सायबानू मीच त्यो .... भाग १

Submitted by मुरारी on 11 December, 2010 - 10:59

एक उदास संध्याकाळ "नागरगोजे" गावावर उतरू लागली होती, गेल्या पंधरवड्यात अशा काही घटना तिथे घडल्या होत्या कि ते छोटंसं गाव चांगलंच हादरून गेलं होतं.
"नागरगोजे" सोलापूर-बीड महामार्गावरील तालुक्याच एक ठिकाण . तालुक्याचं असलं तरी मुळ गाव लहानच, फक्त "उसाची मोठी बाजारपेठ" आणि "कोर्ट" यामुळे बऱ्यापैकी गजबजलेलं. त्या भागातली जमीन "अफाट सुपीक" मुख्य पिक हे "ऊस" . गावाच्या आजूबाजूला आता हळूहळू उसाचे कारखाने उघडू घातलेले होते.गावापेक्षा गावाबाहेरच्या लोकांचीच गावात गर्दी जास्त .. यामुळे एकदा संध्याकाळ होऊन सगळी लोक आपापल्या मुक्कामी परतली .. गाव परत चिडीचूप.... गावातल्या "बस स्त्यान्ड" वर काय ती तुरळक गर्दी असायची . तर अश्या या गावात गेला महिनाभर "किसन गणपत शेलार" हि केस चांगलीच गाजत होती.... सर्व कडे चर्चा फक्त याच आणि याच केसची.............................

अरे हणम्या , लेका बर्फ काय उद्या आणणार आहेस काय? आण लवकर......
"शेळके साहेब" आपल्या बंगल्याच्या बाहेर खुर्ची टाकून "black lable" उघडत होते. त्यांनाही गेल्या महिनाभराच्या घडामोडीचा बराच ताण आलेला. विषय तोच - "किसन गणपत शेलार"

सर्पन्च्याच्या सुनेवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोपातला मुख्य आरोपी आणि दोषी सुद्धा ......
त्यांच्या मनातलं विचारचक्र काही केल्या थांबत नव्हतं, संपूर्ण घटनाक्रमच असा काही घडला आणि इतक्या वेगाने घडला कि बापरे....... त्यांनी सुद्धा अशी अपेक्षा केली नव्हती.म्हणूनच आजची रात्र "मदिरेच्या" आश्रयात घालवण्याचा त्यांचा निर्णय झालेला होता.....
"शेळके साहेब" ,वय - ५५ च्या पुढे, पेशाने "न्यायाधीश - State Court " , बेताची उंची, स्थूल शरीर, चेहऱ्यावर एकप्रकारचा बेरकी भाव, कदाचित इतकी वर्ष काम केल्याने सतत समोरच्या माणसाला पारखण्याचा चाळा लागलेला. स्वभाव अतिशय हलकट. जिथून खाता येईल तिथून खायचे, आणि प्रकरण अंगाशी आलेच तर मिटवायला दुसऱ्याला खिलवायचे. प्रसंगी "साम दाम दंड भेद" याचा वापर करायलाही हा माणूस मागे पुढे पाहत नसे.
सरकार दरबारी सुद्धा याचा एवढा वचक होता, कि त्याला अजून काढून टाकायची कोणाची हिम्मत झालेली नव्हती. पण यावर एक उपाय म्हणून राज्य सरकारने त्यांची बदली या गावात केलेली होती. ते मुळचे कोल्हापूरचे, त्यामुळे कोल्हापूरसारख्या "खादाडीच्या" शहरातून इथे या छोट्या तालुक्यात टाकल्याबद्दल प्रचंड संताप संताप झालेला होता त्यांचा. त्यांनी जीवतोड प्रयत्न केले , बदली टाळण्याची पण यावेळी त्यांना अपयश आले. ते शेवटी या गावात येऊन पडलेच.
अचानक "टाSSSSSSSण" असा स्वयंपाक घरात भांडी पडल्याचा आवाज झाला. साहेब एकदम दचकले.
"अरे भोसडीच्या , काय चालवलाय काय?
"साहेब काय नाय , एक मांजर हाय हिथ , त्याने समदी भांडी पाडली"... हनम्याने बाहेर धावत येत उत्तर दिलं, त्याच्या हातातल्या भांड्यात बर्फ होता.
"साहेब एक मांजर येतया ५ ६ दिवसांपासून आधी ते बाहेरच असायचं, आता आत सुद्धा यायला लागलंय."
"अरे मग हाकलाव ना त्याला"
"आवो साहेब ,त्याला रोज हाकलवून देतुया मी, तरी पन ते येत कुठून काय बे समजना झालंय, रोज जाताना ,आतल्या सर्व खिडक्या दार लावून जातो मी, आनी आनी ..हणम्या चाचारतो , पन ...................

आता त्याच्या डोळ्यात भय दाटलेलं असतं....
"आनी आनी काय ? बोल ना पुढे गाढवा.. "साहेब वैतागतात"
आताशा मला त्याच्या "हिरव्यागार" डोल्यान्च लय भय वाटून राहतंय. हणम्या पुटपुटतो.
"हात लेका , मर्द सारखा मर्द तू, आनी मांजराला घाबरतोस ?
नाही साहेब, हल्ली गावात महिन्याभरापासून "सुतकी कला" आलीय , तेव्हापासून जास्तच भ्या वाटून राहिलिया.
साहेब मी जेवण "फ्रीज" मध्ये ठेवून दिलाय , ते घ्या.. मी निघू? हनम्याला हल्ली दिवस मावळायच्या आत घरी जायची घाई लागलेली असते , हि गोष्ट "साहेबांच्या " नजरेतून सुटत नाही . ठीक आहे जा तू.
हणम्या डोक्याला मुंडासं बांधून निघून जातो, त्याची आकृती दूर दूर जात नाहीशी होईपर्यंत "शेळके साहेब" इथे टक लावून बघत असतात .... बाहेर गार वाऱ सुटलेलं असतं, साहेब डोळे मिटून घेतात, आनी परत भूतकाळात शिरतात,
एक एकर जमिनीवर वसलेलं गावातलं कोर्ट गावापासून तसं बाहेरच, संध्याकाळी ५ ला कोर्टातली तुरळक कामं संपली, कि उरली सुरली लोक निघून जात. मग ती "कोर्टाची ३ मजली भव्य दगडी इमारत" उगाचच भकास जाणवू लागे. कोर्टाच्या मागेच अधिकार्यांसाठी ४ ५ "क्वार्टर्स" बांधलेल्या होत्या. "क्वार्टर्स" कसल्या
,छान बंगलेच होते ते. खाली चार खोल्या , वरती दोन, आणी छोटीशी गच्ची. पुढे मागे झकास मोकळी जागा, मस्त बाग फुलवली होती तिथे, त्याच बागेत एक छान मोठा "झोपाळा", पण आपल्याला हा झोपाळा काय कामाचा, लहानपणी एकदा याच्यावरून पडलेलो होतो, तेव्हापासून याच्या बद्दलची जी भीती मनात दाटलिये ती अजून आहे... मगाशी मारे आपण हन्म्याला चिडवत होतो,
आपण सुद्धा घाबरतोच कि ..... असा मनात विचार येताच "शेल्क्यांना" पुन्हा आपल्या एकटेपणाची जाणीव झाली. बाजूलाच चिंचेचा मोठा वृक्ष होता , त्यावरची पक्ष्यांची "किलबिल", आणि दूर शेतातल्या चालू असलेल्या "मोटर" चा आवाज , याचीच साथ त्यांना होती,
मधेच त्यांना वाटलं, कि काढावी गाडी, आणि जाऊन येव गावात, उगाच एक फेरफटका ... पण केसचा निकाल लागल्यापासून गावकरी वेगळ्याच नजरेने त्यांच्या कडे पाहत, ते खूप दुर्लक्ष करायचे, ठरवायचे, आपल्याला कुठे इथे कायमचं राहायचं, पुढच्या वर्षी ट्रान्स्फर मिळवून , निदान सातारा तरी पदरात पडून घेऊच.
तरीही, एक प्रकारची टोचणी जीवाला लागलेली असायची.. आणि याचं कारण त्यांना चांगलाच माहित होतं, पण त्यांना आता हा विचार करायचा नव्हता.
त्यांनी एक मोठा पेग बनवून तोंडाला लावला.... डोक्यात जरा हलल्यासारख झालं, पण बरं सुद्धा वाटलं
तिन्हीसांजा झालेली होती... भणाण वारं सुटलं होतं.. दूरवर गावात दिवे दिसत होते. "बापरे आपले पहिले २ महिने कसले भयानक गेले, सवयच नव्हती या शांततेची, "शेळक्यांनी ग्लास तोंडाला लावला, त्यांना जरा तरतरी आली. पण इथे मात्र काहीच काम नसायचं, फालतू भांडणांच्या किंवा
मालमत्तेसंबधीच्या केसेस .. वर्षानुवर्षे चाललेल्या..... काहीच थिल नाही यात .. "खादाडी" तर मुळीच नाही, साले हेच कफल्लक आपल्याला काय देणार ? शेळके विचारात बुडलेले होते. वर बायका मुलानी आपल्याबरोबर या अडाणी गावात यायला स्पष्ट नकार दिलेला, बरोबर आहे, त्यांना कसा जमणार, आपल्यालाच किती कष्ट पडले इथे रुळायला, शिवाय स्वप्नील चं "कॉलेज" ते कसं सोडणार तो? पण आपण मात्र रुळलो, हि शांतता आवडायला लागली , आणि ती केस दाखल झाली " किसन गणपत शेलार - बलात्कार आणि खून प्रकरण " साला आपला आयुष्य ढवळून निघालं या केस ने ..............तेवढ्यात "म्यांव ........ " या आवाजाने शेळके साहेब खाडकन दचकले ... खाली बघतात तो त्यांच्या पायाशी

काळ्या रंगाची, आणि हिरव्याजर्द डोळ्यांची" दोन मोठी आणि दोन लहान मांजर , त्यांच्याकडेच रोखून बघत होती.....

गुलमोहर: 

वाचतो आहे.
हा भाग छोटा झाल्यासारखा वाटतो आहे.

"आनी आनी काय ? बोल ना पुढे गाढवा.. "साहेब वैतागतात"
आताशा मला त्याच्या "हिरव्यागार" डोल्यान्च लय भय वाटून राहतंय. हणम्या पुटपुटतो. >> पन्क्चुएशन मार्क व्यवस्थित लिहिल्यास वाचायल बर पडेल.
पु.ले.शु.

अध्ये मध्ये वर्तनमानकाळातली वाक्ये घातलीत. ते वाचताना खटकतंय. नाटकाची पटकथा लिहिताना वातावरणनिर्मिती करीता अशी वाक्ये वापरतात ना!!!

उदा.
आता त्याच्या डोळ्यात भय दाटलेलं असतं....
......साहेब वैतागतात
.......हणम्या पुटपुटतो.

इ.

...