कविता करणे - एक मानसोपचार - काव्योपचार पद्धतीची ओळख!

Submitted by सानी on 13 September, 2010 - 11:13

प्रेरणा: दिनेशदा

केवळ आणि केवळ दिनेशदांच्याच प्रेमळ आग्रहाखातर मी ह्या विषयात पडले. अन्यथा मी कविता हा माझा प्रांत नाही असेच मानते. काही वेळा केवळ गंमत म्हणून मी काही रचना केल्या आहेत आणि काही वेळा काही मोजक्याच पण आवडणार्‍या कवितांवर प्रतिसाद लिहिले आहेत, या पलिकडे माझा कवितेशी काही म्हणता काही संबंध नाही.

त्याचे झाले असे, मी नुकतीच एक कविता रचली आणि दिनेशदांच्या विपुत तिची रिक्षा फिरवली. मग काय, मला अपेक्षा सुद्धा नव्हती असे काहीसे घडले. दिनेशदांचे कवितेविषयीचे मत समजले आणि आमची ह्या विषयावर खुप चर्चा झाली. कवींविषयी, कवितांविषयी आणि प्रतिसादकांविषयीही आम्ही भरभरुन बोललो.

माबोवर येणारे कवी- काही फुटपट्टी घेऊन रचना करणारे, काही मुक्तछंदवाले, काही यमकं जुळवणारे, काही अनाकलनीय असे लिहिणारे, काही कवितेतून कथा सादर करणारे तर काही कवितेतून आधार शोधणारे- दु:खी मनाचे कवी ह्या सगळ्यांविषयी आम्ही बोललो.

शिवाय या कवींना प्रतिसाद देणारे- काही नुसतेच प्रशंसा करणारे- छान, सुंदर, मस्त असा प्रतिसाद देणारे, काही केवळ टिका करणारे- फालतू, वाईट इत्यादी शेरे मारणारे, काही कवितेचे विवेचन, रसग्रहण, विस्तार करणारे, काही कवितेकडे निखळ मनोरंजन म्हणून बघणारे तर काही कवितेकडे कुचेष्टेच्या उद्देशाने पाहणारे, काही जण मात्र कवितेकडे, कवीकडे सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून बघणारे, कवीच्या लेखनातल्या तृटींकडे आपुलकीने पाहून त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून मनापासून झटणारे याही विषयी आम्ही बोललो....

मी मानसशास्त्राची विद्यार्थीनी असल्याने अभ्यासात शिकलेले काही थोडे-फार मुद्दे नकळतपणे माझ्या बोलण्यात उतरले, त्यावरुन दिनेशदांनी मला या विषयावरच लेख लिहायला सांगितला!!! झालं....मी चर्चा वगैरे करायला एका पायावर तयार आहे हो दिनेशदा!!!! पण लेख वगैरे, तो ही कवितेवर आणि कळस म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून लिहायचा, म्हणजे फारच झालं... एकतर माबोवर इतकी ज्ञानी मंडळी आहेत. मी त्यांच्या कवितेवरील समिक्षा, विचार सर्व वाचलंय, तेंव्हा मी लिहिणार तरी काय आणि कसं याचं माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं...आणि मी हा विषय लिहायचं कायम टाळत आले, ते आजपर्यंत. पण आज...आज नाही टाळू शकले. आज पुन्हा दिनेशदांची आज्ञा आलीच...आणि ती का आली हेही माहितीये...

एका दु:खी मनाच्या एकाकी कवीने एक मोठं पाप केलं...काव्यचौर्याचं!!!!आणि ते उघडकीस आलं. मग पुन्हा सुरु झालं एक चर्चासत्र...त्या चर्चासत्रातच एक मुद्दा पुढे आला- या आणि अशा सर्व निराशाजनक काव्यलेखन करणार्‍यांकडे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता येईल का??? आणि मग आलेली दिनेशदांची आज्ञा...तेंव्हा आता 'तशा' दृष्टीकोनातून पाहण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. पहा, आवडतोय का... Happy

*****************************************************************************************************************

"In the desert of the heart Let the healing fountain start."
- W. H. Auden

कवितेच्या माध्यमातून मनात दाटून आलेल्या भावनांचा निचरा होतो, हे मानसशास्त्रीय गृहितक आहे. कवितेतून नुसते एवढेच साधले जात नाही, तर मनातल्या जखमा भरुन काढण्याचे सामर्थ्यही कवितेत असते. त्यामुळे मानसशास्त्रीय उपचारपद्धतीमधे पोएट्री थेरपीला(काव्योपचार-पद्धती) एक वेगळेच स्थान प्राप्त झाले.

थेरपीसाठी येणार्‍या, मनमोकळ्या गप्पा मारु न शकणार्‍या, आपल्या भावना बोलून व्यक्त करु न शकणार्‍या मनोरुग्णांना कविता करायला सांगण्यात येणे किंवा त्यांनी लिहिलेल्या कविता वाचून त्यांच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य तो सल्ला देणे, त्यांच्या निरोगी, निकोप मानसिक वाढीसाठी योग्य ती दिशा देणे यालाच म्हणतात पोएट्री थेरपी. याविषयी अधिक माहिती गोळा करायला गेले, तेंव्हा फार छान माहिती हाती आली. ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करायला नक्की आवडेल.

(डिस्क्लेमरः खाली देतेय ती माहिती म्हणजे पोएट्री थेरपी या विषयाशी संबंधित आंतरजालावर सापडलेल्या लेखांचा निव्वळ अनुवाद/ भाषांतर आहे आणि त्या लेखांचे दुवे तळाशी दिले आहेत. )

कविता लेखनाला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी झाली असावी???
वाचून आश्चर्य वाटेल, पण त्याच्या खुणा अगदी आपल्या आदीमानवाजवळही सापडतील! प्राचीन काळापासूनच अस्तित्वात असलेले होम-हवन हे त्याचेच एक उदाहरण आहे... अति-प्राचीन काळात (म्हणजे इसवीसन पूर्व हजारो वर्षे) इजिप्तमधे कवितेचे शब्द लिहून ते एका पेयात विरघळून रुग्णाला प्यायला दिले तर तो लवकर बरा होतो, अशाप्रकारच्या उपचाराचे दाखले सापडलेले आहेत.

मात्र, पहिल्या काव्योपचारपद्धतीची नोंद मात्र इ.स. पहिल्या शतकात झालेली आहे. रोमन फिजिशियन सोरानसने त्याच्या मेनियाक (सकारात्मक भावनांची अतिशय उच्च पातळी, जसे, अत्यानंद) रुग्णांना शोकांतिका (दु:खी, निराशाजनक) तर डिप्रेसिव्ह रुग्णांना सुखांतिका कविता लिहायला प्रवृत्त केले.

त्यानंतर मात्र अनेक शतके काव्य आणि वैद्यक यांचा मेळ बसवणारे असे काहीच घडले नाही. एकदम १७५१ साली अमेरिकेत बेंजामिन फ्रँकलिन यांनी स्थापन केलेल्या पेन्सिल्व्हेनिया हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी 'साहित्यिक उपचारांची' सुरुवात करण्यात आली. यात रुग्णांना वाचन आणि लेखन करायला सांगून त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले. अमेरिकन सायकियाट्रीचे जनक म्हणून संबोधले जाणारे डॉ. बेंजामिन रश यांनी संगीत-उपचार पद्धतीची जगाला ओळख करुन दिली. मनोरुग्णांना कविता लिहायला सांगून खास त्यांच्यासाठी असलेल्या "द इल्युमिनेटर" या वर्तमानपत्रात त्याला प्रसिद्धी सुद्धा देण्यात येत असे.

त्यानंतर १९६० ते १९७० या या काळात बिब्लिओथेरपी अधिक नावाजली. बिब्लिओथेरपीचा शब्दशः अर्थ म्हणजे वैद्यकीय मदतीसाठी साहित्याचा उपयोग करणे.

नंतर मात्र काव्योपचार पद्धती खर्‍या अर्थाने नावारुपाला आली. "मी नाही, पण कविताच नेणीवेचा शोध घेते" असे मनोविश्लेषक सिग्मण्ड फ्रॉईड म्हणून गेला. त्यानंतर अ‍ॅडलर, युंग, अ‍ॅरिटी, आणि राईकने सुद्धा फ्रॉईडच्या संशोधनावर शिक्कामोर्तब केले. मोरेनोने सायको-पोएट्री, सायको-ड्रामा हे शब्द प्रचलित केले. १९६० साली पोएट्री-थेरपी नावाने एक समविचारी लोकांचा गटही स्थापन झाला. ज्याचा नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात-जसे शिक्षण, पुनर्वसन, ग्रंथशास्त्र, मनोरंजन, आणि सर्जनशील कला यात अधिक चांगला व्यापक असा विस्तार होत गेला.

काव्योपचार संघटनेची स्थापना:
१९२८ सालात अली ग्राईफर या मुळात फार्मासिस्ट आणि व्यवसायाने वकील असणार्‍या कवीने कवितेत मनाच्या जखमा भरुन काढण्याची ताकद असते अशा संदेशाची प्रचारमोहिमच हाती घेतली. ह्या काव्यमोहिमेसाठी त्याने आपले आख्खे आयुष्यच वाहून घेतले. त्याच्याचसारखे नंतर अनेक लोक होऊन गेले. कवितेला दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी, अनेक संस्थांचीही निर्मिती झाली.

नॅशनल असोसिएशन फॉर पोएट्री थेरपीची १९८१ साली स्थापना झाली. ही असोसिएशन चालवत असलेल्या पोएट्री-थेरपीची मुख्य उद्दिष्ट्ये:
१. स्वतःला आणि इतरांना समजून घेण्यातली अचूकता वाढवणे.
२. सर्जनशीलता, व्यक्त होण्यातला सुस्पष्टपणा, आणि आत्म-सन्मान वाढवणे.
३. व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद आणि सुसंवाद कौशल्ये वाढवणे.
४.नवीन कल्पना, माहिती, प्रचिती यांच्यातून नवीन अर्थ शोधणे आणि
५. बदलांशी जुळवून घेण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी नवीन वातावरण निर्मिती करणे.

या संघटनेची वाटचाल अजूनही चालूच आहे. या संघटनेच्या आणि नॅशनल कोलिशन ऑफ क्रिएटिव्ह आर्टस, थेरपीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च २०१० मध्ये पोर्टलंड येथे "क्रिएटिव्ह आर्ट्स थेरपी विक" साजरा करण्यात आला.

******************************************************************************************************************

पोएट्री थेरपीविषयीची माहिती हा कवितेकडे पाहण्याचा एक निराळा पैलू म्हणून लिहिली आहे. बाकीच्या पैलूंवर आपण सगळे मिळून चर्चा करुया. हा लेख म्हणजे कवितेविषयी चर्चेचे मुक्त व्यासपीठ व्हावे ही मनापासून इच्छा!!!
चला, तर मग माबोकर, आपणही कवितेकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहूया... माझे या विषयातील मर्यादित ज्ञान आणि चिंतन आणि तुमचा त्यातील अभ्यास याचा मेळ घालून ही चर्चा पुढे नेऊ या Happy

संदर्भः
http://www.poetrytherapy.org/articles/pt.htm
http://www.poetrytherapy.org/government_affairs.htm
http://www.poetryconnection.net/poets/W._H._Auden/18489
http://www.nccata.org/poetry_therapy.htm
http://www.poetrymagic.co.uk/literary-theory/freud.html
http://ecam.oxfordjournals.org/cgi/content/full/2/2/161
http://www.recover-from-grief.com/grief-poem.html
http://www.poetrymagic.co.uk/therapy.html
http://www.spcsb.org/pdfs/resources/a-poetry_as_therapy.pdf

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पेशवा, साष्टांग दंडवत!!
त्यामुळे "जरा जादा तिखा" अशी ऑर्डर सरसकट देण्यापेक्षा आपल्या चविचा कवी शोधावा>>> हा नियम पाळला गेला तर माबोवरचा काव्यकचरा, त्यावरच्या प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियांवरची भांडणे आपोआप संपतील.

अर्थात ज्या मनोवस्थेतून तो अकृतीबंध तयार झाला त्याच मनोवस्थेत वाचक पोचला पाहिजे हा अट्टाहास वा अपेक्षा चुकीची आहे. पण त्या कविच्या मनोवस्थेची उर्जा त्या आकृतीबंधतात उतरली असेल तर असा जाणिवांचा प्रवास वाचकाला जरूर अनुभवायला मिळतोच असा माझा अनुभव आहे.>>> केवळ शुद्ध प्रतिभा असल्याने हे होईल असे मला वाटत नाही, त्याबरोबर क्राफ्ट्समनशिपही आवश्यकच आहे. फक्त या दोन्हीतला बॅलन्स जाता कामा नये.

सानी, खूप छान धागा आहे.
कविता ( अर्थात ' पाडलेली ' नाही, मनातून आपोआप उतरलेली )....खरोखर कॅथार्सिसचं काम करते,असं मला वाटतं.
अरुंधती आणि पेशवा ह्यांच्या पोस्टस प्रचंड आवडल्या.
बराच जुना धागा खोदलाय मी. पण योगायोगाने ४-५ दिवसांपूर्वी साधारण असाच विषय निघाला होता.....कवितेला येणार्‍या प्रतिसादांवरून.
<<पण प्रतिसाद दिला तर कविला वाईट वाटेल, म्हणून प्रतिसाद देत नाही.>>.......खरं आहे. म्हणून तर मी सुद्धा मला न आवडलेल्या कवितांवर प्रतिसाद द्यायचं टाळते.
कारण मनापासून लिहिलेलं काहीही,कविता किंवा लेख, हे त्या लेखकाला स्वतःला प्रिय असणारच.शिवाय त्यातलं मर्म प्रत्येकवेळी दुसर्‍याला कळेलच,असं नाही.
वपु म्हणतात ते खरंय , " निर्मितीचा आनंद त्या एका क्षणापुरताच. त्यानंतर उरते ती कंटाळवाणी प्रोसेस."
( लिहिलेलं टायपा, प्रकाशित करा, मग बर्‍यावाईट प्रतिसादांच्या झुल्यावर झुलत रहा....:फिदी: )
मला वाटतं, लिखाण स्वान्तसुखाय असावं. ( हे मी मागे इथल्या एका कवीच्या विपुतही लिहिलं होतं.प्रतिसाद येत नाहीत म्हणून ते फारच चिडले होते ! )
मग असा प्रश्न येतो की, लिखाण स्वान्तसुखाय आहे तर प्रकाशित का करायचं?
इथे पोस्टायचं कारण इतकंच की आपल्यासारख्या आवडी असणारे लोक भेटतात.बरं वाटतं.
बाकी, कुठल्याही विषयावर चर्चेने फार सिरीयस मोड घेतला की झेपत नाही बुवा.
ज्याला कविता होतायेत, त्याला होऊ द्याव्या. ज्यांना वाचवल्या जातायेत त्यांनी वाचाव्यात. हाकानाका.:)
"एकच रंग सर्वांना रूचेल, ही आशाच चुकीची
प्रत्येकच गोष्ट मला जमेल,ही अभिलाषाच चुकीची."..( कवी माहीत नाहीत.)

Pages