राजसगाणी
पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही. ...
.... उलट तिला तर सौंदर्याची, जीवननिष्ठेची अनादि, अनंत अशी धुंद भुरळ पडलेली! मनाच्या गाभ्यात उत्कट आनंदाचा आणि चैतन्याचा लामणदिवा सतत तेवता! गाढ सुखांनी भरुन येणारी आणि मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करणारी ही कविता. ती प्रीती व्यक्त करताना तरी संकोच का बाळगेल? आणि प्रीतीतून उमलणार्या रतीचे आदिम आकर्षण नाकारण्याचा करंटेपणा तरी का करेल? प्रीती आणि रती तितक्याच ताकदीने, तरलतेने आणि संवेदनक्षमतेने उलगडत नेणारी, आणि इंद्रियानुभवांमध्ये समरसणारी ही कविता. तिने अनुभवलेल्या इंद्रदिनांचा प्रभाव तिच्या मनपटलावरुन पुसून जायलाच तयार नाही!
इंद्रदिनांचा असर सरेना
विसरु म्हटल्या विसरेना
चंद्रमदिर जरी सरल्या घडी त्या
स्वप्नांची लय उतरेना...
जीवनाबद्दलची आसक्ती, ऐहिकाबद्दलचे प्रेम व्यक्त करताना संकोच कसला? ह्या कवितेला रतीभावना प्रिय आहे आणि प्रीतीभावना हा तर तिचा प्राण आहे... आणि तरीही, ह्या रती प्रीतीत गुरफटून जात असतानाही, जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीवही सुटलेली नाही. तेही शाश्वत बनवायचे आहे, तेही ह्या रती प्रीतीच्या साक्षीनेच!
क्षणभंगूर जरी जीवन सखे
सुखसुंदर करु आपण
सखे गऽ शाश्वत करु आपण....
शरीराची असक्ती, शृंगार नि:संकोचरीत्या व्यक्त करताना ही कविता धुंद शब्दकळेने नटते, पण तरीही तिचा कुठे तोल सुटत नाही की कुठे शब्द वाकुडा जात नाही. मनापासून, हृदयातून उमटलेल्या शब्दांमधे नावालादेखील हीण सापडत नाही...
तुझे वीजेचे चांदपाखरु दीपराग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात..
किंवा,
केळीचे पान पहा उजळ किती, नितळ किती
वाळ्याने भिजलेले उर्वशीचे वस्त्र उडे,पौषातील उन गडे....
हृदयातून उमाळत, उसासत येणार्या उत्कट भावना आणि इंद्रियाधिष्ठित संवेदना शब्दांतून अलगद जिवंत करणारी ही प्रत्ययकारी कविता.
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी
पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पार्यासम अंगातील वासें
आणि तरंगत डुलू लागली नौकेपरी शेज
तो कांतीतूनी तुझ्या झळकले फेनाचे तेज
नखें लाखिया, दांत मोतिया, वैदूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र
कात सोडिल्या नागिणीचे ते नवयौवन होतें
विलख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें
गरळ तनूतील गोठूनी झाले अंतरांत गोड
कळले का मज जडते देवां नरकाची ओढ
आणि तरीही केवळ शृंगार भोगात आणि इंद्रियाधिष्ठित अनुभवांच्या आसक्तीत गुंतून राहणारी ही कविता नव्हे. तिची अनुरक्ती केवळ भोगविलासापुरती मर्यादित नाही. त्यापलिकडे जाणार्या चिरंतन सहजीवनाची आणि स्निग्ध, समंजस अशा समर्पित नात्याची तिला जाणीव आहे. भान आहे, मोह आणि आकर्षणदेखील आहे.
तुला मला उमगला जिव्हाळा जन्माचा पट फिटला गं,
अन् शब्दांचा प्रपंच सगळा कमळासम हा मिटला गं...
तिच्या अंतरंगात प्रीतीचा अमृतझरा सतत झुळझुळत वाहता आहे..
प्रीत वहावी संथ ध्वनीविण या तटिनीसारखी
नकळत बहरावी या हिरव्या तृणसटिनीसारखी
स्पर्शकुशल झुळुकेसम असूनी कधी न दिसावी कुणा
तिल असावा या घंटेचा सूचक शीतलपणा
तिने फिरावे या खारीसम सहजपणे सावध
ऊनसावलीमधून चुकवीत डोळ्यांची पारध...
तिने अंतरंगातली माया, प्रेम जाणले आहे. शरीराच्या तृष्णेवीण रस कुठला प्रीतीला हे सांगणारी ही कविता, आयुष्याच्या शेवटीही आपले चिरतारुण्य जपते, आपल्या सखीच्या लावण्याला ती चिरवश आहे.. सखीच्याच हाताची सोबत घेऊन ह्या कवितेला गतायुष्याच्या आठवणींत रमायचे आहे. तिच्याबद्दलची कृतज्ञता आणि मनातून ओसंडून जाणारे प्रेम व्यक्त करायचे आहे...
शरदातील ओढ्यासम निर्मल
तुझा नि माझा ओढा
चार तपांनंतरही तू मज
सोळाचीच नवोढा...
सखीचा हात कधी मधेच सोडून द्यावा लागेल की काय किंवा सुटला तर ह्या भावनेने ती हुरहुरते तर खरीच, पण कधीतरी निसर्गनियमाप्रमाणे ताटातूट होणार हे सत्यदेखील ही कविता जाणते. असं असलं तरीसुद्धा आता सखीच्या अस्तित्वाने तिचे भावविश्व अष्टौप्रहर, अंतर्बाह्य असे काही व्यापले गेले आहे, की आता ताटातूट तरी होईलच कशी?
तशी आठवण येत नाही... भेटीचीही काय जरुर?
सूर वाहे ऊर भरुन, घरातदेखील चांदणे टिपूर
इतके दिवस हसतरुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळले खोल खोल माझ्याच दृष्टीत मिटली आहेस
अंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत
कधी कामात, कधी गाण्यात फुलता फळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर.... अष्टौप्रहर तुझ्यात असतो...
आणि तरीही, रसरंगात आणि प्रीतीत गुरफटून जाणार्या ह्या कवितेने मनात एक गोसावीपणही जपले आहे.
अर्थात, जगाला विटून, संसाराचा उद्वेग, उबग येऊन, वैतागून आलेले हे वैराग्य नव्हे. नाही म्हणायला जगाचे अनुभव, बर्या वाईटाचे संचितही आता गाठीशी भरपूर जमा झालेत. तिला कधीचे बरेच काही उमजले आहे.. जरी सगळ्यांत अजून ती रमते आहे, तरीही त्यातून दूरही होते आहे.
कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कशा मूर्ती सार्या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?
हळूहळू सगळ्यांत असूनही नसण्याची मजा तिला उमगली आहे, सगळ्यांत नसूनही असता येते हेही लक्षात आलेय. तिला उमजलेय की आज जे असेल ते उद्या असेलच असे नाही, आयुष्याचं कोडं उलगडेलच असंही नाही. काही अक्षत टिकेल असंही नाही. स्वतःच्याच मनाचा भरवसा देता येत नाही, मग दुसर्यांचा कोणी द्यावा?
मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....
ज्ञात अज्ञाताचा पाठशिवणीचा खेळ आता तिच्या नजरेच्या टप्प्यात आलेला आहे, त्या अफाट पसार्याची कळत नकळत पुसटशी जाणीव झालीये आणि आपल्या अट्टाहासांच्या मर्यादाही जाणवल्यात. आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी हे जाणवून सारं कसं लख्ख समोर आलं आहे...
शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...
तिची काही तक्रार नाही, आता काही मागणी नाही, इच्छा नाही. जे काही आयुष्य पुढ्यात आले, जसे काही दान पदरात पडले त्यात सर्वांतच लावण्याची जत्रा शोधणारी ही कविता. आता तिला अलौकिकाची कळा चढली आहे. ती शेवटचे ऋण व्यक्त करते आहे. अंतर्बाह्य शब्दसौंदर्याने सजून झाल्यावर आता उरले तरी काय?
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
उमलल्या शब्दी नवीन पहाट
पावलांत वाट माहेराची.
अंतर्बाह्य आता आनंदकल्लोळ
श्वासी परिमळ कस्तुरीचा
सुखोत्सवी अशा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे....
समाप्त
सुं द र
सुं द र
सुंदरच, शैलजा, कोणाच्याही
सुंदरच,
शैलजा, कोणाच्याही कवितांवर बोलण एवढ सोप नसत खरतर, मला तर ते कधीच जमत नाही. मी फक्त आवडली आणि नाही आवडली एवढच बोलू शकते. पण तू फार मस्त लिहित्येस. आवडलं.
सुरेख झालाय लेख! पुढील
सुरेख झालाय लेख! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
सुंदरच लिहीलेय.
सुंदरच लिहीलेय.
कोणाच्याही कवितांवर बोलण एवढ
कोणाच्याही कवितांवर बोलण एवढ सोप नसत खरतर >> सहमत.
मला दोन्ही लेख आवडले. तू मस्तच लिहित आहेस.
शैलु, काय सुंदर लिहितस गो.
शैलु, काय सुंदर लिहितस गो. संपुच नये असा वाटता. खूप सुंदर. संगणका सारख्या रुक्ष क्षेत्रात काम करत आसताना कवितेचा ईतक्या मर्मग्राही रसग्रहण केलसं, सलाम तुका! असांच लिहित रव.
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.
शरदातील ओढ्यासम निर्मल तुझा
शरदातील ओढ्यासम निर्मल
तुझा नि माझा ओढा
चार तपांनंतरही तू मज
सोळाचीच नवोढा >>
हा काळच वेगळा होता, हे पुन्हा पुन्हा जाणवते. माझ्यासाठी बोरकर तिथेच थांबतात. लय, शब्दकळा आणि गोडवा. एक प्रकारचे balm for the soul.
छान. लिहीत रहा. वाचते आहे.
>>balm for the soul>>अगदी
>>balm for the soul>>अगदी रैना.
सुरेख लिहीत्येस शैलजा.
सुरेख लिहीत्येस शैलजा.
शैलजा,खूपच छान. तुझ्यातला हा
शैलजा,खूपच छान. तुझ्यातला हा पैलु माहित नव्हता इतके दिवस.
मया अरे तिचे जुने लेख आठव की
मया अरे तिचे जुने लेख आठव की .. ये परतीचा वारा. कोकणसय !
अरे नंद्या,मी कविता
अरे नंद्या,मी कविता रसग्रहणाबद्दल बोलतोय .
शैलु मस्तच लिहिलय्स ग. शामली
शैलु मस्तच लिहिलय्स ग.
शामली ला अगदी १००% अनुमोदन
स्मिता, नंदूशेट
स्मिता, नंदूशेट धन्यवाद.
मयुरेश, हो क्का? बरं बरं
मस्त लिहीलयस. श्यामलीला
मस्त लिहीलयस. श्यामलीला अनुमोदन