काही ऊत्तरे पुस्तकात सापडतात काही अनुत्तरीत तर काही ऊत्तरे आपण स्वताच शोधायची असतात.

प्रत्त्येक जागरूक अन देशाभिमानी नागरीकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. कमकुवत मनाच्या अन आपली जबाबदारी कायम दुसर्‍यावर टाकू पाहणार्‍यांसाठी हे पुस्तक नाही.

धन्स. योग. एक चांगली माहिती शेअर केल्याबद्दल. सेव्ह करून घेतली आहे. ऑफिसात असल्याने वाचता येत नाही. ह्या पुस्तकाविषयी थोड्याश्या प्रमाणात काही कॉन्ट्रोव्हर्सी पण ऐकण्यात आली. खरतर २६/११ हा हल्ला बळी गेलेल्यांच्या बाबतीत कमी अन कॉन्ट्रॉव्हर्सीच्या बाबतीतच जास्त चर्चेत राहीला. खरोखर मुंबईचं स्पिरीट वाखाण्याजोगं असलं तरी.. मुंबईने खरोखर तीन रत्ने गमवली त्या हल्ल्यात याची खंत त्यांनी बाळगायलाच हवी. अशोक कामटे यांची सोलापूरला लावलेली शिस्त अजूनही विसरता येणार नाही. Happy

पुस्तकाबद्दल ऐकून आहे पण अद्याप वाचलेले नाही.
सध्या वादग्रस्त हे विशेषण या पुस्तकाला जोडण्यात येत आहे तेव्हा प्रत्यक्ष वाचण्यापूर्वी असं कुणाचं समीक्षण वाचायला मिळण गरजेच होतं.
हा लेख वाचून प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लेखकाने केवळ पुस्तक आणि लेखिकेच्या लिखाणाबद्दल , तिच्या दृष्टिकोणाबद्दल लिहीले आहे. हे सर्व करताना या घटनांबद्दलचे आपले वैयक्तिक मतप्रदर्शन टाळले आहे हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळ एक उत्कृष्ट लेख वाचल्याचं समाधान मिळतं..

आता हे पुस्तक देखील लवकरात लवकर वाचणार..
धन्यवाद

हे पुस्तक मी crossword मधे उभ्याउभ्या वाचले होते (वाचुन होते बरेच लहान आहे),विकत घेण्याइतके चांगले नाही.
पुस्तक खुप एकतर्फी आहे,त्याच काळात पेपरमधे control roomचे सगळे logs प्रसिध्द झाले होते, तेव्हा पुस्तकात फक्त स्वतःच्या सोयीने गोष्टी छापल्यात हे लक्षात येते.
शहीद झालेल्य व्यक्ती आणि कुटुंबियांविरोधात बोलले जात नाही (आणि २६/११ च्या बाबतीत तर लोक इतके हळवे झाले होते की शासन काही बोलणे शक्यच नव्हते), हा protocol असतो त्यामुळे शासनाकडुन ह्याचा फारसा प्रतिवाद केला नव्हता.
बाकी system,भ्रष्टाचार हे शब्द वापरणे आजकाल fashion आहे.

प्रतीसादाबद्दल धन्यवाद!
कृपया, ईथे "राजकारण" आणि त्या अनुशंगाने चर्चा नको.. "चूक वा बरोबर" या दृष्टीकोनातून ही समीक्षा लिहीलेली नाही.. पुस्तक तसे लिहीले आहे असे वाटत नाही. ऊभ्या ऊभ्या वाचून काढायचे हे काही नवनित गाईड नाही असे माझे मत आहे. प्रत्येक गोष्ट, घटना, अन त्यानुसार केलेले पुस्तकातील लिखाण याचे संदर्भ लक्षात घेवून आणि मग दोन्ही बाजू विचारात घेवून भाष्य केले तर अधिक ऊचित ठरते.
असो. तरी विषय संवेदनशील असल्याने प्रतीक्रीया देताना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत खेरीज मा.बो. प्रशासन अडचणीत येणार नाही ईतपत दक्षता घ्यावी अशी सर्वांना विनंती.
(तसे आढळल्यास मला स्वतालाच हा लेख ईथून ऊडवावा लागेल.)
आभारी.
योग

मी पण वाचलयं पुस्तक , सुरुवातीला तर वाचवतं नव्हतं त्या रात्रीचं वर्णन वाचून,

पोलिस / लष्करातल्या लोकांच्या घरातल्यांचं जीवन किती तणावपूर्ण आहे त्याची जाणीव झाली Sad

पुन्हा अशा घटना घडु नयेत आणि असे अधिकारी देशाने गमावु नयेत !
कारण असे अधिकारी तयार होणं सोप नसतं !
अशोक कामटे !! अमर रहे !!

>>हे पुस्तक मी crossword मधे उभ्याउभ्या वाचले होते (वाचुन होते बरेच लहान आहे),

मूळ ईंग्रजी पुस्तकाचे माहित नाही, मराठी पुस्तकाला तब्बल २२८ पाने आहेत. मिनीटाला एक पान अशा सुपरफास्ट यांत्रिकी वेगाने (दृष्टीकोनाने?) वाचले तरी २२८ मिनीटे म्हणजे जवळपास ४ तास.
४ तास ऊभ्या ऊभ्या....??? (हे क्रॉसवर्ड नक्कीच पुण्यातील नसणार)
एक टेक्निकल शंका बाकी काही नाही.

मी १ वर्षपुर्वी मुळ इंग्रजी वाचले आहे.किंबहुना पेपरधले छापुन आलेले पुर्ण control room logs ताजे ताजे लक्षात असताना ते वाचल्याने मला पुस्तकातला एकतेर्फीपणा प्रचंड खटकला होता.
पुस्तकाचा font खुप मोठा आणि पानांचा आकार छोटा वाटला मला. त्यामुळे ज्यांना सिडने शेल्डन आणि harry potter एका दमात वाचायची सवय असते त्यांचे जास्तीत जास्त
२ तासात वाचुन होइल. मी हे पुस्तक वाचत होते तेव्हा SB road crossword मधे फुकट वाचणे allowed आहे माहीत नव्हते,त्यामुळे २ कपाटाम्च्यामधे लपुनचपुन लाजत ,वरती ठेवलेली पुस्तके काढण्यासाठी जे स्तुल असते त्यावर अवघडुन वाचले, पण दुसरी पुस्तके घेउन बाहेर निघताना माझ्या कीतीतरी वेळ आधी आलेले लोक शांतपणे सोफ्यावर वाचत बसलेले बघुन माझी भीड चेपली,त्यामुळे तिथेच मी ज्या ज्या वेळी गेले तेव्हा three mistakes of my life,wise-otherwise,हेमामालिनीचे चरीत्र अशी अनेक पुस्तके मी फुकट वाचलेली आहेत्.कोणीही काहीच म्हणत नाही.फक्त निघताना एखादे पुस्तक मात्र मी नक्की विकत घेते.
असो . १ वर्ष झाल्यामुळे मला पुस्तक तुमच्याइतके तपशीलात आठवत नाही. पण पुस्तक न आवदण्याची इतरही अराजकीय कारणे आहेत(जी मायबोलील अडचणीत आणतील असे नाही वाटत).ती थोडक्यात सांगते
१.पुस्तकात शहीद कामटेंना larger that the life रंगविण्याच्या नादात काही वर्णने अत्यंत कंटाळवाणी वाटली मला.
२.त्यांना फक्त चांगला पोलिस अधिकारीच्या पुढे जाउन चांगला माणुस project करायचा प्रयत्नात फक्त कौतुक आणि कौतुकच(त्यांच्या fitness freak असण्याचे तर इतके repeatation आहे की आवराच असे होते) येते.dark/grey shades कुठे येतच नाहीत.
३.सगळे पुस्तक लेखिकेच्या निवेदनातुन येत नाही तर काही ठिकाणी इतरांकडुन लेखन करवुन घेतले आहे.त्यात आपल्या दिवंगत साहेबांविषयी चांगलेच लिहायचे हा दट्ट्या मानेवर असल्याने काही चिरकुट प्रसंगांचेही त्या लोकांनी glorification केले आहे असे वाटते.
४.मला सध्या तरी 'अति झाले आणि हसु आले' ह्याचे आठवणनारे ठळक उदाहरण म्हणजे एका ठिकाणी त्या आपल्या सासरची,माहेरची influencial connections लिहितात, त्यात पुढे जाउन आपल्या सासुबाईंच्या माहेरची influencial connections लिहितात.तेव्हा वाचताना मला माझ्या मावशीच्या भीशी मंडळातल्या typical बायकाच ,ज्यांना आपल्या सासर माहेरची influential connections सांगायला आवडतात ,त्या आठवल्या .
अर्थात वाचक fan असेल तर ह्याच गोष्टी भारवुन जाउन वाचायला वाचकाला आवडतीलही.आम्हीही जेव्हा क्रिकेट आवदीने बघायचो तेव्हा सचिन तेन्डुलकरला लहानणी चिक्कुम्ची allergy होती,तो त्याच्या काकुकडे रहायचा,अशा गोष्टी कुठे छापुन आल्या की चवीने वाचायचो,शालेतही एक्मेकींना सांगायचो.
काही लोक म्हणतील एका शहीदपत्नीने जी सिध्दहस्त लेखिका नाही, आपल्या पतीच्या आठवणी लिहिल्या की असे कौतुकच येणार.पण मग आपण फार मोठे दडवलेले सत्य बाहेर आणत आहोत असा आव कशाला आणायचा?
त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे चिदंबरम यांनी पुस्तक बाजारात येण्याआधीच जे निवेदन लोकसभेत केले होते त्यात आपोआप आली होती.तरीही systeme ने माझ्या प्रश्नाम्ची उत्तरे दिलीच नाहीत असे आरोप मला खुप illogical वाटले होते.
असो रंगेबेरम्गी पान तुमचे असल्याने तुम्हाल अडचणीच्या वाटणार्‍या प्रतिक्रिया तुम्ही उडवुच शकता.

arc,
धन्यवाद! प्रतिक्रीया अडचणीची वाटली म्हणून मी निश्चीतच ऊडवणार नाही. तेव्हा त्याची काळजी नको.

कृ. लक्षात घ्या मी अशोक कामटे वा त्यांची पत्नी, वा भारत सरकार, कुणाचीच बाजू घ्यायचा प्रयत्न करत नाहीये.. आपल्याकडे म्हण आहे "सत्तेला शहाणपण शिकवायला जावू नये".. तेव्हा चिदंबरम यांनी दिलेले स्पष्टीकरण योग्य का विनीता कामटे यांनी पुस्तकात मांडलेले स्पष्टीकरण योग्य हा वाद न संपणारा आहे.

बाकी पुस्तक एकांगी वाटले का किंवा फिटनेस फ्रिक वगैरे गोष्टी या सर्व "सापेक्ष" आहेत. तुम्हाला जे "लार्जर दॅन लाईफ" रंगवलेले वाटते ते मला तरी "अ पार्ट ऑफ हीज लाईफ" वाटले.

तात्पर्यः सरसकट "एकांगी" शेरा मारून या पुस्तकात ऊपस्थित केलेले प्रश्ण, आपल्या पतीच्या मृत्त्यूच्या कारणामागील सत्त्याचा शोध घेण्याचा एका पत्नीने केलेला प्रयत्न, त्यातून समोर येणार्‍या काही महत्वाचा गोष्टी, ई. सर्व याकडे निव्वळ दुर्लक्ष करता येणार नाही.

>>त्यामुळे ज्यांना सिडने शेल्डन आणि harry potter एका दमात वाचायची सवय असते त्यांचे जास्तीत जास्त २ तासात वाचुन होइल.

वरील पुस्तक वाचताना मात्र वाचकाने "जरा दमानेच" घ्यायला हवं Happy

योग, छान पुस्तक परीचय. आता मिळवून वाचणार नक्की.

arc, तेव्हा पुस्तकात फक्त स्वतःच्या सोयीने गोष्टी छापल्यात हे लक्षात येते>>> ह्या वाक्याला तीव्र आक्षेप. पुस्तक एकतर्फी आहे इतपत म्हणणे ठीक आहे. तुम्ही म्हणताय तसे काही प्रोटोकॉलस् असतीलच तर माझ्या मते २६/११ चा पूर्ण निकाल लागेपर्यंत ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाला परवानगीच मिळाली नसती.

सत्य काय असत याबद्दल कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. सद्दाम ला मारण्यासाठी दिलेली कारण खोटी होती हे आता कुणीही सांगू शकत असल तरी त्या वेळी अमेरिकन मेडियाच्या झंझावातामुळ सद्दाम कसा दोषी आहे हे सगळे छाती ठोकून सांगत होते. कित्येक गोष्टीतल सत्य तर त्या व्यक्तिंबरोबरच काळाच्या उदरात गडप होत.

माध्यमात छापून आलेल सत्य असा एकेकाळी असणारा माझा समज सीबीआयचे एक अतिरिक्त संचालक निर्मलचंद्र सुरू यांचे "द प्लेन ट्र्थ" वाचताना गळून पडला. या महाशयांनी यशस्वीपणे हाताळलेली प्रकरणे म्हणजे किस्सा कुर्सी का, फेअरफॅक्स प्रकरण आणि अशीच काही राजकियदृष्ट्या संवेदनशील होती. धूर आहे म्हणजे कुठतरी आग असली पाहीजे तसच हे पुस्तक छापणा-यावर कारवाई होत नाही यात बरच काही आल.

पूर्वीच्या या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर २६/११ बाबतची उलटसुलट विधान शंकाकुशंकांना चालना देणारी. तीन अधिकारी एकत्र का जावेत याच समाधानकारक उत्तर आजही मिळत नाहीये. त्या विभागाचे डीसीपी कारवाईत का सामील नव्हते असाही प्रश्न मध्यंतरी वाचनात आलेला. मुद्रांक घोटाळा उजेडात आणणा-या आणखी एका निस्पृह पोलीस अधिका-याचेही पुस्तक या विषयावर प्रकाशित झालेले आहे. अंतुले वगैरेंच्या विधानांना महत्व देण्यात अर्थ नाही.

पण वस्तुस्थिती अशी नसल्यास शंकाकुशंकांना पूर्णविराम देण्यासाठी सरकारने या लेखकांवर योग्य ती कारवाई करावी. न्यायालयात शहीदपत्नीच्या बाबतीत सहानुभूतीचा विचार करता येऊ शकतो. पण एका निवृत्त पोलीस अधिका-याला सरकार विरोधी बिनबुडाचे लिखाण करण्याच्या गुन्ह्यासाठी कारवाई व्हायलाच हवी. असो.

लेखाबद्दल म्हणाल तर आदर्श असा हा लेख आहे. पुस्तकात आलेले मुद्दे यापूर्वी वाचनात येऊन गेलेले आहेत. तरीही पुस्तक वाचायला हवे असं हा लेख वाचल्यावर वाटू लागलेले आहे.

सोनवणे,
धन्यवाद! एकंदरीत मिडीया या प्रकारावर ईथे अनंतकाळ चर्चा होवू शकते.. शिवाय आजचा मिडीया हा "समाजाभिमुख" आहे (ट्विटर, फेस्बूक, ऑर्कूट, युट्यूब वगैरे) त्यामूळे एकाच विषयावर १००० स्रोतातून माहिती येत असते. यातून कोण काय घेईल हे सांगणे अवघड आहे. पण तुम्ही म्हणता तसे आयाम बदलले आहेत तेव्हा सत्त्य, असत्त्य, ई. सर्व गोष्टी व्यक्तीसापेक्ष ठरतात---- आजकालचा नविन मंत्र आहे- "शब्द (माहिती) हवे तसे वळवणे आणि वापरणे". नीरा राडीया टेप्स वगैरे प्रकरणे ही याची ऊ.दा. आहेत.
असो.

रच्याकने: वरील पुस्तकात माहितीचा अधिकार या अनुशंगाने एक स्वतंत्र प्रकरण आहे.

आजच लोकसत्ता मध्ये या संबंधीत ही बातमी आहे. भवीष्यकाळात याचा खूप ऊपयोग होणार आहे हे नक्की:
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=121...

चांगला परिचय करून दिला आहे.
वाचताना टचकन डोळ्यात पाणी आलं......भारतात आल्यावर नक्की विकत घेऊन वाचेन.
राजकारणात अजिबात गतीनाही...मुळात आवडच नाही. पण त्यादिवशी त्या तिघांचं तिथे एकत्र असणं, कसलीच ज्यादा कुमक न मिळणं, ह्या सगळ्यामागे किडलेली यंत्रणा आहे, हे फार जाणवतं.
कामटेंच्या मुलाच्म ते बुलेटप्रूफ जॅकेटवालं वाक्य वाचून तर फारच टोचलं. Sad

योग खुपच संयत लिखाण. ह्या पुस्तकाचा परिचय करुन दिल्याबद्द्ल मनापासुन धन्यवाद. नक्कि वाचेन.

पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद. शक्य तेव्हा विकत घेऊन वाचणारच.
हे पुस्तक अ‍ॅमेझॉनवर किंडल साठी ईबुक स्वरुपात उपलब्ध आहे.

थँक्स योग , कामटेंची कार्यपद्धती आम्ही अनुभवली असल्यामुळे त्यांच्याविषयी आम्हा सोलापुरकरांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे.
वरची arc ची प्रतिक्रिया अजिबात पटली नाही , कामटेंविषयी लोकांच्या काय भावना आहेत ते सोलापुरात जाऊन बघा , म्हणजे ग्लोरिफिकेशन आहे की सत्य आहे कळेल तुम्हाला.

>>कामटेंविषयी लोकांच्या काय भावना आहेत ते सोलापुरात जाऊन बघा , म्हणजे ग्लोरिफिकेशन आहे की सत्य आहे कळेल तुम्हाला

अगदी..
(आपल्याकडे गॉसिप्स आणि काँट्रोवर्सीतच जास्त रस असतो.. मूळ मुद्दा बाजूलाच रहातो.)

पुस्तक मी पण पुर्ण वाचले आहे, ARC यांची प्रतिक्रीया मुळीच आवडली नाही, असे म्हणणारे लोकं शिवाजी महाराजांन्ना सुद्धा नावं ठेवतात त्यामुळे ignore केली, पण कुठेतरी अशा लोकांना काहीतरी समाधान मिळत असेल अशा controversy करुन.

मी सध्याच हे पुस्तक वाचले. त्यांच्या कुटुंबावर झालेल्या आघाता बद्दल, त्यांचे एक माणुस हरवले त्या बद्दल खूपच वाईट वाटले.
पुस्तकामध्ये प्रशासनावर दोष ठेवला गेला आहे. काही व्यक्तींची नावे घेतली गेली आहेत. तेव्हा कुठेतरी, हे आधी माहित नवते का असे वाटले? हे दोष पहिल्यापासूनच सतर्क राहून दूर करता येण्यासारखे नव्हते का, हा प्रश्ण पुस्तक वाचताना पडत राहीला.
आर्क सांगत आहेत ते लॉग तपशील मी वाचलेले नाहीत. त्यामुळे जे पुस्तकात लिहीलेय त्यावर विश्वास ठेवला तरी हा ढिसाळपणा, भ्रष्टाचार सिस्टीम मध्ये आधी पासूनच आहे. भारतातील कित्येक लोकांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यावेळेस ही लोक स्वःत सिस्टीम मध्ये असताना खंबीर पावले का नाही उचलत, याला वाचा फोडत असे वाटले.
मला काही बाबतीत arc यांची प्रतीक्रिया पटली. त्यांच्या काही मुद्यांना अनुमोदन.

बित्तुबंगा,
धन्यवाद! मला हेच अपेक्षित आहे:
>>प्रत्त्येक जागरूक अन देशाभिमानी नागरीकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

terence tao मी सुद्धा हीच लिंक देणार होतो. राजकारण इतक्या उलट्या काळजाने खेळलं जातें की त्याचा आपण विचारही करु शकत नाही. इशरत प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा कळेलच सत्य काय आहे. पण सोबतच ३ पोलिस अधिकारी एकाच गाडीतुन जातात आणि त्यांच्यावर अतिरेकी (?) हल्ला करतात, हे खरच न पटणारं आहे. कुठेतरी पाणी मुरतय, हे नक्की.

@ विजयराव.. +१
शहाणे लोक आहेत ते निकाल येईपर्यंत मत देत नाहीयेत. पण आधीच निष्कर्ष काढून धुळवड खेळणारे, देशद्रोहाची आणि देशप्रेमाची प्रमाणपत्रं वाटणारे यांना तितका दम काढावासा वाटत नाहीये. देशातल्या दोन प्रमुख राजकिय पक्षांवर बंदी घातली तरच सत्य काय ते बाहेर येऊन शिक्षा होईल असं वाटू लागलंय.

योग : अवांतराबद्दल क्षमस्व ! पण ज्या हेतूने पुस्तक लिहीलंय त्यात दम असावा असं वाटू लागलंय, फक्त तेच लोक आलटून पालटून सत्तेवर आले तर पुस्तकाचा हेतू तडीस जाईल का ही शंका वाटते.

Pages